TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

भानुदास चरित्र

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


भानुदास चरित्र
॥८१७५॥
विद्यानगरांत असे नृपनाथ । नाम हें विख्यात रामराजा ॥१॥
वैष्णवांची पूजा करी हरीभक्त । असे शरणांगत हरीदासां ॥२॥
ब्रह्मांडनायक भक्ती आराधिला । दर्शन तयाला दिल्हें देवें ॥३॥
भक्तांचा कैवारी दिनाचा वत्सल । मारग प्रांजळ दावी आतां ॥४॥
रामरायें प्रभूभावें भक्ति केली । विठोबानें दिल्ही भाक तया ॥५॥
म्हणे रामराजा पंढरीच्या देवा । येई माझ्या गांवा आनेंगोंदी ॥६॥
एके दिशीं मज आनेंगोंडीं न्यावें । वाक्य सांभाळावें प्रत्यक्ष हें ॥७॥
माज्या हरीभक्तां जरी छळी कोणी । प्रत्यक्ष तेथूनी येतो मागें ॥८॥
कबुल करुनी पंढरीस आला । डांग तो ठेविला राजयानें ॥९॥
देव ह्मणे रखुमाई एथें असा । कानडयानें फांसा केला मज ॥१०॥
रखुमाईपती भावें उचलीला । आनेंगोंदी नेला भक्तिबळें ॥११॥
आषाढीचा पोहा पंढरीस आला । ह्मणे देव नेला राजयानें ॥१२॥
पताकांचे भार वैष्णव नाचती । लोटांगण घेती महाद्वारीं ॥१३॥
राउळाचा रंग सर्व शोभा गेली । विठोबा माउली नाहीं आंत ॥१४॥
ह्मणे वारकरी मोकलिले हरी । कोणासी मुरारी भेटूं आतां ॥१५॥
आतां आह्मी भेटूं कोणासी देवा । वारकरी धांवा करिताती ॥१६॥
विठोबाचे दास सप्रेम बोलती । रुक्मिणीच्या पती मोकलिलें ॥१७॥
क्षेत्र प्रतिष्ठानीं होते भानुदास । आले पंढरीस वाळवंटीं ॥१८॥
ह्मणे लोकपाळ ऐसा नाहीं भक्त । आणी लोकनाथ आवडीनें ॥१९॥
ऐसा नाहीं कोणी भक्त पराक्रमी । रुक्मिणीचा स्वामी आणी येथें ॥२०॥
तया पोहियासी भानुदास ह्मणे । देव मी आणीन पंढरीचा ॥२१॥
तुह्मी चिंतातुर नको होऊं जीवा । भेटवीन देवा सकळांसी ॥२२॥
विठोबाची आण पाहोनी चालिला । भानुदास गेला आनेंगोंदा ॥२३॥
सात दारवंटी असती राउअळा । कुलुपें अगळा किल्या कोंडया ॥२४॥
लावितां ना हात कुलुपें निघालीं । विठोबा देखिली मूर्ति त्यानें ॥२५॥
भानुदास ह्मणे भली देवराया । लेंकराची माया सांडियेली ॥२६॥
भलारे विठोबा पळुनी आलासी । पोटिच्या पोरांसी कोण पोसी ॥२७॥
कानीं कुंडलिया रत्नें माळा कंठी । भक्ति जगजेठी देखोनियां ॥२८॥
काय देवा तुला दुष्काळ पडिला । न मिळे खायाला पंढरिसी ॥२९॥
आपुल्या पोटाची तुह्मी केली सोय । आह्मां गती काय मायबापा ॥३०॥
हत्ती घोडे धन महाल संपदा । पाहुनी गोविंदा भुललासी ॥३१॥
देखे भानुदास गळयासी भोंवला । कंठही दाटला पांडुरंगें ॥३२॥
ऐक भानुदासा सख्या सहोदरा । नेत्रीं अश्रुधारा चालियल्या ॥३३॥
माझ्या भानुदासा बंदीं मी पडलों । भिमा अंतरलों चंद्रभागा ॥३४॥
सत्यभामा राही रुक्मिणी राहिली । भीमा अंतरली पुंडलिक ॥३५॥
नाहीं गरुडपार नामाची पायरी । नाहीं तो सामोरी हनुमंत ॥३६॥
पाहे भोवताले नाहीं माझें कोणी । न देखे नयनीं हरीभक्त ॥३७॥
दिंडिया पताका टकियाचे भार । मज भीमातीर अंतरलें ॥३८॥
तुम्हाविण मज नाहीं भानुदासा । तुमचीच आशा करितसें ॥३९॥
कानडया राजानें वचनीं गोंविलें । चालोनी आणिलें करुं काय ॥४०॥
सद्गदित कंठ देवासी दाटला । कोंडमार केला येणें माझा ॥४१॥
करितां हा पूजा मज वाटे विख । देखोनियां सुख मज झालें ॥४२॥
भानुदास ह्मणे चला हो पंढरी । तुह्मासाठीं सारी यात्रा आली ॥४३॥
बळकट वेडी भक्तिची घातली । भाक सांभाळीली पाहिजे ती ॥४४॥
मोतियांचा हार कंठींचा काढिला । भानुदासा दिल्हा पांडुरंगें ॥४५॥
नगरा बाहेर धरा मौन मुद्रा । मारितां शरीरा बोलूं नका ॥४६॥
निघे भानुदास कवाडें लागलीं । सुर्योदय झाला तये वेळीं ॥४७॥
तये वेळीं आला प्रभु रामराजा । करावया पूजा विठोबाची ॥४८॥
कपाट झोंबोनी विठोबाला पाही । तंव हार नाहीं गळ्यामध्यें ॥४९॥
माझ्या विठोबाचा हार कोणी नेला । माराया हेर रायापाशीं ॥५१॥
करितो हो पूजा आहे तो ब्राम्हण । धरोनियां मौन हातीं माळ ॥५२॥
तेव्हां नृपनाथ बोले सेवकांसी । बांधोनियां त्यासी येथें आणा ॥५३॥
दूतीं भानुदास धरुनी बांधिला । रायापें आणिला आज्ञाधारी ॥५४॥
रामराजा प्रभू म्हणे तये वेळीं । मइंदासी सुळीं त्वरें द्यावा ॥५५॥
खांद्यावरी सूळ देतां चालविला । चिंतन विठ्ठला करीतसे ॥५६॥
शरीराचा लोभ न धरावा मनीं । आम्ही शूर रणीं हरीभक्त ॥५७॥
भानुदास ह्मणे शरीर देवाचें । ठेंगणें जयाचें जाईल हें ॥५८॥
आनंदाचें कुंकू लाउनीयां भाळीं । भक्ति गळसरी बळकट ॥५९॥
प्राक्तनाचा भोग सुख तें होईना । तुज नारायणा न सोडीं मी ॥६०॥
दूतीं भानुदास सुळावरी दिल्हा । तेव्हां वृक्ष झाला तात्कालिक ॥६१॥
पुष्प पानें शाखा वृक्षाला दिसती । रुक्मिणीचा पती दिनानाथ ॥६२॥
कळिकाळा भय नाम ब्रिदावळी । विठोबा सांभाळी भानुदासा ॥६३॥
सकळ झाला तरु आलीं पुष्प पानें । सांगती गार्‍हाणें रायापाशीं ॥६४॥
चिंतातूर झाला ह्मणे त्यासी आणा । काय त्या प्राक्तना ओढवलें ॥६५॥
सोडा भानुदासा लागती चरणीं । आणियला मुनीं राजद्वारीं ॥६६॥
निरभिमानानें रायालागीं हांसे । संत भानुदास महाराज ॥६७॥
रामराजा प्रभू ह्मणे त्राही त्राही । लोटांगण पायीं घालीतसे ॥६८॥
क्षमा अपराध करा जी समर्था । चरणीं मी माथा ठेवियला ॥६९॥
हात धरी राजा आणिला राउळीं । मग वनमाळी बोलियले ॥७०॥
न साहे हा क्रोध भक्तांचा कोंवसा । ह्मणे भानुदासा चाल आतां ॥७१॥
देव ह्मणे राजा तुझी माझी भाक । येथूनी प्रत्यक्ष उगवला ॥७२॥
तेव्हां नृपनाथें धरिले चरण । ह्मणे नारायणा न राहें मी ॥७३॥
विठोबाचे दास सुळासी घालावे । पाषाण पुजावे धर्म कोण ॥७४॥
भक्त भानुदास माझेंचि शरीर । दासांचा मी भार वाहतसें ॥७५॥
भगवतभक्तांचें ऐसें नव्हे चिन । भूतीं नारायण जाणताती ॥७६॥
मोतियांचा हार तुझा सांपडला । तरी कां घातला सुळावरी ॥७७॥
निरोप घेऊनी बाहेरी निघाले । कृपाळू विठ्ठल मायबाप ॥७८॥
बैसे खांद्यावरी ह्मणे भानुदास । नारायण हांसे नेसी कैसा ॥७९॥
प्रेमें भानुदास आलिंगिला पोटीं । तुझिया संपुटीं बैसतों मी ॥८०॥
ब्रह्मांडनायकें संपुटीं राहावें । भानुदास भावें करी काय ॥८१॥
विश्वाचा पाळक संपुटा घातला । भानुदास आला पंढरिसी ॥८२॥
आणी भानुदास रखुमाईवर । झाला जयजयकार चंद्रभागे ॥८३॥
धन्य भानुदासा धन्य तुझी भक्ति । तिहीं कीर्ति भर्तखंडीं ॥८४॥
विठोबा माझा अंगज्वरो नेणे कायी । केला तैसा होई भाव नेणें ॥८५॥
विठोबानें नाहीं कांहीं एक केलें । चिंतावीं पाउलें तुका म्हणे ॥८६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-07-18T21:38:16.7900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वतारी

 • ओतारी , ओतीव पहा . 
 • vatala, vatārī, vatīṃva, vatīṃva thālīpīṭha See ओतल, ओतारी &c. 
RANDOM WORD

Did you know?

84 लक्ष योनी आहेत काय? त्या कोणत्या?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,689
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,801
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.