मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
सोवळ्या-ओवळ्याचे निर्बंध कुठल्या देवाला लागतात ?

गुरूचरित्र - सोवळ्या-ओवळ्याचे निर्बंध कुठल्या देवाला लागतात ?

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


'देव' शब्दाच्या अर्थाने इतका घोटाळा माजविला आहे की सांगतां सोय नाहीं. पण हा घोटाळा साधुसंतांनीं व वेदान्तशास्त्रानें काढून टाकला असून देवाचें सत्य स्वरूप सोज्जळ रीतीनें दाखविलें आहे. त्याच्या साक्षात्काराचे मार्गही सांगून दिले आहेत. पण हे पाहाणारे व ऐकणारे थोडेच असतात. देखोदेखी भक्ति गं करणारेच जास्त ! देवाचीं निर्गुण व सगुण अशीं दोन स्वरूपें आपल्या शास्त्रांत सांगितलीं आहेत. निर्गुण-निराकार देवाला भजण्याचे मार्ग व सगुण साकार देवाला भजण्याचे मार्ग भिन्नभिन्न आहेत. सगुणांतही पुनः 'स्वयंभू' सगुण व 'कृत्रिम' सगुण असे दोन भेद आहेत. याचा विचार जाणला पाहिजे. स्वयंभु म्हणजे स्वतः सहजपणें असलेला, आणि कृत्रिम म्हणजे 'आपण केलेला.' सृष्टींत स्वतः सहजपणे वीज सर्वत्र आहे, तिला 'स्वयंभू' वीज म्हटली, तर आपण यंत्राच्या साह्यानें जी बीज तयार करितों तिला 'कृत्रिम बीज म्हणतां येईल. ह्या कृत्रिम विजेला उत्पत्ति आहे, स्वयंभु विजेला उत्पत्ति नाहीं, ती अनादि आहे आणि म्हणूनच तिला स्वयंभु म्हणतात. कृत्रिम बीज यंत्राच्या साह्यानें तयार करावी लागते. तिला एकीकडे साठवितां येतें व पाहिजे तिकडे पाठवितां येतें. वातावरणांतील स्वयंभु विजेंत आपण निर्भयपणे वावरत असतों, कारण ती 'अव्यक्त' असते. पण कृत्रिम विजेशीं वावरतांना योग्य नियम पाळावे लागतात, कारण ती जडद्रव्याच्या साह्यानें ‘व्यक्त' झालेली असते. आगपेटीतील एका काडींत सर्व घर किंवा गांव जाळण्याची शक्ति असते, पण ती 'अव्यक्त' असते. म्हणून त्या काड्यांची पेटी म्ह. अव्यक्त अग्नि आपण खिशांत बाळगूं शकतो. पण तोच घर्षणानें 'व्यक्त' केला म्हणजे ती पेटलेली काडी खिशांत ठेवतां येत नाहीं. अव्यक्त वीज किंवा विस्तू यांच्याकडे वागतांना पाळण्याचे नियम निराळे आहेत. याचप्रमाणे स्वयंभू देव व कृत्रिम देव अथवा अव्यक्त व व्यक्त देव यांच्याकडे वागतांना पाळण्याचे नियम निराळे आहेत. (सर्वव्यापी सच्चिदानंद वस्तु हें देवाचें निर्गुण स्वरूप व श्रीराम-कृष्ण-नृसिंहादि अवतार हें त्याचें सगुण स्वरूप. सत्-चित्-आनंद हें देवाचें 'स्वरूपलक्षण’ व अवतार हें 'तटस्थलक्षण' समजावें. त्याचप्रमाणे देवाचे अवतार हे 'स्वयंभू' सगुण व अवताराच्या आम्हीं केलेल्या मूर्ति हें 'कृत्रिम’ सगुण समजावें.)
कृत्रिम विजेचा प्रवाह तांब्याच्या तारेंत सांठवितां येतो, त्याप्रमाणें अव्यक्त देवाला व्यक्त करून मूर्तीत बसवितां येतें. वीज उत्पन्न करण्याचा जसा प्रयोग आहे, तसा प्रतिमेत देवकला आणण्याचाही प्रयोग आहे. त्याला 'प्रतिष्ठाप्रयोग' म्हणतात. तांब्याची तार म्हणजे जशी वीज नव्हे, तशी मूर्ति म्हणजे देव नव्हे. पण तारेंत वीज असते तशी प्रतिमेंत देवकला असते. ही देवकला ज्या प्रतिमेंत आपण जागृत केलेली असते, त्या प्रतिमेची पूजा अर्चा वगैरे करण्यांत योग्य ते नियम पाळावे लागतात व ते कल्याणाचे असतात. देवकला जागृत झालेल्या प्रतिमेचे प्रत्यय येऊ लागतात. प्रतिमेंत देवकला उत्पन्न झाली कीं नाहीं हें पाहाण्याची कसोटीही ह्या प्रयोगशास्त्रांत सांगितली आहे. जाणणारे हें जाणतात व करणारे करितात. काशींतील विश्वेश्वर, गोकर्णचा महाबळेश्वर किंवा पंढरीचा पांडुरंग इत्यादि कांहीं कांहीं क्षेत्रांतील प्रतिमेला स्पर्श करून पूजा करण्याचा अधिकार सर्व वर्णाला आहे. तसा इतर देवालयांतील प्रतिमेला स्पर्श करण्याचा अधिकार सर्वोना नाहीं. कारण त्या त्या वेळच्या व त्या त्या ठिकाणच्या प्रतिष्ठाप्रयोगांत व प्रयोगकर्त्यांनीं त्या वेळीं ठरविलेल्या नियमांत व संकल्पांत भेद असतो. परंपरेने त्या नियमांचे ज्ञान अथवा ते नियम चालत आले आहेत. ते पाळले पाहिजेत. त्यांत "आपुल्या मतें उगिच चिखल कालवू नये रे" ही संतांची सूचना नेहमीं लक्षांत ठेवून वागणें सर्वांच्या कल्याणाचे आहे.
ह्या नियमांचा विचार तन्त्रशास्त्रांत फार सूक्ष्मपणाने व विस्तृत रीतीनें केलेला आहे. तो ज्यांनीं पाहिला असेल त्याला प्रतिमापूजेचें रहस्य समजून येईल. परंतु हल्लीं, ज्या शास्त्राचे आपण एक अक्षर किंवा एक रेषाही पाहिली नाहीं, असा मनुष्य त्या शास्त्रांतील एखाद्या मुद्दयावर 'माझे मत असे असे आहे' म्हणून बेधडक सांगत असतो ! व त्याच्या लौकिक योग्यतेवर वा दुसर्‍या शास्त्राच्या किंवा विद्येच्या प्रावीण्यावर लोक ते प्रमाण मानूं लागतात! एखादा मोठा एम्. डी. डॉक्टरही झाला, तर त्याला कायद्याच्या नाजूक प्रश्नावर बोलण्याचा अधिकार येत नाहीं; तेथे ब्यारिस्टरच पाहिजे. त्याचप्रमाणें एखादा मोठा ब्यारिस्टरही झाला, तर नर्मदेचा पूल मोडल्यास त्याच्या दुरुस्तीच्या प्रश्नावर त्याला अधिकारानें बोलतां येणार नाही; तिकडे एंजिनियरच पाहिजे. त्याचप्रमाणें ज्यानें ज्या शास्त्राचा अत्यंत परिश्रमानें खोल अभ्यास केला असेल, त्यालाच त्या शास्त्रावर अधिकारानें बोलण्याचा हक्क प्राप्त होतो व तशा पुरुषाचेंच त्या शास्त्रावरील मत प्रमाण मानलें जाते. आपले तंत्रशास्त्र हें प्रयोगशास्त्र आहे. या शास्त्राचा खोल अभ्यास कलकत्त्याचे प्रसिद्ध जस्टिस बुड्रॉफ साहेब यांनी केला असून त्या शास्त्राचे प्राचीन संस्कृत ग्रंथही त्यांनीं छापून प्रसिद्ध केले आहेत. त्यांची त्या शास्त्रांतील गति पाहून आमचे मोठे मोठे विद्वान शास्त्री पंडितही माना डोलवितात. तन्त्रशास्त्र हें किती अफाट शास्त्र आहे व त्याचें वाङ्मयही किती विशाल आहे त्याची कल्पना ज. वुड्रॉफ साहेबांनीं त्याकरितां वाचलेल्या ग्रंथांवरून देखील लक्षांत येईल. कोणत्याही ग्रंथांचा अथवा विद्येचा इतक्या आस्थेनें अभ्यास करण्याची प्रवृत्ति त्या लोकांसारखी आमच्या लोकांत क्वचित् दृष्टीस पडते. आमच्यांतील विद्वान लोक आपणांस जें आकलन होत नाहीं अथवा कळत नाहीं तें खोटेंच असले पाहिजे असें बेधडक म्हणतात व तसें म्हणणें हें एक समंजसपणाचे लक्षण समजलें जाते! (याबद्दल ज. बुड्रॉफ म्हणतात- There is a widely diffused lower mind which says, * What, I do not understand is absurd !') असो. तंत्रशास्त्र हें प्रयोगशास्त्र असल्यामुळें तें प्राचीन लोकांनीं शक्य तेवढें गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कांहीं अनधिकारी-स्वार्थी लोक त्याचा अभिचाराच्या रीतीने दुरुपयोगही करूं लागले; त्यामुळेंही सर्वसामान्य लोकांच्या हिताकरितां तें गुप्त राखावें लागले, त्याचा परिणाम तें लुप्तप्राय होण्यांत झाला. पण ईश्वरी संकेत तसा नसल्यामुळे ज. वुड्रॉफच्या मनांत या शास्त्राचा शोध व अभ्यास करण्याची प्रेरणा झाली. दुसरें कालाच्या ओघांत आपल्या शास्त्रीपंडितांवरील लोकांचा विश्वास कमी होत जाऊन, पाश्चात्य गोन्या कातड्यावर तो जास्त बसत चालला; म्हणूनच न जाणों त्या कातड्याकडून आपल्या शास्त्राची तत्त्वें बोलली जावीं अशी ईश्वरानें योजना केली. पुनः असेंही म्हणण्यास हरकत नाहीं कीं, आपल्यांतील ज्या थोर आर्यांनी ही गूढ शास्त्रें निर्माण केलीं होतीं, त्यांनाच त्या देशांत जन्माला घालून (जगांतील सर्व मानव जातीस याचा फायदा मिळावा म्हणून) त्यांच्याकडून तीं वदविलीं. एकंदरीत विचार केला असतां असे वाटतें कीं, आर्य जीवात्मे पाश्चात्य देशांत जन्माला आले, तसे पाश्र्वत्य देशांतील अनार्य जीव ह्या आर्यभूमींत आर्याच्या पोटीं जन्माला आले. अशा अनार्य जीवांकडूनच आर्याच्या धर्माची निंदा वा उच्छेद होत आहे ! नसलेस आपली गीता व उपनिषदे यांचा अभ्यास करणारे महात्मे त्या देशांत दिसतात, याच्या उलट गीताउपनिषदादिकांची निंदा करणारे या देशांत दिसतात, असें दिसलें नसतें ! असो. विषयांतराच्या भीतीनें हा विषय एवढ्यावरच पुरा करून मुख्य मुद्दयाकडे वळतों.
देवप्रतिष्ठाशास्त्राच्या प्रयोगाने ज्या प्रतिमेंत आम्ही देवकला जागृत अथवा उत्पन्न केली आहे, ते आम्ही 'केलेले देव' समजावे. अशा देवांनाच सोवळ्या- ओवळ्याचे व स्पर्शास्पर्शाचे नियम लागतात; स्वयंभू देवाला लागत नाहींत. ह्या देवांची प्रत्यक्ष पूजाअर्चा करणार्‍या अर्चकाने फार शुचिर्भूतपणाने वागावें लागतें. ‘‘देवतानां तु सांनिध्यं अर्चकस्य तपोबलात्" असें शास्त्रवचन आहे. याचा अर्थ अर्चकाच्या तपोबलावर प्रतिमेंत देवतांचे सांनिध्य अवलंबून असतें, असा आहे. याकरितां अर्चकाने अंतर्बाह्य शुचित्वानें वागलें पाहिजे, तो जर शास्त्रांतील हे शुचित्वाचे म्हणजे सोवळ्या ओवळ्याचे नियम पाळणार नाहीं, कोणत्याही लोभानें
----
‘‘आमिरस्याच्च मूर्तीनां, अर्चनस्यातिशायित्तात् । अर्चकस्य तपोयोगाद्देवः सांनिध्यमृच्छति  ॥" (अर्थ) मूर्तीच्या सौंदर्यातिशयाने, अर्चनोपचार विपुल केल्यानें व अर्चकाच्या तपोयोगाने मूर्तीमध्ये देवतासांनिध्य उत्पन्न होते, असेंही शास्त्रवचन आहे. या गोष्टीचा मूर्तिपूजकानें विचार केला पाहिजे.
असा शास्त्रवचन आहे. या गोष्टीचा मूर्तिपूजकाने विचार केला पाहिजे.
----
वा मोहानें तो भ्रष्टपणानें वागेल तर त्याचें कल्याण होणार नाहीं. देवालयांतील अशा पुष्कळ अर्चकांच्या कुटुंबांचा नाश झालेला पाहाण्यांत आहे. एखादा फोटो ठेवून करावयाची भक्तिभावाची पूजा निराळी आणि शास्त्रोक्त प्रतिष्ठा करून स्थापलेल्या मूर्तींची विध्युक्त पूजा निराळी. 'भक्तिभावाच्या' पूजेला फारशीं बंधनें नसतात, पण ‘तंत्रोक्त' विध्युक्त पूजेला त्यांची गरज असते. काशीपासून रामेश्वरापर्यंतच्या प्राचीन देवालयांतील पूजाअर्चा मंत्र व तंत्र यांच्या मिश्रणानें चाललेल्या आहेत. उत्तरेपेक्षां दक्षिणेंतील देवालयांत मंत्रापेक्षां तंत्राचेंच प्राधान्य फार आहे. पुनः दुसरा विचार असा आहे कीं, सर्व देवता सारख्या जातीच्या व सारख्या स्वभावाच्या नाहींत. त्यांची स्वरूपें भिन्न, तसे त्यांचे स्वभाव व आवडीनावडीही भिन्न आहेत. त्या ओळखून त्याप्रमाणें वागलें पाहिजे. गणपतीला दूर्वा प्रिय, शंकराला बेल प्रिय, विष्णूला तुळसी प्रिय इत्यादि विचार शास्त्रांत सांगितलेला प्रसिद्ध आहे. (गु. च. च्या ३७ व्या अध्यायांत याविषयींचें वर्णन आले आहे.) 'थोरल्या देव’ म्हणजे जगन्नियंता 'ईश्वर' हा एकच आहे. ईश्वर हा एकच, पण त्याच्या शक्ति अनंत आहेत. भिन्न भिन्न देव म्हणजे त्या परमात्म्याच्या भिन्न भिन्न शक्ति होत, ही गोष्ट लक्षांत ठेविली म्हणजे आपल्या हिंदुस्थानांत 'तेहतीस कोटि देव' म्हणून बिचकून जाण्याचें व नाक मुरडण्याचें कांहीं कारण नाहीं. ह्या भिन्न भिन्न देवतांपैकी काहीं सात्त्विक, कांहीं राजस व कांहीं तामस आहेत. तामस देवतांना मद्यमांसादि पदार्थांचा नैवेद्य लागतो म्हणतात. त्यामुळे त्यांच्यापुढे मेघादिकांचे बळी देण्याची वहिवाट पडून गेली आहे. अशा कांहीं देवदेवतांची दृष्टि श्रीशंकराचार्यांनी त्यांच्यापुढे 'यंत्र' स्थापन करून त्या यंत्रावर खिळून ठेवून तिकडील पशूंचा बलिदान विधि बंद करून टाकला आहे असें सांगतात. प्रत्येक देवतेचें यंत्र निराळें असतें. देवाच्या प्रतिमेपेक्षां देवाच्या ह्या यंत्रांत त्या देवतेचें अधिक सांनिध्य असतें म्हणतात. प्रत्येक देवतेच्या यंत्राची आकृति (रेषात्मक आकृति) निरनिराळी असते. हे यंत्र भूर्जपत्रावर किंवा तांब्याच्या पत्र्यावर काढून त्यांत निरनिराळ्या विवक्षित स्थानांवर निरनिराळीं बीजाक्षरें लिहावी लागतात. अशा यंत्राचीं विशिष्ट विधीनें पूजा करून त्यावर दृष्टि ठेवून त्या देवतेच्या मंत्राचा विवक्षित संख्येचा जप करावा लागतो. अशा रीतीनें तें यंत्र 'सिद्ध' करून मग त्या यंत्रावर ती प्रतिमा स्थापन करावयाची असते. हें यंत्रशास्त्रही एक स्वतंत्र शास्त्र आहे. हें यंत्र, मंत्र व तंत्रशास्त्र आमच्या पूर्वजांना चांगलें माहीत होतें. या शास्त्राच्या आधारेंच त्यांनी त्यावेळी सामुदायिकरीत्या आपल्या व आपल्या पुढील पिढीच्या कल्याणाच्या संकल्पाने देवतांची म्हणजे कल्याणकारी शक्तीची विशिष्ट रूपांत स्थापना करून ठेवली आहे. हेच मग त्या त्या मंडळाचे (गटाचे) 'कुळदेव' होऊन बसले. कुलपरंपरेनें त्या त्या दैवताला भजण्याची वहिवाट पडून गेली. अशा रीतीनें स्थापन केलेली कुळदेवता ही त्या त्या कुळाची अभिमानी असते. म्हणून प्रत्येकानें आपल्या कुळदेवतेला आधीं भजलें पाहिजे. कालांतरानें, पूर्वजन्म संस्काराने किंवा अन्य संगतीनें 'इष्टदेव' अथवा 'उपास्यदेव' म्हणून निराळा होतो. तथापि कुळदेवतेस विसरता कामा नये. कारण ती देवता कुलाची अभिमानी असते. 'अनिष्टनिवृत्तिपूर्वक इष्टप्राप्ति' करून देण्याची भाक त्या देवतेकडून पूर्वजांनी घेऊन ठेवलेली असते. असो.
अशा देवतांची शरीरें (प्रतिमांतर्गत देवताशक्ति) आमच्यापेक्षां अत्यंत सूक्ष्म व दिव्य परमाणूंची असतात. त्यांना स्पर्श करण्याला आमचें शरीरही तसेंच पवित्र ठेवावें लागतें. नुसत्या स्नानानें शरीर 'स्वच्छ' होते, मंत्रोक्तस्नानानें तें 'पवित्र' होते. अशा रीतीने पवित्र केलेलें शरीर पुरुषसूक्तादिकाच्या न्यासानें देवतारूप करावें लागतें. नंतरच देवपूजेचा अधिकार येतो. देवतांना मनुष्यशरीराचा वास सहन होत नाहीं म्हणून स्नानादिकरून पूजेला आरंभ करण्यापूर्वी- 'मनुष्यगंधनिवर्हणार्थे' असें म्हणून 'येभ्योमाता०' हा मंत्र म्हणण्याचा विधि ठेवला आहे. विडी न ओढणार्‍याला बिडीचा वास सहन होत नाहीं, कांदा न खाणार्‍याच्या तोंडांत कांद्याचा पदार्थ गेला असतां उलटी होते, तपकीर न ओढणार्‍याला मोहरी एवढ्याही तपकिरीने शिंका येऊन जीव कासावीस होत असतो,कारण तीं तीं इंद्रियें तितकीं सूक्ष्म बनलेली असतात. त्याप्रमाणे तपश्चर्येनें किंवा योगाभ्यासानें ज्याचें शरीर अत्यंत शुद्ध झालेलें असतें, त्याला अपवित्र पदार्थांचा किंवा अपवित्र मनुष्याचा स्पर्श सहन होत नाहीं, नव्हे, तशा मनुष्याची सावली अथवा त्याचें न कळत संनिधांनही सहन होत नाहीं. बंगाल्यांतील प्रसिद्ध श्रीगौरांगप्रभु ऊर्फ कृष्णचैतन्य एकदां एका भक्ताच्या घरीं आपल्या भजनमंडळीसह गेले असतां भजन करतांना त्यांना नेहमींप्रमाणे 'भाव उत्पन्न होऊन ‘आ वेश' चढेना. या भावोत्पत्तीला कसला तरी बाहेरचा प्रतिबंध होत आहे असें त्यांनी जाणलें व कोणी तरी विरुद्ध विचाराचा पापी मनुष्य या समाजांत असला पाहिजे असें त्यांना वाटलें व भजन बंद करून जमलेल्या मंडळींत ते पाहूं लागले. तों त्यांना कोपर्‍यांत तसा एक मनुष्य असलेला दिसला व त्याला बाहेर काढा असे त्यांनी आपल्या भक्तमंडळीस सांगितले. मंडळींनी तसे करतांच यांच्यांत 'भावावेश’ उत्पन्न झाला व नेहमींप्रमाणें ते 'हरि बोल हरि बोल' म्हणून विशेष होऊन भजनांत नाचू लागले, अशी गोष्ट त्यांच्या चरित्रांत आहे. आमचे विद्वान मित्र श्री. अप्रबुद्ध यांनी मागें 'धर्मवीर' पत्रांत 'मूर्तिपूजा' या विषयावर फारच महत्त्वाचे ८ लेख प्रसिद्ध केले होते ते प्रत्येक विचारवंतानें वाचण्यासारखे आहेत. त्यांच्या एका लेखांतील स्पर्शास्पर्शसंबंधाचा खालील उतारा महत्वाचा वाटल्यामुळें देत आहें. वाचकांच्या चिकित्सक बुद्धीलाही आमच्या धर्मातील स्पर्शास्पर्शाची सूक्ष्मतर तत्त्वें कळून आनंद होईल अशी आशा आहे.
"जीवदृष्ट्या सारे जीव तंत्रशास्त्रही सारखेच मानीत असलें, तरी 'द्रव्यदृष्ट्या' सारी शरीरें तें एकसारखीं मानीत नाहीं. हें द्रव्य अर्थातच स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही प्रकारचें आहे. नुसत्या 'स्थूल’ शरीरापुरतें पाहिलें तरी प्रत्येक शरीर वेगळ्या प्रकारचें आहे. आणि 'आरोग्यदृष्ट्या’ त्यांचा एकमेकांचा संघर्ष व्यवस्थित असावा हें अर्वाचीन वैद्यशास्त्रही मानतें. प्रत्येक रक्तकण भिन्न प्रकारचे असतात हेंही शास्त्रसंमत आहे. (प्रत्येकाचें रक्त तांबडेंच असतें म्हणून सर्व मनुष्य सारखेच, असें म्हणणें हें अज्ञानाचे होय.) प्रत्येकाचे रक्तकण भिन्न ही गोष्ट नित्य व्यवहारांतील उदाहरणानें देखील समजून येते. आपल्या स्थूल दृष्टीला अथवा अर्वाचीन शास्त्रज्ञांनी काढलेल्या कोणच्याही यंत्राला जरी ती गोष्ट कळत नसली तरी, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरांतून एक विशेष प्रकारचें द्रव्य अखंड बाहेर पडत असतें हें खरें आहे. हें बाहेर पडणारें द्रव्य कोणत्याही दोन व्यक्तींचें सारखें नसतें. शिकारी कुत्र्यांच्या अनुभवावरून ही गोष्ट लक्षांत येईल. ते नुसत्या वासावरून माणसांचा पत्ता काढतात आणि आश्चर्याची गोष्ट आहे कीं, हा वास देखील जास्त सन्निकर्षाने लागलेला नसतो. रस्त्यांतून घाईनें जातांना धुळीस जीं पाउलें लागतील तेवढ्यानेंच धुळीस लागलेला असतो. तेवढ्यानेंच सामान्य कुत्रा आपल्या मालकाचा पत्ता काढूं शकतो व शिकवून तयार केलेले कांहीं जातीचे कुत्रे, पूर्वी त्यांना माहीत नसलेल्या गुन्हेगाराचाही पत्ता काढूं शकतात. जी गोष्ट स्थूल शरीरास लागू आहे तीच
----
$ सन १९३८ च्या जानेवारी महिन्यांत बेळगांवांत सुमारे १ लाख रुपये खर्चून सरकारनें मोठें 'शेतकी प्रदर्शन भरविलें होतें. त्यांत धान्यें, बैल, गायी व कुत्रेही निरनिराळ्या प्रांतांतून आणवून ठेवले होते. त्या कुत्र्यांत निलगिरी पर्वतावरून एक कुत्रा आणविला होता. त्या कुत्र्याच्या अंगांतील अद्भुत गुणाच्या परीक्षेचा प्रयोग कलेक्टर वगैरे मोठमोठ्या लोकांसमोर करून दाखविला होता. त्या कुत्र्याची मालकीण एक युरोपियन बाई होती. तिनें त्या कुत्र्याला त्याच्या नोकराकडून फार दूर नेवविले व एका म्युनिसिपालिटीच्या शिपायाकडून आपल्या हातांतले पुस्तक घेऊन त्याजकडून आपले दोन्ही हात हातरुमालानें बांधून घेतले व त्याला दूर कुठें तरी जाऊन बसण्यास सांगितलें. तो गेल्यानंतर त्या कुत्र्यास या बाईनें आणविले व त्याला सांगितलें कीं माझें पुस्तक माझे हात बांधून ठेवून एकट्यानें नेलें आहे त्या बोराला इकडे घेऊन ये. हे ऐकून त्या कुत्र्यानें त्या बाईच्या हाताचा वास घेतला. पायाचा व पायाकडील जमिनीचा घेतला व जमीन हुंगत हुंगत, तो शिपाई जिकडे होता तिकडे अचूक गेला. कुत्र्याच्या गळ्यांतील लोखंडी सांखळी नोकरानें ओटून धरलेली होती. कुत्र्यानें अगदीं बरोबर त्या मनुष्यास ओळखून काढले व त्याच्या अंगावर गुरगुरुं लागून त्याचे कपडे तोंडानें धरून तो ओढूं लागला. व त्याला त्या बाईच्या समोर आणून उभा केला. नंतर तिनें सूचना केल्याप्रमाणें त्या शिपायानें जेव्हां तिचें बांधलेले हात सोडले व तिचें पुस्तक तिच्या हातांत देऊन तिला व कुत्र्यालाही सलाम करून क्षमा मागितली, तेव्हां तो कुत्रा गुरगुरण्याचा बंद झाला. त्या कुत्र्याला आणण्याकरितां सरकारला साडेतीनशे रुपये खर्च आला म्हणे!
----
कितीतरी पटीने लिंगशरीरास लागू आहे. कुत्र्यासारखे घ्राणेंद्रिय जरी आपणांस नसलें अथवा या द्रव्याची प्रतीति घेण्याचे साधन (यंत्र वगैरे) आज जरी नसलें, तरी कित्येक माणसांच्या सहवासांत त्याची अंतर्गत जाणीव पुष्कळांना होते. असो."
या गोष्टीवरून देवपूजा करणार्‍या ब्राह्मणाची शरीरशुद्धि (वंशशुद्धीच्या परंपरेनें) कशी असावी लागते याचे अनुमान करितां येईल. आतां स्पर्शास्पर्शाच्या संबंधानें त्यांनीं पुढील दोन उदाहरणें दिली आहेत, त्यांत ते म्हणतात-   
"अर्वाचीन काळांतील तंत्र व भाव या दोन्ही योगांचे आचार्य श्रीरामकृष्ण परमहंस यांचा अनुभव या बाबतीत विचारांत घेण्याजोगा आहे. पुष्कळ वेळां दर्शनास आलेल्या माणसांच्या स्पर्शानेंही त्यांचा गात्र-दाह होऊं लागे अथवा त्या ठिकाणीं विशेष भावजागृति होई. पानीहाट उत्सवांत सर्व लोकांत सरसहा मिसळल्यामुळें रात्रभर त्यांच्या अंगाचा एकसारखा दाह होत होता. ही जर देवता-शरीराशी संबंध असलेल्या शरीराची स्थिति, तर मूळ दिव्य व्यक्तींचे (देवतेचें) शरीर किती नाजूक असेल त्याची कल्पनाच केली पाहिजे. म्हणूनच स्पर्शास्पर्शाचे इतके बारीक नियम झाले आहेत. अस्पृश्यांची अथवा रजस्वलांबी काय गोष्ट? पण क्षतशरीरानेंही देवमूर्तीस शिवू नये असें शास्त्र आहे. एकदां भावावेशांत श्रीरामकृष्णांचा तोल जातो असें वाटून त्यांचा लाडका शिष्य छोटा नोरेन्‌ यानें त्यांना चटकन् सांवरून धरलें. त्याबरोबर तीव्र वेदना झाल्यासारखी त्यांनीं किंकाळी फोडली. त्या शिष्याच्या शरीरास कांहीं जखम झालेली होती. त्या साध्या जखमेची त्याला स्वत:लाही आठवण नव्हती आणि श्रीरामकृष्णांना तर तिचें ज्ञान होण्याचेंही कारण नव्हतें. शरीरांतील या सूक्ष्म द्रव्याचे परिणाम अनिच्छित रीतीनें इतरांवर बरे वाईट होतात. ल्यूकच्या 'शुभवर्तमानां'त असेंच एक उदाहरण आहे. एका घाणेरड्या रोगानें पीडलेली एक बाई येशूख्रिस्ताकडे आली आणि गर्दीत मागून तिने नुसत्या त्याच्या वस्त्रास स्पर्श केला. त्यासरसा एकदम तो ओरडला---'मला कोण शिवले?' (Who touched me?) भोवताली असलेली मंडळी कानांवर हात ठेवू लागल्यावर तो म्हणूं लागला कीं, "कोणीतरी मला शिवलें हें खास. कारण माझा शक्तिपात झाल्यासारखा मला वाटतो आहे.’’ (Somebody hath touched me, for I perceive that virtue is gone out of me. 846) येशू ख्रिस्त स्वतः अभ्यासी असल्यामुळें आणि एकान्तांत योग करीत असल्यामुळें एवढ्याशा शक्तिपातानें त्याचें फार नुकसान झालें नाहीं ही गोष्ट वेगळी. पण हा शक्तिपात अनिश्चितपणे एका स्पर्शानें घडला ही ध्यानांत घेण्याजोगी महत्त्वाची गोष्ट आहे. शास्त्राच्या प्रयोगांत निष्ठुर सत्य असते, मानवी भावनेला तेथें सवड नाहीं, ही गोष्ट अर्वाचीन भौतिक शास्त्रज्ञांनाही कबूल करावी लागेल या शास्त्रीय तत्त्वास धरूनच सोंवळे-ओवळे, स्पर्शास्पर्श, इत्यादिकांचे महत्त्व वैदिक धर्मशास्त्रानें मान्य केले आहे. " इ०
तात्पर्य, आपल्या हिंदूधर्मांतील सावळे-ओवळे व स्पर्शास्पर्श म्हणजे कित्येक लोक मानतात तसें कांहीं तरी 'थोतांड' अथवा धर्माचा 'कलंक’ नसून धर्माचें ते एक अपूर्व 'वैशिष्ट्य' आहे, आणि तें भौतिक विज्ञानाला म्ह. सायन्सला धरून असल्यामुळें विचारी लोकांना ते पटेल व मानवी अल्पज्ञतेमुळें झालेला पूर्वदूषित ग्रह ते सोडून देतील अशी मला आशा आहे. आतां कित्येक ब्राह्मण त्याचा अतिरेक करितात व उच्चवर्णत्वाभिमानामुळे इतर वर्णांस तुच्छ लेखतात हेंही चुकीचें आहे. वर्णहीनत्व मानणे निराळें व तुच्छ लेखून अपमान करणें निराळें. अपमान करणें ही एक हिंसा आहे आणि हिंसा म्हणजे पाप आहे. हल्ली ब्राह्मणवर्गाचा जो अपमान सर्वत्र चालला आहे तें सृष्टिकर्माच्या कायद्याप्रमाणें त्यांच्या पापाचें प्रतिफळ आहे असे म्हणणें वावगे होणार नाहीं. परमेश्वर सर्वोच्या अपराधाची क्षमा करून सर्वांना सद्बुद्धि देवो व धर्मातील उच्च तत्त्वाचा प्रकाश त्यांच्या हृदयांत पाडो अशी मी प्रार्थना करितों -
रा.कृ.का.

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP