मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ५६१ ते ५८०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ५६१ ते ५८०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


५६१
परवाच्येषु निपुण: सर्वो भवति सर्वदा ।
आत्मवाच्यं न जानीते जानन्नपि च मुह्यति ॥८।४५।४४॥
दुसर्‍याचे दोष काढण्यांत सर्वजण प्रवीण असतात. कोणालाही स्वत:चा दोष मात्र समजत नाहीं आणि समजला तर उमजत नाहीं.

५६२
परश्रिया न तप्यन्ति ये सन्त: पुरुषर्पभा: ।
ग्राम्यादर्थान्निवृत्ताश्च दुर्गाण्यतितरन्ति ते ॥१२।११०।१७॥
जे श्रेष्ठ सत्पुरुष दुसर्‍याच्या संपत्तीनें संतप्त होत नाहींत आणि ग्राम्य विषयांपासून निवृत्त आहेत ते संकटांतून तरुन जातात.

५६२
परश्रिया न तप्यन्ति ये सन्त: पुरुषर्षभा: ।
ग्राम्यादर्थान्निवृत्ताश्च दुर्गाण्यतितरन्ति ते ॥१२।११०।१७॥
जे श्रेष्ठ सत्पुरुष दुसर्‍याच्या संपत्तीनें संतप्त होत नाहींत आणि ग्राम्य विषयांपासून निवृत्त आहेत ते संकटांतून तरुन जातात.

५६३
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥६।२८।८॥
(श्रीकृष्ण म्हणतात) सज्जनांचें संरक्षण करण्यासाठीं, दुष्टांचें निर्दलन करण्यासाठीं आणि धर्माची संस्थापना करण्यासाठीं युगायुगांच्या ठिकाणीं मी अवतार घेत असतों.

५६४
पर्जन्य: पर्वते वर्षन् किं नु साधयते फलम् ।
कृष्टे क्षेत्रे तथा वर्षन् किं न साधयते फलम् ॥१०।२।५॥
पाऊस डोंगरावर पुष्कळ पडला तरी त्यापासून कोणतें बरें फळ मिळणार ? तोच नांगरलेल्या शेतांत पडला तर कोणतें फळ मिळणार नाहीं ?

५६५
पर्जन्यनाथा: पशवो राजानो मन्त्रिबान्धवा: ॥५।३४।३८॥
पर्जन्य हा पशूंचा बांधव (हितकर्ता) होय. राजांचा बांधव प्रधान. स्त्रियांचा बांधव पति आणि ब्राह्मणांचा बांधव वेद होय.

५६६
पर्यड्कशय्या भूमिश्च समाने यस्य देहिन: ।
शालयश्च कदन्नं च यस्य स्यान्मुक्त एव स: ॥१२।२८८।३४॥
पलंगावर पहुडणें व जमिनीवर पडणें हीं दोनही ज्याला सारखींच वाटतात, तसेंच पक्वान्न आणि कदन्न ज्याला सारखेंच वाटतें तो मुक्तच होय.

५६७
पात्रे दानं स्वल्पमपि काले दत्तं युधिष्ठिर ।
मनसा हि विशुध्देन प्रेत्यानन्तफलं स्मृतम् ॥३।२५९।३४॥
(व्यासमुनि म्हणतात) हे युधिष्ठिरा, योग्य ठिकाणीं योग्य वेळीं शुध्द मनानें केलेलें दान अत्यल्प जरी असलें तरी त्यापासून मरणोत्तर मोठें फळ मिळतें.

५६८
पानमक्षास्तथा नार्यो मृगया गीतवादितम् ।
एतानि युक्त्या सेवेत प्रसड्गो ह्यत्र दोषवान् ॥१२।१४०।२६॥
मद्य, जुगार त्याचप्रमाणें स्त्रिया, मृगया आणि गाणें बजावणें ह्यांचें सेवन युक्तीनें करावें. कारण, ह्यांची चटक लागणें फार वाईट.

५६९
पापानां विध्दयधिष्ठानं लोभमेव द्विजोत्तम ॥३।२०७।५८॥
(धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणतो) हे द्विजश्रेष्ठा, सर्व पापांचें आश्रयस्थान लोभ हेंच आहे असें जाण.

५७०
पापेभ्यो हि धनं दत्तं दातारमपि पीडयेत् ।
तस्माध्दर्मार्थमनृतम् उक्त्वा नानृतभाग्भवेत् ॥८।६९।६५॥
दुष्टांना धन मिळूं दिलें असतां त्यापासून देणारालासुध्दां पीडा होते. (म्हणून चोराला धन कोठें आहे हें सांगण्यापेक्षां खुशाल खोटें सांगावें.) म्हणून धर्मासाठीं खोटें बोललें असतां पाप नाहीं.

५७१
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
पुत्राश्च स्थाविरे भावे न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ॥१३।४६।१४॥
स्त्रीचें कुंवारपणी बाप रक्षण करितो, तरुणपणीं पति रक्षण करितो आणि वृध्दपणीं मुलगे रक्षण करितात, एवंच, स्त्री ही स्वातंत्र्याला पात्र नाहीं.

५७२
पित्रा पित्रो वय:स्थोऽपि सततं वाच्य एव तु ।
यथा स्याद्गुणसंयुक्त: प्राप्नुयाच्च महध्यश: ॥१।४२।४॥
मुलगा मोठा झाला असला, तरीसुध्दां तो सद्गुणी व्हावा आणि त्याला उत्तम प्रकारचें यश लाभावें, म्हणून बापानें त्याला तशा प्रकारचा उपदेश करावा.

५७३
पिबन्त्येवोदकं गावो मण्डूकेषु रुवत्स्वपि ॥१२।१४१।८२॥
बेडकांनीं कितीही डरांव डरांव केलें तरी गायी पाणी पितातच !

५७४
पुत्रं हि मातापितरौ त्यजत: पतितं प्रियम् ।
लोको रक्षति चात्मानं पश्य स्वार्थस्य सारताम् ॥१२।१३८।१४६॥
आपला पुत्र प्रिय असूनही पतित झाला तर आईबापसुध्दां त्याचा त्याग करतात. लोकही (इतरांकडे न पाहतां) स्वत:चें संरक्षण करीत असतात. स्वार्थाचा प्रभाव केवढा आहे पाहा !

५७६
पुत्र नात्मावमन्तव्य: पूर्वाभिरसमृध्दिभि: ॥५।१३।५२५॥
(विदुला माता संजयाला म्हणते) हे पुत्रा, प्रथमत: आपणापाशीं जरी संपत्ति नसली तरी त्याकरितां पुरुषानें स्वत:ला दीन समजूं नये.

५७७
पुत्रपौत्रोपपन्नोऽपि जननीं य: समाश्रित: ।
अपि वर्षतस्यान्ते स द्विहायनवच्चरेत् ॥१२।२६६।२८॥
मनुष्य पुत्रपौत्रांनीं युक्त असला तरी ज्याला मातेचा आश्रय आहे, तो आपल्या वयाच्या शंभराव्या वर्षाच्या शेवटींही दोन वर्षांच्या लहान मुलाप्रमाणें वागेल !

५७८
पुत्रस्पर्शात्सुखतर: स्पर्शो लोके न विध्यते ॥१।७४।५८॥
पुत्रस्पर्शापेक्षां सुखकर स्पर्श जगांत कोणताच नाहीं.

५७९
पुत्र: सखा वा भ्राता वा पिता वा यदि वा गुरु: ।
रिपुस्थानेषु वर्तन्तो हन्तव्या भूतिमिच्छता ॥१।१४०।५२॥
पुत्र, मित्र, भाऊ, बाप किंवा गुरु, कोणीही असो, तो जर शत्रुत्वानें वागत असेल तर उत्कर्षेच्छु पुरुषानें वध करावा.

५८०
पुत्रा इव पितुर्गेहे विषये यस्य मानवा: ।
निर्भया विचरिष्यन्ति स राजा राजसत्तम: ॥१२।५७।३३॥
बापाच्या घरांत जसे मुलगे, तसे ज्याच्या राज्यांत लोक निर्भयपणें संचार करुं शकतात, तो राजा सर्व राजांत श्रेष्ठ होय.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP