गिरिधर

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


गिरिधर हे रामदाससांप्रदायी असून , त्यांची व त्यांच्या ग्रंथांची योग्यता त्या संप्रदायात कांही विशेष आहे. श्रीनिवृत्तिराम व समर्थप्रताप हे गिरिधर स्वामीचे दोन ग्रंथ छापून प्रसिध्द झालेले असून, त्यातील समर्थप्रताप ग्रंथाच्या आरंभी, धुळे येथील विव्दान प्रेमळ व शोधक रामदासी रा. शंकर श्रीकृष्ण देव यांनी स्वामींचे जे विस्तृत चरित्र दिले आहे, त्याच्याच केवळ आधाराने हा संक्षिप्त लेख मी लिहीत आहे.
श्रीसमर्थ रामदासस्वामीच्या प्रसिध्द शिष्यिणी वेणाबाई यांच्या "बाईयाबाई" नामेकरुन कोणी शिष्यिणी होत्या, त्याचे गिरिधर हे शिष्य होत. बाइयाबाईची विशेष माहिती उपलब्ध नाही. एकदा सहा महिने त्या केवळ सद्गुरुतीर्थ सेवून होत्या. बालपणीच त्याना श्रीरामदर्शन झाले होते. दहीभाताचा नैवैद्य दाखवीत असतां प्रत्यक्ष श्रीराम त्यांच्या ताटांत जेवल्याची हकीकत श्रीसमर्थप्रताप ग्रंथाच्या ११ व्या समासात गिरिधरांनी सांगितला आहे. आपल्या वयाच्या ८४ व्या वर्षी बाइयाबाईंनी आपला अवतार संपविला."
त्रिंबक, यशवंत व भीम या त्रिवर्गबंधूसह गिरिधरांना बाइयाबाईंचा अनुग्रह होता. गिरीधरांचा जन्मशक उपलब्ध नाही, परंतु श्रीसमर्थांच्या आज्ञेने सज्जनगडावर त्यांनी एकदा कीर्तन केल्याचा उल्लेख त्यांच्या एका कविताप्रकरणात आढळतो. श्रीसमर्थांच्या चरित्रांतील काही प्रसंग आपण स्वत: पाहिले आहेत, असे समर्थप्रतापाच्या पहिल्या समासांत त्यांनी ह्मटले आहे, यावरुन त्यांचा जन्म शके १५७५ च्या सुमारास झाला असावा असे मानण्यास हरकत नाही. गिरिधर हे मूळचे मिरजतासगांवाकडे राहणार; परंतु पुढे गुर्वाज्ञेवरुन ते बिडापासून सात आठ कोस असलेल्य ईट गांवी जाऊन राहिले; तेथेच त्यांचा मुख्य मठ आहे. स्वत: गिरिधरांनी
भिंतींवर काढलेली मारुतीची मूर्ती त्या ठिकाणी अद्याप आहे. गिरिधरांस पुत्रसंतती नव्हती, एक कन्या मात्र होती. हल्ली बीड येथे जे दोन मठ आहेत, त्यापैकी एक त्यांच्या कन्येचा वंशजांचा असून, दुसरा त्यांचे बंधु भीम यांच्या वंशजांचा आहे. गिरिधरांचा सर्व काल श्रीगुरु व श्रीराम यांच्या भजनांत व नामसंकीर्तनांत ग्गेल. श्रीसमर्थप्रतापसुध्दा त्यांचे एकंदर चाळीस ग्रंथ उपलब्ध झाले आहेत. त्याशिवाय अभंग, पदे वगैरे फ़ुटकळ कविता बरीच आहे. त्यांच्या कवितेची एकंदर संख्या सुमारे २४००० होईल. त्यांच्या वरील ४० ग्रंथांपैकी संकेत रामायणाची पहिली सहा कांडे बेणाबाईंची असावीत असा रा. देव यांचा तर्क आहे.
गिरिधरांची बहुतेक सर्व कविता रा. देव यांस मिळाली आहे. व त्यांच्या ’रामदासी’ ग्रंथमालेतून ही सर्व कविता यथाकाली प्रसिध्द होईल, अशी आशा आहे. गिरिधरांच्या एकंदर कवितेत श्रीसमर्थांविषयींचे शेकडो प्रेमळ उल्लेख ठिकठिकाणी आले आहेत.

१) श्रीगंथभावार्थ
पदसंख्या - २३०
२) ग्रंथान्वय
पदसंख्या - २४५
३) श्रीदासबोध ग्रंथराजभावार्थ
पदसंख्या -२७
४) श्रीआत्मनुभव
पदसंख्या - ६९७
५) गुरुमार्ग
पदसंख्या - ७६
६) शिष्यभावार्थ
पदसंख्या - ५३
७) श्रीगुरुआज्ञा
पदसंख्या - ७८
८) श्रीगुरुरुप
पदसंख्या - १०५
९) शिष्यशासन
पदसंख्या - १८६
१०) श्रीगुरुदीक्षा
पदसंख्या - १७८
११) श्रीस्वामीदर्शन
पदसंख्या - १२९
१२) श्रीदेवदर्शन
पदसंख्या - ११८
१३)श्रीरामरुप
पदसंख्या - ५२
१४) श्रीसीतारुप
पदसंख्या - ५४
१५) प्राणनाथ
पदसंख्या - ५२
१६)योगीराज
पदसंख्या - ५०
१७)दीक्षासंवाद
पदसंख्या - १५४
१८)साधुसंवाद
पदसंख्या - ४५
१९) श्रीगुरुदेवनमन
पद्संख्या - १२८
२०) देवसंवाद
पद्संख्य़ा - ७१
२१)गुरुगीतार्थ
पदसंख्या - २३४
२२)गुरुवाक्यमाला
पदसंख्या - १६१
२३) श्रीशिवरहस्य
पदसंख्या - १०२
२४) लोकस्वभा्व
पदसंख्या - २५
२५) श्रीकृष्णकथातरंग
पदसंख्या - १७३
२६) हरिलीला
पदसंख्या - ४५४
२७) नानापंथ
पदसंख्या - ५०
२८)हकिकत वाके
पदसंख्या - १४७
२९)काशीयात्राकथन
पदसंख्या - १०६
३०)काशीखंड
पदसंख्या - ३९४८
३१)श्रीसमर्थकरुणा
पदसंख्या - १०९
३२) श्रीकरुणाराम
पदसंख्या - १८२
३३) श्रीकरुणारुद्र
पदसंख्या - १२१
३४) अव्दरामायण
पदसंख्या - १८३
३५) मंगल रामायण
पदसंख्या - १६१९
३६)छंदो रामायण
पदसंख्या - १५५६
३७) सुंदर रामायण
पदसंख्या - ७४९
३८) संकेत रामायण
पदसंख्या - ६७४१
३९) निवृत्तिराम
पदसंख्या - २०१६
४०) श्रीसमर्थप्रताप
पदसंख्या - १३३२
४१) स्फ़ुट कविता
पदसंख्या - १५००

गिरिधरांची सर्व कविता, दिनकरबुवांच्या कवितेप्रमाणेच, अगदी थेट रामदासी पध्दतीची आहे. जेमतेम अर्थबोध झाला ह्मणजे झाले, मग बाह्य थाटमाट कसाही असो, या भावनेनेंच श्रीसमर्थ सांप्रदायांतील बहुतेक सत्पुरुषांनी काव्यरचना केलेली दिसते. त्यामुळे भाषाशुध्दि किंवा वृत्तशुध्दी यांजकडे फ़ाससे लक्ष देणे यांस अगत्याचे वाटले नसावे. तथापि त्यांच्या कवितेत जो एक प्रकारचा जिवंतपणा-चैतन्य आहे, त्याच्या योगाने त्या कवितेस मोठा भारदस्तपणा प्राप्त झालेला आहे. उपरिनिर्दिष्ट लेखांत रा. देव यांनी "गिरीधरांच्या सर्व ग्रंथातील निवडक उतारे देऊन, त्यांचे जे मार्मिक विवेचन केले आहे, ते अत्यंत वाचनीय आहे. रा. देव म्हणतात गिरिधर महंतांनी आयुष्यभर ( काव्यरचनेशिवाय) दुसरा काही व्यापार केला नाही, असे वाटते. आज आपणांस नुसती कल्पना करावयाची आहे; पण, खरोखर अशा महंताच्या संगतीत राहून हजारों शिष्य ज्ञानार्जन करुन कृतार्थ होत असतील यांत मला शंका नाही... त्या काळीं ही विद्यापीठे (मठ) केवढाली तरी असली पाहिजेत ! या प्रत्येक रामदासी विद्यापीठात मोठा थोरला ग्रंथसंग्रह असे. पूर्वकालीन यच्चयावत् सर्व साधुसंतांच्या संस्कृत ग्रंथाचा संग्रह या विद्यापीठांतून केलेला असे. श्रीज्ञानेश्वर, मुकुंदराज, नामदेव, मुक्ताबाई, एकनाथ, तुकाराम, श्रेष्ठ पूर्णानंदाचे शिवराम, मुक्तेश्वर, उध्दवचिद्‍घन, वामनपंडित, केशवस्वामी, रंगनाथस्वामी, वेणीस्वामी, राघवरंक, शिवदिन केसरी, मालो, बोधला, कृष्णदयार्णव, चिंतामणीसुत मुद्गल (मुक्तेश्वरच), विष्णुदास नामा, शिवतनय, कोकिळगंगाधर, हरिहर, शाम, वासुदेव, नृहरिसुत, राघवसुत, रंगेशात्मज, शिवात्मज रघुनाथ, बहिरा, किंकर, महिपति इत्यादी ज्ञात आणि अज्ञात अशा कित्येक सत्पुरुषांचे ग्रंथ आजही गिरिधरांच्या मठात आहेत. शके १५६७ त लिहिलेली वाल्मीकिकृत रामायणाची प्रत या मठांत आहे. भीम, नरहरी इत्यादिकांची गिरिधरांवर अष्टके आहेत. आणखी एक अपूर्व वस्तु या मठांत मला पहावयास मिळाली. गिरिधरांना सर्व दासबोध मुखोद्गत होता; दोन अडीच बोटे रुंद व आठ बोटे लांब अशी एक उभी शिवलेली, मुठीत राहण्यासारखी त्यांची वही आहे. तीत क्रमश: एकाखाली एक, दासबोधातील ओव्याच्या आरंभीचे दोन दोन तीन तीन शब्द लिहिलेले आहेत. ही वही गिरिधर नेहमी हातांत ठेवीत असत, व चालता बोलता, धंदा करितां, तिच्याकडे पाहून सर्व दासबोधाचे , न जाणो प्रत्यही, एक पारायण करीत असत."
श्रीगुरुचरणसेवेत आपले बहुतेक सर्व आयुष्य खर्चून शके १६५१ वैशाख शुध्द अष्टमी, शुक्रवारी, गिरिधरस्वामी समाधिस्थ झाले. बीडास गांवाबाहेर नदीच्या कांठी उंचवट्यावर गर्द झाडीत एक मोठे थोरले आवार चौफ़ेर मजबूत कोटीवजा भिंती बांधून केलेले असून त्यांत गिरिधर व त्यांच्या मागून झालेले मठपति यांच्या समाधि आहेत. त्या आवारांत एकंदर आठ समाधिमंदिरे आहेत. स्थान रम्य व निवांत आहे. गिरिधराच्या मंदिरावर पुढील श्लोक कोरलेला आहे-
"श्रीराम॥ श्रीमत्सन्नृपशालिवाहन शके चंद्रेषु भपोन्मिते ।
सौम्ये माधवशुक्लशुक्रदिवसेष्ट्म्यां प्रभाते विभु:॥
श्रीरामानुचराग्रगो गिरिधरस्त्वासीत्समाधिस्थितो।
यस्तस्यानुज भीमनिर्मितमिदं रम्यं तदीयं स्थलं॥
हल्ली बीड येथे जे दोन मठ आहेत, त्यापैकी एक गिरिधरांचे धाकटे बंधु भीम यांच्या वंशजांचा व दुसरा त्यांच्या कन्येचा वंशजांचा आहे. उभय मठांची परंपरा येणेप्रमाणे -
येकांत वनी उपवनी । येकांत भुवनी ब्रम्हभुवनी ।
गुरुदेवसदनी परमात्मसदनी । अध्यात्म ग्रंथ पाहावे ॥
नाना सुमनवाटिका आरामे । देवदेवालये एकांत धामे ।
श्रवणमनने पूर्णकामे । अध्यात्म ग्रंथ वाचावे ॥
नाना परोपकाराकारणे । सद्गुरुनाथे केले धावणे ।
वेदशास्त्रसंमत वचने । अध्यात्म ग्रंथ विवरावे ॥
गुरुमार्ग, शिष्यभावार्थ, श्रीगुरुआज्ञा, श्रीगुरुरुप, शिष्यशासन व गुरुदीक्षा या ग्रंथात गुरुशिष्यसंबंधाचे उपदेशात्मक विवेचन आहे. श्रीस्वामीदर्शन या प्रकरणांत श्रीसमर्थांच्या दिनचर्येचा उल्लेख असल्यामुळे ते प्रकरण सांप्रदायी लोकांस विशेष महत्वाचे आहे. समर्थांच्या सहवासात गिरिधरांनी कांही दिवस घालविल्यावर एके दिवशी समर्थांनी त्यांस एकांतांत बुध्दिवाद सांगून स्वस्थली जाण्याची आज्ञा केली. त्या वेळी गिरिधरांस फ़ार वाईट वाटले, त्या प्रसंगाचे वर्णन -
असुं आले मग पल्लवें पुसिले । आश्वासन दिल्हें काय देवे ॥
काय देवे दिल्हे आश्वासन ऐका । येक वेळे देखा यावे लागे ॥
न्यावे लागे येक वेळे सांभाळाया । आम्हावांचूनियां कोण आहे ॥
कोण आहे तूज आम्हावांचूनियां । कळला भाव वायां खंती काय ॥
खंती काय जाले प्रसंग आठवी । अनन्य स्वभावीं देवभक्त ॥
देव भक्त येक कळ्ला विवेक । ग्रंथाधारे लोक प्रबोधिसी ॥
प्रबोधिसी तेथे काय भिन्न आहे । अर्थ पूर्ण पाहे विचाराचा ॥
विचाराचा अर्थ नित्य बोलतोसी । खंत करितोसी नवल मोठे ॥
नवल मोठे वाटे भक्तीची आवडी । राहो द्यावी जोडी भक्तिप्रेमे ॥
भक्तिप्रेमे जोडी असोहि विदेसी । आहो तुजपासी सर्व काळ ॥
सर्व काळ आहो वचन प्रमाण । प्रसंग जाणून भेटी आणूं ॥
भेटी आणूं काही खंति न करावी । नौमी आठवावी रात्रिदिवस ॥
रात्रि दिवस ध्यान नौमीचे करावे । गिरीधर देवे आज्ञापिला ॥
श्रीदेवदर्शन या ग्रंथात, प्रत्यक्ष भेटीत समर्थांनी जो उपदेश केला, त्याचा संग्रह गिरिधरस्वामींनी केला आहे. श्रीरामरुप या ग्रंथात श्रीरामाच्या सगुण व निर्गुण अशा दोन्ही स्वरुपांचे वर्णन आहे. "सगुणाचा सारखा ध्यास घेतला ह्मणजे सर्व सृष्टी कशी राममय होते, ते गिरिधरांनी या प्रकरणात दाखवले आहे. " ते आपला स्वानुभव सांगतात:-
दृढ मनी रामरुप हे धरिले । दृश्य हे सारिले कैसे पाहा ॥
पाहा पाहा आतां कल्पनासंभ्रम । राम राम राम राम जाला ॥
राम जाला ब्रह्मगोळ हा सकळ । येकेक प्रांजळ बोलू आतां ॥
बोलू आतां लोक मला न दिसती । राम सीतापति सर्व जाले ॥
श्रीसीतारुप या ग्रंथात मायेच्या स्वरुपाचे वर्णन आहे. प्राणनाथ या ग्रंथात वायुसुत जो मारुती त्याच्या विश्वव्यापक स्वरुपाचे वर्णन आहे. योगिराज या ग्रंथात ब्रह्म आणि योगी एकच असे निरुपण करुन ’योगीयाचा योगी स्वामी माझा’ या शब्दांनी श्रीसमर्थांचा उल्लेख केला आहे. दीक्षासंवाद या ग्रंथात रामनाम, ब्रह्मज्ञान, विज्ञानविवेक, वैराग्य, संतसंग, पर्यटन, ब्रह्मचर्य, रामोपासना इत्यादि विषयांचे विवेचन आहे.’ साधुसंवाद या ग्रंथात भिन्न सांप्रदायांच्या दोघासाधूंचा संवाद आहे. श्रीगुरुदेवनमन या गोड प्रकरणांत श्रीगुरुदेवाला नमन केले आहे. देवसंवाद या ग्रंथात ’इंद्र, ब्रम्हा, विष्णु, महेश हे सारे श्रीरामाचीच स्तोत्रे गातात’ असे वर्णिले आहे. यांत इंद्रास अनुलक्षुन कवि ह्मणतात:-
श्लोक.
बंदांतुनी देव समस्त रामें । सोडोनि द्यावे भुवनैकरामें ॥
ऐसा कृपाराम समर्थ माझा । इंद्रा अम्हा काय हिसाब तुझा ॥
श्रीरामोपांसकाला इंद्राचे वैभव देखील तुच्छ वाटावे यांत आश्चर्य काय? गुरुगीतार्थ या प्रकरणात संस्कृत गुरुगीतेचा साद्यंत अर्थ मराठी भाषेत दिला आहे.
"मुखोद्गत तुम्हा गुरुगीता आहे । अर्थ कैसा काय निरुपावा ॥
असे भाषण श्रोत्याच्या तोंडी गिरिधरांनी घातले आहे, यावरुन त्यांस संस्कृत गुरुगीता मुखोद्गत होती, हे उघड दिसते. गुरुवाक्यमाला या ग्रंथाच्या पहिल्या ८५ श्लोकात आत्मज्ञान सांगितले अहे व पुढे ५० श्लोकात श्रीगुरुंनी शिष्याला वरप्रदान केले आहे. श्रीशिवरहस्य हे प्रकरण पद्मपुराण व लिंगपुराण यांच्या आधाराने लिहिले आहे.यात नामस्मरण हाच सर्वात सुगमोपाय आहे, असे सांगितले आहे. लोकस्वभाव ग्रंथात गिरिधर ह्मणतात :-
ओव्या.
जो जो प्राणी जन्मासि आला । तो तो देहाभिमानेचि गेला ।
त्यामध्ये कोणी विरळा । प्रबोधनिवळा निवळ्ला ॥
जो तो म्हणे आम्ही थोर । कोण पाहे सारासार ।
माझी वर्तणूक परपार । पाववी भवाच्या ॥
परमार हेहि नाही । मीच अवघा सर्व कांही ।
साधुसंत कैचे काई । कोठून आले ॥
शूद्र निंदिती ब्राह्मणास । ब्राह्मण निंदिती आणिकास ।
परस्परे यातीपातीस । थोरपणे उडविती ॥
श्रीकृष्णकथातरंग व हरिलीला या प्रकरणांत गिरिधरांनी श्रीकृष्णाच्या बाललीलेचे वर्णन केले आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या ऐक्यभावासंबंधाने हरिलीला ग्रंथात गिरिधर ह्मणतात :-
रघुविरभजनाची मुख्य आजन्म दीक्षा ।
यदुवीरभजनाची रामरुपें अपेक्षा ॥
यदुपति रघुराजी ऐक्यरुपे मिळाला ।
श्रवण करुत आतां संतश्रोते तयाला ॥
’नाना पंथ’ या प्रकरणात निरनिराळ्या पंथावर ५० कडवी आहेत. ’हकिकत वाके’ (कड्वी १४७) यांत स्वात्मबोध, दिकपाळ, नवग्रह, महर्षी, पंचीकरण, ब्रम्हगोळ, दैवी, पंथी, निवेदनी आणि राजशासनी अशा १० सदराखाली श्रीसमर्थ रामदासस्वामीस दहा पत्रे लिहिली आहेत. काशीयात्राकथन या प्रकरणात, गिरिधरांनी शके १६३९ च्या सुमारास केलेल्या काशीयात्रेचे वर्णन आहे. रा देव लिहितात -
"वेणीस्वामी व श्रीसमर्थ यांच्या पादुकांस नमन करुन गिरिधरस्वामी निघाले, ते माहुली, पंढरी करुन गोदावरीतीरास आले. गोदावरीच्या कांठी कुठे मुक्काम केला, त्या ठिकाणाचे नांव त्यांनी दिले नाही; पण काशीखंड ग्रंथ लिहिण्यास त्या ठिकाणी सुरुवात करुन यात्रा पुढे चालविली. मार्गात पवित्र नद्या लागत तेथे स्नानार्थ मुक्काम करीत, तीर्थ लागत त्या त्या ठिकाणी तीर्थविधि करीत, त्यांची माहात्म्ये श्रवण करीत. पयोष्णी, पूर्णा, नर्मदा इत्यादि नद्यांची स्नाने होऊन, अनेक सुगम दुर्गम स्थले ओलांडून यात्रा त्रिकुटास पोचली. तेथे भरतप्रेमाची आठवण होऊन गिरिधर प्रेमभरित झाले. पयस्विनी, कालिंदी, यमुना यांची स्नाने करुन माघस्नानाला गिरिधरांनी प्रयाग गांठले. माघमासाचा पहिला पंधरावडा तेथेच कंठून काशीखंडाचा पूर्वार्ध तेथेच समाप्त केला. नंतर, समर्थांची पुण्यतिथि साजरी केल्यावर यात्रा पुढे चालली. गुहाचे श्रृंगवेर अवलोकन करुन व गोमती, तमसा उल्लंघून यात्रा अयोध्येस पातली. अयोध्येचे दर्शन होतांच गिरिधर म्हणतात :-
...............................। पापे गेली भंगा क्षणमात्रे ।
क्षणमात्रे पापे नसता पदरी ॥ गेली हे उत्तरी कोण बोले ?
कोण बोले पापपुण्य सरयुतीरी ॥ जेथे नांदे हरि आत्माराम ।
निरंतर वृत्ती नौमी विश्रामली ॥ रामआज्ञा जाली गयागमने ॥
गयेस जातांना गिरिधरांस पुन: शरयुदर्शन घडले व त्यामुळे :-
...............................। ध्यान आठवले अयोध्येचें ॥
अयोध्येचा राम विश्रामा विश्राम । तारक हे ब्रह्म स्वानंदाचे ॥
स्वानंदाचा घन श्रीराम वोळला  । बरा काळ गेला सरयतीरी ॥
गयेस यात्रा चैत्रांत पोचली. तेथे पिंडदानादि सर्व विधि उरकून यात्रा ज्येष्ठांत काशीस येऊन दाखल झाली. गिरिधरांचा चातुर्मास मुक्काम तेथेच होता. काशीसंबंधाने ते ह्मणतात:-
वर्णवेना मुक्तपुरीचा स्वानंद । जेथे परमानंद शिव स्वये ॥
शिव स्वये काशीखंड श्रवणी बैस । वाणी वदवीतसे काशीखंडी ॥
गुरुकृपेने यात्राहेतु सफ़ल होऊन काशीखंड ग्रंथही काशीसच संपूर्ण झाला. काशीखंडाची अभंगसंख्या ३९४८ आहे. स्कंदपुराणांतर्गत संस्कृत काशीखंडाच्या आधाराने हा ग्रंथ लिहिला आहे. याशिवाय ’शिवदास गोमा’ नामक कवींचे ओवीबध्द काशीखंड प्रसिध्द आहे, ते पुष्कळांच्या अवलोकनांत आलेच असेल. श्रीसमर्थकरुणा या प्रकरणांत गिरिधरांनी श्रीसमर्थांना परोपरीने आळविले आहे. श्रीकरुणाराम या प्रकरणांत श्रीरामाची करुणा भाकिली आहे. श्रीकरुणारुद्र या प्रकरणांत "श्रीहनुमंताची करुणा भाकीत एकंदर हनुमंतचरित्र क्रमश: निवेदन केले आहे". वरील सर्व स्तोत्रे फ़ार प्रेमळ आहेत. अव्दरामायण या ग्रंथात रामायणातील कथा कालक्रमानुसार-तिथी, महिना वगैरे दिली आहे. मंगलरामायणातही रामचरित्रच गायिले आहे. ग्रंथारंभी गिरिधर ह्मणतात :-
आधी मंगल शारदा गणपती श्रीसद्गुरु गायिला ।
कृष्णतीरनिवास वास बहुसा ऊदाससा पाहिला ॥
ज्याची कीर्ती जगांत होऊनि पुढे भेदीत गेली चढे ।
कुर्यात मंगल राघवं विजयते रामायणं मंगलम् ॥
या ग्रंथाचे एकंदर श्लोक १६१९ असून त्या सर्वांच्या शेवटी "कुर्यांत मंगल राघवं विजयते रामायणं मंगलम्" हा एकच चरण आहे. या ग्रंथातले बरेच श्लोक रा. देव यांनी ’श्रीसमर्थप्रताप’ ग्रंथाच्या प्रस्तावनेत दिले आहेत, परंतु ते येथे उतरुन घेण्यास स्थलावकाश नाही. ’छंदोरामायण’ या ग्रंथासंबंधाने रा. देव म्हणतात ;- "श्रीसमर्थ, वेणाबाई व बाइयाबाई असा हा त्रिवेणीसंगम होय, आणि ह्मणून पुष्कळ वेळा गिरिधरांनी आपल्या परंपरेला त्रिवेणी ह्मणून संबोधिले आहे. त्रिवेणीच्या ऐवजी या रामायणात गिरिधरानी नुसता शब्द योजला आहे.
गिरीगुहांत राहणे । जनी अभिष्ट पाहणे ।
समर्थस्वामि ते गुरु । नदी म्हणे जगद्‍गुरु ॥
श्रीरामदासस्वामिंचे । चरित्र सर्व तेथिचे ।
हरादिकां न वर्णवे । नदीस केवि वर्णवे ॥
या ठिकाणी व इतरही या रामायणांत त्रिवेणीऐवजी नदी शब्द योजिला आहे. नदी ह्मणजे त्रिवेणी व पर्यायाने तद्रुपता पावलेले गिरिधर होत." या रामायणांत युध्द्कांडाचाच फ़ार विस्तार केला आहे. श्रीसमर्थांना युध्दकांड फ़ार आवड्त असे. सुंदरकांडात मारुतीचा पराक्रम आहे ह्मणून व युध्दकांड आवडते ह्मणून श्रीसमर्थांनी ही दोनच कांडे वर्णिली आहेत. वरील रामायणाशिवाय सुंदर रामायण (श्लोक ७४९) व संकेत रामाय़ण (ओव्या ६७४०) अशी आणखी दोन रामायणे गिरिधरांनी लिहिली आहेत. त्यांच्या सर्व ग्रंथाच्या स्वरुपाविषयी रा. देव ह्मणतात "पहिल्या सहा कांडाची भाषा शेवटच्या कांडांच्या भाषेहून निराळी दिसते. चेणाबाईच्या सीतास्वयंवराची जी भाषापध्दती ती पहिल्या सहा कांडात दिसते, व उत्तरकांडाची भाषा श्रीसमर्थप्रताप किंवा निवृत्तिराम ग्रंथासारखी दिसते." सदरहू ग्रंथ गिरिधरांनी शके १६४४ त गोदातीरी संपूर्ण केला. या ग्रंथाचे एकंदर सर्ग १८८ आहेत. निरनिराळ्या नांवांची अनेक रामायणे लिहिण्याची ही कल्पना मूळची गिरिधरांची असे आतां स्पष्ट ह्मटले पाहिजे. निरंजन माधव व मोरोपंत या दोन कवींनी, अनेक रामायणे लिहिण्याची ही कल्पना गिरिधरांची रामाय़णे पाहूनच उचलली की काय हे समजण्यास मार्ग नाही. रामकथा पुन:पुन: सांगण्याचे कारण गिरिधरांनी दिले आहे ते असे :-
नाना सकाम कथा सृष्टीवरी । रामकथेची न पवती सरी ।
कां जे आत्माराम चराचरी । तारक ब्रह्म सर्वत्र हे ॥
शिवकंठीचा अग्नि विझविला । ब्रह्महत्यारा कवि आदि केला ।
त्रैलोक्य तेणे पावन जाला । शतकोटी रामायणे ॥
आदिकाव्य हे रामायण । जै नव्हते कोणाचे आख्यान ।
नाना पुराणे माहात्म्यकथन । शास्त्रसिध्दांत रामायणी ॥
गिरीधरांच्या श्लोकबध्द ग्रंथापेक्षां त्यांचे ओवीबध्द ग्रंथ अधिक सुरस आहेत. प्रस्तुत सुंदर रामायण हा ग्रंथ खरोखरच फ़ार सुंदर आहे. मखरक्षणासाठी विश्वामित्र  रामाला मागावयास दशरथाकडे आले. व पुष्कळ होय नाही होऊन अखेरीस रामलक्ष्मणांना विश्वामित्रांबरोबर पाठविण्याचे ठरले तेव्हा राम आईची आज्ञा मागावयास गेले असता तिला ह्मणतात :-
ब्राह्मणाच्या कार्याकारणे । अवतार घेतले नारायणे ।
ह्मणोनी माये आज्ञा देणे । व्दिजां रक्षणे उचित ॥
देव ब्राह्मण अग्निपूजनें । नाना योग याग व्रते दाने ।
नाना तपे तीर्थाटणे । माते रक्षणे उचित ॥
नाना पुरश्चरणे अनुष्ठाने । नाना योग नाना साधने ।
आत्मचिंतने स्वानंदभुवनें । स्वधर्म रक्षणे उचित ॥
ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण जेथे । सर्व सांडोनि धांवणे तेथे ।
नाना वैष्णवी माया भक्तजनाते । झणी बाधील म्हणूनियां ॥
नि:काम भजने सर्वस्वत्याग । मजनिमित्त मांडिती योगयाग ।
आत्मचिंतने भवस्वर्गभोग । तुच्छ करिती स्वानंदे ॥
ऐसे योगी दुर्लभ जगी । अवतार घेणे निर्धारे ॥
पूर्वी सूतिकागृही दिधले दर्शन । माते तुजला असेल स्मरण ।
सुरसाधु धर्मधरारक्षण । करावया मी अवतरलो ॥
शिलारुप गौतमभार्या अहल्या, रामचरणस्पर्शाने स्वत:चा उध्दारकाल समीप येतांच, अगदी उतावीळ होऊन श्रीरामाची करुणा भाकते :- म्हणे देवा कै तूं येशील । कै तूं भेटी देशील ।
आपुल्या पदा कै तूं नेशील । थोर आपदा चिरकाळे ॥
तूं जळी स्थळी काष्ठी पाषाणी । ऐसी वदे समर्थवाणी ।
तरी कां नव्हे  माझी धांवणी । जगदानंदा जगद्गुरु ॥
आत्माराम म्हणती तूते । तरी कां दर्शन नव्हे माते ।
भवितव्य भाविनि विधी कर्मांते । संचित प्रारब्ध कुमरिला ॥
मी भ्रमे जाल्ये जडमूढ शिळा। परी तूं जीवांचा जिव्हाळा ।
चरणप्रताप दावी अवलीळा । कीर्ति गाजो त्रैलोक्यी ॥
पुढे, श्रीरामचरणस्पर्शाने पूर्ववत् स्त्रीरुप प्राप्त होतांच :-
तात्काळ अहल्या लागली रामपायी । म्हणे माझे श्रीराम आई ।
इतुके दिवस कवणे ठायी । विगुंतलीस जननिये ॥
कैलासी शंकर गोविलीस । सुटका जालिया धांवलीस ।
राम माउली सावकाश । आतां न विसंबे ह्र्दयांतुनी ।
अयोध्येच्या लोकांना श्रीरामाचा कसा ध्यास लागला होता त्याचे वर्णन :-
राम सकळांसी व्हावा । राम सकळांचा विसावा ।
राम सकळांनी चिंतावा । राम घ्यावा जनांनी ॥
घरी क्रमेना क्षणभरी । अन्य न भावे अंतरी ।
तिष्ठत उभी राजव्दारी । राम पाहो म्हणोनियां ॥
बाळ तारुण्य आणि वृध्द । सकळां लागला रुपवेध ।
जेथे तेथे बोधप्रबोध । जयजराम होतसे ॥
जिकडे तिकडे रामराम । गल्लोगल्लीने रामराम ।
बिंदी बाजारी रामराम । पूर्णकाम चिंतिती ॥
जाता येतां रामराम । काम करितां रामराम ।
सर्वांचा तो अंतर्याम । म्हणोनी रामराम चिंतिती ॥
खांता जेवितां रामराम । उठतां बैसतां रामराम ।
अशनीं शयनी रामराम । मंगळधाम चिंतिती ॥
कोण भाग्य हो आमुचे । थोर पुण्य पूर्वजांचे ।
कोण सुकृत सांचिले साचे । रुप रामाचे देखिलें ॥
रामदासांची रामभक्ति कशी जाज्वल्य असली पाहिजे, हे गिरिधरांनी खालील ओव्यांत सांगितले आहे :-
राम म्हणता देहभाव जावा । तेंचि घडले त्यास देवा
राया दशरथाने जीवा । जयजयरामें वोवाळीले ॥

किंवा देह असतां भजन । करावे गुणानुवादकीर्तन ।
कीं बरव्या रीतीने पूजन । लक्ष्मणासारिखे करावे ॥
सकळांसी कैचे श्रीरामाअर्चन । तरी करावे प्रतिमापूजन ।
तेथे ठेऊनि अंत:करण ।     चापपाणी चिंतावा ॥

गिरीधरांनी प्रस्तुत रामायण एकट्या वाल्मीकी रामायणाच्याच आधाराने लिहिलेले नाही, तर अग्निपुराण, ब्रह्मांडपुराण, स्कंदपुराण, पद्मपुराण, हनुमन्नाटक इत्यादी इतर पुराणग्रंथातील रामकथांचाही समावेश त्यांनी आपल्या ग्रंथांत केला आहे.
निवृत्तिराम या ग्रंथाच्या ओव्या २०१६ असून हा ग्रंथ दोन वेळ छापून प्रसिध्द झाला आहे. "या ग्रंथाचे बावीस समास आहेत. पहिल्या समासांत श्रीसमर्थाआख्यान, दुसर्‍यांत गुरुकृपास्तवन, तिसर्‍यात ब्रह्मानुभव व चवथ्यांत दासबोधग्रंथानुभव सांगून पुढे मनमाया, अहंमाया, भक्ति, ज्ञान, वैराग्य, भवोपसर्ग, संकल्प, प्रपंच, अभ्यास, स्वर्गकाम, ब्रह्मगोळ, सृष्टिक्रम, भेदाभेद, प्रत्यक्ष ग्रंथराज (दासबोध) ,मूळ माया, पंचीकरण, सर्व सिध्दांत इत्यादी सर्व गोष्टी पूर्वपक्षांतच कशा येतात व त्या सर्वांची निवृत्ती होऊन "निखिळ परब्रह्म केवळ निर्गुण" कसे उरते ते स्पष्ट करुन दाखविले आहे.
श्रीसमर्थप्रताप हा ग्रंथही धुळे येथील सत्कार्योत्तेजक मंडळीने प्रसिध्द केला आहे; व त्याच्या प्रस्तावनेत रा. शंकर श्रीकृष्ण देव यांनी जे प्रेमळ विवेचन केले आहे ते सर्वांनी अवश्य वाचण्यासारखे आहे. श्रीसमर्थप्रताप ग्रंथात गिरिधरांनी श्रीसमर्थ रामदासस्वामींचे चरित्र प्रेमळ भाषेत गाइले आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या १३३२ आहे.
उपरिनिर्दिष्ट ग्रंथाशिवाय गिरिधरांची श्लोक पदे वगैरे स्फ़ुट कविता सुमारे १५०० आहे ! यावरुन त्यांनी आपले बहुतेक आयुष्य ग्रंथलेखनांतच कसे घालविले हे दिसून येईल. परमार्थाशिवाय अन्य विषयांवरही त्यांनी कांही कविता केल्या आहेत; प्राकृत व्याकरणावर त्यांचे ८४ व संस्कृत व्याकरणावर २५ श्लोक आहेत ! हे सगळे प्रचंड वाड्मय अर्वाचीन वाड्मयदृष्टीने जरी काही विचिकित्सकांस विशेष महत्वाचे वाटले नाही, तरी रामदास सांप्रदायी लोकांच्या दृष्टीने त्यांचे महत्व फ़ार आहे हे कोणासही नाकबूल करिता येणार नाही. गिरीधरांच्या कवितेविषयी रा. देव यांनी पुढील उद्गार काढले आहेत :-
" गिरिधर वृध्द झाले होते तरी देखील श्रीरामक्षेत्र चांफ़ळ व श्रीरामक्षेत्र सज्जनगड या दोन स्थळांच्या दर्शनाविषयी त्यांची उत्कंठा यतकिंचितही कमी झाली नाही !
गळित शरिर जाले दर्शनी शक्ति द्यावी ।
त्वरीत सदय देवे आस हे पूरवावी ॥
प्रभुवर महिमेचा भाट ठेऊनि मागें ।
गिरिधर प्रभुपाई येतसे लागवेगे ॥
अशी चार श्लोकांची पत्रिका त्यांनी आधी बंधूबरोबर पुढे पाठविली होती आणि मागोमाग आपण गेले !"
येथे गिरिधरांचे चरित्र संपले. हा चरित्रलेख, गिरिधरकृत श्रीसमर्थप्रताप ग्रंथास रा. देव यांनी जी ८६ पृष्ठांची विस्तृत प्रस्तावना जोडली आहे, तिच्याच केवळ आधाराने लिहिला आहे. रा. देव यांची प्रस्तावना इतकी सुंदर आणि माहितीने भरलेली आहे की, जुन्या वाडमयाविषयी आस्था बाळगणार्‍या प्रत्येक महाराष्ट्रीयाने ती प्रस्तावना अवश्य वाचावी अशी येथे आग्रहपूर्वक विनंती केल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. गिरिधरांची गुरुमाऊली श्रीबयाबाई रामदासी यांची काही पदें व गिरिधरांच्या कवितेतले आणखी थोडेसे उतारे येथे देऊन हा चरित्रभाग पूर्ण करुं.
=
बयाबाईंची पदे.
१.
 हा गुरु राजचि साचा । सिंधु आनंदाचा ॥ ध्रु ॥
सा चारांला अंत न लागे । कुंठित जाल्या वाचा ॥१॥
जाणिव टाकूनि नेणिव ग्रासुनि । येथेचि लाग तयाचा ॥२॥
भास निराभास होऊनियां एक । हाचि भास जयाचा ॥३॥
गुरु हा विश्वंभर दास बयावर । घाली पदर कृपेचा ॥४॥
२.
 धांवत येऊनि सद्गुरुमाय निज पान्हा देई ।
तुझिया विरहानलाने व्याकुळ जीव जाला पाही ॥ ध्रु.।
इंद्रनिळाची कीळ गाळुनी शाममूर्ति घडिली ।
अष्ट दिशांला प्रभा व्यापुनि दश अंगुळ उरली ।\१॥
यमुनातीरी कुंजवनामधिं वाजवितो मुरली ।
याला पाह्ता चित्तवृत्ती हे सखये घाबरली ॥२॥
चाल ॥ मग दृढतर निश्चय मनांत हा केला ॥
खरि आग लाविली या सहा ईषणेला ।
निर्धूत होऊनी शरण गेले पायाला ।
चिद्‍ग्रंथीची गांठ सुटुनियां मिठि पठ्ली पाई ॥
३.
या समयी कां दूर टाकिले खरे सांग मजलाम ।
हीनदीन मतिमंद आळशी ह्मणुन त्याग केला ॥
अर्वाकाने फ़ार बोलित्यें हाचि त्रास जाला ।
पदकमलाचा वियोग मजवर हा पडला घाला ॥
चाल ॥ आता क्षमा करावी कर जोडुनि विनविते ।
निजचरणि अखंडित ठाव द्या मागते ।
निर नयनी वाहे तुजलागी बाहते ।
उदास दिसती दाही दिशा अतां धीर नाही ॥१॥
चराचराला व्यापुनिया तूं उवरित असशी ।
नानात्वाचा ग्रास करुनिया त्या निजपदि रमशी ।
सहज लीले करुनिया ट्क सच्छिष्या देशी ।
तेथिल निज बोलायाला ते नये हो मजशी ।
चाल । तेथे चार सहा अठरा मौनाबले ।
गति कुंठित जाल्या तेथूनिया परतले ।
त्या चिद्गगनी मग दास बया मावळे ।
बहु जन्माची पुण्यसंपती फ़ळली या समयी ॥२॥
४.
 क्या कहू रे गुरुनाथ की बात मे । मस्तमयाहे दिल मेरा रंगमे ॥ ध्रु.॥
लाल रंगमे सफ़ेद खुला है । कोई नहि जाने आप भुला है ॥१॥
जब सद्गुरुके पगलिन होना । रंगातीत रंग आपहि होना ॥२॥
रामदास गुरुपदकी दासी । दास बया फ़िरे देस बिदेसी ॥३॥
५.
लागुन गेलं लगन हो ॥ या गुरुला निजनयनी पाहतां ॥ ध्रु.॥
मी ममता हे वसन टाकितां । जनांत जाले जथन हो ॥१॥
चाहो शून्याच्या वर मी नले । तेथेच जाले मगन हो ॥२॥
परपुरुषाची मिठी सुटेना । आतां कशि येउं बाई फ़िरुन हो ॥३॥
दास बया म्हणे गुरुराजाने । दाखविले चिद्गगन हो ॥४॥
६.
आर्या.
गुरुरुपचि तूं अससी हरि बा तुजला अखंड नमित असे ।
दास बया हे त्यजुनी श्रीचरणी मस्तकास ठेवितसे ॥
श्री श्रेष्ठ शुध्द नवमी नवमीच्या घरीच राहतसे ।
समजुनियां उमजावे अक्षरपत्री लिहून धाडितसे ॥
श्रीकारां आकारा मिळणी होतांच भ्रांति हे गेली ।
ॐ काररुप जाला जरि गुरुने आत्मदृष्टि हे केली ॥
आतां बोलू काये बोलाया मार्ग राहिला नाही ।
मौन्य गर्भिचे निजसुख सदगुरुराजेचि दाविले देही
देही असतां विदेही केले मजला गुरु समर्थाने ।
त्याचिया उपकारा देऊनियां काय व्हावे अर्थाने ॥
७.
पद.
काय सांगूं बाई तरी कपटी मोठा कान्हा ॥ ध्रु ॥
जात होते यमुनातीरी । अडवुनियां धरितो निरी ।
घुंगुटपट काढुनिया हळुच लागे काना ॥१॥
ठमक ठमक करुनी चाले । अर्वाच्च शब्द बोले ।
नैनी नैन एक करी भीइच ना कोणी ॥२॥
गोकुळांत धूम केली । वृत्ती चोरुनियां नेली ।
दास बया धन्य ह्मणे गुरुराजराणा ॥३॥
८.
ध्याइये गुरुपग अघमोचन । सुखदायक भवाब्धितरन ॥ ध्रु.॥
चिद्गुरुमे आसन खूला । जापर सद्गुरुराज रमीला ।
चंद्र सूर्य दो दिवटि जलत है । जब देखा तब डूब गई तन ॥१॥
ज्याकी सत्ता जगमो भरि हे । जां देखो तहां ठाड रही हे ।
सो सद्गुरु किरिपा सो मिलती । सब छांडके पग जा सरन ॥२॥
लिखा पढा कछु संग नहि आवे । अंतकालमे सबही जावे ।
जोरु लड्के महल मजालस । यहां रहती फ़ेर आपहि जाना ॥३॥
दिलका मेहेर मिलगया दिलको । तारनवाला गुरु है सबको ।
दास बया कहे कछु नहि देखा । जब देखा तब उलटा नयन ॥४॥
बयाबईंस हिंदी भाषेचे ज्ञान चांगले होते असे त्यांच्या हिंदी पदांवरुन दिसते. त्यांनी कांही आर्याही रचिल्या आहेत असे रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या एका लेखावरुन समजते. बयाबाईंची ही सर्व उपलब्ध कविता पुढेमागे रामदास आणि रामदासी या मासिकांत प्रसिध्द होण्याचा संभव आहे. वेणाबाई व बयाबाई यांच्याप्रमाणे अंबाबाई नामक एक साध्वी व कवियत्री या रामदास संप्रदायात होऊन गेली आहे, परंतु तिजविषयीची ह्मणण्यासारखी माहिती अद्याप कोठे प्रसिद्ध झालेली दिसत नाही. असो.
निवृत्तीराम ग्रंथातील एकंदर विवेचन पाहिले ह्मणजे, गिरिधर यांस संस्कृत भाषेचे ज्ञान चांगले असले पाहिजे व त्या भाषेतील अनेक ग्रंथ त्यांच्या अवलोकनांत आले असले पाहिजेत हे उघड दिसते. अध्यात्म विषय सुलभतेने समजावून देण्याची त्यांची हातोटीही चांगली आहे. गिरिधर, दिनकर रामदासी, हरिबुवा भोंडवे वगैरे अनेक ग्रंथकार या रामदास संप्रदायात होऊन गेले, परंतु इतर कांही मराठी कवींप्रमाणे त्यांची किंवा त्यांच्या ग्रंथाची महाराष्ट्रात आजवर फ़ारशी प्रसिध्दि झाली नाही. याचे मुख्य कारण,
श्रीसमर्थ रामदासस्वामी या मुख्य ग्रहासभोवती फ़िरणार्‍या ह्या उपग्रहांचे तेज, सूर्याच्या तेजापुढे चंद्राचे तेज जसे लोपून जाते, त्या प्रमाणे लोपून गेल्यामुळे लोकांचे डोळे दिपविण्यास ते समर्थ झाले नाहीत, हेच होय व अशी स्थिति दुसर्‍या पुष्कळ महाराष्ट्र कवींची झाली आहे . असो.
सद्गुरुमहिमा वर्णन करितांना गिरिधर ह्मणतात :-
देवा देवपण सद्गुरुकरितां । संता संतपण सद्गुरुकरितां ।
जीवासी शिवपण सद्गुरुकरितां । ब्रह्मपण सद्गुरुचनी ॥
सद्गुरुचेनि कृपालेशे । अहंकार निवृत्ति नि:शेषे ।
वशिष्ठ विश्वामित्र संतोषे । जगदोध्दार करावया ॥
जगदोध्दार संती केले । व्दंव्द सांडूनि निर्व्दव्द ठेले ।
ऐकूनि श्रोते तद्रूप जाले । निवृत्तिबोधी परमार्थी ॥
कोण्ही राहिले पुरुषार्थी । प्रार्थिते जाहले श्रवणार्थी ।
अहं ममता निवृत्यर्थी । कथन अपूर्व सांगा जी ॥
वसिष्ठ कौशिक निर्व्दव्द जाहाले । आम्हासि व्दंव्दी ठेऊनि गेले ।
दशपाशबंधनी जीव बांधले । शुकनळिका न्याये जी ॥
अहंममता नसतीच माथां । मर्कट मुष्टी सांपडे सर्वथा ।
विषयपंचके बांधिले तत्वता । मृग गज पतंग मीन भृंग ॥
आतां अहंममता निवृत्तिलक्षणी । एका जी इतिहास रामायणी ।
संत साधु परिसती श्रवणी । श्रोते वक्ते स्वानंदे ॥
अहंममता म्हणजे जाणा । मी माझे ऐसी भावना ।
मी कोण माझे काय मना । आणिले पाहिजे ॥
मी जीव माझे वैभव । मी सुंदर माझे गौरव ।
धन संपत्ती संतती हांव । ब्रह्माडाते कवटाळी ॥
मी ज्ञाता माझी मान्यता । मी तपस्वी माझी उग्रता ।
मी सुशील माझी शुचिर्भूतता । लोकांसि नये ।
मी विद्यावंत माझी प्रतिष्ठा । मी प्रतिसृष्टीचा स्त्रष्टा ।
म्या बहुतांसी अप्रतिष्ठा । केली म्हणे अभिमानी ॥
विश्वामित्र गोत्र माझे । मज जाणिजे वसिष्ठराजे ।
नाना अभिमानी फ़ुंजे । अहं ममता दुर्बुध्दि ॥
सर्प वांकडे तिकडे चालती । बिळी सरळचि प्रवेशती ।
तैसे अहंकार नाना विकार करिती । आत्मसदनी येती सरळेचा ॥
किती दिवस अहंबुध्दी । घ्यावी आतां आत्मशुध्दी ।
रावण ज्ञाता दुसरा विधि । खंडे केली श्रुतींची ॥
म्हणे चंद्र मजवरी छत्र धरी । सूर्य माझ तिष्ठे व्दारी ।
वरुण वायो अधिकारी । झाडी फ़ेडी करावयाचे ॥
पुरंदर तो सुमनदायक । रजक माझा मुख्य पावक ।
शतुक्रतु ज्याचेनि सम्यक । होमहवने त्रिभुवनी ॥
त्रिदश माझे बंदिशाळे । म्हणोन करी नानाचाळे ।
कुटिल कपटी जनकबाळे । लंकेसि घेऊनि गेलासे ॥
बरे रावणे स्वहित केले । समर्थेसी वैर धरिले ।
मी माझे समूळ गेले । सर्वही जाले रामार्पण ॥
म्हणे भवसिंधु तरेल कोण । तेथे तरले पाषाण ।
सुंदर माझे अशोक वन । शोक उत्पन्न तेथेही ॥
अक्षया माझा आयुष्यांत त्यासी क्षय करी हनुमंत ।
सुवेळा माझी हे निभ्रांत । तेथे ठाणें रामाचे ॥
माझी अमरपुरी अजिंक । तेथे वेधलें कपिकटक ।
असुर माझे सुरवरत्रासक । त्यांसी त्रासक वानर हे ॥
त्रिशिरा माझा त्रिभुवन जिंकी । त्यांसी वानर ऋषभ जिंकी ।
कुंभकर्ण माझा बळसागर की । अगस्तिराम आचमन हे ॥
अतिकाया माझा चंडकाया । त्यासी मारी सौमित्र बळिया ।
इंद्रजित माझा पराक्रमिया । त्यासिही मारी लक्ष्मण ॥
अहिमहि माझे मित्रबंधु । त्यासी मारी प्रतापसिंधु ।
म्हणे करीन लक्ष्मणबंधु । तात्काळ उठवी द्रोणाचल ॥
मी होम करीन वाममार्गे । तो वानर भंगिती गगनमार्गे ।
रणांगणी माझी दैत्यदुर्गे । समर्थ भर्गे पाडिली ॥
माझी गगन भरोनी शरसुटी । क्षणार्धे ताडी राम जेठी ।
माझी शिरात्पत्ति मोठी । श्रीराम फ़ोडी कुपिका ॥
जे जे मी माझे भाविले । तितुके पूर्वपक्षवारी गेले ।
शास्त्रज्ञासि कळो आले । अहंममतानिरुपण ॥
पूर्वपक्ष जाला रावणाचा । सिध्दांत राम उरला साचा ।
मी माझे अहंममतेचा । राम जाला चहूंकडे ॥
वाम सव्य मागेपुढे । रथ सारथी राम पुढे ।
गगन भरुनि रामें रोकडे । स्वरुप दाविले सर्वत्र ॥
गगनसदृश राम जाला । पूर्वपक्ष अवघा उडाला ।
खं ब्रह्म राम देखता जाला । खंडे केली वेदांची ॥
वेदशास्त्र मिथ्या नव्हे । पढत मूर्ख जरी आहे ।
श्रीराम त्यास भेटताहे । ईश्वरी कृपा रावणा ॥
अहंममता निमोनि गेली । अंतरस्थिति राम जाली ।
मी जीव ऐसी शुध्दि उडाली । अहं आत्मा निर्धारे ॥
अहं आत्मा आत्माराम । अहं सोहं सारुनि नेम ।
रामरावणएक्यवर्म । संत सज्जन जाणती ॥
अहं रावण उभा केला । अर्थ परमार्थी आणिला ।
जयविजय रावण गेला । वैकुंठभुवना निश्चये ॥
सद्गुरुकृपेचेनि बळे । वैकुंठ गिळिले सगळे ।
चतुर्विधा मुक्ति सारुनि केवळे । बध्द ना मुक्त स्वरुपी ॥
कोणासि सांगो अध्यात्मज्ञान । जाणती संत सुलक्षण ।
अहंममता निवृत्तिकथन । आत्मारामे संपविले ॥
आत्माराम निरंजनी । अहंममतावृत्ति निवृत्ति वेणी ।
अध्यात्म विद्या अध्यात्मश्रवणी । संत खुणेसी बाणती ॥
अहंममतेचे वर्णन वरील ओव्यात गिरिधरांनी फ़ार सुंदर रीतीने अहंममतेचे वर्णन वरील ओव्यांत गिरिधरांनी फ़ार सुंदर रीतीने केले आहे. तरी पण, केवळ काव्यदृष्टीने पाहतां, मुक्तेश्वर, वामन किंवा मोरोपंत यांच्या कवितेतील प्रतिभा गिरिधरांच्या कवितेत फ़ारशी आढळणार नाही; आणि याचे कारणही उघडच आहे. एक तर रामदास संप्रदायांतल्या कोणत्याही कवीने रसिकजनमनोल्हादक काव्य रचून , कविमंडळात महाकवि ह्मणून चमकण्याचा बुध्दिपुरस्सर प्रयत्न कधीच केलेला नाही व दुसरे असे की, भाषेचा साधेपणा कायम ठेवून , गुरुगम्य अध्यात्मज्ञान सामान्य प्राकृत जनांस, होता होईल तितके सुगम करुन द्यावे इतकाच त्यांच्या काव्यविरचनेचा हेतु असल्यामुळे, आपले गुरु जे श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या काव्यरचनापध्दतीचेच अनुकरण त्यांनी सर्वत्र केले आहे. अस्तु.
प्रस्तुत गिरिधर कवीशिवाय गिरिधर नांवाचे आणखी एकदोन कवि महाराष्ट्रात होऊन गेले असावेत, असे दुसर्‍या कांही कवितेतील महाराष्ट्रात होऊन गेले असावेत, असे दुसर्‍या काही कवितेतील नामोल्लेखांवरुन दिसते. "भक्ति आकळिला । दयाघन भक्ति आकळिला" ह्या प्रसिध्द पदाच्या शेवटी "रुक्मिणीने एका तुलसिदलाने । गिरिधर प्रभु तुळिला" असा कविनामोल्लेख आहे. याशिवाय, "प्रात:स्मरामि" या नांवाने एक पन्नास पाऊणशे कडव्यांचे अप्रसिध्द जुने प्रकरण माझ्या संग्रही आहे, त्याच्या शेवटी ---
जीवन्मुक्त याचा सुत ।
"गिरिधर प्रसाद अमृत "
असा नामोल्लेख आहे, त्यावरुन जीवन्मुक्त नामक सत्पुरुषाचा हा गिरिधर कवि पुत्र असावा हे उघड दिसते. रामदासी गिरिधरांचा निवृत्तिराम ग्रंथ धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभेने प्रसिध्द केला आहे, त्याची, रा. केशव लक्ष्मण ओगले यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचनीय असल्यामुळे, ती वाचकांनी एकवार अवश्य वाचावी, अशी सूचना करुन हा चरित्रलेख येथे पूर्ण करितो.

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP