मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

सुदाम चरित्र

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८१८९॥
ऐका हो तुह्मी भावीक हो जन । दासा नारायण सांभाळितो ॥१॥
सुदामा ब्राह्मण संसारीं कष्टला । स्मरुं तो लागला कृष्णजीला ॥२॥
तयेवेळीं कांता पुसे सुदाम्यासीं । स्मरतां कोणासी वेळोवेळीं ॥३॥
तयाचा वृत्तांत ऐका सविस्तर । जोडीतसे कर तुका ह्मणे ॥४॥

॥८१९०॥
संसारी असतां बहु दु:खी झाला । मग तो स्मरला तुज देवा ॥१॥
स्त्रियेपाशीं सांगे ऐक वो सुंदरे । मित्र माझा खरा कृष्णनाथ ॥२॥
तयाचे दर्शना जाईन मी आतां । आह्मासी सर्वथा चिंता नाहीं ॥३॥
तयेवेळीं कांता ह्मणे सुदाम्यासीं । मित्र हृषीकेशी तुह्मां ऐसा ॥४॥
तरी कां आह्मासी ऐशी झाली परी । उपवास घरीं पडताती ॥५॥
येरु ह्मणे आतां जावें त्याचे भेटी । मग जगजेठी उपेक्षीना ॥६॥
कांहीं तरी देई सत्वर मजसी । तयाचे भेटीसी न्यावयाला ॥७॥
तुका ह्मणे तुह्मा ठाउका वृत्तांत । काय घराआंत आहे ऐसें ॥८॥

॥८१९१॥
स्त्रियेलागीं ह्मणे मित्र माझा हरी । त्याचा तों अंतरीं आवडीनें ॥१॥
येरी ह्मणे त्याचे जावें आतां भेटी । बहुत हिंपुटी झालों आह्मीं ॥२॥
तीन मुष्टी पोहे आणिले उसनें । पतीकरीं तीनें दिधले शीघ्र ॥३॥
तुका ह्मणे आतां ब्राह्मण चालिला । आनंद तो झाला समर्थासी ॥४॥

॥८१९२॥
वाटेसीं चालता प्रश्न झाला चांग । ह्मणे पांडुरंग तुष्टला हो ॥१॥
ऐसा तो पावला द्वारके चालला । आल्हाद तो झाला ब्राह्मणासीं ॥२॥
येरु ह्मणे सांगों गेले द्वारपाळ । सांगती सकळ वृत्तांतातें ॥४॥

॥८१९३॥
श्रीकृष्णनाथा सांगितली मात । आला हो अतीत द्विज एक ॥१॥
सांगतसे नाम आपुलें सुदामा । काय आज्ञा आम्हा करीतसां ॥२॥
श्रवणीं पडतां तयाचें वचन । गेले नारायण धांवोनियां ॥३॥
तुका म्हणे हरी प्रीतीनें भेटला । घेऊनीयां आला राऊळासी ॥४॥

॥८१९४॥
सुदाम्यासी देव प्रीतीनें पुसती । तुझी गृहस्थिति काय आहे ॥१॥
येरु ह्मणे लाज वाटतसे मला । गृहीं बाळकांला भुक्ति नाहीं ॥२॥
वहिनीनें आम्हां काय पाठविलें । द्यावें तें वहिलें सत्वरची ॥३॥
तीन मुष्टी पोहे आणुनीयां दिल्हे । आनंदे भक्षिले देवरायें ॥४॥
तुका म्हणे देव भक्तांचा बांधला । आवडी विठ्ठला भावरुची ॥५॥

॥८१९५॥
आनंदें करुनि सुदामा पूजिला । दिलीं वस्त्रें त्याला आदरेसीं ॥१॥
अलंकार त्याला केले परिपूर्ण । सर्व समाधान ब्राम्हणासी ॥२॥
विश्वकर्मा पाचारुनि आणीयेला । नगरी सुदाम्याला सिद्ध करी ॥३॥
दुसरी द्वारका देवें रचियेली । तुका म्हणे केली मात तेणें ॥४॥

॥८१९६॥
मागील आठव झाला सुदाम्यासीं । आज्ञा हृषीकेशी द्यावी मज ॥१॥
ते वेळे ती माव केली नारायणें । सुदाम्यासी म्हणे ऐका एक ॥२॥
वाटे तस्करांचा उपद्रव फार । वस्त्रें अलंकार ठेवी येथें ॥३॥
तुका म्हणे द्विजें ठेवीयेलीं वस्त्रें बहुत गहिवरें चालिला तो ॥४॥

॥८१९७॥
सुदामा ब्राम्हण वाटेसी चालतां । करीतसे चिंता वेळोवेळीं ॥१॥
जाऊनीयां काय सांगूं स्त्रियेपाशीं । आतां असो ऐसी बरोबरी ॥२॥
कृष्ण हा चोरटा शिंदळ ठाईचा । ठाऊक पूर्वीचा मज आहे ॥३॥
तुका म्हणे कष्टें द्विज तो चालिला । पुढें हा देखीला ग्राम थोर ॥४॥

॥८१९८॥
वाटेसी तो पुसे पुढें कोण ग्राम । काय याचें नाम ऐसें सांगा ॥१॥
येरु म्हणे तुझें काज नाम असे । लोक सुदामा ऐसें म्हणताती ॥२॥
वाट मी चुकलों न कळेची वाट । द्वारकेची भेट दिसतसे ॥३॥
तेणें ओळखूनी आपलाची स्वामी । नेला निजधामीं धरुनियां ॥४॥
तुका म्हणे स्वामी कृपेचा सागर । न कळेची पार ब्रम्हादिकां ॥५॥

॥८१९९॥
सकळही जन करिती आरती । भावें ओंवाळीती सुदाम्यासी ॥१॥
ते वेळीं सुदामा झाला तो विस्मित । व्यर्थ कृष्णनाथ निंदिला म्यां ॥२॥
कृपावंता तुझी न कळेचि माव । अल्प माझा भाव तुझे ठायीं ॥३॥
कृपेचा सागर तूंचि नारायण । तुका ह्मणे जान भाविकांचा ॥४॥

॥८२००॥
न कळेचि घर झाला असे भ्रांत । वैभव अद्भुत देखोनियां ॥१॥
कांता आली भेटे श्रृंगार करुनि । मानुनी भवानी पायां लागे ॥२॥
झांकियेले नेत्र न बोलेचि कांहीं । हालवूनि बाही जागें करी ॥३॥
गेला तो येथूनि भेटला जगजेठी । तेणें कृपादृष्टी पाहियेलें ॥४॥
तुका म्हणे दिला सुवर्णाचा गांव । उच्चारितां नांव गोविंदाचें ॥५॥

॥८२०१॥
आठवा येतांचि झालासे सावध । नाटकी गोविंद बहु असे ॥१॥
न कळतां तुज निंदिलें म्यां देवा । अन्याय करावा क्षमा माझा ॥२॥
अपराध अनंता किती सांगूं माझा । वाटतसे लाज निंदिल्याची ॥३॥
तुका म्हणे कृष्णकृपेचा सागर । रखुमादेवीवर पांडुरंग ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP