स्कंध १ ला - अध्याय ८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५६

सूत म्हणे पुत्रशोकें सर्व दु:खी । और्ध्वदेहिकासी सिद्ध झाले ॥१॥
तिलोदकास्तव उत्सुक मृतांसी । तिलोदक देती सकल तदा ॥२॥
धृतराष्ट्र, कुंती, गांधारी, द्रौपदी । पुत्रशोकें दु:खी होती बहू ॥३॥
कृष्णासवें मुनि सांत्वन तयांचें । करिती काळातें वर्णूनियां ॥४॥
वासुदेव म्हणे पुढती श्रीकृष्ण । द्वारकागमन योजिताती ॥५॥

५७
व्यासांसी पूजूनि सिद्ध होई कृष्ण । व्यासही पूजन करिती त्याचें ॥१॥
सात्यकि उद्धवासवें यदुनाथ । बैसण्यासी सिद्ध होती रथीं ॥२॥
इतुक्यांत येई धांवूनि उत्तरा । म्हणे गदाधरा रक्षीं मज ॥३॥
मर्त्यजन केंवी रक्षितील कोणा । देई नारायणा, अभय तूंचि ॥४॥
तप्तलोहबाण अंगावरी येई । देवा, तूं वांचवीं गर्भ माझा ॥५॥
तैसेचि त्यावेळीं पांडवांवरीही । विनाशार्थ सोडी विप्र बाण ॥६॥
वासुदेव म्हणे जाणूनि हरीनें । भक्तां सुदर्शनें संरक्षिलें ॥७॥

५८
ब्रह्मास्त्रही केंवी शांत झालें ऐसी । शंका मानसासी नच येवो ॥१॥
उत्पत्ति पालन संहार जो करी । समर्थ तो हरी सकल कर्मा ॥२॥
सांभाळ यापरी करुनि निघतां । करी कुंतीमाता स्तवन त्याचें ॥३॥
भगवंता, माझा घेईं नमस्कार । साक्षात्‍ परमेश्वर प्रगटलासी ॥४॥
सर्वव्यापी परी अलक्ष्य योग्यांही । अंतरीं जडावी भक्ति केंवी ॥५॥
वासुदेव म्हणे स्त्रियातेंही मोक्ष । भक्ति जरी दृढ होई तरी ॥६॥

५९
कृष्णा वासुदेवा देवकीनंदना । हे कंसकंदना नमन घेईं ॥१॥
कमलनाभा हे कमललोचना । घे मम वंदना कमलाप्रिया ॥२॥
करचरणही कोमल कमळें । देवा, मी वंदिले चरण तव ॥३॥
बंदिवासांतूनि सोडविली माता । तूंचि संरक्षिता मत्पुत्रांसी ॥४॥
अंतीं ब्रह्मास्त्रही निवारिलें त्वांचि । पुरवीं माझी तूंचि इच्छा एक ॥५॥
वासुदेव म्हणे कुंती वीरमाता । मागे जगन्नाथा ऐका काय ॥६॥

६०
वारंवार जागोजागीं आम्हांवरी । संकटें श्रीहरी यावीं नित्य ॥१॥
रक्षणार्थ तेणें धांवूनि तूं येसी । दर्शन आम्हांसी घडे तेणें ॥२॥
दर्शन तें टाळी जन्म-मरणासी । कुल ऐश्वर्यादि व्यर्थ सर्व ॥३॥
कुळ-कीर्ति-धन-विद्या-अभिमान । जडतां हरिप्रेम न वसे चित्तीं ॥४॥
संकटग्रस्त तं निर्धन जे कोणी । आठविती मनीं नित्य तुज ॥५॥
यास्तव संकटें आम्हांवरी नित्य । असावीं हा हेत पुरवीं माझा ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती बहु स्तुति । करुनियां कुंती वंदी देवा ॥७॥

६१
परस्पर जीव कलहांत मग्न । समासी विषम म्हणती तुज ॥१॥
अजन्मा तूं जन्म पावसी बहुत । करिसी नाटक नटासम ॥२॥
यदूचें महत्त्व वाढावया लोकीं । कुळीं या जन्मसी म्हणती कोणी ॥३॥
दुष्टनिर्दलन, सज्जनपालन । भूभार हरण कथिती कोणी ॥४॥
कर्मदोशें क्लेश भोगिताती जन । चरित्र पावन तयांसी जें ॥५॥
वर्तूनि दावाया अवतार घेसी । ज्ञाते वदताती ऐसें कोणी ॥६॥
वासुदेव म्हणे कुंती श्रीकृष्णासी । आश्रय आम्हांसी तूंचि म्हणे ॥७॥

६२
झाला उत्कर्ष आमुचा । न सहे वैरियां कित्येकां ॥१॥
ऐशा वेळीं संरक्षण । देवा, आवश्यक जाण ॥२॥
परी त्यागूनि आम्हांसी । कैसा जासी या संकटीं ॥३॥
जैसें निर्जीव शरीर । तैसे तुजवीण हे वीर ॥४॥
सकलां देऊं नको दु:ख । अथवा छेदीं स्नेहपाश ॥५॥
सर्वभावें मी शरण । यावें तुजसी दे, हें दान ॥६॥
वासुदेव म्हणे कुंती । करी वंदन प्रभूसी ॥७॥

६३
सूत म्हणे ऐशा स्तवनें श्रीकृष्ण । घाली आवरण हंसूनि बोले ॥१॥
पूर्ण तुझे हेतु होतींल समस्त । घेऊनि निरोप धर्मा भेटे ॥२॥
अत्यंत आग्रह करी धर्मराज । तदा यदुराज राही तेथ ॥३॥
ज्ञातिबधें धर्म जाहला उद्विग्न । बोधेंही न मन शांत त्याचें ॥४॥
अशाश्वत माझें नसे समाधान । अश्वमेधपुण्य व्यर्थचि तें ॥६॥
पंकमग्नाप्रति पंकें प्रक्षालन । हिंसामय यज्ञ तेंवी वाटे ॥७॥
वासुदेव म्हणे शोकमोहमग्न । सज्जनही भ्रम पावे ऐसा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP