रामीरामदास

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


श्रीसमर्थ रामदासस्वामी यांचे जेष्ठ बंधु गंगाधर हे रामदास संप्रदायात जरी "श्रेष्ठ" या नावाने प्रसिध्द आहेत, तरी सर्वसामान्य लोक त्यांना ’रामीरामदास’ या नावानेच ओळखतात व स्वत: श्रेष्ठांनीही आपल्या कवितेत ’रामीरामदास ’ असाच स्वनामोल्लेख केला आहे. मात्र येथे एक गोष्ट आरंभीच सांगितली पाहिजे ती ही की, रामदासस्वामीची जी कविता आजवर प्रसिध्द झाली आहे, तीत "रामीरामदास" या नावाचा निर्देश बर्‍याच ठिकाणी आढळतो व त्यामुळे या फ़ुटकळ कवितेत श्रेष्ठ व समर्थ या दोन्ही बंधूंची रचना समाविष्ट झालेली असण्याचा बराच संभव आहे. मोठ्या ग्रंथासंबंधाने मात्र अशा प्रकारचा घोटाळा मुळीच नाही, ही त्यांतल्या त्यात समाधानाची गोष्ट होय, कारण समर्थांचा दासबोध व श्रेष्ठांचे भक्तिरहस्य यांच्या रचनाशैलीची भिन्नता इतकी स्पष्ट आहे की, सकृद्दर्शनीच, या दोन ग्रंथांचे कर्ते निरनिराळे दोन पुरुष असले पाहिजेत ही गोष्ट वाचकाच्या लक्षात आल्याशिवाय रहात नाही.
श्रीसमर्थ रामदासस्वामीसंबंधाने आजवर जितकी माहिती उपलब्ध झाली आहे, तिच्या मानाने श्रेष्ठांविषयीची उपलब्ध माहिती अगदीच अल्प आहे. रामदासी संप्रदायातील सात आठ लेखकांनी समर्थांची निरनिराळी लहानमोठी चरित्रे लिहिली आहेत, पण रामीरामदासांचे एकही जुने चरित्र अद्याप उपलब्ध झालेले नाही; आणि याचे कारण उघडच आहे. श्रीसमर्थ हे रामदासी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक असल्यामुळे त्या संप्रदायातील लोकांची त्यांच्याविषयी जितकी उत्कट पूज्यबुध्दी असणे साहजिक आहे, तितकी इतरांविषयी असणे शक्य नाही. तुकारामबुवांचे बंधु कान्होबा (तुकयाबंधु) हेही मोठे प्रेमळ संत होते व त्याचीही थोडीशी उत्कृष्ट कविता उपलब्ध आहे, परंतु तुकारामबुवांइतकी त्यांची प्रसिध्दि झाली नाही. तात्पर्य, प्रसिध्दि ही विशिष्ट ब्यक्तीच्या कर्तबगारीवर अवलंबून आहे. असो.
श्रीसमर्थ रामदासस्वामींचे जेष्ठ बंधू हे नाते बाजूस ठेवून अगदी स्वतंत्र दृष्टीने पाहिले तरी रामीरामदास यांची योग्यता, सत्पुरुष व ग्रंथकार या नात्याने पुष्कळच मोठी आहे, हे त्यांचे ग्रंथ वरवर चाळून पाहिल्यानेही लक्षात येण्यासारखे आहे. "श्रीरामीरामदासांची कविता" या नांवाचा सुमारे ५०० पृष्ठांचा ग्रंथ धुळे येथील ’सत्कार्योत्तेजक सभेने’ प्रसिध्द केला आहे, त्यात रामीरामदासांची बहुतेक सगळी उपलब्ध कविता समाविष्ट झाली असून, तिच्या आरंभी, सदर सभेचे प्रेमळ व उत्साही कार्यकर्ते रा. शंकर श्रीकृष्ण देव यांनी ’श्रीश्रेष्ठांचे चरित्र’ व श्रीश्रेष्ठांची कविता’ असे दोन सुंदर व महत्वाचे निबंध जोडले आहेत, त्याचा यथेच्छ उपयोग करुन, प्रस्तुतचा अल्प चरित्रलेख मी लिहीत आहे. या विषयाची अधिक विस्तृत माहिती ज्यांस हवी असेल त्यांनी रा. देव यांचे उपरिनिर्दिष्ट दोन निबंधच वाचले पाहिजेत, हे सांगावयास नकोच.
श्रीश्रेष्ठ व श्रीसमर्थ यांच्या घराण्याचे मूळ पुरुष कृष्णाजीपंत, गोत्र जमदग्नि, सुत्र आश्र्वालायन, आडनाव ठोसर. हे प्रथम बेदर प्रांती रहात होते. राज्यक्रांति व दुष्काळ यांनी पीडित झालेले तत्प्राथस्थ काही गृहस्थ गोदातीरी आले, त्यात कृष्णाजीपंतही शके ८८४ सहकुटुंब येऊन गोदेच्या दक्षिण तीरास हिवरे नामक गांवी पहिल्याने राहिले. "त्यांना पाच पुत्र होते, त्यापैकी चौघांनी एकंदर ४८ गांवी कुळकर्ण व जोशीपणाची वृत्ति संपादन केली. पांचवे पुत्र दशरथ यांनी हिवर्‍यापासून तीन कोसांवर गेगंच्या उत्तरेस पडपांढर पडली होती तेथे नवीन गांव वसविला . त्या पांढरीचे पूर्वीचे नांव वडगांव होते. दशरथपंतांनी वसाहत केल्यावर त्या गांवाचे नांव जांब असे ठेवले. जांबेसुध्दा नविनच बारा गांवांची वृत्ति त्यांनी मिळवली. त्यांच्यापासून एकविसावे पुरुष सूर्याजीपंत, हेच श्रेष्ठ आणि समर्थ यांचे वडील होत. या घराण्यातील बावीस पिढयांच्या पूर्वजांनी श्रीराम आणि सूर्य यांची उपासना केली होती अशी आख्यायिका आहे. या उपासनावृक्षाला सूर्याजीपंत व राणूबाई यांच्या पोटी गंगाधर व नारायण अशी दोन फ़ळे आली. त्यांनी आपल्या पूर्वजांचाच नव्हे तर अखिल महाराष्ट्राचा कसा उध्दार केला व आपल्या घराण्याचे नांव महाराष्ट्राच्या धार्मिक, राजकीय कसे अजरामर करुन ठेविले, तो कथाभाग, थोड्या फ़ार प्रमाणात, बहुतेक महाराष्ट्रीयांस श्रुत आहेच."
गंगाधर उर्फ़ श्रेष्ठ उर्फ़ रामीरामदास हे सूर्याचे व समर्थ रामदासस्वामी हे मारुतीचे अंशावतार होत, अशी सर्व भाविकांची समजूत आहे; आणि संतचरित्रकार महिपति यांनी आपल्या संतविजयांच्या पहिल्या अध्यायात सूर्याजीपंताच्या ज्या दीर्घ आणि कडक तपश्चर्येचे वर्णन केले आहे, तसली तपश्चर्या करणार्‍यांच्य़ा पोटी असली तेजस्वी नररत्ने निर्माण होऊन, अवतारी पुरुषांच्या पंक्तीत लोकांनी त्यांस बसवावे, यांत आश्चर्य करण्यासारखे काही नाही.
महिपति म्हणतात:-
"प्रात:काळी करोनी स्नान । वासरमणीसी अर्घ्यदान ।
आरक्त सुमने रक्तचंदन । यथाविधीने मंत्रोक्त ॥
आदित्यह्र्दय स्तोत्रपठण । नित्य करीत पारायण ।
अखंड वासरमणीचे ध्यान । निजप्रीतीने अंतरी ॥
इतुके करोनी साचार । घालित सहस्त्र नमस्कार ।
तेणे तेजाची शक्ति फ़ार । यास्तव अंतर पडेना ॥
बारा सहस्त्र जप नित्य । करित असे एकाग्रचित्त ।
बारा वर्षे लोटतां सत्य । साक्षात आदित्य भेटला ॥"
तेव्हा सूर्याजीपंतांनी भगवान सहस्त्रश्मीपाशी कोणते वरप्रदान मागितले ? त्यांनी काहीच मागितले नाही, पण "राणूबाईच्या इच्छेस्तव, तुम्हास दोन भगवद्भक्त पुत्र होतील" असा सूर्यनारायणाने त्यांस आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे शके १५२७ विश्वावसु संवत्सरी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी दिवशी गंगाधराचा व शके १५३० कीलक नाम संवत्सरी चैत्र शुध्द नवमीस बरोबर श्रीरामजन्मकाली नारायणाचा जन्म झाला.
"उभयता पुत्रांना घेऊन राणूबाई श्रीएकनाथ महाराजांच्या दर्शनास पैठणास गेल्या असतां, आमच्या हातून घडावयाचे कार्य राहिले ते हे तुमचे पुत्र सिध्दीस नेतील, असे म्हणून नाथमहाराजांनी शके १५३१ सौम्यनाम सवत्सरी फ़ाल्गुन वद्य ६ स आपला अवतार समाप्त केला" इत्यादि हकीकत हनुमंतस्वामीकृत समर्थांच्या बखरीत दिली आहे; परंतु हा भेटीचा प्रसंग यथार्थ नसावा असे वाटते. कारण नाथनिर्याणकालविषयक दोन श्र्लोक पैठण येथील नाथांचे वंशज नानाबुवा यांच्या दत्परांत सांपडले त्यावरुन व नाथांच्या समाधीवर असलेली अक्षरे सदर श्लोकांच्या अनुरोधाने वाचली असतां नाथांचा समाधिशक १५२१ येतो. वरील दोन श्लोक, प्रसिध्द ’हरिवरदा-’ कर्ते श्रीमत्कृष्ण्दयार्णव यांनी रचिलेले आहेत असे म्हणतात व ते पैठणांत सर्वतोमुखी आहेत. शिवाय रा. पांगारकर यांनी आपल्या एकनाथचरित्रात अनेक पुराव्यांच्या आधाराने, शके १५२१ विकारी नाम संवत्सर, हाच नाथांचा समाधिकाल दिला आहे. तेव्हा आतां या प्रश्नासंबंधाने अत:पर वादाचे कारण राहिले नाही. तात्पर्य, एकनाथ महाराज समाधिस्थ झाल्यावर श्रेष्ठ व समर्थ हे अनुक्रमे सहा व नऊ वर्षांनी जन्म पावले. नाथांचे नातु प्रसिध्द कवि मुक्तेश्वर हे मात्र बंधुव्दयाचे समकालीन होते.
"गंगाधर आणि नारायण यांचे शिक्षण सूर्याजीपंतांसारख्या आचारविचारसंपन्न पुरुषाच्या देखरेखीखाली कोणत्या प्रकारे झाले असेल याची कल्पना करणे फ़ारसे कठीण नाही. गंगाधराचा विवाह त्याच्या वयाचे सातव्या वर्षी झाला. त्यांस आंबेडकर देशमुखांची कन्या दिली होती. हे देशमुखांचे घराणे अजून आंबडास प्रसिध्द आहे. श्रेष्ठांच्या प्रपंचाची ही बाजू झाली. त्याना परमार्थाचा लाभ कसा झाला हे आता पाहू."
श्रेष्ठ व समर्थ यांस प्रत्यक्ष श्रीरामाचा अनुग्रह झाला होता असे तत्कालीन जुन्या सांप्रदायिक ग्रंथावरुन दिसते.’भक्तिरहस्य’ ग्रंथाच्या नमनांत श्रेष्ठ म्हणतात:-
तो मद्र्रु जगद्गुरु समर्थ । भावेचि भेटला श्रीरघुनाथ ।
मस्तकी ठेऊनि पद्महस्त म। स्वस्वरुप प्रकाशिले ॥
तिसगांव मठपति दिनकर गोसावी रामदासी यांनी शके १९१६ त लिहिलेल्या "स्वानुभवदिनकर" नामक ग्रंथाच्या सोळाव्या कलापांत, एतव्दिषयक जो कथाभाग आला आहे तो येणेप्रमाणे- "गोदावरीच्या उत्तर तीरी असलेल्या जांबगांवचे कुलकर्णी (सूर्याजीपंत) हे एके दिवशी गोदेवर स्नानास गेले असतां मागे असे वर्तमान घडले की, दूतवेषाने एक वानरगण त्यांच्या घरी आला व नारायणास ( समर्थास) घेऊन गांवाच्या बाह्यप्रदेशी गेला. त्या वेळी नारायणाचे वय ११ वर्षाचे होते. वानराच्या खांद्यावर बसून जात असतां नारायण फ़ार भयभीत होऊन पाहतो तो पुढील चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला.
"मेधश्यामरुप क्षत्रीवेषे। सिबीकेमाजी बैसली स्त्रीपुरुषे ।
सभंवते निजगण यथासंतोषे । उणे असता भागी ॥
वानराने नारायणास त्या श्यामवर्ण जोडप्यापुढे नेऊन उभे केले, व "तुझा पिता कोठे आहे?" असा प्रश्न ’रजपुती’ भाषेत त्यास विचारण्यात आला. त्या मंडळींचा वेषही रजपूती थाटाचाच होता. नारायणाने आपल्या पित्याचा वृत्तांत सांगितला तेव्हा प्रभूने (तो श्यामवर्ण पुरुष श्रीरामचंद्र होता) त्यास जवळ बोलाविले व त्याचे मस्तक कुरवाळून त्याच्या हाती एक पत्र दिले . ते राममुद्रांकित पत्र हाती पडतांच तत्क्षणी नारायणाची वृत्ती पालटली ! त्याच्या अंगास थरथर कंप सुट्ला व तोंडातून एक शब्दही बाहेर पडेना.
"वाचा जातसे बेंबळपणे ।  हांसे रडे नाचे सत्राणे ।
शब्द बोलवेना निर्बळपणे । उगाचि टकामकां पाहतसे ॥
आंग कांपतसे थराथरा । विस्मये दाटलासे सैरा ।
घामेजोनि अतिघाबिरा । रडे पडे आक्रंदे ॥
क्षणे हांसे क्षणे रडे । उड्या मारी क्षणे पडे ।
इतुकियामाजी निजनिवाडे । कौतुक देखे निजदृष्टी ॥
तव मूर्ति देखिली घवघवीत । मेघश्याम प्रभा लखलखीत आ।
वामांकी जानकी शोभत । पाठीसी सौमित्र भरत ॥
तया सेजी उभा शत्रुघ्न । पुढे उभा वीर हनुमान ।
अकस्मात वांहाटुळी येऊन । इतुके देखे तत्काळी ॥
ऐसे देखेना जंव अकस्मात । तव श्रीरामे मस्तकी ठेऊनि कृपाहस्त ।
महावाक्य उपदेशूनि त्वरीत । हनुमंतासीई निरविले ॥
ते समयी दिग्मंडळ दणाणिले । तेणे नारायणाचे सर्वांग थरारिले ।
म्हणे काय ब्रम्हांड कोसळ्ले । मजवरीख ये काळी ॥
म्हणोनी थरथरा असे कांपत । तेणे दांतखिळी बैसों पहात ।
सभंवते टकामकां अवलोकित । तवं धुधुकार देखिला ॥
इतुकियामाजी अकस्मात । विज्जुसारखे लखलखीत ।
निजांगी दिव्य वस्त्र वेष्टीत । सीतनिवारणार्थ ॥
वस्त्र रंगाथिले अति मनोहर । आरक्त शोभामंडित सुंदर ।
हुमुजीसारखे सपरिकर । दिव्य तेजे विलसे ॥
सव्य करी पत्र राममुद्रांकित । वाम करी अर्धचंद्रबाण राम देत ।
इतुकियामाजी तत्काळ जाली गुप्त । राममुर्ती निजांगे ॥
इतुके जंव क्षणमात्रे हो न सरे । तवं नारायणासी पडले अंधारे म।
वाचा स्तब्ध होऊनि एक संवत्सरे । निजसमाधी तटस्थ ॥
गावाबाहेर इतका प्रकार घडल्यावर, इकडे नारायणाचे वडील सूर्याजीपंत व जेष्ठ बंधु गंगाधर घरी आले तेव्हा, वानराने नारायणास नेल्याचे वर्तमान त्यास समजले. ते ऐकताच ते भयभीत होत्साते नारायणाच्या शोधार्थ गांवाबाहेर चालले, तो ब्रह्मारण्यांत नारायण एकटाच यांच्या दृष्टीस पडला. तो प्रश्नाची उत्तरे देत नाही व काही बोलतचालत नाही हे पाहून त्यांस आश्चर्य वाटले. इतक्यात काही ग्रामस्थ लोकही त्या ठिकाणी आले. नारायणाची मूकवृत्ती पाहून त्यातील काही लोकांनी असा तर्क केला की, यास भूतबाधा झाली असली पाहिजे.

"कोणी म्हणती ब्रह्मराक्षस । का लागली झोटिंगाची टापस ।
कोणी म्हणती अहो यास । मुंज्या लागला निश्चयेसी ॥ "
अशा प्रकारे निरनिराळे लोक तर्क करु लागले; व पंचाक्षरी आणवून भूत काढण्याचे उपाय करण्याचीही काही लोकांनी सूचना केली ! त्याप्रमाणे अनेक उपाय केले , परंतु समर्थांच्या मनस्थितीत किंवा बाह्य वर्तनांत कांही पालट झाला नाही. मग मंडळींने त्यांना त्यांच्या घरी उचलून आणले. तेथे ,
तव ते वस्त्र देखिले अकस्मात । अर्धचंद्र आणि पत्र ॥
त्यावरी सकळ लोकांसी आज्ञा दिधली । पितयाने मूठ उकलूनि पाहिली ।
तव पत्रावरी मुद्रा देखिली । श्रीरामनामांकित ॥
हा श्रीसमर्थ झालेल्या श्रीरामदर्शनाचा वृत्तांत वाचून वाचक म्हणतील की, श्रेष्ठांच्या चरित्राशी या गोष्टीचा काय संबंध? तर यांचे उत्तर असे आहे*
पुढे पत्रार्थासी जव वाचिती । तव दोघांसही समाधि अवचिती ॥
प्राप्त होऊनी तटस्थ होती । स्वानुभवसुखे ॥
पिता निजसमाधिसुख लाधोनि । देह ठेवूनिया तत्क्षणी ।
साम्रज्यपद सुखासनी । निज वैकुंठी वास्तव्य ॥
जेष्ठ बंधु जो का गंगाधर । त्यासी पत्र वाचितां समाधि साचार ।
तेणेहि लेखणी वाहोनि रघुवीर । प्रसन्न केला निजभावे ॥
याप्रमाणे श्रीसमर्थांस ज्या दिवशी श्रीरामदर्शन होऊन भगवंताचा अनुग्रह झाला, त्याच दिवशी समर्थांस मिळालेले राममुद्रांकित पत्र वाचून सूर्याजीपंतांचे निर्याण झाले व श्रेष्ठांस समाधिसुखानुभव येऊन त्यांनी आपली लेखणी रघुवीरचरणी वाहिली. श्रीसमर्थांस  मिळालेल्या या श्रीरामनामांकित पत्रांचे पुढे काय झाले, हे समजले नाही. हे पत्र चांफ़ळच्या मठांत असते तर रा. देव यांनी त्याचा उध्दार खात्रीने केला असता. अर्थात ते आतां उपलब्ध होण्याचा संभव मुळीच नाही, हे उघड आहे.
वरील अनुग्रहाची हकीकत, श्रीएकनाथादि इतर संतास झालेल्या देवदर्शनाच्या ह्कीकतीशी पुष्कळच जुळते. श्रीएकनाथ महाराजांस श्रीगुरुदत्तात्रेयांनी यवनवेषाने दर्शन दिले होते, ही आख्यायिका प्रसिध्दच आहे. वरील वृत्तांताविषयी लिहितांना रा. देव म्हणतात, "ज्याची जशी बुध्दी असेल, त्याप्रमाणे तो या उतार्‍याचा अर्थ करील. ऐतिहासिक दृष्टीने अथवा परमार्थदृष्टीने अथवा सांप्रदायाच्या दृष्टीने, कोणत्याही दृष्टीने या उतार्‍याचा विचार केला तरी तो क्षणोक्षणी वाचावा असे वाटणार नाही, असा वाचक विरळा !  हा उतारा मोठा आहे पण तो महत्वाचा आहे. त्यावरुन पुष्कळ गोष्टींचा नि:शंकपणे निर्णय करण्यास हरकत नाही" आणि रा. देव यांनी हा निर्णय वरील उतार्‍यातील सर्व गोष्टी विश्वसनीय आहेत असे मानून केला आहे. अर्थात हा श्रध्देचा विषय असल्यामुळे, तो मानणे न मानने हे ज्याच्या त्याच्या भावनेवर अवलंबून आहे. मला मात्र यांत काहीच अशक्य दिसत नाही.
प्रस्तुत ग्रंथात गिरिधर रामदासी यांचे चरित्र दिले आहे, त्यांत श्रीसमर्थप्रताप ग्रंथाचा उल्लेख आहे. सदर ग्रंथात गिरिधर म्हणतात - समर्थांचे भविष्यअवतारमहिम्न । ग्रामधिपतिरुपे श्रीरघुवीरे जाण ।
गंगाधरपंतांकरवी लेहून । रात्री वटवृक्षातळी दिधले ॥
गंगाधर स्वामी तीन दिवस समाधिस्थ राहे ।
समर्थचरित्रपत्रे हस्ती घेऊनिया ॥
पुढे श्रेष्ठ समर्थांच्या लग्नाच्या उद्योगास लागले, परंतु समर्थांनी आयत्या वेळी कसा ’दगा दिला’ व पलायन केले हे सर्वांस ठाऊकच आहे. पंत म्हणतात -
"व्दिज सावधान ऐसे सर्वत्र विवाहमंगली म्हणती ।
ते एक रामदासे आयकिले त्या असो सदा प्रणति ॥
समर्थांची प्रपंचपराड्‍मुखता पाहून
गृहस्थाश्रमी ऐशा मुर्ति । निर्माण होती पुण्यकीर्ति ।
पुत्रपौत्राभिवृध्दि सत्कीर्ति । गंगाधर स्वामी विस्तारीजे तुम्ही ॥
असे म्हणून आप्तेष्टांनी श्रेष्ठांचे सात्वन केले. रा. देव म्हणतात- "येथवर श्रीश्रेष्ठांचे चरित्र थोडे फ़ार तरी सांगता आले, परंतु यापुढ्चे त्यांचे चरित्र लिहिण्यास मुळीच साधन नाही म्ह्टले तरी चालेल. नाही म्हणायला शके १५६६ चे सुमारास एकदा व शके १५७६ चे सुमारास दुसर्‍यांदा श्रीसमर्थ जांबेस आले होते, त्या वेळचा थोडासा वृत्तांत व एक दोन वेळा उभयतां बंधूंचा जो पत्र व्यवहार झाला तो, इतकीच माहिती या पन्नास वर्षातील देता येण्यासारखी आहे. श्रेष्ठांनी भक्तीरहस्य ग्रंथ शके १९९० त लिहीला."
"पुरश्वरण व तीर्थयात्रा संपवून श्रीसमर्थ शके १५६६ चे सुमारास जांबेस आले. हा "भिक्षा घेऊन जाणारा गोसावी नव्हे, " कोण , माझा नारोबा आला की काय ? " असा आतुरतेचा प्रश्न राणूबाईंनी करितांच "होय आई, हा मीच आले," असे म्हणून समर्थांनी आईच्या पायांवर मस्तक ठेविले. असा प्रकार इकडे चालू असतां, श्रेष्ठ घरांत संध्या करीत होते, त्यास समजले की नारायण बाहेर आला आहे. समर्थांनी श्रेष्ठाच्या चरणी मस्तक ठेविले व श्रेष्ठांनी त्यांना उचलून पोटाशी धरिले. त्या भेटीला उपमा श्रीराम आणि भरत यांच्याच भेटीची होय ."
"यानंतर पुन: एकदा श्रीसमर्थ शके १५७६ चे सुमारास जांबेस आले होते असा उल्लेख स्वानुभवदिनकरांत सापडतो व त्यास समर्थप्रतापांत पुष्टी मिळते. याही भेटीच्या वेळी मातु:श्री होत्या. राणूबाईंनी देह ठेवल्याची मिति हनुमंतस्वामीनी दिली आहे ती शके १५७७ ची जेष्ठ शुध्द ३ होय. श्रीसमर्थांकडून श्रेष्ठांस आलेल्या पत्रांपैकी दोन पत्रे हनुमंतस्वामींनी बखरीत दिलेली आहेत; त्यावरुन समर्थ श्रेष्ठांस किती मान देत असत हे स्पष्ट होत असल्यामुळे ती येथे देणे अवश्य आहे -
पहिलें पत्र ( ओव्या )
सकळ तीर्थाचे माहेर । सकळ गुणांचे भांडार ।
सकळ विद्येचा सागर । स्वरुप तुमचे ॥१॥
तू धीरपणे मेरु । तू उदारपणे जळधरु ।
तू गंभीरपणे सागरु । पीयुषाचा ॥२॥
तू पवित्रपणे वैश्वानरु । तू समर्थपणे ईश्वरु ।
तू प्रतापाचा दिनकरु । धगधगायमान ॥३॥
तू सकळ तीर्थांचे यश । तू उंच आकाश ।
तू मायेचा मूळ पुरुष । सकळकर्ता ॥४॥
तू विष्णूचे मुळस्थान । तूं योगियांचे ध्यान ।
वू वेदशास्त्रांचे मथन । सार वेदांताचे ॥५॥  
तूं सकळ सत्याचा साक्षी । अनंत माया तुझे कुक्षी ।
तुमचे निजरुप लक्षी । ऐसा कवणु ॥६॥
झुंज वायूसी आकळावे । गगन वोलांडूनि जावे ।
महातेजासी आच्छादावे । कवणे परी ॥७॥
सप्तपाताळा तळवटी । एकवीस स्वर्गाचे शेवटी ।
पवाडा करीन ऐसी पोटी । हांव कैची ॥८॥
वसुंधरा ही एकसरी । घालोनियां मस्तकावरी ।
अंतरीक्ष गमन करी । ऐसा कवणु असे ॥९॥
आवर्णोदकाचा अंत । कैसा घ्यावा तो अद‍भुत ।
तुमचे स्वरुपाचा निश्चितार्थ । कवण करी ॥१०॥
दुसरे पत्र
सकळ तीर्थांचे सार । सत्यस्वरुप निर्विकार ।
तुमचे चित्त तदाकार । निरंतर ॥१॥
विमळ ब्रह्मपरायण । सगुण भक्तिसंरक्षण ।
विशेष वैराग्यलक्षण । तुमचे ठायी ॥२॥
मुक्त क्रियेचा अनादरु । स्वधर्मकर्मी अत्यादरु ।
आग्रह निग्रहाचा विचारु । तोही नसे ॥३॥
नसे कामनेचा लेश । जयत्या पर्वाचा हव्यास ।
अंतरी आवडे विशेष । हरिकथानिरुपण ॥४॥
तुमचे देह सार्थकाचे । सर्वदा परोपकाराचे ।
भगवंते निर्मिले बहुतांचे । समाधान ॥५॥
तुमचेचि वाग्विलासे । बहु पाखंड नासे ।
संशयातीत प्रकाशे । विमळ वस्तु ॥६॥
सन्मार्गीचा कैपक्षी । अनमार्ग करणे अलक्षी ।
लोक पावती प्रत्यक्ष । समाधान ॥७॥
दक्षता आणि चातुर्यता । वित्पन्नता आणि लीनता ।
उत्तम गुण सर्वज्ञता । तुमचे ठायी ॥८॥
तुमचे स्वरुप वर्णवेना । म्हणोनि देहाची वर्णना ।
युक्त अयुक्त मित्रजना । क्षमा केली पाहिजे ॥९॥
जाड्या अक्षरात दिलेल्या वरिल चौथ्या ओवीत श्रेष्ठांच्या परमार्थ मार्गाचे "जयंत्या पर्वांचा हव्यास" इत्यादी जे वर्णन समर्थांनी केले आहे, त्याची यथार्थता श्रेष्ठांचा ’भक्तिरहस्य’ ग्रंथ पाहिला असतां कोणाच्याही निदर्शनास येईल. सदर ग्रंथात हरिनाममाहात्म्य आणि व्रतोद्यापने यांवरच श्रेष्ठांनी विशेष भर दिलेला स्पष्ट दिसतो.
श्रेष्ठांनीही कांही मुमुक्षु जनावर अनुग्रह केला होता असे दिसते. मुंजे उपनांवाच्या एका शिष्याचा उल्लेख हनुमंत स्वामीच्या बखरीत आला आहे. दक्षिणगीर गोसावी नामक त्यांचे एक दुसरे शिष्य होते. कोणी म्हणतात हे त्यांचे प्रशिष्य होते. त्यांचा मठ जांबेस आहे. त्यांच्या विलक्षण भूतदयेसंबंधाने एक आख्यायिका रा. देव यांनी दिली आहे, ती जिज्ञासूंनी त्यांच्या लेखांत पहावी.
शके १५९९ च्या फ़ाल्गुन वद्य १४ स श्रेष्ठांनी दहिफ़ळ येथे आपला देह ठेविला. त्यांच्या कुटुंबाने पतिसमागमे परलोकास जावे असा निश्चय करुन, अमावस्येचे दिवशी दीर्घ स्वराने "राम" असा उच्चार करुन देहाचे विसर्जन केले !  दहिफ़ळ येथे गांवचे बाहेर अर्ध्या कोसावर खंदारे पाटलांच्या एका शेतांत श्रेष्ठांचे वृंदावन आहे. या वृंदावनास मोगलाईंतून ८० रु. वर्षासन आहे. पुजारी पूजा करीत असतात.
रामचंद्रबावा व श्यामजीबावा असे श्रेष्ठांना दोन पुत्र होते. ते या वेळी लहान होते. श्रेष्ठांच्या अवतारसमाप्तीचे वृत्त कळतांच समर्थानी उध्दव गोसावी यांस जांबेस पाठविले. त्यांजबरोबर उभयता चिरंजीवांकरिता उपदेशपर दहा श्लोक त्यांनी दिले होते, त्यांचा समावेश श्रीसमर्थांच्या चरित्रलेखांत करु.
श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी शके १६०३ मध्ये समाधि घेतल्यानंतर काही दिवसांनी , दासनवमीच्या उत्सवासंबंधाने शिष्यमंडळीत ईर्ष्येमुळे मतभेद उत्पन्न झाला. कल्याणस्वामींनी मध्यस्थी केली. मग सर्वांनी विचार करुन , परंपरा पुढे चालविण्यासाठी श्रेष्ठांच्या चिरंजीवांस जांबेहून आणावे असे ठरविले. परंतु, त्यानंतरचा काही काळ महाराष्ट्रात धामधुमीचा गेल्यामुळे तो विचार लांबणीवर पडला. मध्यंतरी आधी श्यामजी व नंतर रामजी यांनी अवतार संपविले. जांबेस आणि गडावर श्रींचे साक्षात्कार झाले, तेव्हा जांबेस जाऊन समर्थांच्या महंतांनी श्रेष्ठांचे नातू म्हणजे रामजीबुवांचे चिरंजीव गंगाधर स्वामी यांस विज्ञति केली. यावरुन ते शके १६३२  च्या श्रावण शुध्द पंचमीस सज्जनगडी येऊन दाखल झाले. या सर्व हकीकतीस कागदपत्रांचा भरपूर आधार रा. देव यांजपाशी आहे. असो. अशा रीतीने श्रेष्ठांचे नातू गंगाधर स्वामी उर्फ़ बापास्वामी यांचे आगमन चाफ़ळ व सज्जनगड इकडे झाले. श्रीछत्रपति शाहू महाराज व सर्व महंत मंडळी यांना आनंद झाला व तेव्हापासून आजतागाईत श्रेष्ठ व समर्थ यांचे पारमार्थिक साम्राज्य परंपरेने सुरु झाले. चांफ़ळ येथील मठाला उत्पन्न चांगले आहे. गादीचा अधिकार कसा चालत आला आहे, हे पुढील वंशावळीवरुन ध्यानात येईल
श्रेष्ठांचे मुख्य ग्रंथ म्हणजे भक्तिरहस्य व सुगमोपाय हे होत. हे दोन्ही छापून प्रसिध्द झालेले आहेत. भक्तिरहस्याची प्रकरणे ७७ असून ओवीसंख्या ५८१९ आहे. व सुगमोपायाची प्रकरणे १० व ओवीसंख्या ११३९ आहे. फ़ुटकळ कविता अगदीच थोडी आहे. मिळून श्रेष्ठांची उपलब्ध कविता साडेसहा हजारांच्या आत आहे. "रामीरामदासांची कविता" या ग्रंथाच्या आरंभी "श्रेष्ठांची कविता" या मथळ्याखाली रा. देव यांनी जो निबंध दिला आहे तो अत्यंत वाचनीय आहे. या निबंधाच्या आरंभीच रा. देव लिहितात -" श्रीसमर्थांचे जसे दासबोध व आत्माराम हे दोन ग्रंथ तसे श्रीश्रेष्ठांचे भक्तिरहस्य आणि सुगपोपाय हे दोन ग्रंथ होत. करावयाचा तेवढा सर्व बोध दासबोधात करुनही काही शिष्य जेव्हा कोरडेच्या कोरडे राहिले, तेव्हा त्यांच्यासाठी श्रीसमर्थांनी आत्माराम नावाचा लहानसा ग्रंथ निर्माण केला; तव्दत भक्तिरहस्याचे सारे रहस्य श्रेष्ठांनी सुगमोपायात थोडक्यात आणले आहे."
भक्तिरहस्य ग्रंथ शके १५९० च्या विजयादशमीस पूर्ण झाला. सुगमोपायाचा रचनाकाल ग्रंथात दिलेला नाही. रामीरामदास या नांवावर जशी श्रेष्ठ व समर्थ या दोघांचीही कविता आढळ्ते, तव्दत "दास" हे अभिधान समर्थांप्रमाणेच श्रेष्ठांनीही काही ठिकाणी धारण केलेले आढळते. यासंबंधाने एके ठिकाणी ते म्हणतात -
"कदापि ऐसे म्हणती अभक्त जन । दास हे अनुचित्त विप्राभिधान ।
तरी हा आक्षेपचि अज्ञान । करी जयाचा तयाशी ॥
अहो शूद्र सेवक जैसा तिही वर्णोस । तैसे मनुष्यदास्य अनुचित ब्राम्हणांस ।
ते दुषक योजील हरिभक्तास । तो चतुर की मुर्ख ? ॥
विप्र दास व्हावया ईश्वराचे । संचित पाहिजे की जन्मोजन्मीचे ।
नारदादी म्हणविती जयांचे । दासाचे दास ॥
श्रेष्ठांची भाषा शुध्द असून ,त्यांच्या कवितेत , समर्थांच्या कवितेतल्याप्रमाणे शब्दांची अशुध्द रुपे फ़ारशी आढळत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्या कवितेत संस्कृत शब्द अधिक आहेत. थोड्याशा अंतराने समर्थाशी समकालीन असलेले वामनपंडित यांचा जसा भगवन्नाममाहात्म्यावर विशेष बर दिसतो, तव्दत श्रेष्ठांनीही सगुणोपासना आणि भगवन्नामस्मरण यांचे माहात्म्य आपल्या ग्रंथात प्रामुख्याने वर्णिले आहे. भक्तिरहस्याच्या अकराव्या प्रकरणाचे शेवटी श्रेष्ठ म्हणतात -
" या सकळहि व्रतफ़ळाचे फ़ळ । नामस्मरण रामाचे एक वेळ ।
अहिर्निशी स्मरेल जो प्रेमळ । तो स्वयेचि श्रीराम ॥
अशक्ता न टकती व्रते तपे । तरी नाम भगवंताचे सोपे ।
सुखे स्मरावे स्वरुपे । परमानंददायक ॥
श्रीराम जयराम जयजयराम । अखंडे जो स्मरे सप्रेम ।
तो स्वयंचि असे पुरुषोत्तम । म्हणोनी राम न विसरावा ॥"
श्रेष्ठांनी आपले ग्रंथ लिहितांना भारत, भागवत, रामायण, गौतमस्मृती, अत्रिस्मृति, मन्वादि अष्टाद्श स्मृतिकारांच्या स्मृति, शारीर भाष्य, ब्रम्हपुराण, ब्रम्हांडपुराण, स्कंदपुराण, गरुडपुराण, नारादपुराण, गुरुगीता इत्यादि ग्रंथाचा उपयोग केल्याचा उल्लेख खुद्द त्यांनीच सदर ग्रंथात केला आहे. "श्रुति, स्मृति आणि पुराणे यांचा मथितार्थ काढून आपण तो श्रोत्यास सादर केला आहे," असे श्रेष्ठांनी एके ठिकाणी म्हटले आहे. भर्तुहरीची शतकेही त्यांच्या वाचनांतून चुकली नव्हती असे भक्तिरहस्याच्या ५४ व्या प्रकरणातील पुढील ओवीवरुन दिसते :-
शुष्क वैरकारी दुर्जन । व्देषिती मृगमीन सज्जन ।
ढिवर लुब्धक दुष्ट मन । विषयतृष्णेस्तव तर्‍ही ॥४३॥
रा. देव म्हणतात, "संस्कृतांतील या ज्ञानभांडाराशिवाय ज्ञानेश्वर, एकनाथ, इत्यादी साधुसंतांच्या ग्रंथाचा श्रेष्ठांना पूर्ण व्यासंग होता, असे त्यांच्या ग्रंथावरुन विशेषत: सुगमोपायावरुन -वाचकांचे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. फ़ार काय सांगावे, परंतु काही उल्लेखांवरुन आपल्या धाकट्या बंधूंचा ’दासबोध’ ग्रंथही श्रेष्ठांच्या अवलोकनांतून गेला असावा असे मला वाटते."
आपल्या या विधानाच्या समर्थनार्थ रा. देव यांनी श्रेष्ठ आणि समर्थ यांच्या ग्रंथातील जी सदृश स्थले उदाहरणार्थ दिली आहेत, ती चिंतनीय आहेत. तत्कालीन देशकालस्थितीसंबंधाचे उध्दार दोघांच्याही ग्रंथात सापडतात.
श्रेष्ठांनी भक्तियोगाचा महिमा खालील ओव्यात वर्णिला आहे :-
कृतयुगी तरले ध्याने । त्रेतायुगी यज्ञदाने ।
व्दापारी तरले पूजन । केवळ कीर्तने कलियुगी ॥२६॥
कलौ कल्मषरुप मने ,। निश्चये न तरे अन्यसाधने ।
मुक्ति रामनामाभिधाने । आणि स्मरणं शिवाच्या ॥२७॥
सांडूनी हरीहरभक्तिचा आश्रय । केवळ बोधलुब्ध निराश्रय ।
ते पावती क्लेशसमुदाय । तुषकंडणी श्रम जैसा ॥२८॥
म्हणोनी भक्ति साधनसंजीवनी । भक्ति वैराग्याची योनी ।
भक्ति ज्ञानाची जननी । विज्ञानेसहित  ॥२९॥
भगवदक्तिचिये व्दारी । वोळंगती पुरुषार्थ चारी ।
कर जोडूनी निरंतरी । तिष्ठत असती ॥३०॥
भक्ति धर्माचे निजधाम । भक्ति अर्थाचा आराम ।
भक्तिचा ठाइं संपूर्ण काम । मोक्षदायिनी सुभक्ति ॥३१॥
भक्तिचे ठाइं भगवंताचे । षड्‍गुण ऐश्वर्य वर्ते साचे ।
संपूर्ण महिमान भक्तिचे । कवणा वर्णवेल ॥३२॥
भगवद्भक्तिची सत्ता थोर । विधीनिषेध केले किंकर ।
भक्तिप्रतापे मोडली थार । दंडा आणि दोषांची ॥३३॥
प्रायश्चित्तास कोण पुसे । हठयोगास ठावचि नसे ।
तीर्थादिके अनायासे । भक्तिचा ठायी वोळगती ॥३४॥
तपे हरिहरेवीण तापली । प्राप्तिकारणे अनुतापली ।
ईश्वरभक्त्या निवाली । सार्थक जाले कीतनी ॥३५॥
कृतादि युगींचे तापस प्राणी । करिती कलियुगाची सिराणी ।
येथे कीर्तनमात्रे चक्रपाणी । मोक्षदाता सुभक्तां ॥३६॥
कळी हा दोषांचा समुद्र । परि येक असे महाभद्र ।
कीर्तनमात्रे चंद्रमौळी रामचंद्र । महापापे हरुनि मोक्ष दे ॥३७॥
पूर्वयुगी काळांतरे । ईश्वरप्राप्ती होय निर्धारे ।
कलौ येकेचि अहोरात्रे । सुप्रसन्न सुभक्तां ॥३८॥
म्हणौनी धन्य धन्य हे कलियुग । पावले धन्य धन्य जग ।
भगवद्भक्त महाभाग । अनायासे तरताती ॥३९॥
कळी भरे भवसिंधू दुस्तरु । भगवंत अनाथकरुणाकरु ।
प्रेरिले सुभक्ति महातारु । विलंब न  लउं वळगतां ॥४०॥
पुन: पुना म्हणे जगज्जीवनधन । माझे नाम माझे जीवन ।
कलीयुगी नामस्मरणावांचुन । गतिच नाही अन्यथा ॥४१॥
ह्र्दयी धरुनिया प्रेम । मद्भक्त जो नि:काम ।
सदा स्मरेल माझे नाम । तयाचा मी विकिला ॥४२॥
माझिया नामस्मरणाचे टोणे । मज केले भक्तें जेणे ॥
तयापासुनि वेगळे होणे । यैसे मज स्मरेना ॥४३॥
वैकुंठी नलगे माझे मन । मज नावडे कैलासभुवन ।
नामसंकीर्तनी अनुदिन । निष्ठे भावे भुललो ॥४४॥

भक्तिरहस्य प्रकरण ६
भक्तिरहस्य ग्रंथात शैव आणि वैष्णव या दोघांच्याही व्रताचे वर्णन असून, श्रेष्ठांनी हरिहरांचा पूर्ण अभेद मानिला आहे.
महाभगवद्भभक्त ध्रुव हा आपल्या पित्याच्या अंकावर बसला असता :-
"सापत्न माता म्हणे मछरे । तुवा अभाग्यवंतेचा कुमरे ।
सिंहासन कैसे पाविजे, ईश्वरे । दिधलियावांचुनी ॥३९॥
जीव कष्टवावा साधने । तनु दमावी पंचाग्नि ध्रुम्रपाने ।
उग्र तपतां सिंहासने । पावती भववैभव ॥४०॥
जव दिधले नाही देवे । तव हांव काय दुजयाचा दैवे ।"
छळवादे बोलिली परी धृवे । धृवबुध्या मानिले ॥॥
आपुलिया जनकादेखतां । धि:कारुनि दवडी सापत्न माता ।
अति अनुतापली मनोदेवता । रुदन आले स्फ़ुंदने ॥४२॥
बाळकाचे चित्त कोमल । पारिखे वाटले जगज्जाळ ।
एका भगवंतावाचूनि स्थळ । नाही आतां मजलागी ॥४३॥
दीनवदना मम जननी । राजाज्ञे प्रमाण वर्तिजे जनी ।
अत:पर परमेश्वरावांचूनि । कोण आहे मजलागी ॥४४॥
कोमाइले बाळकाचे वदन । जैसे पाडळीचे सुमन ।
श्रीहरिवाचूंनि सर्व जन  । न दिसे दृष्टी तयाचे ॥४५॥
वसतच क्जनता जाली वोस । मनता विषयी अति उदास ।
लागला श्रीहरीचा निजध्यास । न पाहे वास आणिकाची ॥४६॥
धांव धांव जगदीश्वरा । भक्तजनवज्रपंजरा ।
अनाथ दीनाच्या आधारा । तूं सोयरा निर्वाणी ॥४७॥
प्रति तनुता हे जेथवरी । तितुकी मावेची सोयरी ॥४७॥
प्रति तनुता हे जेथवरी । तितुकी मावेची सोयरी ।
तुजवांचूनिया श्रीहरि । जिवलग नाही दुजा ॥४८॥
हरि तू जीवाचे जीवन । जीव न जिये तुजवांचून ।
तू एक न वचसी सांडून । सर्व काळ सांगाती ॥४९॥
एर विश्व मिथ्यामय  । जैसा यात्रेचा समुदाय ।
स्वकार्यतत्पर कैचे प्रिय । तुजवांचूनि आत्मया ॥५०॥
तूं व्यापक सचराचरी । वससी बाह्य अंतरी ।
विश्वविसांवया मुरारी । हरि तूं पाव मजलागी ॥५१॥
माया आधार तुटला । जीव तुजलागी फ़ुटला ।
आपुले उदरी तु मजला । अचळ स्थळ देई देवा ॥५२॥
ऐसा आयकोनिया धांवा । देव पावलासे धृवा ।
काय जवळी होता जीवा । माजील तो साक्षी ॥५३॥
भक्ता वाटला परदेश । तंव प्रगटला ह्र्षीकेश ।
विश्वरुप स्वप्रकाश । अढ्ळ स्वपद दिधले ॥५४॥
नाभी म्हणतसे श्रीहरी । मज असतां शिरावरी ।
बहूत शिणलासी संसारी । म्हणौनि ह्र्दयी धरियेला ॥५५॥
तव ते पातली विमाने । दशधा तुरे मंगळ स्वने ।
गगन कोंदले सधने । सुमनवृष्टि होतसे ॥५६॥
धृवे नमिली सापत्न माता । तूंच गुरु होसी तत्वता ।
तुवा तोडिली ममता । तुझेन हरि मज भेटला ॥५७॥
तूंही बोलतीसी रसाळ । मिथ्या प्रपंच परि पाल्हाळ ।
तरि कां तुटते मायाजाळ । कां भेट्ता भगवंत ॥५८॥

भक्तिरहस्य , प्रकरण ५९

एवढ्या उतार्‍यावरुन श्रेष्ठांच्या वर्णनशैलीची ओळख वाचकांस होईल. श्रेष्ठांची कविता अगदी साधी आहे, तीत मुक्तेश्वराची अलौकीक प्रतिभा नाही, किंवा श्रीधराची उच्च रसभरितता नाही, परंतु ज्या एका विशिष्ट हेतूने-सगुणोपासना व भक्तिमार्ग यांचा सामान्य जनतेत प्रसार करावा या हेतूने त्यांनी आपली कविता रचिली तो हेतु सिध्दीस नेण्याइतके रचनाकौशल्य त्यांच्या अंगी खात्रीने होते व यामुळे त्यांचेही ग्रंथ मुमुक्षुस परमार्थमार्गदर्शक झाले आहेत. सुगमोपाय हा ग्रंथ निवळ वेदांतपर -जवळ जवळ गद्यात्मकच असल्यामुळे त्यातील वेच येथे न देता श्रेष्ठांच्या एकदोन फ़ुटकळ कविता देऊन हा लेख संपवितो.

अभंग.

रामासी देखिजे तेचि पै देखणे । येर अंध पाहणे डोळ्यांचे ॥१॥
रामासी परिसिजे परिसणे तेचि । येर श्रवणाची बधिरता ॥२॥
रामासी सन्मुख तेचि पै नासिक । येर निर्नासिक उच्च तर्‍ही ॥३॥
रामेसी बोलिजे तेचि पै रसना  । येर मुकेपणा बोलतांही ॥४॥
रामालागी झिजे तेचि त्वचा पुष्ट । येर कृश कुष्ट भवरोगी ॥५॥
श्रीरामी सार्थक तेचि पै हस्तक । येर ते चाळक तर्‍ही थोटे ॥६॥
चालणे तेचि जे रामालागि चाले । येर ते पांगळे मोक्षपंथी ॥७॥
संसारी सूटीजे तेचि पै पुरुषत्व । येर नपुंसकत्व दाराधीन ॥८॥
रामी चित्तशुध्दी तोचि मळत्याग । येर संसर्ग नीच नवा ॥९॥
रामासी चिंती जे तेचि पै चिंतन । येर ते वणवणा श्वानप्राये ॥१०॥
रामी बोध करी तेचि पै सुबुध्दि । येर ते कुबुध्दि विषयेस्फ़ुर्ति ॥११॥
श्रवण करावे अंतरी धरावे । आणि प्रवर्तावे निजकाजी ॥१२॥
हा देह पुडती न पावात बा रे । म्हणोनि करा रे आत्मसहित ॥१३॥
रामीरामदास विनवी वेळोवेळां  । काळ पळपळां ग्रासितसे ॥१४॥

’नामस्मरण ’  या नावाचे श्रेष्ठांचे एक प्रकरण आहे, त्याच्या २७ ओव्या आहेत, त्यातील १२ ओव्या येथे देतो -

कथे घालावे लोटांगण । भक्तां द्यावे आलिंगन ।
ज्यांच्या स्पर्शे जनार्दन । अभ्यंतरी प्रवेशे ॥१६॥
नाम वाचे रंगी नाचे । नयनी प्रवाह प्रेमाचे ।
हर पदरज वंदी त्याचे । हर्षे नाचत कैलासी ॥१७॥
टाळ मृदांग वैष्णवभार । करताळिका जैजैकार ।
करितां कीर्तनाचा गजर । रंगी तिष्ठे श्रीरंग ॥१८॥
हरिकथेस करी उच्छेद । ऐसा कोण भाग्यमंद ।
तया रुसला गोविंद । निरई पचित येमदूत ॥१९॥
करी भक्तांचा मानभंग । तेणे भंगिले हरीचे लिंग ।
वैकुंठभुवन जे अभंग । तेणे तेहि भंगिले ॥२०॥
भक्ता संकटी घाली उडी । व्देषियाचे मूळ तोडी ।
गदाघाते मस्तक फ़ोडी । आपले जोडी तयांचे ॥२१॥
मधुकैठभेसी घेतली झोंबी । जीवे मारिला निरालंबी ।
कुश छेदिल्याहि तनु अवलंबी । मग जीतचि पुरिला ॥२२॥
हिरण्याक्ष दांती तोडिला । हिरण्यकश्य नखी फ़ाडिला ।
रावण कुंभकर्ण विभांडिला । अति तिक्षण शरधारी ॥२३॥
सहस्त्रार्जुनाची कुठारवरि । केली करचरणाची कांडोरी ।
तर्पण केले त्याच्या रुधिरी । कौस परिवारें मारिला ॥२४॥
भक्तकैवारे दैत्य मारी । याची काये नवलपरी ।
लक्ष्मी शापिली सिंधुतीरी । अश्विनौ देवांकारणे ॥२५॥
भक्तांस अनुमोदन देती । भक्तसंकटे निवारिती ।
त्यांचा साहाकारी श्रीपति । मुक्तिमुक्तीचा दाता ॥२६॥
रामीरामदास म्हणे प्रेमे । जे गर्जती हरीच्या नामे ।
त्यांची हरि हरी जन्मकर्मे । पुरुषोत्तम ते स्वये ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP