मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ८६१ ते ८८०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ८६१ ते ८८०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


८६१
वेदाढ्या वृत्तसंपन्ना ज्ञानवन्तस्तपस्विन: ।
यत्र तिष्ठन्ति वै विप्रास्तन्नाम नगरं नृप ॥३।२००।९१॥
(मार्कंडेय युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, वेदपारंगत, शीलसंपन्न, ज्ञानी व तपस्वी असे ब्राह्मण ज्यांत राहत असतील त्यालाच खरोखर नगर म्हणावें.

८६२
वेदाऽहं तव या बुध्दिरानृशंस्याऽगुणैव सा ॥१२।७५।१८॥
(धर्माचरण करण्याच्या इच्छेनें राज्य सोडून अरण्यांत जाऊं इच्छिणार्‍या युधिष्ठिरास भीष्म म्हणतात) तुझ्या बुध्दीला क्रूरत्वाचा संपर्क नाहीं हें मी जाणून आहें पण तशा प्रकारची बुध्दि निष्फल होय.

८६३
वैध्याश्चाप्यातुरा: सन्ति बलवन्तश्च दुर्बला: ।
श्रीमन्तश्चापरे षण्ढा विचित्र: कालपर्यय: ॥१२।२८।२२॥
वैद्यांनासुध्दां रोग होतात आणि बलवान् देखील दुबळे ठरतात. तसेंच कित्येक श्रीमंत लोक नामर्द असतात. काळाची गति विचित्र आहे !

८६४
व्यक्तं हि जीर्यमाणोऽपि बुध्दिं जरयते नर: ॥७।१४३।१६॥
मनुष्य वृध्द होऊं लागला म्हणजे बुध्दिही त्याच्या शरीराबरोबरच जीर्ण होऊं लागते हें अगदीं खरें आहे.

८६५
व्यवसायं समाश्रित्य सहायान् योऽधिगच्छति ।
न तस्य कश्चिदारम्भ: कदाचिदवसीदति ॥१२।२९८।४२॥
जो आपली मुख्य भिस्त स्वत:च्या प्रयत्नावर ठेवून मग दुसर्‍यांचें साहाय्य घेतो, त्याचा कसलाही प्रयत्न केव्हांही फसत नाहीं.

८६६
व्रजे वाप्यथवारण्ये यत्र सन्ति बहुश्रुता: ।
तत्तन्नगरमित्याहु: पार्थ तीर्थं च तद्भवेत् ॥३।२००।९२॥
(मार्कंडेय म्हणतात) हे युधिष्ठिरा, बहुश्रुत ब्राह्मण जेथें असतील तो गौळवाडा असला, अथवा अरण्य जरी असलें तरी त्यालाच नगर म्हणतात आणि तेंच तीर्थ होय.

८६७
शकुनानामिवाकाशे मत्स्यानामिव चोदके ।
पदं यथा न दृश्येत तथा पुण्यकृतां गति: ॥१२।३२२।१९॥
पक्ष्यांनीं आकाशांत आणि माशांनीं पाण्यांत आक्रमिलेल्या मार्गाची जशी कांहीं खूण दिसत नाहीं, त्याप्रमाणें पुण्यवान् लोकांना प्राप्त होणारी गति उघड दिसत नाहीं.

८६८
शक्नोति जीवितुं दक्षो नालस: सुखमेधते ॥१०।२।१५॥
तत्परतेनें उद्योग करणारा मनुष्य चांगल्या प्रकारें जगूं शकतो. आळशी मनुष्याला सुख म्हणून मिळत नाहीं.

८६९
शक्नोतीहैव य: सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्त: स सुखी नर: ॥६।२९।२३॥
शरीर टाकून देण्यापूर्वीं ह्या जगांत असतांनाच, जो कामक्रोधांचा तडाका सहन करुं शकतो तो योगी होय. तोच मनुष्य सुखी होय.

८७०
शक्यं ह्येवाहवे योध्दुं न दातुमनसूयितम् ॥१३।८।१०॥
समरांगणांत लढणें सहज शक्य आहे; पण असूया (म्हणजे हेवा, लोभ, इत्यादि) न धरितां दान करणें हें मात्र शक्य नाहीं.

८७१
शत्रु: प्रवृध्दो नोपेक्ष्यो दुर्बलोऽपि बलीयसा ॥५।९।२२॥
शत्रु दुर्बळ जरी असला तरी तो वृध्दिंगत झाला असतां, बलाढ्य पुरुषानेंही त्याची उपेक्षा करितां उपयोगी नाहीं.

८७२
शत्रुं च मित्ररुपेण सान्त्वेनैवाभिसान्त्वयेत् ।
नित्यशश्चोद्विजेत्तस्मात् गृहात्सर्पयुतादिव ॥१२।१४०।१५॥
वरकरणी मित्रत्वाचा आव आणून शत्रूला सामोपचारानेंच वश करावें; परंतु आंत सर्प शिरलेल्या घराप्रमाणें त्याचें निरंतर भय बाळगावें.

८७३
शत्रुपक्षं समृध्यन्तं यो मोहात्समुपेक्षते ।
व्याधिराप्यायित इव तस्य मूलं छिनत्ति स: ॥२।५५।१६॥
भरभराटींत असलेल्या शत्रुपक्षाची जो मूर्खपेणें उपेक्षा करितो, त्याचा तो शत्रुपक्ष, विकोपास गेलेल्या व्याधीप्रमाणें समूळ उच्छेद करितो.

८७४
शत्रुर्निमज्जता ग्राह्यो जड्घायां प्रपतिष्यता ।
विपरिच्छिन्नमूलोऽपि न विषीदेत्कथंचन ॥५।१३३।२०॥
बुडतां बुडतां अथवा पडतां पडतांसुध्दां शत्रूची तंगडी पकडावी (आणि त्यासह बुडावें किंवा पडावें.) मुळासकट सर्वनाश झाला तरी केव्हांही खिन्न होऊन बसूं नये.

८७५
शत्रुश्चैव हि मित्रं च न लेख्यं न च मातृका ।
यो वै संतापयति यं स शत्रु: प्रोच्यते नृप ॥२।५५।१०॥
(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, अमका हा शत्रु आणि अमका हा मित्र, असा कांहीं कोणावर छाप मारलेला नाहीं, किंवा अक्षरेंही खोदलेलीं नाहींत ! तर, ज्याच्यापासून ज्याला ताप होतो, त्यालाच त्याचा शत्रु असें म्हणत असतात.

८७६
शत्रोरपि गुणा ग्राह्या दोषा वाच्या गुरोरपि ॥४।५१।१५॥
शत्रूचेसुध्दां गुण घ्यावे आणि दोष गुरुचे असले तरीसुध्दां निंद्य मानावे.

८७७
शयानं चानुशेते हि तिष्ठन्तं चानुतिष्ठति ।
अनुधावति धावन्तं कर्म पूर्वकृतं नरम् ॥११।२।३२॥
पूर्वजन्मीं केलेलें कर्म मनुष्य झोपीं गेला कीं त्याच्याबरोबरच झोपीं जातें, उभा राहिला कीं लगेच उभें राहतें, आणि तो धावूं लागला म्हणजे त्याच्या मागोमाग धावत जातें.

८७८
शरीरनियमं प्राहुर्ब्राह्मणा मानुषं व्रतम् ।
मनो विशुध्दां बुध्दिं च दैवमाहुर्व्रतं द्विजा: ॥३।९३।२१॥
(व्यासादिकमुनि पांडवांना म्हणतात) शारीरिक नियम पाळणें हें ज्ञानी लोक मानवी व्रत समजतात आणि मनावर जय मिळवून बुध्दि शुध्द करणें हें दैवी व्रत मानतात.

८७९
शरीरस्य विनाशेन धर्म एव विशिष्यते ॥१।२१३।२०॥
आपला प्राण खर्चीं घालूनही धर्म पाळणें हेंच अधिक श्रेयस्कर आहे.

८८०
शाश्वतोऽयं धर्मपथ: सद्भिराचरित: सदा ।
यद्भार्यां परिरक्षन्ति भर्त्तारोऽल्बला अपि ॥३।१२।६८॥
(द्रौपदी पांडवांस म्हणते) भर्ते अशक्त असले तरीही भार्येचें संरक्षण करितात. हा सनातन धर्ममार्ग असून सज्जनांनीं नेहमीं आचरलेला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP