स्कंध १ ला - अध्याय ४ था

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२७
सूताचें वचन ऐकूनि शौनक । म्हणे भागवत कथीं आम्हां ॥१॥
कदा कोण्या ठाईं कथा हे किमर्थ । निवेदिती व्यास तेंही कथीं ॥२॥
उन्मक्त मूक तैं जडभावें शुक । विचरती देख भूमंडळीं ॥३॥
अभेदभावें ते जातां वनामाजी । मागोमाग जाती व्यास त्यांच्या ॥४॥
विवस्त्रहि शुका पाहूनि अप्सरा । क्रीडेंत रंगल्या जळामाजी ॥५॥
स्वस्त्रहि व्यासां पाहूनि लाजल्या । परिधानिल्या झाल्या निज वस्त्रें ॥६॥
पुशितां कारण बदल्या व्यासांसी । भेदभाव चित्तीं शुकाच्या न ॥७॥
वासुदेव म्हणे स्त्री-पुरुषभेद । जाणें विलयास कठिण बहु ॥८॥

२८
ऐसे शुक, केंवी परीक्षितीलागीं । अहो निवेदिती भागवत ॥१॥
गोदोहनकाल गृहस्थसदनीं । भिक्षामिषें मुनि वसती भाग्यें ॥२॥
उन्मत्त, मूक तैं जडाची संगती । केंवी रायाप्रती होऊं शके ॥३॥
ऐसा अशक्य हा संवाद दोघांचा । वाटे तरी शंका दूर करा ॥४॥
अभिमन्य़ूसुत परीक्षित केंवी । गंगेच्या तटाकीं बसला सांगें ॥५॥
पादपीठीं ज्याच्या लोळताती राजे । केंवी तो विरागें त्यागी प्राण ॥६॥
वासुदेव म्हणे शौनकासी सूत । निवेदी वृत्तांत ऐका काय ॥७॥

२९
युगांच्या तृतीय पर्यायीं द्वापर । समाप्तिसमय प्राप्त होतां ॥१॥
सत्यवतीचिया ठायीं पराशरां । पुत्र व्यास झाला महाज्ञानी ॥२॥
कालगति तेणें जाणिली ज्ञानानें । शुद्धान्त:करणें मलिन झालीं ॥३॥
नि:सत्व निर्धन अल्पायुषि लोक । चिंतूनि मनांत खेद वाटे ॥४॥
पुढती विभाग करुनि वेदाचे । पढवी शिष्यांते व्यासदेव ॥५॥
पैलासी ऋग्वेद, वैशंपायनासी । यजुर्वेद कथी मुनिराज ॥६॥
सुमंतु शिष्यास पढवी तृतीय । पुराणेतिहास मत्पित्यासी ॥७॥
वासुदेव म्हणे करुनि सुलभ । अध्ययन, वेद संरक्षिले ॥८॥

३०
स्त्री, शूद्र, विप्र जे कोणी मतिमंद । पंचम त्यां वेद उपदेशिला ॥१॥
लोककल्याणाची ऐसी तळमळ । होती अहोरात्र द्वैपायना ॥२॥
इतुकियानेंही नाहीं ती शमली । अपूर्णता आली ध्यानीं त्यांच्या ॥३॥
वेद, वेदसार सुलभ करुनि । अद्यापि न मनीं समाधान ॥४॥
सरस्वतीतीरीं चिंतिती एकदां । भागवतमार्गा निवेदावें ॥५॥
इतुक्यांत येती आश्रमीं नारद । पूजा यथाशास्त्र केली त्यांची ॥६॥
वासुदेव म्हणे सज्जनसंयोग । ईश्वरी प्रसाद घडतां लाभे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP