चूडामणिसुत

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


दाजीदेव चौथ साचे । विठ्ठलशास्त्री चाकूरचे ।
ते रामजोशी बुवाचे  । होते प्रतिअवतार ॥१८६॥
काव्यकुशल महाचतुर । सरस्वती ज्यापुढे जोडी कर ।
अधिकार पूर्ण भाषेवर । महाव्यत्पन्न शास्त्रवेत्ते ॥१८७॥
विठ्ठलशास्त्री चाकूरकर उर्फ़ चुडामणि यांचा जन्म शके १७३२ त मोंगलाईतील बेदर जिल्ह्याच्या राजूर तालुक्यांतील चाकूर नामक गांवी झाला. त्यांच्या वडिलांचे नांव चूडामणि. शास्त्रीबुवांनी आपल्या कवितेंत सर्वत्र ’ चुडामणिसुत ’ याच नांवाने स्वत:चा उल्लेख केला आहे.
कोणत्याही श्रेष्ठ पुरुषाच्या अंगातील सद्गुणाचे अंकुर त्याच्या बालपणांतच दृष्टोत्पत्तीस येत असतात; आणि त्यावरुनच, त्याच्या भावी मोठेपणाचे अनुमान लोक करीत असतात. पुढील सुखसोह्ळ्याची कल्पना या आशेतच बीजरुपाने गर्भित असते. भाग्यवान मातापित्यांची ही आशा सफ़ल होऊन मुलाच्या सुखसोहळ्याच्या आनंदाचा लाभ त्यांस होतो. परंतु प्रस्तुत कवीच्या आईबापांना, शास्त्रीबोवांच्या पुढील कीर्तिमान आयुष्यांतील सुखसोहळा तर राहोच, परंतु त्याच्या बालपणीच्या स्वभावाकडे पाहून साहजिक उत्पन्न होणार्‍या आशेच्या मनोराज्यातील काल्पनिक सुखाचा आस्वाद देखील चाखावयास न मिळतां या नश्वर जगताचा त्याग करावा लागला ! त्यामुळे शास्त्रीबोवांना बालपणांतच आईबापांचा वियोग होऊन केवळ अनाथ होण्याचा प्रसंग आला परंतु
सकल जगाचा करितो सांभाळ ।
तुज मोकलील ऐसे नाही ॥
हा नाथ महाराजांचा उपदेश व मध्वमुनीश्वरादि इतर संतांच्या आश्वासनपर उक्ति यांच्या वाचनाने, परमेश्वराविषयी दृढ विश्वास पूर्वाभ्यासाने बालपणींच उत्पन्न झाल्यामुळे भगवद्भक्त शास्त्रीबुवांच्या योगक्षेमाची काळजी त्या भक्तिप्रिय भगवंताला ’ योगक्षेम वहाम्यहम ’ म्हणून आश्वासन देणार्‍या श्रीकृष्णाला घ्यावी लागली व त्याप्रमाणे प्रत्यक्ष घटना घडूनही आली .
बनवस संस्थानातील मूळपुरुष श्रीगुरुमाधवाचार्य यांच्या भेटीचा योग घडून आल्यामुळे त्यांजकडून शास्त्रीबुवांचे मौजीबंधन शके १७३९ त म्हणजे त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी झाले. श्रीगुरुमाधवाचार्यानी शास्त्रीबुवांचे पुत्रवत पालन करुन , त्यांजकडून संस्कृत विद्येचा पूर्ण अभ्यास करुन घेतला. शास्त्रीबुवांचे मोक्षगुरुही तेच होत.
पुढे माधवाचार्य एका सुशील व सद्गुणी कन्येबरोबर शास्त्रीबोवांचा विवाह करवून त्यांना गृहस्थाश्रमांत प्रविष्ट केले. वर्णाश्रमविहित वेदोक्त कर्माचरणांत आयुष्य कंठीत असतां त्यांस एक पुत्र झाला, व नंतर त्यांनी अग्निहोत्र घेतले. शास्त्रीबोवा पुराण सांगत व कीर्तने करीत. त्यांची कीर्तने पुराणोक्त आख्यानावर स्वकृत पद्यांनी युक्त अशी असत. दुपारी आख्यान रचून रात्रौ त्यावर कीर्तन होत असे. शास्त्रीबुवांचे काव्य, प्रतिभा, शब्दलालित्य, भाषासौष्टव व अलंकार इत्यादि काव्यगुणांनी परिपूर्ण असे आहे.
शास्त्रीबोवांचा मुलगा ऐन तारुण्याच्या भरांत येतांच निर्दय कालाने त्यावर झडप घालून, त्याच्या मातापित्यास शोकसागरांत लोटून दिले. परंतु या शोकाचा शास्त्रीबुवांच्या मनावर अगदी उलट परिणाम झाला शोकाचा पहिला उमाळा ओसरतांच, चितेच्या वाढत्या ज्वाळांबरोबर त्यांच्या अंगातला स्वत:सिद्ध वैराग्याग्नि जास्तच पेट घेऊ लागला व स्मशानवैराग्याचा आरोप करणार्‍या शंकाखोरांच्या मनावर चिरकालिकत्वाचा लख्ख प्रकाश पाडूं लागला ! त्यांतल्या त्यांत आश्चर्याची गोष्ट ही की स्मशानांतून घरी परत येतांना शास्त्रीबुवांच्या वाणीतून अंतर्गत विचारांचे सत्य पटविण्याकरितांच की काय, पुढील वैराग्यपर विचार सुंदर पद्यरुपाने बाहेर पडले !

संसारचक्र जणुं दुपारची साउली ॥ जे चालवील ते खरे विठो माउली ॥ ध्रु.॥
कधि अधिकाराने उंच मिळाले आसन ॥ कधि तोंड फ़ोडुनी मागे हातभर वसन ॥
कधि पेढे बरफ़ी येत मनाला किसन ॥ कधि भाकर मिळेना आठवि कांदा लसन ॥
कधि रंगीत माहली म्हणे शत वर्षे बसन ॥ कधि पटकिच बसली आले कपाळा
मसन ॥ कधि पंखिन घोडी हरिणीवर धांवली ॥ कधि काठि धरुनि ठोकरा खात
पावली ॥सं.॥१॥ कधिं चिंता टाकुनि झुले सुखीच्या भरांत ॥ कधिं गुंगुनि गेला
कलह लागला घरांत ॥ कधिं संग्रह केला खुप रुपया मोहरांत ॥
विकित हिंडतो पळी तपेली परात ॥ कधिं कीर्ति वाढली खूप जन्मला नरात ॥
कधि डाव फ़िस्कला गणना आली खरांत ॥ कधिं वाघ सिंह मारुनी कीर्ति पावली ॥
कधि कोल्ही कुत्री चहुकुन् सरसावली ॥सं ॥२॥ कधि माहली रमला दिवस कळेना निशा ॥
कधि कवडीसाठी फ़िरत असे दशदिशा ॥ कधिं आरसा पाहुनि चढवित बसला मिशा ॥
कधि बुद्धिच गेली पोरें ह्मणती पिसा ॥ कधिं सद्गुरुबोधे अध्यात्माची निशा ॥
कधिं दृशा मृशा भासती कणाविण पिशा ॥ कधिं मायामृगजल रज्जु सर्प सावुली ॥
हरिकरितां ’ चूडामणिसुत ’ भावुली ॥स.॥३॥
पुढे थोडयाच दिवसांत शास्त्रीबुवांच्या कुटुंबानेही आपली इहलोकची यात्रा संपविली. शास्त्रीबुवांना कीर्तनपुराणाचा उत्तम व्यासंग झाल्यामुळे चहूंकडे यांची कीर्ति पसरली व त्यांचे स्वकृत काव्य व रसाळ कीर्तन श्रवण करण्याकरितां गांवोगांवचे लोक त्यांना आपले येथे बोलावून नेऊन त्यांच्या सहवासाचा लाभ घेऊं लागले. विशेशत: वर्‍हाड नागपूर प्रांतांत त्यांची पुष्कळ कीर्तने झाली. मुखेड मुक्कामी दर नवरात्रीस कीर्तन करण्यास जाण्याचाअ त्यांचा परिपाठ असे. तेथे शास्त्रीबुवांनी सदाशिव महाजन यांस सांगून गांवाबाहेरील नैऋत्येकडील श्रीदशरथेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करविला. श्रीदशरथेश्वरास रुद्राभिषेक अभिषिक्त करुन पुष्कळसे अन्नदान करविले. दर शिवरात्रीस पालखींतून श्रीची मिरवणूक अद्याप निघत असते. शिवरात्रीलाही शास्त्रीबुवांचे कीर्तन याच ठिकाणी होत असे; व अद्याप शिष्यांपैकी एका शिष्यांचे किर्तन होत असते. ह.भ.प. वामनबुवा व बाळाभाऊ लातूरकर हे दोन हरिदास शिष्यांपैकी प्रमुख होत.
शास्त्रीबुवांनी कीर्तनाकरितां पुष्कळशी आख्याने व स्फ़ुट पदें स्वत: तयार केली. सुभद्राहरण, सीतास्वयंवर, गरुडगर्वहरण, शकुंतला, लवकुशाख्यान, शुकचरित्र, चंद्रकला, कृष्णदान, गालव, शतमुखरावण, भिल्लीण, सुदामा, चंद्रावळी, राधाविलास, द्त्तजन्म , वत्सलाहरण, उत्तरगोग्रहण, श्रियाळ, नल, चंद्रहास, श्रीरामजन्म, गणपतिजन्म, डांगवी, अहिरावण महिरावण, इत्यादि प्रकरणावर शास्त्रीबुवांनी रसाळ कविता केली आहे. याशिवाय स्फ़ुट पदें, आर्या कटाव, स्त्रोंत्रे, आरत्या, गौळणी वगैरे कविता बरीच आहे. भर्तुहरीच्या शतकत्र यावर समश्लोकी टीका, अमरकोशावर टीका, व महिम्नावर टीका असे तीन टीकाग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. एकंदर ग्रंथसंख्य़ा सुमारे २८०० आहे.
अशा प्रकारे वर्णाश्रमविहित कर्मे करुन भक्तियुक्त अपरोक्ष ज्ञानाने शेवटी चतुर्थाश्रम स्वीकारुन शास्त्रीबुवा शके १७९२ च्या कार्तिक शुद्ध ६ स म्हणजे आपल्या वयाच्या ६५ व्या वर्षी नारायणस्वरुपी लीन झाले.
शास्त्रीबुवांचा काव्यसंग्रह अद्याप अप्रकाशित आहे. त्याच्या कवितेचे स्वरुप अंशत: तरी वाचकांच्या निदर्शनास यावे या हेतूने त्यांची आणखी थोडीशी पदें येथे देऊन हा अल्प चरित्रलेख संपवितो.
१.
गुरुजी निज पामर पदरिं धरा ॥ अनाथा नाथ होई ॥ध्रु.॥
तात न जननी तुजसि तुळेना । भवभय वारिसि अमरवरा ॥१॥
शरणागतजनपलनचतुरा । हरिपद दानासि द्यावे करा ॥२॥
निजपदलाभा कारण आपुले । वचन सुवेदचि एक वरा ॥३॥
चूडामणिसुत विनवि सुदेवा । देवकिनंदन आणि घरा ॥४॥
हरिपाय अनेक अपाय नासि सदुपाय भवांबुधि पायवाट जावया ।
हे विसरुन निजहित घसरुन जगि मुख पसरुन हरितां वया ॥ध्रु.॥
उदरांत, जठर पदरांत वन्हिकदरांत, ताप दिनरात नाळ आवळे ।
नवमास जंतु असमास तोडिती मांस नवे कोवळे ॥
नसमाय व्दारि मग माय जाहली गाय, जन्मला काय, काय सोहळे ।
मळमूत्री जणुं किरि कुत्री, प्राक्तनसूत्री, मति मावळे ॥
रडे तानतान पडे मान मागे स्तनपान दु:खसोपान, घुट्या जावळे ।
जरि भूका न वदे मुका तोडिति युकाक्षति कावळे ॥
चाल ॥ किति मत्कुण चिरटे पिसा ।
करि गोवर देवी पिसा ।
नरकी पचतो पापिसा ।
ही बाळपणी आबाळ, शरद दशकाळ, जनक मग साळ दावि लिहावया ।
तिथे मार छकड भडिमार तशामध्ये मार आला रहावया ॥१॥
होय तरुण वंदन रुचि अरुण, मदाने भरुन, जलाने वरुण जसा सासला ।
करि यत्न कनकनगरत्न वधूही पत्न नवा मासला ॥ सरदार विटे वरदार,
तयाचे व्दार, फ़िरत परदार करुं ध्यासला । गजगाडया रंगित माड्या
इंद्रच वाड्यामध्ये भासला ॥ तडजोड किती घडमोड वारवधु गोड भजन
तरि दोड म्हणुन त्रासला । नग शंभर धरि पीतांबर डोळे तंबर करि नासला ॥
चाल । किति माळा गजरे तुरे ।
हुजरे सेवक चातुरे ।
आले सुत कन्या नातु रे ।
करि ख्याल सदा मुख लाल, बिघडली चाल, तोडिती ताल नटा गावया ।
मनिं खुशाल झोकुन दुशाल दोहेरी मशाल जन पहावया ॥२॥ पुढे ताट
फ़ुल्यांचे पाट पंक्तिचा थाट वाढिती नाटकशाळा रसे । गंगेरि पान रंगेरि
तबक चंगेरि विडे सौरसे । नवि बनात मढवुन कनात त्या फ़ुलवनांत
ते सुख मनांत चढे फ़ारसे । बहु जाहली मार्जित न्याहली रुतती महाली
किति आरसे ॥ धन घटल तेव्हा घर फ़ुटल जगीं पत उटल मागतां
सुटल चार पांचशे । दुध पेढया भुलुं नको वेडया, पुढे आहे बेडयांचे बारसे ॥
चाल ॥ उडतिल आप्तहि माजुनी ।
स्वकरें खाशिल भाजुनी ।
खाली पाहशिल लाजुनी ।
हात थकल काढितिल शकल जगामध्ये झकल म्हणति कांहि अकल नाहिं रहावया । आधिं ठकला केवळ भकला करितिल नकला हंसावावया ॥३॥ असा बद्ध होय नर वृद्ध अजागळ शुद्ध यमासी युद्ध करित किति तटल । बसे शिंकत चहुंकडे थुंकत भलतच भुंकत बडबड फ़ुट्ल ॥ हाले मान कोंदले कान नयन गति भान नसे अपान मोकळें सुटल । धुळ चंदन खाटाचि स्यंदन उबगल नंदन वनिता विटल ॥ नित कण्हत अरेरे म्हणत थेरडा शिणत अंगही घणत वास किति उठल । वर धाप तनूला कांप लोक वदे ताप कधी हा कटाल ॥
चाल । मुखि खाइन खाइन करी ।
माशा हाणवेना करी ।
आशा न सुटे लवकरी ।
आले मरण घोटना तरण तेव्हा गुरुचरण कशाचे स्मरण वांचवावया । करि शोक आप्त निजलोक आला परलोक भोग द्यावया ॥४॥ यमसदन सुखाची कदन पाडितिल रदन लव्ह्याचे अदन चणकमुष्टीचे । ज्महा नरक अकल करि चरक मागे पुढे सरक मार यष्टीचे ॥ नव कशा उडति चवकशा पुससि चव राहति तव तशांत शरवृष्टीचे । सर्पांत पक्षि दर्पात वरी गिरिपात घात ऋष्टीचे ॥ ते चार करिति लाचार पुसति साचार सांग आचार चार गोष्टीचे मम गेह मीच हा देह हेचि संदेह पूर्ण काष्ठींचे ॥
चाल । अध्यात्ममार्ग मोडिला ।
मन कर्माने झोडिला ।
आणि आपण बंध जोडिला ।
गुरुराज राखि जरि लाज सृष्टिचे काज मृषा जसे साज हेम भावया । सुत चूडामणि शशिचूडानुत हरि चूडामणि व्हावया ॥५॥
कीर्तनांतील श्रोतृवर्गाच्या मनावर वर्ण्य विषयाचा तात्कालिक परिणाम व्हावा या हेतूनें वरील पदांत प्रासानुप्रासांची व यमाकांची गर्दी करतांना जरी बरेच अपरिचित शब्द शास्त्रीबुवांनी वापरले आहेत, तरी मानव प्राण्याच्या तिन्ही अवस्थांचे हे वर्णन एकंदरीत फ़ार बहरीचे उतरले आहे, यांत संशय नाही.
३.
अरे गडया, अजुनि तर कळना जणुं प्रपंच हा लटका । बुडत चालल्या फ़ुकट
घटका ॥ध्रु.॥ जंवर तुझ्या घरची मिळते मुठभर भाजी । तंवर करितिल हांजी हांजी ॥
लागतिल पाठी काका नाना दाजी । भला जन्मला मर्द गाजी ॥
समय चलतीचा अवघे तुजवर राजी । पुन: परतुन म्हणतिल पाजी॥चाल ।
दुबोली दुनिया । कांहि समज समज घर गुनिया । निंदितात केवळ धनिया ।
कवडीस तोडिता तटका ॥१॥ प्रीतीची छ्कडी हात गोंजारिसि तोंडा । तंवर
तुजपुढे घोळिल गोंडा ॥ जंवर त्या बाळ्या बुगडया राखडि गौडा । आणा
बसवुन साखळि कोंडा ॥ हात चटकेना उठ म्हणल तुला मोडा । काय भाजुन
घालूं धोंडा ॥ चाल । तिला काय भुलसी । कसा मधुर भाषणे खुलसी ॥ किति
विषयसुखामधे झुलसी । यम मारिल पहा मटका ॥२॥ आप्त कवणाचे करिशिल
लुगडी चोळी । म्हणती घ्या घ्या उन्ह उन्ह पोळी ॥ पाट मांडा की पुढे
घाला रांगोळी । रावजीची मर्जी भोळी ॥ विषय दिन येतां मग करितिल
राडोळी । कसा ठकला वाल्हा कोळी ॥ चाल । जवळ नाही अडका । मग
सकल म्हणती रडका । पळताति सोयरे धडका । मडका मिळना फ़ुटका ॥३॥
गूळ सरल्यावर सहजचि माशा उडती । कळून जाणुन प्राणा बुडती ॥ आपणा
साठी पदरचे लोक रडती । यातना तुझि तुला घडती ॥ देह हा गेला मग काय
मिळेल पुढती । गांठ तुझी काळासवे पडती ॥ चाल । म्हणुन घर त्यागा ।
चूडामणिसुत प्रभुला गा । तो नेईल उत्तम भागा । घे अमृतरस घुटका ॥४॥
अरे गडया, दुबोली दुनिया ॥ध्रु.॥ चोरालागी चारी मलिदा ।
दावी धतूरा धनिया ॥१॥ मूर्ख निरक्षर ते प्रभु झाले ।
कोणि पुसेना गुणिया ॥२॥ लटकी कर्मे सत्याचि झाली ।
भात तशा या कणिया ॥३॥ साधु घरोघरि कथिति विवेका ।
ब्रह्म मिळे मुठ चणिया ॥४॥ तीर्थे हिंडत विसरुनि गेले ।
चूडामणि प्रभु कन्हया ॥५॥
५.
सत्य कर्म वेगळेचि वेगळेचि बापा ॥ध्रु.॥
हस्ति चर्मकाचे घरि । सर्वकाळ राहे जरि ।
गजाधीश त्यास तरी । नावडे का पा ॥१॥
कीटाकाचि माजि घोडी । सांपडले लक्ष कोडी ।
कोण बसुन तीर्थ जोडी । दूर करुन तापा ॥२॥
माशियाचा उडुन वाघ । पातल्याहि बहुत राग ।
कोण पळे पाहुन लाग । फ़ार भरुन धापा ॥३॥
विधिनिषेधास कांही । सर्वयाहि वाट नाही ।
चूडामणिसूनु पाही । कापडाचे सापा ॥४॥
६.
येई येई दयाघन राम ॥ध्रु ॥
उडुपतिवदना। अंबुजनयना । कोमलतनु घनश्यामा ॥१॥
जानकीजीवना । शरधनुधरणा । सीतापते गुणधामा ॥२।}।
चूडामणिसुत विठ्ठल विनवी । प्रीत असो तव नामा ॥३॥
७.
या गुरुमाउलीतुल्य न दुसरे । शरण रिघुनि निज वैभव पुस रे ॥ध्रु .॥
मी मम, दृढतर मानसि ठसले । ज्याचे कृपे क्षणी निस्तुक विसरे ॥१॥
दृश्य असत्यहि सत्यचि दिसले । आत्मपणा जनिं काननिं पसरे ॥२॥
एकचि माधव अवघा भरला । चूडामणि लटिकेची मिस रे ॥३॥
८.
ये धांवत आज गुरुराया ॥ शरणागत मानी पायां ॥ध्रु.॥
इहपर दोन्ही घसरुन गेले । वरपड झालो अपाया ॥१॥
व्दिजकुळिं जन्मुनि सार्थक नाही । पतित मी गेलो वायां ॥२॥
निगमागमिंचे तत्व न कळले । सत्यचि भासे माया ॥३॥
चूडामणिसुत निजकर देऊन । लावि तरी गुण गाया ॥४॥
९.
हरि करुणाकर फ़ार । समजा ॥ध्रु.॥
मार्ग चुकोनि जातांच सेवक । देत तया आधार ॥१॥
भवजलसागर गोष्पद करितो । नत जन नेतसे पार ॥२॥
गोपीजनाचा बहु अभिमानी । चूडामणिसुत हार ॥३॥
१०.
नाथ माझी कणवा येईल काय ॥ध्रु.॥
लंपट होउनि खट्पट करितां । विसरुनि गेलो पाय ॥१॥
अन्यायी अपराधी बालक । घेई ओसंगा माय ॥२॥
चूडामणिसुत जोडुनि पाणी । नित्य तुझे गुण गाय ॥३॥
शास्त्रीबुवांची ही थोडीशी पदे येथे दिली आहेत, ती सगळी सारखीच सरस आहेत असे नाही ; व त्यांवरुन त्यांच्या एकंदर कवितेच्या स्वरुपाची योग्य कल्पनाही होणार नाही. त्यांचा पदसंग्रह फ़ार मोठा आहे; व तो असल्या अल्पचरित्रांत देतां येणे शक्य नाही.

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP