स्कंध १ ला - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४९
पुढती म्हणे सूत सरस्वतीतीरीं । व्यास ‘शम्याप्रासीं’ करिती वास ॥१॥
तया रम्यस्थानीं नारदवचन । चिंतितांचि ध्यान स्थिर होई ॥२॥
रागद्वेषादिक दोषहीन चित्तीं । स्थिरावली भक्ति प्रेममयी ॥३॥
माया, मायानाथ, प्रगटले तेथ । ज्ञान अंतरांत प्रकाशलें ॥४॥
जीव तोचि शिव असूनि निर्गुण । मानी हे त्रिगुण आपणचि ॥५॥
जन्ममरणादि सर्वही त्यायोगें । जातां भक्तिमार्गे टळती क्लेश ॥६॥
वासुदेव म्हणे बोध हा सुस्पष्ट । होई तदा व्यास रचिती ग्रंथ ॥७॥

५०
शोक, भय, मोहनिवारण जेणें । पढविती प्रेमें शुकासी तो ॥१॥
नि:संगही शुक रंगती कथेंत । स्वभावचि नित्य ज्ञात्यांचा हा ॥२॥
सूत म्हणे आतां परीक्षितवृत्त । हरिलीलायुक्त ऐका प्रेमें ॥३॥
विप्रहस्ते निद्रामग्न पुत्रवध - । होतां, द्रौपदीस शोक होई ॥४॥
सांत्वनार्थ तिच्या बोलला अर्जुन । आणूनि देईन दुष्टशिर ॥५॥
वचन यापरी देऊनि निघाला । रथ सिद्ध केला कृष्णासवें ॥६॥
वासुदेव म्हणे भयग्रस्त विप्र । सोडी तैं ब्रह्मास्त्र नुरतां मार्ग ॥७॥

५१
अस्त्रोद्‍भूत तया तेजासी पाहूनि । प्रार्थी धनुष्पाणी पार्थ कृष्णा ॥१॥
आदिपुरुष तूं क्लेशहारी देव । हरिसी भूभार अवतरुनि ॥२॥
ध्यानार्थ भक्तांच्या गोजिरें हें रुप । असूनि अरुप धरिलेंसी त्वां ॥३॥
भयंकर तेज पातलें कोठूनि । येईनाचि ध्यानीं नारायणा ॥४॥
कृष्ण म्हणे पार्था, द्रोणपुत्राचें हें । ब्रह्मास्त्र जाणावें निवारी या ॥५॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्णवचनें । ब्रह्मास्त्र पार्थानें अभिमंत्रिलें ॥६॥

५२
ब्रह्मास्त्रें तीं दोन ठाकतां एकत्र । होई हाहा:कार प्रलयासम ॥१॥
तदा श्रीकृष्णेच्छा जाणूनि अर्जुन । करी निग्रहण अस्त्रांचे त्या ॥२॥
पशूसम बांधी अश्वत्थाम्याप्रति । नेऊं शिबिरासी धरुनि इच्छा ॥३॥
कृष्ण तदा क्रोधें बोलला पार्थासी । वधचि दुष्टासि योग्य ऐशा ॥४॥
आतताई ऐसा निष्ठुर दुरात्मा । वधितां अर्जुना पुण्यलाभ ॥५॥
वासुदेव म्हणे थोरांची कसोटी । पाही जगजेठी कठिण काळीं ॥६॥

५३
सूत म्हणे कृष्णबोध उफराटा । करुनि पार्थाचा हेतु पाहे ॥१॥
परी पार्थ गुरुपुत्रासी न वधी । द्रौपदीपुढते धरुनी आणी ॥२॥
पशूसम बद्ध विप्र लज्जायुक्त । पाहूनि कृष्णेस करुणा येई ॥३॥
वंदूनियां तया म्हणे सोडा यासी । विप्र बंधनासी योग्य नसे ॥४॥
गुरुचि पुढती उभा पुत्ररुपें । दु:ख गुरुपत्नीचें ध्यानीं आणा ॥५॥
मजसम पुत्रशोक तिजप्रति । होऊं नये ऐसी इच्छा मम ॥६॥
अज्ञानें विप्रांसी नाडिलें तयांचीं । जाहलीं सर्वस्वी कुळें दग्ध ॥७॥
वासुदेव म्हणे वचनें या भीम । म्हणे नराधम वध्यचि हा ॥८॥

५४
सुहास्य वदनें अर्जुनाचें मुख । पाही जगन्नाथ तया वेळीं ॥१॥
विप्र अवघ्यचि परी या दुष्टासी । कथिलें तुजसी मीचि वधीं ॥२॥
उभयही आज्ञा पाळीं या समयीं । वचन सांभाळी दिधलेंसी जें ॥३॥
तात्पर्य, द्रौपदीभीमासवें मज । होईल संतोष ऐसें करीं ॥४॥
वासुदेव म्हणे होतां ईशकृपा । अशक्य न भक्ता जगतीं कांहीं ॥५॥

५५
सूत म्हणे भाव जाणूनि हरीचा । मणि मस्तकींचा हरिला पार्थे ॥१॥
काढूनियां पाट मुक्त केला विप्र । जाहला निष्प्रभ अश्वत्थामा ॥२॥
शिबिरांतूनि त्या दिलें हांकलूनि । सद्धर्म जाणूनि किरीटीनें ॥३॥
घोर अपराधा शिक्षा हेचि विप्रा । देहवध त्याचा करुं नये ॥४॥
वासुदेव म्हणे सर्वांसी संतुष्ट । ऐशा मार्गे पार्थ करी तदा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP