॥पटळ॥ १०६

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


॥श्रीरामसमर्थ॥

॥पद॥ (राग कल्याण॥) रे राघवा देई तुझें भजन । रे० ॥धृ॥ अनुतापें त्याग वरी भक्तीयोग । मानिती हे सज्जन ॥१॥
कीर्तन करावें नाम उत्धरावें । अंतरीं लागों ध्यान ॥२॥
दास ह्मणे मन आत्मनिवेदन । सगुण समाधान ॥३॥

॥वोवी॥ जयजया जी श्रीसीतापती । जयजया जी सुदिव्यकीर्ती । मुक्तिप्रदाता देता सद्गती । सगुणनिर्गुणा पूर्णकामा ॥१॥
भक्तभवभंगा भ्रमतमहारका । भेदभयहंता सौख्यकारका । वानिता नाकळसी वेदादिका । नगजावरसखा दीनबंधु ॥२॥
अनंतकोटिब्रह्मांडनायका । मायेसि नियंता जगद्वापका । परमपुरुषा अद्वय अलेखा । सर्वसाक्षी परब्रह्मा ॥३॥

॥पद॥ रामा रघुवीरा दयाळा जय दीनबंधु । दाता भुवनत्रयपाळा जय दयासिंधु ॥धृ०॥ सुरवरदा भक्तकैवारी अनाथनाथा । परतरपरमात्मा समर्था अद्वय अनंता ॥१॥
ब्रह्मादिवंद्या सगुणा रे । दिव्य स्वरुपा । नाहीं अंत ना पार रे होसी सोपा ॥२॥
आत्मा अविनाशा देवा रे प्रसन्न होई । वोपी तव भजनठेवा रे । निववीं निजछाई ॥३॥

॥वोवी॥ तव भजनाचें इछुनी वैभव । आराधिती कीं महानुभाव । न लक्षूनि नाना साधनोपाव । भजनानंदीं विसावले ॥४॥
भजनें चि देवा कैवल्यनिधान । शिवादिकाचें हृदयभूषण । हें चि त्रिसत्य मम जीवन । साध्यसाधन हेंचि माझें ॥५॥
भजनें चि होय भवभयभंजन । भजनें चि होय मुनिजनरंजन । भजनें चि निजगुज ज्ञानांजन । वसे निरंजन भजनांत ॥६॥

॥पद॥ मज पाहिजे तारक भजन जें ॥धृ०॥ हें सौख्य लाहिजे मनासि बाहिजे । हा चि अध्यासीं राहिजे ॥१॥
हें ची ज्ञान ध्यान पूर्ण समाधान । सप्रेमें गाइजे ॥२॥
धन्य होताति येणें जनीं पाविजे मान्य । स्वयें पावन होइजे ॥३॥
आत्मा जो व्यापक भजनें गवसे अस्क ॥ तेणें बहुता तारिजे ॥४॥

॥वोवी॥ आवडत तें देसी दयाळा । त्यावरी शोभवी पूर्णत्व सोहळा । जेणें हित साधे भक्तजनाला । पूर्ण काम हो ठाकिजे ॥७॥
भजनावरील भूषणभाग्य । अनुतापें घडावा अयोग्यत्याग । त्यावरी वैराग्य सद्भक्तियोग । निवावेझं सज्जन जें देखतां ॥८॥
यावरी शोभा हे दयानिधी । कीर्तन करावें निष्कामबुत्धी । नामें चि फळावे स्वरुपसित्धी । अंतरींध्यान लागावें ॥९॥
मन व्हावें आत्मनिवेदन । यावरी सगुण समाधान । होउनि निरंजनीं निरंजन । तव भजनासि अनुसरिजे ॥१०॥
प्रार्थितां यापरी देव प्रसन्न । होउनि मनोरथ केले पूर्ण । पाहतां जनिं या भजनांवाचुन । आनसार साधन नसे ची ॥११॥
ऐकोन वक्त्याला विनवी श्रोता । साधने आसती कीं बहुत पाहतां । भजनें चि काय हें कैसेनि श्लाघ्यता । प्रचितीवचन कोणाचें ॥१२॥
वक्ता वदे तैं श्रुति शास्त्र कांहीं । नेणो मी अडवा आणु गा ही । बोलिलेति ऐका दासगोसावी । सकळ संतातें मान्य ज्याचें ॥१३॥

॥श्लोक॥ भजन रघुविराचें पाह्तां सार आहे । अगणित तुळणा हे सर्व कांही न साहे । भुषण हरिजनाचें ध्यान योगीजनाचें । स्वहित मुनिजनाचें गूज हें सज्जनाचें ॥१॥

॥वोवी॥ ऐकोन यापरी निजसारवचन । श्रोतयाचें हरुषलें मन । सुपंथ यापरी दाविते सज्जन । केले निवासगडावरी ॥१४॥
येउनि राहतां येक सद्भक्त । राहटों लागले देव समस्त । श्रीराम आणि अंजनीसुत । वसों अक्षई पातले ॥१५॥
मिळाले आसती साधुसंत । येती जाती संसारीक भक्त । भुक्तिमुक्तिचा सुकाळ जेथें । आतां चरित्र अवधारा ॥१६॥
सद्गुरुस्मरण करित चित्तीं । सिंहासनीं असतां नृपती । सौदागर पातला तयाप्रती । सन्मानुनि सभेंत बैसविला ॥१७॥
तो उदिम्यांनीं असिलता ठेऊनि नजर । मोल काय ह्मणतां नेदी उत्तर सरदारलोका करितां विचार । मोल ईस ह्मणती सहस्त्रावरी ॥१८॥
फिरंग हातीं ते धरुनि राव । तोलुनि घालितां वारुळी घाव । कांहीं च तेथिल न होय अडव । झाड थोर तुटोन पडियेलें ॥१९॥
मग दो टुकडे जाला सबळ घट्ट । तेणें राजा तो होउनि संतुष्ट । होन्न देवविले तीनसे हे साट । गेला व्यापारी संतोषत ॥२०॥

॥अभंग॥ राजा धर्मसीळ प्रधानी वीवेकी । तेथें प्रजा सुखी कां आसेना ॥१॥
देवब्राह्मणाची मान्यता जे ठायीं । नोहे नुन्य कांहीं संपतींत ॥२॥
दीनासी पाळण संताचें पूजन । वैर्‍यादिक विघ्न न बाधे ची ॥३॥
बंधान करुनि सैन्यानि सैन्यासि वागवी । मर्यादेनें ठेवी स्वजनासी ॥४॥
मुख्य गुरुकृपा आत्मारामभक्ती । धन्य तो जगतीमाजी होय ॥५॥

॥वोवी॥ नीति न्याय मर्यादा उदारपण । प्रभुत्वामाजिं आसल्या हे गुण । तेथें विसावती साधु सज्जन । प्रजासंतुष्टें कीर्ति वाढे ॥२१॥
हें आसो राजानीं पाहतां शस्त्रानें । तारीफ करिती जाणते समस्त । तंव गणीक जोसी पातला तेथें । बोल बहु सत्य तयाचा ॥२२॥
पाहोन तयांनीं कमाई लोहा । खिन्नत्व पावला अंतरीं महा । कां घेतली ह्मणे हे राजा रे अहहा । अमोल्यवस्तु परि घातकी ॥२३॥
जरि वसेल चीज हे सज्जनापासी । गवसेल येणें गती बहुतासीं । कांहींच संशयो नाणितां मानसीं । सार्थकावरी घाली हे ॥२४॥
इयेसी लागतां सज्जनकर । हरेल बहुताचा अहंकार । वानावया होईल चरित्र । दृढता बाणेल बहुतासी ॥२५॥
नेऊनि सह्तिदक्षणाधन । समर्थाचें करुनि पूजन । होई बहु सुखी करुनि अर्पण । वदोन तथास्तु सन्मानिला ॥२६॥
मग सद्रुरुपासीं आला हरुषत । करुनि पूजादि विधानयुक्त । असिलता वोपितां तोषूनि समर्थ । ठेवविली ती सेजसदनीं ॥२७॥
स्वस्छळाप्रती गेला नृपती । आतां इकडील कथा श्रोती । संतपूजा संतर्पण गडावरुती । निरोपादि ससांग जाल्यावरी ॥२८॥
खबरीस चहुंकडे जे होते गेले । करकरोन महंती गडाल आले । लोक ही वरिवरी येऊनि मिळाले । घेऊं विसावा सौख्य भोगूं ॥२९॥
खर्च चौंजीनसी वाढला भारी । आळस पैसावला सकळा अंतरीं । आपुल्याल्या ठाई आपण चि भारी । शाहणपण दाविती कितेकी ॥३०॥
तनुमनधन हें श्रीगुरुअर्पण । केलों हें बोलती करुनि व्याख्यान । देहबुद्धिचेनि आळकेपण । गुरुबांधवीं विशम भाविती ॥३१॥
निर्दोषयेषाची वानिती कीर्ति । साधननेमाची झाकिती युक्ती । येकाचेनि बहुताच्या पालटे मती । अविश्वास स्वल्प झळंबतां ॥३२॥

॥अभंग॥ गुरुउपासना जाणेल जो भाव । नावडे त्या भाव करुं कांहीं ॥१॥
जाणता ही जरी किंचित अवज्ञा । केल्या विटंबणा स्छिती होय ॥२॥
यास्तव सावध होउनि वर्तावें । आन न भावावें गुरुवीण ॥३॥
क्रमामाजीं कांहीं नाणीजे थोतांड । मुक्तक्रियाचाड धरुं नये ॥४॥
सद्गुरुची कृपा जया प्राप्त होय । आत्माराम स्वयें जाणा तो ची ॥५॥

॥वोवी॥ हें आसो स्वामिनीं करुणा करुन । करुनि सत्सिष्य जे आपुल्यासमान । श्रीरामजीचें वाढऊं भजन । घेऊं पूजन धाडिले ॥३३॥
धेंडे धेंडे जे जगदोत्धारक । स्छळोस्छळीं होऊन ठेले स्छायिक । वरकडामानसीं आस्छा येक । आईते तनुसी पोसाव ॥३४॥
सर्वज्ञरायांनीं जाणोनि अंतर । कर्त्ता ह्मणतिलें श्रीरघुवीर । सर्व श्लाघ्य करुं करुणाकर । प्रसन्न उपाव योजिती ॥३५॥
भले सतिष्य जे आसती निकटीं । तें कोणासवें न करिती गोष्टी । गुरुवचनावरी ठेऊन दृष्टी । सेवेंत तिष्ठती सादरें ॥३६॥
योग्यवंताला महंतीस धाडूं । संशय आळसाचा समूळ मोडूं । दृढ विश्वासतांकपाट उघडूं । जाले उहित देशकेंद्र ॥३७॥
बैसोन येकांतीं गुंफेमाजीं । लक्ष लावोन श्रीरामपदाब्जीं । पडावया भक्तलोककाजीं । कवन लिहोन टाकिती ॥३८॥
पानावरि कीं कागदपुर्जावरी । प्रत्यय आलें ते नानाप्रकारीं । भाषाभेद ही त्यांत दोनचारी । बंदप्रबंद ग्रंथादि ॥३९॥
पुर्जेपानाचा जालासे ढीग । उतार करवाया यथासांग । कल्याण सत्सिष्य तो जाणोनि योग्य । बाहोन सन्निधीं कृपेनें ॥४०॥
आसिरवाद देऊनि सदयें । दाऊन पडला तो कवनसंग्रह । ह्मणतिलें उतार करीं लवलाह्य । चाफळक्षेत्रांत राहुनी ॥४१॥
हें अवघें लिहिणें जाल्याविरहित । येऊं नको तूं इकडे गडांत । तंव भाविलें सिष्यांनीं कांहीं चरित । अपूर्व दाऊं इछिलें ॥४२॥
वदोन तथास्तु घेऊनि मोट । निघतां जनाची मिळाली थाट । अर्थ सर्वत्रा कळों प्रगट । बोलिले ऐका कविराज ॥४३॥
कथिलेति नानापरी बुत्धिवाद । ग्रंथीं विलोका लिहिलेति विशद । आतां ही लेखनीक्रियाविध । सांगितलें तो मनीं धरा ॥४४॥

॥श्लोक॥ परीस लेखनीक्रिया । बहुत मानिती जया । उदंड दाट मोकळे । ठकार दाखवी बळें ॥१॥
सुबक चौघडी घडी । विचित्र चौक मूरडी । मनीं सबंध धारणा । अबत्धसारसारणा ॥२॥
मनें चि धात तूळणें । घनें कुशाद वोळणें । सुढाळ माळ साजिरी । तयेपरी भरोवरी ॥३॥
समान सीर तें बरें । वळी समान अक्षरें । भरीवपष्ट मात्रुका । चळों चुकों नका नका ॥४॥
तरुण सुदरें भरें । सुटकटांक ठोसरें । अढेच पोकळें नको । झकेल तो सुखें झको ॥५॥
मनीं पाहावया लके । गुणी चतुर चामके । भलाभला परोपरी । अनेकबंद कूसरी ॥६॥

॥वोवी॥ ऐकोन यापरी लेखनलक्षण । तद्वत चि लिहिणार धन्य कल्याण । इतरा ही वाटलें कीजे साधन । चाफळाप्रती पातला ॥४५॥
श्रीरामा करुनि साष्टांग नमन । भीमादिकाचें घेतलें दर्शन । मठीं होते ते तोषले पूर्ण । शरण हो पातले बहुत लोक ॥४६॥
सद्गुरुरायाची जाणोन इछा । अनुग्रहाची जे धरिती अपेक्षा । उपदेशूनिया सांगती दीक्षा । हो कां विरक्त संसारिक ॥४७॥
हें असो कागद ते मोहरेदार । कुळकुळीते काळी शाई सुंदर । करुनि साहित्य सित्ध समग्र । वह्यावरी लीहूं प्रारंभिलें ॥४८॥
जपोन लिहिणें करिती सुंदर । पाहोन लाविती विलेवार । जयाचा मानसीं हा निर्धार । साफल्य सर्व ही गुरुसेवा ॥४९॥
कांहीं गुरुमुखीचें निघो वाक्य । तैसें चि घडेल अपसया कौतुक । भेटो गुरुबंधु कोणी रंक । देवासमान मानिती ॥५०॥
धन्य पद्महस्ती कल्याणदाता । मंदमती मुलाला देतां किता । होऊनि शाहणे पावती मान्यता । अक्षर सुंदर लिहिताती ॥५१॥
सिष्यास वदतां करा रे कवन । सवें चि लिहिती युक्ति सुचोन । सर्वमान्य करुं लागती कीर्तन । वाढऊं जाणती परमार्था ॥५२॥
हें असो इकडील ऐका कथन । येकांतामाजिं असतां सज्जन । मारुतीस करुं सेंदुरलेपन । सित्ध सन्निधीं ठेविलासे ॥५३॥
परिक्षा करुं भाविले सज्जन । दिधलेती कैसें तनुमनधन । कैसें कोणाचे आहे दृढ मन । कोणाची वृत्ती कैसी असे ॥५४॥
कोण काय बोलती घालिती आळ । कोणा वोपावें काय वरद फळ । कोठें ठेवावा मम बोध अढळ । ऐसें दयाळ चिंतितु ॥५५॥
दिसती तरी सगट सारिखे । बोलती तरी अनुभववाक्य । प्रत्ययपण ध्याना आणूं मुख्य । मांडिलें कौतुक योगींद्र ॥५६॥
वनांतरीं राहूं उदासभाव । वर्तमान कपेंद्रा जीविचें वदावें । आनंद पावावा श्रीरामसवें । जन त्याग करुं इछिलें ॥५७॥

॥अभंग॥ योगींद्राची स्छिती न कळे कोणासी । दाविती जनासी काय लीळा ॥१॥
जें कांहीं इछिती कामावरी पडे । स्वहीत चि बहुतासी ॥२॥
जीव प्राण घेतां खंती ठावा नाही । पाडीतां अपाई न्याहल होती ॥३॥
स्वयें ब्रह्ममूर्ति होउनि आपण । उदासीनचिन्ह दाविताती ॥४॥
बाल्यलीळा आणि पिशाच्च वैराग्य । किंवा राजयोग मांडिताती ॥५॥
नसे विखापेक्षा आधार लालची । चिंता सर्वत्राची जया आसे ॥६॥
छुटाव सित्धिचे जे कां सोंग ढोंग । फजितीचा भोग ज्या नावडे ॥७॥
स्वात्मानंदसौख्य दाऊं अवतार । येरें निर्विकार रुप ज्याचें ॥८॥

॥वोवी॥ सेंदुरकुंडा धरितां हातीं । दिसों लागले स्वयमेव मारुती । चर्चून घेतलें सर्वांगाप्रती । नटलें रुप तें अति उग्र ॥५८॥
कुंकु चर्चिलें कपाळभरुनि । साजूक विडा तो असेव वदनीं । ते असिलता घेतले करीं उचलोनी । पुष्पहार शोभती गळ्यांत ॥५९॥
कां हें धरिलें ह्मणाल स्वरुप । तरि भक्तासि दाविलें रुप अमूप । विडा कुंकुनें झळके वोप । नेणों जगदंबा प्रगटली ॥६०॥
देत आरोळ्या भुभु:कार । गुंफा बाहेरीं आले गुरुवर । ह्मणत काय काय न देतां उत्तर । समुदाव फार मिळाला ॥६१॥
पाहून दचकले रुप भ्यासुर । तंव दाऊन वाकल्या फिरऊन नेत्र । बोलिले मोठयानें जालों आतुर । या कोणी सन्मुखी मारीन ॥६२॥
स्वस्छ निजा रे कापीन कंठ । निर्मळ करीन फाडूनि पोट । शस्त्रदैवती हे पाहे वाट । श्रोणीत कटकट निवारुं ॥६३॥
वेड लागोन मज होतसे घोर । तनुमनधनाचा वाटतो भार । जीव बहु घेतल्याविण उतार । न होये चि कोणी धावा रे ॥६४॥
जीव देऊनि तोषवाल मातें । उपकार घडेल पुढें बहुताते । कृपा करील श्रीरघुनाथ । पिसाटपणातें वारील ॥६५॥
तनुमनधन हें नाशीवंत । आशा न धरा रे याची किंचित । घे घाव परीक्षा नुरवीन हेत । ह्मणोन उड्डान साधिलें ॥६६॥
हें देखोन येकायेकीं स्वरुप । बहुतेका सुटले भय चळकाप । धैर्य न होय येऊं समीप । लपोन राहिले कितेकीं ॥६७॥
केलें कितेकीं पलायमान । मूर्छित पडले वाळोन वदन । गुरुभक्तीचें जालें विस्मरण । भ्रमतमामाजीं पडियले ॥६८॥
जेवि लेकराची खेळ्तरवार । शब्दज्ञान तेवी न लावी पार । कठीण प्रसंगीं धरावा धीर । विवेकविचारें साजविजे ॥६९॥

॥अभंग॥ कांहीं किती पढो बोलो कां निर्भय । क्रियामाजि आहे सार्थकता ॥१॥
अंदेशा केलिया गुरुवचनासि । पावेल तयासी देव कैसा ॥२॥
कांहीं लीळा दावो मानावी उत्तम । धरावी नि:सीम धैर्यबुत्धी ॥३॥
दृढविश्वासानें क्रमी धरितां प्रेम । साह्य आत्माराम कां न होय ॥४॥

॥ओवी॥ पाहा हो अभ्यासीं अनास्छा केली । ह्मणोन भल्याला माया घेरली । नानापरीची कल्पना चालिली । भाविलें काळ विपरीत ॥
॥७०॥
पडेल कारणी हा देह ह्मणोन । रघुविरी मागती जीवदान । माहराजांनीं हासोनि तेणें । चहुंकडे दवडों लागले ॥७१॥
कोणी न येती न टिकती पुढें । मग पळोन पातले राणाकडे । थोर पाषाणीं बैसोन निधडे । तरवारात झमकविती ॥७२॥
मार्गवशात येतां चि कोणी । त्यावरी धावती उडी टाकुनि । बोभाट पसरला चहुंकडे जनीं । वाट ती मोडली न चालती ॥७३॥
भय संचरलें प्रांती चहुंकडे । यावया न होती पाउलें पुढें । ह्मणती गोसावी थोर बळाढय । न सोडी च पाठीं लागल्या ॥७४॥
ह्मणती स्मशानीं राहती सदा । तेणें भूताची जाहलीसे बाधा । उतार न होईल आतां कदा । एवं करिताती निंदा बहु ॥७५॥
सिष्यजन तिकडे जाले सावध । कल्पना कल्पिती अनेकविध । सांप्रदाय हा वाढला शुत्ध । परंतु विघ्न वोढवलें ॥७६॥
वृतांत गुरुचा कळतां भूप । तळमळोनीयां करितु प्रलाप । बहुत ब्राह्मणाला करुं जपतप । घातला सावध हो ह्मणुनी ॥७७॥
घडावया गुरुसहवास । बहुत देवाला करितो नवस । येउनिया सज्जनगडास । दीनरुप राहिला ॥७८॥
संगीतसोयर्‍या नृपाची चिंता । घात चि गुरुचे दर्शना जातां । लोक बहु आले ऐकोन वार्ता । सिष्यवर्गादि त्रिविधजन ॥७९॥
पंडीतजन वदती तपतो भारी । अन्नसंतर्पण नाहीं त्यासरी । बहुता प्रपंची घातल वारी । तो दोष भोवला याभोवतीं ॥८०॥
वैदीक जन वदती पाहतां त्याकडे । आमच्या उदरांत पडती खडे । दुजा वदे तैं गोष्टी हेकाड । यामाजिं तुमच काय गेलें ॥८१॥
येक ह्मणे हो महापुरुषलोक । वैदीकाहुनी दिसती अधीक । येक ह्मणे तप करा यासारिखे । त्याहुनि श्रेष्ठ दिसाल ॥८२॥
जोइसी ह्मणती हा शस्त्राचा गुण । उतार होईल घेतां हिरोन बोलती नाना त्रिविधजन । मुख्य वर्म न कळे कोणासी ॥८३॥
कोणी भाविती मंत्रचळण । उतार करितील योगीजन । कोणी वदताती पैत्यभ्रमण । परि वैद्याचा लाग चालेना ॥८४॥
न देखवतां महंतीसुख । केलें दुष्टांनीं चेडेंचेटक । राजा तो जाला जाणुनि सेवक । दावा साधिती बहुतेकीं ॥८५॥
देवासि लाविलें सेंदुर फार । तेणें देव ते होउनि बेजार । हो फेडाया तयारा प्रत्योपकार । लाविला त्याचा तयासी ॥८६॥
कोणी ह्मणती तोफा डागिजे । भीवोन स्वस्छळा येती सहज । वाद्यगजराचा भरीव कीजे भ्रमपरिहार होईल ॥८७॥
सोडोन जेठया धाडितां यावरी । धरुन आणतील क्षणामाझारीं । जावें अवघ्यांनीं तोडितील तरी । घात येकाचा होईल ॥८८॥
कोणी ह्मणती हो हें काय बोलण । जयांनीं अर्पिलें तनुमनधन । तेथें तयाला द्यावें बळिदान । कांही न बोलिजे काय गरज ॥८९॥
संतर्पण खावया मिळती फार । लांब गोष्टीनें कथिती बडिवार । अवस्छा घडतां या या प्रकार । कोणाचे कोणी न होती ॥९०॥
अहहा महापुरुष होता भला । दुजा वदे हो विलोका लीळा । जगदीश साह्य असे तयाला । बहुवेळीं दाविलें विचित्र ॥९१॥
गुरुरायासि न बाधो विघ्न । कोणी मांडिलें अनुष्ठान । करिताती सेवा वृत उपोषण । जाणतें मौन्य धरियलें ॥९२॥
ह्मणती या समई असतां कल्याण । समजाविसी करिता युक्तीनें । आतां तयाला आणिजे प्रार्थून । ह्मणोन धावले भाविकीं ॥९३॥
संकटीं पडतां श्रीरामराणा । करिती आर्जव वायुनंदना । प्रार्थुनि आणाया गिरिजारमणा । जेवि सित्धपुरुष धावले ॥९४॥
सांगती कोपले असती दयाळ । सर्वत्रीं व्यापले विकळ व्याकुळ । द्वारकेंत नसतां श्रीघननीळ । समुदाई क्लेष वाटला ॥९५॥
बहुत कष्टाच्या लोटती घडी । कळाहीन दिसों लागल्या कुडी । सर्वत्रा घालूं सौख्य परवडी । करा जी तातडी निघावया ॥९६॥
येरु हासोन बोलिले त्यासी । कां भय संचरलें वृथा मानसीं । भेटावया करुणाकरासी । कांही च संशय न धरावा ॥९७॥
गुरुरायाचे धरितां चरण । किमपी न बाधी तयासी विघ्न । लीळा करितां ही नाना विधान । दृढभाव आपुला न त्यागिजे ॥९८॥
देखती ऐकती करणी अद्भुत । विपरीत ते चि होती सुप्रचित चरित्र हें ही परीक्षानिमित्य । कुशळ चि होऊं सकळासी ॥९९॥
मी आज्ञाप्रमाणीं गुंतलों येथ । जा सर्वत्रा वृत्तांत । तनुमनधन अर्पण असेल सत्य । तया गुरुनाथ प्रसन्न ॥१००॥
तनुमनधनाची आशा कायसी । कां भ्यावें जावया सद्गुरुपासीं । जो टाळिता आपुल जन्ममृत्यासी । अपाय घडेल कां तेथें ॥१॥
ऐकोन रहस्य हें धरुन मानसीं । परतले साधकीं आले गडासी । कळवितां वृतांतु सर्वत्रासी । धैर्य कवणासी न होय ॥२॥
तो धैर्यवंत हा नेमवंत । फलाष्याचेनि हें होईल कृत्य । सरकले आपणा सोडुन मोजित । लीळा विलोकूं ह्मणती बहु ॥३॥

॥अभंग॥ सर्वत्रासि गुरु येक कृपावंत । सकळामनीं आर्त कृपा व्हावी ॥१॥
अवघ्यासि साधन उपासना येक । कां उणा अधीक भाव जाला ॥२॥
आहो विश्वासाचें नाहीं पूर्ण बळ । पांगाचा विटाळ वसे चित्तीं ॥३॥
संसाराची आस्छा देहाचा समंध । लोकीकाचा वेध जाचीतसे ॥४॥
वृत्ती नाहीं स्छीर सेवा अनादर । नासलें अंतर फळाशेनें ॥५॥
जाणता प्रेमळु मानी गुरुब्रह्म । तो चि आत्माराम नराकृती ॥६॥

॥वोवी॥ अविश्वास अश्रत्धा लुब्धपण । लालुच विषयाची अधार घेणें । हे अविद्यामायेचें होय भूषण । चांग चि दिसाया लागलें ॥४॥
तें मायेसि मायेनें करुं सिंतर । भाव गुरुचरणीं असावा दृढतर । साधनाचा न पडिजे विसर । वंदोन मायेंत परिहारिजे ॥५॥
॥पद॥ मायादेवी तुजला नमन । संतसभेसी न दावी वदन । कृपा करुनि न देईं दर्शन । जेथील तेथें होऊनि जाई लीन ॥ध्रु०॥ दीनदुर्बळा पिडिसी उगाची । चालो नेंदिसी वाट ते सत्याची । हरविसी बळें सोय स्वरुपाची । गोविसी इस्छाबंधनाच्या पेचीं ॥१॥
साव तुज ह्मणतां वेडा च करिसी । मिथ्या मानितां अहंतेंत गोविसी । कांही न ह्मणतां मूर्खत्व स्छापिसी । पालटिसी जरी उपासना होसी ॥२॥
यास्तव संतीं निंदिती तुजला । मिथ्या खेळु खेळसी काशाला । परतोन पाहीं स्वानंदसोहळा । घेसी गोउन तुझा कां तूं गळा ॥३॥
सित्धा धरविसी जाणीव फुगारा । बत्धा घोळिसी नेणिवेन सैरा । साधकालागी दाविसी भेदरा । मुमुक्षु तो ही तुझेनि घाबिरा ॥४॥
राहसी तरी राही उन्मनी हो राही । जासी तरि जाई नाहीं च हो जाई । आह्मी तों न ह्मणूं तुजला आन कांहीं । नांदोन येश घे गुरुपाईं ॥५॥
तुजमाजीं आहे मुळिंची ते सत्ता । आत्मासर्वात्मा हो ठाया स्वथा । उरों नेदितां द्वंद्वभेदवार्ता । निजनिर्विकारीं तन्मय हो आतां ॥६॥

॥वोवी॥ जाणोन जो ऐसें करी स्तवन । दावीगुरुपुत्रा स्वानंद पूर्ण । परमार्थाचें वागवी निशाण । येरवी नाटोपे कवणा ही ॥६॥
जाणतेवेत्त्याला गोव्यांत गोवी । न कळऊन योग्याला अहंता लावी । वेडा लाऊन मी ब्रह्म ह्मणवी । ज्ञातृत्व अभिमान करी आड ॥७॥
तेथें मूर्खाला कायसी गती । सेवटावरी छी छी फजीती । एवं दुरत्यया माया ख्याती । मायराणी ते स्वयें ची ॥८॥
ऐसिये मायेत करुं परिहार । परमार्थाचा कळे विस्तार । सिष्यजनाचें निवळों अंतर । मांडिलें चरित्र गुरुनाथ ॥९॥
जवं वनीं विसाऊं पातले विरक्त । सबाह्य सांभाळू सद्भक्तात । संवे चि धाऊन आला रघुनाथ । पवनसुत ही पातला ॥११०॥
देवभक्ताचा जाला संगम । न समाय ऐसा लोटला संभ्रम । जाणतील अनुभवी तेथील प्रेम । विधानविश्राम पावले ॥११॥
धन्य देवाचें कृपासौरस । जाणोन जाला दास उदास । करुनि करुणेनें हृदई निवास । पालटोन दिल्हें ते घडी ॥१२॥
रसभरीत तैसा चि असे तांबोल । अणुमात्र कांहीं आंग न मळल । सेंदूरगंधादि असती वोल । पुष्पहार तैसे चि असती ॥१३॥
क्षुधातृषाची नसे चि बाधा । नेणों सर्वांगीं व्यापिल सुधा । कीजे आरंभु कर्मनेमधंदा । तरि पालटला न दिसे दिवस तो ॥१४॥
लक्षिती जनांनीं उचलोन तोंड । द्वय त्रय दीसती दासाकडे । घातपात जाला रे ह्मणती भ्याड । पत्तेवाल्यांनीं सीणती ॥१५॥
इकडे दासाला वदे श्रीराम । कां लीळा मांडिली हे भोगीत श्रम । उत्तर दे देवा जोडूनि करपद्म । इत्छा तुमची कीं सर्व कर्त्ता ॥१६॥
भक्तजनाचें कळलें कीं धैर्य । केवीं साधेल परमार्थ कार्य । श्रीराम वदे बा दावीन सोय । चिंता अणुमात्र धरी मनीं ॥१७॥
येरु बोलिले काय नमोन । हा चि भरंवसा मज असे पूर्ण । आतां विनवणी ध्याना आणून । सामाविजे दीना स्वरुपीं ॥१८॥
बहुत केलें यापरी प्रार्थना । येक दोन वाक्य ध्यानासि आणा । भक्तिज्ञानवैराग्ययोगभावना । माजिं नून्य नसे कांहींच ॥१९॥

॥अभंग॥ कैसे कोण आहे मुकियाचें जाण । कळे वोळखण न सांगतां ॥१॥
न सांगतां जाणें अंतरीचा हेत । पुरवी आरत सर्व कांहीं ॥२॥
सर्व कांही जाणे चतुराचा राणा । धन्ये नारायेणा लीळा तुझी ॥३॥
तुझी लीळा जाणे ऐसा कोण आहे । विरंची तो राहे चाकाटला ॥४॥
चाकाटला मनु देवासी पाहतां । दास ह्मणे आतां हद जाली ॥५॥

॥माझा देह तुज देखत पडावा । आवडी हे जीवा फार० ॥च०५॥

॥वोवी॥ ऐकोन भक्ताचें करुणावचन । गहिंवरोन वदे श्रीरघुनंदन । न गमे सख्या रे कहीं तुजविण । सर्वदां असेन तुज माजीं ॥१२०॥
होईन भावितां सगुण साकार । निर्गुणी तो निज निर्धार । मागितलें ते ते वोपूनि वर । अंतर्धान पावले समजाउनी ॥२१॥
इकडे दासांनीं धरुनि फिरंग । वावरों लागले वनीं नि:संग । कृपादान वोपूं पाहती मार्ग । कोण्ही च लाग न करिती ॥२२॥
नानापरीनें वद्ती स्तोमीं । कैं येतील ह्मणती कल्याणस्वामी । अभक्त अन्याई जालों आह्मी । पडलों भ्रमतमीं जाणत ची ॥२३॥
जाली सर्वत्रा प्राणप्रीत मोठी । गुरुराज होऊं लागले कष्टी । कल्याणापासी येवोन गोष्टी । सांगसांगोन प्रार्थिती ॥२४॥
येकास ह्मणतिलें आहे ते लीळा । भवहर्त्त्याची चिंता काशाला । नाशिवंत देहाचा भार जो त्यागिला । त्या श्रीराम साह्यसर्वार्थी ॥२५॥
करित भक्तांनीं ज्याचें स्मरण । चहुंकडे वागती निर्भय मनें । सेऊन जयाचें बोधरसपान । काळकर्मात न भीती ॥२६॥
छायागमनाची नमोन सती । जाली सुवाष्णी सुपुत्रवंती । माहर ह्यैशाला कृपामूर्ती । आयुष्य देऊन तारिलें ॥२७॥
विहरींत न जाला द्विजा अपाय । कासीस गेला भक्त लवलाह्य दावाग्नी । जाला कीं मेघवृष्टीप्राय । विद्युल्लतात वारिलें कीं ॥२८॥
सर्पवाघाचें टळलें अरिष्ट । दुष्ट रोगाचे वारिले कष्ट । पाहिलें पाहातां कीं नवल मोट । कौतुक हें ही सुखदाय ॥२९॥
नृसिंहदेवाचें उग्ररुप । थोर थोर खळ दैत्या सुटवी काप । परि प्रल्हादबाळा न वाटे खोप । तैसें चि हें ही जाणिजे ॥३०॥
समजावीत यापरी लिहितां नित्य । लिहिणें हि होऊं आलें समाप्त । तातड बहु जाली ह्मणोन मठांत । वह्यादि ठेऊन निघाले ॥३१॥
कल्याणस्वामीची ऐसी पत्धती । लिहिलें तें कीजे दुसरीप्रती । गुरुरायाकडे लागोन वृत्ती । उतार ते ही न केले ॥३२॥
संग्रहो राहिला क्षेत्रीं तेथ । श्रवण घडत असेल पुण्यवंतात । जें लिहिणें अवलोकितां लाऊन चित्त । होतील अक्षर सुंदर ॥३३॥
मग धैर्य देऊनि क्षेत्रस्छांत । नमोन देवाला घेऊनि साहित्य । पावले त्वरेनें येउनि गडांत । उल्हास वाटला सकळासी ॥३४॥
अक्रूर येतां द्वारकाजवळी । नाचों लागले भक्तजनमंडळी । शुत्धी घेऊनी पावतां बळी । वान्नरमेळीं उल्हास ॥३५॥
कोणी पायावरी लोळती । सद्गुरुराया दाखवा ह्मणती । कर जोडुनि प्रार्थना करिती । डोई घालिती उदरांत ॥३६॥
कोणी ह्मणती बा धन सर्व खर्चू । पाहीजे तरि आतां प्राणासि वेचूं । सकळ विवेका सांग विवंचूं । न्या येऊ गुरुजवळी निर्भय ॥३७॥
परिसोन सर्वाच्या ऐशा ग्लांती भाळतील ह्मणतिलें श्रीगुरुमूर्ति । समाधान करुन सकळाप्रती । गुरुमाउलीस भेटों चालिला ॥३८॥
राजयापासी पातला स्वबाळ । वाघीणसंव करु पिली खेळ । त्रिंबका भेटों आला गणपाळ । ब्रह्मा ये जैसा हरीपासी ॥३९॥
निरखोन कल्याणजीचें येणें । मूळ हा आला भाविलें सज्जन । चोज विलोकूं चहुंकडोन जन । इकडे दडोन पाहती ॥१४०॥
धन्य दृढ धैर्य ह्मणती कोणी । उदारजीवाचा देखिला जनीं । येकरुपीं ते भाविले मनीं । काय होतो कीं पाहवें ॥४१॥
दृष्टीस पडतां गुरुदयाघन । केला तेथून साष्टांगनमन । देखोन स्वामींनीं शस्त्र उचलोन । देत आरोळ्या चौताळले ॥४२॥
तंव बोलिला धीर तो रंक सित्ध आहे । हळूं च यावें जी दुखतील पाये । मग भिरकावीत धोंडे सद्गुरुराय । अति उग्रता दाविली ॥४३॥
मारितील ऐसा दाविता डौल । विनवणी करितु सिष्य प्रेमळ । हातपाय श्रमले नाजूक कोमळ । चुरीन विसावा घ्यावा जी ॥४४॥
येरु ह्मणतिलें मिष्टान्न गोड । खाखाऊन मोटी केली गांड । मासळलासि खांडविखंड । करुन जीव घेऊन ॥४५॥
मग अवळोन सेंडी पाडूं पाहती । स्वयें चि उताणा निजला सुमती । पाव देऊन हृदयावरुती । लाविलें उफराटें शस्त्र कंठीं ॥४६॥
लपोन पाहत होती तयाला । घातपात चि जालासा वाटला । या येकाचेनि घडों सौख्य सकळाला । पालटों ह्मणती गुरुवृत्ती ॥४७॥
कल्पीत यावरी गडासि गेले । गुरुसिष्याकडे हेरुं लागले । प्रसन्नता इछितेजाले । आतां इकडील वृतांत ॥४८॥
लवोन श्रमती जाणोन देशिक । सिष्यसुमतीचें उतरलें मुख । कां रे जालासि ह्मणतां लुब्धक । जी देखवेना सिणतां कीं ॥४९॥
जंव जालें स्वामीचें चरणदर्शन । तनुमनधनाचें केलें अर्पण । तेधवा च जालों कृतार्थ पावन । कासया अनुमान पाहिजे ॥१५०॥
जी उदारा आतां येक्या घाई । द्यावा रंकाला ठाव निजपाई । तंव हासोन बोलिले गुरुगोसावी । जिंतलास कीं रे दृढमनें ॥५१॥
द्यावया न दिसती कांहीं पदार्थ । तुजकडे आतां वोपिलें गुरुत्व । तुझ्या हृदयांतरीं राहणें मात । जाई महंती करावया ॥५२॥
जी देवा वदाल तें घडेल घट्ट । कोण वरदाना करील पालट । सिष्यधर्मी असे जें सौख्य मोट । तें न गवसे धुंडितां कशांत ही ॥५३॥
जो महंतीची करील अपेक्षा । जो वीट मानील गुरुची सीक्षा । परमार्थ न जोडे त्या नतद्र्क्षा । जडावी आवडी सगुणसेवा ॥५४॥
जो गुरुसेवेमाजीं वागे सदा । न होय तयाला काळकर्मबाधा । तृणतुछे वाटे त्या इंद्रादि संपदा । मोक्षसित्ध्यादि न इछी ॥५५॥
अरे आलिया देवाचे चित्ता । स्वत्बुत्धिची टीका ते वृथा । आतां न धरावी कांहीं भिन्नता । वचन प्रमाण सर्वस्वीं ॥५६॥
येरु मौन्य चि धरिला पाय । आज्ञापिलें करीं पाक लवलाह्य । मग भुकेजले जाणोनि सद्गुरुराय । उसीर कांहीं च न लावी ॥५७॥
असे झोळींत सित्ध सामोग्री । सयपाक भक्तांनीं केला वेगीं । सोवळे च होते श्रीराजयोगी । जेवोन धाले बैसले ॥५८॥
मग करुनिया प्रसादस्वीकार । सित्धसन्मुखी ठाकला चतुर । संतोषें उभौ चालोन सत्वर । सद्गडाप्रती पातले ॥५९॥
प्रसन्न असती श्रीगुरुदेव । चिन्हें न दिसती विकार अपाव । ठकलों रे ह्मणती नेणोनि भाव । धन्य कल्याण तिहीं लोकीं ॥१६०॥
ऐसा न देखों दृढभावाचा । प्रताप विदित त्या योगीरायाचा । प्रसाद स्वीकारुं ह्मणोन तयाचा । समुदाव मिळाला गुरुपासीं ॥६१॥
कळो सर्वत्रा आर्थ विशद । बोलिले ऐका हो कैस पद । तारु बहुतेका सच्चिदानंद । लीळा दाविती जनांत ॥६२॥

॥पद॥ धाट-ऐक रे साधका ॥ पळा पळा ब्रह्मपिसा येतो जवळी । रामनामे हाक मारुनि डोई कांडोळी ॥च०॥५॥

॥वोवी॥ पदामाजील जाणोन रहस्य । सावध होठेले भक्तजन सिष्य । विश्वासापासून न ढळे मानस । वर्तो इछिलें यापरी ॥६३॥
तंव ईक्षोन फिरंगा श्रीयोगीराज । नभीं भिरकाविलें तेज:पुंज । गुप्तली लवोन जेवि वीज । प्रकाश तो भरला नेत्रांत ॥६४॥
पाहत चि असतां लाहन थोर । असिलतेचा जाला उत्धार । धन्य कर महिमा वानिती चरित्र । प्राणी तरतील नवल काय ॥६५॥
अपराध क्षमा करुनि समस्त । सौम्यरुप धरिलें दीनानाथ । स्वीकारुनिया भक्तिभावात । निजस्छानावरी बैसले ॥६६॥
मीनले असती पुण्यश्लोकी । सादरें तिष्ठती राजादिकीं । गुजगुह्य कथिती येकमेकीं । धरिलें हृत्पदकीं गुरुध्यान ॥६७॥
करिती आनंदें ससांग पूजन । जाले कितेकीं सिष्य नूतन । बुत्धिवाद कथितां करिती श्रवण । वर्ताया ऐका सद्भावें ॥६८॥

फुट ॥पद॥ राम न ज्याने नर जिया तो क्या जी ॥धृ०॥ धन दौलत सब माल खजीना । और मुलुक सर किया तो क्या जी ॥१॥
गंगा गोमति रेवा तापी । और बनारस नाह्या तो क्या जी ॥२॥
गोकुलमथुरा मधुबनद्वारका । और आयोध्या कर आया तो क्या जी ॥३॥
दर्वेश शवडा जंगम जोगी । और कानफाडी हुवा तो क्या जी ॥४॥
आत्मज्ञान की खबर न ज्याने । और ध्यान न बक हुवा तो क्या जी ॥५॥
बेदपुरानकी चर्चा घनि हय । और शास्तर पढ आया तो क्या जी ॥६॥
रामदासप्रभू आत्मरघूविर । इस नयन नहि छयाया तो क्या जी ॥७॥

॥वोवी॥ ऐकोन यापरी बुत्धिवाद । तो धरोज्न मानसीं जाले सावध । कवणा ही न ह्मणावें बत्धसित्ध । धन्य प्रसित्ध गुरुभक्त ॥६९॥
जंव आला गुरुपासीं कल्याण सद्गुणी । गुरुराज दिसले जैसी भवानी । तें स्वरुप लक्षामाजि ठेऊनि । पद करुनि वर्णिलें ॥१७०॥
जें रुप पाहिलें ज्या ज्या समई । तैसें चि वर्णना केलें निस्पृहीं । प्रसंगोचिती श्रवण कांहीं । घडेल पुढारी सांगतां ॥७१॥
पदें तें प्रेमाची ऐसीं श्रवण । करितां समर्थ होती प्रसन्न । भेद दिसतां ही गुरुशिष्यमान । दासकल्याण येकरुपी ॥७२॥
जो कल्याणाचें घेईल नाव । घर रिघेल परमार्थवैभव । ऐसा गुरुचा वरप्रभाव । होती साहकारी राम भीम ॥७३॥
कथन सुरस असे पुढील कांडीं । असे श्रीगुरुप्रतापप्रौढी । श्रवणद्वारें घेतां गोडी । होय ब्रह्मांडीं तो मान्य ॥७४॥

॥अभंग॥ मी तों समर्थाचा सोयरा गरीब । परी पंक्तिलाभ घडतसे ॥१॥
उंचनीच नाहीं नसे द्वंद भेद । खेदाचा समंध नाहीं मूळीं ॥२॥
रंक राजे जेथें समान वर्तती । सर्वालागि गती येकरुप ॥३॥
लेता चि सद्भाव जेथील भूषण । छुल्लकता दैन्य दूरी होय ॥४॥
न येती तयाला बळें चि बाहती । अमर करिती नानापरी ॥५॥
रुसोन फुगोन दुर जे होतील । तयासी सफळ केवी होय ॥६॥
मुख्य ते सोयरे देव आत्माराम । भोळा बलभीम संत साधु ॥७॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम सुंदर । रवाळेश्वर मनोहर । मिनला जेथें भक्तपरिवार । स्वात्मानंदसुख भोगूं ॥१७५॥
इति श्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । भजनसौख्य । सिष्यपरीक्षानाम । पटळ येकसेहे साहा ॥१०६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP