मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

पदें - ८२६१ ते ८२७१

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८२६१॥
जागारे जागल्या भाई । शेत पिकले नवखंड रोही ॥
पाहाट झाली तूं निजलासी कांहीं ॥ध्रु०॥
माळा रोऊनी मेडी चारी । कान्होअ टगाळ क्रीडा करी ॥
मज धाडोनी पैल थडी ॥१॥ जा०॥
चारी कोनीं दाही दीशा । शेत पिकलें आलें ब्रह्मरसा ॥
काळ मोडील तूं निजलास कसा ॥ जागारे०॥२॥
तुका ह्मणे अह्मी जागलों । एका सद्गुरु शरण गेलों ॥
जन्मोजन्मीचें दु:खविसरलों । जागारे जागल्या धाई ॥३॥

॥८२६२॥
गुरु बोलिला साचार । मूळ विस्तार ॥ध्रु०॥
गुरु बोलतसे ही खुण । अकराची महिमा जाण ॥
मूळ विस्तार कंठती नयन । अवघा अपार ॥
गुरु बोलिला० ॥१॥
मुळीं ध्वनी अंबरीं झाली । ब्रह्मा ह्मणोनि हाक झाली ॥
ब्रह्मा असतां हो नंदनी । निशब्दीं उठला शब्द ।
अवघा आकार ॥ गुरु बोलिला साचार ॥२॥
ध्वनी माथां सिद्ध असतां । वेद शास्त्रें हो गर्जतां ॥
येवढें ब्रह्मांड रचितां । मूळ विस्तार । गुरु बोलिला साचार ॥३॥
नाम जिचें मूळ प्रलती । आदि पुरुषाची हो शक्ती ॥
तिनें सेजे निजउनी पती । मांडिला आकार । गुरु बोलिला साचार ॥४॥
येवढें ब्रह्मांड गोळा केलें । पतीस कळों नाहीं दिलें ॥
देवते भिउनी गेले । ही नसती कंवटाळीण । कोण आकार ॥ गुरु बोलिला०॥५॥
ब्रह्मा विष्णु उमाकांत । हीं बाळें तिचे आज्ञेंत ॥ नेत्र उघडुनी निश्चित ।
तनु दिसे स्वरुप आकार ॥ गुरु बोलिला साचार ॥६॥
ब्रह्म सुखाच्या समुद्रांत । बुडाले जीव समस्त ॥ तिला मूळपीठ म्हणत ।
आइका उभर ॥ गुरु बोलिला० ॥७॥
हिनें चैतन्य झांकिलें । अरुप रुपासी आणिलें ॥
अनंत ब्रह्मांडीचें पुतळे । नाचवी पहारे ॥ गुरु बोलिला साचार ॥८॥
निर्गुणासी गुण लाविले । निराकार आकारलें ॥
अनंतासी नाम ठेविलें । जिवित्वासी लाविलें पार ॥ गुरु बोलिला०॥९॥
मायबाप नसतां ती जन्मली । पतीस न कळतां गरोदर झाली ॥
हें ब्रह्मांड रचिलें नाना विकारी । पहा आकार ॥ गुरु बोलिला०॥१०॥
असो ऐशी ती आदि शक्ति । ती विच्छाया धरिली चित्तीं ॥
तिसी कुणबी न ह्मणती । पहा दुरवर ॥ गुरु बोलिला साचार ॥११॥
तुका ह्मणे सावधान । परिसा मायेचें कारण ॥
सप्त पाताळ मायेनें ग्रासीलें पहारे । गुरु बोलिला साचार ॥१२॥

॥८२६३॥
गस्त आली जागा लोकांनो । पडली संसारभ्रांती ॥ध्रु०॥
निजल्याची निज गेली । व्यर्थ जागोनी कायरे ॥
गुरुवांचोनि प्राणी जन्मला । त्याची जन्मली मायरे ॥१॥
काळें रोगें शिडी लाविली । लाविली ब्रम्हांडपुरीं ॥
हा काळ सर्वाला लागला । कांहीं उरुं नेदी उरी ॥२॥
गस्त करी चार सहा । अठरा हाका जो मारी ॥
अनुहात तुतारी । वेद डफ हा हातीं ॥३॥
गीता सांगे सद्गुरु । अर्थ शोधुनी पाहेरे ॥
तुका म्हणे सत्य सत्व । सत्य होऊनी राहेरे ॥४॥

॥८२६४॥
ज्याचें सुख्य त्याला सुख त्याला काय असे भलत्याला ॥ध्रु०॥
एक जेऊनी तृप्त झाला । एक हाका मारी अन्नाला ॥ ज्याचें॥१॥
एक नदी उतरुनि गेला । एक हाका मारी तारुला ॥ ज्याचें सु०॥
एक मोक्षमार्गी गेला । एक अधोगती चालिला ॥ ज्याचे सु०॥३॥
तुका वैकुंठासी गेला । हाका मारीतो लोकांला ॥ ज्याचें सु०॥४॥

॥८२६५॥
नादाबिंबाच्या पडल्या गांठी । तंव त्या भुतानें मारिली मिठी ॥१॥
भूत जबर मोठेंग बाई । झाली झडपण करुं गत कायीं ॥ध्रु०॥
भूत जडले जाईना अंगा । आतां कसी गत करुं मला सांगा ॥२॥
निंबु नारळ कोंबडा उतारा । तंव त्या भूतानें धरिला थारा ॥३॥
शेळी बोकड द्या भुताला । भुत जाईना देवऋषीला ॥४॥
आले पंचाक्षरी केली भालदोरी । तंव त्या भुतानें धरिलें थारीं ॥५॥
जाणाई जाती खंडोबा आला । भुत जाईना त्याच्या बाला ॥६॥
सुपचाटूचे केले देवऋषी । तंव त्या भुतानें धरिलेझ्खं केशी ॥७॥
भुत जडलें पुंडलिकाला । पुन्हा जन्म नाहीं दासाला ॥८॥
भुत चतुर्भुज पितांबरधारी । त्यानें मनुष्यपण नेलें वारीं ॥९॥
भूत झडपी साधुसंत । तुका म्हणे पंढरीनाथ ॥१०॥
तें भुत उभें भिवरेतटीं । साधूसंतांसी देतें भेटी ॥ भुत जबर०॥११॥

॥८२६६॥
एका घायीं खेळतां न सांपडेची । डायी दो घाल्या न तगसील भाई रे ॥
त्रिगुणाची फेरी थोर कष्टी होशील । या चौघांची तरी धरी सोयीरे ॥१॥
खेळ खेळुनी निराळा राही । सांडे या विषयाची घायी रे ॥
तेणेंच खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाण माझे भाई रे ॥ध्रु०॥
सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । त्यानें विठ्ठल बसवंत केला रे ॥
आपुल्या सवंगडया शिकउनी घाई । त्यानें संतत फड जागविला रे ॥खेळ०॥२॥
ज्ञानदेव मुक्ताई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे ॥
कान्हो गोवारी तेणें बसवंत केला । आपणा भोंवती नाचती रे ॥
सकळ ही मिळोनिया एकचि घाई । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायीं रे ॥खेळ०॥३॥
राम बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे ॥
पांचा संवगडया एकचि घायी । तेथें नाद बरवा उठला रे ॥
ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं तो हरि खेळिया निवडिला रे ॥खेळ०॥४॥
ब्राह्मणाचा पोर एक एका भला । त्यानें जन खेळकर केले रे ॥
जनार्दन बसवंत करोनी त्यानें वैष्णवांचा मेळा मेळविला रे ।
एक धाई खेळतां आपणचि बसवंत जाला रे ॥खेळ०॥५॥
आणिक ही खेळिये होउनी गेले । वर्णाया वाचा मज नाहीं रे ॥
तुका ह्मणे गडिया हो हुशार खेळा । पुढिलांची धरुनी सोई रे ॥
एका घायीं खेळतां जो चुकेल । पडेल चौर्‍यांशीचे डायीरें ॥खेळ०॥६॥

॥८२६७॥
खेळ फुगडी फुगडी । नको जाऊं तूं रडी ॥खे०॥ध्रु०॥
फुगडी खेळग तूं पिंगा । आलिस माझ्या संगा ॥
फुगडी खेळरे श्रीरंगा । सोडुन धांगडधिंगा ॥खेळगफु०॥१॥
फुगडी खेळगे फेराची । हो बाईल दिराची ॥
लज्जा सोडगे मनाची । गांवच्या लोकांची॥खे०॥२॥
फुगडी खेळ गे लखोटा । धर माझा आंगोठा ॥
बळकट घालगे कांसोटा । सोडुन च्यारी वाटा॥खे०॥३॥
फुगडी खेळगे शिवशक्ती । हरी नामाची भक्ती ॥
तुकया स्वानंद गर्जती । पदोपदींच्या कीर्ति ॥खेळग फु०॥४॥

॥८२६८॥
याणें माझी लपविली पिंवळी गोटी । उलटा भोंवर्‍याची चोरी लावी पाठी ॥
बाई कंचुकीची सोडोनियां गांठी । हृदय सखोल एकांतीं घाली मिठी ॥१॥
पहा पहा सांवळा कैसा धीट । बोलूं नये ते बोलतो उद्धट ॥
याच्या बोलण्याचा कोणा नये वीट । याच्यावरुनी देह ओवाळूं चतुष्ट ॥पहा पहा ॥ध्रु०॥
अवचित माझ्या डोळ्यांत गेलें कणू । फुंकून काढितां वाटलें समाधानु ॥
शहाणा कानडा तुझा गे नारायणू । चुंबन देतां हरपलें देहभानू ॥ पहा पहा०॥२॥
नवनीत पाहुनी लावितो लाडीगोडी । राधिका पाहुनी राजस डोळे मोडी ॥
आगमनिगमा नकळे त्याची खोडी । स्वामी तुकया शरण हात जोडी ॥ पहा पहा सांवळा ॥३॥

॥८२६९॥
तुझे अंगींचा उतारा । बाबा बाळ संतोष ॥  
तो मज देईगा दातारा ॥ बाबा० ॥
पुन्हा नयें मी संसारा ॥ बाबा० ॥१॥
तुझ्या मस्तकीं टोप ॥ बाबा०॥
देतां होईल प्रताप ॥बाबा०॥
विलया जाईल महा पाप ॥बाबा०॥२॥
शालू पिंताबर सकलाद ॥बाबा०॥
आलो मागता बाबा० ॥३॥

॥८२७०॥
प्रसूत झाली बाळा । वाजवा ह्मणती थाळा ॥ध्रु०॥
दुध पाजुनी केला थोर । निघाला शिंदळ चाहाड खोर ॥
राजद्वारीं पायीं दोर । दरवडाखोर दिवसाचा ॥१॥
घरीं उपास करी माय । परनारीसी द्रव्य खाय ॥
भांग पिउनी डुलत जाय । झुलपें सोडी मोकळीं ॥२॥
ऐसे बिसणीचे ढंग । परनारीसी करी संग ॥
कोटी पूजा होती भंग । पदोपदीं ब्रह्महत्या ॥३॥
त्याचे पूर्वजांची माळ । नरकीं नेऊनी टाकी काळ ॥
उदरीं जन्मला चांडाळ । काय पाड तयाचा ॥४॥
पाउनी नरदेह निधान । करीं विठोबाचें ध्यान ॥
तुका ह्मणे समाधान । तरीच आलों संसारा ॥५॥

॥८२७१॥
मस्करी ज्याची त्याला । येईल कामला ॥मस्क०॥ध्रु०॥
ऐक मात नारदाची । मस्करी केली कृष्णाची ॥
गवळण मागितली तयाची । बायको झाला ॥मस्करी०॥१॥
मस्करी केली रावणानें । राज्य गमाविलें त्यानें ॥
भस्मासुर कीं मस्करीनें । भस्म झाला ॥ मस्करीं०॥२॥
ऐसा मस्करीचा संग । महादेवाचें गळलें लिंग ॥
कीचक द्रौपदीचे संगें । कुळासहित गेला ॥मस्करी०॥
ऐसी मस्करी आहे थोर । सदाशिव पाडी वैर ॥
तुका विनवी जोडुनी कर । कीं मस्करीला ॥मस्करी०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP