श्रीकृष्ण जगन्नाथभट्ट बांदकर

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


श्लोक (शिखरिणी)
यतोऽव्यक्तात्सर्वे गुरुलघुनृदेवादि निवहा:
प्रभूता: संभूता अजहरिहरा: शक्तिवशगा:
ततोऽहं सवाद्यं त्रिदशनुतपाद्यं खलजनै-
रनासाद्यं कृष्णं गुरुवरमनाद्यंतममलम्‍ ॥१॥
श्रीसद्गुरुमहिम्नस्त्रोत्रम्‍.

आपली भाषा व आपला धर्म यांचा अभिमान व उन्नतीची इच्छा ज्यांस नाहीं, असे लोक "मनुष्यरुपेण मृगाश्चरंति" याच कोटींतले होत. प्रत्येकास आपल्या भाषेचा व धर्माचा सर्वत्र विस्तार व्हावा, अशी महत्त्वाकांक्षा असतेच; परंतु, मनुष्य स्वतंत्र असला म्हणजे तो आपणास हवी असेल तशी आपली सुधारणा व उन्नति करुन घेतो; व तोच परतंत्र झाला, आणि परक्यांच्या जुलमाचें जख्खड जूं त्याच्या मानेवर पडलें, म्हणजे मग निरुपायास्तव परकी शिकवितील ती त्याची भाषा, परकी म्हणतील ती त्याची सुधारणा व परकी करुं देतील तेवढी त्याची उन्नति, असाच प्रकार व्हावयाचा. एका कालीं वैभवाच्या उच्च शिखरावर विहार करणार्‍या या आमच्या भूमीस आजची ही करुणास्थिति प्राप्त होण्याचेंही हेंच मुख्य कारण होय. आमचा गोमांतक प्रांत पोर्तुगीज सरकारच्या हातांत जाऊन आज चार शतकांवर वर्षे झालीं. तितक्या अवधींत, आमच्या धर्माची, भाषेची व स्वातंत्र्याची जी भयंकर पायमल्ली झाली, तिचें वर्णन करणें अगदीं अशक्य आहे ! त्या राक्षसी जुलमाचें व सुलतानी कारकिर्दीचें वर्णन इतिहासांत वाचलें असतां प्रत्येक हिंदु म्हणविणार्‍याच्या अंगावर रोमांच उठतील, यांत शंका नाहीं. जिंकलेल्या लोकांस एकाद्या पाळींव जनावरापेक्षां जास्त स्वातंत्र्य न देण्याची कांहीं जेत्यांस नेहमी हौस असते; व याच कारणामुळें स्वाभिमानजनक व उन्नतिकारक असें शिक्षण न देतां, नेहमीं ते त्यांस अज्ञानस्थितींत ठेवीत असतात. गोवें प्रांतांतही वरील कारणास्तव सरकारानें लोकांस मराठी शिक्षण देण्याकडे साफ दुर्लक्ष्य केलें. सरकारचा आश्रय मुळींच नसल्यामुळें, लोकांच्या आश्रयावर उभारलेल्या ज्या कांही थोडया शाळा होत्या, त्याही हळुहळु नामशेष झाल्या; व मराठी भाषेसंबंधानें समाजांत पराकाष्ठेचें अज्ञान व्यापून राहिलें. अशा रीतीनें मराठी शिक्षण नसल्यामुळें लोकांस आमच्या पवित्र धर्मग्रंथांचें अवलोकन घडेनासें झालें; व त्यामुळे आमच्या आधुनिक व प्राचीन साधुसंतांची आणि कवींची त्यांस ओळख मिळणें दुरापास्त झालें. आमचा सनातन धर्म म्हणजे काय व तो कशाबरोबर खातात याची कोणास ओळखही राहिली नाहीं व अशाच अनेक पिढया अशिक्षित राहिल्यामुळें, उत्तरोत्तर तें अज्ञान अधिकच बळावलें; आणि पुढें पुढें तर ज्या आमच्या पवित्रतम धर्मग्रंथांस सुधारणेच्या शेंडयास पोंचलेल्या जर्मनी, अमेरिकेसारख्या राष्ट्रांतील निर्मत्सर विद्वानांनीं व तत्त्ववेत्त्यांनीं माना डोलविल्या, त्यासंबंधानें आमचा अगदीं उलटा व विपरीत ग्रह झाला. येथील एका गर्भश्रीमंताची एक सखेदाश्चर्यजनक गोष्ट ऐकिवांत आहे, ती ऐकिली असतां, गेल्या पन्नास वर्षांपूर्वींचें गोमांतकांतील शिक्षण व धर्मश्रद्धा यांचें सहज अनुमान होण्यासारखें आहे. ती गोष्ट आम्हीं येथें देतों. एकदां येथील कुलीन गर्भश्रीमंताचे घरीं एक गरीब ब्राह्मण कांहीं याचना करण्याकरितां आला. ब्राह्मण दुरुन आला असल्यामुळें बराच थकून गेला होता; यास्तव त्या श्रीमंतानें त्यास एक तपेली देऊन आपल्या गोठयांत भात करुन जेवण्यास सांगितलें. ब्राह्मण मोठा कर्मनिष्ठ व पवित्र आचरणाचा होता. भगवद्गीतेचा नित्य निदान एक अध्याय तरी वाचल्यावांचून तो अन्नग्रहण करीत नसे. ब्राह्मणानें भात चुलीवर ठेविला व संध्यावंदनादि करुन भगवद्गीता वाचण्याकरितां बसला. ब्राह्मण भगवद्गीता वाचतो हें कळतांच यजमान रागानें धांवत धांवत गोठयांत आले व म्हणाले "अहो ! आमच्या भरलेल्या घरांत ही गीता कां वाचतां ? तुम्हांस वेडबीड तर लागलें नाहीं ना ? कोणी आसन्नमरण असेल तर त्याच्या जवळ मात्र गीता वाचतात. बर्‍या बोलानें येथून निघू चला; नाहीं तर हांकून लावूं." अशी हीं श्रीमंतांचे तोंडचीं शब्दमौक्तिकें पाहून ब्राह्मणास काय वाटलें असेल, त्याची कल्पनाच केली पाहिजे ! बिचारा ब्राह्मण तसाच उठून चंबूगवाळें घेऊन चालता झाला ! श्रीमंत व कुलीन घराण्यांत जर अशिक्षितपणामुळें असें घनघोर अज्ञान भरलेलें होतें, तर मग सामान्य जनसमूहाची शोचनीय स्थिति काय वर्णन करावी ? दु:खामागून सुख या सृष्टिनियमानुसार अज्ञानाचाही काल मधून मधून येत असतो. आमच्या प्रांतांत सर्वत्र असें गडद अज्ञान पसरल्यावर भगवंतास आमची करुणा येऊनच कीं काय, वेदप्रतिपादित सनातन धर्माचा प्रसार करण्याकरितां भक्तिज्ञानसंपन्न महानुभाव श्रीकृष्ण भट्ट बांदकर यांचा अवतार झाला. त्यांचें संक्षिप्त चरित्र आम्ही येथें देतों. गोव्याची राजधानी जें पणजी शहर, त्यापासून सुमारें तीन कोसांवर डोंगरी या नांवाचा एक लहान गांव आहे. हा गांव लहानशा एका डोंगराच्या पायथ्यासभोंवती वलयाकार बसला असल्यामुळें, त्यास डोंगरी हें अन्वर्थक नांव प्राप्त झाल आहे. या गांवांत जगन्नाथ भटजी या नांवाचे अत्यंत सात्त्विक, कर्मनिष्ठ व पवित्र आचरणाचे एक ब्राह्मण रहात असत. ते रुक्मिणी-पांडुरंगाचे नि:सीम भक्त होते. ते कीर्तन करीत तेव्हां विठ्ठलनामाच्या गजरांत देहभान विसरुन जाऊन त्यांची पगडी देखील खालीं पडत असे. ते नित्य पांडुरंगाचें भजन करीत व त्या वेळीं त्यांच्या नेत्रांतून एकसारख्या प्रेमाश्रूंच्या धारा चालत असत. भजन करितेवेळीं ते पांडुरंगास बसण्याकरितां म्हणून समोर एक पाठ ठेवीत व त्यावर फुलें टाकित असत. आणि भजन समाप्त झाल्यावर पांडुरंगाचा प्रसाद म्हणून तीं फुलें लोकांस वांटून देत. असें सांगतात कीं, त्या वेळीं त्या फुलांचा नैसर्गिक गंध नाहींसा होऊन त्यांस बुक्याचा घमघमाट येत असे. ही गोष्ट प्रत्यक्ष पाहिलेली कांहीं वृद्ध मंडळी अजून डोंगरीवर आहे. जगन्नाथ भटजींस एका प्रसिद्ध ज्योतिष्यानें "तुमचा देह अमुक वर्षी अमुक तिथीस कोणत्याही एका पुण्यक्षेत्रीं पडेल" असें सांगितलें होतें. पुढें जगन्नाथ भटजी शके १७६७ विश्वावसु संवत्सरांत नवरात्राच्या सुमारास श्रीवेंकटगिरीवर यात्रेस जावयास सहकुटुब निघाले. तेथें सहस्त्र ब्राह्मणभोजन घालण्याचा त्यांचा विचार होता; परंतु सांपत्तिक स्थिति तशी नसल्यामुळें त्यांनीं फक्त मानसिक ब्राह्मणभोजन घालण्याचा निश्चय केला व आश्विन शु॥ ५ दिवशी प्रात:काळीं स्नानसंध्या वगैरे करुन ते पूर्वाभिमुख ध्यानस्थ बसले. त्यांनीं आपल्या मनांतच स्वयंपाकसिद्धता करुन पात्रें वाढिलीं व मानसिक ब्राह्मणांच्या अनेक पंक्ती अनेक खेपा जेवविल्या. प्रतिक्षणीं "घ्या ! गोविंदा !" एवढाच काय तो ब्राह्मणांस भोजनसूचना देणारा त्यांचा शब्द लोकांस ऐकूं येत होता. बाकी त्यांचें सर्व मानसिकच चाललें होतें. शेवटीं, त्यांच्या संकल्पाप्रमाणें सहस्त्र ब्राह्मणांचें भोजन झाल्यावर "पुंडलीकवरदा हरिविठ्ठल !" असें म्हणून एकदम त्या सत्पुरुषानें आपला पवित्र देह, पवित्र तिथीस, त्या अत्यंत पवित्र क्षेत्रीं ठेवून आपण निर्याण केलें ! हेंच आमच्या प्रस्तुत चरित्रनायकाचें तीर्थरुप होत. कांही अपवादक स्थळें वेगळीं केलीं असतां साधुसंतांचें जन्म नेहमीं पवित्र कुलांतच झालेलें आढळतें. "अथवा योगिनामेव कुले भवति धीमतां" या भगवदुक्तीप्रमाणें सज्जनास अवतार घेण्यास योग्याचेंच कुल पाहिजे असतें. शिवाय, ज्यांनीं प्रेमबळानें भगवंतास आपलासा करुन घेतला आहे, त्या आपल्या हृदयरंजक भक्तोत्तमास भगवान्‍ विषयलुब्ध व अपवित्र मातापितरांच्या उदरांत जन्म कसें देईल ? याचसाठीं श्रीकृष्ण भटजीमहाराजांस परमात्म्यानें जगन्नाथभटजींच्या पोटीं जन्म देऊन आपलें वचन व भक्तवात्सल्य स्पष्ट करुन दाखविलें. श्रीकृष्ण भटजीमहाराजांचें जन्म शके १७६६ क्रोधी संवत्सरांत आषाढ शु०११ एकादशीच्या महापर्वणीस झालें. मागें सांगितल्याप्रमाणें वेंकटगिरीवर जेव्हां जगन्नाथ भटजींचे निर्याण झालें, त्यावेळीं भटजी महाराज तेथें होते. तेव्हां त्यांचे वय अवघें पंध्रा महिन्याचें होतें. तीर्थरुप निवर्तल्यावर भटजीमहाराजांचे लालनपालन त्यांचे चुलते मुकुंदभटजी हे करीत होते. "प्रसादचिन्हानि पुर:फलानि" या कविकुलगुरुक्तीप्रमाणें भटजीमहाराजांचें भावी प्रच्छन्नभाग्य लहानपणींच त्यांच्या खेळांतेही दिसून येऊं लागलें. नारळीच्या पिडयास लहान लहान काठ्यांच्या खुंट्या लावून त्यांस काथ्याच्या दोर्‍या बांधाव्या आणि त्याचा तंबोर्‍याऐवजीं उपयोग करुन इतर मुलांस जवल बसवावें व आपण कीर्तन करावें, हाच त्यांचा लहानपणींचा आवडीचा खेळ होता ! " मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात" म्हणून म्हणतात तें खोटें नव्हे. भटजीमहाराजांची बुद्धि उपजतच महातीव्र होती. त्यांचें मराठी शिक्षण अक्षरांची ओळख पटण्यापुरतेंच झालें होतें. डोंगरीवरील प्रसिद्ध विद्वान गृहस्थ कै० हरिबाबा मुर्कुंडीकर यांचेजवळ त्यांनीं रुपावली व रघुवंशाच्या दुसर्‍या सर्गाचे फक्त १४ श्लोक काव्यपद्धतीनें म्हटले होते. याशिवाय दुसरीकडे कोठेंही त्यांनी कसलेंच अध्ययन केलें नाहीं; तरीही भागवतासारख्या दुर्बोध ग्रंथाचा ते सहज अर्थ लावीत असत, यावरुन भटजीमहाराज हे खचित कोणीतरी योगभ्रष्ट सत्पुरुष होते असें म्हटल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. "तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं" या भगदुक्तीप्रमाणें त्यांच्या तीव्र पूर्वसंस्काराचा या जन्मांत उदय झाला. हेंच खरें नाहीं तर, संस्कृतासारख्या दुर्जेय भाषेंत कांहींच अध्ययन नसतां इतकी गति होणें अगदीं दुरापास्त आहे.

भटजीमहाराजांचा कुलपरंपरागत धंदा भिक्षुकीचा होता. त्यांचे चुलते मुकुंदभटजी हेही याज्ञिकीच करुन कुटुंबाचा निर्वाह चालवीत होते. भटजीमहाराजांचा स्वभाव फार तेजस्वी असल्यामुळें, त्यांस परक्याच्या द्वारावर याचना करुन पोटाची वीतभर खळगी भरण्याचीही याचकवृत्ति अगदीं आवडत नसे. पण, "पळत्यापाठीं ब्रह्मराक्षस" या न्यायानें भटजीमहाराज १८/१९ वर्षांचे असतां त्यांच्या चुलत्यांनीं आपली इहलोकची यात्रा संपविली; व कुटुंबपोषण अर्थातच भटजीमहाराजांवरच येऊण पडलें. त्यांस निर्वाहाचें दुसरें काहींच साधन नसल्यामुळें जरी भिक्षुकीचा कंटाळा येई, तरी मुकाटयानें तीच कुलपरंपरागत वृत्ति स्वीकारुन कुटुंबभरण करणें भाग झालें. आपल्या वृत्तीची त्यांस मनस्वी किळस येत होती, हें त्यांच्याच कवितेंतील अनेक उक्तींवरुन सिद्ध होतें. त्यांनीं स्वत: आपल्या हकीकतीचें एक पद केलें आहे, त्यांत त्यांचें "भिक्षुकि वृत्ती करितां आला मनिं कंटाळा" असे स्पष्ट उद्गार आहेत. अशा रीतीनें त्रासून त्रासून पांच सहा वर्षे त्यांनीं कसेंबसे कुटुंबपोषण केलें. या जाचांतून देवानें आपणास सोडवावें म्हणून रात्रीच्या रात्री जागरण करुन त्यांनी ईश्वराचा धांवा करावा व मोठयानें भजन करुन देवास आळवावें. तरीही त्रासांतून मोकळें होण्याचा कांहीं मार्ग दिसेना. जिचा मनापासून त्यांस तिरस्कार वाटत होता ती वृत्ति चालवून तरी निर्वाह होता बरें होतें. परंतु, तसें न होतां उपवास काढण्याचेही अनेक प्रसंग जेव्हां येऊं लागले, तेव्हा मात्र भटजीमहाराज फारच गांजून गेले व दारिद्र्य आणि मनस्ताप यांनीं त्यांस अगदीं वेडें करण्य़ाच्या बेतांत आणिलें. दु:खाचा अतिरेक झाल्यांवाचून सुखाची खरी गोडी समजत नाहीं. उन्हांतून श्रमून आलेल्या तृषित पांथस्थास पाण्याची जी गोडी असते ती गोडी घरांत बसून असलेल्या सुखवस्तू गृहस्थास असणें शक्य नाहीं; तसेंच, अनेक संसारतापांनीं ज्यांचें हृदय पोळून गेलेलें असतें त्यांसच भगवत्स्वरुपसाक्षात्काराच्या शाश्वत सुखाची खरी किंमत कळून येते. समर्थांनीं दासबोधांत म्हटलें आहे: -


संसारदु:खें दुखवला, त्रिविधतापें पोळला ।
तोचि एक अधिकारी झाला, परमार्थासी ॥१॥

भटजीमहाराजही अनेक प्रकारच्या संसारदु:खांनीं पोळून गेले असल्यामुळें परमार्थाचे खरे अधिकारी बनले होते, हें निराळें सांगण्याची गरज नाहीं. गोमांतकांतील प्रसिद्ध देवस्थान श्रीक्षेत्र बांदिवडें येथें रा.रा. मण पै या नांवाचे एक परम सात्त्विक व अंतर्निष्ठ गृहस्थ राहत असत. ते भटजीमहाराजांचे प्रेमळ मित्र होते. एके दिवशीं भटजीमहाराज त्यांचे येथे गेले होते, तेव्हां रा. मण पै हे यथार्थदीपिका वाचित होते. त्यावेळीएं "तद्विद्वि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया" या श्लोकावरील पंडितांचें सुरस व्याख्यान रा. मण पै आपल्या रसाळ शब्दांनीं श्रोत्यांस समजावून देत होते. संतांचा महिमा असा अनिर्वचनीय आहे व त्यांस शरण गेलें असतां ते तत्काळ जीवांस भवबंधमुक्त करितात, हें ऐकतांच भटजीमहाराजांस फार आनंद झाला. वाचून संपल्यावर मण पैजवळ भटजीमहाराजांनीं मोठया उत्सुकतेनें प्रश्न केला कीं "असे जगदुद्धारक संत आज या जगतीतलावर आहेत काय ?" मण पैनीं उत्तर दिले "होय, पुष्कळ आहेत !" भटजींनीं विचारिलें " कोठें आहेत तें कृपा करुन आम्हांस सांगा." त्यावर मण म्हणाले, "भवबंध नाहींसा करणारे दीनदयाळ संत सर्वत्र भरलेले आहेत. आम्हां विषयांधांस मात्र त्यांची परीक्षा होत नाहीं." हें ऐकून भटजींनीं लागलेंच मण पैचे चरण धरिले व म्हणाले, " असें आहे तर, आपणच कृपा करुन मला भवबंधापासून मुक्त करण्याजोगें उपदेशामृत पाजा." त्यावर मण पै म्हणाले, "कृष्णभटजी ! मीं तुम्हांस भवबंधविच्छेदक ज्ञानोपदेश केला असता; परंतु आपण विद्वान व संस्कृतज्ञ आहां. आपल्या कांही शंका असल्यास, त्यांचें समाधान करण्याचें कदाचित्‍ मला जड जाईल; व असें झालें म्हणजे सहजच माझ्यावरील श्रद्धा कमी पडेल. पंडितांनीं याविषयीं आपल्या यथार्थदीपिकेंत सांगितलें आहे.

शिष्यसंदेह न शके हरुं । तो अनुभवीही न म्हणवे गुरु ।
कल्पिले पदार्थ नेदी तरु । तो कल्पतरु कैसा म्हणावा ? ॥१॥
म्हणोनि शास्त्रज्ञ आणि अनुभवी । साजे त्याला गुरुत्वपदवी ।
तोचि जगद्गुरु गोसावी । कीं शास्त्रज्ञ आणि अनुभवी  परिपक्व ॥२॥
 
यास्तव, आपण तशाच प्रकारचे शास्त्रसंपन्न आणि अनुभवी सत्पुरुष पाहून त्यांस शरण जावें हें बरें. आतां असा सत्पुरुष तुला पाहिजे तर वेंगुर्ले येथें विष्णुबुवा सोमण या नांवाचे एक प्रसिद्ध व अनुभवसंपन्न रामदासी संत आहेत, त्यांस शरण जा, म्हणजे तुझा कार्यभाग होईल." मण पैंची ही अमृततुल्य वाणी ऐकून, भटजीमहाराजांचा आनंद गगनांत मावेनासा झाला. ते तसेच उठून घरीं आले, व दुसर्‍याच दिवशीं म्हणजे शके १७९१ शुक्ल संवत्सर आषाढ व॥ ७ शुक्रवारीं पहांटेस कोणास नकळत एकटेच वेंगुर्ल्यास जावयास निघाले. त्यावेळीं खुद्द त्यांची गृहिणी दोन दिवसांची बाळंतीण होती व घरांत एक दाणाही शिल्लक नव्हता. असें असून मागचा पुढचा कसलाच विचार न करितां भटजीमहाराजांची स्वारी एकदम बाहेर पडली. मनुष्यास एकदां तीव्रतर विरक्ति झाल्यावर, मग घरदार, बायकापोरें यांवरचा मोह पार उडून जाऊन त्यास, आपण केव्हां एकदां शाश्वतसुखसंपन्न होऊं, असें होऊन जातें. बायकापोरांचा मोह सोडणें हें आमच्यासारख्या प्राकृतांस जरी कठीण वाटतें तरी सत्पुरुषास एका परमात्म्यापुढें त्याची कांहींच मातबरी दिसत नाहीं. समर्थ म्हणतात:-

सांडुनि आपली संसार कांता । करीत जावी देवाची चिंता ।
निरुपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याच सांगाव्या ॥१॥
देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी ।
सर्व अर्पावें शेवटीं । प्राण तोही वेंचावा ॥२॥

हरिभक्तींचे खरें लक्षण हेंच होय. प्रर्‍हादानें आपल्या बापाची आज्ञा मोडिली खरी, परंतु त्यानें भगवंताची प्राप्ति करुन घेतली. ध्रुवानें आईबापांचा त्याग केला पण अचल असें परब्रह्मपद मिळविलें. भरतानें आपल्या आईचा उपमर्द केला परंतु परमात्मा श्रीरामाचे ठायीं अनन्यत्व संपादन केलें. समर्थ रामदासस्वामींनीं बंधु, आई व घरदा यांचा त्याग केला, परंतु आपण कृतार्थ होऊन सर्व भरत-भूमीच्या लोकांस चिरकाल स्मरण राहील अशी अजरामर कीर्ति संपादिली. भटजी महाराजांनींही आपल्या प्रसूतपत्नींची उपेक्षा केली पण, निरतिशयानंदपरिपूर्ण अस परब्रह्मस्वरुप साध्य केलें. तें यासच अनुसरुन होय. आषाढ महिना, भरपावसाळ्याचे दिवस ! बरोबर एक कागदाची फाटकी छत्री; भागवत, यथार्थदीपिका वगैरे दोनचार पुस्तकें पाठीस बांधलेली; अंगावर एकच पैरण व एक धोतर; अशा सामग्रीनें, भटजीमहाराजांची स्वारी पूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा गांवांतून व रानांतून प्रवास करीत करीत जाऊं लागली. रात्र पडली कीं कोठेंतरी एका गोठयांत निजावें, व सकाळ झाली कीं चालावें. अशा रीतीनें, पोटांत अन्नाचा लेश नसतांही पावसांतून भिजत भिजत दोन दिवस प्रवास केला व तिसर्‍या दिवशीं वेंगुर्ले गांठिलें. भटजीमहाराज घरांतून बाहेर निघून वेंगुर्ल्यास येईपर्यंत पावसानें एकसारखी वृष्टि चालविली होती, त्यामुळें, अंगावरील सर्व कपडे भिजून चिंब झालेले होते. क्षुधेमुळें पायांत अगदीं त्राण राहिलें नव्हतें. अशा स्थितींत हळु हळु चालत व बोवांचे घर विचारीत विचारीत भटजीमहाराज अगदीं नेमकेच आपल्या इष्टस्थळीं आले; परंतु, तेंच विष्णुबोवांचे निवासस्थान हें मात्र भटजी महाराजांस ठाऊक नव्हतें. बाहेर ओटीवरच विष्णुबोवा पंचदशीचें पुस्तक घेऊन त्यावर व्याख्यान करीत होते व जवळ बरीच शिष्यमंडळी श्रवनार्थ बसली होती. भटजीमहाराजांनीं खुद्द बोवांस हाक मारुन त्यांकडे "विष्णु बोवा सोमण म्हणतात त्यांचें घर कोठें आहे ?" असा प्रश्न केला. ते म्हणाले "कां ? त्यांच्याकडे आपलें काय काम आहे ?" भटजी महाराज आधींच प्रवासामुळें थकून गेले होते. त्यांत, त्यांच्या सरळ प्रश्नास हें विचित्र उत्तरें ऐकून त्यांस फार वाईट वाटलें व ते पुन: म्हणाले, "महाराज ! ते कोठें राहतात तेवढें मला कृपाकरुन सांगा. मला त्यांचेकडे थोडें नाजूक काम आहे." हें ऐकून बोवांच्या शिष्यमंडळींस भटजीमहाराजांची करुणा आली व ते त्यांस म्हणाले, "अहो ! ज्यांचेजवळ आपण बोलत आहां तेच आपले उद्दिष्ट गृहस्थ होत व हाच त्यांचा आश्रम आहे." हें ऐकून, ज्यांचेकरितां आपण इतके त्रास सोसून आलों ते सद्गुरु आपणास भेटले म्हणून भटजीमहाराजांस जो आनंद झाला त्याचें वर्णन करणें अशक्य आहे. त्या आनंदातिरेकासरसा पावसाचें पाणी खळखळां वाहत असलेल्या त्या आंगणांतच त्यांनीं बोवांस दीर्घदंड नमस्कार घातला. हस्तादिकांचा आश्रय सुटतांच जसा एकादा अचेतन दंड एकदम खालीं पडतो, तसे भटजीमहाराजांनीं निरभिमानत्वानें सद्गुरुंस लोटांगण घातलें अशा प्रणिपाताचें वर्णन वामन पंडित आपल्या यथार्थदीपिकेंत करितात:-

शरणागतीचें लक्षण । प्रथम हें की आपण ।
काहीं नेणे टोणपा अविचक्षण । सर्वज्ञ तूं मज उद्धारीं ॥१॥
या भावें प्रणिपात । करावा प्रकर्षे शरीराचा निपात ।
तो दंडवत कीं अकस्मात्‍ । पडे जैसा टोणपा ॥२॥
तो टोणपा ढकलितां पडों जाणे । परी पडला उठों नेणे ।
कीं मस्तका पद्महस्त बाणे । उठे प्रभावें तयाच्या ॥३॥
अचेतन दंड पडला । तो टोणपा सचेतने उचलिला ।
तैसा जडात्मत्व जाणणार याला । उचली कोणचिदात्मत्वें त्यावांचुनी ॥४॥

भटजीमहाराजांनीं असें पावसांतच लोटांगण घातलेलें पाहून विष्णुबुवांस परमाश्चर्य वाटलें. हा कोणीतरी परमविरक्त व संसारतप्त गृहस्थ असावा अशी बोवांची खात्री झाली. बोवांनी बराच वेळ वाट पाहिली. पण, भटजी कांहीं उठेनात ! तो त्यांचा दृढ निश्चय पाहून स्वत: विष्णुबोवांनीं पावसांतच जाऊन त्यांस उठविलें व घरांत घेऊन आले. भटजीमहाराजांचें सर्व वृत्त समजून घेतल्यावर बोवांस अत्यंत हर्ष झाला. कारण:-

सद्गुरुवीण सच्छिष्य । तो वांयां जाय नि:शेष ।
कां सच्छिष्येंवीण विशेष । सद्गुरु शिणे ॥१॥
उत्तम भूमी शोधिली शुद्ध । तेथें बीज पेरिलें कीडखाद ।
कां तें उत्तम बीज परी संबंध । खडकेंसी पडला ॥२॥
X  X  X  X
तैसें एकावीण एक । होतसे निरर्थक ।
परलोकीचें जें सार्थक । तें दुरी दुरावे ॥३॥
म्हणोनि सद्गुरु आणि सच्छिष्य । तेथें न लगती सायास ।
त्या उभयतांचा हव्यास । पुरे एकसरां ॥४॥
X  X  X  X

सच्छिष्यास जशी सद्गुरुची, तशीच सद्गुरुस सच्छिष्याची फार गरज लागते. हें श्रीसमर्थांच्या वरील वचनावरुन स्पष्ट दिसत आहे. असा अधिकारी शिष्य देवानें आपणास दिला, हें पाहून विष्णुबोवांसही परमानंद झाला व दुसर्‍याच दिवशीं त्यांनीं भटजीमहाराजांस महावाक्योपदेश केला. सद्गुरुंनीं जें काय त्यांस सांगितलें तें त्यांनीं आपल्या "स्वात्मतत्त्वामृतशतक" नांवाच्या ग्रंथांत मुमुक्षुजनांच्या हितार्थ श्लोकबद्ध करुन ठेविलें आहे. हा ग्रंथ प्रत्येक मुमुक्षूनें वाचण्याजोगा आहे.

विष्णुबोवांनी याप्रमाणें भटजीमहाराजांवर अनुग्रह करुन त्यांस प्रपंचव्यवहार दक्षपणानें चालविण्याविषयीं बराच उपदेश केला व श्रीसीतारामचंद्राची प्रतिमा पुजून तिचा सांप्रदायाप्रमाणें नित्य भजनपूजनविधि करण्यास सांगून, त्यांस घरीं जाण्यास आज्ञा दिली. भटजीमहाराजांची घरीं जाण्याची मुळींच इच्छा नव्हती. परंतु घराकडून त्यांच्या शोधार्थ दोन तीन मंडळी आली होती, त्यांनीं विष्णुबोवांस विनंति केल्यावरुन बोवांनीं भटजींस घरीं जाण्याविषयीं आग्रह केला; त्यामुळें, निरुपाय होऊन ते परत घरीं आले. गोमान्तकांतील बोरी या नांवाच्या गांवांत सांवळा म्हणून एक अत्यंत हुशार कारागीर आहे. त्यास भटजीमहाराजांनीं गुर्वाज्ञेप्रमाणें श्रीसीतारामाची लांकडी प्रतिमा करण्य़ास सांगितलें. तो एके दिवशीं श्रीसिद्धनाथ पर्वतावर कांही कामाकरितां जात असतां, वाटेंत त्याच्या मनांत अकस्मात्‍ असा विचार आला कीं, भटजींनीं लांकडी प्रतिमा करुन द्यावी. असा संकल्प करुन तो आपल्या कामास गेला. परत येतांना, ज्या ठिकाणीं पूर्वी त्याच्या मनांत प्रतिमा पाषाणाची करावी असा विचार आला होता, त्याच जागीं पोंचल्यावर, पुन: तोच विचार त्याच्या मनांत आला व तो तसाच पुढें चालून जाऊं लागला. तो त्या जागेपासून पांच दहा हात पुढें गेला तोंच त्याचे पाय आंखुडल्यासारखें त्यास वाटूं लागले. खालीं पायांकडे पाहिलें तेव्हां पाय बरेच सुजल्यासारखे दिसूं लागले ! तरीही तो तसाच आणखी दहावीस हात पुढें गेला. तो जितका जितका पुढें गेला, तितकी तितकी त्याच्या पायास जास्त कळ लागूं लागली व पाय तर फुगून खांबासारखे झाले !! शेवटीं, जेव्हां पायच पुढें टाकतां येईना, तेव्हां तो मागें फिरला. मागें फिरतांच कळ थोडी हलकी झाली व तसाच परत मूळच्या जागेवर येईतोंपर्यंत क्रमाक्रमानें ठणका कमी होत जाऊन कळा अगदी बंद झाल्या व पाय पूर्ववत्‍ झाले ! हा काय चमत्कार असावा, याचा त्यास कांहींच अजमास होईना. त्यानें चोहोंकडे न्याहाळून पाहिलें, तों जवळच एक लहानसा काळा पाषाण पडलेला त्याला दिसला. तो कारागीर मोठा धूर्त होता. त्यानें मनांत असा विचार केला कीं, ज्या अर्थी एकाएकीं याच स्थानीं आपणास पाषाणाची प्रतिमा करण्याची स्फूर्ति झाली व त्याच प्रतिमेजोगी शिलाही येथें आहे, त्याअर्थी, याच शिलेची ती प्रतिमा करण्यासंबंधानें ही मला श्रीरामाची सूचनाच झाली असावी व त्या सूचनेचा अनादर करुन मी पुढें गेलों म्हणून मला हा प्रतिबंध झाला असेल. असा विचार करुन त्यानें ती शिला आपले बरोबर घेतली व मग निर्विघ्नपणें घरीं आला. दुसर्‍या दिवशीं दुपारीं जेव्हां त्यानें त्या मूर्तीच्या कामास आरंभ केला तेव्हां, बरोबर बारांची तोफ झाली. ती रामजन्मकालसूचक तोफ ऐकून त्या कारागिरास तो शुभशकुनच वाटला व त्यानें मोठया उत्साहानें व काळजीपूर्वक ती सीतारामाची प्रतिमा तयार केली. ती प्रतिमा, त्यानें भटजीमहाराजांकडे देऊन त्यांस घडलेलें सर्व वर्तमान निवेदन केलें. तें ऐकून भटजीमहाराजांस परमानंद झाला. तीच प्रतिमा प्रस्तुत डोंगरी येथील श्रीराममंदिरांत उच्चासनावर विराजमान असून सकल सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण करीत आहे. त्या प्रतिमेच्या साक्षात्काराच्या अनेक गोष्टी आम्हांस त्यांपैकीं एकच महत्त्वाची गोष्ट खालीं देतों.
भटजीमहाराजांच्या घरांत त्यांचीच एक चुलतसासू आहे. तिला सर्व डोंगरावरील लोक "आजीबाई" म्हणतात. ही स्वभावानें श्रद्धाळू व देवभोळी आहे. तिची म्हाडदोळ येथील श्रीमहालसेवर फार श्रद्धा होती. तिच्या जत्रेस ती कधींच गेल्यावांचून राहत नसे. एकदां तिच्या जत्रेच्या पूर्वदिवशीं भटजीमहाराजांस कांहीं सद्भक्तमंडळींच्या विशेष आग्रहावरुन दूरच्या एका गांवी जावें लागलें. जातांना भटजीमहाराजांनीं आजीबाईस सांगितलें कीं, "पहा ! मी तर हा निघालों. घरांत तुझ्यावांचून जाणतें कोणी नाहीं. कोणाही पूजा जाणणार्‍याकडून श्रीरामाची पूजानैवेद्य वगैरे संपादून घे. तुला उद्यां तुझ्या वार्षिक नियमाप्रमाणें महालसेच्या दर्शनास जातां येणार नाहीं, त्याबद्दल वाईट वाटूं देऊं नकोस. श्रीराम व महालसा ही कांहीं निराळी नाहींत. एकाच परमात्म्यानें प्रसंगोपात्त घेतलेले हे निरनिराळे अवतार होत. यास्तव, हीच महालसा समजून तूं उद्यां इकडे रहा." भटजीमहाराजांच्या आज्ञेप्रमाणें आजीबाई म्हाडदोळास न जातां घरींच राहिली, परंतु, वार्षिक महालसादर्शन चुकलें म्हणून तिच्या मनास फार वाईट वाटलें. तिनें गांवांतील देवपूजा येत असलेला एक मुलगा पाहून त्याचेकडून श्रीरामाची षोडषोपचारें पूजा करविली. नैवेद्य दाखवून झाल्यावर मंगलार्तिक्याचे वेळीं आरती फिरवितांना त्या मुलास श्रीरामाच्या मूर्तीऐवजीं दुसरीच मूर्ति दिसूं लागली ! आजीबाई ! इकडे येऊन हा काय चमत्कार आहे तो पहा." आजीबाईनीं बाहेर येऊन पाहिलें, तो श्रीराम महालसा नटलेला आहे ! आजीबाईचा आनंद गगनांत मावेनासा झाला. तिनें प्रेमाश्रूंनीं आपलें हृदय भिजवून टाकिलें ! आपणाकरितां भगवंतास हे श्रम घ्यावे लागले असें जाणून तिचा कंठ भरुन आला व तिनें महालसारुपधारी श्रीरामाचे आपल्या भाबडया भोळ्या शब्दांनीं पुष्कळ स्तुतिवाद गाइले. तिनें गांवांतील अनेक लोकांस जमवून हें कौतुक दाखविलें. ही गोष्ट दुपारीं १२ वाजतां घडली. आजीबाई महालसारुपधारी रामाजवळ बसून होती. शेवटीं, सुमारें सायंकाळचे चार वाजतां अकस्मात्‍ महालसारुप नाहींसे होऊन पूर्ववत्‍ श्रीरामाची मूर्ति दिसूं लागली !! आपल्या भोळया भक्तांकरितां देव काय करील आणि काय न करील, याचा नेम नाहीं ! ही आजीबाई अजून हयात आहे. ती अतिशय वृद्ध झाली आहे, तरीही तिच्याकडे वरील गोष्ट कोणीं विचारिली असतां तिला मोठें स्फुरण येतें व ती फार प्रेमानें घडलेली सर्व हकीकत सांगते. पाश्चात्य शिक्षणामुळें विचारभ्रष्ट व धर्मश्रद्धाहीन होऊन भौतिक सुधारणेच्या पोकळ लखलखटानें ज्यांचे डोळे दिपून गेले आहेत, अशा कांही आधुनिक सुधारकांस पूर्वीचीं आमचीं पुराणें व तत्तदवतारविशिष्ट भगवल्लीला अगदीं खोटया वाटतात. सीताविरहमिषानें श्रीरामांनीं वृक्षपाषाणादिकांस आलिंगन देऊन त्या त्या रुपानें असलेल्या देवगंधर्वादिकांस शापांपासून मुक्त केलें; तसेंच आपल्या भक्तांच्या हेतुस्तव परमात्मा अनेक वेळां अवतार घेत असतो; हें ऐकून प्रस्तुतचे सुधारक लागलेच "इंम्पोस्सिबल" किंवा "नोन्सेस" म्हणून नाकें मुरडितात. परंतु असे चमत्कार आज देखील घडत असलेले पाहून सुधारक आपला हेका सोडित नाहींत, हें मोठेंच आश्चर्य नव्हे काय ? भटजीमहाराज नेहमीं म्हणत असत कीं, "आमच्या सीतारामाच्या प्रतिमेची शिला हा कोणातरी शापभ्रष्ट देवादिकाचा देह असून, त्याचा शापमोक्षकाल जेव्हां जवळ आला, तेव्हां परमात्म्यानें त्यास आत्मस्वरुप केलें." म्हणजे श्रीसीतारामाचा दिव्य देह देऊन नित्य पूजाअर्चाश्रवणकीर्तनरुप आत्मभाग्य त्यास अर्पण करुन मुक्त केलें. शके १७९३ प्रजापति संवत्सरांत भटजीमहाराजांनीं आपल्या घरांतच श्रीसद्गुरु विष्णुबोवा यांच्या हातानें श्रीसीतारामाच्या प्रतिमेची प्रतिष्ठा केली. श्रीसद्गुरु विष्णुबोवा यांचें भटजीमहाराजांवर नि:सीम प्रेम होतें. ते डोंगरीवर आले म्हणजे आपल्या हातानें माती आणून भटजीमहाराजांच्या घराचीं बिळें व भिंतीच्या भेगा पुरुन नीट करीत असत. भटजीमहाराजांनीं सद्गुरुंस साष्टांग नमस्कार घालून तसें न करण्याविषयीं परोपरी विनंति करावी, पण ते म्हणत कीं, "कृष्णा ! अरे, तुला या जाग्याचा महिमा ठाऊक नाहीं. येथें अनेक संत येऊन आपल्या पवित्र चरणराजांनीं ही जागा पुनीत करितील व हिचा महिमा यावच्चंद्रदिवाकरौ सर्व भूमंडळांत गाजत राहील. यास्तव या संतमंदिराची मी जी ही अल्पसेवा करितों, तिचा तूं मुळींच निषेध करुं नकोस." भटजीमहाराजांचे घर अगदीं जुन्या पद्धतीचें असल्यामुळें तेथें श्रीरामनवमीचा वगैरे उत्सव होण्यास फारच अडचण पडूं लागली. नवीन देऊळ बांधावें, तर गोव्यांत देऊळ बांधण्याचा कडक प्रतिबंध, यास्तव घरास राहून देवळास देऊळ तयार व्हावें म्हणून मोठया चातुर्यानें भटजीमहाराजांनीं तें तशा रीतीनें नवीन बांधविलें, व त्या मंदिरांत शके १८०६ तारण संवत्सरांत ज्येष्ठ शु०९ मीस पूर्वी घरांत स्थापन केलेली श्रीसीतारामाची प्रतिमा आणून ठेविली व त्या दिवशीं मोठया थाटानें उत्सव केला. अशा रीतीनें गुर्वाज्ञेप्रमाणें भजन पूजन इत्यादि सांप्रदायाचा विस्तार करुन अनेक संसारतप्त मुमुक्षूंस आपल्या अमृततुल्य रसाळ वाणीच्या सदुपदेशानें भवबंधनापासून मुक्त केलें व जढमूढांचा उद्धार करुन लोकांस श्रीरामभजनीं लाविलें. लक्ष्मण या नांवाचा एक कुंभार भटजीमहाराजांचा एकनिष्ठ शिष्य होता. तो भक्तिज्ञानवैराग्याचा केवळ पुतळाच असून त्यानें आपलें बहुतेक आयुष्य गुरुसेवेंतच घालविलें होतें. श्रीरामाचा जसा हनुमान्‍ अत्यंत प्रेमळ भक्त व सेवक, तसाच लक्ष्मण कुंभारही भटजी महाराजांचा निष्ठावंत शिष्य व नम्र सेवक होता. भटजी महाराजांनीं त्याचेकरितां खालील साधनोपदेशपर अभंग तयार केला होता: -

गुरुराज बोले, अरे शिष्यराया ! ! एकांतीं बैसाया उबळूं नये ॥१॥
उबगूं नये कधी साधन करितां । क्षण एक रिता राहूं नको ॥२॥
राहुं नको दासबोध ग्रंथावीण । आत्मा हा आपण अनुभवाचा ॥३॥
अनुभव साधीं आपण एकला । सकल दृश्याला साक्षी तो मी ॥४॥
साक्षी तो मी जो हा वायु उठे त्याचा । उठल्या वृत्तीचा मीच साक्षी ॥५॥
मीच साक्षी एक वृत्ती या अनेक । पाहतों कौतुक एकला मी ॥६॥
एकला मी पाठीं, वृत्ती पुढें दिसे । संग मज नसे या वृत्तेचा ॥७॥
या वृत्ती ऊठती मजपुढें सार्‍या । देखणा मी बर्‍या वाईटाचा ॥८॥
बर्‍या वाईटाचा संग नसे मज । साक्षी मी सहज दिसे त्याचा ॥९॥
दिसे त्याच्या पाठी आहें मी एकला । पाहणार झाला मोकळा मी ॥१०॥
मोकळा मी देह इंद्रियांचा साक्षी । आपणातें लक्षी आपणची ॥११॥
आपणासी लाभ आपणाचा परी । अभ्यास हा करी गुरुबोधें ॥१२॥
करी गुरु बोध ऐसा सच्छिष्यास । म्हणे कृष्ण दास वैष्णवांचा ॥१३॥

वरील अभंगांत वर्णन केल्याप्रमाणें साधनसंपन्न होऊन लक्ष्मण कुंभार भटजी महाराजांच्या सेवेंत नित्य तत्पर असे. एकदां भटजीमहाराजांच्या स्वप्नांत ब्राह्मणरुपानें श्रीमारुतिराय येऊन त्यांनीं भटजींस आपल्या उच्चासनावर बसवून घेतलें व म्हणाले "आपल्या जवळ राहून नित्य आपल्या मुखानें अध्यात्मरामायण ऐकण्याची आम्हांस फार इच्छा झाली आहे. तर आम्ही येत्या महाएकादशीस इकडे येऊं" इतकें सांगून ब्राह्मणरुपधारी मारुतिराय गुप्त झाले. भटजी महाराजांनीं दुसर्‍या दिवशीं तें स्वप्न सर्वांस सांगितलें. इकडे लक्ष्मण कुंभार यासही त्याच रात्रीं स्वप्न पडलें कीं, "मी सांगें येथें अमुक अमुक ठिकाणीं मृत्तिकेंत पुरलेला आहें, माझा मुकुट तेवढा वर दिसत आहे. मला तिकडून डोंगरीवर पोंचीव मला भटजींच्या मुखानें अध्यात्मरामायण श्रवण केलें पाहिजे." हें व भटजीमहाराजांचें स्वप्न यांचा मेळ बसला व लक्ष्मण कुंभार सांगें येथें श्रीमारुतिरायास आणण्याकरितां निघाला. डोंगरीवरुन सांगें सुमारें ४५ मैल आहे. तेथें गेल्यावर त्यास ती खुणेची जागा मिळाली; परंतु, दिवसा मूर्तिं काढिल्यास कोणी तरी गांवकरी निषेध करितील, यास्तव लक्ष्मण कुंभार रात्र पडेपर्यंत तेथेंच राहिला व काळोख होतांच तो ती मूर्ति उकंरुंन वर काढूं लागला. मूर्ति मातीतून वर काढतेवेळीं " भों-ओं-ओं-औं" असा एक भयंकर ध्वनि झाला. तो ऐकून हें कांही तरी विघ्न आहे, असें समजून मारुतीस तसाच तिकडे टाकून तो कुंभार पळाला व एका देवळांत हरिभक्तिपरायण मुकुंदबोवा भागवत यांचें कीर्तन चाललें होतें, तेथें येऊन बसला. कांहीं वेळानें तेथेंच त्यास सडकून ताप भरला. व थोडा वेळ गेल्यानंतर निद्रा लागली आणि पुन: स्वप्न झालें कीं, "अरे वेडया ! मी आतां डोंगरीवर जाणार म्हणून आनंदाचा ध्वनि केला, त्यास तूं इतका भ्यालास काय ? ऊठ लवकर ! मला आतांच घेऊन डोंगरीवर चल. नाहींतर तुझा नाश करीन" असें स्वप्न होतांच लक्ष्मण खडबडून जागा झाला व पहांटेस उठून श्री मारुतिरायास एका मोठया पांटींत घालून त्यावर वस्त्र झांकून घट्ट बांधिलें होतें. मारुतिरायांची पांटी आगबोटीवर चढतांच आगबोट भाराक्रांत होऊन बरीच खालीं गेली. हें पाहून बोटीवरील कप्तान वगैरे लोकांस हें काय झालें ते समजेना. ते त्या पाटींत काय आहे तें पाहण्यासाठीं पांटीजवळ आले. परंतु, लक्ष्मणानें पांटी घट्ट पोटाशी धरिली व त्यांस हात लावूं दिला नाहीं. त्यानें सांगितलें कीं, यांत ब्राह्मणाचे सोवळे पापड आहेत, त्यांस तुम्ही शिवतां कामा नये. पणजास लक्ष्मण कुंभार याचे ओळखीची एक शूद्र बाई होती. तिला पूर्वरात्रीं स्वप्न झालें कीं, "उद्यां मी येणार. जागा चांगली सारवून वगैरे स्वच्छ करुन मला पाट मांडून ठेव." ती बाई फार श्रद्धाळू होती, तिनें विश्वासपूर्वक सर्व तयारी केली, इतक्यांत, लक्ष्मण कुंभार आगबोटीवरुन उतरुन तिच्याच घरीं आला. ही सर्व तयारे पाहून त्यास आश्चर्य वाटलें. बाईनें घडलेलें सर्व वर्तमान लक्ष्मणास सांगितलें. तें ऐकून त्यास फार आनंद झाला. मग त्या रात्रीं तो तिजकडे राहून दुसर्‍या दिवशीं सकाळीं, म्हणजे शके १८०७ पार्थिव संवत्सर आषाढ शु० एकादशीस श्रीमारुतिरायासह डोंगरीवर आला. भटजीमहाराजांस परमानंद झाला. त्यांनीं मारुतिरायास क्षेमालिंगन दिलें व श्रीरामाच्या गर्भगृहाबाहेरच्या बाजूस उजवीकडे त्याची स्थापना केली. हे मारुतिराय अत्यंत जागृत असल्यामुळें त्यांस डोंगरीवरील सर्व लोक मोठया श्रद्धेनें भजतात. कांहीं चोरी वगैरे झाली असतां मारुतिरायांस केळ्यांच्या घडाचा नवस केला आहे, असें जर चोरास कळेल, तर तो एका क्षणाचाही विलंब न लावितां चोरुन नेलेली वस्तु जेथल्या तेथें आणून टाकतो. नवसाच्या केळ्यांचे घड नित्य मारुतीकडे लोंबलेलेच असतात व मारुतिरायही नवसाप्रमाणें सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण करितात. भटजीमहाराजांस लहानपणापासून गायनाचा मोठा नाद होता. कोणी कांही पद वगैरे म्हटलें, तर यांनीं तें अगदीं तस्सें म्हणून दाखवावें. शब्दानुकरण करणारे भटजीमहाराज हे चालते बोलते ग्रामोफोनच होते असें म्हटल्यास चालेल. या त्यांच्या अलौकिक गुणामुळें पुढें ते चांगले गायक निपजले. आधींच भगवद्भक्तीनें फुलून गेलेलें हृदय, त्यांत अत्युत्कृष्ट संगीत गायन; या दोहोंचाही मेळ झाल्यावर तिकडे आनंदास काय उणें असेल ? भटजीमहाराज कीर्तन करुं लागले म्हणजे आपल्या अर्थपूर्ण रसभरित निरुपणानें व अपूर्व गायन पद्धतीनें श्रोतृसमुदायाचें अन्त:करण गार करुन सोडीत असत. भजनांत ते एकादें करुणरसप्रचुर पद म्हणूं लागले, तर सर्वांच्या डोळयांतून खळखळ प्रेमाश्रू लोटवीत. त्यांच्या कीर्तनास बसलेल्या श्रोत्यांस, तासाचे तास नुसत्या एका पळाप्रमाणें वाटत असत. समर्थांनीं दासबोधांत सांगितल्याप्रमाणें, जेथें "सांग महंती" आणि "संगीत गाणें" आहे, तेथें "वैभवास काय उणें" असणार ? ज्यांचा कंठ सुस्वर असून ज्यांस उत्तम गातां येतें, त्यांनी आपल्या वाणीचा उपयोग हरिगुणसंकीर्तनाकडे केला, तर किती बरें फायदा होईल ? नुसत्या साध्या गायनानें जर मनुष्याचें चित्त गारीगार होऊन जातें, व क्षणभरच कां होईना, पण, शांतुसुखाचा अनुभव येतो; तर ज्यावर हरिभक्तिचीं अनेक पुटें चढलीं आहेत, अशा गायनानें लोक तत्काल शाश्वतसुखानुभवास पात्र होतील, हें निराळें सांगण्याची गरज नाहीं. गायनकलेचें असें महत्त्व जाणूनच समर्थांनीं श्रीरामरायांकडे "संगीत गायन दे रे राम ! आलाप गोडी दे रे राम" म्हणून आस्थापूर्वक गायनाची याचना केली आहे.
भटजीमहाराजांच्या कीर्तनाची सर्वत्र प्रख्याति झाल्यामुळें जो तो त्यांस आपले घरीं नेऊन कीर्तनभजनादिक उत्सव करुं लागला. ही त्यांची दिगंत पसरलेली कीर्ति व लोक गात असलेले त्यांचे स्तुतिवाद, कांहीं परोत्कर्षासहिष्णु श्रीमंत मंडळींस सहन न होऊन, भटजीमहाराज त्यांच्या डोळ्यांत खुपूं लागले व त्यांनीं त्यांचा छळ करण्याचा निश्चय केला. गोकर्णमठाधीश स्वामिमहाराज श्रीमत्पद्मनाभतीर्थ श्रीपादवडेर हे त्यावेळीं संचारार्थ फिरत फिरत पणजी येथें श्रीमंत धेंपे यांचे येथें पोंचले होते. तेव्हां वरील श्रीमंत मंडळीनें श्रीस्वामींकडे भटजीमहाराजासंबंधानें भलतीच कांहीं कांगाळी करुन, त्यांस बहिष्कृत करावें, अशी विनंति केली. श्रीस्वामींनी भटजीस पणजी येथें बोलावून आणूण चौकशी केली त्यावेळीं, भटजीमहाराजांनीं जें अलौकिक भाषण केलें, त्यामुळें श्रीमंतांच्या भ्रमाचा सर्व भोपळा फुटला व भटजी महाराज निष्कलंक ठरुन ते कुटिल श्रीमंत मात्र उलट श्रीस्वामींच्या रोषास पात्र झाले. दोन तीन दिवस लाजेमुळें ती श्रीमंत मंडळी स्वामीदर्शनास देखील आली नाहीं. श्रीस्वामींनीं भटजीमहाराजांस आठ दहा दिवस ठेवून घेऊन कीर्तन, पुराण वगैरे मोठया थाटाचा उत्सव केला. भटजीमहाराजांनीं श्रीस्वामींवर त्यावेळीं केलेलीं अनेक पदे आहेत, ती विस्तारभयास्तव येथें देतां येत नाहींत. त्या कुटिल श्रीमंतांसंबंधानें देखील भटजीमहाराजांनीं केलेलें "बहु मला गांजिति नि:सीम दुष्ट, ज्यां श्रीमद अतिबलभीम मारुति" हें पद प्रसिद्ध आहे. इंग्रजसरकारनें ज्यावेळीं इकडील मिठाचें कंत्राट घेतलें होतें, त्यावेळीं कै०अण्णा किर्लोसकर हे गोव्यांत आले होते व त्याच संधीस डोंगरीवर श्रीरामनवमीच्या उत्सवाप्रीत्यर्थ नाटकें होत होतीं. हीं नाटकें खुद्द भटजीमहाराजांनीच पुराणांतील बोधप्रद आख्यानें निवडून काढून संगीतांत तयार केली होतीं. कै०अण्णा किर्लोसकरांस भटजीमहाराजांची कीर्ति ऐकून ठाऊक होती. यास्तव, तेही एके दिवशीं या नाटकास आले. त्या दिवशीं "शुकरंभासंवाद" नाटक असल्यामुळें प्रयोगास अप्रतिम रंग आला. भटजीमहाराजांनीं रचिलेलीं तीं मनोहर पदें व लाटानुप्रासयुक्त गद्यपद्धति पाहून, कविवर्य किर्लोसकर जागच्या जागींच विरघळले. नाटक केव्हां संपलें हें देखील त्यांच्या लक्षांत आलें नाहीं. नाटक केव्हां संपलें हें देखील त्यांच्या लक्षांत आलें नाहीं. नाटक संपल्यावर कै०अण्णा किर्लोसकर जागच्या जागींच विरघळले. नाटक केव्हां संपलें हें देखील त्यांच्या लक्षांत आलें नाहीं. नाटक संपल्यावर कै०अण्णा किर्लोसकर यांणी भटजीमहाराजांस तीं नाटकें करुन पैसे अगर कीर्ति मिळविण्याचा आपला हेतु नसून, फक्त भगवल्लीलांचा विस्तार करण्याचाच आहे, असें त्यांस उत्तर मिळालें. आपण येत नाहीं तर तीं नाटकें तरी आपणास द्यावीं अशी कविवर्य अण्णांनी पुन: नम्रतापूर्वक विनंति केली. परंतु, तीं नाटकें पुस्तकरुपानें स्वतंत्र नसून प्रत्येक पात्राकडे त्या त्या वेळीं तयार करुन दिलेले त्यांचे खर्डे मात्र होते; त्यामुळें, तींही त्यांस नेतां आलीं नाहींत शेवटीं, आपणास नाटकें करण्याची याच ठिकाणीं स्फूर्ति झाली. यास्तव आपल्या हातचा प्रसाद तरी आम्हांस मिळावा, अशी विनंति केल्यावरुन, भटजींनीं श्रीरामाकडे व श्रीमारुतिरायाकडे त्यांची इच्छा सफल करण्याबद्दल प्रार्थना करुन, त्यांस आपल्या हातानें नारळ व पुष्पप्रसाद दिला. इकडून गेल्यावर अण्णांनीं शाकुंतल वगैरे नाटकें रचून रंगभूमीवर त्यांचे अनेक प्रयोग केले व दिगंत कीर्ति मिळविली, हें सर्वविश्रुत आहेच. आपल्या एकाद्या तरी नाटकाच्या प्रस्तावनेंत कविवर्य अण्णांनीं या गोष्टीचा नुसता उल्लेख देखील केला नाहीं, याचें आम्हांस फार वाईट वाटतें ! भटजीमहाराजांनीं पंढरपूर, पंचवटी, अयोध्या, काशी, वेंकटाचल वगैरे अनेक यात्रा केल्या. ते पंढरपुरास एकसारखे तीन महिने श्रीविठ्ठलाचा प्रेमरंग पाहण्याकरितां राहिले होते. पंढरपुराहून घरीं आल्यावर त्यांनीं श्रीरामासन्निध भजनीसप्ताह सुरु केला. त्या वेळीं बोरी येथील प्रसिद्ध महंत जगन्नाथबोवा हे भटजीमहाराजांच्या अतुल स्नेहामुळें वारंवार डोंगरीवर येत असत. त्यांस ती भटजीमहाराजांची अपूर्व भजनपद्धति व तो अनिर्वचनीय सात्त्विक प्रेमरंग पाहून पराकाष्टेचा आनंद झाला. जगन्नाथबोवा भटजीमहाराजांस गुरुस्थानीं मानीत असत व आपणास कांहीं तरी सेवा सांगावी म्हणून ते वरचेवर भटजींस विनंति करीत. त्यांस भटजींनीं भजनीसप्ताहाचा सर्वत्र विस्तार करण्याची आज्ञा करुन, हीच आपली सेवा असे सांगितलें. तेव्हांपासून, जगन्नाथबोवांनीं सर्व गोमान्तकभर फिरुन जिकडेतिकडे भजनी सप्ताह सुरु केले. ते अजूनही सर्वत्र अव्याहत चालू आहेत. जगन्नाथबोवांवर भटजीमहाराजांचें खालील पद प्रसिद्ध आहे.

धन्य धन्य अवतारचि केवळ जगन्नाथ दासाचा ॥
ज्ञानभक्तिवैराग्यविराजित जगदोद्धारक साचा ॥ध्रु०॥
पतित पावन व्हाया देशोदेशीं वास जयांचा ॥
जिकडे तिकडे थाट चालविति कीर्तन सप्ताहांचा ॥१॥
निरहंकारी प्रेमळ भारी स्वभाव शांत मनाचा ॥
इंद्रियनिग्रह बळकट जैसा परिसों योगि शुकाचा ॥२॥
नरनारी आबालवृद्ध यां जिवलग होय जिवाचा ॥
निंदास्तुति सम अद्वय भावें भोक्ता भजनसुखाचा ॥३॥
कोणी कांहिं म्हणो आवडता कृष्णजगन्नाथाचा ॥
भला भला सत्पुरुष लाभला पुतळा भक्तिरसाचा ॥४॥

वरील विवेचनावरुन भटजीमहाराजांनीं भजनांचा गोव्यांत केवढा विस्तार केला, हें सहज कळण्यासारखें आहे. छिद्रान्वेषक काकदृष्टि दुर्जनांनीं त्यांचा पुष्कळ छळ केला ! परंतु "मणि: शाणोल्लीढ:" या न्यायानें भटजीमहाराजांचें त्यापासून कांहींच नुकसान न होतां उलटा त्यांच्या निर्मल कीर्तीचा दिगंत विस्तार मात्र झाला ! भटजीमहाराजांच्या दर्शनास दूरदूरच्या प्रांतांतून अनेक सद्भक्त येऊन त्यांची अमोघ वाणी श्रवण करीत असत. त्यांचें अन्त:करण प्रेमानें गदगदां हालवून सोडणारें भजन ऐकिलें असतां, पाषाणासदेखील द्रव फुटेल, असें वाटत असे. एकदां भटजीमहाराजांचा कट्टा निंदक असा एक श्रीमंत गृहस्थ सहज भटजीमहाराजांचा भजनास बसला असतां, भटजींनीं त्याच्या डोळयांतून प्रेमाश्रू लोटविले व त्यानें निरभिमानपणें भटजींस लोटांगण घालून क्षमा मागितली. भटजीमहाराज उत्तम ज्ञानमार्गोपदेशक व प्रेमळ भजनरंगाची केवळ प्रतिमाच होते. त्यांचें भजन "घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्याहातीं" अशापैकींच होतें. श्रीमंतांपासून थेट तेल्यातांबोळ्यापर्यंत व ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत त्यांनीं उंचनीच भेदभाव सोडून देऊन, सर्वत्र एकसारखा ज्ञानमार्गाचा विस्तार केला. व बहुतेकांचें अज्ञान दूर करुन त्यांच्या हृदयांत ज्ञानाचा प्रकाश पाडिला. अशा रीतीनें "यथेमां वाचं कल्याणी" या श्रुतिवाक्यरुप भगवदनुशासनाप्रमाणें त्यांनीं भगवंताच्या यथार्थ ज्ञानाचा विस्तार करुन शके १८२४ शुभकृत्‍ संवत्सर आश्विन वद्य प्रतिपदा युक्त पौर्णिमेदिवशीं शुक्रवारीं, रात्रौ दहा वाजतां सर्व गोमांतकास-नव्हे महाराष्ट्रास ललामभूत असा आपला पुण्यदेह टाकून दिला व आपण परब्रह्मीं लीन झाले ! देह ठेवण्यापूर्वी त्यांनीं सर्व गांवांतील सद्भक्तांस आपणाजवळ बोलावून आणून ३/४ तासपर्यंत त्यांस सदुपदेश केला व रामभजनाचें माहात्म्य त्यास मोठया कळकळीनें समजावून दिलें. आणि आपणावर जसें प्रेम ठेविलें तसेंच आतां मुकुंदराजावरही ठेवा, असें सांगून त्यांनीं भाषण बंद केलें. आपण अमुकच दिवशीं निर्याण करणार असें त्यांनीं पूर्वीच सांगितलें होतें. कोजागरी पौर्णिमेचा उत्सव निर्विघ्नपणें पार पडल्यावर ते म्हणाले "आतां अवधी नाहीं. कारण, पुढें दिपवाळीच्या उत्सवास अवघे तेरा दिवस राहिले. आमचें और्ध्वदेहिक वगैरे होऊन दिपवाळीचा श्रीरामाच्या मिरवणुकीचा उत्सवही तसास निर्विघ्नपणें झाला पाहिजे" वगैरे सांगून आश्विन वद्य प्रतिपदा रोजीं स्वेच्छेनें "जय जय राम कृष्ण हरी" या सद्भक्तांनीं केलेल्या भजनाच्या गजरांत त्यांनीं देह ठेविला. प्रेमातिशयामुळें शोकव्यग्र होऊन लोक आपल्या देहावसानकालीं आपणाजवळ भजन करणार नाहींत, हें त्यांस पक्कें ठाऊक होतें. म्हणून, त्यांनीं पूर्वीच " डोळ्यांतून अश्रु न काढितां रामकृष्णहरी असें भजन करुं" अशी सर्वांकडून श्रीरामाची शपथ घेतली होती ! सर्व गोमान्तकास आपला आईबाप गेल्यासाखें परमदु:ख वाटलें ! विशेषत: त्यांच्या सद्भक्तांस त्यांच्या परिणामकारक सदुपदेशाचें स्मरण होऊन, त्या वेळी जें दु:ख झालें, त्याचें वर्णन करण्याचें आमच्या लेखणींत सामर्थ्य नाहीं ! अशा रीतीनें भक्तिज्ञानवैराग्यरुप तेजोमय किरणाचा सर्वत्र विस्तार व प्रकाश करुन अज्ञानांधकारास देशोधडीस लावणार्‍या या सत्पुरुषरुप सूर्याचा अकल्पित अस्त जाला. निर्याणकालीं त्यांचें वय अवघें ५८ वर्षांचें होतें. येथपर्यंत साधुत्वासंबंधानें भटजीमहाराजांचे वर्णन झालें, आतां त्यांच्या कवितेकडे वळूं. भटजीमहाराज हे उत्तम कवि होते. त्यांची कविता सरळ, सुबोध व सद्य:परिणामकारक अशी आहे. त्यांनीं केलेला स्वात्मतत्त्वामृतशतक या नांवाचा एक लहानसा श्लोकबद्ध वेदांतग्रंथ आहे, असें आम्ही मागें सांगितलेंच आहे. हा ग्रंथ म्हणजे वेदांताचा केवळ गर्भ असें म्हटलें तरी चालेल. यांतील विषय इतक्या सुलभ रीतीनें प्रतिपादिला आहे कीं, तो एकाद्या लहान मुलास देखील सहज समजेल. वेदांतग्रंथांत वारंवार आढळणार्‍या पारिभाषिक शब्दांची भानगड यांत मुळींच नसल्यामुळें कोणाही मुमुक्षूस या ग्रंथाच्या अभ्यासानें दुर्निवार अशा मोहाचा निरास करितां येईल. त्यांतील कांहीं वेंचे खालीं देतों. आपण वस्तुत: आनंदस्वरुप असून आपणास कसा भ्रम होतो तें सांगतात:-

आनंद आपण असे न कळे मनातें । घेऊनि विस्मृति घरी विषयासि नातें ॥
कीं होय सौख्य तुज तें विषयांत आहे । वाटे उगा भ्रम तुझा तुज बाधताहे ॥१२॥
विषय कल्पुनि जें सुख भोगिसी । स्वरुप तेंचि तुझें परि नेणसी ।
म्हणुनि दु:ख अनावर वाटलें । तुजवरीच तुझें तम दाटलें ॥१३॥

भटजीमहाराजांच्या वरील दोनच श्लोकांवरुन त्यांची कविता किती सुबोध व सोपी आहे, याची वाचकांस सहज कल्पना होईल.

न दृश्य तूं साक्षि असे तयाचा । मागें पुढें भास दिसे मनाचा ।
सर्वासि या आपण मूळ साचा । अलक्ष सच्चित्सुखलक्षणाचा ॥३२॥

अशा अलक्ष्य परब्रह्माचा अभ्यास करितेवेळीं तुला हें दृश्य आडवें येईल तेव्हां, त्रासून जाऊन तूं या दृश्याचा त्याग करण्याची खटपट करुं नकोस, तर:-

दिसे तें तूं पाहें, परि वळख द्रष्टयासि वळुनि ।
असे जो सत्यत्वें सुखमयसदावृत्ति त्यजुनि ॥
दिसे माझे सारें तुजवरिच हें तूं न दिससी ।
तुला तूं लक्षाया सहज समजानेंचि अससी ॥३३॥

वेदांतासारखा गहन विषय बोलतांना भटजीमहाराजांच्या भाषणांत एकदेखील कठीण शब्द येत नसे. "आत्मा" हा शब्द संस्कृत आहे. याचा अज्ञ लोक विपरीत अर्थ कल्पितील म्हणून "आत्मा" म्हणण्याऐवजीं ते "आपण" असेंच म्हणत असत. यावरुन त्यांची वेदांतविवेचनपद्धति किती सुगम होती हें समजण्यासारखें आहे. याचा प्रत्यय पाहिजे असेल तर त्यांचे वरील उद्गार किती सोपे व सरळ आहेत तें पहावें. अनेक उपायांनीं जर चित्त स्थिर होऊन स्वसुखानुभव येत नाहीं तर त्यास काय करावे,तें सांगतात:-

सुखाची जे इच्छा त्यजुनि वळ मागें परतुनी ।
स्थिरत्वानें राहीं सुखमय निजात्मा समजुनी ॥
उठों नेदीं वृत्ती, सहज सुख येईल उदया ।
तदाकारें घोंटी स्फुरत सुख जें आपण तया ॥

अहाहा ! किती सहज व गोड उद्गार हे ! संसाररोगग्रस्त जीवास वरील श्लोक ही दिव्य मात्राच होय. विषयांपासून सुख प्राप्त होतें, असें जर कोणास वाटते असेल तर खालील श्लोक पहावा:-

पदार्थ सुखसे तुला जरि देसे सुषुप्ती पहा ।
अपार सुख निद्रिता, न विषयीं जिवाची स्पृहा ॥
प्रपंच सुख हा जरी, तरि निजेंत कैचें सुख ? ।
न तैं विषयवृत्ति, जागृतिंत जे दिसे सन्मुख ॥७६॥

स्वात्मतत्त्वामृतांतील प्रत्येक श्लोक वाचनीय असल्यामुळें त्यांतील वेंचे म्हणून देतां येत नाहींत. प्रत्येक मुमुक्षूनें एकवार तरी हा ग्रंथ अवश्य वाचून प्रत्यय पहावा. आतां फक्त त्यांतील आणखी एकच श्लोक देऊन, भटजीमहाराजांच्या इतर कवितेकडे वळूं. चित्त विषयांतून काढून आत्मस्वरुपांत स्थिर केल्यानंतर आपली स्थिति कशी होते तें सांगतात -

जैं वासना वळविसी स्वसुखैक ठाया
वाटेल त्यां कठिण तेथुनियां उठाया ॥
जे तें स्फुरेल सुख आपण विश्व सारें
दु:खें न राहतिल या निज सद्विचारें ॥७८॥

भटजीमहाराज स्वत: चांगले गायक असल्यामुळें, त्यांनीं अनेक रागांवर अनेक सुंदर पदें केलीं आहेत. भगवद्भक्तिविरहित जें गाणें तें त्यांस अगदीं आवडत नसे. कीर्तनांत विश्रांतीसाठीं म्हणून अप्रासंगिक हिंदुस्थानी पदें ठुंबर्‍या वगैरे ते कधींच म्हणत नसत. त्यांचें म्हणणें असें होतें कीं, कोणतीही कविता भगवद्गुणवर्णनपर किंवा ज्ञानवैराग्यपर असावी. उगीच "तननन" करुन त्यांत काय अर्थ आहे ? भटजी महाराजांचे चिरंजीव मुकुंदराज हे अगदीं लहान असतां, त्यांची आई वगैरे त्यांस खेळविण्याकरितां म्हणून कसलें तरी एकादें क्षुद्र गीत म्हणत असे. तें भटजीमहाराजांस न आवडून मुद्दाम त्यानीं खालील रसभरित पद तयार करुन त्यांस म्हणावयास दिलें: -
पद (गुरुकृपांजन पायो मेरा भाई) या चालीवर).
मुकुंद राजा ! तू प्रिय माझा, । लावीं देह तूझा रामभक्तिकाजा ॥ध्रु०॥
तुझा आई बाप राम सीतापती । ओळखी घे त्याची साधूंचे संगती ॥१॥
नवविधा भक्ति करिं राघवाची । रामासन्मुख नित्य दासबोध वाचीं ॥२॥
विवरुनि अर्था साधीं परमार्था । निशिदिनिं भज तूं राम समर्था ॥३॥
तरिच वंशजा होइल उद्धार । विष्णु कृष्ण जगन्नाथा आवडसि फार ॥४॥

असा आपला मुलगा निपजावा, अशी इच्छा करणारे आजमितीस आमच्या या भरतभूमीवर कितीसे आईबाप असतील, याचा वाचकांनींच विचार करावा. भटजीमहाराजांच्या या गोड शब्दांची तारीफ करावी, कीं त्यांच्या या पृथ्वीच्या मोलाच्या सद्धेतूची शिफारस करावी, हेंच आम्हांस समजत नाहीं. आम्हांस सांगावायास अत्यंत आनंद वाटतो कीं, त्यांच्या या पवित्र व निर्मल वासनेप्रमाणें, त्यांचे चिरंजीवही, श्रीरामाची नवविधा भक्ति करुन, त्यासन्मुख नित्य दासबोध वाचणारे व त्याच्या अर्थाचें विवरण करुन आत्मवंशाचाच काय, पण जनांचाही उद्धार करणारे निपजले आहेत ! भटजीमहाराजांची वामनपंडितांच्या यथार्थदीपिकेवर फार भक्ति होती. यथार्थदीपिकेच्या तोडीचा - गीतेचें हृदय उकलून देणारा-दुसरा ग्रंथ नाहीं, असें ते म्हणत असत. एकदां एका निर्गुणवादी शास्त्रीबोवांनीं "वामनानें यथार्थदीपिकेंत सगुणाचें उगीच ढोंग निर्गुणवादी शास्त्रीबोवांनीं, "वामनानें यथार्थदीपिकेंत सगुणाचें उगीच ढोंग माजविलें आहे" वगैरे पंडितांची बरीच निंदा केली. त्या वेळीं भटजीमहाराजांस फार वाईट वाटून त्यांनीं त्यावर खालील पद केलें:-

सच्चित्सुख जगलहरींत स्फुरसि आत्मपाणी, तुजविण मज कोणि
नावडे चापपाणि । हितगुज माझें तूंचि एक, जो अनेक । विश्वव्यापक
कनकनगापरी । तूं जननि-जनक माझा सनाकादिस्तुत प्रभु तूं राघव
रामराजा । दिव्य सिंहासनि शोभे यद्वामांकि जानकि भाजा । ध्यान
निरंतर करि त्याचें देहभान हरुनि । अद्वयात्म सुख स्फुरविसि अंतरीं ।
हें बिज त्वद्भक्तचि जाणति, अन्य नेणति फुकट शिणति ज्ञानोपायीं ।

सगुण-निर्गुण भेद नाही लवहि कांही। अवयव मिथ्या भासति, आपण निरवयलावक्ष न लक्षिति खुण सच्चिदानंदस्वरुप जे मुळिंची। तरि ते बुद्धि खुळिच त्यांचि । द्वैतभावना निरसलि नाहीं मानसाचि । "सगुण ढोंग" म्हणति अद्वय स्थिति कशाची ? ।
चरणिं शरण मी अनन्य, स्वपदभक्तिभाग्यें धन्य- । करुनि, तूंचि कळविसि मज आत्मस्थिति बरी । राम विष्णु कृष्णजगन्नाथ !
तुला हात जोडुनि प्रार्थितों मि ऐसें ॥१॥

वरील पदाची चाल भटजीमहाराजांच्या स्वयंस्फूर्तीची असल्यामुळें तें पद कोणाही जाणणार्‍यांकडूनच ऐकिलें पाहिजे. भटजीमहाराजांची बहुतेक पदें अशींच आहेत कीं, त्यांची चाल अमुक अशी मुळींच देतां येत नाहीं व ती चाल कळल्याशिवाय तीं अगदी नीरस वाटतात. मीठ न घातलेला कोणताही पदार्थ प्रथम चाखून पाहिला असतां जसा बेचव लागतो व मीठ घालतांच रसभरित होतो, तशींच, भटजीमहाराजांचीं पद, त्याची खरी धाटी ठाऊक नसलेल्यांकडून ऐकिली असतां गचाळ वाटतात व तींच जाणत्याच्या मुखांतून ऐकिलीं असतां अगदी तन्मय करुन सोडितात. वरील पदांत निर्गुणवाद्याची अद्वैतस्थिति भटजीमहाराजांनीं मोठया गमतीनें उडवून टाकिली आहे ! अत्यंत मधुर असें जें रामनाम, त्याच्या जपाचें रहस्य भटजीमहाराज सांगतात: -

पद - (दादरा).

जप तूं रामनाम किती मधुर ! मधुर ! मधुर ! मधुर ! ॥ध्रु०॥
रामनामध्वनि उमटे, तेथें लक्ष लाविं नेटें ।
ब्रह्मानंद सहज भेटे, प्रचुर ! प्रचुर ! प्रचुर ! प्रचुर ! ॥जप) ॥१॥
दृश्य देखतांचि दिठी, देई द्रष्टेयासि मिठी ।
आपुलें आपण सौख्य घोंटिं, न दुर ! न दुर ! न दुर ! न दुर ॥२॥
रामविष्णुकृष्णध्यान, त्यासि दे मुकुंद ज्ञान ।
जेणें होय समाधान, चतुर ! चतुर ! चतुर ! ॥३॥

त्यांचें खालील प्रसिद्ध पद किती हृदयंगम आहे पहा !

पद - (कित्‍ना थमालले, थमाल आपुल्या गाई० या चालीवर).
रामा ! दयाघना ! क्षमा करुनि मज पाहीं ॥
जरि बहु अपराधी खराच मी अन्यायी ॥
तुजविण पाहतां रे ! संसारीं सुख नाहीं, निमिषभर कांही ॥रामा० ॥ध्रु०॥
कोठिल कोण मीं न जाणिला हा पत्ता ।
आजिवरि अज्ञानें मिरविली विद्वत्ता ।
देहात्मत्वाची स्थिति झाली उन्मत्ता ।

येउनि जन्मा रे ! व्यर्थ श्रमविली आई, हेंचि मनिं खाई ! रामा० ॥१॥
कोठिल कोण मीं न जाणिला हा पत्ता ।
आजिवरि अज्ञानें मिरविली विद्वत्ता ।
देहात्मत्वाची स्थिति झाली उन्मत्ता ।

येउनि जन्मा रे ! व्यर्थ श्रमविली आई, हेंचि मनिं खाई ! ॥रामा० ॥१॥
नाथ अनाथा तूं माय-बापही तैसा ।
परि मी उद्भवलों पतित पापी ऐसा ॥
तरी निज नामाचें महत्त्व सांडिसि कैचा ।

पावननामा रे ! जाच देति रिपु साहि; साच वपु दाही ॥रामा०॥२॥
करुणासागरा ! राघवा ! रघुराजा !।
विषयीं पांगला नका करुं जिव माजा ।
भजनीं चांगला मिळवीं साधुसमाजा ।

भुलुनि प्रपंचा रे ! श्रमुनि भ्रमुनि ठायिं ठायिं, हरुनि वय जाई ॥रामा० ॥३॥
सच्चित्सुख जो तूं परब्रह्म केवळ ।
विश्वीं व्यापला तरंगीं जैसें जळ
अवतारतोसि हें उपासकांचे बळ ।

भक्तजनाला रे ! चित्रविचित्र उपायीं, सतत सुखदायीं ॥रामा० ॥४॥
विष्णु ! कृष्ण । जगन्नाथ ! तुझा मी लेक ।
चरणी शरण; दे स्मरण आपुलें एक ।
हातीं संतांची सेवा घडविं अनेक ।
जगदभिरामा रे ! मानस हें तव पायीं, जडविं लवलाहीं ॥रामा० ॥५॥

हें पद, व भटजीमहाराजांसारखा म्हणणारा मिळाला, तर कोण मायेचा पूत या मायिक प्रपंचसुखावर लाथ मारुन विरक्त होणार नाहीं ?
मारुतिरायाचें खालील रहस्यार्थप्रचुर पद पहा:-

पद.

वन्य ! एक मारुति सेवक रामाचा ॥
अन्य नाहीं त्रिभुवनीं ! काया - मनें - वाचा ॥ध्रु०॥
देहलंकेमाजी शोधी जाणीवे सितेला ॥
जाणतां अशोकमुळीं, भेटावया गेला ॥धन्य० ॥१॥
दाविली खूण तिसी निज राममुद्रा ॥
पाहतां तन्मय झाली आनंदसमुद्रा ॥ध० ॥२॥
अद्वय होउनी सीतारामीं लीन झाला ॥
रामनामस्मरणाचा नित्य नेम ज्याला ॥३॥
अभय वरदहस्त करुनियां उभा ॥
वाम कर कटिं ठेवुनि दावी दिव्य शोभा ॥४॥
मारुती संकटहारी रामभजकांचा ॥
विष्णुकृष्ण जगन्नाथा उपयोगी साचा ॥५॥

भटजीमहाराजांचे खालील वैराग्योत्पादक पद किती सरस आहे पाहा !
पद (अखंड हरि हरि वदा रे बापांनो० या चालीवर)
सदैव राम राम म्हणा रे बापांन ! । सदैव राम राम म्हणा !
नरतनु हे दुर्लभ गणा रे बापांनो ॥स०॥ध्रु॥
तुम्हिं प्रपंच केला जरि निका ।
तरि शेवटिं होइल हा फिका ।
यम काढिल शोधुनि बहु चुका ॥
मार मारिल कठिण आइका, रे बापांनो ! सदैव राम० ॥१॥
काय घालवितां वय फुका ।
ध्यानिं आठवा रघुनायका ।
ब्रह्मत्वें आपणा तुका ।
जन्म-मरणाला मग मुका रे बापांनो ! सदैव राम राम म्हणा ॥२॥
देह पडेल कधिं न भरंवसा ।
निज आत्मा आपुला कसा ।
हें जाणत एकांतीं बसा ।
नकळे तरि गुरुला पुसा रे बापांनो ! सदैव राम राम० ॥३॥
मोठेपणिंचा अभिमान सोडा ।
छी ! छी ! देहमीपण खोडा ।
दृढ असंगशस्त्रें तोडा ।
आहे अखंड सुख तें जोडा रे बापांनो ! सदैव राम० ॥४॥
जगिं तारक वैष्णव गुरु ।
त्याचे चरण जाउनि दृढ धरुं ।
कृष्णजगन्नाथ सांगे, उद्धरुं ।

आपाआपणा सावध करुं रे बापानों ! सदैव राम राम० ॥५॥
हें दिसणारें सर्व विश्व भगवत्स्वरुप आहे, हें सांगतात:-

पद (हरि तुझि मंजुळ मुरली० या चालीवर)
उमज मनिं रामचि जग हें । रामचि जग, न धरिं
कांहीं उबग । कीं रज्जु भुजग जेवि कनक नग ॥ध्रु०॥
दृश्य पसारा द्र्ष्टा सारा । सूर्यकिरणिं मृगजल
जैसें झग झग ॥रामचि जग० ॥१॥
अद्वय आपण हे विवरीं खुण ।
ज्यापरि जलतरंग, तेविं अनुभविं मग ॥रा० ॥३॥
खालील अभंगांत संतसंगाचा महिमा उत्तम वर्णिला आहे:-
धन्य धन्य धन्य सज्जनाचा संग, । ज्ञानभक्तिरंग रंगावया ॥१॥
रंगावया मन चैतन्यरुपीं । नाहीं दुजा ओपी ज्ञान ऐसें ॥२॥
ज्ञान ऐसें जागें जयाचे हृदयीं । नित्य त्याचे पायीं ठेवूं माथा ॥३॥
ठेवूं माथा अहंकार निरसोनी । सेवा संपादनी राहूं तेथें ॥४॥
राहूं तेथें मन सर्वदा विश्रांती । संसाराची खंती आठवेना ॥५॥
आठवेना एका आपणावांचोनी । जनीं मनीं वनीं घनदाट ॥६॥
घनदाट सुखस्वरुप आपुलें । अंतरी धरिले आत्मभावें ॥७॥
आत्मभावें निजदर्शनाचा लाभ । दिधला स्वयंभ गुरुराया ॥८॥
गुरुराया स्वामी ! समर्था ! वैष्णवा ! । द्यावी निज सेवा कृष्णदासा ॥९॥

इकडे गोमान्तकांत कोणताही उत्सव झाला म्हणजे, त्याच्या सांगतेच्या वेळीं गौळणकाला करीत असतात. गौळणकाला म्हणजे भगवान्‍ श्रीकृष्णांनीं गोकुलांत केलेल्या लीलाविहाराचें वर्णन होय. हे गौळणकाले अनेक कवींनीं नाटकरुपानें तयार केलेले आहेत. परंतु, जगन्नाटकी मायाचक्रचालक श्रीकृष्णपरमात्म्यानें गोकुलांत केलेल्या लीला, कर्त्यांनीं, आपल्या स्वभावानुसार नुसत्या विषयासक्तीच्या शृंगाराप्रमाणें वर्णिल्या आहेत ज्या श्रीहरीच्या चरित्रश्रवणानें तत्काल भवबंध तुटून परमपदाची प्राप्ति होते, त्या मंगलकारक चरित्राचा असा हेतुविपर्यास झालेला पाहून, भटजीमहाराजांस फार वाईट वाटलें व त्यांनीं उत्तम रहस्यप्रकटार्थप्रचुर असे दोन गौळणकाले तयार केले त्यांतील पदें पाहिलीं म्हणजे कर्त्याच्या विलक्षण चातुर्याबद्दल तारीफ करावी तेवढी थोडीच वाटते. कारण, त्या काव्यांनीं विषयासक्तांची व विरक्त सज्जनांची सारखीच करमणूक होते. कल्पनेचा साक्षी जो चैतन्यघन आत्मा, तो श्रीकृष्ण; विवेक वैराग्यरुप आत्मसखे, ते गोपाल; इंद्रियवृत्ती, गोपिका; व शुद्धसत्त्वात्मक ज्ञानमायारुप जी तुर्या किंवा निवृत्ति ती यशोदा; अशी त्यांत योजना केलेली आहे. त्यांतील कांहीं पदें खालीं देतों. "गोकुलांत तूं अशा नानाप्रकारच्या खोडया करुन गोपिकांस व्यर्थ कां त्रास देतोस ?" असें यशोदेनें विचारिल्यावरुन भगवान्‍ श्रीकृष्ण तिला सांगतात: -

पद (मलय गव्हरीं अद्भुत शोभा पाहुनियां शबरी० या चालीवर)

निर्विकल्प सच्चिदानंद मी नेणति या मातें ॥
केवळ जड तनु शाश्वत मानुनि कल्पिति कामातें ॥ध्रु०॥
मन्मूर्तीवरि बळकट प्रेमें लंपट मन करिती ।
विषयदृष्टीनें दिननिशिं हा आकार हृदयिं धरिती ।
दृश्यचराचर चिन्मय ऐसी वृत्ति न तिळभरि ती ।
आत्मसुखास्तव आळविती बहु मज निष्कामातें ॥नि०॥१॥
यद्यपि चिद्धन तो मीं या अवलांसि नसें ठावा ।
केवळ सगुणी पूर्ण जयांही धरिलें सद्भावा ।
जाणुनि मीं अवतारि होय सद्भक्तांच्या गांवा ।
मायाब्रह्मीं सहज घडे हा स्फुरणधर्म मातें ॥नि०॥२॥
अवस्थात्रयातीत हरिन नवनीत कसा यांचें ।
जसा तसा असताचि स्फूर्तिरुप जग नटलों साचें ।
तंतूपट मृद्धट दृष्टांतें, कारण कार्याचें ।
कर्ता कृष्णजगन्नाथ नसुनि घेती नामातें ॥३॥

या एकाच पदावरुन वाचकांस भटजीमहाराजांची कवित्वशक्ति, चातुर्य, अनुप्रास व अर्थगौरव या सर्व गुणांची सहज कल्पना होण्यासारखी आहे. राधिका श्रीकृष्णास म्हणते:-

पद (दादरा.)
असुनी सुजाण कां न जाणत्या सम गोपी छलिसी ।
प्राणजीवना रे कृष्णा ! प्राणजीवना ॥ध्रु०॥
इंद्रियवृत्ति मज नावरती या, लक्षुनी प्रमाण, मी ।
रममाण व्हाया अंतरसाक्षी आणितें मना रे कृष्णा ॥१॥
अनुसंधाना चुकविति कान्हा ! या ।
चिद्रत्नाचि खाण आपण आण वाहुनि, मन्मन कथितें ॥
आनंदघना रे कृष्णा ! आनंदघना ॥अ०॥२॥
चंचलचिता; कृष्णजगन्नाथा ! या । नव्हसि लहान
तूं महान सुमति पहाना कैसें ॥ मनमोहना रे कृष्णा ॥मन०॥३॥

गोपी यशोदेस कृष्णाची कागाळी सांगतात-

पद.
चटकी चपल मोठा नाटकी साच । घटचि नुरवि हट धरुनि मुरारि ॥च०॥ध्रु०॥
गोपकटकीं एकी एकट अनेकीं ।
व्यापक निकट करिं न मिळे कीं भारी ॥च०॥१॥
सकल त्यजुनि तरि, धरिन मी श्रीहरि
करि नाना परि न वदवति कंसारि ॥च०॥२॥
सुख निर्धारें आत्मविचारें ॥
कृष्ण जगन्नाथ ऐसा असतो संसारीं ॥च०॥३॥

वरील पदांत "ट" चा अनुप्रास आहे. भटजीमहाराजांस यमकें व अनुप्रास यांची मोठी हौस होती. त्यांच्या पदांत सर्वत्र अनुप्रास व यमकें यांची गर्दी आढळून येते. तरीही त्यांनीं अर्थगौरवाकडे पूर्ण लक्ष पुरविलेलें आहे हें वर दिलेल्या त्यांच्या थोडया कवितेवरुन वाचकांस सहज समजेल. भटजीमहाराजांस मयूरकवीप्रमाणें चित्रकाव्याचा फार नाद होता. खालील त्यांचें पतितपावन रामाष्टक पहा:-

"पतितपावनराम" श्लोकाष्टक.
(उपजाति)
परात्पर श्रीपति रामभूप । पदीं रमे त्या सुख दे अमूप ।
परावर व्यापक चित्स्वरुप । परेश भक्तांस्तव जो सरुप ॥१॥
तीरें वधी शोधुनियां अराती । तीव्रें गुणें सज्जन पक्षपाती ।
तीनीं गुणी लिप्तनयत्प्रभाती । तीर्थास्पदें सद्गुण साधु गाती ॥२॥
तद्रूप, ये नाम जरी मुखांत । तल्लीन होतो जिव यत्सुखांत ।
तरावया यत्न असा भवांत । तथापि जाती जन रौरवांत ॥३॥
पावे स्मरुं त्या जरि मायबापा । पाहे प्रयत्नें हरुनि त्रितापा ।
पाळी कृपे ओढुनि आत्मचापा । पापा न ठेवी भजुं त्या रमापा ॥४॥
वरिष्ठ जो एकचि रामदेव । वरीन मी त्या हृदयीं सदैव ।
वदेन तन्नाम अवश्यमेव । वसेन देऊनि तयासि खेंव ॥५॥
व रत्न रामासदया समान । नरां सुरां माजि जगन्निधान ।
नभापरी रुप न होय मान । नमूनि ज्या देति समस्त मान ॥६॥
रात्रिंचरा देउनि तीव्र मारा । राजेंश्वरें आणियली स्वदारा ।
राज्यासनी बैसुनि कारभारा । राष्ट्रीय जो चालवि भक्तथारा ॥७॥
मनीं मुखी ज्या प्रिय आत्मनाम । मवाळ त्याच्यावरी पूर्णकाम ।
मरामती वाढवि सौख्यधाम । मदोद्धतांचा करुनी विराम ॥८॥

(अनुष्टुप्‍)

पतितपावना रामा ! श्लोकाष्टक तुझें तुवां ।
विष्णू कृष्ण जगन्नाथा ! रचिलें स्फूर्तिनें तुझ्या ॥

भटजीमहाराजांनीं केलेलीं एकंदर स्फुट पदें सुमारें आठशेंवर होतील. त्याशिवाय "स्वात्मतत्त्वामृत" हा लहानसा वेदांतग्रंथ व मानसपूजा या नांवाचें एक लहानसें प्रकरण आहे. त्यांनीं शुकरंभासंवाद, लोपामुद्रासंवाद, नटसुभद्राविलास व अहिल्योद्धार अशीं चार संगीत नाटकें तयार केलीं होतीं. परंतु फार खेदाची गोष्ट ही कीं, त्यांतील एकच अहिल्योद्धार तूर्त उपलब्ध असून बाकीची सर्व नामशेष झालीं ! त्यांनीं आनंदरामायणांतील कांहीं सुरस आख्यानें निवडून काढून तीं कीर्तनाकरितां म्हणून छंदोबद्ध करुन ठेविलीं आहेत तीं येणेंप्रमाणें -

१  व्यासवरदान
२  शतस्त्रीणांवरदानम्‍
३  तुलसीपत्रसंधान
४  हास्यमुक्ति
५  यागकांड
६  यात्राकांड
७  चंपिकासुमतीस्वयंवर
८  यूपकेतूस्वयंवर
९  पिंगलाख्यान
१० दुर्वासभोजन
११  नागरिकोपदेश
१२ सुगुणाख्यान
१३  गुणवत्याख्यान

याशिवाय त्यांचे कांहीं अभंग व कोंकणीं भाषेंतील कांही स्फुट श्लोक वगैरे आहेत; असो. भाषाशास्त्राचें फारसें ज्ञान नसतां, उत्तम कवींच्य पंक्तीस बसण्याजोगी कविता भटजीमहाराजांनीं केली, यावरुन त्यांची योग्यता सामान्य नव्हती, हें सहज लक्षांत येतें. ईश्वरी कृपेवांचून असें घडणें फार कठिण आहे. कवितेंतील त्यांचे जिवंत उद्गार वाचून कोणाही विषयग्रस्ताचें हृदय परमार्थाकडे वळल्यावांचून रहावयाचें नाहीं. ते जरी आज प्रत्यक्षत्वानें हयात नाहींत, तरीही त्यांच्या या परिणामकारक वाणीमुळें त्यांचे बहुतेक सान्निध्य घडल्यासारखेंच होतें; असो. शेवटीं त्यांच्या चरित्रासंबंधानें त्यांनींच केलेलें एक पद आहे तें देऊन, त्यांच्या गोड व प्रासादिक वाणीनेंच या फार लांबलेल्या चरित्रलेखाचा उपसंहार करितों.

यत्कुलदेवं "लक्ष्मीनृसिंह" सुखदायी
पिता "जगन्नाथ" माता "नरसाई"
पितृव्य "मुकुंद" चुलती लक्ष्मीबाई
कृष्णद्विज मीं जन्मा आलों अचला ठायीं ॥य०॥ध्रु०॥
शिणलों प्रपंचिं फिरतां नकळुनि आयुष्यकाला ।
भिक्षुकिवृत्ति करितां आला मनिं कंटाळा ।
मत्पत्नी जनित स्मरतां माझी पोरांबाळा ।
"मी" "माझें" मनि धरितां सांपडलों मोहजाला ॥१॥
त्रिविध तापाग्नीनें चित्त जई पोळलें ।
दारापुत्रीं गृहवित्तावरि कंटाळलें ।
संतमुखें जइं तारकईश्वर मज कळलें ।
तईं पासुनि मन माझें तद्भजनिंच वळलें ॥२॥
आळवितां रात्रंदिन किति वर्षे प्रभुला मी ।
सदयासि दया माझी येउनि अंतर्यामीं ।
साक्षात्सद्गुरु आपण प्रगटति विष्णुनामीं ।
दृश्य विलक्षण मज स्थिर केला आनंदधामीं ॥३॥
सद्गुरुनीं ज मजवरि केली करुणादृष्टी ।
सच्चित्सुख कनकनगासम समजाविलि सृष्टी ।
वदले बहु जन्मी तूं होता बाळा कष्टी ।
आतां पूर्ण सुखी हो घेउनि आनंदवृष्टि ॥४॥
मच्छब्दें आनंद स्फुरला तो आपैसा ।
पिंडब्रह्मांडातें ग्रासी नेट ऐसा ।
अनुभव तो या वदनें बोलवेल कैसा ? ।
द्वैताद्वैतरहित; लहरीविण समुद्र जैसा ॥५॥
ऐशा सद्गुरुसी म्यां द्यावें तरी काई !।
तनु मन धन हें अर्पण झालें पूर्वीच पायीं ।
देण्याजोगी वस्तु ज्याविण दुसरी नाहीं ।
आतां कोण्यायोगें होईन मीं उतराई ? ॥६॥
विचार ऐसा जई मज अंत:करणीं आला ।
तैं सद्गुरुचा हृदयामाजी स्फूर झाला ।
"वर्णन करिं आनंदप्रद राघवचरिताला ।
सर्व सुखास्पद सेवा पावे तेचि आह्माला ॥७॥
नाहं कर्ता, स्फूर्ती समर्थ गुरुरायाची ।
घडविली सेवा वदवुनि सुकीर्ति राघवाची ।
श्रोता वक्ता अवघी सद्गुरुस्फूर्ती साची ।
कविताशक्ति न गुरुविण कृष्णजगन्नाथाची ॥८॥
जय जय रघुवीर समर्थ ।
श्रीबलभीम मारुतिराय समर्थ ।
श्रीमत्सच्चिदानंद कृष्णजगन्नाथ-
स्वामिसद्गुरुमहाराज की जय ।

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP