मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

आरत्या - ८२८१ ते ८२९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८२८१॥
अवतारनामभेद गणा आदि अगाध । जयासी पार नाहीं पुढें खुंटला वाद ॥
एकचि दंत शोभे मुख विक्राळ दोंद । ब्रह्मांडामाजी दावी अनंत हे छंद ॥१॥
जय जया गणपती ओंवाळीन आरती । साजिर्‍या सरळ भुजा फरश कमळ शोभती ॥ध्रु०॥
हे मही ठेंगणी हो तुज नृत्यनायका । भोंवरी फेर देतां असुर मर्दिले एकां ॥
घातले तोडरीं हो भक्तजनपाळका । सहस्त्र नाम तुज भुक्तिमुक्तिदायका ॥२॥
सुंदर शोभला हो रुपें लोपलीं तेजें । उपमा काय देऊं असे आणिक दुजें ॥
रवि शशि तारांगणें जयामाजी सहजें । उदरीं सामावली जया ब्रह्मांड बीजें ॥३॥
वर्णीतां शेष लीळा तया भागलीं मुखें । पांगळले वेद चारी कैसे राहिले मुके ॥
अवतार जन्मला हो लिंग नाभी या मुखें । अमूर्त मूर्तिमंत होय भक्तीच्या सुखें ॥४॥
विश्व हें रुप तुझें हस्त पाद मुखडें । ऐसाचि भाव देई तया नाचतां पुढें ॥
धूप दीप पंचारति ओंवाळीन निवाडें । राखें या शरणांगता बुका खेळतां लाडें ॥५॥

॥८२८२॥
कनकाच्या परियेळी उजळून आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥
ओंवाळूं गे माये सबाह्य साजिरा । राहिरखुमाई सत्यभामेच्या वरा ॥ध्रु०॥
मंडित चतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें । श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकलें ॥२॥
वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंख चक्र गदा पद्म आयुधें शोभत ॥३॥
सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा । चरणींचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥४॥
ओंवाळितां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृष्टी समाधि तुकया लागली पायीं ॥५॥

॥८२८३॥
भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओंवाळुं आरती ॥१॥
ओंवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेवीन माथा ॥ध्रु०॥
काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती । कोटि ब्रम्हहत्या सुख पाहतां जाती ॥२॥
राही रखुमाई दोही हों बाहीं । मयुर पिच्छचामरें ढाळिती ठायीं ठायीं ॥३॥
तुका म्हणे दीप घेउनि उन्मन ती शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा ॥४॥

॥८२८४॥
धन्य दिवस आजी दर्शन संतांचें । नांदें तया घरीं दैवत पंढरीचें ॥१॥
धन्य पुण्यरुप कैसा झाला संसार । देव आणि भक्त दुजा नाहीं विचार ॥ध्रु०॥
धन्य पूर्व पुण्य वोडवलें निरुतेम । संतांचें दर्शन झालें भाग्यें बहुतेम ॥२॥
तुका म्हणे धन्य आम्हां जोडली जोडी । संतांचें चरण आतां जीवें न सोडीं ॥३॥

॥८२८५॥
ओंवाळूं आरती पंढरीराया । सर्व भावें शरण आलों तुझिया पायां ॥ध्रु०॥
सर्व व्यापून कैसें रुप आकळ । तो हा गौळ्याघरीं झाला कृष्णबाळ ॥१॥
स्वरुप गुणातीत झाला आवतारधारीं । तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥२॥
भक्तीचिया काजा कैसा रुपासी आला । ब्रीदाचा तोडर चरणीं मिरविला ॥३॥
आरतें आरती कैसी ओंवाळिली । वाखाणितां कीर्तिअ वाचा परतली ॥४॥
भाव भक्ति बळें होसी कृपाळू देवा । तुका म्हणे पांडुरंगा तुझ्या न कळती मावा ॥५॥

॥८२८६॥
गाऊं वाणूं तुज विठो तुझा करुं आनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥
आनंद रे विठोबा झाला माझे मनीं । देखिलीं लोचनीं विटेसहित पाउलें ॥ध्रु०॥
न करीं तपसाधनें रे मुक्तीचे सायास । हाचि जन्मोजन्मीं गोड भक्तीचा रस ॥२॥
तुका म्हणे आम्हां प्रेमा उणें तें कायी । पंढरीचा राणा सांटविला हृदयीं ॥३॥

॥८२८७॥
जय देवा पांडुरंगा । जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुह्मा लक्ष्मीकांता ॥ध्रु०॥
पंढरी पुण्यभुमी । भिमा दक्षिण वाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा । महा पातकां धुणी ।
उतरलें वैकुंठ हो । महा सुख मेदिनी ॥ जय देवा०॥१॥
नित्य नवा सोहळा हो । महावाद्यांचा गजर । सन्मुख गरुडपारीं । कांठी मिरवती करी ।
मंदित चतुर्भुज । कटी जोडुनी कर ॥ जय देवा०॥२॥
हरीनाथ कीर्तन हो । महा आनंद द्वारीं । नाचताती प्रेमसुखें नर तेथीच्या नारी ।
जीवन्मुक्त लोक । कौतुके पाहती हरी ॥ जयदेवा०॥३॥
आषाढी कार्तिकी हो । गरुड ठाकीं यांचा भार गर्जती नामघोषें । पहा वैष्णववीर ।
पापासी रीघ नाहीं असुर कांपती फार । जयदेवा०॥४॥
तें सुख पुंडलिकें । कैसे आणिलें बापें । निर्गुण साकारलें आह्मालागी हें सोपें ।
ह्मणुनी चरण धरिले । तुका राहिला सुखें ॥ जय देवा०॥५॥

॥८२८८॥
अवतार सूर्यवंशीं दिव्य घेतला स्वामी । एकपत्नी करुनी राहिला नेमी ॥
मर्दिले ताटिकेसी सुख । वाटलें भूमी । रक्षोनी यज्ञ केला कीर्ति प्रख्यात नामीं ॥१॥
जयदेवा रघुनाथा जय जानकीकांता । आरती ओंवाळीन तुजलागीं समर्था ॥ध्रु०॥
विदेही राजयानें पण केलासे भारी । तें शिवचाप मोठें मोडुनियां सत्वरीं ॥
वरिलें जानकीसी आदिशक्ती सुंदरी । जिंकुनी भार्गवाला बहु दाविली परी ॥२॥
पाळोनी पितृवाक्य मग सेविलें वन । हिंडतां पादचारी मुक्त तृण पाषाण ॥
मर्दिले दुष्ट भारी दैत्य खर दूषण । तोषले सर्व ऋषी त्यांसी दिलें दरुशन ॥३॥
जानकीलक्ष्मणासहित चांलतां त्वरें । भेटली भिल्लटी तिचीं उच्चिष्ट बोरें ।
भक्षुनी उद्धरिले कबंधादि अपार । देखिली पंचवटी तेथें केला विहार ॥४॥
पातली शूर्पनखा तिचें छेदिलें नाक । जाऊनी रावणासी सांगे सकळ दु:ख ॥
तेथोनी पातला तो मायामारीच देख । पाहतां जानकीसी तेव्हां वाटलें सुख ॥५॥
तें चर्म आणावया राम धांवतां मागें । रावणें जानकीसी नेले लंकेसी वेगें ॥
मागुता राम येतां सीता न दिसे चांग । तैं दु:ख टाकुनी हृदय झालें भंग ॥६॥
धुंडितां जानकीसी कपी भेटला त्यांसी । सुग्रीव भक्त केला मारुनी वाळीसी ॥
मेळविली कपि सेना शुद्धि मांडिली कैसी । मारुती पाठविला वेगें करुनी लंकेसी ॥७॥
मारिला अखया तो जंबुमाळी उत्पात । जाळिली हेमपुरी बहु केली नि:पात ॥
घेउनी शुद्धि आला बळी थोर हनुमंत । सांगतां सुखवार्ता मन निवालें तेथ ॥८॥
तारिले सिंधुपोटीं महा पर्वत कोटी । सुवेळा शिखरासी आले राम जगजेठी ॥
मांडिलें युद्ध मोठें वधी राक्षसकोटी । रावण कुंभकर्ण क्षणामाजि निवटी ॥९॥
करुनी चिरंजीव बिभीषण जो भक्त । दिधलें राज्य लंका झाली कीर्ति विख्यात ।
देखोनी जानकीला सुखी झाले रघुनाथ । तेहतीस कोटी देव जयजयकारें गर्जत ॥१०॥
पुष्पकारुढ झाले अंकीं जानकी भाजा । येतांचि भेटला भरत बंधु वोजा ॥
वाजती घोष नाना गुढया उभविल्या ध्वजा । अयोध्येलागीं आला राम त्रैलोक्यराजा ॥११॥
पट्टाभिषेक केला देव सेविती पाय । चिंतितां नाम ज्याचें होती दूर अपाय ॥
उत्सव थोर झाला थोर झाला वाचे वर्णितां नये । तन्मय दास तुका उभा कीर्तनीं राहे ॥१२॥

॥८२८९॥
मंडित चतुर्भुज दिव्य कर्णी कुंडलें । श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकलें ॥१॥
ओंवाळू गे माय कैसा सौभाग्य साजिरा । राही शंख चक्र गदा पद्म आयुधमंडित ॥२॥
सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥३॥
ओंवाळीतां मन उभें ठाकलें ठायीं । समदृष्टी समाधि तुकया लागला पायीं ॥४॥

॥८२९०॥
ओंवाळा ओंवाळा वेगीं सद्गुरुराणा । पांचां तत्वांची आरती लाऊनी जाणा ॥ध्रु०॥
निराकाराची वस्तु कैसी आकारा आली । सर्वा घटीं व्यापक माझी सद्गुरु माउली ॥१॥
सोळा सांधे बहात्तर कोठडी काया ओतिली । नऊ खिडक्या राखुनी कैसी मुर्ती बनविली ॥२॥
सप्त सागराचा कैसा वेढा घातला । खेळ खेळोनियां कैसा वेगळा झाला ॥
तुका ह्मणे स्वामी माझा सद्गुरु झाला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP