शिवदिन केसरी

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


गावें नतपद्मातें जो दे नि:सीम शिअ दिनकरा या ।
पटु हित उपासकांचें, श्रीशिवदिन तेंवि शिवदिन कराया ॥१॥
सन्मणिमाला-मोरोपंत.
हे प्रसिद्ध सत्पुरुष सुमारें १५० वर्षापूर्वीं श्रीक्षेत्र पैठण येथें होऊन गेले. मोरोपंत, अमृतराय, मध्वमुनीश्वर, सोहिरोबा, महिपति व निरंजनमाधव हे महाराष्ट्रकवि शिवदिनकेसरींचे समकालीन होत. शिवदिनांच्या मातु:श्रीचें नांव सरस्वती व तीर्थरुपांचे नांव कृष्ण यादव जोशी. यांचें जन्म शके १६२०, बहुधान्य नाम संवत्सरे वैशाख वद्य ७, भृगुवासर या दिवशीं सूर्योदयीं झालें. पंतांच्या शिरोभागीं दिलेल्या आर्येतील दिनकर शब्दाचा याच गोष्टीशीं संबंध असावा, असें वाटतें. शिवदिनस्वामींची गुरुपरंपरा येणेंप्रमाणें:-
श्रीआदिनाथ
मत्स्येंद्रनाथ
गोरखनाथ
गैनीनाथ
निवृत्तिनाथ
ज्ञाननाथ (ज्ञानेश्वरीकार ज्ञानदेव)
सत्यामलनाथ
गैबीनाथ
गुप्तनाथ
उब्दोधनाथ
केसरीनाथ
शिवदिननाथ

शिवदिन केसरी या नावांत शिवदिननाथ आणि त्यांचे गुरु केसरीनाथ या दोघांचांही समावेश झाला आहे, हें वाचकांच्या लक्ष्यांत आलेंच असेल. केसरीनाथांचा जन्म शके १५८५ मार्गशीर्ष शुद्ध पंचमी या दिवशीं झाला व शके १६४६ मार्गशीर्ष शुद्ध २ या दिवशीं ते समाथिस्थ झाले. शिवदिननाथ हे यजुर्वेदी कौशिक गोत्री देशस्थ ब्राह्मण; ह्यांना जन्मापासून समाधि साधली होती, यावरुन
‘पाप्य पुण्यकृताँल्लोकानुषित्वा शाश्वती: समा: ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभि जायते ॥
तत्रऽतं तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्‍ ।
यततेच ततो भूय़: संसिद्धौ कुरुनंदन ॥’

या गीतावचनांत योगभ्रष्टांच्या वर्गांतले ते होते, असें वाटतें. शिवदिननाथ पांच वर्षांचे होते, त्या वेळीं कांहीं मुलांनीं गोदेच्या वाळवंटावर त्यांस खेळावयास नेलें. खेळतां खेळतां, त्यांनीं शिवदिननाथांस मौजेनें वाळवंटांत पुरलें व वर माती टाकली. पुढें, खेळण्याच्या भरांत तें ठिकाण विसरल्यामुळें सगळीं मुलें भिऊन आपापल्या घरीं निघून गेलीं. मुलगा वेळेवर घरीं आला नाहीं म्हणून शिवदिननाथांचे तीर्थरुप कृष्णाजीपंत यांनीं पुष्कळ शोध केला, परंतु कांहीं उपयोग झाला नाहीं. शेवटीं, पैठण येथें ‘केसरीनाथ’ नामक एक सिद्ध पुरुष होते, त्यांजकडे जाऊन, मुलाचा पत्ता लावण्याविषयीं कृष्णाजीपंतांनीं त्यांस विनंति केली. केसरीनाथ कृष्णाजीपंतांस घेऊन वाळवंटावर गेले व शिवदिनाचें नांव घेऊन त्यांनीं मोठयानें हाक मारिली. त्या क्षणींच शिवदिनस्वामी वाळूंतून वर आले ! आपल्या मुलास पाहून कृष्णाजीपंतांस अत्यानंद झाला. त्यांनीं त्यास केसरीनाथांच्या पायांवर घातलें. नाथांनीं त्यास आपल्याजवळ ठेवून घेतलें व पुढें शके १६२८ सालीं त्याचा व्रतबंध करुन, त्याजवर आपल्या संप्रदायानुसार अनुग्रह केला. एके दिवशीं गोदीतीरीं, शिवदिननाथ हे पार्थिवलिंगार्चन करीत असतां, त्यांच्यावरुन नदीचें पाणी गेलें तरी त्यांनीं आपलें स्थान सोडिलें नाहीं अशी एक आख्यायिका आहे. शिवदिननाथ हे जन्मापासून अत्यंत सात्त्विक व प्रेमळ होते; पुढें केसरीनाथांपासून गुरुपदेश मिळाल्यावर तर ते अगदींच पूर्णत्वास पोंचले. प्रसिद्ध महाराष्ट्र कवि अमृतराय व शिवदिननाथ हे समकालीन असून, रायजींची नाथांचे ठायीं अत्यंत पूज्यबुद्धि असे. वेरुळ येथें शिवदिननाथांचीं कीर्तनें चालू असतां, तेथें जर्जरीबक्ष नामक एक मुसलमान अवलिया होता, तो ती कीर्तनें ऐकण्यास येत असे. शिवदिननाथांचे कवित्व, त्यांची निरुपणशैली व त्यांचा अधिकार पाहून, तो अवलिया फार खूष झाला व आपल्या डोक्यावरची टोपी शिवदिनांच्या मस्तकीं ठेवून, त्यानें त्यांस ‘दीन’ (धर्म) अशी पदवी दिली. यापूर्वी लोक त्यांस ‘शिवनाथ’ म्हणत असत; परंतु यापुढें ते त्यांस ‘शिवदिनाथ’ या नांवानें संबोधूं लागले. त्यावेळी पैठण येथें शहादावल नामक एक अवलिया राहत असत, त्यांचा व शिवदिननाथांचा फार स्नेह असे. त्यांच्या एकांतांत नेहमीं बैठकी होत असत. शिवदिननाथांनीं या अवलियावर ‘वाहवा शहदाबल शहदाबल । पीर जागते आवल ।’ असें एक पद केलें आहे. शिवदिननाथांचा विवाह त्यांच्या बाराव्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचें नांव उमाबाई. ही मोठी पतिव्रता होती. शिवदिननाथांच्या मृत्यूची खोटी बातमी एकदां पैठणभर प्रसिद्ध झाली असतां, या साध्वीनें क्षणैक ध्यानस्थ होऊन सांगितलें कीं, माझें मंगळसूत्र माझ्या गळ्यांत आहे, यावरुन ते सुखरुप असले पाहिजेत. शिवदिनांस गळ्यांत आहे, यावरुन ते सुखरुप असले पाहिजेत. शिवदिनांस दोन पुत्र होते, त्यांनीं आपल्या तीर्थरुपांचांच उपदेश घेतला होता. त्यांचीं नांवें नरहरिनाथ व गदाधरनाथ. नरहरिनाथ व त्यांचे पुत्र लक्ष्मीनाथ हे मोठे अधिकारी पुरुष होते. लक्ष्मीनाथांची समाधि आळंदी येथें केसरीनाथांच्या समाधीजवळ आहे. शिवदिननाथ रुपानें फार सुंदर होते. त्यांचा शिष्यसमुदाय मोठा होता. त्यांपैकी उमाबाई, रमाबाई व मुकुंद यांनीं शिवदिननाथांस पाठविलेलीं पत्रें पैठण येथील मठांत अद्याप आहेत. रमाबाईनें आपले पत्र ओवीवृत्तांत लिहिलें आहे. आमच्या जुन्या साधुसंतांशीं ज्या स्त्रियांचा शिष्यत्वसंबंध जडला, त्या बहुतेक स्त्रियांनीं कविता केला आहे; यावरुन स्त्रीशिक्षणाच्या बाबतींत आमचे प्राचीन सत्पुरुष उदासीन नव्हते, हें स्पष्ट होत आहे. मुक्ताबाई, प्रेमाबाई, जनी, नामदेवाच्या घरच्या स्त्रिया, चोखामेळ्याची पत्नी, अक्का, वेणू व मिराबाई ह्या सगळ्या स्त्रिया उत्तम कवयित्री होत्या. हल्लीं स्त्रीशिक्षण वाढलें आहे म्हणतात, पण जनाबाईच्या अभंगांसारखे प्रासादिक अभंग रचणारी किंवा वेणूबाईच्या ‘निवृत्तिराम’ ग्रंथासारखा सरस ग्रंथ लिहिणारी एकही विदुषी हल्लींच्या शिक्षणानें अद्याप तयार केली नाहीं, हे लक्षांत ठेवण्यासारखें आहे. असो. शिवदिननाथ हे, आमच्या इतर साधुसंतांप्रमाणें, अगदीं नि:स्पृह  व वैराग्यसंपन्न होते; तथापि, त्यांनीं स्वत:च म्हटल्याप्रमाणें, अगदीं नि:स्पृह व वैराग्यसंपन्न होते; तथापि, त्यांनीं स्वत:च म्हटल्याप्रमाणें ‘प्रपंच साधुनि परमार्थाचा लाभ जयानें केला । तो नर भला रे भला’ या कोटींतले ते होते. प्रपंच व परमार्थ या दोन्ही विषयांकडे त्यांचें सारखेंच लक्ष्य होतें. बदोद्याचे दिवाण रावजी बापुजी यांस शिवदिननाथांनीं शके १६५१ या वर्षी उपदेश केला. त्यांना देणग्या व उत्पन्नें बरींच मिळालीं होतीं; त्या सर्वांचें एक संस्थान करुन, त्याचे द्वारें भजन-पूजनाची परंपरा चालू राहील, अशी व्यवस्था त्यांनीं करुन ठेविली आहे. शके १६९६ माघ वद्य १० सोमवार रोजीं त्यांनीं संस्थानपत्र करुन, ते आपल्या वडील मुलाच्या स्वाधीन केलें. हें पत्र बरेंच मोठें असल्यामुळें, त्याची नक्कल येथें दिली नाहीं. या संस्थानपत्रांत पुढील वाक्यें आहेत:-
"आमचे गुरु श्रीकेसरीनाथजी व आमचे गुरुंचें गुरु श्रीउद्बोधनाथजी या उभयतां नाथजींविषयीं तुम्हांस आज्ञा करितों कीं, आपण स्मरणपूर्वक मनन, पठण, निजध्यास हृदयांत धरुन, श्रीउद्बोधनाथजी यांचा उत्सव, महोत्सव, कथा, कीर्तन, भजन-पूजन, चार दिवस आनंद करावा. दुसरे श्रीगुरु केसरीनाथस्वामी आमचे गुरु यांचा उत्सव, महोत्सव, कथा, कीर्तन, भजन-पूजन,ध्यान, मनन,चार दिवस श्रीक्षेत्र आळंदीस जाऊन समारंभ करावा. यांत अंतर पडूं नये हेंच माझें सांगणें आहे. आमचा उत्सव न झाल्यास आपण काळजी करुं नये, परंतु गुरु श्रीगुरुनाथजी यांचे उत्सव आपण संतोष आनंदमय करावे, यांत आम्हांस बहुत संतोष आहे. आपला संस्थांनीं वांटयाचा सांप्रदाय नाहीं. असें माझें सांगणें आहे कीं दोन होऊं नये. दोन झाल्यास त्याजला यश प्राप्त होणार नाहीं. वडिलांनीं पुढें होऊन कथाकीर्तन करावें. सर्व समान असून सर्वांनीं स्वामीचे सेवेंत वडिलांचे आज्ञेनें चालावें. अनुक्रम ऐसा चालवावा ...... प्रपंचास दोन रुपये कमजास्त लागल्यास भिक्षा करावी अगर कर्जवाम सावकाराचें द्यावें." या पत्राच्या खालीं ‘हस्ताक्षर शिवदिन कृष्ण जोशी, संस्थान क्षेत्र प्रतिष्ठान’ अशी सही आहे. हें पत्र करुन दिल्यावर तीनच दिवसांनीं, म्हणजे शके १६९६ माघ वद्य १३ या दिवशीं स्वामी समाधिस्थ झाले. त्या वेळीं त्यांचे वय ७६ वर्षांचें होतें व अशा वयांत, मरणापूर्वी तीन दिवस, इतकें व्यवस्थित संस्थानपत्र तयार करण्यास किती मन:स्वास्थ्याची आवश्यकता आह, याचा विचार वाचकांनींच करावा. वरील उतार्‍यावरुन, शिवदिननाथांची उत्कट गुरुभक्ति जशी स्पष्टपणें दिसून येत आहे, त्याचप्रमाणें त्यांचें व्यवहारज्ञानही उघड उघड दृश्यमान होत आहे. शिवदिननाथांची समाधि पैठण येथें गोदातीरी आहे. याप्रमाणें या सत्पुरुषाचें हें संक्षिप्त चरित्र आहे. शिवदिननाथांच्या गुरुपरंपरेंतील बहुतेक सत्पुरुषांनी थोडीबहुत कविता केला आहे. निवृत्तिनाथ व ज्ञाननाथ (ज्ञानदेव) हे तर महाराष्ट्र कविमंडळांत प्रसिद्धच आहेत. गैबीनाथ व गुप्तनाथ यांचे कांहीं अभंग आढळतात. गुप्तनाथांच्या अभंगांची एक वही डाँ० विल्सन यांच्या संग्रहीं होती, ती हल्लीं मुंबई विश्वविद्यालयाच्या पुस्तकसंग्रहालयांत आहे. ह्या वहींतील एकदोन अभंगांच्या आधारें, मुंबईतील सुबोधपत्रिका पत्राच्या ता० ७ जुलई १९०१ च्या अंकांत एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच अंकांत, पत्रिकाकारांनीं, ‘गुप्त स्वामी कोण?’ या मथळ्याखालीं एक लहानसा लेख लिहून, या कवीसंबंधाची माहिती भारद्वाज, भिंगारकर, अशांसारख्या कोणीं गृहस्थांनीं आपल्याकडे अवश्य पाठवावी, अशी विनंति केली होती, परंतु तिकडे कोणाचेंही लक्ष्य गेल्याचें दिसत नाहीं. असो; या गुप्तस्वामीचे एकदोन अभंग पुढें दिले आहेत:-


सर्व करी देवाधिदेव । त्यासी नेणती मानव ॥१॥
वाहती देह अभिमान । देव सर्व कांहीं जाणें ॥२॥
अहंपणें आतां । देव न दिसे सर्वथा ॥३॥
अहंकर्ता जो मी म्हणे । तेणें केली आपुली हानी ॥४॥
चाले देवासी भिऊन । गुप्त म्हणे तोचि धन्य ॥५॥


माता पिता त्राता अरि पुत्र भ्राता । गुरुवीण आतां नाहीं दुजा ॥१॥
पशुपक्षी याती गुरुरुप भासती । ऐसी ज्याची स्थिती तोचि जाणें ॥२॥
वृक्षवल्ली पाही अणुरेणु तेही । गुरुविण नाहीं रितें कोठें ॥३॥
ऐसा गुरुराज भज पूर्ण व्यापक । गुप्त बोले रंक राज सम ॥४॥

गुप्तनाथांचे शिष्य उद्बोधनाथ यांचीं कांहीं पदें व अभंग आढळतात; त्यांपैकीं तीन अभंग पुढें दिले आहेत:-


काय उतराई पाया । होऊं तुझ्या गुरुराया ॥१॥
नित्य नूतन विठठलवीर । केला डोळियां गोचर ॥२॥
साध्य साधनें नातुडे । तया केलें मागें पुढें ॥३॥
चौंस आठरां कानडें । तेंण त्वां दाविलें ऊघडें ॥४॥
म्हणे उद्बोध सर्वदां । नाहीं उत्तीर्णता कदा ॥५॥
स्वर्ग मृत्यु आला वाटे येतां जातां । परि नाही गुंता कांहीं येथें ॥१॥
जेथें तूं अससी तेथें मी येईन । स्वरुप पाहिन याचि डोळां ॥२॥
न करिं ध्यान मी सिद्ध तूं असतां । न धरीं सर्वथा दुरस्ता ते ॥३॥
दुरी मी न जाय तुज जाऊं नेदीं । उद्बोध गोविंदी लीन पायीं ॥४॥


दृष्टि पुंजाळली निजरुपीं बैसली । पाहतां पाहतां परतली ठायींच मुराली ॥१॥
दृश्य लया गेलें देखणें पारुषलें । दर्शन ठसावलें तन्मय झालें ॥२॥
जालें म्हणतां नये आटली मनाची सोये । कोण कोणासि पाहे रे सहज आहे रे ॥३॥
उद्बोधनाथकृपें नसतें हें हारपे । दाविलें निजप्रतापें या केसरीसी ॥४॥

हा शेवटचा अभंग, उद्बोधनाथांचे शिष्य व शिवदिनस्वामींचे गुरु केसरीनाथ यांचा आहे. केसरीनाथांचीं कांहीं पदें व सिद्धांतसार या नांवाचा ग्रंथ इतकी कविता उपलब्ध आहे. शिवदिन स्वामींची बरीच कविता पैठण येथें त्यांच्या वंशजांच्या संग्रहीं आहे; त्यांत सुमारें ५०० पदें व शके १६९२ मध्यें लिहिलेला ज्ञानप्रदीप नामक २१ अध्यायांचा ओवीबद्ध ग्रंथ, इतकी कविता अप्रकाशित आहे. एकंदरींत, शिवदिन केसरी व त्यांच्या गुरुशिष्यपरंपरेंतील इतर साधु यांची बहुतेक कविता अद्याप अप्रकाशित असून, ती प्रकाशांत आणण्याचें जर कोणी सज्जन मनावर घेईल, तर महाराष्ट्रावर त्याचे मोठे उपकार होतील. शिवदिनस्वामींचीं ‘माझी देवपुजा, देवपुजा’ ‘सद्गुरुमार्तंडा, मार्तंडा’ ‘भाव धरा रे । आपुलासा देव करा रे !’ इत्यादि पदें ज्यांनीं ऐकलीं असतील त्यांस त्यांच्या कवितेच्या योग्यतेसंबंधानें विशेष कांहीं सांगितलें पाहिजे, असें नाहीं. रा० पांगारकर यांच्या भाषेंत बोलावयाचें म्हटल्यास ‘मराठी भाषेंतला पदसंग्रह म्हणजे अनुभवी साधूंचे सहजोद्गार आहेत, त्यांची किंमत करतां येणार नाहीं;’ व शिवदिननाथ यांची बहुतेक कविता याच मासल्याची आहे. शके १६४४ पासून १६४८ पर्यंत शिवदिननाथांनीं तीर्थयात्रेसाठीं सगळया हिंदुस्थानभर प्रवास केला. त्यांनीं कित्येक पदें जगदंबा, गणपति, मारुती, खंडोबा, विठ्ठल, दत्त, भैरवनाथ इत्यादि देवांवर केलीं आहेत. शिवदिननाथांची पदें अत्यंत प्रासादिक, तेजस्वी आणि ठसकेदार अशीं आहेत. शिवदिनाथ हे पार्थिवपूजा करणारे शिवभक्तपरंपरेचे होते. प्रसिद्ध कविवर्य अमृतराय यांच्या संगतीमुळें, शिवदिननाथांनीं कटावांच्या धर्तीवर कांहीं कावती केली आहे. पंढरीच्या विठ्ठलावरील त्यांचे अभंग फार साधे आणि गोड आहेत. पैठण हें क्षेत्र आमच्या साधुसंतांची प्रसवभूमि होय. ज्ञानदेवांनीं रेडयाकडून वेद म्हणविले ते पैठण येथेंच; एकनाथस्वामींचें वास्तव्यस्थान पैठणच होय; कृष्णदासमुद्गल हा कवि पैठण येथेंच होऊन गेला; रंगनाथ मोगरेकरांनीं याच ठिकाणीं वास्तव्य केलें; श्रीमत् कृष्णदयार्णव, त्यांचे गुरु गोविंद व शिष्य उत्तमश्लोक हे सगळे पैठणचेच रहिवासी. शिवदिननाथ व त्यांच्या शिष्यपरंपरेंतील सत्पुरुष पैठण येथेंच वास करुन समाधिस्थ झाले; मुक्तेश्वर आणि त्यांचे तीर्थरुप चिंतामणि ऊर्फ विश्वंभरस्वामी यांच्या आयुष्याचा बहुतेक भाग पैठणांतच गेला; शहादावल नामक मुसलमान सत्पुरुष पैठण येथेंच राहत असत; अमृतरायांनीं पैठण येथें बरेच दिवस वास्तव्य केलें होतें असें दिसतें व थोडया वर्षापूर्वीं समाधिस्थ झालेले अनंतनाथस्वामी यांनींही आपलें अवतारकार्य पैठणांतच केलें । याशिवाय, ह्या सगळ्या सत्पुरुषांच्या गुरुशिष्यपरंपरेंतील किती तरी सत्पुरुष पैठण येथेंच होऊन गेले आहेत, ही गोष्ट लक्ष्यांत घेतली म्हणजे सत्पुरुषनिर्माणाच्या बाबतींत पंढरपुराच्या खालोखाल पैठणासच महत्त्व द्यावें लागतें. अस्तु.
महाराष्ट्र कविवर्य मोरोपंत हे पैठणास गेले होते, त्या वेळीं त्यांची व शिवदिननाथांची भेट झाली होती, असें प्रस्तुत लेखाच्या आरंभी दिलेल्या सन्मणिमालेंतील आर्येवरुन दिसतें. त्या आर्येत, ‘दिनकर’ हें पद केवळ यमकपूर्तीसाठी पंतांनीं घातलें असावें असें आरंभी वाटतें, पण शिवदिननाथांचे पुत्र नरहरिनाथ यांनीं केलेल्या आरतीतला ‘दिव्य मूर्ति अति सुंदर पाहतां थक्कित असरादि’ हा चरण पाहिला म्हणजे ‘दिनकर’ हे पद पंतांनीं शिवदिननाथांची तेजस्विता व्यक्त करण्यासाठी मुद्दाम घातलें आहे, हें उघड होतें. शिवदिनकेसरीचें दर्शन घेणारा मनुष्य त्यांच्या ईश्वरनिष्ठाजन्य दिव्यकांतीनें थक्क होऊन जाई व हा स्वानुभव व्यक्त करण्यासाठीच पंतांनीं ‘दिनकर’ शब्दाची योजना करुन शिवदिननाथ हे सूर्यासारखे तेजस्वी होते, असें ध्वनित केलें आहे. सदर आर्येच्या उत्तरार्धात शिवदिन हे शिवभक्त असून, ‘शिवदिनीं’ (शिवरात्रीस) समाधिस्थ झाले म्हणून त्यांना शिवदिनाची उपमा पंतांनीं दिली आहे, हें चाणाक्ष वाचकांच्या लक्ष्यांत आलेंच असेल. एकंदरीत यां एका आर्येत, शिवदिननाथांचें संक्षिप्त चरित्रच पंतांनी सांगितलें आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. शिवदिनकेसरींची कांही निवडक पदें येथें देऊन हें चरित्र पूर्ण करितों:-

पदें

बाळ करी अन्याय । त्यासी माता मारी काय ! ।
तैसें माझें सर्व साहे । जाण सद्गुरुराया ॥१॥
राजपुत्र अन्यायी । त्याचा न्याय कोणे ठायीं ? ।
तैसा मी तुझे पायीं । जाण सद्गुरुराया ॥२॥
चंद्रीं कळंक नव्हाळी । तरी बैसे रुद्रभाळीं ।
तैसें मजलागुनी पाळी । जाण सद्गुरुराया ॥३॥
दासी जाली रावराणी । फिरुन वाहे काय पाणी ? ।
तैसा मीही तुझे ध्यानीं । जाण सद्गुरुराया ॥४॥

पद २. (जगदंबेचें).
व्यास वाणी गीर्वाणीं तुज वाणी । प्राकृत भाषा वर्णन वाणी ।
काय भवानी ॥ध्रु०॥
हे जगदंबे विश्वकदंबे । निरावलंबे । तूं शिवसांबे । मज अविलंबे ।
धांव पाव निर्वाणी ॥१॥
कृपाकटाक्षे सर्वहि साक्षे । अलक्षपक्षे । प्रताप दक्षे । मज संरक्षे ।
पुण्यभाग्य परवाणी ॥२॥
केसरिनाथे तुर्य समर्थे । तूं परमार्थे । शिवदिनाथें । स्वहितसार्थे ।
जागृत कीं शर्वाणी ॥३॥


विठठल गाइलाचि गाऊं । विठठल पाहिलाचि पाहूं ॥ध्रु०॥
सत्रावी भिवरेच्या तीरीं पंढरपुरासि जाऊं ।
चंद्रभागे स्नान करुनी मुक्तिपताका लावूं ॥१॥
मृदंग वीणा टाळघोळ संतसमागमिं बाहूं ।
प्रदक्षिणेसि नाचत कीर्तनिं नेमनिष्ठ राहूं ॥२॥
जीवजंतु पंढरिचे वतनी विठठलरुप भावूं ।
स्वहितशिक्षित वचनें त्यांचीं अनाक्रोश साहूं ॥३॥
वेणूनादीं संतत काला केसरि गुरुचा खाऊं ।
शिवदिन गरुडपारीं प्रसाद हरिदासाचा लाहूं ॥४॥


भाव धरा रे । आपुलासा देव करा रे ॥ध्रु०॥
कोणी कांहि म्हणो यासाठीं । बळकट प्रेम असावें गांठीं ।
निंदास्तुतिवर लावुनि काठी । मी तूं हरा रे ॥आपुलासा० ॥१॥
सकाम साधन सर्वहि सांडा । निष्कामें मुळ भजनिं भांडा ।
नाना कुतर्क वृत्तिसि दवडा । आलि जरा रे ॥आपुलासा०॥३॥
केसरिनाथ गुरुचे पायीं । सृष्टी आजि बुडालि पाही ।
शिवदिनिं निश्चय दुसरा नाहीं । भक्त खरा रे ॥आपुलासा०॥३॥


आतां मी नाहीं । मी नाहीं । नरहरिवांचुनि कांही ॥ध्रु०॥
विकल्प अवघा सरला । दोहीं डोळां नरहरि भरला ॥१॥
अनुभव पाउल वाटे । जिविंचें जीवन नरहरि भेटे ॥२॥
सच्चिद्धनरुप सारा । नरहरिविरहित काय पसारा ॥३॥
विसरुनि साधन क्षुद्रा । ल्यालों सबाह्य नरहरिमुद्रा ॥४॥
शिवदिन-जिवपण गेलें । केसरि गुरुनें नरहरि केलें ॥५॥


माझी देवपुजा देवपुजा । पायें तुझे गुरुराजा ॥ध्रु०॥
गुरुचरणाची माती । तेच माझी भागीरथी ॥१॥
गुरुचरणाचा बिंदु । तोचि माझा क्षीरसिंधु ॥२॥
गुरुचरणांचें ध्यान । तेंचि माझें संध्यास्नान ॥३॥
शिवदिन केसरिपायीं । सद्गुरुवांचुनि दैवत नाहीं ॥४॥


निष्ठाभावें व्यापक सकळांतर्यामीं ।
तरती पापी ज्याच्या पावन निजनामीं ।
घ्यातां चित्तीं चिंतन उन्मन सुखसिंधु ।
तो हा वंदा ज्ञानेश्वर गुरु दिनबंधु ॥१॥
योगीयांचा मुकुटमणि जो अविनाशी ।
लक्षी लक्षातीतचि जडली नयनासी ।
कृपादृष्टी वारित जन्ममरणबंधु ।
तो हा वंदा ज्ञानेश्वर गुरु दिनबंधु ॥२॥
सत्ता साक्षी लीला कौतुक करि नाना ।
सोज्वळ साधु विष्णु अवतारचि माना ।
वदला म्हैसा वेदऋचेचा उद्बोधु ।
तो हा वंदा० ॥३॥
जागृत केली प्राकृत गीता गुढ अर्थी ।
वाची नेमें तो न पडे विघ्न अनर्थी ।
बोली भींती चालवि जड देह समंधु ।
तो हा वंदा० ॥४॥
अर्ध मात्रा इंद्रायणि तट सुरगंगा ।
सिद्धातांच्या सिद्धेश्वर शिवनिजलिंगा ।
अद्वैताचे अळंकार क्षेत्र निबंधु ॥
तो हा वंदा० ॥५॥

निवृत्तीच मुळें जो विश्वरुपि नटला ।
ज्याच्या बोधें नाना संशय भ्रम फिटला ।
डोळस डोळा सर्वहि जाला जिव अंधु ॥
तो हा वंदा) ॥६॥
अजान दंड फुटला ऊर्ध्व पक्षि वृक्ष ।
शांति सन्मुख बाह्यांतरिं दक्ष ।
दर्शन दृष्टि यात्रा प्रेमभरें धुंधु ।
तो हा वंदा० ॥८॥
वेदाक्षर हा मंत्र अनुष्ठित निजभक्ति ।
ज्ञानीयांच्या तो नर बसला निजपंक्ती ।
संचित क्रियमाणाचें खोडित प्रारब्धु ।
तो हा वंदा० ॥९॥
अर्थे स्वार्थे वदनीं दशक स्तोत्र पढा ।
यशप्रतापें उत्तम कीर्तीलागिं चढा ।
शिवदिनासि पूर्ण सदा केसरी लब्धु ।
तो हा वंदा० ॥१०॥

ह्या पदावरुन, आळंदीचेच ज्ञानदेव ज्ञानेश्वरीचे कर्ते होत, या गोष्टीस आणखी एका सत्पुरुषाची साक्ष मिळून, कै. भिंगारकरबुवांच्या लेखास बळकटी येत आहे.

अभंग नरहरिनाथांचे

गुरुरायें बरवें केलें । माझें मीपण हरुनी नेलें ॥१॥
काय सांगूं आतां बाई । सांगायाची सोय नाहीं ॥२॥
ठेवितांचि माथां हात । षड्रिपूंचा झाला घात ॥३॥
दिठी मुरडोनी दावितां । जाली मनासि उन्मनता ॥४॥
सहन करितां अवलोकन । गेलें तुटोनी बंधन ॥५॥
शिवनाथें धरितां करी । तेव्हां जाला नरहरी ॥६॥


जित असतां मारिलें । मेलियासी जित केलें ॥१॥
मोठें कौतुक सद्गुरु आई । तुझें, वाचे बोलुं मि कायी ॥२॥
रात्रीं सूर्याचा प्रकाश । दिवसा चंद्रतारा भास ॥३॥
आकाशाचें फोडुनि पोट । त्यांत दाविलें निघोट ॥
मेघावांचुनि पाणी वर्षे । पीक अचाट नयनीं दिसे ॥५॥
शिवकेसरी न करी काय ? । नराचा हा हरि होय ॥६॥

नरहरिनाथ हे शिवदिनकेसरींचे पुत्र होत; त्यांची कविताही त्यांच्या परंपरेंतील इतर सत्पुरुषांच्या कवितेप्रमाणेंच प्रासादिक आणि स्वानुभवयुक्त अशी आहे. नरहरिनाथांनीं पुढील पदांत शिवदिननाथांचें वर्णन केलें आहे: -

‘सीमा ज्याच्या स्वरुपाची हो न कळे कोणासी ।
शिणले चौ सा अठरा नेणों करितां स्तवनासी ।
सिद्धांचा कीं परमगुरु हा तारक अविनाशी ।
शिक्षा करुनी दुष्ट जगाला लावी भजनासी ॥१॥
‘शिवदिन शिवदिन’ चतुराक्षरि मंत्र जपतां हा भावें ।
आसनमुद्रेवीण सहज तारिल स्वभावें ॥ध्रु०॥
वसला सर्वां ठायीं जो कीं आपण स्वयमेव ।
वणवण चुकवी चौर्‍यांशींची देउनि अनुभव ।
वत्सल पुरता भक्तजनांचा हा सद्गुरुराव ।
वदला नाना श्लोकादिक बहुत अपूर्व ॥२॥
दिसतो प्रकट पाहतो कीं, पिंडीचा संधी ।
दिवा रात्री नाहिं जयाला नित्य नवा आदि ।
दिव्यमूर्ति अतिसुंदर पाहतां थकित अमरादि ।
दिठीस मुरडुनि लक्षुनि घे अरे तूं हृदयीं ॥३॥
नयनिं दाखवि .... सध्यां अकळ कळा खूण ।
न दिसे कांहीं त्याविण मजला द्वैताचें भान ।
नग कनकाचे होती जैसे तैसें जग जाण ।
नरहरि अखंड निशिदिनिं ध्याई शिवदिन ॥४॥

शिवदिननाथ यांस मराठीप्रमाणेंच हिंदी भाषेचेंही चांगलें ज्ञान होतें. त्यांचें एक हिंदी पद पुढें दिलें आहे: -
तो मैं गुरुका पूत कहाऊं । मान गुमान बहाऊं ॥ध्र०॥
तोरुं बंद पाखंड करमके । विवेक मान चढाऊं ॥१॥
कामक्रोधकूं ठारहि करके । भाव भगतिकुं बढाऊं ॥२॥
दु:खाकर भवसागर .....। जननमरणकुं भगाऊं ॥३॥
जग सब ब्रह्म यही परचितकी । सहज समाधि लगाऊं ॥४॥
गाऊं नाम रिझाऊं दिलकूं ।... की बात छिपाऊं ॥५॥
शिवदिनप्रभु केसरिसाहेब । मंगल दर्शन पाऊं ॥६॥

शिवदिन केसरी यांचें ‘सामराज’ नांवाच्या सत्पुरुषावर एक पद आहे. हे सामराज ‘रुक्मिणीहरण’ काव्याचे कर्ते असावे असें वाटतें. शिवदिनकेसरीचे गुरुबंधु मालोनाथ हेही मोठे साक्षात्कारी पुरुष होते; त्यांचीं एकदोन पदें येथें देतों; म्हणजे शिवदिन केसरीच्या संप्रदायपरंपरंतील बहुतेक सगळ्या सत्पुरुषांच्या कवितेशी वाचकांची ओळख करुन दिल्यासारखें होईल.

राखीं माझी लाज । सखया । राखीं माझी लाज ॥ध्रु०॥
मी तों तुझें शरणागत स्वामी । तूं तंव गरिब नवाज ॥१॥
या समयीं मज पाव दयानिधि । सांडुनि सर्वहि काज ॥२॥
मालो म्हणे अभय कर देई । केसरि जी महाराज ॥३॥

आरती केसरीनाथांची.
ओवाळा ओवाळा भावें केसरी राणा ।
सर्वांगें डोळस मूर्ति सर्व देखणा ॥ध्रु०॥
सुनीळ आकृती मनोहर गगनाचा गाभा ।
शून्य सिंहासनीं प्रगट दिसतसे उभा ॥१॥
कोंदला प्रकाश दाही दिशा उजळल्या ।
कोटी विद्युल्लता ज्याचे नखीं शोभल्या ॥२॥
विश्वंभर करुणासुखसागर जीवन सकळांचा ।
पिंड ब्रह्मांडाचा चाळक स्वामी मालोचा ॥३॥

आरती-सांप्रदायिक पुरुषांची .
आरती आदिनाथा महाराज समर्था ।
तूंचि तूं एक अंश सर्व विश्वंभरिता ॥ध्रु०॥
मत्स्येंद्र बाळ तूझा गुरुराज योग्यांचा ।
कारूण्य कामधेनु वत्स गोरक्ष जीचा ॥
पीयूष पीउनियां रसें भरली वाचा ।
तेथेंचि समरसला नाथ गैनी दैवाचा ॥१॥
आनंदसागरासी महापूर लोटला ।
निवृत्ति राजयोगी अष्टांगीं निवाला ॥
शांति अरुणतेजें ज्ञान उदयो झाला ।
ज्ञानार्क उगवतां विश्वब्रह्म धवळला ॥२॥
किरण प्रगटले दशदिशा व्यापुनी ।
सत्यासी सत्यवादी मोह अंध निरसुनी ॥
लीला विचित्र कैसी गैबीरुप धरुनी ॥
गुप्तां प्रकटविलें निजसुखनयनीं ॥३॥
पाहतां पाहतांचि लक्ष उद्‍बोधावरी ।
चैतन्य शुद्धज्योति उद्भवली अंतरीं ॥
प्रभेसी पार नाहीं उजळले केसरी ।
मंगळ गीत-वाद्यें अनुहात गजरीं ॥४॥
नवलक्ष आरती हे सांगूं कवणा काई ।
मन हें उन्मन जालें बुद्धि ठाइंच्या ठाई ॥
संकल्प हारपोनी गेला देहिंचा देहीं ।
केसरीनाथ योगें मालो शोभतो पायीं ॥५॥

शिवदिनकेसरींच्या संप्रदायांतील पुरुषांची उपलब्ध असलेली कविता थोडी आहे, पण तिच्यावरुन त्या पुरुषांच्या वाणीची तेजविस्ता, तिचें पारमार्थिक महत्त्व व तिच्यांतील ईश्वरी प्रसाद हे गुण इतक्या उत्कटत्वानें दृश्यमान होतात कीं, त्यांवरुन हे सगळे कवि मोठे महात्मे असले पाहिजेत, असें वाटल्यावांचून रहात नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP