मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन २८१ ते ३००

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन २८१ ते ३००

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


२८१
क्षत्रियस्यातिवृत्तस्य ब्राह्मणेषु विशेषत: ।
ब्रह्मैव संनियन्तृ स्यात् क्षत्रं हि ब्रह्मसंभवम् ॥१२।७८।२१॥
क्षत्रिय जर आपला धर्म सोडून विशेषत: ब्राह्मणांवर अत्याचार करुं लागेल, तर ब्राह्मणच त्याचें नियमन करील. कारण, क्षत्रिय हा ब्राह्मणापासून उत्पन्न झालेला आहे.

२८२
क्षत्रियाणां बलं तेजो ब्राह्मणांना क्षमा बलम् ॥१।१७५।२९॥
क्षत्रियांचें बळ पराक्रम. ब्राह्मणांचे बळ क्षमा.

२८३
क्षत्रियो बाहुवीर्यस्तु न तथा वाक्यवीर्यवान् ॥२।२१।५१॥
क्षत्रियाचें सामर्थ्य बाहूंमध्येंच असतें तें भाषण करण्यांत नसतें.

२८४
क्षममाणं नृपं नित्यं नीच: परिभवेज्जन: ।
हस्तियन्ता गजस्येव शिर एवारुरुक्षति ॥१२।५६।३९॥
राजा सदैव अपराधाची क्षमा करुं लागला, म्हणजे निकृष्ट प्रतीचे लोकसुध्दां त्याची अवज्ञा करुं लागतात. (इतकेंच नव्हे तर) हत्तीच्या मस्तकावर आरोहण करणार्‍या महाताप्रमाणें ते त्याच्या डोक्यावर बसण्याची इच्छा करुं लागतात.

२८५
क्षमा गुणो ह्यशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा ॥५।३३।५४॥
क्षमा हा दुर्बळांचा गुण व समर्थाचें भूषण होय.

२८६
क्षमा प्रशस्यते लोके
न तु पापोऽर्हति क्षमाम् ॥७।१९८।२६॥
क्षमा करणें ही गोष्ट लोकांत चांगली समजली जाते. पण पापी मनुष्य क्षमेला पात्र नाहीं.

२८७
क्षमावन्तं हि पापात्मा
जितोऽयमिति मन्यते ॥७।१९८।२७॥
क्षमा करणार्‍याविषयीं दुष्ट मनुष्याला वाटतें कीं आपण ह्याला जिंकलें.

२८८
क्षमावान् निरमर्षश्च नैव स्त्री न पुन: पुमान् ॥५।१३३।३३॥
जो अपमान सहन करतो, ज्याला राग येत नाहीं, तो स्त्रीही नव्हे आणि पुरुष तर नव्हेच नव्हे !

२८९
क्षात्रो धर्मो ह्यादिदेवात्प्रवृत:
पश्चादन्ये शेषभूताश्च धर्मा: ॥१२।६४।२१॥
ब्रह्मदेवापासून क्षात्रधर्म हाच प्रथम उत्पन्न झाला आणि नंतर दुसरे धर्म निर्माण झाले असून ते सर्व त्याचे अंगभूत आहेत.

२९०
क्षिप्रं विजानाति चिरं शृणोति
विज्ञाय चार्थं भजते न कामात् ।
नासंपृष्टो व्युपयुड्के परार्थे
तत्प्रज्ञानं प्रथमं पण्डितस्य ॥५।३३।२७॥
सांगितलेलें चटकन् समजणें, दुसर्‍याचें म्हणणें पुरेसा वेळ ऐकून घेणें, इच्छेची पर्वा न करतां विचार करुन कोणतीही गोष्ट हातीं घेणें आणि कोणीं विचारिल्यावांचून दुसर्‍याच्या कामांत न पडणें, हें पंडिताचें मुख्य लक्षण होय.

२९१
क्षुधा निर्णुदति प्रज्ञां धर्मबुध्दिं व्यपोहति ।
क्षुधापरिगतज्ञानो धृतिं त्यजति चैव ह ॥१४।९०।९१॥
क्षुधा ही बुध्दिभ्रंश करते आणि क्षुधेच्या योगानें मनुष्याचें ज्ञान पार नाहींसें होऊन त्याचें धैर्य गळून जातें.

२९२
क्षेत्रं पुरुषकारस्तु दैवं बीजमुदाहृतम् ।
क्षेत्रबीजसमायोगात् तत: सस्यं समृध्यते ॥१३।६।८॥
उद्योग हें शेत व दैव हें बीं आहे. (उद्योगरुप) शेत व (दैवरुप) बीं ह्यांचा संयोग झाला म्हणजे उत्तम प्रकारचें (यशोरुपी) पीक येतें.

२९३
खरीवात्सल्यमाहुस् तत् नि:सामर्थ्यमहेतुकम् ॥५।१३५।८॥
जें निष्कारण आणि निरुपयोगी वात्सल्य त्याला गाढवीचें प्रेम म्हणतात.

२९४
गतोदके सेतुबन्धो यादृक् तादृड्‍. मतिस्तव ।
संदीप्ते भवने यद्वत् कूपस्य खननं तथा ॥६।४९।२३॥
पाणी वाहून गेल्यावर बंधारा बांधावा, किंवा घराला आग लागल्यावर विहीर खणूं लागावें त्यासारखा हा तुझा विचार आहे. (पांडवांशीं युध्दाचा प्रसंग आणूं नकोस, म्हणून मीं दुर्योधनाला परोपरीनें सांगितलें असें धृतराष्ट्रानें म्हटलें त्यावर संजयानें दिलेलें हे उत्तर आहे.)

२९५
गीता सुगीता कर्तव्या किमन्यै: शास्त्रसंग्रहै: ।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनि:सृता ॥६।४३।१॥
एकट्या गीतेचें चांगलें अध्ययन करावें. इतर भाराभर शास्त्रांची गीतेपुढें काय प्रतिष्ठा ? गीता ही प्रत्यक्ष पद्मनाभ जो परमात्मा श्रीकृष्ण त्याच्या मुखकमलांतून बाहेर पडलेली आहे.

२९६
गुणयुक्तेऽपि नैकस्मिन् विश्वसेत विचक्षण: ॥१२।१४।१८॥
गुणसंपन्न अशाही एकटया मनुष्यावर शहाण्यानें विश्वास ठेवूं नये.

२९७
गुणानामेव वक्तार: सन्त: सत्सु नराधिप ॥१२।१३२।१३॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) सज्जन हे सज्जनांच्या ठिकाणीं असलेलें गुण तेवढेच सांगत असतात.

२९८
गुणान्गुणवंता शल्य गुणवान् वेत्ति नागुण: ॥८।४०।२॥
(कर्ण म्हणतो) हे शल्या, गुणवान् लोकांच्या गुणांची पारख स्वत: गुणी असलेल्यालाच होत असते; गुणहीन असलेल्याला होत नाहीं.

२९९
गुणाश्च षण्मितभुक्तं भजन्ते
आरोग्यमायुश्च बलं सुखं च ।
अनाविलं चास्य भवत्यपत्यं
न चैनमाध्यून इति क्षिपन्ति ॥५।३७॥३४॥
मिताहार करणाराला सहा गुण प्राप्त होतात. आरोग्य (दीर्घ) आयुष्य, बळ व सुख हीं त्याला मिळतात. त्याची संतति निरोगी असते आणि त्याच्यावर कोणी ‘खादाड आहे’ असा आक्षेप घेत नाहींत.

३००
गुरुरात्मवतां शास्ता शास्ता राजा दुरात्मनाम् ।
अथ प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यम: ॥५।३५।७१॥
सुष्टांचा शास्ता गुरु आणि दुष्टांना शासन करणारा राजा होय. परंतु चोरुन पापें करणार्‍यांना शिक्षा करणारा विवस्वानाचा पुत्र यम हाच होय.

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP