मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ७०१ ते ७२०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ७०१ ते ७२०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


७०१
यत्सुखं सेवमानोऽपि धर्मार्थाभ्यां न हीयते ।
कामं तदुपसेवेत न मूढव्रतमाचरेत् ॥५।३९।६१॥
ज्या सुखाचें सेवन केलें तरी धर्म व अर्थ ह्या दोन पुरुषार्थांना कांहीं बाध येत नाहीं, तेंच यथेष्ट सेवन करावें. मूर्खासारखें (अविचारानें) वर्तन करुं नये.

७०२
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ ।
समेत्य च व्यपेयातं तद्वभ्दूतसमागम: ॥१२।२८।३६॥
ज्याप्रमाणें महासागरांत लाकडाचे दोन ओंडके वाहत वाहत एका ठिकाणीं येतात व (थोडया वेळानें) पुन्हा एकमेकांपासून दूर जातात, त्यासारखा सर्व प्राण्यांचा एकमेकांशी असणारा सहवास आहे.

७०४
यथा जीर्णमजीर्णं वा वस्त्रं त्यक्त्वा तु पूरुष: ।
अन्यद्रोचयते वस्त्रम् एवं देहा: शरीरिणाम् ॥११।३।९॥
जुनें झालेलें किंवा कधींकधीं नवेंही वस्त्र टाकून मनुष्य दुसरें घेतो, त्याप्रमाणेंच प्राण्यांच्या देहांचीही गोष्ट आहे.

७०५
यथा दानं तथा भोग इति धर्मेषु निश्चय: ॥१३।६२।८॥
जसें दिलें असेल तसेंच भोगावयास मिळतें, असा धर्मशास्त्राचा सिध्दान्त आहे.

७०६
यथादित्य: समुध्यन्वै तम: पूर्वं व्यपोहति ।
एवं कल्याणमातिष्ठन् सर्वपापै: प्रमुच्यते ॥३।२०७।५७॥
ज्याप्रमाणें सूर्य उदयास येऊं लागला म्हणजे पूवींचा अंधकार नाहींसा होतो, त्याप्रमाणें कल्याणकारक कृत्यें करणारा सर्व पातकांपासून मुक्त होतो.

७०७
यथा धेनुसहस्त्रेषु वत्सो विन्दति मातरम् ।
तथा पूर्वकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ॥१२।३२२।१६॥
हजारों गायींतून वासरुं जसें नेमकें आपल्या आईला हुडकून काढतें, तसें पूर्वजन्मीं केलेलें कर्म कर्त्याच्या पाठोपाठ येतें.

७०८
यथा नदीनदा: सर्वे सागरे यान्ति संस्थितिम् ।
एवमाश्रमिण: सर्वे गृहस्थे यान्ति संस्थितिम् ॥१२।२९५।३९॥
ज्याप्रमाणें सर्व नद्या आणि नद अखेर समुद्राला जाऊन मिळतात, त्याप्रमाणें इतर सर्व आश्रमांतील लोक गृहस्थाश्रमी पुरुषावर अवलंबून राहतात.

७०९
यथा बर्हाणि चित्राणि बिभर्ति भुजगाशन: ।
तथा बहुविधं राजा रुपं कुर्वीत धर्मवित् ॥१२।१२०।४॥
मोर जशीं चित्रविचित्र पिसें धारण करतो, त्याप्रमाणें आपलें कर्तव्य ओळखणार्‍या राजानें (प्रसंगानुसार) निरनिराळीं रुपें धारण करावीं.

७१०
यथा बीजं विना क्षेत्रम् उप्तं भवति निष्फलम् ।
तथा पुरुषकारेण विना दैवं न सिध्यति ॥१३।६।७॥
शेत तयार न करितां त्यांत बीं टाइल्यानें जसें तें व्यर्थ जातें, त्याप्रमाणें उद्योग केल्यावांचून नुसत्या दैवानें सिध्दि मिळत नाहीं.

७११
यथामति यथापाठं
तथा विद्या फलिष्यति ॥१२।३२७।४८॥
जशी बुध्दि असेल आणि जसा अभ्यास असेल त्या मानानें विद्येचें फळ मिळणार.

७१२
यथा मधु समादत्ते रक्षन् पुष्पाणि षट्‍पद: ।
तद्वदर्थान्मनुष्येभ्य आदध्यादविहिंसया ॥५।३४।१७॥
भ्रमर जसा फुलांना अपाय न करतां त्यांतील मध तेवढा काढून घेतो, त्याप्रमाणें (राजानें) लोकांचें मन न दुखवितां त्यांजपासून द्रव्य घ्यावें.

७१३
यथा मातरमाश्रित्य सर्वे जीवन्ति जन्तव: ।
एवं गार्हस्थ्यमाश्रित्य वर्तन्त इतराश्रमा: ॥१२।२६९।६॥
जसे सर्व प्राणी मातेचा आश्रय करुन जिवंत राहतात, तसे गृहस्थाश्रमाच्या आधारानें इतर आश्रम राहतात.

७१४
यथा यथा हि पुरुषो नित्यं शास्त्रवेक्षते ।
तथा तथा विजानाति विज्ञानमथ रोचते ॥१२।१३०।१०॥
मनुष्य जसजसा नेहमीं शास्त्राचें अवलोकन करीत जाईल, तसतसें त्याला समजूं लागेल आणि नंतर त्याला ज्ञानाची आवड उत्पन्न होईल.

७१५
यथा यथैव जीवेध्दि तत्कर्तव्यमहेलया ।
जीवितं मरणाच्छ्रेयो जीवन्धर्मवाप्नुयात् ॥१२।१४१।६५॥
ज्या ज्या प्रकारें जीविताचें संरक्षण होईल तें बेलाशक करावें. मरण्यापेक्षां जगणें हेंच श्रेयस्कर आहे. कारण आधीं जगेल तर पुढें धर्माचरण करील.

७१६
यथा राजन् हस्तिपदे पदानि
संलीयन्ते सर्वसत्त्वोभ्दवानि ।
एवं धर्मान् राजधर्मेषु सर्वान्
सर्वावस्थं संप्रलीनान्निबोध ॥१२।६३।२५॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, ज्याप्रमाणें हत्तीच्या एका पावलांत इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणें एका राजधर्मांत इतर सर्व धर्मांचा सर्व प्रकारें अंतर्भाव होतो हें तूं पक्कें समज.

७१७
यथाऽवध्ये वध्यमाने भवेद्दोषो जनार्दन ।
स वध्यस्थावधे इष्ट इति धर्मविदो विदु: ॥५।८२।१८॥
(द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणते) वधास पात्र नसलेल्याचा वध होऊं लागला असतां जो दोष लागतो, तोच दोष वधास पात्र असलेल्याचा वध होत नसल्यास लागतो, असें धर्मवेत्त्यांचें मत आहे.

७१८
यथा वायुस्तृणाग्राणि संवर्तयति सर्वश: ।
तथा कालवशं यान्ति भूतानि भरतर्षभ ॥११।२।९॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) जसा वारा गवताचे सर्व शेंडे हलवून सोडतो त्याप्रमाणें सर्व प्राणी काळाच्या तडाक्यांत सांपडतात.

७१९
यथाशक्ति चिकीर्षन्ति यथाशक्ति च कुर्वते
न किंचिदवमन्यन्ते नरा: पन्डितबुध्दय: ॥५।३३।२१॥
शहाणे लोक शक्तीप्रमाणें कार्य करण्याची इच्छा करितात, शक्तीप्रमाणेंच कार्य करितात आणि कोणाचाही मुळींच अवमान करीत नाहींत.

७२०
यथाशक्ति मनुष्याणां शममालक्षयामहे ।
अन्येषामपि सत्त्वानाम् अपि कीटपिपीलिकै: ॥४।५०।१४॥
(अश्वत्थामा कर्णाला म्हणतो) आम्हांला वाटतें कीं मनुष्यांच्या सहनशीलतेला तरी कांहीं मर्यादा असतेच. फार काय, पण किडामुंगी, इत्यादि इतर प्राणीही कांहीं विशिष्ट मर्यादेपर्यंतच दु:खें सहन करितात.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP