स्कंध १ ला - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४२
व्यास नारदांसी मज वृत्त । कथावें समस्त घडलें जें तें ॥१॥
कंठियेलें केंवी पुढील आयुष्य । पूर्वजन्मवृत्त स्मरतें केंवी ॥२॥
कथावें तें सर्व कृपाळु होऊनि । व्यासा घेई ध्यानीं म्हणती मुनि ॥३॥
एकुलता एक होतों मी मातेसी । पाळी ती मजसी अति प्रेमें ॥४॥
योगक्षेमभार घ्यावा ऐसें इच्छी । शक्य तें तिजसी नव्हतें परी ॥५॥
काष्ठपुतळी ती जेवीं पराधीन । तैसेंचि जीवन मानवाचें ॥६॥
वासुदेव म्हणे ठेवील अनंत । तैसें या जगांत बसणें प्राप्त ॥७॥

४३
दुग्धदोहनार्थ जातां एके वेळीं । माता निवर्तली सर्पदंशें ॥१॥
इष्टचि हे पाश तुटतां भक्तांसी । गेलों उत्तरेसी त्यजूनि स्थान ॥२॥
पर्वत वनें तैं लंघूनियां देश । पाहिला प्रदेश एक रम्य ॥३॥
श्रांत होऊनियां उदक प्राशूनि । बैसलों काननीं ध्यानालागीं ॥४॥
कंठ रुद्ध झाले रोमांच ठाकले । अश्रुपूर आले नयनांतूनि ॥५॥
प्रगटला चित्तीं कृष्णभगवान्‍ । जाहलों मी धन्य दर्शनें त्या ॥६॥
वासुदेव म्हणे कृपाळू श्रीहरी । संकटांत तारी सद्भक्तांसी ॥७॥

४४
पुढती एकाएकीं हृदयस्थ कृष्ण । पावे अंतर्धान तया वेळीं ॥१॥
आर्तपणें तदा खिन्न मी जाहलों । अतृप्त राहिलों दर्शनानें ॥२॥
वारंवार यत्नें आंवरुनि चित्त । बैसलों वनांत ध्यानमग्न ॥३॥
पुनरपि व्हावें दर्शन हे इच्छा । कानावरी वाचा पडली तदा ॥४॥
वासुदेव म्हणे आर्त भक्तांप्रति । संकटीं श्रीपती रक्षीतसे ॥५॥

४५
कर्णी आली नभोवाणी । बाळा, वचन घेईं ध्यानीं ॥१॥
पुनर्दर्शन न तुज । आड येई हें शूद्रत्व ॥२॥
भोगें पातक संपतां । सिद्ध होई एकाग्रता ॥३॥
अन्यथा न सिद्ध ध्यान । दिधलें एकदां दर्शन ॥४॥
हेतु वाढावी उत्कंठा । जेणें लाभ घडे मोठा ॥५॥
जन्म भक्ताचा पावसी । पूर्वस्मरणयुक्त होसी ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसी । वाणी नारद निवेदी ॥७॥

४६
नभासम सर्वव्यापी परमात्मा । दुर्ज्ञेयत्व जाणा तैसेंचि त्या ॥१॥
कृपा ऐसी तेणें करितां सर्व लाज । त्यागूनियां छंद धरिला त्याचा ॥२॥
अनासक्तचित्तें नाम त्याचें गात । हिंडलों सर्वत्र भूमंडळीं ॥३॥
अंतीं देह नष्ट होतां मुक्त झालों । श्वासासवें गेलों ब्रह्मोदरीं ॥४॥
लोटलीं सहस्त्र महायुगें ऐसीं । जन्मलों मरीचि आदींसवें ॥५॥
वासुदेव म्हणे नारद यापरी । निवेदन करी जन्मवृत्त ॥६॥

४७
अस्खलित ब्रह्मचर्यादिक व्रतें । पाळीत त्रैलोक्यें हिंडतसें ॥१॥
अकुंठित माझी गतीहि सर्वत्र । नाद स्वत:सिद्ध वीणेचा या ॥२॥
ईशदत्त वीणा ठेवूनियां स्कंधीं । हिंडतों श्रीरंगीं रंगूनियां ॥३॥
आतां नित्य माझ्या हृदयीं मुकुंद - । दर्शनाचा लाभ सर्वकाल ॥४॥
व्यासप्रश्नोत्तरें निवेदूनि ऐसीं । नारद व्यासांसी स्फूर्ती देती ॥५॥
वासुदेव म्हणे स्वानुभवाविण । सकलही शीण साधनांचा ॥६॥

४८
घेऊनि निरोप सप्रेम व्यासांचा । नारद सुखाचा क्रमिती मार्ग ॥१॥
ब्रह्मवीणा स्कंधीं टाकूनि यथेच्छ । लुटिती आनंद भजूनि ईश ॥२॥
अहो धन्य धन्य देवर्षि नारद । शार्ड्गपाणीछंद जयालागीं ॥३॥
ईशगुणगानें तेंवी वीणानादें । आतुर जगातें रंजवीती ॥४॥
वासुदेव म्हणे भक्तप्रिय हरी । भक्तांवरी धरी कृपाछत्र ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP