तुका ब्रम्हानंद.

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


"सुमारे दोनशे अडीचशे वर्षांपूर्वी, गोब्राह्मणप्रतिपालक श्रीशिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीत विश्वब्राम्हण (सुवर्णकार) कुलामध्ये तुकाब्रम्हानंद स्वामी या नांवाचे एक मोठे विव्दान  योगी होऊन गेले. हे सातारा येथे राहात असत. ह्यांच्या वडिलांचे नांव नागनाथ असून, उपनाम कर्मार होते. ह्मणून पूर्ववयांत ह्यांना तुका नागनाथ कर्मार अस ह्मणत. नागनाथपंत हे राजाश्रित असून पोतदारीच्या वृत्तीवर आपले उपजीवन चालवीत. सरकारी खजिना तपासून ठेवणे, रुपये पारखून घेणे ह्या कामावर जे सराफ़ असतात, त्यांनाच पोतदार असे ह्मणतात. छत्रपतींच्या दरबारात हे काम नागनाथपंतांकडे होते.
तुका कर्मार यांचे उपनयन होतांच लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडून वेदाध्ययन, संस्कृत व्याकरणशास्त्र व अलंकारशास्त्र यांचा अभ्यास करविला. नंतर, देवशिल्प हाही आपल्या ब्राह्मणांची एक कुलपरंपरागत वृत्ति असून ती फ़ार उपयोगी आहे; परंतु वैदिक शिल्पशास्त्रांचे अध्ययन केल्याशिवाय देवमूर्ति वगैरे शिल्प येणे शक्य नाही, हेही त्यांच्या लक्ष्यांत आले. ह्मणून त्यांनी अथर्वणसंहिता, बौघायनशुल्बसूत्र, पद्मसंहिता वगैरे वैदिक शिल्पग्रंथांचे पूर्ण अध्ययन केले आणि शिवाजी महाराजांच्या आश्रयाने सुवर्णशिल्पाचा धंदा करुन त्या शिल्पशास्त्राचा अनुभव महाराजांस दाखविला. यासंबंधाने एक आख्यायिका प्रचलित आहे ती अशी:-
एकदा शिवाजी महाराजांनी तुका कर्मार ह्यांस आपणाकरितां एक पवित्रक तयार करावयास सांगितले. तेव्हा ते ह्मणाले की, यथाशास्त्र पवित्रक तयार करणे असेल तर त्याला बारा वर्ष लागतील. महाराज ह्मणाले,"त्यांत इतका अपूर्व गुण तरी काय ? " कर्मारानी उत्तर दिले, " तसल्या पवित्रकांत काय अपूर्व गुण असतो, हे ते पवित्रक तयार झाल्यावर आपणास दाखवूं. " इतकें झाल्यावर, महाराजांच्या आज्ञेने त्यांनी ते पवित्रक तयार करावयास घेतले. नंतर शिल्पशास्त्रोक्त विधीप्रमाणे पूजन, हवन वगैरे , नवग्रहांच्या प्राणप्रतिष्ठा करुन त्या पवित्रकांत त्या त्या ग्रहाच्या इष्ट रत्नाची स्थापना केली. ह्याप्रमाणे शास्त्रोक्त रीतीने पवित्रक तयार करुन ते शिवाजीमहाराजांस दाखविले. ते पाहून महाराज ह्मणाले," ह्यामध्ये विशेष गुण काय आहे तो प्रत्यक्ष दाखवाल तरच आमची खात्री होईल." तेव्हा तुका कर्मार यांनी करुन शुचिर्भूत होऊन , जागा सारवून त्यावर रांगोळी वगैरे घालून तेथे पाट मांडला; आणि त्या पवित्रकांतील नवग्रहांची यथाविधी पूजा केली. आणि हात जोडून प्रार्थना करुन त्यांस ह्मणाले,"ह्या पवित्रकामध्ये जसे आपण मूर्तिमंत स्वरुपाने येऊन वास्तव्य केले, त्याप्रमाणेच आपण आपल्या स्थानी गमन करावे." ही प्रार्थना संपते न संपते तोच शिवाजीमहाराजांसमक्ष ते नवरत्नरुपी नवग्रह ताडकन त्या पवित्रकांतून निघून आकाशामध्ये आपापल्या स्थानी गमन करिते झाले. हे पाहून महाराजांस मोठे आश्चर्य वाटले; व शिल्पशास्त्राचा प्रभाव पूर्णपणे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आला; व तुका कर्मार हे शिल्पशास्त्राचे अव्दितीय विव्दान आहेत अशी त्यांची खात्री होऊन त्यांच्या विषयी त्यांच्या मनांत पूज्यभाव उत्पन्न झाला.
तुका कर्मार हे कालिकादेवीचे मोठे भक्त होते. पण ते शाक्तपंथी नव्हते. ते एकनिष्ठ व प्रेमळ भक्त होते. त्यामुळे त्यांना देवीचा साक्षात्कारही होत असे. पुढे शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांनी शिल्पशास्त्रविधीप्रमाणे देवीची सुवर्णाची मूर्ति तयार केली. ती पाहुन महाराज प्रसन्न झाले. तेव्हा कर्मारांनी त्यांस विनंती केली की, ह्या मूर्तीची स्थापना करणे ती विश्वब्राह्मणाच्या हातूनच झाली पाहिजे. ते मूर्तीची स्थापना करणे ती विश्वब्राह्मणाच्या हातूनच झाली पाहिजे. ते त्यांचे ह्मणणे महाराजांनी मान्य करुन , मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचे कार्य तुका कर्मार यांजकडेच सोपविले. तेव्हा दुसर्‍या कित्येक वैदिक ब्राह्मणांनी अशी कोटी काढिली की, तुका कर्मार जर एवढे विद्वान आणि शिल्पशास्त्रज्ञ आहेत व त्यांच्या हातानेच जर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करवावयाची तर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देवीने आपण होऊन आपले अलंकार आपल्या अंगावर घालावेत; तरच आह्मी शिल्पशास्त्रांतील प्रमाण सत्य मानूं. तुका कर्मार यानी ही गोष्ट मान्य केली; व निश्चित केलेल्या मंगल मुहूर्तावर देवीची अर्चा वा प्राणप्रतिष्ठा करुन यथाविधि स्थापना केली. नंतर देवीपुढे एका चांदीच्या ताटांत सुवर्णाचे व रत्नाचे अलंकार भरुन ठेवले; आणि संस्कृतांत एक अष्टक रचून देवीच्या स्तोत्रपाठास आरंभ केला. तेव्हा काय चमत्कार सांगावा? प्रत्येक श्लोकास एक अलंकार याप्रमाणे त्या सुवर्णाच्या देवीने सर्व अलंकार प्रत्यक्ष आपल्या हाताने उचलून अंगावर धारण केले. ह्या अद्गुत कृत्यामुळे महाराजांची व वैदिक लोकांचीही तुका कर्मारावर विशेष भक्ति जडली.
एके दिवशी शिवाजी महाराजांनी आपली चष्मा नीट करण्यासाठी तुका कर्मारांकडे पाठविला. तो नीट करीत असतां कर्मार यांच्या हातून अकस्मात त्या चष्म्याचे भिंगच फ़ुटले. तेव्हा त्यांस मोठे भय उत्पन्न होऊन त्यांनी देवीचा मोठ्या करुणस्वराने धांवा आरंभिला. तेव्हा श्रीजगदंबा त्यांस प्रसन्न झाली आणि तिच्या कृपेमुळे, ते चष्म्याचे भिंग आपोआपच पूर्ववत झालेले त्यांच्या दृष्टीस पडले ! ही देवीची आपल्यावर असलेली अलौकिक कृपा पाहून त्यांच्या नेत्रातून खळखळ आनंदाश्रूंचे लोट आले. नंतर, मोठ्या सद्गदित अंत:करणाने तो चष्मा नेऊन त्यांनी महाराजांच्या स्वाधीन केला.
पुढे तुका कर्मार यांचे वडील नागनाथ हे वारले. तेव्हा त्यांची वडिलोपार्जित वृत्ती सांभाळणे त्यांस भाग पडले. ही वृत्ती ह्मणजे सरकार कचेरीतील पोतदारीचे ह्मणजे खजीनदाराचे काम करणे ही होय. तेथे नित्यश: जाऊन सरकारच्या गांवगन्ना असलेल्या चावड्यांतून व तालुक्यांतून रुपयांचे पोते येईल त्यातले सारे रुपये पारखून सरकारी तिजोरीत जमा करावे लागत. परंतु तुका कर्मार हे मोठे कर्मनिष्ठ होते. प्रत्यही तीन त्रिकाळ संध्या करण्याचा त्यांचा नियम होता. प्रथम ते स्वतंत्र धंदा करीत असत तेव्हा त्यांच्या या संध्यानियमांत कधीही अंतर पड्त नसे. परंतु नवीन नोकरीमुळे ते परतंत्र झाले. तथापि त्यांनी आपला नियम चालू ठेवलाच होता. हे एवढे स्नानसंध्याशील असल्यामुळे कचेरीतील इतर लोक ह्यांची थट्टा करीत. एकदां तर त्यांचा सायंसंध्येचा नियम मोडून त्याम्त व्यत्यय आणून काय मौज होते ती पहावी या विचाराने काही गृहस्थांनी तुका कर्मारांचे सत्वच पाहण्याचा बेत केला. त्यांनी रोजच्याप्रमाणे ऐवजाने भरलेल्या थैल्या पारखावयास द्यावयाच्या त्या वेळेवर न देता अगदी कचेरी बंद करण्याच्या सुमारास ह्मणजे अगदी सूर्यास्ताचे वेळी त्यांचपुढे आणून टाकल्या ! आणि त्याही एकदोन नव्हत, तर ढीगच्या ढीग ! पोतदारीचे काम ह्मणजे मोठ्या जोखमाचे. शिल्लक पारखून खजिन्यांत टाकल्याशिवाय त्यांना तेथून उठता येईना. तेव्हा अर्थातच सायंसंध्येचा त्यांचा नियम ट्ळण्याची वेळ येऊन ठेपली. परंतु परमेश्वर हा भक्तांचा कैवारी व पाठिराखा ; तो काय त्यांची उपेक्षा करणार ? कर्मार हे भक्तिभावाने संध्येचा नियम अगदी कडकडीतपणे चालवीत असल्यामुळे ह्या वेळीही भगवान श्रीसूर्यनारायण त्यांचे अर्घ्यप्रदान घेण्याकरितां जागच्या जागीच खिळून राहिले. अस्तास गेले नाहीत ! इकडे तुका कर्मारांचे रुपये पारखून घेण्याचे काम सुरुच होते. राजवाड्यांत शिवाजी महाराजांनी किती वाजले ह्मणून पाहिले तो तीन तास रात्रीचा समय झाला असून सूर्याचा अस्त मात्र झालेला नाही ! त्यावरुन त्यांनी विचारांती ठरविले की, कोणा तरी पुण्यपुरुषाचा छळ चालला असावा. त्याशिवाय असा प्रकार होणार नाही. ह्मणून त्यांनी हुजर्‍याकडून चौकशी करविली. तेव्हा, सर्व कचेर्‍या बंद झाल्या असून , तुका नागनाथांची कचेरी मात्र अद्याप उघडी आहे व त्यांचे रुपये पारखून व मोजून खजिना भरण्याचे काम चालू आहे असे समजले. तेव्हा महाराज स्वत: कर्मारांच्या कचेरीत जाऊन त्यांस ह्मणाले "आज आपण इतका वेळपर्यंत का बसला ?" कर्मार ह्मणाले "कचेरी बंद होण्याच्या सुमारास थैल्या आल्यामुळे त्यांची व्यवस्था लावणे भाग पडले." ते ऐकून महाराज ह्मणाले, "तीन तास रात्र झाली तरी अद्याप सूर्य अस्तास गेला नाही. ह्या करितां हे काम असेच ठेवून आपले संध्यादि नित्यकर्म आतां ह्याच ठिकाणी उरकून घ्या." ती आज्ञा ऐकतांच त्या ठिकाणी हौदावरच तुका कर्मारांनी सायंसंध्या केली. तोच सुर्य अस्तास जाऊन तीन तास रात्र पड्ली. नंतर महाराजांनी कचेरीतील दरोबस्त लोकांस हुकूम केला की, कर्मार यांस कोणी असा त्रास देऊ नये.
वरील कथेवर अनेक आक्षेप घेता येण्यासारखे आहेत. सूर्यास्तास विलंब होण्याचे कारण , कोणा तरी सत्पुरुषाचा छ्ळ चालला असावा, हे महाराजांच्या लक्षात बिनचूक कसे आले ? शिवाय हा सत्पुरुष सातार्‍यातच असला पाहिजे हेदेखील त्यांस कसे समजले ? दुसरा ऐतिहासिक दृष्ट्या येणारा आक्षेप असा आहे की, सातारा ही शिवाजी महाराजांची राजधानी नव्हती. रायगड हे त्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. अस्तु. थोर व्यक्तींच्या पुण्यबलाने सूर्याची गति कुंठित झाल्याची काही उदाहरणे पुराणग्रंथांतून आढळतात.कालिदासासंबंधानेही अशा प्रकारची एक आख्यायिका प्रसिध्द आहे. जगांतील बहुतेक सगळ्या साधुसंताची व धर्मसंस्थापकांची चरित्रे अशा प्रकारच्या अलौकिक चमत्कारांनी अशी खच्चून भरलेली आहेत की, त्यातले खरे चमत्कार कोणते व खोटे कोणते , किंवा सर्वच खोटे, याचा निर्णय करण्याचे काम एखाद्या मोठ्या शास्त्रज्ञासही बिकट वाटेल. अशा स्थितीत परंपरागत गोष्टी व दंतकथा, त्या त्या साधूच्या चरित्रात नुसत्या नमुद करुन ठेवण्यापलीकडे, चरित्रलेखकाने तरी काय करावे ? असो.
वरील चमत्कार घडला त्या दिवसापासून तुका कर्मार यांस विरक्ति उत्पन्न झाली; आणि नोकरीत व प्रपंचात राहून आपल्या नित्यकर्मात व्यत्यय येतो, ह्याकरिता चतुर्थाश्रम ह्मणजे संन्यास घ्यावा हेच उत्तम असे त्यांच्या मनाने घेतले; आणि संधि पाहून त्यांनी तो आपला विचार शिवाजी महाराजांच्या कानावर घातला. व महाराजांची अनुज्ञा मिळतांच श्रीब्रह्मानंदस्वामीच्या अनुग्रहाने त्यांनी सुमुहूर्तावर संन्यासदीक्षा धारण केली. ब्रह्मानंदस्वामीनी त्यांस ’तुकाब्रह्मानंद’ हे नांव दिले. त्या आश्रमांत त्यांनी हठयोगाचे परिपूर्ण अध्ययन करुन प्रस्थानत्रयादि वेदांतग्रंथांचे परिशीलन केले.ह्या आश्रमांतही शिवाजी महाराज त्यांचा समाचार घेत असत. तुका कर्मार हे उत्तम कवि होते. ह्यांनी भर्तुहरीकृत शतकत्रयावर समश्लोकी टीका केलेली आहे.ह्या भगवद्भक्त कवीने आपल्या विव्दत्तेची व कवित्वाची साक्ष ह्मणून अनेक काव्ये रचिली आहेत. शांकरभाष्य टीका, वेदांतरहस्य, शतकत्रय, समश्लोकी, सप्तशतीची टीका, प्रणवाष्टक, नाटकरामायण,गीतगोविंद समश्लोकी, व विश्वकर्ममाहात्म्य वगैरे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. यांपैकी प्रणवाष्टक व गीतगोविंद समश्लोकी हे दोन ग्रंथ छापून प्रसिध्द झालेले आहेत. अप्रकाशित ग्रंथापैकी कांही ग्रंथ पुणे येथे वे.शा.सं. बाळशास्त्री रावजीशास्त्री क्षीरसागर यांचे संग्रही आहेत. अंतकाळी तुका ब्रह्मानंद यांनी सातार्‍यानजीक माहुली येथे कृष्णावेण्यासंगमावर आपला देह ठेवला. त्या ठिकाणी महाराजांनी त्याची समाधी, घाट व देवालयही बाधले आहे असे मशारनिल्हे रा. क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीवरुन समजते. तुका ब्रह्मानंद यांच्या कवितेतील कांही वेचे येथे देतो.
गीतगोविंद समश्लोकी.
मूळ श्लोक -"वाग्देवता" इत्यादि.
समश्लोकी - वागीश्वरीचरितलेखित चित्तसद्मा ।
पद्मावती नृपतिसेवित पादपद्मा ॥
गोपाल गोपवनिता रतिरासगाथा ।
गीताप्रबंध करितो जयदेव आतां ॥
मूळ श्लोक - "वेदानुध्दरते" इत्यादि.
समश्लोकी - वेदोध्दारकरा जगत्रयधरा भूगोल दंष्टांकुरा ।
दैत्यप्राणहरा बलिच्छलकरा क्षत्रीकुलारीवरा ॥
लोकेशांतकरा हलायुधधरा कारुण्यपूर्तीतरा ।
म्लेच्छादिप्रहरा दशाकृतिधरा कृष्णो नमो श्रीधरा ॥
मूळ अष्टपदी- "कापि कपोल."
समश्लोकी - कोणी कपोलतळी मिळती लपती श्रवणातळि बाळा ।
श्रीहरिचे मुख चुंबिति त्या मृगराजक त्या अनुकूळा ॥
कोणि अतिक्रीडा कौतुक खेळे जाति यमुनेच्या कुळी ।
कुंजवनी मदमंजुळ वायु.... चिरे हरी वनमाळी ॥
मूळ श्लोक- "साध्वी माध्वी" इत्यादि
समश्लोकी - गर्वा सर्वांपुढे तूं नच मिरवि मधो, साखरे टाक मान ।
द्राक्षीतें कोण रक्षी, अमृत मृत बुधा, तुंहि पाण्यासमान ॥
आम्रा ताम्रा रडे ये शशिमुखि अघरा ! तोंड दावी न दृष्टी ।
आनंदे विश्व जो हे कविवर जयदेवाचिया काव्यसृष्टी ॥
मदोल्लसितलोचने वदन इंदुबिंबावरी ।
गती जनमनोरमा जघन कर्दळीची सरी ॥
रती तव कलावती भ्रुकुटी रम्य वाटे मना ।
अहा जमवुनी पहा उतरलीस देवांगना ॥
शय्येचा शेष त्याच्या शिरसिं मणिगणी पाडूनी बिंबछाया ।
मूर्ति स्फ़ूर्ती हजारो प्रकटुनि आपुल्या सर्व नेत्रे पहाया ॥
आनंदाने पुरेशी जलनिधितनया कृत्तिकी देहधारी ।
मदोल्लसितलोचने वदन इंदुबिंबापरी ।
गती जनमनोरमा जघ्न कर्दळीची सरी ॥
रती तव कलावती भ्रुकुटी रम्य वाटे मना ॥
अहा जमवुनी पहा उतरलीस देवांगना ॥
शय्येचा शेष त्याच्या शिरसि मणिगणी पाडुनी बिंबछाया ।
मूर्ति स्फ़ूर्ती हजारो प्रकटुनि अपुल्या सर्व नेत्रे पहाया ॥
आनंदाने पुरेशी जलनिधितनया कृत्तिकी देहधारी ।
जेणे यत्काम वाढे, हरि सततचि हो सर्वकल्याणकारी ॥
मेघी अंबर दाटले वनभुमी नीळ्या तमालद्रुमी ।
राधे ! हा तमभीत बाल सदना ने प्राप्त झाली तमी ॥
एवं नंदनिरोपयुक्त गमिती कुंजद्रुमाच्या पंथी ।
राधाकृष्ण विराजमान यमुनातीरी रमायास ती ॥
गीतगोविंद समश्लोकीच्या उपसंहारांत टीकाकार ह्मणतात :-
श्रीमद्‍ब्रह्मानंदशिष्ये तुकेशे । नागेशाच्या आत्मजे स्वर्णदेशे ॥
देशी भाषा संस्कृताची सुरेखा । केली श्रीमद्गीतगोविंदटीका ॥
भर्तुहरी - शतकत्रयावरील समश्लोकी टीकेतील उतारे -
मुखें काही हांसे सरळ चपळा चोलन कळा ।
ससंमोहा वाचा सरसिक विलासोक्ति सकळा ॥
गतीच्या प्रारंभी कमळदलविस्तारचि निका ।
मृगाक्षी तारुण्या न प्रथम हिरण्यासमचि कां ॥
कुंकुम कर्दम चिन्हे शरिरा । गौर कुचांवरि कंप विहारा ॥
हंसगती घुंगुर पदपद्मा । रंजविना कवणा अशि रामा ॥
मुग्ध स्त्री मनरजनी गतगुणा जाली सकामोन्मुखी ।
सल्लज्जा वधु भीत घैर्यगलिता कंपांकिताला निकी ॥
प्रेमोत्कंठित कामिनी रतिरस प्रौढी सकामे रते ।
नि:शंकाकविकर्षणे सुख महा तेजे कुलस्त्रीरते ॥
भोगी रोगभये सुखी असुखता वित्ती नृपाची भये ।
मानी दैन्यभये बळी रिपुभये रुपी जरेची भये ।
वस्तू सर्व भयान्विता, नर धरो वैराग्य भीना भये ॥
ते रम्या नगरी महानृपति तो मंत्रीसभा ते घना ।
भागीं त्या उभयीं सुवेत्र धरुनी त्या चंद्रबिबानना ॥
राज्यायोग्य सुशील राजसुत तो ते भारती कीर्तने ।
ज्याच्या साह्यवशे समस्तहि नमो त्या काळजीकारणे ॥
निघेल पिळितां सुतैल अतिसाहसे वाळुके ।
मृगोद्क पिऊनही तृषित शांत होऊ शके ॥
मिळेल भलते वनी शशकशृ गहीशोधिता ।
असाध्य जवळून मूर्खजन चित्त संबोधिता ॥
तुकाब्रह्मानंद स्वामीकृत वेदांतरहस्यांतील उतारे -
ओव्या.
फ़ेणासी ह्मणती हे अभ । अभ्रास मानिती हेचि नभ ।
भ्रांत परी निभ्रांत निर्लोभ । यथा जगदारंभ मायामोही ॥
अंध पंगूते वाहूनि खांदी । मार्ग क्रमी पंगूचिया शब्दबुध्दी ।
पंगू क्रमी अंधाचिया पदी । उभयां कार्यसिध्दि परस्परे ॥
आत्मा पंगु प्रकृति अंध । येरयेरां अनादि संबंध ॥
तेणे प्रकृतिपुरुषसंयोगे विविध । क्रियासंबंध प्रकट होय ॥
प्रद्युम्नरुपिणी स्वये प्रकृति । प्रद्युम्नानंद पुरुष प्रकृति ।
उत्तम संयोगे विविध कृती । विविध उत्पत्ती क्रियेच्या तेथ ॥
मन स्वभावे प्रचंचल अति । तदर्थ शंकराचार्यवचनोक्ति ।
"यत्संकल्प विकल्पे रति । कंथ तद्भवति मनोत्मैव ॥"
सुदामचरित्रांतील उतारे -
विवेकी सज्ञान ब्राह्मण  अयाचित वृत्ति अतिगहन ।
अप्राप्त भावाचा जो शीण । विवेकें संपूर्ण विसरला ॥
अखंड वायूचें संचरण । तै अभ्रे केवि व्यापिजे गगन \
विवेकाची राहटी पूर्ण । तेथ अज्ञानश्वान रिघे कैसे ॥
हा ब्राह्मण अतिनिर्धन । भगवद्भक्तिपरायण ।
याचे पाशी झालिया धन । भगवद्भजन  मग कैसे ॥
धने वाढेल धनमदु । धने वाढेल कामक्रोधु ।
धने वाढेल विषयभेदु । तदा गोविंदु स्मरे केवी ॥
नाटकरामायणातील श्लोक -
दृष्टादृष्टि परस्परे मिसळ्तां सल्लग्न जीवशिवा ।
होतां लोचन पल्लवा झडकरी सल्लज्ज उर्वी भवा ॥
पाहे मन्मथमातृका पुनरपी रामास मुक्तेक्षणी ।
तो लज्जापट मुक्त चिन्मय गुरु ॐ पुण्य गर्जे ध्वनी ॥
संतोषला राघव दे पदातें । जे नासिते संसृति-आपदांते
घेतां करी तत्पदपंकजाते । जाली विदेहीच विदेहजा त ॥
सौदर्यखाणि नवरी गुणभूवरिष्टा ।
जाली असेल बहुधा वरभूतचेष्ठा ॥
आदित्य वंशगुरु भूतभविष्यद्रष्टा ।
दावा तया जन म्हणे नवरी वसिष्ठा ॥
प्रसादे संतांच्या गुरुवरपदी प्रिति नटली ।
गुरौप्रीत्या असत्कथन विषयीं बुध्दी विटली ॥
सरे तो प्रारब्धावधि वृत मला हेच करणे ।
महाकीर्त्याधारे वरुनि भवसिंधूच तरणे ॥
याशिवाय, पुणे येथील प्रसिध्द विव्दान दैवज्ञ वे. शा. सं. बाळशास्त्री रावजीशास्त्री क्षीरसागर यांनी स्वज्ञातीयांसाठी ’स्तोत्ररत्नमाला’ नामक एक पुस्तक प्रसिध्द कले आहे, त्यांत तुकाब्रह्मानंद्कृत कांही स्तोत्रांचा समावेश झालेला आहे. वरील वेंचे लेखकप्रमादामुळे असावे तसे शुध्द नसल्यामुळे कांही स्थली व्हावा तसा अर्थबोध होत नाही. तथापि एकंदरीत, तुका ब्रह्मानंद यांची वाणी बरीच रसाळ असून वेदांतविषयाचाही त्यांचा व्यासंग मोठा असला पाहिजे असे त्यांच्या कवितेवरुन दिसते. भर्तृहरी-शतकत्रयावर वामन, तुकारामबाबा वर्दे आणि तुका ब्रह्मानंद या तीन मराठी कवींनी समश्लोकी टीका केली आहे. याशिवाय ’तुका विप्र’ यांचीही एक समश्लोकी टीका आहे, अशी माहिती ठाणे येथील प्रसिध्द संशोधक व लेखक रा. विनायक लक्ष्मण भावे यांनी दिली. ’तुका’ या नामैक्यामुळे या बाबतीत कांही तरी गैरसमज किंवा घोटाळाही होण्याचा संभव आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP