मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ३४१ ते ३६०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ३४१ ते ३६०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


३४१
त्यजन्ति दारान् पुत्रांश्च
मनुष्या: परिपूजिता: ॥१२।९१।५३॥
मनुष्यांचा बहुमान केला म्हणजे ते आपल्या स्त्रीपुत्रांचाही त्याग करण्यास तयार होतात.

३४२
त्यजेत् कुलार्थे पुरुषं ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।
ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥५।३७।१७॥
(प्रसंग पडल्यास) कुळाच्या रक्षणाकरितां कुळांतील एका मनुष्याचा त्याग करावा. सगळ्या गावांकरितां एका कुळाची पर्वा करुं नये. देशाकरितां एका गांवावरही उदक सोडावें आणि आत्मकल्याणाकरितां सर्व पृथ्वीचाही त्याग करावा.

३४३
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन: ।
काम: क्रोधस्तदा लोभस्तस्मादेवत्रयं त्यजेत् ॥६।४०।२१॥
काम, क्रोध व लोभ असें तीन प्रकारचें नरकाचें द्वार असून तें आत्मनाश करणारें आहे. तस्मात् ह्या तिहींचाही त्याग करावा.

३४४
त्रीण्येव तु पदान्याहु: पुरुषस्योत्तमं व्रतम् ।
न द्रुह्येच्चैव दध्याच्च सत्यं चैव परं वदेत् ॥१३।१२०।१०॥
तीनच गोष्टींना पुरुषाचें उत्तम व्रत असें म्हटलें आहे. त्या म्हणजे, मत्सर करुं नये, दान करावें आणि श्रेष्ठ असें सत्यच बोलावें.

३४५
त्यवित्युक्तो हि निहतो गुरुर्भवति भारत ॥८।६९।८३॥
(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) गुरुला ‘तूं’ असें संबोधिलें म्हणजे त्याचा वध केल्यासारखेंच झालें.

३४६
दण्ड एव हि राजेन्द्र क्षत्रधर्मो न मुण्डनम् ॥१२।२३।४७॥
(व्यास मुनि युधिष्ठिराला म्हणतात) दंडन हाच क्षत्रियाचा धर्म आहे; मुंडन नव्हे.

३४७
दण्डनीत्यां यदा राजा सम्यक् कात्सर्न्येन वर्तते ।
तदा कृतयुगं नाम कालसृष्टं प्रवर्तते ॥१२।६९।८०॥
जेव्हां राजा योग्य रीतीनें आणि पूर्णपणें दंडनीतीच्या अनुरोधानें चालतो, तेव्हां कालनिर्मित अशा कृतयुगाची प्रवृत्ति होते.

३४८
दण्डश्चेन्न भवेल्लोके विनश्येयुरिमा: प्रजा: ।
जले मत्स्यानिवाभक्ष्यन् दुर्बलान् बलवत्तरा: ॥१२।१५।३०॥
जगांत जर दंड नसता तर प्रजा नाश पावल्या असत्या. पाण्यांतील माशांप्रमाणें बलवत्तर लोकांनीं दुर्बळांना खाऊन टाकलें असतें.

३४९
दण्ड: शास्ति प्रजा: सर्वा दण्ड एवाभिरक्षति ।
दण्ड: सुप्तेषु जागर्ति दण्डं धर्मं विदुर्बुधा: ॥१२।१५।२॥
दंड हाच सर्व प्रजेला वळण लावतो. दंडच सर्वाचें रक्षण करतो. सर्व लोक झोपीं गेले तरी दंड जागा राहतो. म्हणूनच दंड हाच धर्म आहे असें ज्ञानी लोक समजतात.

३५०
दण्डस्यैव भयादेके न खादन्ति परस्परम् ।
अन्धे तमसि मज्जेयुर्यदि दण्डो न पालयेत् ।
दंडाच्याच भीतीमुळें कांहीं प्राणी परस्परांना खाऊन टाकीत नाहींत. जर दंडशक्तीनें रक्षण केलें नाहीं तर ते घोर अंधकारांत बुडून जातील.

३५१
दत्तभुक्तफलं धनम् ॥५।३९।६७॥
दान करणें व भोग्य वस्तूंचा उपभोग घेणें हें धनाचें फळ होय.

३५२
दया सर्वसुखैषित्वम् ॥३।३१३।९०॥
दया म्हणजे सर्वांना सुख व्हावें अशी इच्छा.

३५३
दर्पो नाम श्रिय: पुत्रो
जज्ञेऽधर्मात् इति श्रुति: ॥१२।९०।२६॥
दर्प हा लक्ष्मीचा पुत्र आहे; तो तिला अधर्मापासून झाला असे ऐकण्यांत येतें.

३५४
दाक्ष्यमेकपदं धर्म्यं दानमेकपदं यश: ।
सत्यमेकपदं स्वर्ग्यं शीलमेकपदं सुखम् ॥३।३१३।७०॥
दक्षता हेंच धर्माचें मुख्य कारण होय. दान हेंच यश:प्राप्तीचें मुख्य साधन होय. सत्य हेंच स्वर्गप्राप्तीचें मुख्य साधन होय आणि शील हेंच सुखाचें मुख्य निधान होय.

३५५
दानपथ्यौदनो जन्तु: स्वकर्मफलमश्नुते ॥१२।२९८।३९॥
दान हेंच मनुष्याला परलोकींच्या मार्गांत शिदोरीप्रमाणें उपयोगी पडतें. प्राण्याला स्वत:च्याच कर्माचें फळ मिळत असतें.

३५६
दानमेव हि सर्वत्र सान्त्वेनानभिजल्पितम् ।
न प्रीणयति भूतानि निर्व्युञ्जनमिवाशनम् ॥१२।८४।७॥
दान झालें तरी गोड शब्द बोलून केलें नाहीं, तर तें तोंडीं लावण्यावांचून दिलेल्या भोजनाप्रमाणें लोकांच्या मनाला आनंद देत नाहीं.

३५७
दानं मित्रं मरिष्यत: ॥३।३१३।६४॥
दान हा मरणोन्मुख झालेल्याचा मित्र होय.

३५८
दाने तपसि सत्ये च यस्य नोच्चरितं यश: ।
विध्यायामर्थलाभे वा मातुरुच्चार एव स: ॥५।१३३।२४॥
दान, तप, सत्यभाषण, विद्या किंवा संपत्ति ह्यांपैकीं कोणत्याही बाबतींत ज्याची कीर्ति कोणी गात नाहीं तो आपल्या मातेचा केवळ मलोत्सर्ग होय. (म्हणजे त्याच्या जन्माच्या रुपानें त्याच्या आईनें केवळ आपल्या पोटांतील घाण बाहेर टाकली.)

३५९
दान्तस्य किमरण्येन तथाऽदान्तस्य भारत ।
यत्रैव निवसेद्दान्तम् तदरण्यं स चाश्रम: ॥१२।१६०।३६॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) इंद्रियें स्वाधीन असल्यावर अरण्यांत जाण्याची गरज काय ? व नसल्यावर जाऊन उपयोग काय ? जितेंद्रिय पुरुष ज्या ठिकाणीं वास्तव्य करील तेंच त्याचें अरण्य व तोच त्याचा आश्रम.

३६०
दारिद्र्यमिति यत्प्रोक्तं पर्यायमरणं हि तत् ॥५।१३४।१३॥
दारिद्य्र म्हणून जो शब्द आहे त्यालाच पर्याय शब्द मरण असा आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP