जयराम नाना

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


अहमदनगर येथे बावळे देशमुख या घराण्यांत जयरामनाना या नांवाचे सत्पुरुष शके १७७० या वर्षी होऊन गेले. हे शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण होते. यांच्या आजाचे नांव योगीराज व आजीचे नांव तुळजाबाई. जयरामनानाच्या वडिलाचे नांव अनंत व मातुश्रीचे नांव मुक्ताबाई. या कुटुंबाचा उदरनिर्वाह कुळकर्णी वतनांतील कांही भाग व कांही इनाम जमिनी यांवर होत असे. अनंत यांची दिनचर्या म्हणजे नित्यनैमित्तिक स्नानसंध्यादि कर्मे सारुन दोन प्रहरी गीता भागवत यांचे वाचन, सायंकाळी देवदर्शन व उरलेल्या वेळांत अखंड नामस्मरण या प्रकारची असे. श्रीहरीचे चिंतनावांचून इतर प्रांपचिक काळजीमुळे स्वत:चा चित्तविक्षेप अनंताने कधी होऊ दिला नाही. हरिनामाच्या निदिध्यासामुळे पुढे पु्ढे ते इतके तद्रुप होऊं लागले की प्रपंचाची जवळ जवळ त्यांस विस्मृतीच पडल्यासारखी झाली. त्याची पत्नी मुक्ताबाई ही मोठी पतिव्रता स्त्री होती. ती पतिसेवेत निरंतर दक्ष असे. घरची राहणी अगदी साधी असतांही, आपल्या साधुशील वृत्तीमुळे हे दांपत्य खरोखरीच्या स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेत होते.
’ शुद्धबीजापोटी । फ़ळे रसाळ गोमटी ’ या न्यायाने मुक्ताबाईचे उदरी नारयण व जयराम अशी दोन पुत्ररत्ने निपजली. भगवद्भक्तिपरायण मात्यापित्यांच्या तालमीत त्यांची प्रवृत्ति भक्तिमार्गाकडे सहजच वळली. आईबापांचा प्रत्यक्ष धडा नेहमी समोर असल्यामुळे, भक्ति, वैराग्य, ज्ञान वगैरे गहन विषयांचे अध्यापन या दोन बालकांस रोजचे वागणुकीचे व्यवहारांत अनायासे होत असे. दरिद्रावस्थेत जन्म झाल्यामुळे खाणे पिणे, वस्त्रप्रावरणे, दागदागिने इत्यादी विषयांकडून त्यांची मने निसर्गत:च परावृत्त होऊन, भक्ति, वैराग्य, ज्ञान या विषयांतच त्यांच्या मनाचा अधिकाधिक विश्वास होत गेला.
वर सांगितल्याप्रमाणे अनंत व मुक्ताबाई यांची राहणी फ़ारच साधी असल्यामुळे नारायण व जयराम यांसही तेच वळण लागले व त्यांची बाळपणची क्रीडा पाहून नागरिक लोकांस अनंताचे प्रपंचाचे मोठे कौतुक वाटत असे; व जसजशी ही दोन भांवडे वयाने मोठी होत चालली तशीतशी शहरांतील तद्‍ज्ञातीय लोकांना, आपल्या मुली त्यांना देऊन आपले गोत्रज सत्पुरुषसेवेने पवित्र करावेत. अशी इच्छा होऊ लागली. पुढे लवकरच, विशेष प्रयास न पडतां नारायण व जयराम यांची लग्ने झाली. काही दिवसांनी मुक्ताबाईस एकाएकी देवज्ञा झाली व त्यानंतर थोडयाच दिवसांनी अनंतरावजीनीही आपली इहलोकची यात्रा संपविली. नारायण व जयराम यांना मात्यापित्यांचे सेवेचा ध्यास अखंड असल्यामुळे, त्यांच्या चिरवियोगदु:खाने त्यांच्या मनास मोठा धक्का बसला; व जागाच्या नाशवंतपणाचा अनुभव येऊन त्यांचे वैराग्य अधिकच दृढ झाले. जयराम यांनी असा विचार केला की, नारायण हा आपला वडील बंधु आहे, तो प्रपंचाचा गाडा हांकीतच आहे. रात्रंदिवस ज्या मातापित्याची सेवा आपण करीत होतो, ती एकाएकी आपणास प्रपंचसागरांत लोटून गेली ; आता घरांत रिकामे बसून काय करावयाचे ? असा विचार करुन, अहमदनगर शहराचे पश्चिम दिशेला शहरापासून एक मैलावर श्रीमारुतीचे भव्य मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन श्रीमद्भागवत व गीता यांचा अर्थ समजून घेण्यांत जयरामनाना आपला काळ घालवूं लागले. अशा रीतीन एकांतांत कालक्रमणा करीत असतां, एके दिवशी एक बैरागी तेथे आला. त्याचे आचरण पाहून जयराम यांस फ़ारच चमत्कार वाटला. या बैराग्यास जारणमारण विद्या अवगत होती. त्याने केलेले त्या विद्येचे चमत्कार पाहून, ती विद्या शिकण्याची इच्छा जयराम यांस झाली व त्या बैराग्याकडून जारणमारण विद्येचे मंत्र घेऊन त्याप्रमाणे ते पाठ करुं लागले. ह्या विद्येच्या योगाने त्यांचे वैराग्य अधिकच पक्क दशेस येऊ लागले. लोकांत बसणे, खाणे पिणे यांजकडे मन न जाऊं देण्याची व एकांतांत बसण्याची त्यांस आपोआप सवय झाली. त्या बैराग्याबरोबर प्रवास करीत असतां जयरमनानांनी अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली. जांता जांता, संगमनेर शहरी त्यांचा मुक्काम झाला. तेथे विठ्ठल महाराज या नांवाचे एक महान सत्पुरुष वास करीत असत. त्यांच्या दर्शनाचा योग जयरामनानास आकस्मिक रीतीने घडून आलाअ. साधुशील मातापित्याचे वळण या जारणमारण विद्येच्या व्यासंगाने थोडेसे कमी होत चाल्ले होते, ते या विठ्ठल महाराजांचे दर्शन होतांच पुन: पूर्वस्थितीवर आले. जारणमारण विद्येच्या साधनांत गढून गेल्यामुळे कपाळी शेंदूर, हातांत वेताची छडी, मनगटास लिंबे, गळ्यात ताईत, केस वाढलेले असे आक्राळविक्राळ स्वरुप जयरामनानास प्राप्त झाले होते. अशा स्थितीत विठ्ठलमहाराजांसारख्या सत्पुरुषाचे दर्शन होतांच त्यांनी ते चमत्कारिक स्वरुप विशेष बारकाईने निरखून पाहिले व ते पाहत असतांना जयराम यांच्या चित्ताची चमत्कारिक स्थिति होऊन गेली. हा कोणा तरी सत्पुरुषाचा मुलगा असून, जारणमारण विद्येच्या नादी लागल्यामुळे त्याच्या देहाचे मातेरे होत आहे, ही गोष्ट विठ्ठल्महाराजांनी तात्काळ ताडली. त्यांनी जयरामास ’ तूं कोठून आलास ? ’ असा प्रश्न विचारला. परंतु जयरामास कांही उत्तर सुचेना. त्यांनी " आपल्या पायापाशी राहून सेवा करावी " एवढीच इच्छा व्यक्त केली. पुढे जयरामनाना महाराजांची सेवा करीत असतां, त्यांची एकाग्रता, उत्कट बुद्धि, कर्तव्यतत्परता इत्यादी गुण महाराजांच्या निदर्शनास आले. एके समयी जयराम नाना सेवेत मग्न असतांना विठ्ठ्ल महाराजांनी त्यांस हाक मारली, व ’ तूं आलास कोठून ? तुला जावयाचे कोठे ? तूं येथे कां आलास ? ’ इत्यादि प्रश्न विचारले. तेव्हा जयरामनानांनी आपला सविस्तर वृत्तांत त्यांस निवेदन केला. तो ऐकून महाराज म्हणाले " अरे, तूं चांगला ब्राह्मणकुलांत जन्म घेतलास व श्रीगायत्रीचा मंत्र तुला येत असतां तो सोडून या वेड्यावांकड्या जारणमारणादि मंत्राचे पठण करतोस तेव्हा या दुर्देवास काय म्हणावे ? अत:पर तरी हा नाद तूं सोडून दे व आपल्या घरी जाऊन श्रीहरीचे अखंड नामस्मरण करीत रहा. "
विठ्ठलमहाराजांच्या सानिध्याने जयरामनानाचे बुद्धिमालिन्य नाहीसें होऊन पूर्ण सात्विक बुद्धिचा उदय झाला होता, त्यांत  महाराजांनी स्वत: उपदेश केल्यावर, त्यांचे चित्त ठिकाणावर येण्यास विलंब लागला नाही. एतद्विषयक स्वानुभव त्यांनी एका अभंगात वर्णिला आहे तो अभंग असा :-
जो जो करुं जावा संग । तो तो होतो मनोभंग ॥
विषय नामाची संगती । पदोपदी ही फ़जिती ॥
तळमळ चिंता गाढी । चित्ती संशयाची आढी ॥
जयराम उपजला । विठ्ठल गुरु सखा केला ॥
जयरामनानाची गुरुपरंपरा येणेप्रमाणे :-
अभंग
चैतन्य संप्रदाय परंपरा हंस । केला उपदेश ब्रह्मयासी ॥
आदि नारायण ब्रह्म अत्री दत्त । जनार्दन एकनाथ नरहरी ॥
कमळाकर बल्लाळ राम हा बल्लाळ । जयराम विठ्ठल उपदेशिला ॥
पुन: विठ्ठलाचा दास जयराम । परंपरा वर्म ऐसे आहे ॥
श्रीविठ्ठल महाराजांनी जयरामनानावर कृपा करुन त्यांस आपल्या जन्मभूमीस जाण्याची आज्ञा दिली. परंतु श्रीगुरुसेवेत अंतराय होईल व त्यांचे सहवासांत दिवस ज्या आनंदात गेले, तो आनंद घरी गेल्यावर आपणास प्राप्त होणार नाही, याबद्दल जयरामनानास वाईट वाटले. जयरामास आपण घरी जाण्यास सांगितले असतांही तो जात नाही, हा त्याचा निग्रह पाहून विठ्ठल महाराजांस समाधान वाटले. मग ते त्यांस म्हणाले " बा जयरामा, तुझे लग्न झाले आहे. तरी अशा उदासीन वृत्तीने न राहता घरी जाऊन प्रपंच व परमार्थ दोन्ही साध. माझा तुला ध्यास लागला आहे, हे मी जाणून आहे. परंतु मी जरी दूर असलो तरी तुझी विस्मृति मला कधी होणार नाही. " इतके झाल्यावर श्रीगुरुंचा निरोप घेऊन, जयरामनाना नगरास येण्यास निघाले. घरी आल्यावर वडील बंधु नारायण यांचे सहवासांत, परमार्थसंपादनाकडे आपल्या आयुष्याचा व्यय ते करु लागले. श्रीमद्भागवतगीता, रामायण यांचे वाचन व सांयकाळी प्रेमळ हरिभजन, असा त्यांचा नित्यक्रम असे. त्यांचे प्रेमळ भजन ऐकून कांही नागरिकही भजनास येऊं लागले.
जयरामनानाचे घरी श्रीगोविंदनामस्मरण फ़ारच प्रेमाने होत असे. दर एकादशीस श्रीगोविंदाचा नामसोहळा अहोरात्र होऊन श्रीद्वादशीचा पर्वकाळ मोठ्याच समारंभाने साजरा होई. साध्या भाजी भाकरीचा प्रसाद मिळविण्याकरितां मुमुक्षु जनांच्या उड्या पडत. भोजनाचे वेळी खालील श्लोक म्हणण्याचा संप्रदाय असे :-
उपासनेला दृढ चालवावे । भूदेव संतांसि सदा नमावे ॥
सत्कर्मयोगे वय घालवावे । सर्वा मुखी मंगल बोलवावे ॥
श्रीराम जयराम जयजयराम हरि विठ्ठल ।
सत्संगतीचा महिमा कळेना । सत्संग कोठे श्रमल्या मिळेना ॥
सत्संगतीने तुटली कुबुद्धि । सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी ॥
मी हीन सर्वापरि रामचंद्रा । दयाळ तूं रे करुणासमुद्रा ॥
माझे बरे वाइट सर्व कोटी । अपराध सारे हरि घाल पोटी ॥
पादांबुजा नमन मी करितो दयाळा । तारील कोण मजला दिनबंधु बाळा ॥
संसारदु:ख समुळे हरि या प्रसंगा । धावोनिया करि धरी मज पांडुरंगा ॥
तुजवांचुनि कोण असे मजला ।  शरणागत लाज तुझी तुजला ॥
पडिलो भ्रमणी करि पूर्ण दये । हरि ये हरि ये हरि लौकर ये ॥
श्लोक म्हणून झाल्यावर ’ गोविंद ’ या नामामृताच्या योगाने भोजनाची रुची वाढून चित्ताला एक प्रकारचा अपूर्व आनंद वाटत असे.
दर वर्षी श्रीरामजन्मोत्सव, श्रीहनुमानजयंती व श्रीदत्तजयंतीचा सात दिवस नामसप्ताह मोठ्या कडाक्याने होत असे. श्रीदत्तजयंतीच्या नामसप्ताहास प्रारंभ मार्गशुद्ध ९ रोजी प्रात:काळी होऊन शुद्ध १३ रोजी दोन प्रहरी, रात्रौ, श्रीच्या जन्मकाळी फ़ारच प्रेक्षणीय सोहळा होत असे; व वद्य प्रतिपदेस श्रीच्या नामसप्ताहाची समाप्ति उष:काली होऊन श्रीस सहस्त्रभोजनाचा नैवेद्य समर्पिला जात असे. देशोदेशीचे वैष्णवजन व भाविक बाळगोपाळ या उसत्वास येऊन तो फ़ारच प्रेमाने साजरा करीत. " जयरामाचे घरी उत्पन्न कांही नाही व खर्च तर अतोनात होतो ; रोज पंक्तिला शेकडो बाळगोपाळ जेवतात, " याबद्दल गांवांतील शेटसावकार, नोकरचाकर वगैरे लोकांना मोठा अचंबा वाटे. पुढे गृहस्थ जयरामनानाचे शिष्य झाले, त्यांत जटाशंकर, जयराम, माधवराव पारनाईक, विठोबा तात्या ही मंडळी होती. त्या प्रत्येकाने एकेक काम पतकरले. जटाशंकर यांनी भोजनाची सर्व सिद्धता करावी. जयराम यांनी सर्व सामग्री तयार करावी. माधवराव व विठोबातात्या यांनी सर्वास पोटभर भोजन घालावे. याप्रमाणे जयरामनानाचे घरी भजनाचा व भोजनाचा थाट फ़ार वर्णनीय होत असे.
जयरामनानाची भार्या रेणुकाबाई ही फ़ार मायाळु व कष्टाळु बाई होती. ती अखंड पतिसेवेत निमग्न असून अतिथि अभ्यागत यांची सेवा करण्यास रात्रंदिवस तप्तर असे. रेणुकाबाईस नरहरि, वैकुठ व गोविंद असे तीन पुत्र झाले. जयराम यांस लेखनवाचनाचा फ़ार नाद असे. ते नित्य रात्रौ लिहीत बसत. त्यांनी श्रीमद्भागवताचा दशमस्कंध मोठ्या अक्षरांनी स्वत: लिहून काढला. आपण जे कांही लिहिले ते ध्यानांत आणून, ते आपणास कसे समजले याची प्रचीति म्हणून, शिष्यमंडळापैकी सुदर्शन स्वामी यांजकरवी ’ सुदर्शनबोध ’ नामक एक ग्रंथ त्यांनी लिहविला. भजनाचे वेळी ’ जयहरि गोविंद राधे गोविंद ’ या प्रेमळ नामस्मरणात सतत नाचत नाचत तल्लीन होऊन, देहभावाचा विसर पडून, प्रेमाच्या व आनंदाच्या वर्षावाने जयरामनाना थबथबून जात असत. प्रेक्षकांचे चित्तासही प्रेमाचे पाझर फ़ुटून, ’ब्रह्मानंदी लागली टाळी । कोण देहाते सांभाळी ’ अशी त्यांची स्पृहणीय अवस्था होत असे. जयरामनाना यांनी स्वत: बर्‍याच ओव्या, अभंग, सौर्‍या वगैरे कविता रचिली आहे. श्रीरामजन्माचे अभंग, श्रीहनुमानजन्माचे अभंग, श्रीदत्तजन्माचे अभंग वगैरे त्यांची प्रकरणे प्रेमळ आहेत. ही त्यांची सर्व कविता अद्याप अप्रकाशित असून, ती अहमदनगर येथे त्यांच्या वंशजांपाशी असण्याचा संभव आहे. परंतु, ती माझ्या हाती येणे, प्रस्तुत स्थितीत, अशक्यप्राय असल्यामुळे, तिच्याशी वाचकांचा परिचय मला करुन देता येत नाही, याबद्दल फ़ार वाईट वाटते. तथापि, प्रस्तुत चरित्रलेख ज्या लेखाची जवळ जवळ नक्कलच आहे, त्या लेखाचे कर्ते रा. गणेश नरहरिबुवा यांनी ’मुमुक्षु ’ त दिलेले त्यांचे एक पद वाचकांस येथे सादर करितो :-
पद ( अर्जुना तूं जाण रे. )
गोविंद गोविंद बोल गे । प्रेमानंदे डोल गे ।
माया मोह प्रपंच जैसे हरबर्‍याचे फ़ोल गे ॥१॥
वैराग्याची कास गे । धरी सावकाश गे ।
भाऊबंद घर सखे सोड यांची आस गे ॥२॥
विवेक नाही ज्यास गे । करी त्याचा त्रास गे ।
रामनामावीण गडे घेऊं नको ग्रास गे ॥३॥
विठ्ठलचरणी भाव गे । जयरामी स्वभाव गे।
सांगितल्याची सोय धरुनी करणी करुन दाव गे ॥४॥
ह्या एकाच पद्यावरुन जयरामनानाच्या सहज सुलभ व प्रेमळ पद्यरचनाशक्तीची वाचकांस कल्पना होईल.
दरसाल आषाढी पौर्णिमेसस जयराम नानाचे घरी श्रीचा गोपाळ्काला होत असे. जयराम यांच्या चिरंजीवांपैकी गोविंदबुवा यांस संस्कृत भाषेचे ज्ञान चांगले होते. त्यांनी श्रीमद्भागवतांतील दशमस्कंधांत वर्णन केल्याप्रमाणे श्रीकृष्णाची बालक्रीडा बालगोपालास संस्कृतांत शिकवून त्यांजकडून पाठ करविली व तिचा प्रयोग, टिपर्‍या वगैरेच्या तालावर, श्रीगोविंचनामाच्या जयजयकारांत, फ़ार प्रेक्षणीय होत असे. श्रीचे गोपाळकाल्यांत जी सोंगे येत असत ती श्रीकृष्ण, गर्गाचार्य, महाबळ, पुतना, गोपी, गोपाळ, यमलार्जुन, अर्धांगी पार्वती, भाट, महादेव नारद, पेंद्या, सुदामा, राक्षस वगैरे. अर्धांगी पार्वतीचे सोंग फ़ारच प्रेक्षणीय होई. गोविंदबुवा हे दर एकाद्शीचे जागरणी श्रीजयदेकृत अष्टपद्या फ़ार प्रेमळपणाने म्हणत असत.
रेणुकाबाईस गोपिका, गंगा व राधा या तीन सुना होत्या. त्याही आपल्या सासुप्रमाने पतिसेवापरायण व देवकार्यनिमग्न असत. अहमदनगरपासून दोन मैलांवर भिंगार नामक गांव आहे तेथे सखाराम महाराज ह्मणून महान वैष्णव होते त्यांची व जयरामाची नेहमी भेट होत असे. खाकीबुवा बैरागी, पद्माकर महाराज ही वैष्णव मंडळी त्या वेळी होती. त्यांनी परस्परांत भेटून एकांतांत परमार्थविचारणा करावी, आपल्या चित्तांतील संदेहाच्या गांठी परस्परांकडून सोडवाव्या, चित्ताची व चैतन्याची गाठ घ्यावी असा क्रम चालू असे.
अशा रीतीने पंचवसि वर्षे श्रीहरिभजनांत घालविल्यावर, जयराम यांनी एके दिवशी आपल्या शिष्यमंडळीस व मुलांलेकरांस जवळ बोलाविले व सांगितले की " श्रीगुरु विठ्ठलमहाराजांनी मज पामरावर कृपा केली व हे आनंदाचे दिवस दाखविले. परंतु यापुढे आतां या देहाचा भरंवसा नाही. हे आनंदाचे दिवस दाखविले. परंतु यापुढे आतां या देहाचा भंरवसा नाही. आजपर्यंत जो आनंद झाला तोच पुढे चालू ठेवा." आपला मुलगा नरहरी यास जयरामांनी सांगितले की, " श्रीगुरु विठ्ठलमहाराजांनी मज पामरावर कृपा केली व हे आनंदाचे दिवस दाखविले. परंतु यापुढे आता या देहाचा भरंवसा नाही. आजपर्यंत जो आनंद झाला तोच पुढे चालू ठेवा. " आपला मुलगा नरहरी यास जयरामांनी सांगितले की, " तीन भकार आहेत, ते जतन करा. एक श्रीमद्भागवत अखंड वाचावे. दुसरे, गोविंदाचे भजन प्रेमाने करावे; व तिसरे आल्या गेल्यास यथाशक्ति भोजन घालावे. माघशुद्ध ७ स माझे देहावसान होईल असा अजमास आहे. श्रीराधे गोविंद संस्थानाची स्थापना झाली आहे. त्या गादीची सर्व शिष्यमंडळीने व बाळगोपाळांनी सेवा करावी. "
जयरामाचे हे निर्वाणीचे उद्गार ऐकताच, त्यांच्या शिष्यमंडळीने त्यांस माघ शुद्ध प्रतिपदे दिवशी चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली. पुढे सात दिवस भजनाचा सोहळा झाला; व पूर्वी सूचित केल्याप्रमाणे माघ शुद्ध ७ ( रथसप्तमी ) स उष:काली जयराममहाराज समाधिस्थ झाले. सर्व शिष्यांनी, समाधिस्थितीत महाराजांचे दर्शन घेऊन टाळ, मृदंग, पताका, दुंदुभि इत्यादि सामग्री तयार करुन दिंडीचा सोहळा केला; तुळशी, फ़ुले, बुका, गुलाल, यांच्या गालिच्यावरुन स्वामीस मिरवीत नेऊन सायंकाळी समाधीचा सोहळा पूर्ण केला. उत्तरेस समाधीची जागा ठरविली व यथाशास्त्र सर्व विधि करुन स्वामीचे शिष्यमंडळीने तेथे श्रीचे नामसप्ताहास प्रारंभ केला. कै. भास्कर दामोदर पाळंदे हे त्या वेळी अहमदनगर येथील स्माँल काँज कोर्टाचे न्यायाधीश होते त्यांनी, समाधीकडे दरमहा १०० रु. देण्याचा क्रम ठेविला होता. याशिवाय, आबाजी नानाजी सातभाई, पेन्शनर फ़र्स्ट क्लासस सबजज्ज; रा.सा. करंदीकर; कै. गोपाळराव हरि देशमुख; विष्णु मोरेश्वर भिडे इत्यादि थोर थोर गृहस्थांनी स्वामीच्या समाधीवर एक भव्य इमारत उभारली. हा मठ अहमदनगर शहराचे उत्तर बाजूस दिल्ली दरवाजाने बाहेर गांवकुसाला लागूनच आहे. कै. गोपाळराव हरि देशमुख, विष्णु मोरेश्वर भिडे आणि रा. सा. पाळंदे हे आंग्लविद्याविभूषित व सुधारक ह्मणून प्रसिद्ध असलेले गृहस्थ जयरामनानाच्या भजनी लागले, यावरुन, सर्व प्रकारच्या व सर्व मतांच्या लोकांची यांच्या साधुत्वाविषयी पूर्ण खात्री झाली असली पाहिजे हे उघड दिसते.
जयराममहाराजानी स्थापिलेल्या राधेगोविंद संस्थानाच्या गादीची सेवा पुढे नरहरिबुवांनी केली; व त्यांचे पश्चात त्यांचे चिरंजीव रामचंद्र, रंगनाथ, शंकर व गणपति हे आज तागायत करीत आहेत. श्रीदत्तजयंतीचा उत्साह, जयराममहाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नामसप्ताह, यथाशक्ति ब्राह्मणभोजन, श्रीमद्भागवतांचे पुराण त्यांचे मठांत आजपावेतो चालू आहे; व भगवंताचे कृपेने पुढेही चालेल यांत संशय नाही. श्रीजयरामस्वामीचे शिष्य सखारामबुवा ठाकर यांचा पंचपदीचा नित्यपाठ समाधीपुढे सतत चालू आहे. या मठात श्रीनिवृत्तीनाथ यांची पालखी दरवर्षी पंढरीस जातांना व येतांना उतरते. दरसाल आषाढी पौर्णिमेस गोपाळकाल्याचा मोठा उत्सव होतो. जयरामनानाची कविता, त्यांचे वंशज व शिष्य प्रसिद्ध करितील काय ?

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP