मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ४६१ ते ४८०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ४६१ ते ४८०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


४६१
नष्टं समुद्रे पतितं नष्टं वाक्यमशृण्वति ।
अनात्मनि श्रुतं नष्टं नष्टं हुतमनग्निकम् ॥५।३९।४२॥
जें समुद्रांत पडलें तें नष्ट झालें. न ऐकणार्‍याला सांगितलेलें व्यर्थ गेलें. स्वेच्छाचारी माणसाची विद्या फुकट गेली, राखेंत टाकलेली आहुति व्यर्थ गेली.

४६२
न संशयमनारुह्य नरो भद्राणि पश्यति ।
संशयं पुनरारुह्य यदि जीवति पश्यति ॥१२।१४०।३४॥
संकटांत सांपडल्यावांचून सांपडल्यानंतर जर तो जिवंत राहिला तर त्याला आपलें कल्याण झालेलें दिसून येईल.

४६३
न स क्षयो महाराज य: क्षयो वृध्दिमावहेत ।
क्षय: स त्विह मत्नव्यो यं लब्ध्वा बहु नाशयेत् ॥५।३९।७॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) जो क्षय उत्कर्षाला कारण होतो तो खरोखर क्षय नव्हे. जो प्राप्त झाला असतां बहुत नाश करतो त्यालाच क्षय म्हणावें.

४६४
न सख्यमजरं लोके हृदि तिष्ठति कस्यचित् ।
कालो ह्येनं विहरति क्रोधो वैनं रहत्युत ॥१।१३१।७॥
जगांत कोणाच्याही अंत:करणांत स्नेहभाव कमी न होतां एकसारखा टिकून राहत नाहीं. कालान्तरानें स्नेह नाहींसा होतो किंवा क्रोधामुळेंही नष्ट होतो.

४६५
न सा सभा यत्र न सन्ति वृध्दा
न ते वृध्दा ये न वदन्ति धर्मम् ।
नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति
न तत् सत्यं यच्छलेनाभ्युपेतम् ॥५।३५।५८॥
जेथें वृध्द लोक नाहींत ती सभा नव्हे. जे धर्माला अनुसरुन भाषण करीत नाहींत, ते वृध्द नव्हेत. ज्यांत सत्य नाहीं तो धर्म नव्हे आणि जें कपटानें युक्त असेल तें सत्यही नव्हे.

४६६
न स्याद्वनम् ऋते व्याघ्रान् व्याघ्रा न स्युऋते वनम् ।
वनं हि रक्ष्यते व्याघ्रैर्व्याघ्रान् रक्षति काननम् ॥५।३७।४६॥
वाघावांचून वन टिकूं शकणार नाहीं आणि वनांवाचून वाघ राहूं शकणार नाहींत. कारण वाघांच्या योगानें वनाचें रक्षण होतें आणि वन वाघांचें रक्षण करतें.

४६७
न हायनैर्न पलितैर्न वित्तैर्न च बन्धुभि: ।
ऋषयश्चक्रिरे धर्मं योऽनूचान: स नो महान् ॥१२।३२३।६॥
वयोमान, पिकलेले केस, धनदौलत आणि सोयरेधायरे ह्यांच्या बळावर कोणाला मोठेपणा प्राप्त होत नाहीं. ऋषींनीं असा नियम ठरविला कीं जो साड्ग वेदाचें अध्ययन करणारा त्यालाच आम्ही श्रेष्ठ समजतों.

४६८
न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति ॥६।३०।४०॥
(श्रीकृष्ण सांगतात) बा अर्जुना, शुभ कर्में करणारा कोणीही दु:स्थितीप्रत जात नाहीं.

४६९
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ॥६।२७।५॥
कांहींही कर्म न करितां कोणीही एक क्षणभर देखील राहूं शकत नाहीं.

४७०
न हि खल्वनुपायेन कश्चिदर्थोऽभिसिध्यति ।
सूत्रजालैर्यथा मत्स्यान् ब्रध्नन्ति जलजीविन: ॥१२।२०३।११॥
भलत्याच उपायानें कोणतेंही कार्य खचित सिध्द होत नाहीं. उदाहरणार्थ, जलचरांवर उपजीविका करणारे लोक सुतांचें जाळेंच टाकून (वस्त्र टाकून नव्हे) माशांना घेरीत असतात.

४७१
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमहि विध्यते ॥६।२८।३८॥
ज्ञानासारखें पवित्र ह्या जगांत खरोखर दुसरें कांहींच नाहीं.
उदाहरणार्थ, जलचरांवर उपजीविका करणारे लोक सुतांचें जाळेंच टाकून (वस्त्र टाकून नव्हे) माशांना घेरीत असतात.

४७२
न हि दैवेन सिध्यन्ति कार्याण्येकेन सत्तम ।
न चापि कर्मणैकेन द्वाभ्यां सिध्दिस्तु योगत: ॥१०।२।३॥
(कृपाचार्य अश्वत्थाम्याला सांगतात) हे सज्जनश्रेष्ठा, एकटया दैवानें किंवा एकटया उद्योगानें कार्यें सिध्दीस जात नसतात. परंतु ह्या दोहोंच्या संयोगानें कोणतेंही काम साधत असतें.

४७३
न हि पश्यामि जीवन्तं लोके कंचिदहिंसया ।
सत्त्वै: सत्त्वा हि जीवन्ति दुर्बलैर्बलवत्तरा ॥१२।१५।२०॥
(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) अहिंसावृत्तीनें जगांत जिवंत राहणारा कोणी दिसून येत नाहीं. खरोखर बलवान् प्राणी आपल्याहून दुर्बल असलेल्या प्राण्यांवर उपजीविका करीत असतात.

४७४
न हि प्रमादात्परमस्ति कश्चित्
वधो नराणामिह जीवलोके ।
प्रमत्तमर्था हि नरं समन्तात्
त्यजन्त्यनर्थाश्च समाविशन्ति ॥१०।१०।१९॥
ह्या लोकीं मनुष्यांना बेसावधपणापेक्षां अधिक घातक असें कांहींच नाहीं. बेसावध राहणार्‍या मनुष्याला सर्व प्रकारची संपत्ति सोडून जाते आणि त्याच्यावर संकटें मात्र कोसळतात.

४७५
न हि प्राणात् प्रियतरं लोके किंचन विध्यते ।
तस्मात् दयां नर: कुर्यात् यथात्मनि तथा परे ॥१३।११६।१२॥
मृत्युलोकीं प्राणापेक्षां प्रियतर असें कांहींच नाहीं.
ह्यास्तव मनुष्यानें स्वत:प्रमाणेंच दुसर्‍यावर दया करावी.

४७६
न हि बुध्द्यान्वित: प्राज्ञो नीतिशास्त्रविशारद: ।
निमज्जत्यापदं प्राप्य महतीं दारुणामप ॥१२।१३८।४०॥
नीतिशास्त्रनिपुण, बुध्दिमान, चतुर पुरुष केवढेंही मोठें भयंकर संकट प्राप्त झालें तरी त्यांत बुडून जात नाहीं.

४७७
न हि वैरं महात्मानो विवृण्वन्त्यपकारिषु ।
शनै: शनैर्महाराज दर्शयन्ति स्म ते बलम् ॥१२।१५७।१०॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) थोर लोक आपला अपकार करणार्‍याविषयींचें वैर एकदम प्रगट करीत नाहींत. तथापि हळू हळू आपलें सामर्थ्य (त्यांना) दाखविल्यावाचून ते राह्त नाहींत.

४७८
न हि वैराणि शाम्यन्ति दीर्घकालधृतान्यपि ॥५।७२।६२॥
वैर दीर्घ कालपर्यंत धारण केलें तरीसुध्दां नाहींसें होत नाहीं.

४७९
न हि शौर्यात्परं किंचित् ॥१२।९९।१८॥
शौर्यापेक्षां श्रेष्ठ कांहींच नाहीं.

४८०
न हि संचयवान् कश्चित् दृश्यते निरुपद्रव: ॥३।२।४८॥
कोणीही संचय करणारा पुरुष उपद्रवरहित असल्याचें दृष्टोत्पत्तीस येत नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP