मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

कालयवनवध

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८१३७॥
मथुरेमाझारी श्रीकृष्ण असतां । पाळी निज भक्तां दुष्टां दंडी ॥१॥
मातलासे शाल्व जरासंध बळी । आरंभिली कळी हरीसवें ॥२॥
मेळविलें सैन्य दुष्ट दानवांनीं । तेविसाक्षौहिणी गणितेचें ॥३॥
जिंकीं ह्मणे देवा पातला युद्धासी । देव यादवेंसी युद्ध केलें ॥४॥
बळिराम कृष्ण बळी शिरोमणी । पराभविला त्यानीं सत्रा वेळ ॥५॥
नाटोपेची कृष्ण विचारी मानसीं । काळयौवनासी साह्य केलें ॥६॥
मागुती सैन्यासी जरासंध आला । अंतरीं देवाला कळे सारें ॥७॥
नाटकी हा हरी बंधूसी विचारी । मथुरा हे पुरी न उरेचि ॥८॥
वरदानबळें मातला दुर्जन । दुर्बुद्धी यौवन काळ आला ॥९॥
लाघवी हा देव न कळेचि माव । सिंधुमाजी गांव निर्मियले ॥१०॥
एका रात्रीमाजी सागराभीतरीं । रचियली पुरी सुवर्णाची ॥११॥
न कळतां लोकां नेलें रात्रीं एका । जीव मात्र होकां जगज्जना ॥१२॥
तुका ह्मणे मागें राहियले दोघे । पुढिल प्रसंग जाणोनीयां ॥१३॥

॥८१३८॥
विंदान कृष्णाचें न कळेचि कोणा । नाटकी हा कान्हा बहुरुपी ॥१॥
पातलिया दुष्ट पाहती दानव । न देखती जीवमात्र कोणी ॥२॥
तये काळीं दुष्टा नवल वाटलें । विस्मित देखिलें रामकृष्णा ॥३॥
अवचिता देखे काळ तो यौवन । नाहीं त्या मरण कोणा हातीं ॥४॥
तुका ह्मणे ऋषीवरदानें बळी । कृष्णासम फळी मांडूं आला ॥५॥

॥८१३९॥
नाहीं त्या मरणें कळों आलें देवा । आरंभिल्या मावा तयेवेळीं ॥१॥
बळिराम ह्मणे नाटोपेची दैत्य । वराच्या निमित्यें बळ अंगीं ॥
आतां एक करा येथुनियां झुरा । पुढिल विचारा पाहों कैसे ॥३॥
पळतां देखिलें काळरुपी दुष्टें । पाठी लागे नष्ट नाटोपती ॥४॥
तुका म्हणे वेदां नेणवे लाघव । तेथें हा दानव काय जाणे ॥५॥

॥८१४०॥
भरलासे हांवा लागलासे पाठीं । धरुं जगजेठी धांवतसे ॥१॥
जवळीच दिसे हाताचें अंतर । धरुं धांवे त्वरें न सांपडे ॥२॥
न सांपडे कधीं यम वायु इंद्रा । रवि आणि चंद्रा ब्रम्हादिकां ॥३॥
न सांपडें वेदां श्रुति स्मृति देवा । मुख्य सदाशिवा न सांपडे ॥४॥
तुका म्हणे एका भक्तिभावाविण । नये नारायण अनुमाना ॥५॥

॥८१४१॥
ब्रिद नारायणा काशी अवंतिका । गया हे द्वारका पुष्करादि ॥१॥
हिंडविला तीर्थे नाना परा क्षेत्रें । दैव तें विचित्रें पुण्य भूमी ॥२॥
गंगा तापी कृष्णा त्रिवेणी यमुना । भोगावती नाना तीर्थ राशी ॥३॥
हेमाद्री सह्याद्री हिमाद्री अरुण । त्र्यंबक गोकर्ण व्यंकटाद्री ॥४॥
तुका ह्मणे ऐसा हिंडतां भागला । पाठीसी लागला न सोडी तो ॥५॥

॥८१४२॥
झाला कासावीस बाण लागतांची । गति प्रारब्धाची चुकेना ती ॥१॥
चुकेना ती रेखा क्रियमाण जाण । कृष्णाचिये प्राण घेत बाण ॥२॥
बाणें पश्चात्ताप अर्जुनाचे मनीं ॥ शस्त्र चक्रपाणी धरी न मी ॥३॥
तुका ह्मणे धरुं ऐशियाचा संग ॥ तारुं पांडुरंग उभा असे ॥४॥

॥८१४३॥
पूर्वी मुचकुंद देवां साह्य झाला । युद्धासी दैत्याला पराभवे ॥१॥
अहोरात्र त्यासीं करीतां समर । भागला अपार निद्रा आली ॥२॥
जाउनी वैकुंठा मागीतला वर । उठवी पामर मरे तेथें ॥३॥
निद्रा सरे माझी तुझी भेट व्हावी । ऐसी भाक द्यावी मजलागें ॥४॥
तुका ह्मणे त्यासी दिल्हें नारायणें । तेथें झालें येणें गोविंदाचें ॥५॥

॥८१४४॥
पाठीसी लागला न सोडी राक्षस ॥ विवरीं प्रवेश केला देवें ॥१॥
झांकियला दिव्य पीतांबर त्यासी । आपण अदृश्य राहे तेथें ॥२॥
धांवोनियां क्रोधें मारिलें लाथेनें । सप्त द्विपें तेणें दणाणिलीं ॥३॥
दर्पे मुचकुंद पाहे क्रोध रुपीं । भस्म झाला पापी तये झणीं ॥४॥
तुका ह्मणे ज्याचें कुडें तया पुढें । त्याचे तया चाड तेणें न्याय ॥५॥

॥८१४५॥
नवल वाटलें मुचकुंदा चित्तीं । स्वप्न कीं सुषुप्ती देखियलें ॥१॥
साच किंवा खरें मिथ्या नव्हे वर । दिधला श्रीधरें मजलागीं ॥२॥
अनंत भानूंचा भरला प्रकाश । देखतां आवेशें उठला तो ॥३॥
घाली लोटांगण मिठी दिली पायीं । आलिंगिला बाहीं कृपासिंधु ॥४॥
तुका ह्मणे देव भक्तां भेटे भावें । सुख अभिनव काय सांगूं ॥५॥

॥८१४६॥
पायापाशीं राखे भक्त । दुर्जनासी संहारित ॥१॥
भक्त आवडती देवा । परता न करीच जीवा ॥२॥
दासा रक्षी नारायण । मारी राक्षस दुर्जन ॥३॥
अंकीतासि अपंगिता । दैत्य दानवांचा हंता ॥४॥
पतीतासी तारी । दुष्ट मारी दुराचारी ॥५॥
तुका म्हणे याला । माया दासांची विठ्ठला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP