मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

प्रल्हादचरित्र

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७९५६॥
बोलावूनी पीता पुसे प्रल्हादासी । काय शिकलासी सांग बापा ॥१॥
येरु ह्मणे हरिनाम वसे चित्तीं । बहूतची प्रीति त्याची मज ॥२॥
मरो झडो पडो तुटो हें शरीर । वाचे निरंतर हेंची घोकीं ॥३॥
राग आला दुष्टा आज्ञा केली दूता । धरा बांधा लाता मारा यांसी ॥४॥
तुका ह्मणे दूतीं केली जे यातना । एक नारायणा ठावी असे ॥५॥

॥७९५७॥
पर्वतावरुनी लोटिला प्रल्हाद । परी तो गोविंद विसरेना ॥१॥
वरुनीयां त्यांणीं लोटियेल्या धोंडीं । खचल्या दरडी पर्वताच्या ॥२॥
पक्षी श्वापदासीं वर्तला प्रलय । ह्मणती हायहाय जनलोक ॥३॥
पाहाती तो उभा जैसा तैसा आहे । चिंतीतसे पाय गोविंदाचे ॥४॥
तुका ह्मणे ज्याचें मुखी नाम आहे । विघ्नाचें तें भय काय असे ॥५॥

॥७९५८॥
आणविला हत्ती बहु बळिवंत । मस्त मदोन्मत्त धीट सदा ॥१॥
लोटीयेला वरी दया नाहीं पोटीं । दुर्जन तो हटीं पडियेला ॥२॥
जवळी येतां हरीनाम गर्जे वाणी । पळतां मेदिनी थोडी झाली ॥३॥
दृष्टी देखियेला गजाचा तो वैरी । तेणें नेत्रा चंद्री लागलीसे ॥४॥
मारितां अंकुश न फिरती मागें । सोडियेला वेगें प्राण त्यांनीं ॥५॥
तुका ह्मणे वसे ज्याचे मुखीं नाम । भवजग भ्रम काय करी ॥६॥

॥७९५९॥
बांधोनी पाषाण बुडविला सागरीं । ठेवियेल्या वरी शीळा थोर ॥१॥
आप नारायण रक्षी निज दासा । लोटोनी सरसा कडे लावी ॥२॥
न बुडेची कांहीं करितां उपाय । रक्षी तया देव मागें पुढें ॥३॥
तुका ह्मणे देव भक्तां साह्यकारी । रक्षी नानापरी संकटें तो ॥४॥

॥७९६०॥
भवसागरीचे । निजदासां भय कैचें ॥१॥
बुडवितां जळीं तेथें रक्षी वनमाळी ॥२॥
तुका ह्मणे आंगीं । राखी जळत्या प्रसंगीं ॥३॥

॥७९६१॥
पाचारिले व्याळ लाविले शरीरीं । अंगा चहूंफेरी वेष्टीयेले ॥१॥
भयानक रुप मुखीं उठे ज्वाळा ॥ सर्वांगासी कळा लावियेल्या ॥२॥
नाम धडपडां जपे वेळोवेळां । तेणें कळिकाळा कांप सुटे ॥३॥
दुष्ट विखारांनीं गरुड देखिला । अंतक भेटला भक्षावया ॥४॥
तुका ह्मणे विघ्न थोर वोढवलें । मरण पावलें दुर्जनांसीं ॥५॥

॥७९६२॥
वाटीभरी वीष दिल्हें प्रल्हादासीं । निर्भय मानसीं तया बळें ॥१॥
भोक्ता नारायण केलें तें प्राशन । प्रतापें जीवन झालें तुझ्या ॥२॥
नामाचें चिंतनें विषाचें अमृत । जाहलें देखतां नारायणा ॥३॥
तुका ह्मणे ऐसे तुझे बडिवार । शिणला फणिवर वर्णवेना ॥४॥

॥७९६३॥
अग्निकुंडामाजी घातला प्रल्हाद । तरी तो गोविंद विसरेना ॥१॥
पितयासी ह्मणे व्यापक श्रीहरी । नांदतो मुरारी सर्वा ठायीं ॥२॥
अग्निरुप माझा सखा नारायण । प्रल्हाद गर्जून हाका मारी ॥३॥
तुका ह्मणे अग्नि झालासे शीतळ । प्रतापाचें बळ विठो तुझ्या ॥४॥

॥७९६४॥
कोपोनियां पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥
येरु ह्मणे काष्टीं पाषाणीं सकळीं । आहे वनमाळी जेथें तेथें ॥२॥
खांबावरी लात मारिली दुर्जनें । स्तंभीं नारायण प्रकटला ॥३॥
तुका ह्मणे ऐसा खांब कडाडला । ब्रह्मा दचकला सत्यलोकीं ॥४॥

॥७९६५॥
डळमळिला मेरु आणि तो मांदार । पाताळीं फणिवर डोई झाडी ॥१॥
लोपलासे गगनीं चंद्र आणि सूर्य । कांपतसें इंद्र थरथरां ॥२॥
ऐसें नरहरीरुप प्रगटलें । दैत्यासी मारलें मांडीवरी ॥३॥
तुका ह्मणे भक्तांकारणें श्रीहरी । बहु दुराचारी निर्दाळिले ॥४॥

॥७९६६॥
प्रल्हादाकारणें नरहरी झालासी । त्याचीया बोलासी सत्य केलें ॥१॥
विठ्ठल माधव मुकुंद केशव । तेणें दैत्यराव भीत मनीं ॥२॥
राम कृष्ण विष्णु मारियेली हांक । तेणें पडे धाक बळीयासी ॥३॥
तुका ह्मणे तयाकारणें सगुण । भक्तांचें वचन पाळावया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP