मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
श्रीसरस्वती-गंगाधराच्या भाषेचे नमुने

गुरूचरित्र - श्रीसरस्वती-गंगाधराच्या भाषेचे नमुने

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


गु. च. ग्रंथकार सरस्वती-गंगाधर हा 'कानडा ब्राह्मण' होता. त्याची मातृभाषा कानडी होती. त्याला मराठी भाषा चांगली येत नव्हती. 'भाषा नये महाराष्ट्र' (अ. १, ओं. ३४) अशी त्याची स्वतःची कबुलीच आहे. अजून मुरगोड, धारवाड, विजापूर, गाणगापूर वगैरे कर्नाटक प्रांतांतील गांवांमधील कानडे देशस्य ब्राह्मण मराठी कसें बोलतात हे पाहिलें म्हणजे समजून येईल कीं लिंग, वचन, विभक्ति, प्रत्यय, अर्थ, काळ, प्रयोग इत्यादिकांमध्ये त्यांच्याकडून हास्यास्पद वाटणार्‍या चुका घडतात. त्या ऐकून आम्हांला हसूच येतें. 'आई आला, बाप गेली, मी जेवण केलों, तो स्नान केला, त्यांनी गेला' अशा तऱ्हेची त्यांची भाषा असते. मुंबई, अहमदाबाद बगैरेकडील गुजराथी लोकही मराठी बोलतांना अशाच चुका करितात. नामाला विभक्तिप्रत्यय लावतांना तर त्यांच्याकडून हमेश चुका घडतात. हा त्या लोकांचा दोष नव्हे. आमची मराठी भाषाच तशी कठीण आहे. इवर भाषेच्या लोकांना कानडी, तेलगू, तामिल किंबहुना इंग्रजीही भाषा शिकतांना जितके कठीण वाटत नाहीं, तितकें मराठी भाषा शिकतांना वाटते, असे त्यांच्याकडून समजते. याचे कारण मराठी भाषेत लिंगाचीच भानगड जास्त. लाकडाचा 'फळा' म्हटले की पुल्लिंगी, 'फळी' म्हटली की स्त्रीलिंगी, व 'फळें' म्हटले कीं नपुंसकलिंगी; अशी भानगड इतर भाषांत नाहीं. त्यांत अचेतनवस्तु तेवढ्या बहुतेक नपुंसकलिंगी. तात्पर्य, इतर लोकांनी मराठी भाषा बोलतांना किंवा लिहितांना चुका केल्या म्हणून आपण त्यांना दोष देतां कामा नये. 'अथ तात्पर्य सज्जना' या वचनानुसार आपण त्या शब्दांतील किंवा * वाक्यांतील भाव घेऊन चालूं लागले पाहिजे. आमच्या सरस्वती-गंगाधराची भाषा वर सांगितलेल्या प्रकारची आहे. (त्याचे प्रत्यक्ष नमुने थोडे पुढे दिले आहेत.) पण त्याची ती भाषा देवाला आवडली आणि म्हणूनच ग्रंथ सर्वमान्य व वंदनीय झाला हे ध्यानांत ठेवावे. ज्या वेळीं अगदीं प्रथम छापण्यासाठीं म्हणून तो ग्रंथ कोणी हातांत घेतला, त्या वेळीं त्या पहिल्या छापखान्यांतील शाख्यांना त्यांतील भाषेचें वैगुण्य कानामनाला जाचूं लागले व त्यांनीं ती भाषा सुधारण्याचा प्रयत्न केला. मूळच्या जुन्या व ओबडधोबड दिसणार्‍या भाषेला नव्या भाषेचें रूप देतांना कित्येक ठिकाणीं बरें साधले आहे. पण कित्येक ठिकाणच्या प्रयत्नांत 'कळंत्र' (कळंतर) च्या ऐवजी 'कळत्र', 'जुगूळ' च्या ऐवजीं 'गुरुस्थळ', 'स्वित्री'च्या ऐवजीं 'स्वस्त्री' अशा तऱ्हेचे अत्यंत हास्यापद अथवा अनर्थास्पद प्रमाद घडले आहेत ! कित्येक ठिकाणी मूळची भाषा बदलणे फार कठीण जाऊं लागलें अथवा ती भाषा किंवा ते शब्द तसेच असणें फारसे बाधक नाहीं असे दिसले, तिकडे ते मेहेरबानीनें तसेच ठेवले आहेत. उदाहरणार्थ
' भिक्षा मागोनि संदीपकु । गुरुसी आणोनि देत नित्यकु' (२।१८७) यांत 'नित्य' शब्दाचे रूप ग्रंथकाराने मागील चरणाच्या प्रासाला जमण्याकरितां 'निव्यकु' असे करून सोडलें आहे. (पूर्वीच्या छापखानेवाल्यांनी 'संदीपक' व 'नित्यक' इतकीच सुधारणा केली आहे. पण 'नित्य’ चें ‘नित्यक’ ठेवलेंच आहे.) 'सेवा करूं आम्ही तिसी' (अ. ४|२३ - येथे नवीन भाषेच्या पद्धतीप्रमाणे 'सेवूं आम्ही तिसी' असें पाहिजे, किंवा 'सेवा करूं आम्ही तिची' असें पाहिजे. पण मूळचे फारसें बाधक वाटले नाहीं म्हणून होते तसें ठेवलें वाटते.)... ' क्षाळण केले चरण त्यांचे' (अ. ४|३१—-येथें वास्तविक 'क्षाळिले चरण त्यांचे ' असे किंवा 'क्षालन केलें चरणांचे' असें कांहीं तरी पाहिजे होतें. पण तसें कांहीं केलेलें नाहीं.)…तथापि पुष्कळच ठिकाणीं शब्द व वाक्यरचना बदलण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दलची चर्चा मांगें पुष्कळ झालेलीच आहे. चाणाक्ष वाचकांनाही हें सहज समजण्यासारखे आहे, म्हणून पुनः त्याबद्दल येथे लिहीत नाहीं. फक्त सरस्वती-गंगाधराच्या भाषेचे नमुने सांगण्याकरितां वरील तीन उदाहरण सांगितलीं. आणखी थोडींशीं सांगतों-
वरील 'नित्यक' शब्दाप्रमाणे 'समीप' शब्दाचे रूप मागील प्रासास जुळण्याकरितां 'समीपत' असे केलें आहे. 'ऐशी चाण्डाळी कष्टत । आाली वृक्षा समीपत'- (७।२०२); 'जंबबरी होय एक सुत । तंवरी राहे समीपत' (१२।२६); 'तेंचि ब्रह्मांड देखा । फुटोनि झाली शकलें द्वैका' - (४|७) (येथें 'द्वैका' हा शब्द दोन अथवा द्विधा या अर्थाने नवीन बनवून घातला आहे.) प्रचारांत नसलेले शब्द नवीन बनविण्याची अथवा मूळच्या शब्दांस थोडेंसें नवीन रूप देण्याची संवय आमच्या सरस्वती-गंगाधराला आहे. नहून वरील 'नित्यक, समीपत, द्वैका, सुक्षीणक' ( २२।२२) हे शब्द आपणांस कुठल्याही नव्या वा जुन्या कोशांत मिळणार नाहींत.
'संतोष जाहला वेदधर्ममुनी'- (२।१५८) असेच सर्व लेखी प्रतींत आहे. (येथे अलीकडच्या भाषेप्रमाणे संतोषी किंवा संतुष्ट असें पाहिजे, किंवा 'संतोष पावला' असें तरी पाहिजे). 'पुत्रपौत्रीं श्रियायुक्त। तुम्हां होईल निश्चित' (२२|५४) असे सर्व लेखी प्रतींत आहे. (येथें ‘तुम्ही व्हाल’ असें पाहिजे.)...' ब्रह्मज्ञान तयासी । उपदेश केला प्रीतीसीं ' (१२।१२७ ) असे सर्व लेखी प्रतींत आहे. (येथें 'उपदेशिलें' असें पाहिजे. किंवा 'ब्रह्मज्ञानाचा' असें मागें पाहिजे. )...' पूजा केली तुज मानसीं'- (२४।२१) असेंच सर्व लेखींत आहे. (येथे ' तुज'च्या ठिकाणी 'तुझी' असें पाहिजे किंवा 'पूजा केली' च्या ठिकाणीं 'पूजिलें' असें पाहिजे.) याचप्रमाणे – 'पुरला माझा मनोरथ । आरोग्य झाला प्राणनाथ' (३२।१३४), 'प्राण वांचविले आम्हांसी (३५/३०५) 'एकादा पुस्तक करी तस्कर - (२८/५६); 'स्मरण करील आम्हांसी'- (१२/५२) इत्यादि. अशा तऱ्हेच्या भाषासरणीचीं वचनें एकंदर लेखी पुस्तकांत असल्याकारणानें सरस्वती-गंगाधराची भाषा अशा पद्धतीची होती हें सहज सिद्ध होतें. आपल्यास ती बरी वाटत नाहीं म्हणून सुधारण्याचे कोणास काय कारण अथवा हक आहे बरें ?
लिंगवचनांचा विचार---हाही आपल्या प्रचलित नव्या भाषेस अथवा इतर संतांच्या प्राकृत ग्रंथांतील भाषेस थोडासा सोडूनच आहे. उदाहरणार्थ- “सांदीपनी जाहला गुरु कैसी’’---(१२|१०३) “तुयां निरोपिलें आम्हांसी । पुत्र अवधे होती ऐसी" (१२।२५) असाच पाठ सर्व लेखी प्रतीत आहे. वास्तविक ऐसा व ऐसें असें जेथे पाहिजे, तेथें प्रासाकरितां म्हणून ग्रंथकारानें 'ऐसी' शब्द पुष्कळच ठिकाणीं वापरलेला आहे. वचनासंबंधानें असेंच आहे. "जैशा समस्त नदी देखा । समुद्रासी घेऊनि जाती उदका"-- (१२।१४) येथें नदी हें एकवचन असून अनेकवचनी अर्थाने वापरलेले आहे. कारण त्या ओवींतील सर्व क्रियापदें अनेकवचनी आहेत. (सर्व लेखी प्रतींत नदी असाच पाठ आहे.) तसेंच, वरच्या ओंवींत श्रीगुरूला एकवचन तर लगेच पुढच्या ओंवींत अनेकवचन, असेंही झालेले आहे. उ० – “कृपामूर्ति श्रीगुरुराणा । कां उपेक्षिसी आम्हांसी ॥१५ ॥तुमचे दर्शनमात्रेंसी । श्री समस्त तीर्थे आम्हांसी " इत्यादि.
प्रासांचे नमुने —“असतां पुढे वर्तमानीं। वाणिज्या निघाला तो उदिमी। नवस केला अति गहनी । संतर्पावें ब्राह्मणासी ॥"- (१०|१५) अशा तऱ्हेचे व्यंजनप्रास व अंत्य स्वराचेही प्रास कित्येक ठिकाणीं चुकले आहेत. उ० " ऐसे दहा अवतार झाले । कथा असेल तुवां ऐकिली " ---( ३|७७); " त्रयमूर्तीचे बालक झाले । स्तनपानमात्रे क्षुधा गेली" (४|४७) इत्यादि.
अन्वय अथवा समास- संघीचे नमुने - " दर्शन दिधलें चरण आपुलें ” (१३/८९) येथे “ आपुलें ‘चरण-दर्शन' दिधलें " असा अन्वय लावावयाचा... “दिले दर्शन चरण आपुले" (२७।२) यांतही 'चरण-दर्शन' असाच अन्वय किंवा संधि करावयाचा... "नासतां तुझा देह जाण । भेटी होईल आमुचे चरण (१३|५६) यांत चरणभेटी' असा संधि करावयाचा... "आयुष्य सुखदुःख जाण । समस्त पापवश्य-पुष्य" (३०।१४२) येथें 'पुण्यपापवश्य - ( वश) असा संधि समजावयाचा... "जन्म पावेचि योनि-व्याघ्रीं । महारण्यघोरीं वसे" (३१।८५) येथें 'व्याघ्रयांनीं ' व 'घोरमहारण्यीं असे समजावयाचें... ' तपतो तेजमंदसी (३१।११०) हें 'मंदतेजेंसी ' च्या ऐवजीं आहे. (असे शब्दप्रयोग श्रीतुकाराममहाराजांच्या अभंगांतही पाहावयास सांपडतात. ) असो.

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP