मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
श्रीगुरुचरित्र ग्रंथांतील कांहीं अध्यायांचें विशेष माहात्म्य

गुरूचरित्र - श्रीगुरुचरित्र ग्रंथांतील कांहीं अध्यायांचें विशेष माहात्म्य

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


(१) अध्यायांतील कथा कशीही असो तिच्यांतील रसपरिपोषाच्या मानानें वाचकाच्या मानसद्रव्यांत (Mind-substance मध्ये) कमी अधिक सामर्थ्याचा संचार होऊन त्या त्या अध्यायाच्या अधिक पारायणांनी अधिक पुण्य लागतें; देव अधिक कृपा करतो. याचा अर्थच हा की, वाचकभक्तांच्या लिंगदेहांत त्या त्या विशिष्ट मनोरथसिद्धीच्या शक्तीचे कंप किंवा लहरी (Currents or waves) वेगवेगळ्या तत्त्वाच्या उत्पन्न होऊन ती ती इच्छा लवकर पूर्ण होत असते. सृष्टींतील त्या त्या इष्ट शक्तीला व इष्ट द्रव्याला ती लोहचुंबकाप्रमाणे आकर्षण करिते, असा मानसशास्त्राचा, योगशास्त्राचा व ध्वनिशास्त्राचाही सिद्धान्त आहे. ह्या दृष्टीने विचार, करून, ज्याला समग्र गुरुचरित्राचें पारायण करण्याची सवड नसेल त्यांनी निदान त्या त्या अध्यायाची २८, ५६ किंवा १०८ पारायणें सवडीप्रमाणें करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणें आहे. ते विशिष्ट अध्याय पुढें लिहिल्याप्रमाणें - 'आरोग्य' पाहिजे असेल त्यानें तेराव्या अध्यायाचे पारायण विशेष करावें....' पारमार्थिक गुरुकृपा झाली पाहिजे असें वाटत असेल त्यानें दुसर्‍या अध्यायाचा उपयोग करावा...' सद्गुरुप्राप्तीची तळमळ' लागली असेल त्याने पहिल्या अध्यायांतील हृदय हालवून सोडणारा महा करुणापर अभंग अथवा अभंगछंदपर ओंव्या
"वंदू विघ्नहरा, पार्वतीकुमरा । नमूं ते सुंदरा शारदेसी ॥"
येथपासून अखेरपर्यंत भावनायुक्त हृदय करून वाचाव्या. (इतर कसल्याही प्रापंचिक कामनेसाठीसुद्धां तो भाग किंवा सगळा अध्यायच वाचण्यास हरकत नाहीं.)... 'संततीच्या आरोग्याची काळजी’ अथवा इच्छा असणार्‍यांनी बीस-एकवीस अध्यायाचीं पारायणे करावीं... 'पुत्रप्राप्तीची इच्छा असणार्‍यांनी ३९ व्या अध्यायाचा उपयोग करावा... आकस्मिक अरिष्ट निरसनार्थ’ १४ वा अध्याय विशेष पाठांत ठेवावा. तो सर्व अध्यायमालिकेंतील 'मेरुमणि' आहे. त्यांत भक्तवात्सल्य भरपूर रसरसलेलें दिसते. द्रव्यसंकट परिहारार्थ १८ वा अध्याय नित्य पाठांत ठेवावा. सर्व मनोरथसिद्धीसाठीं समग्र ग्रंथ पारायणांत किंवा श्रवणांत ठेवावा, हे सांगणे नकोच.
गुरुचरित्र ग्रंथ पठण किंवा श्रवण करण्याची कोणत्याही कारणामुळे सवड नसेल त्यानें किंवा तिनें “श्रीदत्त-दत्त" किंवा "श्रीदत्त-जय दत्त" या नाममंत्राचा अखंड जप करावा. (हें मंत्र एका महान् दत्तभक्तास श्रीतुकाराममहाराजांप्रमाणे 'स्वप्नदृष्ट' आहेत.)
खालील संस्कृत 'श्लोकात्मक मंत्र' ज्याला म्हणतां येत असेल त्यानें तो नित्य जपांत ठेवावा. हा मंत्र परमपूज्य सद्गुरु श्रीवासुदेवानंद-सरस्वती स्वामींकडून त्यांचे शिष्य श्री नारायणराव उकीडवे सावंतवाडी यांस पत्रांतून लिहून आलेला होता. त्याची नकल आमचे मित्र वैद्यभूषण, श्रीयुत गणेश व्यंकटेश सातवळेकर, मु. कोलगांव (सावंतवाडी) यांजकडून लिहून आली ती अशी---
“नारोपंत उकीडवे सावंतवाडी यांसीं---नारायण... पत्र पावले...'
अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः । स्मर्तृगामी स्वभक्तानामुर्द्धता भवसंकटात् ॥ याचा जप पडेल तितुका ठेवावा. संकट जाईल. " इ०
----
श्रीयुत सातवळेकर हे सद्गुरु श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे विस्तृत चरित्र लिहीत आहेत. स्वामींच्या शिष्य व भक्त मंडळीकडून त्यांच्यासंबंधीच्या आलेल्या अनुभवाची पत्रे मागवून त्यांचा त्यांनी संग्रह केला आहे व करीत आहेत. श्रीगुरुचरित्रसंशोधनाचाही त्यांनी थोडा बहुत प्रयत्न मागे केला होता तो आमचा चाललेला प्रयत्न पाहून बंद ठेवला व आपण मिळवलेली त्यासंबंधींची माहिती आम्हीं विचारली तो आम्हांस त्यांनी मोठ्या प्रेमाने पाठविली याबद्दल त्यांचे फार आभार आहेत.
वरीलप्रमाणेंच खालील श्लोकात्मक मंत्र, महान् गुरुभक्तिपरायणा श्रीमंत सौ. इंदिराबाईसाहेब होळकर, महाराणी इंदूर (ज्यांना श्रीअहिल्याबाईचा अवतार मानण्यांत येतें) यांनी लिहिलेल्या 'श्रीमहासती अनसूयामाता यांचें अल्प चरित्र' या सुंदर छापी पुस्तकाबरोबर आम्हांस लिहून आलेले होते. हे मंत्रही श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या हातचे होत. श्रद्धावंतांनी यांचाही उपयोग त्या त्या इष्टकामनेकरितां जरूर करून घ्यावा.

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP