मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ६४१ ते ६६०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ६४१ ते ६६०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


६४१
भार्यायां रक्ष्यमाणायां प्रजा भवति रक्षिता ।
प्रजायां रक्ष्यमाणायाम् आत्मा भवति रक्षित: ॥३।१२।६९॥
भार्येचें संरक्षण होऊं लागलें असतां संततीचें संरक्षण होतें आणि संततीचें संरक्षण होऊं लागलें असतां आपलें संरक्षण होते.

६४२
भार्या हि परमो ह्यर्थ: पुरुषस्येह पठयते ।
असहायस्य लोकेऽस्मिन् लोकयात्रासहायिनी ॥१२।१४४।१४॥
भार्या ही पुरुषाची इहलोकांतील संपत्ति होय असें म्हटलेलें आहे. ह्या जगांत असहाय असलेल्या पुरुषाला संसाराच्या कामीं साहाय्य करणारी तीच आहे.

६४३
भार्याहीनं गृहस्थस्य शून्यमेव गृहं भवेत् ॥१२।१४४।५॥
भार्येवांचून गृहस्थाचें घर रिकामेंच वाटतें.

६४४
भिन्नानामतुलो नाश: क्षिप्रमेव प्रवर्तते ॥१।२९।२०॥
ज्यांच्यांत भेदभाव उत्पन्न झाला त्यांचा तत्काळ सर्वथा नाश होतो.

६४५
भिन्ना श्लिष्टा तु या प्रीतिर् न सा स्नेहेन वर्तते ॥१२।१११।८५॥
एकदां मोडून पुन: जोडलेला स्नेह स्नेहाच्या रुपानें टिकत नाहीं.

६४६
भीतवत्संविधातव्यं यावभ्दयमनागतम् ।
आगतं तु भयं दृष्ट्वा प्रहर्तव्यमभीतवत् ॥१।१४०।८२॥
संकट जोंवर प्राप्त झालेलें नाहीं, तोंवर भित्र्या माणसाप्रमाणें त्याचें निवारण करण्याच्या तजविजींत असावें. परंतु संकट येऊन ठेपलें असें दिसतांच, शूराप्रमाणें त्यास तोंड द्यावें.

६४७
भीमसेनस्तु धर्मेण युध्दमानो न जेष्यति ।
अन्यायेन तु युध्यन्वै हन्यादेव सुयोधनम् ॥९।५८।४॥
(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) भीमसेन जर धर्मानें लढेल तर त्यास जय मिळणार नाहीं; परंतु जर अन्यायानें युध्द करील तर खात्रीनें सुयोधनास ठार करील.

६४८
भुञ्जते ते त्वघं पापा
ये पचन्त्यात्मकारणात् ॥६।२७।१३॥
जे केवळ आपल्यासाठीं अन्न शिजवितात, ते पातकी लोक (त्या अन्नाच्या रुपानें) पापच भक्षण करितात.

६४९
भूतं हित्व च भाव्यर्थे
योऽवलम्बेत्स मन्दधी: ॥१।२३३।१५॥
प्राप्त झालेल्या फळाचा त्याग करुन पुढें मिळणार्‍या फळाची जो आशा करीत बसतो तो मूर्ख होय.

६५०
भूति: श्रीर्ह्नीर्धृति: कीर्तिदक्षे वसति नालसे ॥१२।२७।३२॥
वैभव, संपत्ति, विनशीलपणा, धैर्य व कीर्ति हीं सर्व तत्परतेनें उद्योग करणार्‍या मनुष्याच्या ठिकाणीं वास करितात; आळश्याच्या ठिकाणीं राहत नाहींत.

६५१
भूमिरेतौ निगिरति सर्पो बिलशयानिव ।
राजानं चाप्ययोध्दारं ब्राह्मणं चाप्रवासिनम् ॥१२।२३।१५॥
युध्द न करणारा राजा आणि प्रवास न करणारा ब्राह्मण ह्या दोघांना भूमि बिळांत राहणार्‍या प्राण्यांना सर्प खाऊन टाकतो त्याप्रमाणें गिळून टाकते.

६५२
भूयांसं लभते क्लेशं या गौर्भवति दुर्दुहा ।
अथ या भुदुहा राजन् नैव तां वितुदन्त्यपि ॥१२।६७।९॥
जी गाय धार काढूं देण्यास फार त्रास देते, तिला अतिशय क्लेश भोगावे लागतात; पण जी सुखानें दूध देते तिला कोणी मुळींच त्रास देत नाहीं.

६५३
भेदे गणा विनश्युर्हि भिन्नास्तु सुजया: परै: ।
तस्मात्संघातयोगेन प्रयतेरन्गणा: सदा ॥१२।१०७।१४॥
समुदायांत भेद उत्पन्न झाला कीं त्यांचा सर्वथा नाश ठरलेलाच. कारण त्यांच्यांत फूट पडली म्हणजे शत्रु त्यांचा सहज पराभव करुं शकतात. ह्यास्तव, समुदायांनीं नेहमीं संघशक्तीनें कार्य करावें.

६५४
भैषज्यमेतद्दु:खस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ।
चिन्त्यमानं हि न व्येति भूयश्चापि प्रवर्धते ॥१२।३३०।१२॥
दु:खावर औषध हेंच कीं त्याचें एकसारखें चिंतन करीत बसूं नये. कारण चिंतन केल्यानें दु:ख नाहींसें तर होत नाहींच पण उलट अधिक वाढतें मात्र.

६५५
मग्नस्य व्यसने कृच्छ्रे धृति: श्रेयस्करी नृप ॥१२।२२७।३॥
धैर्येण युक्तं सततं शरीरं न विशीर्यते ।
विशोकता सुखं धत्ते धत्ते चारोग्यमुत्तमम् ॥१२।२२७।४॥
आरोग्याच्च शरीरस्य च पुनर्विन्दते श्रियम् ॥१२।२२७।५॥
(भीष्म युधिष्ठिराला सांगतात) महत् संकटांत सांपडलेल्या मनुष्यानें धीर करणें श्रेयस्कर आहे. नेहमीं धैर्य असलें म्हणजे शरीराची हानि होत नाहीं. शोकाचा त्याग केल्यानें सुख होतें व त्यापासून उत्तम आरोग्य प्राप्त होतें आणि शरीर निरोगी राहिलें म्हणजे मनुष्य गेलेलें वैभव पुन: प्राप्त करुन घेतो.

६५६
मद्यमांसपरस्वानि तथा दारा धनानि च ।
आहरेद्रागवशगम् तथा शास्त्रं प्रदर्शयेत् ॥१२।८८।२२॥
विषयाधीन झालेला मनुष्य मद्य, मांस, परस्त्री आणि परद्रव्य ह्यांचा अपहार करील आणि (आपल्या दुष्कृत्याचें समर्थन करण्याकरितां) तसा शास्त्रार्थही काढून दाखवील.

६५७
मधुदोहं दुहेद्राष्ट्रं भ्रमरा इव पादपम् ।
वत्सापेक्षी दुहेच्चैव स्तनांश्च न विकुट्टयेत् ॥१२।८८।४॥
भ्रमर जसा झाडावरील फुलाला धक्का न लावतां त्यांतील मध तेवढा हळूच काढून घेतो त्याप्रमाणें राजानें प्रजेचें मन न दुखवितां तिजपासून कराच्या रुपानें द्रव्य ग्रहण करावें. अथवा, ज्याप्रमाणें गायीची धार काढणारा वासराला दूध राहील अशी बेतानें धार काढतो, आंचळ अगदीं पिळून काढीत नाहीं. त्याप्रमाणेंच राजानें प्रजेचें पोषण होईल अशा बेतानेंच कर घ्यावा.

६५८
मधु य: केवलं दृष्ट्वा प्रपातं नानुपश्यति ।
स भ्रष्टो मधुलोभेन शोचत्येयं यथा भवान् ॥११।१।३७॥
(भारतीय युध्दानंतर संजय धृतराष्ट्राला म्हणतो) ज्याला (तुटलेल्या कडयास लटकणारें) मधाचें पोळें मात्र दिसतें, पण तो तुटलेला कडा दिसत नाहीं, तो मधाच्या लोभानें पुढें जाऊन खालीं घसरतो आणि हल्लीं तूं शोक करीत आहेस असाच पश्चात्ताप करीत बसतो.

६५९
मन एव मनुष्यस्य पूर्वरुपाणि शंसति ॥१२।२२८।२॥
मनुष्याची उन्नति किंवा अवनति पुढें व्हावयाची असली म्हणजे तिचीं पूर्वचिन्हें त्याचें मनच सांगत असतें.

६६०
मनसश्चेन्द्रियाणां चाप्यैकाग्र्यं परमं तप: ।
तज्ज्याय: सर्वधर्मेभ्य: स धर्म: पर उच्यते ॥१२।२५०।४॥
मन आणि इंद्रियें ह्यांची एकाग्रता साध्य करणें हें फार मोठें तप आहे. ही एकाग्रता सर्व प्रकारच्या कर्माचरणापेक्षां श्रेष्ठ आहे. ती साध्य करणें हा श्रेष्ठ धर्म होय.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP