मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
पुष्पांजलि (पुरस्कार)

गुरूचरित्र - पुष्पांजलि (पुरस्कार)

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


धृत्वा मानुषविग्रहं द्विजकुले लीलाश्र्चकाराद्भुता: ।
स्थित्वा गाणगमंडल पुनरगात्‌ श्रीपर्वतस्याटवीम्‌ ॥
त्रातु स्वीय जनाननेकतनुधृक्‌ योऽभूत्‌ क्षितिं पर्यटन्‌ ।
सोऽयं श्रीनरसिंह-सद्गुरुवर: कुर्यात सदा मङ्गलम्‌ ॥
- अप्रबुद्ध

(१) श्रीगुरूंच्या या प्रक्षाळित अनादिसिद्ध मूर्तीवर पहिलें वाक्पुष्प वाहाण्याची संधि श्रीगुरुभक्तिपरायण रा. कामत महाशयांनीं मला दिली हा मी माझा मोठा कल्याणविषय समजतों. म्हणूनच कोणताही संकोच मनांत न आणतां मी चटकन्‌ त्यांच्या आज्ञेप्रमाणें करण्यास प्रवृत्त झालों. एरव्हीं रा. कामत यांच्या परिश्रमाचें मोल करण्याइतकी माझी किंमत नाहीं. महाराष्ट्रामध्यें अनेक अधिकारसंपन्न व्यक्ति असतां हें कार्य त्यांनीं मलाच कां सांगावें, हें माझें मलाच समजत नाहीं. हा निव्वळ प्रेमाचा प्रकार असावा असें वाटतें. तें कांहीही असलें तरी श्रीगुरुच्या या वाङ्‌मयमूर्तीस पूजा बांधण्याची ही संधि दवडण्याइतकी दुबुद्धि माझ्याजवळ नाहीं. म्हणून इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न करितां या कार्यासंबंधीं मला काय वाटतें तें मी सांगतों. भगवंतांनीं ध्रुवाच्या गालास स्पर्श करून त्याच्याकडून आपली स्तुति करवून घेतली, त्याप्रमाणें आपल्या कृपास्पर्शाने श्रीगुरुच हें काम माझ्याकडून करवून घेतील !
(२) महाराष्ट्रांतील लोकांच्या नित्य पाठांत आज जे ग्रंथ आहेत त्यांत श्रीज्ञानेश्वरी, श्रीगुरुचरित्र आणि श्रीदासबोध हे तीन ग्रंथ प्रमुख आहेत, ही गोष्ट निर्विवाद आहे. हे तीन्ही सांप्रदायही अस्सल महाराष्ट्रीय असून एकाच कार्याची पूर्तता करणारे आहेत. श्रीज्ञानेश्वरांनीं त्या कालास अनुसरून असलेली म्हणून श्रीपांडुरंगाची उपासना जरी प्रवृत्त केली असली, तरी ते प्रत्यक्ष श्रीदत्तगुरूंच्याच परंपरेंतील होते. नवनाथांची चरित्रें वाचणार्‍यास सहज समजून येतें कीं, श्रीमत्स्येन्द्राचे मोक्षगुरु जरी आदिनाथ होते, तरी योग आणि मन्त्र इत्यादि विद्यांचे गुरु साक्षात्‌ श्रीदत्तच होते. श्रीनरसिंह-सरस्वती हे तर प्रत्यक्ष दत्तावतांरच होत. आणि श्रीसमर्थ यांसही श्रीदत्तात्रेयांचें दर्शन होऊन कृपाप्रसाद झाला होता असें भीमस्वामीकृत चरित्रावरून दिसून येतें. दासविश्रामधामांतही कृष्णा खोर्‍यांत श्रीसमर्थांचा आणि श्रीगुरुंचा कांहीं दिवस नित्य सहवास असल्याचें वर्णन आहे. श्रीसमर्थांनहीं श्रीसमर्थांनी केलेली श्रीगुरूंची भूपाळी फार गोड आहे. सारांश कार्याच्या दृष्टीनें जरी या तीन या सांप्रदायांत काहीं थोडा विलक्षणपणा दिसला, तरी तो केवळ अवस्था-भेदासारखा आहे. तीन्ही अवस्थांनीं मिळून एकाच महाराष्ट्राच्या मंगलाची रचना केली आहे. श्रीतुकोबारायांनी वारकरी सांप्रदायाचें वर्णन केलेलें आहे त्या इमारतीवर ध्वज चढविणारे श्रीनाथमहाराज हे श्रीगुरूंचे नातशिष्य * होते, ही गोष्ट फार महत्त्वाची श्रीज्ञानेश्वरांनी सामान्य जनता तयार केली यवनांच्या लाटेबरोबर वाहून न जातां हवे ते क्लेश सहन करून हव्या त्या परिस्थितींत आपलें स्वत:चें असें कांही आपलेंपण राखण्याइतकें आत्मबल तिच्यांत उत्पन्न केलें. श्रीगुरूंनी श्रीशंकराचार्यांच्या सिद्धान्तांचें रहस्य ओळखून महाराष्ट्रांतील जनतेला ब्राह्मण्याचें महत्त्व पटवून दिलें आणि ब्राह्मण्य रक्षिण्यास तयार केलें. ह्या तयार झालेल्या जनतेस श्रीसमर्थांनी या भूमंडळाच्या ठिकाणीं उरलेला अल्पस्वल्धर्म रक्षण करण्याचें काम तुमचें आहे असा दिव्य संदेश देऊन त्याकरितां देव पाठीशीं उभा असल्याची प्रतीति आणून दिली ; आणि ‘मराठा तितुका मेळवून ब्राह्मण्य रक्षावें आदरें’ हा मार्ग दाखवून दिला. ह्यावरून महाराष्ट्राच्या इतिहासांत श्रीगुरूंचें कांहीं विशेष कार्य आहे ही गोष्ट लक्षांत येते. आजही पुन्हा तसाच प्रसंग आला आहे. अशा वेळीं या एकवार जीवदान देणार्‍या महाराष्ट्राच्या प्रस्थानत्रयीकडे जनतेचें जितकें लक्ष लागेल तितकें हवेंच आहे.  
(३) श्रीगुरुचरित्र हें घरोघरीं लोकांच्या वाचण्यांत असूनही त्याच्याकडे वाङ्‌मय-उपासकांचें लक्ष आतांपर्यंत फारसें गेलें नाहीं. याचें कारण हा ग्रंथ बहुतकरून विशेष पद्धतीनें वाचला जातो हें असावें. तें अतिशय पवित्र आहे अशा श्रद्धेमुळे बहुतकरून तो नित्यक्रमाने सोवळ्यांतच वाचतात. त्याचप्रमाणें स्त्रीशूद्रांनी तो वाचूं नये अशीही समजूत आढळून येते. खुद्द सरस्वतीगंगाधरांनी म्हणा, कीं श्रीगुरुचरित्रास अवतरणिका जोडणार्‍या भक्तानें म्हणा, ‘‘अंत:करण असतां पवित्र । सदाकाळ वाचावें गुरुचरित्र ।’’ असें म्हणून ठेविलें आहे. त्यावरून असें दिसतें कीं ‘नित्य नियम’ म्हणून अथवा सप्ताहपद्धतीनें श्रीगुरुचरित्र वाचण्याचा क्रम सोडला तर सामान्य शुचिर्भूत अवस्थेंत श्रीमद्भागवत अथवा शिवलीलामृत इत्यादि ग्रंथासारखा तो वाचावयास हरकत नसावी. अतिशय शुचिर्भूतपणानें त्याचें पारायण करणें हे ‘तपोदृष्ट्या’ अवश्य आहे असें वाटतें. ‘भक्तिभावास’ त्याची गरज नसावी. स्त्रीशूद्रांनीं वाचण्यासंबंधीं अधिकारी विभूतीकडून मीं असें ऐकिलें आहे कीं, श्रीगुरुचरित्र हा एक सबंध मंत्रच  आहे ; आणि म्हणून मंत्राच्या अनुष्ठानासंबंधींचे सर्व नियम त्याला लागू आहेत. त्यांत अनेक ठिकाणीं मधून मधून वेदाक्षरें आलीं आहेत, म्हणून तो स्त्री-शूद्रांनीं वाचण्यास प्रतिबंध आहे. जर त्या अक्षरांखालीं खुणा करून ठेवून त्यांचा उच्चार न करतां फक्त त्यावर दृष्टि टाकून वाचावयाचें म्हटलें तर स्त्री-शूद्रांनींही वाचण्यास हरकत नाहीं व अशा रीतीनें वाचणार्‍या कांही स्त्रिया माझ्या पाहाण्यांतही आल्या आहेत. श्रीगुरुचरित्राची ही मंत्रमयता आणि सप्ताहादि विशेष पद्धतीनेंच वाचण्याची आवश्यकता ह्यांचा पुढें थोडा जास्त विचार करावयाचा आहे. त्यापूर्वी अर्वाचीन पद्धतीप्रमाणें त्याचें थोडें ऐतिहासिक परीक्षण करूं.
(४) श्रीगुरुंचा अवतार शालिवाहनाच्या चौदाव्या शतकांत झाला अशी प्रचलित समजूत आहे. ‘महाराष्ट्रमहोदया’ च्या पूर्वरंगांत श्री. ना. कृ. गद्रे ह्यांनी शक १३८० हा श्रीगुरूंचा निजानंदकाल मानला आहे आणि तोच ह. भ. प. पांगारकर इत्यादिकांनी स्वीकारिला आहे. हा काल प्रमाण मानला म्हणजे श्रीगुरुचरित्र हें शक १४८० च्या सुमारास तयार झालें असावें असें ठरतें. कारण श्रीगुरुशिष्य सायंदेव ह्याचा नातू देवराव ह्याच्या नातवानें श्रीगुरुचरित्र लिहिले आहे. परंतु मला
----
‘‘दत्तात्रेयशिष्यपरंपरा । सहस्रार्जुन यदु दुसरा । तेणें जनार्दुन तिसरा । शिष्य केला खरा कलियुगी ॥ सद्‌गुरुप्राप्तीलागी सर्वथा । थोर जनार्दनासाठी चिंता । विसरला तीन्ही अवस्था । सद्गुरु चितितां चिंतनीं ॥ देवो भावाचा भोक्ता । दृढ जाणोनि अवस्था । येणें झालें श्रीदत्ता । तेणें हातु माथां ठेविला ॥ हातु ठेवितांचि तत्काळ । बोधु आकळिला सकळ । मिथ्या प्रपंचाचें मूळ । स्वरूप केवळ स्वबोधें ॥ कर्म करूनि अकर्ता । तोचि अकर्तात्मबोध झाला देता । देहीं असोनि विदेहता । तेही तत्त्वतां आकळिली ॥ गृहाश्रमु न सांडितां । कर्मरेखा नोलांडिता । निज व्यापारी वर्ततां । बोधु सर्वथा न मैळे ॥’’ इत्यादि-(एकनाथी भागवत, अ. ९)
----
स्वत:ला वरील काल थोडा बरोबर वाटत नाही. शक १३८० हा निजानंदकाल धरण्यास मुख्य पुरावे दोन आहेत. एक तर त्या ग्रंथांत वर्णिलेलीं बहुधान्यसंवत्सर, कन्यागतीं बृहस्पति, असितपक्ष, माघमास, प्रतिपदा, भृगुवासर ही परिस्थिति त्या सालीं येते. आणि तो निजानंदकाल असल्याचा उल्लेख एका जुन्या बाढांत मिळतो. ह्याच्या भरीस वाढीस तशी समजूत प्रचलित आहे आणि बेदरच्या एका बादशहाच्या पायावर व्रण होऊन तो मेल्याचें वर्णन फेरिस्त्यानें दिलें आहे हेही दोन मुद्दे आहेत. आणि तसें पाहिलें तर हा पुरावा कांहीं कमी नाहीं. परंतु माझ्या मतानें ह्यांत कांहीं अडचणी आहेत. पण त्यासंबंधीं येथें वाद उपस्थित करावयाचा नाहीं. अनेक कारणांवरून मला स्वत:ला असें वाटतें कीं, श्रीगुरूंचा जन्म शक १३८० बहुधान्य संवत्सरीं कुंभराशीस चंद्र असतां (शाळिग्राम जन्मगांव) झाला. त्यानंतर साठ वर्षे अवतारलीला करून शक १४४० त श्रीशैल्यावर बहुधान्य संवत्सरीं ते गुप्त झाले. नागनाथ त्या वेळेस कर्ता असल्यामुळे देवराव तेव्हां लहान असणें शक्य आहे. त्यानंतर सुमारें साठ वर्षांनी श्रीगुरुचरित्र लिहिलें असावें. श्रीगुरूंच्या जवळ बरेच वर्षे राहिलेल्या सिद्धांनीं तें सरस्वती-गंगाधरास सांगितलें असें ऐतिहासिक दृष्टीनें म्हणण्यास हा काळ संयुक्तिक आहे. त्या काळीं ते फार वृद्ध असावेत, एवढेंच. ‘दक्षिण देशाचा महाराजा’ म्हटला तो बहुतकरून रामरायाचा उल्लेख असावा. कारण एका स्वारींत तो सोलापूरच्या बाजूस आला होता. सारांश श्रीगुरुचरित्राचा अवतार शक १५०० च्या सुमारास झाला असावा. कोलगांव (सावंतवाडी) येथील वैद्यभूषण सातवळेकर यांस सापडलेल्या गुरुचरित्राच्या प्रतीवर शक १५०४ आहे, असे त्यांजकडून आलेल्या पत्रावरून समजून येतें. परंतु ग्रंथलेखनाचा शक पन्नासाव्या अध्यायाच्या शेवटीं आहे म्हणे. या गोष्टींतही कांहीं अर्थ असणें संभवनीय आहे.
(५) श्रीगुरुचरित्राचे अध्याय किती हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कांहीं प्रतींत एक्कावन्न अध्याय आहेत व एकूणपन्नास, पन्नास, अशा अध्यायांच्या पोथ्या असल्याचीही माहिती मिळते. आणि त्रेपन्न अध्यायांची तर आज आपण पाहातोंच ! तेव्हां त्यासंबंधींही थोडा विचार केला पाहिजे. श्री अण्णासाहेब पटवर्धन ह्यांनीं थोडासा संशोधनाचा प्रयत्न केला होता आणि श्रीगुरूंची इच्छा नाहीं असे समजल्यावरून तो सोडून दिला होता, इत्यादि हकीकत त्यांच्या चरित्रांत आहे. त्यांच्या सांगण्यांत असें येत होतें कीं, श्रीगुरुचरित्रांत एक अध्याय मंत्रशास्त्रासंबंधीं होता; परंतु श्रीगुरुंच्या आज्ञेवरून सायंदेवानेंच तो काढून टाकला, इ. हल्लींचा बावन्नावा अध्याय कोणी दुसर्‍यानें बनविला आहे हें उघड दिसतें. कारण त्याची ओवीं वेगळी आहे व त्यांत बहुधान्यास, सिंहेस गुरु होता असें म्हटलें आहे ! अवतरणिका कोणाची असावी हा एक प्रश्र्नच आहे. परंतु तिच्यांतील शेवटच्या रहस्यमय ओंवीवरून* (श्रीगुरुरूपी नारायणा ।) विश्वंभरा दीनोद्धरणा । आपुली आपण दावूनि खुणा । गुरुशिष्यरूपें क्रीडसी॥) ती सायंदेवाची असणें शक्य आहे असें वाटतें. एकेचाळीस व बेचाळीस मिळून पूर्वी एक अध्याय होता असेंही श्रीअण्णासाहेब म्हणत. आतां तशी पोथीच सापडली असून श्रीगुरुगीतेचा स्वतंत्र अध्यायच सापडला आहे. म्हणजे एकंदर फार घोटाळ्याची परिस्थिती दिसते. या घोटाळ्याचा उलगडा पुढीलप्रमाणें करतां येईल. श्रीअण्णासाहेब पटवर्धन व इतर अधिकारी व्यक्तींकडून मीं असें ऐकिलें आहे कीं, श्रीगुरुचरित्रांत पूर्वी मंत्रशास्त्रासंबंधीं एक
----
* विनायक बाजी चांफेकर यांनी चिंचवड इ. स. १८६९ त (शक १७९१) छापलेल्या शिळाछापी प्रतींत अवतरणिकेचा अध्यायच नाहीं. या पोथींत दुसरीही गोष्ट विशेष आहे. बेचाळिसावा अध्याय बहुतेक छापी पोथ्यांतून हल्लीं जसा कांहीं प्रास्ताविकावांचून आहे तसा नसून त्यांत १२ ओव्या तत्प्रीत्यर्थ घातल्या आहेत व त्यामुळे सायंदेव आज्ञा घेऊन घरीं गेला, कुटुंबास घेऊन घरीं गेला, कुटुंबास घेऊन आला व त्यानें पुढील यात्रानिरूपण ऐकिलें असें दाखविलें असून त्यानंतर घरीं जाऊन तो पुन: भाद्रपद शुद्ध १४ दर्शनास आला असें म्हटलें आहे व त्यापुढें पुन: काशीयात्रा निरूपण आहे. यावरून या अध्यायांत किती फिरवाफिरव झाली आहे तें दिसून येतें. अवतरणिकेत अखेरची ओवी महत्त्वाची आहे. श्रीगुरूंनींच सिद्धाचें रूप घेऊन सरस्वती-गंगाधरावर कृपा केली हें सांप्रदायिक रहस्य तींत आहे व ती प्रस्तुत प्रतींत १ ल्या अध्यायाचे शेवटीं ‘प्रत्यक्ष दर्शन योग’ असे म्हटले आहे त्याला धरूनच आहे.
----
अध्याय होता. परंतु, श्रीगुरुंच्या आज्ञेवरून तो गाळून टाकिला असें वर लिहिलें आहे. त्यावरून ह्या घोटाळ्याचा थोडासा उलगडा होतो. वैद्य० सातवळेकर ह्यांनीं शक १५०४ च्या प्रतीवरून नक्कल केली होती, त्या प्रतींत काशीयात्रेचे अध्याय दोन आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण ती प्रत सर्वात जुनी दिसते. पूर्वी एकेचाळीस व बेचाळीस अध्याय मिळून एक होता असें श्रीअण्णासाहेबही म्हणत. श्रीगुरुगीता म्हणून जो अध्याय सांपडला आहे त्याची ओंवी गुरुचरित्रासारखीच आहे ; परंतु तो मूळ ग्रंथांतला असावा असें मला स्वत:ला वाटत नाहीं. हें सरस्वतीगंगाधराचें स्वतंत्र प्रकरण असून कोणीतरी मागाहून गुरुचरित्रांत समाविष्ट केलें असणें शक्य आहे. मूळ श्रीगुरुचरित्र एक्कावन्न अध्यायांचें स्वतंत्र झाल्यावर अवतरणिकेचा अध्याय बनविला असावा. त्याचे बावन्न अध्याय अशी त्यामुळें समजूत कांहीं काळ असावी. बावन श्र्लोकी गुरुचरित्र त्यामुळेंच प्रचारांत आलें. श्रीगुरूंच्या आज्ञेनें सरस्वतीगंगाधरांनींच एक अध्याय काढून टाकून काशीयात्रेच्या अध्यायाचे दोन केल्यामुळें पुन्हा बावन्न ही संख्या कायम राहिली. परंतु, एक अध्याय काढून टाकिला आहे याची जाणीव लोकवार्तेत राहिल्यामुळें ती उणीव भरून काढण्याची इच्छा कांहीं लोकांना होणें साहजिकच होय. तसा प्रयत्न निरनिराळ्या भक्तांनीं दोन प्रकारांनी केला असें दिसतें. कोणी तरी सायंदेवाची म्हणून समजली गेलेली अथवा असलेली गुरुगीता त्यांत समाविष्ट करून एकेचाळीस व बेचाळीस पुन: एक केले आणि कोणी श्रीगुरुसमाधीचा म्हणून केलेला अध्याय कांहींनीं समाविष्ट करून घेतला. परंतु पुढें हे सारेच अध्याय कायम राखण्याची बुद्धि होऊन एकत्र केले गेल्यामुळे एकंदर त्रेपन अध्याय झाले ! वैद्य० सातवळेकर ह्यांना गाणगापुरांतून मिळालेल्या प्रतींत ग्रंथलेखनाचा शक पन्नासाव्या अध्यायाच्या शेवटीं आहे. यावरून असें वाटतें की समाधीचा अध्याय देखील पन्नास अध्याय तयार झाल्यानंतर कांही काळानें झाला असावा. अर्थात्‌ हे सारे संभवनीय तर्क आहेत.
(६) अध्यायासंबंधानेंच एवढा घोटाळा आहे, तेव्हां आंतल्या पाठभेदासंबंधानें तर तो अतिशयच विलक्षण आहे यांत कांही नवल नाहीं. श्रीगुरुचरित्र हा एक मंत्र आहे असें म्हटलें म्हणजे मंत्रशास्त्राच्या तत्त्वाप्रमाणें त्यांतील प्रत्येक अक्षराचा उच्चार सरस्वती-गंगाधराला तें अक्षर जसें स्फुरलें तसाच झाला पाहिजे ही गोष्ट उघड आहे. कारण वैदिक शास्त्राप्रमाणें मंत्र ही एक स्वयंभू शक्ति आहे. वैदिक संस्कृतीनें जर कोणतें मोठें रहस्य आकलन केलें असलें तर तें हेंच कीं शब्दशक्ति ही स्वतंत्र असून तिच्यामध्यें उत्पादक सामर्थ्य आहे. स्थूल, सूक्ष्म सर्व सृष्टीचें मूल आकाशतत्त्वात्मक स्वरूप शब्दमय आहे आणि व्यक्त पदार्थास असे मुलभूत असलेले शब्दसमूह म्हणजेच वेद. म्हणून ते वेद नित्य व स्वयंभू आहेत. त्यांचा उच्चार यशाशास्त्र जशाच्या तसाच झाला, तर ‘‘स भू: इति व्याहरत्‌ । स भूमिं असृजत्‌ ॥ह्याप्रमाणें सृष्टि निर्माण करतात, असा शास्त्रसिद्धान्त आहे.* सरस्वती-गंगाधरांच्या तोंडांतून अखंड सूर्यस्थित असलेल्या श्रीगुरूंनी जे शब्द काढले ते वेदांप्रमाणें अनादि शब्दच आहेत. म्हणून त्यांचाही उच्चार जशाच्या तसाच झाला पाहिजे. पण हल्लींच्या (इतरत्र छापलेल्या) गुरुचरित्रांत तर केवढा मोठा घोटाळा आहे ! अशा स्थितींत त्याच्या संशोधनाचा प्रयत्न होणें आवश्यकच होतें. तशा प्रकारची प्रेरणा श्रीगुरुभक्त रामचंद्रअण्णा कामत ह्यांस झाली हें त्यांचें व सर्वांचें सद्भाग्यच आहे ह्यांत कांहीं शंका नाहीं.
(७) श्री. कामत ह्यांनी केलेला हा प्रयत्नदेखील तसें पाहिलें तर अगदीं पर्याप्त असें कोणी म्हणूं शकणार नाही. कारण श्रीगुरुंनीं त्यांना प्रेरणा केली असली तरी मानवी बुद्धीनेंच त्यांनीं हें कार्य केलें आहे आणि तेंही निरनिराळ्या प्रतींवरून जो पाठ बरा दिसेल तेवढा उचलावयाचा इतक्यापुरतेंच प्रामाणिकपणानें केलें आहे. स्वत:चें असें कांहीं अधिक घातलें नाहीं अथवा कांहीं कमीही केलें नाहीं.* असें करीत असतांना प्रत सर्वस्वी मूळाबरोबर झाली असेल अशी हमी देणें धोक्याचें आहे, परंतु एवढें मात्र म्हणतां येईल कीं, प्रचलित सर्वच प्रती अशुद्ध असल्यामुळें प्रत्येक प्रत वाचणारांना अशुद्धाचा जो दोष पत्करावा लागतो तो ही प्रत वाचणाराला सर्वातं कमी लागेल ; आणि हाही कांही थोडा लाभ नाही.
श्रीगुरुचरित्रासंबंधीं जर अशीच स्थिति आहे, तर आजपर्यंत ज्यांनी तो ग्रंथ वाचला त्यांचें अनुष्टान फुकट गेलें कीं काय अथवा अशा स्थितींत तो ग्रंथ म्हणून लाभ काय अशी मात्र शंका येण्याचें कारण नाहीं. कशाहीं रीतीनें तो वाचला असतांना सिद्धिप्रद आहे. कारण जसा तो ‘सिद्धमंत्र’ आहे तसाच ‘वरदमंत्र’ ही आहे. सिद्धमंत्राचें रहस्य यथाशास्त्र उच्चारांत आहे. वरदमंत्राचें रहस्य त्याला वर देणार्‍याच्या सामर्थ्यांत आहे. त्यामुळें नुसत्या त्याच्या वाचनानेंही आपल्या वरानें बांधले गेलेले श्रीगुरु वाचकांस साहाय्य करितात, म्हणून आजपर्यंत वाचणार्‍यांची अनुष्टानेंही व्यर्थ नाहींत. आज जे भाविकपणानें वाचतात त्यांचींही वांया जात नाहींत आणि पुढें वाचणार्‍यांचीही जाणार नाहींत. मात्र इतकेंच कीं अगदीं मूळास धरून वाचावयास मिळालें तर दुहेरी फायदा होईल आणि तसा फायदा श्री. कामत ह्यांच्या प्रतीनें मिळेल अशी आशा वाटते.
(८) कोणत्याही गोष्टीचा बारीक अभ्यास न करितां सहज लीलेनें तिच्यावर कांहींतरी शेरा मारण्याची जी अलीकडची पद्धत आहे, त्या पद्धतीचे लोक नेहमीं असें म्हणतांना आढळतात कीं श्रीगुरुचरित्रांत आहे तरी काय ? पुराणांतल्या भाकड कथा, नाहीं तर कोणास संतति देणें, कोणास द्रव्य देणें, अशा कांहींतरी रोचक गोष्टी ; अथवा आठ चुळा भराव्यात का बारा भराव्यात, कांदा खाऊं नये, निळें वस्त्र परिधान करूं नये, अशा तर्‍हेचें कांहीं विधिनिषेध. येऊन जाऊन नवनाथांतील प्रत्येक नाथ ज्याप्रमाणे ब्रह्मा-विष्णु-महेश्वराला चळचळ कांपावयास लावतो, त्याप्रमाणें गुरु म्हणजे सार्‍या देवांची शेंडी हातांत ठेवणारा एक अगम्य पुरुष अशा तऱ्हेची भपकेदार बुवाबाजी, हल्लींच्या ‘भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:’ (‘देह तोचि देव, भोजन ते भक्ति । मरण ते मुक्ति पाषांडाची॥’ तुका०) अशा ह्या काळांत तर श्रीगुरुचरित्र म्हटलें कीं कित्येकांच्या पोटांत शूळ उठतो. पुण्याचे एक आसुरयति  तर श्रीगुरुचरित्राचा फोलपणा दाखविण्याकरितां पांचशें पानांचा ग्रंथ लिहीत आहेत, हें समजून वाचकांस हसूंच येईल. जोपर्यंत एकशें पंचाण्णव सूत्रांचें इवलेसें पातंजलदर्शन सप्रयोग कोणी खोडून काढीत नाहीं, तोपर्यंत अशा प्रयत्नांस केवळ वावदुकीपलीकडे जास्त किंमत देतां येणार नाहीं. कारण श्रीगुरुचरित्राचाच तर काय, पण आमच्या सर्वच धार्मिक विधिनिषेधांचा पाया योगशास्त्र हा आहे. ह्यांवर कित्येक जण असें म्हणतात कीं तसें असेल तर सनातनी लोकांनीं तसें सप्रयोग सिद्ध करून द्यावें. परंतु सरळ पाहिलें तर ही जबाबदारी त्यांच्यावर येऊं शकत नाहीं. कारण त्या गोष्टी सिद्ध आहेत हें त्यांना पटलेलें असतें आणि त्यांचे त्यांना अनुभवही आलेले असतात. श्रीअण्णासाहेब यांचे चरित्रांत मद्रासमध्यें असतांना त्यांनी समक्ष पाहिलेली एक छोटीशी गोष्ट दिली आहे. रस्त्यावर उभे राहून जमलेल्या लोकांत एका पाद्यानें केलेली हिंदुधर्माची निंदा सहन न होऊन अस्पृश्य जातीच्या एका सामान्य माणसानें जवळच्या दगडावर मंत्रोच्चारपूर्वक विंचवाचें चित्र काढलें व पाद्याला त्याला हात लावण्यास सांगितलें. पाद्यानें त्याच्या नांगीवर कुचेष्टेनें बोट ठेवतांच प्राणान्त वेदना होऊन तो जमिनीवर लोळावयास लागला. अशा प्रकारचे अनुभव मधून मधून येतच असतात. ते खोटे आहेत आणि पातंजलशास्त्रांत आरोग्यापलीकडे तथ्य नाहीं असें सर्वज्ञपणाचा आव घालून म्हणणार्‍या लोकांवर त्याच्या प्रयोगाची जबाबदारी आहे. तशी मोठ्या प्रमाणावर शक्तिसंपन्नता
----
* याबद्दलचा खुलासा संशोधकांनीं आपल्या प्रस्तावनेंत योग्य रीतीनें केलेला आहे.
हा अपशब्द नव्हे, श्रीभगवद्गीतेने दिलेली पदवी आहे. असुर म्ह. पुनर्जन्म न मानणारे व ‘अपरस्परसंभूतं जगदाहुरनीश्वरम्‌’ या वृत्तीचे लोक,    
----
आल्यावर सनातनी लोक तरी वाद कशाला करीत बसतील ! वाद तोंपर्यंतच शक्य आहे कीं जेथपर्यंत प्रत्यक्ष प्रतीति देतां येत नाहीं आणि तशी स्थिति येईल. शास्त्र हें संशोधनाच्या अवस्थेंत असतें. संशोधन करून आपण प्रत्येक पाऊल पुढें टाकतों अशी आपल्या शास्त्रीयतेची ऐट मिरविणार्‍या लोकांवरच प्रयोगाची जास्त जबाबदारी आहे. एरव्हीं अभिरुचीप्रमाणेंच वागावयाचें म्हटल्यास कोणीच कोणास दूषण देण्याचें कारण नाहीं.
(९) श्रीगुरुचरित्रांत चतुर्वर्णांना पुन्हा आचारसंपन्न बनविण्याचें धोरण असल्यामुळे साहजिकच गायत्री आणि व्रतवैकल्य ह्यांचे माहात्म्य आहे आणि अन्नग्रहणासारख्या बारीक सारीक गोष्टींपासून विधिनिषेध सांगितले आहेत. ‘आहारपरिशुद्धौ सत्त्वपरिशुद्धि:’ असें छांदोग्यांत सांगितलें आहे आणि अन्नांतील ‘अणिष्ट’ भागापासून मन तयार होतें, असें त्याचें कारणही सांगितलें आहे. अंतरबाह्य शुद्धीशीं अन्नाचा असा संबंध असल्यामुळें चातुर्वर्णांकरितांच तर काय, पण सर्व जगाकरितां सत्कर्म करूं म्हणणार्‍या ब्राह्मणाच्या बोकांडीं हे सर्व विधिनिषेध बसले ह्यांत कांहींच नवल नाहीं आणि वावगेंही पण नाहीं. ब्राह्मण केव्हांही मूठभरच होते आणि असणार. ब्राह्मणेतर मनुष्यज्ञातीस हे विधिनिषेध उत्तरोत्तर अगदींच कमी असून त्यांना बहुतेक हल्लींच्या युरोपियन पद्धतींनेही रहाणी ठेवून वाटेल तें देशकल्याण धर्मनिष्ठ राहूनही करतां येतें. मूठभर ब्राह्मणांचे आचारधर्म कोट्यवधि लोकांच्या हिताच्या आड येतात हें म्हणणें, छत्री सांपडेना म्हणून सारा संसार बुडाल्याचा प्रसंग डोळ्यांपुढें आणून आक्रोश करणार्‍या लेडी कॉडेलच्या कांगाव्याप्रमाणे आहे.
(१०) गायत्रीसंबंधी गुरुचरित्रांतील कित्येक गोष्टी तर योगशास्त्राखेरीज समजणार नाहीत. उदा० गायत्रीनें अभिमंत्रित केलेल्या अर्ध्यांनी सूर्योदयास अडथळा करणार्‍या तीस कोटी मंदेहांचा नाश करावयास सांगितलें आहे. न्यास व मुद्रा केल्याखेरीज गायत्री जप करूनही ‘मुद्राविणे गायत्री मंत्र । जप करितां सर्व व्यर्थ’ असेंही स्पष्ट सांगितलें आहे. गायत्रीच जर विलोम (उलट्या अक्षरांनी उच्चार करून) म्हटली तर तें ‘ब्रह्मास्त्र’ होतें. ह्या सर्व गोष्टींचा उमज योगशास्त्रानेंच पडतो. वैदिक ध्येय सर्व लोकांकरितां ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ असें आहे. ह्यास सविता ज्योतीची प्रचीति येण्याच्या आड एकच गोष्ट येते. तमोगुणाने वेष्टित झालेल्या जीवाला त्यासंबंधी ‘तीव्रसंवेग’ च उत्पन्न होत नाहीं. हेच मंदेह राक्षस होत. त्याचा बाहेर सृष्टींत परिणाम घडवून आणण्याकरितां ‘वरेण्य’ अशा ‘भर्गाचे’ ध्यान करून प्रार्थना करावयाची आणि स्वत:वर विशेष परिणाम करून घेण्याकरितां त्याचें प्रतीकरूप जें सूर्यतेज त्याची आपल्या ठिकाणीं धारणा करावयाची. सूर्योदयाच्या वेळीं अंजळींत पाणी घेऊन त्यांत पडलेल्या सूर्यकिरणाच्या प्रतिबिंबावर ध्यान करून तें तेज आपल्या नेत्रांत सांठवावयाचें असा अर्ध्यप्रदानाचा मूळ सांप्रदाय आहे. त्याच्या योगानें आपली स्वत:ची मंदेहा त्वरित नष्ट करण्याचें कार्य होऊन शरीरही निरोगी व तेजस्वी बनतें.
(११) न्यास करण्यामध्यें पिंड-ब्रह्माण्डाच्या तादात्म्याचें तत्त्व आहे आणि मुद्रांत शरीरांत अनंत केंद्रांतून आणि प्रवाहांतून मंदपणें वाहणार्‍या शक्तीस जागृत करण्याचें कार्य आहे. मुद्रांच्या विशिष्ट अंगविक्षेपांनी आंतील यंत्रास हवा तसा धक्का पोहोंचून हें कार्य घडून येतें. म्हणून गायत्रीच्या पुरश्र्चरणास मुद्रा ह्या अवश्य आहेत. मात्र मुद्रेवांचून केलेला रोजचा जप व्यर्थ जाईल असें नाहीं. त्या दोघांचें तत्त्व वेगळें आहे. श्रीगुरुचरित्रांत वर्णिलेल्या पुरश्र्चरणाचा हेतु दुसरें कोणतेंही योगसाधन न करतां केवळ गायत्रीच्याच उच्चारानें हळूहळू शुद्ध होऊन क्रमाक्रमानें सर्व शरीर ‘सर्वदेवपदवी पाविजे ।’ असे होतें. त्याकरितां मुद्रापूर्वक करणें अवश्य आहे. परंतु, नित्यकर्माचें जें एक फळ-गांठलेल्या पायरीपासून जीवास खालीं न पडूं देणें, त्याकरितां नित्यकर्म म्हणून संध्येंत करावयाचा गायत्रीजप मुद्रेवांचून केला तरी हरकत नाहीं. त्याच्यायोगानें अध:पाताची भीति नाहींशी होऊन देवतासंतोष होईल. तेजतत्त्वाचे ध्यान झाल्यामुळें शरीर निरोगी व तेजस्वी होऊन प्रकाशरूप बुद्धिही प्रभावशाही होईल. आतां हाच गायत्रीमंत्र विलोम जपला असतां ब्रह्मास्त्रासारखा कां उपयोगी पडतो ते रसायनशास्त्राच्या उदाहरणानें लक्षांत येईल. नायट्रोग्लिसरीन हें द्रव्य थोडें घेऊन त्याला जर आगकाडी लाविली तर तें स्पिरिटप्रमाणे संथपणे जळतें. पण त्याच्यावर थोडा आघात केला तर एवढा स्फोट उत्पन्न होतो कीं एक औंसभर द्रव्याने मोठें शहरही उडून जाईल, याचें कारण असें कीं, नायट्रोग्लिसरीनचे परमाणू हवेंतील निरनिराळ्या द्रव्याशीं मिळण्याच्या क्रियेस जळणानें अडथळा न होतां उलट तिला अवकाश मिळतो. आघातानें त्यांचें एकदम विभजन झाल्याकारणानें त्यांच्या भोवतालच्या हवेंतील द्रव्यांत एकदम विलक्षण उलथा पालथ होऊन जाते. तिचाच परिणाम स्फोट असतो. रात्रीं शांतपणें निजलेल्या सैन्यावर एकदम शत्रूचा छापा आला अशी हूल उठली म्हणजे जशी दाणादाण होऊन जाते तसेंच हें आहे. गायत्री मंत्र हा सवितृरूप उत्पादक क्रियेचा कारक आहे. तो उलट जपल्यामुळें वरच्या उदाहरणांत सांगितल्याप्रमाणें त्यांतील निरनिराळ्या अक्षरांनी उत्पन्न होणार्‍या लहरींचा गोंधळ होऊन जातो आणि त्याचा परिणाम उत्पादक शक्तीच्या अगदीं उलट म्ह. संहारक असा होतो. श्रीगुरुचरित्रांतील लोकांस विलक्षण लागणार्‍या अनेक गोष्टींची संगति शास्त्रीय पद्धतीनें अशी लावतां येते. परंतु आधींच वाढलेल्या या प्रस्तावनेंत त्यांचा विचार करणें शक्य नाहीं. तरी पण एका विशेष गोष्टीचा विचार करून या प्रस्तावनेचा समारोप करूं
(१२) श्रीगुरुचरित्रांत ब्राह्मणांच्या आचारधर्माप्रमाणें स्त्रीशूद्रांकरितां आणि ब्राह्मणांच्याहि विशेष कामना पुरविण्याकरितां अनेक व्रतवैकल्ये सांगितलीं आहेत. ह्या व्रतवैकल्यांचा सूत्रोक्त धर्माशीं प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळें लोकांच्या अंधश्रद्धेचा उपयोग करून घेऊन स्वत:चा लाभ करून घेण्याकरितां भंड-धूर्त-निशाचरांनीं उत्पन्न केलेलें तें एक बंड आहे असेंही नेहमीं म्हटलें जातें, तें बरोबर नाहीं. व्रतवैकल्यें हीं कांहीं झालें तरी ‘विशेष धर्म’ होत. त्यांच्या योगानें करणार्‍याच्या स्थूल सूक्ष्म शरीराची शुद्धि होते, आस्तिक्य-भावना दृढ होते, चित्तशुद्धीस साहाय्य होतें. कांहींतरी निरर्थक गोष्टी करण्यापेक्षां, अथवा वेळ जात नाहीं म्हणून ‘पेशन्स’ खेळत बसण्यापेक्षां जास्त चांगल्या उद्योगांत काळ जातो. त्याची दोन्ही प्रकारांनी किंमत असते. त्या काळांत कांहीतरी दुसरे उद्योग करण्यांत शक्तीचा जो अपव्यय होतो तो वांचतो आणि नाहीं म्हटलें तरी अनेक शुभ संस्कार बीजरूपानें चित्तामध्यें शिरतात. अशा रीतीनें तीं कोणताही अपाय न करतां पर्यायाने परमार्थाला उपकारकच होतात. व्रतवैकल्यें करणार्‍या माणसांना आयुष्य कंटाळवाणें वाटत नाहीं. करमणुकीचे नित्य नवे प्रकार शोधावे लागत नाहींत ; रडकीं भावगीतें गाण्याची वेळ येत नाहीं अथवा आयुष्यांत कांहीं मौज वाटत नाहीं म्हणून आत्महत्त्या करण्याचाही प्रसंग येत नाहीं. ह्या व्रतवैकल्याचें जे तंत्र सांगितलेले असतें, त्या तंत्राचा फलाशीं अर्थाअर्थी कोणताही संबंध दिसत नसल्यामुळें, वरवर विचार करणारांना तें कांहींतरीच बंड आहे असें सहज वाटतें आणि पुष्कळ वेळीं फलाशीं त्यांचा तसा प्रत्यक्ष संबंध नसतोहीं. वरदमंत्राचें फळ ज्याप्रमाणें वर देणारी देवता आपल्या सामर्थ्यानें देते, त्याप्रमाणें व्रतवैकल्याचें फळ प्रत्यक्ष त्यांच्या तंत्रांतून उत्पन्न होत नसून आपल्याला नित्य समाधींतून जागें करावें म्हणून एक खूण म्हणून व्रतवैकल्याचें तंत्र सांगणार्‍या मूळ देवतेच्या सामर्थ्यातून उत्पन्न होतें, त्यांत विलक्षण असें कांहींच नाहीं. वैदिक कोशविज्ञानास आणि योगशास्त्रास धरून ती गोष्ट आहे.
(१३) सारांश, भक्तिमार्गातील अथवा नामस्मरणाच्या मार्गांतील स्वकर्मच्युति हा जो शास्त्रोक्त दोष तो नाहींसा करून जनतेला स्वकर्माच्या ठिकाणीं अभियुक्त करून भक्तिप्रवण करण्याकरितां आणि लोकांच्या ठिकाणीं त्याग व निर्भयता उत्पन्न करण्याकरितां श्रीगुरुचरित्राचा अवतार आहे. श्रीगुरूंनीं ब्राह्मणांस असें शिकविलें कीं, ब्राह्मणाचें सारें जीवनच यज्ञमय आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, सत्यं वद, धर्म चर, मातृदेवो भव, पितृदेवो भव, इत्यादि साधारण धर्म तर ब्राह्मणांनीं पाळलेच पाहिजेत ; परंतु ह्या सर्वांच्या योगानें शुद्ध ठेवलेल्या शरीरास शास्त्रप्रतिपादित विधिनिषेधांच्या मर्यादांनीं ‘दिव्य’ बनवून-‘ब्राह्मणो लोकपालक: ’ असें म्हणवून घेतलें पाहिजे. ब्राह्मणांचें कर्म कमीअधिक प्रमाणानें त्याला व सर्व विश्वाला उपयोगीं पडतें व त्यानेंच त्याचे तीन्ही पुरुषार्थ आणि मोक्ष त्याला मिळतात. ते टाकून मोक्षाकरितां योगादि दुसरे स्वतंत्र उपाय करणारा ब्राह्मण हा स्वार्थी अल्पधारिष्टाचा आणि 'स्तेन एव सः' असा आहे. म्हणूनच ब्राह्मणाला कोणतीही गोष्ट मग ती श्रद्धापूर्वक पितरांचे स्मरण करण्याची असो, भक्तिपूर्वक देवतार्चन करण्याची असो, आसन-शयनादि अथवा खानपानादि शुलक गोष्टींपासून तों स्त्रीसुखासारख्या अत्युत्तम मानल्या जाणाऱ्या शारीरिक उपभोगांची गोष्ट असो, सर्व कांहीं त्याला एका शास्त्राच्या तंत्राने करावे लागते. आपल्या इच्छेप्रमाणें आवडलेले एखादें फूल एखाद्या देवमूर्तींवर ठेवण्यासारख्या क्षुल्लक बाबतींतही तो स्वतःच्या लहरीप्रमाणें वागूं शकत नाहीं. हें ध्येय ब्राह्मणांपुढे ठेवून सर्वसामान्य जनतेस त्यांनी असा संदेश दिला की " ज्यासी नाहीं मृत्यूचे भय । त्यासि यवन असे तो काय श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचे मुख्य भय नाहीं ॥ " मृत्यूची भीतिच एकदा ज्यांनी टाकून दिली ते त्रैलोक्यविजयी होऊन साम्राज्यसंपन्न झाले ह्यांत नवल नाहीं. श्रीगुरूंची तर आशा अशी होती कीं " जरी आम्हांपाशी राहसी । तरी त्वां न बंदिजे म्लेंच्छासी ॥ " म्लेंच्छापुढें नमन करणें म्हणजे साक्षात मृत्यु हे त्यांनीं शिकविलें आणि ब्राह्मणाच्या ठिकाणीं सामर्थ्य असलें तर यवन राजाही त्याला डोक्यावर घेऊन मिरवितो अशी प्रतीति दिली. साधुसंतांनीं उत्पन्न केलेला हा विश्वासच पुढें शिवाजी तानाजींच्या रूपानें प्रकट झाला आणि अटकेपासून रामेश्वरापर्यंत व द्वारकेपासून जगन्नाथापर्यंत विस्तार पावला.
(१४) असा हा ग्रंथ आजही त्याची कास धरली असतां उपयोगी पडतो असा सहस्रावधि साधकांचा अनुभव आहे. तर मग देशाचें दुर्दैव अजून कां संपत नाहीं असा कोणीही सहज प्रश्न करील. त्याचे उत्तर असें आहे कीं तशा संकल्पानें यत्किंचितही स्वतःचा स्वार्थ आड न येऊ देतां ह्या ग्रंथाची पुरेशी कास धरलीच आहे कोणी ? पुरेशी म्हणण्याचें कारण असे की देशाचें दुर्दैव संपणे किंवा राहाणें ही किती प्रचंड गोष्ट आहे? तिच्याशीं कोट्यवधि जीवांचा कसा संबंध असतो व त्या मानाने तिला प्रतिकार करावयाचा म्हटल्यास उलट कर्मही केवढे मोठें करावयास पाहिजे ह्याची अंधुक कल्पनाही हा प्रश्न करणाऱ्यांच्या डोक्यांत नसते. डायनामाईटचें एक लहानसे काडतूस घेऊन त्यानें हिमालय पर्वत उलथून कसा पडत नाहीं अशी शंका प्रदर्शित करण्यासारखाच प्रश्न हे लोक विचारतात ! पुरेशी कास धरली असतां हा ग्रंथ देशाचे दुर्दैवही आठवू शकतो अशी भाक ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन, श्रीमद् वासुदेवानंद-सरस्वती ह्यांच्यासारख्या अवतारी पुरुषांनी दिली आहे.
(१५) असा हा ग्रंथ पूर्वी म्हटल्याप्रमाणें निर्मल अंतःकरणाने वाचला असतां केव्हांही हितकारकच आहे, पण त्यांतल्या त्यांत तो सप्ताह पद्धतीनें वाचला असतां त्वरित फल देतो. सप्ताह वाचण्याचे नियम अवतरणिकेंत दिले आहेत, त्याप्रमाणें तो वाचीत असतां वाचण्याव्यतिरिक्त इतर वेळींही शरीर व मन हीं दोन्हीही एक प्रकारच्या विशेष अवस्थेत राहून श्रीगुरूंच्या दिव्य तेजाशीं त्यांचा तेवढा संबंध जोडला जातो. लोहचुंबकाला चिकटून असलेला लोखंडाचा तुकडा तात्पुरता चुंबक बनतो तशी ही स्थिति आहे. एरव्हींच्या वाचनांत शरीर-मनावर हा वाण नसल्यामुळें हा परिणाम सहसा घडून येत नाहीं. म्हणून हें अनुष्ठान सर्वात श्रेष्ठ. नित्यनियमानें होणारें थोडेसे वाचन देखील ठराविक वेळीं ठराविक रीतीनें एक संस्कार ठेवून जात असल्यामुळें श्रीतुकाराममहाराजांनीं म्हटल्याप्रमाणें ‘ओलें मूळ भेदी खडकाचे अंग' या न्यायाने परिणामकारक होऊन फलप्रद होतेंच, सप्ताहपद्धतीमध्यें शरीरमनांवर ठराविक काळांत हा जो ताण पडलेला असतो, त्याच्या कमी अधिक प्रमाणानें फलांत व फलसिद्धीच्या कालांत तारतम्य उत्पन्न होतें; परंतु या सर्वही तंत्रांचें विशेष महत्त्व सकाम वाचकांना आहे. केवळ भक्तिप्रेमानें निष्काम वाचन करणाऱ्यांना "अंतःकरण असतां पवित्र । सदाकाळ वाचावें गुरुचरित्र " हाच एक नियम. दुष्यंताने म्हटले आहे - " श्रिया दुरापः कथमीप्सितो भवेत् । "
(१६) श्रीशंकराचार्यांच्या सौंदर्यलहरीप्रमाणेंच श्रीगुरुचरित्र हा एक अद्भुत ग्रंथ आहे. सौ. छ. च्या प्रत्येक लोकाचे विधिपूर्वक अनुष्ठान केलें तर एक लहान सिद्धि मिळते. काव्यदृष्टीनेही ती अतिशय उत्तम आहे हें निर्विवाद आहे. अर्थदृष्टीनें पाहातां योग, तंत्र आणि वेदान्त ह्या तिहींचेंही रहस्य तिच्यांत सांठविले आहे. त्याप्रमाणेंच अनिष्टनिवृत्ति व इष्टप्राप्ति ह्यांस श्रीगुरुचरित्राचें विधिपूर्वक वाचन उपयोगी पडते. यवनाक्रांत झालेल्या काळांत यावनी भाषेचा एकही शब्द नसलेला शुद्ध मराठी असा हाच एक ग्रंथ तयार झाला. काव्य ह्या दृष्टीनें त्याची योग्यता कोणत्या प्रकारची आहें तें त्यांतील अनेक वर्णनांवरून आणि विशेषतः कांहीं करुण प्रसंगांवरून नीट लक्षांत येतें, ते प्रसंग वाचीत असतां व्यवहारांत प्रत्यक्ष अनुभवितांना जे उद्गार आपल्या कानीं येतात तेच हुबेहूब वाचनांत आल्यामुळें कसाही वाचक गहिंवरून क्षणभर थांबल्याशिवाय राहात नाहीं. करुणरसाच्या बाबतींत महाराष्ट्रीय मनुष्याच्या हृदयाच्या भावनांची प्रचीति इतक्या सहजोद्गारानें देण्याची हातोटी सरस्वती-गंगाधराइतकी दुसऱ्या महाराष्ट्रीय कवींत क्वचित् असेल. भक्तिरस हा तर ह्या ग्रंथाचा आत्माच आहे आणि अर्थदृष्ट्या पाहिलें तर सूत्ररूपानें त्यांत सर्व कांहीं आहे असे वाटू लागतें. धर्म म्हणजे काय असले मोठमोठे गहन विषयही" आपले वक्ष-पृष्टेंसीं । धर्माधर्म उपजवी" अशा थोड्याशा शब्दांत साधारणपणें कवि सहज लीलेनें सांगून टाकतो. त्यामुळें श्रीगुरुचरित्रांत आहे काय असें म्हणण्यापेक्षां नाहीं काय? असें म्हणावेंसें वाटू लागतें. श्रीगुरुचरित्र कोरडा वेदान्त सांगत नाहीं, निष्क्रिय भक्तिमार्ग शिकवीत नाहीं, अथवा मनुष्यजीवनाला तुच्छ लेखून कोणत्याही आभासमय ध्येयाच्या मागें लागत नाहीं. ज्ञानपूर्वक भक्तियुक्त असें स्वकर्माचरणच शिकवितें. वेदप्रतिपादित मार्गाप्रमाणे ऐहिक जीवनाचा यथाशास्त्र उपभोग घेऊन मुक्ति मिळविली पाहिजे, असें त्याचे एकंदर धोरण आहे, " या संसारी जन्मोनियां । संतुष्टवावें सकल इन्द्रियां । * मग पावे धर्मकाया। तरीच तरे भवाणैव ॥ " अशी त्याची सर्वसामान्य लोकांस शिकवण आहे. अशा प्रकारें इंद्रियांत कांहींना कांहीं संतुष्टता आल्याखेरीज मोठें धर्माचरण करण्यास त्या कायेची योग्यता होत नाहीं असें त्याला सांगावयाचें असल्यामुळें त्या संतुष्टीसही तोच साहाय्य करतो. “भुक्ति आणि मुक्ति । इहसौख्य आणि परगति " असें त्याचें दुहेरी धोरण आहे व श्री हीच या ग्रंथाची अपूर्वता आहे.
(१७) अशा या ग्रंथाच्या संशोधनाची प्रेरणा गु. भ. प. कामत ह्यांस कशी झाली आणि सतत वीस वर्षे दीर्घोद्योग करून हा ग्रंथ त्यांनी लोकांपुढे कसा ठेविला, त्यांत त्यांना काय काय अडचणी आल्या, कसें कसें ईश्वरसाहाय्य होऊन अखेरीस त्यांचा मनोरथ सिद्ध झाला, इ० सर्व हकीकत त्यांनी स्वतःच 'श्रीगुरुचरित्रांतर्गत गुरुगीता' ह्या छोट्या पुस्तकांत लिहिली आहे. ती वाचकांनी अवश्य वाचावी म्हणजे हें संशोधन कार्य कसें कठीण असतें ह्याची कल्पना येईल. अनेक ठिकाणच्या अनेक प्रती गोळा करणें हेंच आधीं मोठ्या कष्टाचें आणि खर्चाचेंही काम आहे. काशीखंडाची शुद्ध प्रत मिळविण्यास त्यांना Royal Asiatic soceity चे उपकार एका थोर गृहस्थामार्फत मागावे लागले. श्रीगुरुचरित्रांत पराशरस्मृति, स्मृतिचंद्रिका, स्कंदपुराण, देवीभागवत, इत्यादि ज्या निरनिराळ्या ग्रंथांतील विषय आले आहेत, तेथें ते सारे त्या त्या मूळग्रंथांवरून त्यांनीं शुद्ध केले असल्यामुळें त्या सर्व ठिकाणीं ह्या प्रतींत आणि जुन्या प्रतींत केवडा विस्मयकारक फरक पडतो हें २६, ३६, ३७, ४१ ह्या अध्यायांवरून विशेषतः दिसून येईल. सव्विसाच्या अध्यायांतील 'प्रजाप्रति गहन' हा अपपाठ काढून यजुर्वेदप्रवीण पुरुषाकडून समजून घेऊन दिलेला 'गुहन' हा पाठ व त्यावरील टीप, काशीखंड यात्रेंतील निरनिराळ्या गौरींची माहिती आणि गोईबाईंची कथा, छत्तिसाव्या अध्यायांतील 'वीणावाद्य ज्याचे घरीं ह्याच्याऐवजी दिलेला 'विणाविद्या' हा पाठ, अध्याय ६ व ३४ मधील रावणाचें 'सहस्रकोटि आयुष्य' या ऐवजी 'सहाकोटि आयुष्य' इत्यादि पाठांची संशोधित स्थळें पाहिलीं असतां त्यांच्या परिश्रमांचें महत्व लक्षांत येते. ग्रंथांत ठिकठिकाणीं त्यांनी दिलेल्या टीपा तर केवळ अमोल आहेत. अ. १५, ओं. ८४ यांतील तप छाया भगवती', सव्विसाच्या अध्यायांतील 'पन्नासां' चं स्पष्टीकरण व 'अष्टादशपरिशिष्टें', छत्तिसाव्यांतील 'वैश्मीं सहजार नारी' आणि गायत्रीच्या अनुष्टानावरील निरनिराळ्या टीपा ह्यांच्या अभाव हा ग्रंथ केवळ दुर्बोध झाला असता. हें सर्व करण्यास त्यांना आपल्याच शरीरांतील किती रक्त आटवावें लागले असेल, त्यांच्या मनावर व बुद्धीवर केवढा ताण पडला असेल आणि पदरालाही केवढा खार छागला असेल ह्याची कल्पना फार थोड्या वाचकांना येईल.
----
* इंद्रियतृप्तीनंतरच जन्मांतरानें अथवा याच जन्मीं धर्माचरणास योग्य अशी काया होते,
----
नुसता माझ्याशीं थोडा पत्रव्यवहार करण्यांतच किमानपक्ष त्यांचे दोनचार रुपये खर्च झाले असतील. केवळ श्रीगुरुभक्तीनें प्रेरित होऊन त्यांनीं केलेल्या ह्या तपाचे महत्त्व जाणण्यास श्रीगुरुच समर्थ आहेत. माझ्यासारखा सामान्य मनुष्य एवढेंच म्हणेल कीं, त्यांच्या गुरुगीतेचे प्रस्तावनालेखक श्री. रेगे यांनी म्हटल्याप्रमाणें "बहुश्रुतता, सत्यान्वेषण, सत्यनिष्ठा, श्रद्धा, सूक्ष्मदृष्टि, निरलस वृत्ति आणि मुद्रणालयांतील सर्व कामांतील मुख्बीपणा, ह्या गुणांनी युक्त होऊन त्यांनी हे संशोधन केलें आहे. " महाराष्ट्रांतील श्रद्धावंत रसिक जनतेनें कृतज्ञतापूर्वक त्यांच्या श्रमांचें चीज केलें पाहिजे.
(१८) ह्या कार्यासंबंधीं असा जिवंत जिव्हाळा असल्यामुळे ग्रंथ सर्वांगसुंदर करण्याविषयीं त्यांची हौसही तशीच उत्कट प्रकारची आहे. श्रीमद्वासुदेवानंद- सरस्वती ह्यांच्या आवडीचें 'दिगंबरा-दिगंबरा-श्रीपादवल्लभ-दिगंबरा ' हें भजन प्रत्येक पानावर दोन्ही बाजूनें दिलें आहे आणि प्रत्येक अध्यायास फार सुंदर छपाईची चित्रेही जोडलीं आहेत. श्रीगुरुचरित्राचा ज्ञानकांड, कर्मकाण्ड आणि भक्तिकाण्ड असा त्रिविध विभाग करून विशेष रीतीनें ते वाचण्याची दिलेली कल्पनाही अभिनव आहे. प्रथमपासूनच त्यांच्या कार्यास श्रीगुरूंचें साहाय्य असल्यामुळे त्यांना मुद्रकही तसेच जिव्हाळ्याचे आणि निरपेक्ष भेटले. तात्पर्य इतकेंच कीं, अनेक दृष्टींनी हा ग्रंथ पूर्वीच्या कोणत्याही ग्रंथाहून जास्त उपयुक्त झाला आहे यांत संशय नाहीं. कांहीं झालें तरी मूळ अस्सल प्रतींच्या अभावीं तो अतीव शुद्ध आहे असें म्हणतां येणार नाहीं हें  उघड आहे ; आणि ह्या अडचणीमुळे यांत कांहीं उणीव राहाणें अपरिहार्य असले तरी ती श्रीगुरूंच्या कृपेनें भरून निघेल अशी आशा आहे. कारण हा अवतारच प्रेममय आणि वत्सल आहे आणि म्हणूनच औदुंबर, वाडी, गाणगापूर, कुरुगड्डी, इत्यादि स्थळीं अजूनही अदृश्य रूपानें वास करून भाविकांचे मनोरथ पूर्ण करण्याचे कार्य श्रीगुरुमूर्ति करीत असते. "भक्तानां तरणार्थं सर्वजगताम् दीक्षां ददन्योगिनाम्” ही लीला भूतलावर अजूनही चालूच आहे. म्हणून जीवांकडे इतकेच उचित कृत्य आहे कीं "भलतिया भावें । तुका म्हणे जवळी व्हावें" श्रीगुरुचरित्रासारखें जवळ घेऊन जाणारें दुसरें काय आहे ? श्रीगुरुचरित्राचा उद्देश माझ्या शब्दांनीं सांगण्यापेक्षां श्रीअण्णासाहेब पटवर्धन ह्यांच्या अधिकारवाणीनें सांगितलेलाच बरा म्हणून त्यांच्या हातचा लहानसा उताराच देतों-
१. अखंड एक अनंतविश्व व सर्वव्यापक सर्वज्ञ सर्वसाक्षी परब्रह्म परमेश्वर परमात्मा सद्गुरु आहे. त्याची वेदशास्त्रानुसार सेवा भक्ति करावी.
२ श्रीभगवान् गजानन, दत्तात्रेय, श्रीपादश्रीवल्लभ हाच श्रीनरसिंह सरस्वती सद्गुरु आणि परमेश्वर परमात्मा आहे व तो अवतार भूमीवर सदैव नित्य निरंतर आहे.
३ ''त्या अवतारांत जीं अमानुष (अत्यद्भुत) कर्मे करून भक्तांच्या अनुभवाला परमेश्वरत्व आणून दिलें, त्याप्रमाणेंच आतांही त्याची सेवा केली असतां अनुभव येतो व तो सद्गुरु कृपा करितो."
"आधीं केलें आणि मग सांगितले" व "सांगावें ते आपणाला, आपणूं करितां बरें ।” असें व्रत असलेल्या अधिकारी पुरुषांनीं अधिकारी वाणीनें दिलेली ही हमी आहे. महाराष्ट्राचें पुन्हा भाग्य इच्छिणार्‍या भाविकांनी या अथवा आपल्या श्रद्धेनुरूप कोणत्याही कां होईना श्रीगुरुचरित्राच्या प्रतीची कास धरून तिची प्रचीती घ्यावी. तशी त्यांच्या बुद्धीस प्रेरणा करण्याची परम कृपा श्रीगुरूंनीं आम्हां सर्वांवर करावी अशी अनन्य भावानें करुणा भाकून ही वाङ्मयअंजुळी त्यांच्या चरणीं समर्पण करून सरस्वती-गंगाधरांच्या शब्दांत एवढेच म्हणतों कीं,
"ऐसी बुद्धी देणार । तूंचि स्वामी कृपानिधी ॥"
"भद्रं नो अपि वातय मनः ।" ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
नागपूर, विजयादशमी, शके १८६१
विष्णु केशव पाळेकर उर्फ 'अप्रबुद्ध'

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP