मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ६६१ ते ६८०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ६६१ ते ६८०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


६६१
मनसो दु:खमूलं तु स्नेह इत्युपलभ्यते ॥३।२।२७॥
मनाला दु:ख होण्याचें मूळ कारण आसक्ति हेंच असल्याचें आढळून येतें.

६६२
मनुष्या ह्याढयतां प्राप्य राज्यमिच्छन्त्यनन्तरम् ।
राज्याद्देवत्वमिच्छन्ति देवत्वादिन्द्रतामपि ॥१२।१८०।२४॥
खरोखर मनुष्यांना ऐश्वर्य प्राप्त झालें, म्हणजे त्यानंतर राज्य मिळविण्याची इच्छा होते, राज्य मिळालें कीं देवपद आणि देवप्राप्तीनंतर इंद्रपदसुध्दां पाहिजे असें वाटूं लागतें.

६६३
मन्यते कर्षयित्वा तु क्षमा साध्वीति शम्बर: ।
असंतप्तं तु यद्दारु प्रत्येति प्रकृतिं पुन: ॥१२।१०२।३१॥
शत्रूला जर्जर करुन सोडल्यावर मग क्षमा केलेली चांगली असें शंबराचें मत आहे, कारण तापविल्यावांचून वाकविलेलें लाकूड पुनरपि पूर्वस्थितीस येतें.

६६४
महानप्येकजो वृक्षो बलवान् सुप्रतिष्ठित: ।
प्रसह्य एव वातेन सस्कन्धो मर्दितुं क्षणात् ॥५।३६।६२॥
अथ ये सहिता वृक्षा: संघश: सुप्रतिष्ठिता: ।
ते हि शीघ्रतमान्वातान् सहन्तेऽन्योन्यसंश्रयात् ॥५।३६।६३॥
एकटा एक वृक्ष मोठा, बळकट असला व भुईंत खोल गेलेला असला तरी (सोसाटयाच्या) वार्‍यानें एका क्षणांत खोडासहवर्तमान त्याचा चुराडा होणें शक्य आहे. परंतु, जे एकत्र वाढलेले वृक्ष एका जमावानें बळकट पायावर उभे असतात, ते एकमेकांच्या आधारामुळें अति प्रचंड वायूंनाही दाद देत नाहींत.

६६५
महान्भवत्यनिर्विण्ण: सुखं चानन्त्यमश्नुते ॥५।३९।५९॥
सतत उद्योग करणाराच पुरुष योग्यतेला चढतो आणि त्याला अक्षय सुख प्राप्त होतें.

६६६
माता पिता बान्धवानां वरिष्ठौ
भार्या जरा बीजमात्रं तु पुत्र: ।
भ्राता शत्रु: क्लिन्नपाणिर्वयस्य:
आत्मा ह्येक: सुख:दुखस्य भोक्ता ॥१२।१३९।३०॥
आईबाप हे सर्व आप्तवर्गांत वरिष्ठ होत. भार्या ही पुरुषाला वार्धक्य आणण्यास कारणीभूत होत असते. पुत्र हा केवळ आपलें बीज होय. भाऊ हा (वांटणी घेत असल्यामुळें) शत्रुच होय. जोंवर हात भिजत आहे तोंवरच मित्र. सारांश, सुख किंवा दु:ख भोगणारा आत्मा हा आपला एकटा एक आहे.

६६७
मातापितृसहस्त्राणि पुत्रदारशतानि च ।
संसारेष्वनुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे ॥१८।५।६०॥
निरनिराळ्या हजारों जन्मांत अनुभवलेलीं हजारों आईबापें  व शेकडों स्त्रिया आणि पुत्र हीं सर्व मरुन जातात व ह्यापुढें होणारीं इतरही मरणारच.

६६८
मातृलाभे सनाथत्वम् अनाथत्वं विपर्यये ॥१२।२६६।२६॥
आई असली तरच मनुष्य सनाथ असतो, ती नसली कीं अनाथ होतो.

६६९
मानं हित्वा प्रियो भवति ॥३।३१३।७८॥
अभिमान सोडल्यानें मनुष्य (लोकांना) प्रिय होतो.

६७०
मायया निर्जिता देवैरसुरा इति न: श्रुतम् ॥९।५८।५॥
(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) कपटाच्या योगानेंच देवांनीं असुरांना जिंकलें, असें आम्हीं ऐकलें आहे.

६७१
मायावी मायया वध्य: सत्यमेतध्युधिष्ठिर: ॥९।३१।७॥
(श्रीकृष्ण म्हणतात) हे युधिष्ठिरा, कपटी मनुष्याचा कपटानेंच वध केला पाहिजे हें सत्य होय.

६७२
मास्तंगमस्त्वं कृपणो विश्रूयस्व स्वकर्मणा ।
मा मध्ये मा जघन्ये त्वं माधोभूस्तिष्ठ गर्जित: ॥५।१३३।१३॥
(विदुला संजयास म्हणते) तूं दीन होऊन स्वत:चा नाश करुन घेऊं नकोस. स्वपराक्रमानें प्रसिध्दीस ये, तूं मध्यम स्थितींत अथवा हीन स्थितींत राहूं नकोस. हीन न होतां (कर्तृत्वानें) गाजत राहा.

६७३
मित्रं च शत्रुतामेति कस्मिंश्चित्कालपर्यये ।
शत्रुश्च मित्रतामेति स्वार्थो हि बलवत्तर: ॥१२।१३८।१४२॥
एकादे वेळेस मित्र वैर करुं लागतो आणि शत्रु मित्र बनतो. कारण, स्वार्थ हा फार प्रबळ आहे.

६७४
मुहूर्तं ज्वलितं श्रेयो
न च धूमायितं चिरम् ॥५।१३३।१५॥
थोडा वेळ कां होईना पण चमकून जाणें चांगलें; परंतु चिरकाल धुमसत राहणें बरें नव्हे.

६७५
मुहूर्तमपि राजेन्द्र तिन्दुकालावतज्ज्वलेत् ।
न तुषाग्निरिवानर्चिर्धूमायेत चिरं नर: ॥१२।१४०।१९॥
(भारद्वाजमुनि शत्रुंजय राजाला म्हणतात) हे राजश्रेष्ठा, मनुष्यानें टेंभुरणीच्या कोलिताप्रमाणें क्षणभर तरी चमकून जावें. ज्वाला नसलेल्या कोंडयाच्या अग्नीप्रमाणें निरंतर धुमसत राहूं नये.

६७६
मूर्खो हि जल्पतां पुंसां श्रुत्वा वाच: शुभाशुभा: ।
अशुभं वाक्यमादत्ते पुरीषमिव सूकर: ॥१।७४।९०॥
बडबड करणार्‍या लोकांचें बरें वाईट बोलणें ऐकून, त्यांतून वाईट बोलणें तेवढें, विष्ठा ग्रहण करणार्‍या डुकराप्रमाणें, मूर्ख मनुष्य घेत असतो.

६७७
मूलमेवादितिअश्छिन्ध्यात् परपक्षस्य नित्यश: ।
तत: सहायांस्तपक्षान् सर्वांश्च तदनन्तरम् ॥१।१४०।१६॥
नेहमीं आपल्या शत्रूपक्षाचें मूळच पहिल्यानें तोडून टाकावें. नंतर त्याचे साथीदार व त्यानंतर त्याच्या पक्षांतील इतर सर्व लोक ह्यांचा उच्छेद करावा.

६७८
मृतं वा यदि वा नष्टं योऽतीतमनुशोचति ।
दु:खेन लभते दु:खं द्वावनार्थौ प्रपध्यते ॥११।२६।४॥
मेल्यामुळें किंवा हरवल्यामुळें जें नाहींसें झालें त्याविषयीं जो शोक करीत बसतो, त्याला त्या दु:ख करण्यापासून पुन: दु:ख प्राप्त होतें व अशा रीतीनें तो दोन अनर्थांत सांपडतो.

६७९
मृतं शरीरमुत्सृज्य काष्ठलोष्टसमं जना: ।
मुहूर्तमिव रोदित्वा ततो यान्ति पराड्मुखा: ॥१३।१११।१४॥
मेलेलें शरीर लाकडाप्रमाणें अथवा मातीच्या ढेकळाप्रमाणें टाकून देऊन व क्षणभर रडून नंतर लोक पाठमोरे होऊन निघून जातात.

६८०
मृतकल्पा हि रोगिण: ॥५।३६।६७॥
रोगी मनुष्यें मेल्यांतच जमा.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP