मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
संशोधन म्हणजे काय?

गुरूचरित्र - संशोधन म्हणजे काय?

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


रानावनांत नाना प्रकारची झाडे आपोआप उगवतात, पण उपवनांत तीं विचारपूर्वक व्यवस्थेनें लावतात. ह्या उपवनांतील झाडांवर व झाडांखालीं तज्ज्ञ माळ्याचे व यजमानाचे लक्ष नेहमीं असावे लागतें. नसल्यास तेथे रान उगवून त्या उपवनाची शोभा नाहींशी होते व अमृतवल्लीच्या ठिकाणीं विषवल्लीही उत्पन्न होण्याचा संभव असतो. आपल्यांतील प्राचीन सद्ग्रंथांचे तसेंच झाले आहे व होत आहे. भगवत्प्रसादजन्य प्रतिभासंपन्न महापुरुष हे भवरोगग्रस्त जीवांच्या कल्याणाकरितां भगवत्प्रेरणेनें दिव्य भवौषधींची ग्रंथरूप मोठमोठीं उपवनें प्रयासपूर्वक तयार करितात, पण त्यांत कालांतरानें अप्रबुद्ध म्ह. अशिक्षित लेखकांच्या लेखणींतून अनर्थोत्पादक तृणबोजें पडून जे रान उगवतें, तें तेथील मूळच्या अमृतवल्लींचा कसा नाश करितें, आजूबाजूच्या छानदार (छंदवृत्तात्मक) कुंड्यांतील सुंदर फुलझाडांना (अमृतवचनांना) कसें झांकून टाकतें व त्यायोगें उपवनाच्या सौंदर्याला व ते तयार करणार्‍याच्या सुमंगल हेतूला किती भयंकर बाधा आणितें,
याची कल्पना तज्ज्ञ पुरुषांनाच येईल व त्यायोगें तेच विव्हळ होतील! इतरांना दोन्ही सारखींच ! धुळ्याचे सुप्रसिद्ध समर्थभक्त म. शंकर श्रीकृष्ण देव यांनी श्रीदासबोधाचे संशोधन केले. त्याचप्रमाणे 'मुमुक्षु' कर्ते म. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनींही दासबोध व मोरोपंतांचे ग्रंथ वगैरेंचें परिशोधन केले. त्यांत त्यांना पडलेल्या परिश्रमाची यथार्थ कल्पना हुबळीचे आमचे वृद्ध मित्र कै. सुब्राव गोपाळ उभयकर यांना श्रीरमावल्लभदासकृत 'श्रीकृष्णजयंतीव्रतोत्सव भजन' व भ. गीता 'चमत्कारी' टीका शुद्ध करतांना आलेली मीं पाहिली. त्यांच्या त्या भयंकर श्रमाचा सुदैवानें मीही भागीदार होतों. त्यापूर्वी भी श्रीरामतत्त्वप्रकाश छापखान्यांत म्यानेजर असतांना हंसराजकृत ईशावास्योपनिपट्टीका, चूडालाख्यान व श्रीनारायणमहाराज जालवणकरकृत कैवल्यसागर वगैरे पुस्तकांचे संशोधन करण्याचा योग मला परमेश्वरकृपेने लाभला होता. श्रीगुरुचरित्राची दुसरी आवृत्तिही ते त्या वेळी छापण्यास आरंभ झाला होता. परंतु पहिला अध्याय संपण्यापूर्वीच ईश्वरेच्छेने कांहीं कारणामुळें मला तो ब्राह्मणेतर छापखाना सोडावा लागला. (ही गोष्ट 'छापीप्रतींची यादी' पुढे दिली आहे, तिच्या अखेरीस थोड्या विस्तारानें दिली आहे ती पाहावीं.) छापखाना सोडला पण गुरुचरित्रसंशोधनाची वृत्ति मात्र सुटली नाहीं. तशीच छापखान्यांत असतांना उत्पन्न झालेली दोष अथवा छिद्रदर्शनात्मक 'काकदृष्टि' (बाकी सर्व विषयांत व व्यवहारांत ईश्वरकृपेनें माझी 'हंसदृष्टि' असते) तीही सुटली नाहीं. त्यानंतर कांहीं काळाने (म्हणजे छापखाना सोडल्यानंतर दहा वर्षांनीं) श्रीक्षेत्र गाणगापुरास जाणें झालें. तेव्हां मागें सांगितल्याप्रमाणं तेथील लेखी गुरुचरित्राच्या पोथीवरून शास्त्रशुद्ध संशोधनाचे धैर्य उत्पन्न झालें व त्यानंतर तेंच एक वेड जीवाला लागून राहिले, थोड्याच दिवसांनी श्रीक्षेत्र औदुंबर येथे जाणें झाले. त्या वेळीं आमच्या बंधूंचें तेथे काही विशिष्ट हेतूनें उग्र अनुष्ठान चाललें होतें. रिकाम्या वेळेस तेथील जुन्या हस्तलिखित प्रतीवरून गुरुचरित्रसंशोधनाचेंही कार्य सुरू केलें. (ही थोडीशी हकीकत पुढे ‘जुन्या हस्तलिखित प्रतींची यादी' दिली आहे तींत अनुक्रमांक ७ मध्येही लिहिली ती पाहावी.) दोन तीन जुन्या पोथ्या घेऊन त्यांवरून नव्या छापी प्रतींतील अशुद्धे दुरुस्त करीत असतांना एक सज्जन सुशिक्षित गृहस्थ येऊन (हल्लीं ते पेनशन घेऊन काशीक्षेत्रांत राहिले आहेत.) म्हणाले, “कामत, तुम्हीं हें काय चालविलें आहे ?” मीं म्हटलें, “गुरुचरित्राचें संशोधन." ते म्हणाले, "असें करण्यास तुम्हांस काय अधिकार आहे ? जें काम श्रीटेंभेस्वामीसारख्यांनीं केलें नाहीं, तें करण्यास तुम्हांस काय अधिकार ?" त्यावर मीं म्हटलें, “मज गरीबाकरितां ही सेवा राखून ठेवली असेल. सर्वच कामे एकट्यांनीं कशी करावीं? पण मी तुम्हांस विचारतों तें सांगा कीं जें वेदव्यासांनीं केलें नाहीं, तें टेंभेस्वामींना तरी करण्याचा काय अधिकार आहे ?" ह्या माझ्या विनोदाचा भाव त्यांच्या लक्षांत आला नाहीं व तो येण्यासारखाही नव्हता. माझा पूर्वपरिचय नसल्यामुळे स्वामीमहाराजांविषयींचा माझा पूज्यभाव त्यांना कळणें शक्य नव्हतें, त्यामुळे माझे ते शब्द स्वामीमहाराजांचा उपमर्द करणारे आहेत असें त्यांना वाटलें व थोड्याशा रुष्ट मुद्रेनें ते म्हणाले, “म्हणजे काय ? व्यासांनीं केलें नाहीं तें टेंभेस्वामींनीं काय केले?" मीं गंभीर व हास्यमुद्रेनें त्यांना म्हटले, "अहो, श्रीदत्तावर व्यासांनीं केलें नाहीं तितकें वाङ्मय टेंभेस्वामींनीं केलें आहे, असें करण्याचा त्यांना काय बरें अधिकार होता?" माझा भाव ते समजले व मग नम्रपणें बोलू लागले कीं, “गुरुचरित्र हा प्रासादिक ग्रंथ आहे, त्यांत फेरफार करण्याचा अधिकार कोणास नाहीं असें मला वाटतें, म्हणून तुम्हांस विचारतों." मीं म्हटलें, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण संशोधन म्हणजे फेरफार नव्हे. वर्तमानपत्राचीं मुद्रितें (प्रुफें) तपासतांना त्यांतील ऱ्हस्व दीर्घ पाहाणें, मूळांत एकादा अयोग्य शब्द पडलासा वाटल्यास तो काढून टाकून त्या जागीं दुसरा शब्द घालणें, असें प्रासादिक ग्रंथांचें तपासणें नव्हे. तर 'मूळ ग्रंथकाराचा शब्द' कोणता व मागाहूनच्या लेखकाचा 'हस्तप्रमाद' कोणता हें शोधून काढणे याचें नांव 'संशोधन.' प्रासादिक ग्रंथांतील मूळचा शब्द काढून तेथें आपल्या कल्पनेचा दुसरा शब्द घालणेस कोणासही अधिकार नाहीं. तसें करितां आलें असतें तर मला लहानपणापासून ईश्वरकृपें कविता करण्याची संवय आहे, मीं दुसरें गुरुचरित्र निर्माण केलें असतें; पण तसें करणें योग्य नाहीं हें मीं जाणतों." असें सांगून महत्प्रयासाने मला लागलेले अपूर्व शोध मीं त्यांना दाखविले. त्यांत अगदीं प्रथम सहाव्या अध्यायामधील, "गणऋषेश्वरयुक्त । गायन करी लंकानाथ" ही ४२ वी ओवी दाखवून म्हटलें, “हिच्यांत तुम्हांस कांहीं अशुद्ध आहे असें वाटतें का?" त्यांनीं ती ओंवी दोन तीन वेळां नीट पाहून म्हटलें, नाहीं, यांत कसले अशुद्ध ?" मी म्हटलें, "बाबांनो, मीही आज २५ वर्षे गुरुचरित्र वाचीत आहे, इतर अनेक ठिकाणीं मला जिकडे संशय आले, तिकडे मी खुणाही करून ठेवल्या आहेत; पण 'गणऋषेश्वरयुक्त' वाचतांना मलासुद्धां इतकी वर्षे संशय आला नाहीं व जेव्हां मला गाणगापूरच्या एका जुन्या पोथींत ती ओंवी 'गणरसस्वरयुक्त' अशी आढळली व त्यावरून जो अंतःकरणांत प्रकाश पडला व आनंद झाला तो काय सांगावा ? गोव्याची दहा हजार रुपयांची लॉटरीच आली असें वाटले व त्याबरोबरच, मला इतकीं वर्षे त्या ओंवींत अशुद्धाचा संशयसुद्धां कसा आला नाहीं म्हणून रागही आला व माझा मी चिमटा काढून घेतला ! आतां पाहा, पुढच्या ओव्या (४३ ते ४५) वाचा, त्यांत छंदःशाखांतील मगण, यगण, रगण (म-य-र-स-त-ज-भ-न) या आठ गणांचे वर्णन आलें आहे ; त्यापुढील ओंव्यांत (४६/४७) शृंगार, वीर, करुण, इत्यादि नवरसांचें वर्णन आले आहे. त्यापुढील ओव्यांत ( ४८ ते ६२) गायनांतील षड्ज, ऋषभ, गांधार (सा-री-ग-म-प-ध-नी) इत्यादि सप्तस्वरांचे वर्णन आले आहे. तेव्हां आतां सांगा की 'गणऋषेश्वरयुक्त' हा पाठ काढून टाकून त्या ठिकाणी 'गण-रस-स्वरयुक्त' हा पाठ घालणेस कोणाची भीति आहे का ? कीं त्यांत कांहीं पाप आहे ? या दुरुस्तीनें ग्रंथकार सरस्वतीगंगाधर यांस राग येईल की संतोष होईल ?" हें ऐकून ते गृहस्थ गार झाले व हात जोडून क्षमा मागू लागले व म्हणाले कीं, "तुम्ही हें फार मोठें कार्य करीत आहां, श्रीदत्ताची व दत्तभक्तांची खरी सेवा करीत आहां, तुम्हांस यश देण्याबद्दल मी श्रीदत्ताच्या चरणीं अनन्यभावें प्रार्थना करितों." इत्यादि. त्यानंतर मीं त्यांना पहिल्या अध्यायांतील चुका दाखविण्यास' आरंभ केला. त्यांतील १८ वी ओंवी ही १९ वी ओंवी करावी व १९ वी ओंवी ती १८ वी करावी; हा शोध अमुक पोथींत सांपडला, तो किती सयुक्तिक आहे पाहा. त्यानंतर 'आतां वंदूं त्रिमूर्तीसी' (ओं. २७) अशी ग्रंथकर्त्यांने प्रतिज्ञा करून फक्त ब्रह्मा व विष्णु या दोघांसच वंदन केलेले छापले आहे, तिसर्‍या शंकर देवाच्या वंदनाच्या ओंव्या अमुक ग्रंथांत सांपडल्या त्या घेणें योग्य आहे कीं नाहीं पाहा, इत्यादि सांगितलें. (अशा ढोबळ ढोबळ चुकांचे शुद्धिपत्र गु. च. गुरुगीता पुस्तकांत ८ पृष्ठांचे दिलेलें ज्यांनीं बारीक दृष्टीनें पाहिलें असेल व गुरुदेवांच्या कृपेनें तयार झालेल्या या ग्रंथांतील पाठ व टीपा पूर्वप्रकाशित ग्रंथांच्या पाठांशीं व टीपांशीं जे ताडून पाहातील, त्यांना संशोधनाचे महत्त्व व आवश्यकता किती होती हें समजून आनंद झाल्याशिवाय राहाणार नाहीं, अशी खात्री वाटत असल्यामुळे त्या गृहस्थांशी झालेला संवाद मनोरंजक असला तरी तो समग्र येथें देऊन वाचकांचा वेळ व जागा आडवू इच्छीत नाहीं.) हें कार्य चालू असतां पुष्कळ भाविक व विद्वान अशा लोकांशी या संबंधानें बोलण्याचा व चर्चा करण्याचा प्रसंग आला, तेव्हां सर्वांनी मनोभावानें माझी पाठ थोपटून मला आशीर्वादच दिले आहेत.
याप्रमाणें त्या वेळी माझे मन तदाकारच बनून गेलें होतें. श्रीएकनाथमहाराजांनीं आपल्या सुंदर चतुःश्लोकी भागवताच्या अखेरीस म्हटल्याप्रमाणे- “जागृती दिसे ग्रंथार्थज्ञान। ग्रंथार्थज्ञान जाहलें स्वप्न । सुषुप्तीमाजीं दुजेनवीण। हें गुह्यज्ञान कोंदाटे पैं॥" अशी माझी स्थिति झाली होती. जुन्या हस्तलिखित प्रति मिळतील तितक्या थोड्या वाटत होत्या. कारण एकासारखी एक मुळींच आढळेना. प्रत्येकांत निरनिराळे पाठभेद ! पण हे पाठभेद कांहीं फारसा खेद उत्पन्न करीत नाहींत, त्यांना पोटभेदांतही घालतां येईल. पण 'गणरसस्वरयुक्त' च्या ठिकाणीं 'गणऋषेश्वरयुक्त', 'कळंतर' च्या ठिकाणीं 'कळत्र', आणि 'स्वित्री' च्या ठिकाणीं 'स्वस्त्री' असे दाट भेद उत्पन्न झाले कीं मस्तकभेदच होण्याचा प्रसंग ! म्हणून श्रीगुरुचरित्रप्रेमी योग्य पुरुष दिसला कीं योग्य संधि साधून त्याच्याकडे मी ह्या संशोधनाच्या गोष्टी प्रेमानें बोलूं लागलों व लागलेले शोध त्यांना दाखवूं लागलों. त्यांजकडून अंतःकरणपुरःसर प्रोत्साहन मिळू लागले. मुरगोडचे श्रीचिदंबरावतारी म्हणून प्रसिद्ध असलेले महापुरुष श्रीमत्पांडुरंगमहाराज दीक्षित यांनीं आपल्या संस्थानांतील श्रीचिदंबरप्रभूच्या वेळची गुरुचरित्राची प्रत मला मोठ्या प्रेमाने देऊन कृपेनें आशीर्वादही दिला. त्यानंतर श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री या महापुरुषाच्या घरची इतकेंच नव्हे तर स्वतः ते वाचीत असलेली, जुनी हस्तलिखित सुंदर अक्षरांची प्रत त्यांचे बंधु कै. नरसिंगराव बाळेकुंद्री यांनी आमच्या ह्या प्रयत्नाचे मोठे कौतुक करून प्रेमानें दिली. ('जुन्या हस्तलिखित प्रतींची यादी' अनुक्रमांक ९ व १० पाहावे). अशा या प्राणांपेक्षां पलीकडे जपून ठेवलेल्या व प्रत्यक्ष दत्तभावनेनें पूजेस असलेल्या प्रति श्रीदत्तकृपेनें मिळत गेल्या; असें म्हणण्यापेक्षां त्या दयाघन गुरुदेवांनी आपल्याच कार्यासाठी मिळवून दिल्या असें मी म्हणतों व राजादिकांनीं किंवा लोकाश्रयावर चालणार्‍या एकाद्या मोठ्या संस्थेने करण्याचे काम मज रंकाकडून त्यांनी करवून घेतले, हे मी त्यांचे मोठे उपकार समजतों.
याप्रमाणें संशोधन-कार्यासाठी जुन्या 'हस्तलिखित' प्रति सुमारे २५ मिळाल्या व निरनिराळ्या १०/१२ छापखान्यांतील 'छापी' पुस्तकेंही मिळविलीं. त्याची संपूर्ण यादी मी रसिकजन-कुतूहलार्थ थोड्याशा वर्णनासहित पुढे दिली आहे ती पाहावी. त्या जुन्या लेखी प्रतींत लेखकांच्या बुद्धिदौर्बल्यामुळे घडलेले हस्तप्रमाद आहेत, पण ‘जांवईशोध’ नाहींत. छापी प्रतीत मात्र ते घुसडलेले आढळतात ! त्यांचें वर्णन करावें, तेवढे थोडें वाटते! पहिल्या अध्यायांतील ८० वी ओंवी-' रागस्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे' ही व १०८ वी ओवी-' बैसोनियां बाळ वेगीं’ ही (आमच्या प्रतींत या ओंव्यांचे आंकडे अनुक्रमे ८३ व १११ आहेत) या दोन ओंव्या मागील छापी प्रतींत कशा छापल्या आहेत त्या पाहिल्या म्हणजे ह्या जांवईशोधांची कल्पना सुविद्य वाचकांना येईल. हस्तप्रमाद किंवा नजरचुका यांची तर गणतीच नाहीं. पहिल्या छापखानेवाल्यानें एकदां ज्या चुका केल्या त्यांचीच नक्कल बहुतेक नंतरच्या छापखानेवाल्यांनीं केलेली दिसून येते! उदाहरणार्थ- पहिल्या अध्यायांतील ७९ (आमची ८२) वी ओंवी- "अति व्याकुळ अंतःकरणीं । निंदास्तुति आपुले वाणीं । कष्टला भक्त नामकरणी । करितां होय परियेसा ||" या ओंवींतील दुसरा चरण तिसर्‍याच्या ठिकाणीं व तिसरा दुसर्‍याच्या ठिकाणीं पडला आहे. यापेक्षां यांत अशुद्ध असें कांहींच नाहीं. पण वर दर्शविल्याप्रमाणे दुरुस्ती केली म्हणजे ही ओंवी “अति व्याकुळ अंतःकरणीं । कष्टला भक्त नामकरणी । निंदास्तुति आपुले वाणीं । करितां होय परियेसा॥" कशी सरळ व सुंदर लागते व पहिला पाठ मग कसा ओबड धोबड दिसतो तें पाहाण्यासारखे आहे. तसेच मागील सरस्वतीनमनाच्या ओंव्यांत अशुद्ध असें कांहींच दिसत नाहीं, पण १९ वी १८ वींत व १८ वी १२ वींत बसविली आहे, तेवढी दुरुस्ती केली म्हणजे त्यांतील 'म्हणोनि' या शब्दाचा अर्थ लागतो, नसल्यास मुळींच लागत नाहीं. पण हें जुनी कडगंची व कुरवपुर वगैरे प्रतींत पाहाण्याच्या पूर्वी लक्षांत आलें नाहीं, ही गोष्ट दुःखाचीच वाटते ! एकाद्या वेळीं ह्या नजरचुका क्षम्य होतील; कारण विद्वान् व बहुश्रुत मनुष्य त्या दुरुस्त करूं शकेल, पण बुद्धिपूर्वक घातलेले 'जांवईशोध' मात्र कोणाच्या सासर्‍याला अथवा त्याच्या बापालाही दुरुस्त करतां येणार नाहींत. दोन उदाहरणें वर दिल्लीं आहेत, पण आणखी थोडीशीं दिल्याशिवाय राहावत नाहीं. कारण जुन्या प्रतींच्या आधाराने जरी त्यांची दुरुस्ती केली आहे, तरी तीं स्थळें मुद्दाम दाखविल्यावांचून ह्या जांवईशोधांची कल्पना बरोबर रीतीनें येणें शक्य नाहीं. अध्याय १९, ओं. ६७ मध्ये, योगिनींचे दर्शन झालेल्या 'गंगानुज' (नावाडी) याला प्रयाग-काशी-गया ह्या त्रिस्थळीचे दर्शन श्रीगुरूंनी करवून आणण्यापूर्वी, तीं तीन्ही तीर्थें अथवा क्षेत्र येथे जवळ म्ह. जवळच्या प्रांतांतच आहेत असें सांगितले आहे.. त्यांत प्रयाग म्हणजे ‘पंचगंगासंगम' (नरसोबावाडीजवळ), 'काशीपुर ते जुगूळ' (हें बेळगांव जिल्ह्यांतील अथणी तालुक्यांत कृष्णातीरीं एक गांव आहे) आणि 'दक्षिण गया कोल्हापूर' असें श्रीनृसिंहसरस्वतींनीं त्याला सांगितले आहे. (असा पाठ एकंदर लेखी पोथ्यांतून आहे.) यामध्ये 'जुगुळ' हा शब्द मुंबई-पुणे-रत्नागिरी वगैरेकडील छापखानेवाल्यांना अथवा त्यांतील शोधक शास्त्र्यांना चमत्कारिक वाटल्यामुळें ही लेखकाची नजरचूक असावी असें वाटून त्यांनी 'काशीपुर के जुगुळ' या ऐवजीं 'काशीपुर में गुरुस्थळ' असे दडपून दिलें झालें ! कोण हा अनर्थ ! तसेंच पुढील ६८ व्या ओवींत 'दक्षिण गया' च्या ठिकाणीं 'दक्षिण प्रयाग’ म्हणून छापलें आहे, हें तर आंधळेपणाचेंच ! कारण पंचगंगासंगमाला 'प्रयाग' हा शब्द वरच्या ओंवींतच आहे. तात्पर्य त्रिस्थळीमधील 'गया' हे गया म्ह. गेलेंच ! ’जुगूळ' च्या ऐवजी 'गुरुस्थळ ' हेंडी तितकेसे भयंकर नाहीं. पण अध्याय १२, ओं. १३ मध्ये "एखादा नर कळंत्रासी (कळंतरासी) द्रव्य देतां परियेसीं ।" यांतील ‘कळंतर' चा अर्थ माहीत नसल्यामुळें छापखानेवाल्यांनी 'कळंतर' च्या ऐवजीं 'कळत्र' हा शब्द घालून त्यावर टीप 'बायको' अशी दिली आहे! कळत्र म्ह. बायको हें ठीक आहे, पण 'कळंतर' म्ह. कळत्र नव्हे हें त्या मुद्रकास कोणीं सांगावें ? व अशा जांवईशोधाची दुरुस्ती कुठल्या सासरेबुवांनी करावी बरें ? 'कळंतर' शब्दाचा अर्थ व्याजबट्टा, व्यापारी लोकांच्या खातेवहींत 'कळंतरखातें' म्हणून खातें असते; पण हे छापखान्यांतील शास्त्री- पंडितांना कसें कळावें ? अथवा कोणी जाऊन सांगावें ? हा 'कळंतर' शब्द पुढे ३६ व्या अध्यायांत ८२ व्या ओंवींतही आला आहे. तेथेंही तो 'कळत्र' असाच कांहींनीं छापला आहे व कांहींनी 'कळंतरा' चे 'काळांतर' केलें आहे (हें वाईट नाहीं). मी अत्यंत नम्रतेने कळवितों की ह्या चुकांचें दिग्दर्शन मीं त्या छापखान्यांतील शास्त्र्यांचे दोष दाखविण्याकरितां किंवा माझें पांडित्य दाखविण्याकरितां करीत नसून, संशोधकांवर केवढी जबाबदारी असते अथवा त्यांनी केवढ्या जबाबदारीनें व सूक्ष्म दृष्टीनें काम केलें पाहिजे, छापखानेवाल्यांनींही संशोधनाकरितां किती योग्य अथवा अधिकारी मनुष्याची नेमणूक केली पाहिजे, हें दाखविण्याकरितां केलेलें आहे. मला विद्वानांचे दोष काढण्याचा अधिकार नाहीं, कारण मी तितका विद्वान नाहीं व मजकडून असे दोष होणारच नाहींत असा मी गर्वही वहात नाहीं. पण ईश्वरकृपेनें विद्वानांची संगति व पवित्र आणि प्रासादिक ग्रंथ संतांच्या संगतींत वाचण्याची संधि सुदैवानें मला बरीचशी लाभल्यामुळें मी ह्या सूचना लिहूं शकलों इतकेंच.* असो.

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP