चिदानंदस्वामी

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


सावंतवाडी संस्थानांत तेंडुली नामक एक गांव आहे; तेथें ‘बागलांची राई’ या नांवाची एक रमणीय वाडी आहे. त्या ठिकाणी सुमारें दोनशें वर्षापूर्वीं, कुडाळदेशस्थ गौड ब्राह्मण ज्ञातीचे ‘चिदानंद’ या नांवाचे एक महान्‍ सत्पुरुष होऊन गेले. ह्यांचे वंशज हल्लीं तेथें राहत असून, त्यांच्या संग्रहीं स्वामींची थोडीशी कविता आहे. चिदानंदस्वामीसंबंधानें त्यांच्या वंशजांस फारशी माहिती नाहीं. बागलांची राई येथें स्वामींची भव्य व मजबूद समाधि असून, तिजवर श्रीशंकराची पिंडी स्थापन केली आहे. चमत्कारांच्या गोष्टी काल्पनिक किंवा साधु-संतांच्या शिष्यांनीं आपापल्या गुरुंचे माहात्म्य वाढावें म्हणून रचलेल्या असतात, अशी ज्यांची समजूत असेल, त्यांनीं कृपा करुन वरील पवित्र स्थळ एकवार अवश्य अवलोकन करावें, अशी आमची शिफारस आहे. स्वामींच्या समाधीवर एक चौकोनी लांकडी तुळई आहे, तींत महाशिवरात्रीपासून पाण्याचे तुषार उत्पन्न होऊन, त्या उदकाचा खालील पिंडीवर, मृगाचा पाऊस पडेपर्यंत सारखा अभिषेक होत असतो. ‘चक्षुर्वै सत्यं’ या न्यायानें पुष्कळ सद्गृहस्थांनीं हा चमत्कार प्रत्यक्ष पाहिला आहे व त्यांपैकीं दोघांनी केरळकोकिळांत व इंदूप्रकाशांत आपला अनुभव प्रसिद्धही केला आहे. वर ज्या तुळईंतून जलप्रवाह चालू होतो म्हणून लिहिलें, ती तुळई कांहीं वर्षापूर्वी नवीन घालण्यांत आली, त्यावेळीं कित्येकांस अशी शंका आली की, जुन्या तुळईप्रमाणें या नव्या तुळईंतून पाण्याचा अभिषेक होणार नाहीं; पण अनुभवांतीं ही शंका खोटी ठरली, चमत्कारांवर ज्यांचा विश्वास नसेल, त्यांनीं हा प्रकार एक वेळ प्रत्यक्ष पाहून, त्याची उपपत्ति प्रसिद्ध केल्यास माझ्यासारख्या भोळ्या लोकांवर त्यांचे मोठे उपकार होतील. वर सांगितलेली लांकडी तुळई फारशी भक्कम नसून, तिचा घेर फार तर पांच सहा इंच असेल. ह्या तुळईच्या तीन बाजू अगदी कोरडया असून, खालची बाजू मात्र पाण्यानें डबडबलेली असते. तिजवर दहिवरासारखे तेज:पुंज जलबिंदु दिसतात व ते एकास एक मिळून त्यांचें थेंब थेंब पाणी खालील पिंडीवर गळत असतें. हा विलक्षण प्रकार अवलोकन करितांच मन आश्चर्यानें थक्क होऊन जातें व प्राकृत मानवी ज्ञानास अगोचर अशी कांहीं तरी शक्ति सत्पुरुषांच्या ठायीं वास करीत असली पाहिजे, याबद्दल प्रेक्षकाची खात्री होऊन चुकते. तरीपण मनुष्यमात्राचें अंत:करण निसर्गत:च संशयी असल्यामुळें, सदर चमत्काराची कांहीं तरी उपपत्ति लावतां येईल तर लावावी, या हेतूनें प्रेक्षक आपल्या चर्मचक्षूंचा यथाशक्ति उपयोग करुन पाहतो व शेवटी त्यास ‘अज्ञेय अज्ञेय !’ असें ह्मणावें लागून, स्वस्थ बसावें लागतें. कोणी तरी कावेबाज व स्वार्थी लोकांनीं, भोळ्या बापडयांस मोह पाडून त्यांजकडून आपला तळिराम गार करुन घेण्यासाठीं हें थोतांड उभारलें आहे म्हणावें, तर अशा प्रकारचे स्वार्थसाधु किंवा भटभिक्षुक तेथें मुळींच नाहींत. या समाधीजवळ स्वामींच्या वंशजांचे घर आहे व समाधीच्या खर्चासाठी सरकारांतून जमीन इनाम देण्यांत आली आहे. त्या जमिनीच्या उत्पन्नांतून स्वामीचे वंशज समाधीच्या पूजेचा व नैवेद्याचा खर्च चालवितात. पण यापलिकडे, स्थानमाहात्म्य वाढविण्याचा त्यांचा बिलकुल प्रयत्न नाहीं. ही समाधि ज्या ठिकाणीं आहे, तें ठिकाण एका टेंकडीवर असून, सभोंवतालच्या नारळीच्या व सुपारीच्या वृक्षांमुळें त्यांस एकप्रकारचें सहजमनोहर स्वरुप प्राप्त झालें आहे. हल्लींची तुळई घालण्यापूर्वी, जुनी तुळई मोडून पडली होती; त्यावेळीं तिच्या जागीं विजयादशमीच्या दिवशीं फुलांच्या माळा बांधण्यासाठी एका बांबूची योजना करण्यांत आली होती; पण चमत्काराची गोष्ट ही कीं, महाशिवरात्रीचा दिवस उगवतांच, त्या बांबूंतून पाण्याचा अभिषेक होऊं लागला ! व ही गोष्ट शेंकडो लोकांनी प्रत्यक्ष पाहिली आहे. स्वामींप्रमाणेंच त्यांचे दोन पुत्रही मोठे भगवद्भक्त होऊन गेले; त्यांच्या समाधि स्वामींच्या समाधिगृहांत बाहेरच्या बाजूस आहेत. ह्या समाधिगृहासमोर जवळच एक पिंपळाचा जुनाट वृक्ष असून, त्यासंबंधानें आज असा चमत्कार आहे कीं, कितीही मोठा सोसाटयाचा वारा आला, तरी इतर पिंपळवृक्षांप्रमाणें, या वृक्षाच्या पानांचा ‘सळसळ’ असा शब्द बिलकुल होत नाहीं; वार्‍यानें पिंपळाची पानें बाजूं लागल्यामुळें त्यांच्या वाचनास विक्षेप होऊं लागला. तेव्हां स्वामीनीं, ‘सळसळ शब्द करुं नकोस’ अशी आज्ञा हस्तसंकेतानें त्या वृक्षास केली व तेव्हांपासून ती आज्ञा आज दोनशें वर्षे होऊन गेलीं, पण आज त्यांचे हे चमत्कार पाहून त्यांच्या अलौकिक सामर्थ्यासंबंधानें प्रेक्षकांच्या अंत:करणांत भक्तिभाव व पूज्यबुद्धि उत्पन्न झाल्याशिवाय रहात नाहीं. स्वामींच्या वंशजांच्या संग्रहीं स्वामींचा एकच ग्रंथ आढळला. हा ग्रंथ म्हणजे, संस्कृत गुरुगीतेवर ‘स्वानंदलहरी’ नामक प्राकृत ओंवीबद्ध टीका होय. हिचे अध्याय १४ असून ओवीसंख्या १००० आहे. स्वामींची वाणी किती प्रासादिक व अनुभवयुक्त आहे, हें पुढील ओंव्यांवरुन समजेल: -

आशपाश विशाळ । शतबंध वसती प्रबळ ।
ऐसा संसार दु:खमूळ । पाववी सकळ पतनातें ॥१॥
ऐसें संसार घोर विघ्न । त्यातें गुरुगीता ही कृतघ्न ।
जपतां करितसे भग्न । होई निमग्न भावेंसी ॥२॥
सर्व सिद्धि येउनी तेथ । होऊनि भृत्यांचा निजभृत्य ।
दिनरात्रीं गृहीं नांदत । ऐसा महिमा ये ग्रंथीं ॥३॥
भुक्ति नांदे देहीं असतां । मुक्ति सर्वदा येतसे हाता ।
अंती सायुज्याच्या माथां । भोगी कांता मुक्ति तो ॥४॥
सत्य सत्य हें पुन: सत्य । मी धर्म देवी केला उदित ।
गुरुगीतेऐसा ग्रंथ । नाहीं मात अवधारी ॥५॥
हें बोलणें जाणिजे सत्य । बोलिलों सत्याचें निज सत्य ।
न शिवे तिळमात्र असत्य । धरिजे सत्य मानसी ॥६॥
या परिचा निजधर्म । जें गुह्याचें निजधर्म ।
देवी म्यां करुनि सुगम । ओपिला उगम तुजलागीं ॥७॥
गुरुगीतेसी लावितां तुळी । समता नाहीं भूमंडळी ।
सकळ शास्त्रांची मुळी । गीता बाळी जाणिजे ॥८॥
मृगासनावरी देखा । बैसूनि जपतां ग्रंथमाळिका ।
सकळ ज्ञानाची सिद्धि जे कां । होय एका क्षणार्धे ॥९॥
घालोनियां व्याघ्रांबर । नित्य विलोकी हा ग्रंथसार ।
तोही अंती मोक्षद्वार । पावे साचार जाण तूं ॥१०॥
दर्भासनीं बैसूनि जाण । भावें ग्रंथाचें करी अवलोकन ।
करितां वृद्धि होय दारूण । गृहीं जाण अंबिके ॥११॥
आसन बोलिजे निर्मळ । पवित्र जें कां शुभ कंबळ ।
घालुनी हा ग्रंथ सोज्वळ । सिद्धि सकळ ओळंगती ॥१२॥
येथें प्रीत धरी जयाचें मन । तो लेउनि होय समाधान ।
हतदैवी जो अभाग्य जन । न भोगी आपण सर्वथा ॥१३॥
हे वाणी नोहे प्राकृत । निज गुह्याचा गुह्यार्थ ।
आनंदाचा एकांत । गुरुभक्त जाणती ॥१४॥
जे आदिशक्ति महामाया । जे चैतन्यशिवाची स्वरुपकाया ।
तिणें पुसोनियां ग्रंथान्वया । दावी उपाया सकळांसी ॥१५॥
ही सकळ भक्तीची मूळ वाट । हाचि सर्व साधनांचा शेवट ।
गुरुभक्तीहूनि श्रेष्ठ । नाहीं स्पष्ट सर्वत्रीं ॥१६॥

स्वामींचा हा ग्रंथ रा० आनंदराव बाळकृष्ण रांगणेकर यांनी शके १८३३ सालीं छापून प्रसिद्ध केला आहे, त्याच्या आरंभी त्यांनी जी स्वामीची माहिती दिली आहे, ती येणेंप्रमाणें:- "या सत्पुरुषाचें जन्म शके १६३० च्या सुमारास सावंतवाडी संस्थानांतील आजगांव नांवाच्या गांवी एका घरंदाज व कुलीन घराण्यांत झालें. यांचें पूर्वाश्रमीचें नांव रुद्राजी बाळकृष्ण प्रभु मतकरी असून, आईचें नांव रमाबाई होतें. हे कुडाळदेशस्थ गौड ब्राह्मण असून, यांचें गोत्र भारद्वाज होतें. यांचे वडील बाळकृष्ण हे चांगले कर्मनिष्ठ होते. परंतु आपल्या एकुलत्या एक मुलाचें मौजीबंधन करण्यापूर्वीच ते इहलोकींची यात्रा आटोपून गेले. यामुळें मुलाचे संगोपनाची जबाबदारी मातोश्रीवर पडली. बाळकृष्णपंत यांची घरची स्थिति केवळ गरिबीची नव्हती. ते ग्रामाधिकारी घराण्यापैकी होते. परंतु त्यांचे भाऊबंदांत यावेळीं कलहाग्नि माजून राहिला होता. शिवाय देशाची राजकीय परिस्थितीही अगदींच प्रतिकूल होती. अशा स्थितींत रमाबाईनें आपल्या मुलाचें मौजीबंधन कसेंबसें उरकून घेतलें व भाऊबंदांच्या भीतीनें, आपल्या मुलास घेऊन, ती आपल्या माहेरीं-वेतोरें गांवीं-जाऊन राहिली. यावेळीं रुद्राजींचें वय सुमारें १० वर्षांचें होतें. विद्याभ्यासाचे सुरुवातीसच बाप निवर्तल्यामुळें बाळबोध बाराखडया लिहिण्यावांचण्या-पलीकडे त्यांचा अभ्यास झाला नव्हता. पुढें, आजोळीं विद्याभ्यास पुढें चालविण्याची सोय नसल्यामुळें, त्यांना आपल्या आजोबांच्या गाई-म्हैशी राखण्याचा उद्योग करावा लागला. नशिबीं आलेला हा उद्योग रुद्राजीपंत मोठया आनंदानें करीत असत. परंतु विद्याभ्यास करण्याची त्यांची उमेद नष्ट झाली नव्हती. कारण, शिकलेल्या बाराखडया म्हैशीरेडयांचे पाठीवर ते काठीनें लिहित असत ! एके दिवशीं ते खडेसल नांवाच्या जंगलांत गुरें चारणीस सोडून एकांतांत बसले असतां, एका व्याघ्रासह एक देदीप्यमान्‍ संन्यासी आपल्याकडे येत आहे, असें त्याया दृष्टीस पडलें. रुद्राजी हे आधींच फार धीट होते; त्यांत स्वत:च्या दु:स्थितीमुळें जीवित त्यांस तृणप्राय वाटत असे. यामुळें ते न डगमगतां त्यांनीं मोठया प्रेमानें धांवत जाऊन स्वामीच्या पायांवर मस्तक ठेविलें व त्यांची करुणा भाकली. त्या सिद्ध पुरुषानें त्यांचें हृद्गत जाणून त्यांस पूर्ण ब्रह्मोपदेश दिला व त्यांचें नांव चिदानंद ठेवून त्यांस घरीं जाण्यास सांगितलें. परंतु आपल्या गुरुंचा सहवास सोडून जाण्यास चिदानंदाचें मन घेईना. पुढें ते गुरु-शिष्य त्या ठिकाणीं आठ दिवस राहिल्यावर, गुरुंनी चिदानंदांस आपण उत्तरयात्रा करुन परत येईपर्यंत घरीं जाऊन राहण्यास सांगितलें. ही गुर्वाज्ञा ऐकून चिदानंदांस फार वाईट वाटलें; व याउप्पर गुरुचरणसेवेस न अंतरण्याचा आपला निश्चय त्यांनीं नम्रपणें विदित केला. तेव्हां "निदान तूं आपल्या मातोश्रीस तरी भेटून ये; तोंपर्यंत मी येथेंच राहतों" असे वचन देऊन गुरुजींनीं त्यांस घरीं पाठविलें. इकडे रुद्राजीच्या आईनें व तिच्या माहेरच्या मंडळीनें रुद्राजीपंतांचा चार-पांच दिवस शोध केला. परंतु कांहींच पत्ता न लागल्यामुळें, बिचार्‍या रमाबाईनें निराशेनें बिछाना धरला होता. पुढें, वर सांगितल्याप्रमाणें चिदानंद हे जेव्हां तिला येऊन भेटले, तेव्हां तिला किती आनंद झाला असेल, हें सांगावयास नकोच. चिदानंदांनीं आपल्या मातेच्या चरणावर मस्तक ठेविलें. त्यांची गंभीर व सतेज मुद्रा पाहून सर्व मंडळींस फार आश्चर्य वाटलें. आठ दिवस उपासमार होऊन आपल्या मुलाचे फार हाल झाले असतील, अशा समजुतीनें रमाबाईंनीं चिदानंदांची खाण्या-पिण्याची व्यवस्था फार चांगली ठेविली होती, परंतु त्यांचें मन गुरुचरणीं गुंतलें असल्यामुळें त्यांनीं परत जाण्यास मातोश्रीची परवानगी मागितली. त्यांचा हा विलक्षण आग्रह पाहून सर्व मंडळीस सखेदाश्चर्य वाटलें. शेवटीं, त्यांचा निश्चय ढळत नाहीं, असें पाहून रमाबाईनेंही त्यांजबरोबर जाण्याचें ठरविलें. व कांही वेळानें तीं दोघेंही अरण्यांत त्या सत्पुरुषापाशी येऊन दाखल झालीं. रमाबाईनें आपले मस्तक स्वामींच्या चरणावर ठेवितांच त्यांनीं आपला वरद-हस्त तिच्या मस्तकावर ठेवून, तिच्या अंत:करणांत ज्ञानदीपाचा उज्ज्वाल प्रकाश पाडिला. मुलास लागलेलें वेड दूर करण्याच्या निश्चयानें निघालेली रमाबाई स्वत:च वेडी झाली ! शेवटीं त्या साध्वीस घरी जाण्यास सांगून व आपण चिदानंदांसह उत्तर-यात्रा पुरी करुन बारा वर्षांनीं परत येतों; असे तिला आश्चासन देऊन स्वामी तेथून निघून गेले. रमाबाईनें घरीं येऊन कच्ची हकीकत मंडळीस निवेदन केली, तेव्हां सर्वांस फार आश्चर्य वाटलें. पुढें बारा वर्षांनीं ते गुरु-शिष्य परत आल्यावर त्यांनीं वेतोरें येथेंच एक वर्ष मुक्काम केला. या अवधींत रमाबाईचें देहावसान झालें. चिदानंदांनीं पुत्रधर्मानुसार मातेचा यथाशास्त्र उत्तरविधि आटोपल्यावर गुरु-शिष्यांची जोडी दक्षिण-यात्रेस निघून गेली व थोडयाच अवधींत आजगांव येथें येऊन दाखल याली. येथें, जनरुढीप्रमाणें चिदानंदस्वामींनीं कुलदेवतेचें व ग्रामदेवतेचें दर्शन घेतलें. पुढें आजगांव येथें त्यांनी बरेच दिवस वास्तव्य केलें. या अवधींत त्यांनीं चमत्कारही पुष्कळ केले. त्यांच्या गुरुंचें नांव पूर्णानंद होतें. पुढें कांहीं दिवसांनीं, पूर्णानंद स्वामींनीं दाभोली येथील मठाचें आधिपत्य स्वीकारण्याचें कबूल केलें व त्या जागीं आपल्या वतीनें काम करण्याची व गृहस्थाश्रम स्वीकारण्याची चिदानंदांस त्यांनीं आज्ञा केली. चिदानंदस्वामींकडे मठाचे सर्व अधिकार सोंपविण्यांत आले. त्याप्रमाणें ते यथाशास्त्र धर्मदंडाधिकार चालवीत असत. सावंतवाडी संस्थानचे त्या वेळचे राजे सरदेसाई खेमसावंत भोंसले यांनीं वरील मठासंबंधानें पुढील राजाज्ञा जाहिर केली होती:-
श्रीमठ दाभोली येथील मठाधिकारी श्रीमत्‍ चिदानंदाश्रम संन्यासी यांचे व यांचे शिष्यपरंपरेचे आज्ञेप्रमाणे आचार, व्यवहार व प्रायश्चित्तादि कर्म चालवीत जाणें. त्यांस अडथळा करतील त्यांचें पारिपत्य केलें जाईल. इत्यादि०
वर सांगितल्याप्रमाणें, गुर्वाज्ञानुसार चिदानंदस्वामींनीं एका स्वज्ञातीय कुलीन गृहस्थाच्या कन्येशी यथाशास्त्र विवाह केला. या वेळीं त्यांचें वय सुमारें ४० वर्षांचें होतें. त्यांच्या पत्नीचें नांव पार्वती. पार्वतीबाईया पोटीं सहा मुलगे व एक मुलगी अशीं अपत्यें झालीं. चिदानंदस्वामींचे सर्व पुत्र मोठे भगवद्भक्त होते. या दोन्ही मुलांच्या समाधि स्वामींच्या भव्य समाधिगृहांतच आहेत. हें समाधिगृह ज्या ‘बागलांच्या राईंत’ आहे, त्या ठिकाणी स्वामींनीं वसति करण्याचें कारण असें समजतें कीं, स्वामी एक वेळ गुरुदक्षिणेसाठी निघाले असतां केळूस नामक गांवीं गेले. तेथील एक गृहस्थ ब्रह्मसमंधाचे पीडेमुळें प्रेतवत्‍ होत असे. त्याप्रमाणें एके दिवशीं तो प्रेतवत्‍ होऊन पडला असतां, स्वामी त्या ठिकाणीं गेले. तेव्हां त्या गृहस्थाच्या घरच्या माणसांनीं त्यांचे पाय धरले. त्यावेळीं स्वामींनीं आपल्या कमंडलूंतील उदक सिंचून त्या गृहस्थास जागृत केलें. पुढें, त्याची ब्रह्मसमंधाची पीडा कायमची नाहींशी होण्यास जें अनुष्ठान करणें अवश्य होतें, त्या अनुष्ठानास योग्य अशी ही एकांत जागा स्वामींनीं पसंत केल्यावरुन ती पन्नास होन देऊन त्या गृहस्थानें विकत घेऊन दिली. त्यावेळीं या राईत वाघ, तरस, लांडगे वगैरे हिंस्त्र पशूंची वस्ती असल्यामुळें, तिकडे सहसा कोणी जात नसे. परंतु या प्राण्यांशीं स्वामी फार सलगीनें वागत असत. पुढें स्वामींच्या इच्छेवरुन ही व आसपासची उत्पन्नाची जमीन सरकारांतून त्यांस इ०स० १६७० त इनाम देण्यांत आली. ती अद्याप त्यांचे वंशजांकडे चालत आहे. अशा प्रकारें, प्रपंच व परमार्थ हीं दोन्ही साध्य करुन आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी स्वामी समाधिस्थ झाले. त्यांनीं अनेक ग्रंथ लिहिले होते व ते निपाणी येथील त्यांच्या एका शिष्यांच्या मठांत होते. पण दुर्दैवानें तो मठ अग्नीच्या भक्ष्यस्थानीं पडला, त्या वेळीं ते ग्रंथही कायमचेच नष्ट झाले. स्वानंदलहरी ग्रंथांत स्वामींनीं आपली गुरुपरंपरा दिली आहे, ती येणेंप्रमाणें:-

ओव्या.
बैलग्राम कर्नाटिका । तेथें चिदानंद मूळपीठिका ।
प्रत्यक्ष भोगावती देखा । आसनासन्मुख आली असे ॥२८॥
साही प्रहर स्थिरपणीं । राहिला सावेव जीवनीं ।
स्नान केलें ब्राह्मण जनीं । धन्य वाणी बोधिली ॥२९॥
तो परात्पर श्रीगुरु । त्यानें बोधिला बोधसागरु ।
विमलानंद यतीश्वरु । सर्व विचारु जाणता ॥३०॥
जन्मांधासि दिधले नेत्र । हंदी खंडी आश्रम पवित्र ।
चारी आश्रमांचें सूत्र । लेइला पवित्र सर्वांगीं ॥३१॥
तो परमेष्टि अवतार । तेणें शिष्या दाविला पार ।
विश्वानंद नाम सुंदर । ठेवूनि कर मस्तकीं ॥३२॥
तो सकळ शास्त्रार्थी ज्ञानकंद । सेवड ग्रामों नांदे प्रसिद्ध ।
परम गुरु तो महासिद्ध । वाचे अगाध बोलतां ॥३३॥
त्याची होऊनि पूर्ण दया । पूर्णानंद श्रीगुरुराया ।
प्रांत कुडाळ दाभोली ठाया । करितो दया दीनातें ॥३४॥
वंध्या जाहली पुत्रवती । तैसी त्यानें मज दिधली बोधशक्ति ॥
मुक्या भेटला बृहस्पती । वाचे किती अनुवादों ? ॥३५॥
स्वामींनीं ग्रंथसमाप्तीचा कालही दिला आहे: -
शके सोळाशें चौर्‍याहत्तरांसी । संवत्सर अंगिरा वर्षी ।
चिदानंदे सुख उल्हासीं । ग्रंथ टीकेसी लेखिलें ॥४७॥
इंदुवारी एकादशी । शुक्लपक्षीं पौषमासीं ।
दोन प्रहर माध्याह्नेसी । ग्रंथ टीकेसी पूर्णता ॥४८॥
अध्याय १५.

कोंकणांतील मराठे लोकांच्या लग्नकार्यांत बायका जमून ‘घाणा’ व ‘आंबा’ नामक गाणीं म्हणण्याचा प्रघात आहे. एकदां हीं गाणीं स्वामींनीं ऐकलीं, तेव्हां गूढार्थपूर्ण अशीं नवीन गाणीं तत्काल रचून त्यांनीं म्हणून दाखविलीं; त्यांपैकी एक गाणें पुढें दिले आहे:-

घाणा.
नमन गणेश्वरा गौरीच्या कुमरा । शारदा सुंदरा नमियेली ॥१॥
सद्गुरु प्रारंभ ॐकार हा कोष । विवाह आरंभ स्थूलदेहीं ॥२॥
निजशांती नोवरी निर्गुण साकारी । सुलग्नाची परी ऐका श्रोते ॥३॥
कुळदेव नमिला घाणा आरंभिला । उल्हास मांडिला देहामाजी ॥४॥
प्रथम मूळाधारीं चौघी कुमरी । स्वाधिष्ठानावरी सहाजणी ॥५॥
दश बाळा मणिपुरा, अनुहातींच्या बारा । घाणा पूर्ण बरा कांडिताती ॥६॥
विशुद्धि सोळाजणी अग्निचक्रीं दोनी । घाणा आरंभुनी सिद्ध केला ॥७॥
पन्नास कुमरी घाणा भरियेला । नाद उसळला अनुहात ॥८॥
वो माई वरमाया ब्रह्मस्थानी दोघी । सामग्री सवेगी केली पहा ॥९॥
त्रैलोक्याच्या नारी हा घाणा पैं गाती । त्यांसी ज्ञानमुक्ति प्राप्त होय ॥१०॥
घाण्याची सिद्धि जाली पूर्ण बोधीं । चिद्‍ पूर्णानंदीं ओळंगत ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP