श्रीनारायणबोवा जालवणकर

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


N/Aहे प्रसिध्द संतकवि सुमारे ४०/५० वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यांचा जन्म शके १७१५ त झाला व शके १७९० आषाढ वद्य ५ मी रोजी ते समाधिस्थ झाले. हे बाळपणापासूनच कडकडीत वैराग्यसंपन्न होते. त्यांनी गिरनार पर्वतावर बारा वर्ष राहून तीव्र तपश्चर्या केली व नंतर श्रीद्त्तमहाराजानी त्यांना साक्षात दर्शन देऊन कृतार्थ केले.  " शाळांत जशा शिक्षणाच्या सोईकरितां सात इयत्ता अथवा कक्षा ठरविल्या आहेत, त्याचप्रमाणे नारायणबुवांनी मुमुक्षुचे निरनिराळे अधिकार लक्षांत आणून सप्तसागर रचिले आहेत; अथवा त्यांनी हा सात पायर्‍यांचा सोपानच साधकांकरितां तयार केला आहे असे म्हटले तरी चालेल. हे सप्तसागर व त्यांतील विषय येणेप्रमाणे :-
१. ज्ञानसागर यांत मनुष्याचे चार वर्ग अधिकारपरत्वे सांगून त्यांचे कर्तव्याचा विचार केला आहे.
२. विज्ञानसागर यांत कर्म व ज्ञान ही साधने भगवत्प्राप्तीस अवघड आहेत व भक्ति खेच साधन सुलभ आहे हे विवरण केले आहे.
बोधसागर यांत सद्गुरुने मुमुक्षूस केलेला उपदेश दिला आहे.
४. कैवल्यसागर - यांत तोच उपदेश अधिक विस्ताराने व आधार दाखवून केला आहे. या ग्रंथासारखे- आत्मस्वरुपबोध करुन देणारे ग्रंथ मराठी भाषेत फ़ार थोडे आहेत.
५. आनंदसागर - यांत स्वरुपानंदाचे वर्णन आहे.
६. शांतिसागर - यांत अपरोक्षनिष्ठ व शांत पुरुषांची लक्षणे सांगितली आहेत.
७. करुणासागर - यांत शेवटी भगवद्भक्ताने भगवंताची करुणा भाकली आहे.
नारायणमहाराजांचे हे सर्व ग्रंथ ओवीबद्ध आहेत. यांतील बहुतेक ग्रंथ छापून प्रसिद्ध झालेले आहेत. या सप्तसागरांपैकी करुणासागर हा ग्रंथ फ़ार मोठा व चित्तवेधक आहे. त्यांचे दोन खंड असून पूर्वार्धात १८९३ ओव्या आहेत. उत्तरार्धात १५७७९ ओव्या असून तो अपूर्णच राहिला आहे ! पूर्वार्धाचे शेवटी बुवा म्हणतात ;-
निरंजनाच चरण । भावे वंदी नारायण ।
पूर्वार्ध झाला संपूर्ण । भाविकांचा हितकर्ता ॥१८९२॥
जे का भावे वाचिती । त्यांचे मनोरथ ऐसेचि पुरती ।
जैसे माझे श्रीपती । पुरविता झाला निजांगे ॥१८९३॥
या ग्रंथाची एकच प्रत बडोदें येथे श्रीमंत कृष्णराव रघुनाथ धारकर यांचे घरी असल्याचें ’ मुमुक्षु ’ पत्रांतील लेखावरुन समजते. श्री. कृष्णराव यांचे तीर्थरुप रघुनाथ बापूजी उर्फ़ भाऊसाहेब हे श्रीगुरु नारायणमहाराज यांचे परम अधिकारी शिष्य होते. त्यांनी मोठया आस्थेने उत्तम लेखकाकडून जाड व टिकाऊ कागदावर करुणासागर ग्रंथाची प्रत करवून आपले संग्रही ठेवली आहे. समग्र ग्रंथात एकंदर ओवीसंख्या १७६७२ आहे, ह्मणजे हा ग्रंथ जवळ जवळ श्रीमद्भागवताएवढा आहे. तो अद्याप अप्रकाशित आहे, हे सांगावयास नकोच. श्रीनारायणबोवा यांचे शिष्यप्रशिष्य काशी, लष्कर, भेलसा, धार, देवास, पुणे इत्यादि ठिकाणी आहेत, त्यापैकी एखाद्याने महाराजांची समग्र कविता मिळवून ती पुण्या मुंबईतील एखाद्या प्रकाशकाकडून प्रकाशित करविल्यास आपल्या सद्गुरुच्या ऋणांतून अंशत: तरी उतराई झाल्याचं श्रेय त्यास मिळेल.
वरील ग्रंथाशिवाय गुरुपादुकाष्टक, चिद्रत्नमाला, बोधष्टक, विचारमाला, निर्वाणपंचक वगैरे अनेक स्फ़ुटप्रकरणे महाराजांनी लिहिली आहेत व ती मुमुक्षु पत्रांत व काव्यसंग्रहात प्रसिद्ध झाली आहेत. शिवाय अभंग पदें वगैरे बरीच आहेत. नारायणमहाराजांचे शिष्य श्रीलक्ष्मणमहाराज हे इंदूर येथे होते. त्यांचा तेथे एक मठ आहे. तेथे त्यांचे शिष्यमंडळ आहे, त्यांजपाशी महाराजांचे कवितेचा बराच मोठा आहेत. नारायणमहाराजांचे शिष्य श्रीलक्ष्मणमहाराज हे इंदूर येथे होते. त्यांचा तेथे एक मठ आहे. तेथे त्यांचे शिष्यमंडळ आहे, त्यांजपाशी महाराजांचे कवितेचा बराच मोठा संग्रह आहे. लक्ष्मणमहाराजांचे शिष्य बलभीम महाराज साडेकर हे पुण्यपुरुष थोड्या वर्षापूर्वी समाधिस्थ झाले.
नारायण महाराजाचे कुलशील, वास्तव्यस्थान वगैरे बाबतीत विशेष माहिती मिळाली नाही. त्यांनी आपल्या गुरुचा ’ निरंजन ’ या नांवाने उल्लेख केला आहे. प्रस्तुत ग्रंथांत ज्या निरंजनबुवांचे चरित्र दिले आहे, तेच हे ’ निरंजन ’ असावेत, असे वाटते ; कारण दोघांनीही गिरनार पर्वतावर तपश्चर्या केली होती व तेथे दोघांसही श्रीदत्तदर्शन झाल्याचा उल्लेख आढळतो.
नारायण महाराजांची कविता फ़ार साधी, सुलभ आणि अध्यात्मज्ञानपरिपूर्ण आहे. पुढील उतारे पहा :-
निर्वाणपंचक ( श्लोक )
निर्वाणबोधरवि ह्रत्कमळी उदेला ।
मायांधकार सविकार विकल्प गेला ॥
तो व्दैतदु:खशिण अंतरिंचा निवाला ।
आरण्य घोर गृह थोर समान त्याला ॥१॥
निर्वाणशुद्ध निजबुद्ध पदावलंबी ।
लोकी असोनि परिवार नसे कुटुंबी ॥
विद्याविरोध जड सत्स्वरुपी निवाला ।
आरण्य घोर गृह थोर समान त्याला ॥२॥
निर्वाण निर्मल निरंजन वीतरागी ।
आनंदकंद समचिद्धन राजयोगी ॥
भोगी न भोग न वियोग असे जयाला ।
आरण्य घोर गृह थोर समान त्याला ॥३॥
निर्वाण धर्म निजवर्म-विवेक जाणे ।
श्रौतादि कर्म, न लगेचि विधिप्रमाणे ॥
भावी न भूत ह्रदयी करणे जयाला ।
आरण्य घोर गृह थोर समान त्याला ॥४॥
निर्वाण शांतिसुख शीतळ मौन बोले ।
योगाधिराज परिपूर्ण सुखांत डोले ॥
राहे सदां सहज भाव अभाव गेला ।
आरण्य घोर गृह थोर समान त्याला ॥५॥
निर्वाणपंचक भवभ्रमनाशकारी ।
भक्त्या गुरोर्मुख विनिर्गत जो विचारी ॥
नारायणाधिपति दत्त मनी विराजे ।
त्या योग भोग वन पत्तन एक भासे ॥६॥

करुणापर अभंग.
१.
तुझे हाती दिले हात । नको करुं माझा घात ॥१॥
तुझे पायी माथा । ठेवियेला सद्‍गुरुनाथा ॥२॥
कैसा तरी तुझा । अंगिकार करी माझा ॥३॥
भेट देई नारायणा । दत्त देवा निरंजना ॥४॥
२.
माझे अपराध कोटी । सर्व देवा घाली पोटी ॥१॥
मी तो पातकाची खाण । नाम पतितपावन ॥२॥
देवा कृपेच्या सागरा । नको होऊं पाठमोरा ॥३॥
नारायणा मारी हांका । द्त्त देवा दावी मुखा ॥४॥
३.
काही घडेना साधन । कैसे दाविसी चरण ॥१॥
काय करु कोठे जाऊं । कैसे तुझे पाय पाहू ॥२॥
कधी येसी वाट पाहे । धांव आतां सद्‍गुरुमाये ॥३॥
तुजवीण राहवेन । द्त्त देवा नारायणा ॥४॥

सद्गुरुपर अभंग .
१.
धरी सद्‍गुरुचे पाय । पुन्हा जन्म तया नोहे ॥१॥
जो कां सद्‍गुरुचा दास । तया परब्रह्मी वास ॥२॥
ज्याचा सद्‍गुरु सोयरा । त्याचे मोक्ष राबे घरा ॥३॥
गुज सांगे नारायणा । गुरु तोची निरंजन ॥४॥
२.
गुरु नाही ओळखिला । त्याचा जन्म व्यर्थ गेला ॥१॥
जो कां सद्‍गुरुविन्मुख । तया जन्मोजन्मी दु:ख ॥२॥
नाही सद्‍गुरुचा थार । त्याचा भूमीलागी भार ॥३॥
नारायण त्रिभुवनी । गुरु निरंजन धनी ॥४॥
३.
नको साधनाचे श्रम । मुखी सद्‍गुरुचे नाम ॥१॥
तीर्थी धाऊनियां काय । धरी सद्‍गुरुचे पाय ॥२॥
सोडी कर्म आटाआटी । घेई सद्‍गुरुची भेटी ॥३॥
नारायण चित्त वित्त । सर्व कांही गुरुदत्त ॥४॥
४.
एक सद‍गुरु तो सखा । जन संबंधी पारखा ॥१॥
करी सद्‍गुरुचा संग । तेणे होय भवभंग ॥२॥
होतां सद्‍गुरुची कृपा । घरी मोक्ष राबे फ़ुका ॥३॥
दत्ताचिया संगे । नारायण धाला अंगे ॥४॥

पदे
१.
धरिं रामचरणा जग बडबडुं दे ॥धरि.॥ ध्रु.॥
रामभजन अति प्रेमळ पाहुनि,
मनि तडफ़डि त्यासि तडफ़डु दे ॥धरि.॥१॥
पाहुनि कुजन छ्ळण खळनिंदा,
मनिं गडबडि त्यासि गडबडु दे ॥धरी.॥२॥
संसृतिसुखदु:ख सोसुनि अंगे,
नभ कडकडि तरि कडकडु दे ॥धरि.॥३॥
नारायणगुरुसेवा करितां,
तनु धडधडि तरि धडधडु दे ॥धरि.॥४॥
२.
हरिहर गुरुराज भजा यमपुरिभय वारा ॥ ध्रु.॥
प्रेमे हरिध्यान धरुनि नारायण बोला ।
संग त्यजुनि सगुण भजुनि रंग डंग डोला ॥१॥
विषय दु:खरुप सकळ तुच्छ भोग त्यागा ।
सद्गुरुपकमल नमुनि अचळदान मागा ॥२॥
दारुण भय घोर पंथि थोर दु:ख झाले ।
कष्टुनि जड कर्म करुनि जन्मुनि बहु गेले ॥३॥
कर्म सांग घडे ऐसे पुण्य गांठि जोडा ।
नारायण परंधाम सद्गुरुपद जोडा ॥४॥
३.
चाल चाल रे मना वना जाऊं । रम्य काननि एकटे सुखी राहूं ॥ध्रु.॥
पुण्यारण्याची महाशोभा पाहूं । शोभा पहातां श्रीहरिगुण गाऊं ।
वन्य तरुंची सुपर्ण फ़ळे खाऊं । इच्छाविहारी र्त्या मृगांसंगे धावूं ॥१॥
दिव्यसरितांचे जळ तृष्णाहारी । मलय मारुत हा स्वये वारा वारी ।
पर्ण्शय्येत मृदु निद्रा करी । स्थिर राहे अंतरी धीर धरी ॥२॥
रात्री लावूं सोज्वळ चंद्रदीप । विरक्ति कांतेचे पाहुं गौररुप ।
रुप पहातां आलिंगि आपोआप । दूर करीते स्वयें सर्व ताप ॥३॥
ऐशा सुखाची त्या वनी आहे खाण । तेथे राहतां सांपडे त्याचि खूण ।
नेटे बोटे दाखवी नारायण । अंगे भेटवि तो सखा निरंजन ॥४॥
४.
एक सद्‍गुरु तो सखा । जन संबंधी पारखा ॥१॥
करी सद्‍गुरुचा संग । तेणे होय भवभंग ॥२॥
होतां सद्‍गुरुची कृपा । घरी मोक्ष राबे फ़ुका ॥३॥
दत्ताचिया संगे । नारायण धाला अंगे ॥४॥

पदे
१.
धरि रामचरणा जग बडबडु दे ॥धरि.॥ध्रु.॥
रामभजन अति प्रेमळ पाहुनि,
मनिं तडफ़डि त्यासि तडफ़डु दे ॥धरि.॥१॥
पाहुनि कुजन छळण खळनिंदा,
मनिं गडबडि त्यासि गडबडुं दे ॥धरि.॥२॥
संसृतिसुखदु:ख सोसुनि अंगे,
नभ कडकडि तरि कडकडुं दे ॥धरि.॥३॥
नारायणगुरुसेवा करितां,
तनु धडधडि तरि धडधडुं दे ॥ धरि. ॥४॥
२.
हरिहर गुरुराज भजा यमपुरिभय वारा ॥ध्रु.॥
प्रेमे हरिध्यान करुनि नारायण बोला ।
संग त्यजुनि सगुण भजुनि रंग डंग डोला ॥१॥
विषय दु:खरुप सकळ तुच्छ भोग त्यागा ।
सद्गुरुपदकमल नमुनि अचळदान मागा ॥२॥
दारुण भय घोर पंथि थोर दु:ख झाले ।
कष्टुनि जड कर्म करुनि जन्मुनि बहु गेले ॥३॥
कर्म सांग घडे ऐसे पुण्य गांठि जोडा ।
नारायण परंधाम सद्गुरुपद जोडा ॥४॥
३.
चाल चाल रे मना वना जाऊं । रम्य काननि एकटे सुखी राहूं ॥ध्रु.॥
पुण्यारण्याची महाशोभा पाहूं । शोभा पहातां श्रीहरिगुण गाऊं ।
वन्य तरुंची सुपर्ण फ़ळे खाऊं । इच्छाविहारी त्या मृगांसंगे धावूं ॥१॥
दिव्यसरितांचे जळ तृष्णाहारी । मलय मारुत हा स्वये वारा वारी ।
पर्णशय्येते मृदु निद्रा करी । स्थिर राहे अंतरी धीर धरी ॥२॥
रात्रि लावू सोज्वळ चंद्रदीप । विरक्ति कांतेचे पाहुं गौररुप ।
रुप पहातां आलिंगि आपोआप । दूर करिते स्वये सर्व ताप ॥३॥
ऐशा सुखाची त्या वनी आहे खाण । तेथे राहतां सांपडे त्याचि खूण ।
नेटे बोटे दाखवी नारायण । अंगे भेटवि तो सखा निरंजन ॥४॥
बोधाष्टक ( श्लोक )
नानाशास्त्र पुराण वेद पाहतां नानागुणीं गुंतले,
नानायोग तपे व्रते मख सदाचारी उभे ठाकले ।
नेणानां स्वहित हरीसि मुकले ते सर्वथा त्यागणे,
ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुधासाम्राज्य ते भोगणे ॥१॥
नाना वेष धरुनियां विचारती जे संत साधू भले
नाना मत्त मतांतरे बहुपरी सन्मार्ग सांगितले ।
ते नाना भ्रमरुप त्यागुनि महावाक्यार्थ तो शोधणे,
ब्रह्मानंद अगाध.....  .....   .......                     ॥२॥
नाना तर्क वितर्क वाद श्रवणी ऐकूनियां अंतरी,
त्याचा क्षोभः न लोभही न उठतां तूं स्वस्थ राही घरी ।
सर्वात्मा परिपूर्ण तूंच असशी तूते न कांही उणे.
ब्रह्मानंद अगाध....     ......   ........                  ॥३॥
जे जे रुप दिसे तुला नयनिं ज्या नामासिहि ऐकसी,
जे जे तूं स्मरसी मने करुनियां चित्तांतही चिंतिसी ।
ते ते सर्व नसे असे समजुनी स्वच्छंदते राहणे,
ब्रह्मानंद अगाध....    ....   .....                         ॥४॥
तूते देह नसे शुभाशुभ कदा तत्कर्म तेंही नसे,
ऐसे हे निजमानसी समजतां प्रारब्धरेषा पुसे ।
शुद्धात्मा विलसे सदा त्रिभुवनी अद्वैत ते पाहणे,
ब्रह्मानंद अगाध  ....  .....     ......                       ॥५॥
तूं गंभीर सुधासमुद्र अससी जाणें न येणे तुला,
सत्ताही अवघी तुझीच परि तूं सर्वाहूनी वेगळा ।
नाना दु:खविकार काम नसतां का दैन्यवाणे जिणे,
ब्रह्मानंद अगाध  .....    .....  ........                      ॥६॥
जेथे भाव अभावही न विलसे जाणीव नाही कदां,
ते सतचितघनब्रह्मव्यापक असा तूं शांत राही सदा ।
तेथे हा जडभास वाव अवघा ना पाहतां पाहणे,
ब्रह्मानंद अगाध ....     ......     .....                ॥७॥
नित्यानंद अनादि पार न दिसे आलंब नाही जया ।
आपेंआप नभासि गाळुनि सुखे अंगेच पाही तया ।
जेथे मीपण हारपे तदुपरी जे राहिले त्या खुणे,
ब्रह्मानंद अगाध .....         .......     ......          ॥८॥
ध्याता ध्यान समाधि योगहि कदा ती धारणाही नसे,
तो नारायण त्या निरंजनपदी साम्राज्य भोगीतसे ।
हे बोधाष्टक ऐकती निजमुख गाती स्वयें जे सदां,
त्यांते हे भवदु:खरुप रचना कांही न बाधी कदा ॥९॥
संतपर अभंग.
१.
देव तोचि संत, संत तेच देव । येथे दुजाभाव नाही कांही ॥१॥
देव नाम त्यांचे संतनाम त्यांचे । परब्रह्म साचे एकचि ते ॥२॥
कोणी म्हणती देव, कोणी ह्मणती संत । परि ते भावातीत परब्रह्म ॥३॥
संताचे चरण सेवी नारायण । देव निरंजन संतचि तो ॥४॥
२.
संताच्या दारीचा होईन उंबरा । ऐसे रघुवीरा करी मज ॥१॥
येता जाता त्याचे लागतील पाय । ऐसे रघुराय करी मज ॥२॥
संतचरणाची होईन वहाण । ऐसे दयाघन करी मज ॥३॥
मागे हेचिं दान भावे नारायण । अंगे निरंजन देई आतां ॥४॥
३.
संतचरणतीर्थी करीन आंघोळी । ऐसे वनमाळी करी मज ॥२॥
संतचरणामाजी मी लोळेन  ॥ ऐसे नारायणा करी मज ॥२॥
संतचरणसेवा घडो मज देवा । ऐसे तूं केशवा करीं वेगी ॥३॥
ह्मणे नारायण गुरु निरंजन । दास ह्मणवीन संताचा मी ॥४॥
४.
संताचियापुढे होईन खेळता । वचन बोलता ऐसे करी ॥१॥
संत मज देवा धरिती पोटेसी । ऐसे ऋषीकेशी करी मज ॥२॥
संत मज देवा ह्मणतील अपुला । ऐसे घननीळा करी मज ॥३॥
संत मजलागी करिती ब्रह्मबोध । ऐसा ब्रह्मानंद करी देवा ॥४॥
संतालागी माझा असो अभिमान । ह्मणे नारायण निरंजना ॥५॥
५.
संत मायबाप हरती पापताप । ब्रह्म आपोआप स्वयंभ ते ॥१॥
संतांचे व वंदन दु:खाचे खंडण । काळाचे दंडण जयांचेनी ॥२॥
संती उपकार केला विश्वावर । जगाचा उद्धार केला अंगे ॥३॥
ह्मणे नारायण सांगे निरंजन । संतसेवा जाण नेमधर्म ॥४॥
६.
शास्त्रांचा आधार देवांचा बाजार । कर्माचा जोजार वाहे माथां ॥१॥
खर्चिला धर्माचा रोकडा पयका । उधारचि देखा जिन्नस तो ॥२॥
सद्‍गुरुविन्मुख राहोनियां काय । श्रमविली माय व्यर्थचि ते ॥३॥
सखा निरंजन बोले नारायण । अंतरीची खूण सांगतसे ॥४॥

श्लोक.
प्रापंची ममता कधी धरुं नको, लोभांत गुंतूं नको ।
लोकी तूं खळ दुष्ट नष्ट, भलत्या संगात बैसू नको ॥
कांही कर्म करु नको, गुरुमहापंथासि मोडूं नको ।
जो कोणी भवदु:ख सर्व निरसी तो देव सोडू नको ॥१॥
संसारी असतां प्रवाहपतितव्दंव्दांसि त्रासूं नको ।
खेदाखेद मनांत आणूनि वनी जाणे विचारु नको ॥
कर्णी दुष्ट कठोर शब्द पडती ते दु:ख मानू नको ।
भोगे दु:खसुखादि सारुनि निजानंदास भंगू नको ॥२॥
लाभी हर्ष नको, विषादहि नको, निंदा प्रशंसा नको ।
हानीचा मनिं शोक तूं धरुं नको, देही अहंता नको ॥
कोणाचे इतिकृत्य ते स्मरुं नको, माझे तुझे हे नको ।
आप्तासी ममता नको गुरुपरब्रम्हासि सोडू नको ॥३॥
प्रारब्धी सुखभोगयोग नसतां ते दैन्य मानूं नको ।
इंद्रासी बहु संपदा गणुं नको, क्षुद्रार्थ वांछूं नको ॥
देहाचे कृतकर्म दु:ख अपुले कोणास सांगूं नको ।
भूलोकांत महाप्रसंग पडतां तूं सत्व सोडू नको ॥४॥
मायामोह न्को, सुसंग असतां सोडूनि जाऊ नको ।
चिंताशोक नको, परार्थ करितां लोकांस लाजूं नको ॥
वर्माच्चार नको, जनांत बसतां गोष्टी भवाच्या नको ।
चित्ती राग नको अनावर, खरे वैराग्य सोडू नको ॥५॥
इतक्या उतार्‍यांवरुन नारायण महाराजांच्या कवितेचे स्वरुप वाचकांच्या लक्ष्यांत येईल. एकांतवासाची व सृष्टिसौंदर्याची महाराजांस किती आवड होती हे ’ चाच चाल रे मना वना जाऊं " ह्या पदावरुन उघड दिसते.

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP