मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ५८१ ते ६००

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ५८१ ते ६००

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


५८१
पुनरावर्तमानानां भग्नानां जीवितैषिणाम् ।
भेतव्यमरिशेषाणाम् एकायनगता हि ते ॥९।५८।१५॥
जीवाची इच्छा करणारे पण एकदां पराभव पावले असून, पुन: उलटून येणारे असे जे शत्रूकडील उरलेले लोक त्यांचें भय धरावें. कारण, (मारीन किंवा मरेन एवढा) एकच विषय त्यांच्या दृष्टीपुढें असतो.

५८२
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात् पितरं त्रायते सुत: ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्त: स्वयमेव स्वयंभुवा ॥१।७४।३९॥
पुत् नामक नरकापासून मुलगा हा बापाचें रक्षण करतो, म्हणून त्याला स्वत: ब्रह्मदेवानेंच पुत्र असें म्हटलें आहे.

५८३
पुरुषे पुरुषे बुध्दिर्या या भवति शोभन ।
तुष्यन्ति च पृथक्सर्वे प्रज्ञया ते स्वया स्वया ॥१०।३।३॥
प्रत्येक मनुष्यामध्यें जेवढा शहाणपणाचा भाग असतो तेवढयावरच जो तो आपआपल्या ठिकाणीं खूष असतो.

५८४
पुष्पं पुष्पं विचिन्वीत मूलच्छेदं न कारयेत् ।
मालाकार इवारामे न यथाड्गाकारक: ॥५।३४।१८॥
बागेंतील माळ्याप्रमाणें वृक्षाचें मूळ न तोडितां फूल येईल तेवढें घेत असावें. लोणार्‍याप्रमाणें मुळासकट वृक्ष तोडून टाकूं नये.

५८५
पूर्वं संमानना यत्र पश्चाच्चैव विमानना ।
जह्यात्तत्सत्त्ववान्स्थानं शत्रो: संमानितोऽपि सन् ॥१२।१३९।३३॥
जेथें पहिल्यानें बहुमान मिळतो व मागाहून अपमान होतो तें ठिकाण शत्रूकडून पुनरपि मानसन्मान मिळाला तरी स्वाभिमानी पुरुषानें सोडूनच दिलें पाहिजे.

५८६
पृथिवी रत्नसंपूर्णा हिरण्यं पशव: स्त्रिय: ।
नालमेकस्य तत्सर्वमिति मत्मा शमं व्रजेत् ॥१।७५।५१॥
रत्नांनीं परिपूर्ण असलेली सर्व पृथ्वी, सोनें, पशु, स्त्रिया हें सर्व एकटयाला मिळालें तरी, पुरेसें वाटणार नाहीं असा विचार करुन मनुष्यानें मनोनिग्रह करण्यास शिकावें.

५८७
प्रक्षालनाध्दि पड्कस्य श्रेयो न स्पर्शनं नृणाम् ॥३।२।४९॥
चिखल (आंगावर उडाल्यावर) धुऊन टाकण्यापेक्षां त्याला स्पर्शच न करणें मनुष्यांना सुखावह होतें.

५८८
प्रच्छन्नो वा प्रकाशो वा योगो योऽरिं प्रबाधते ।
तद्वै शस्त्रं शस्त्रविदां न शस्त्रं छेदनं स्मृतम् ॥२।५५।९॥
उघड असो अथवा गुप्त असो, ज्या उपायानें शत्रूचा नाश होत असेल त्या उपायालाच वीरांचें शस्त्र म्हणतात. (हातपाय) तोडणार्‍या शस्त्राला शस्त्र म्हणत नाहींत.

५८९
प्रजा यस्य विवर्धन्ते सरसीव महोत्पलम् ।
स सर्वफलभाग्राजा स्वर्गलोके महीयते ॥१२।१३९।११०॥
ज्या राजाच्या प्रजा सरोवरांतील मोठया कमळांप्रमाणें वृध्दिंगत होत असतात, त्याला सर्व प्रकारचीं फळें प्राप्त होतात व तो स्वर्गामध्यें पूज्य होतो.

५९०
प्रज्ञया मानसं दु:खं हन्याच्छारीरमौषधै: ।
एतद्विज्ञानसामर्थ्यं न बालै: समतामियात् ॥१२।२०५।३॥
मानसिक दु:ख विवेकानें आणि शारीरिक दु:ख औषधानें नाहींसें करावें. अशा प्रकारें दु:खाचा नाश करणें हेंच ज्ञानाच्या सामर्थ्याचें लक्षण आहे. (दु:खाचा परिहार न करितां) लहान बालकांसारखें वागूं नये.

५९१
प्रज्ञा प्रतिष्ठा भूतानां प्रज्ञा लाभ: परो मत: ।
प्रज्ञा नि:श्रेयसी लोके प्रज्ञा स्वर्गो मत: सताम् ॥१२।१८०।२॥
ज्ञान हाच प्राण्यांचा आधार आहे. ज्ञान हाच उत्कृष्ट असा लाभ आहे. लोकांत ज्ञान हेंच मोक्षालाही कारण आहे. ज्ञान हाच प्रत्यक्ष स्वर्ग आहे, असें सत्पुरुषांचें मत आहे.

५९२
प्रतिकूल: पितुर्यश्च न स पुत्र: सतां मत: ॥१।८५।२४॥
बापाशीं जो वैर करतो तो पुत्र सज्जनांना मान्य होत नाहीं.

५९३
प्रत्युपकुर्वन्बह्यपि न भाति पूर्वोपकारिणा तुल्य: ।
एक: करोति हि कृते निष्कारणमेव कुरुतेऽन्य: ॥१२।१३८।८२॥
(आर्यावृत्त आहे)
उपकारांची भरपूर फेड करणारा मूळ उपकार करणार्‍याच्या बरोबरीचा ठरेल असें वाटत नाहीं. कां कीं, एकजण आधीं उपकृत झाल्यावर मग (फेड म्हणून) उपकार करीत असतो, तर दुसरा निरपेक्ष बुध्दीनेंच उपकार करितो.

५९४
प्रत्युपस्थितकालस्य सुखस्य परिवर्जनम् ।
अनागतसुखाशा च नैव बुध्दिमतां नय: ॥१२।१४०।३६॥
वेळेवर चालून आलेले सुख सोडून द्यावयाचे आणि प्राप्त न झालेल्या सुखाची आशा करीत बसावयाचें ही शहाण्यांची रीतच नव्हे.

५९५
प्रभवन् योऽनहंवादी स वै पुरुष उच्यते ॥१३।१४६।३६॥
समर्थ असून ज्याला गर्व नाहीं तोच पुरुष म्हणावयाचा.

५९६
प्रभवार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् ।
य: स्यात्प्रभवसंयुक्त: स धर्म इति निश्चय: ॥१२।१०९।१०॥
जीवांचा उत्कर्ष व्हावा एवढयासाठींच धर्म कथन केला आहे. जो उत्कर्षानें युक्त असेल तोच धर्म असा सिध्दान्त आहे.

५९७
प्रयोजनेषु ये सक्ता न विशेषेषु भारत ।
तानहं पण्डितान्मन्ये विशेषा हि प्रसड्गिन: ॥५।३८।४४॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे भारता, जे केवळ कार्यें पार पाडण्याविषयीं तत्पर असतात, फाजील भानगडींत पडत नाहींत, त्यांना मी शहाणे समजतों. कारण, स्वत:चें आधिक्य दाखविणारे (कलहाचा) प्रसंग आणितात.

५९८
प्रवारणं तु बालानां पूर्वं कार्यमिति श्रुति: ॥५।७।१७॥
बालकांची इच्छा प्रथम पुरवावी अशी श्रुति आहे.

५९९
प्रवृत्तवाक् चित्रकथ ऊहवान्प्रतिभानवान् ।
आशु ग्रन्थस्य वक्ता च य: स पण्डित उच्यते ॥५।३३।३३॥
बोलका, मनोरंजक गोष्टी माहीत असलेला, तर्कवान् आणि समयसूचक असून जो ग्रंथाचा अर्थ चटकन् सांगतो तो पंडित होय.

६००
प्रसादो निष्फलो यस्य क्रोधश्चापि निरर्थक: ।
न तं भर्तारमिच्छन्ति षण्ढं पतिमिव स्त्रिय: ॥५।३४।२१॥
ज्याच्या कृपेचा कांहीं उपयोग नाहीं आणि रागापासूनही कांहीं हानी नाहीं, असा अधिपति, ज्याप्रमाणें स्त्रियांना नामर्द पति नको असतो त्याप्रमाणें, प्रजेला नको असतो.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP