दाजी कवि

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


हे कवि सुमारें पाऊणशे वर्षापूर्वी सातारा प्रांती होऊन गेले. यांनी सुमारे ५०००० कविता लिहिली असूनही, त्यांची किंवा त्यांच्या कवितेची महाराष्ट्रांत फ़ारशी प्रसिध्दि नसावी, हे आश्चर्य होय. दाजी कवींची थोडीशी माहिती ’ काव्यसंग्रह ’ मासिक पुस्तकांत प्रसिध्द झाली आहे, तीच अल्पस्वल्प फ़ेरफ़ाराने, येथे उध्दृत केली आहे. दाजी कवीचे मूळपुरुष मोरो गोपाळ गोळे हे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे नातलग असून सन १७७६ साली वारले. त्यांचे चिरंजीव गंगाधरपंत यांजकडे कल्याणप्रांताची ’ मजमू ’ असून, तेही सन १७७९ त निवर्तले. त्यांचे चिरंजिव माधवराव हे , पेशवे अल्पवयी असल्यामुळे त्यांचे सन्निध पुरंदरास असत. त्यांना ग्रंथावलोकनाचा नाद् असून, कवित्वाचीही अभिरुचि असे. ह्यांनी लिहिलेली स्तोंत्रें, साक्य़ा, व रुक्मिणीस्वयंवरादि आख्यानें आहेत. ह्यांस इ.स. १७८० साली पुत्र झाला, तेच व्यंकटराव उर्फ़ दाजीमहाराज् गोळे हे होत. त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या मातेने सहगमन केले. एवढ्या बालवयांत मातेचा अशा रीतीने वियोग व्हावा, ही केवढी खेदाची गोष्ट ! आपली आई चालतां बोलतां एकाएकी नाहीशी झालेली पाहून चार वर्षांच्या अर्भकाच्या अंत:करणांस ज्या भयंकर वेदना झाल्या असतील त्यांच्या नुसत्या कल्पनेनेही अंगावर कांटा उभा राहतो, कंठ दाटून येतो आणि सतीच्या चालीसारख्या अमानुष्य चालीबद्दल त्वेष होऊन, या एका बाबतीत तरी हल्लीचा काल फ़ार चांगला, असे उद्गार तोंडावाटे आपोआप बाहेर पडतात. असो.
दाजी महाराज मोठे झाल्यावर पेशवाईंत त्यांनी सरकारी कामें केली. गायकवाड, होळकर व निजाम यांकडून येणारा वार्षिक पैसा वसूल करण्याचे काम यांजकडे असे. त्यांजकडे ५०० स्वार, शिबंदी, हत्ती, घोडे, पालख्या इत्यादि खाजगी इतमामही असे. यशवंतराव होळकराने पुणे शहर लुटले तेव्हा दाजीबांस आपली सर्व दौलत सोडून पुण्यापासून दुर जावे लागले. दुसर्‍या बाजीरावाच्या कारकीर्दीत त्यांनी मक्त्याच्या मामलती केल्या. सन १८०० साली दाजिबांवर श्रीमंतांची गैरमर्जी झाल्य़ामुळें व नंतर लवकरच पेशवाईचा शेवट झाल्यामुळे दाजिबा आपल्या बंधूसह सातार्‍याजवळील मर्ढे नावाच्या आपल्या इनाम गांवी खाजगी व्यापार वगैरे करुन राहूं लागले. ते दरसाल पंढरीस जात असत. तुकाराम, नामदेव, जनाबाई ह्यांचे अभंग त्यांना मुखोद्गत असत आणि त्यामुळेच त्यांना स्वतंत्र कविता करण्याची स्फ़ूर्ति झाली. त्यांच्या कवितेंत अभंगच पुष्कळ आहेत. तरी पण श्लोक, आरत्या, पदें, भुपाळ्या वगैरेची संख्याही कांही लहान नाही. सन १८३४ त दाजिंबांनी संन्यास घेतला तेव्हांपासून त्यांना दाजीमहाराज म्हणू लागले. पांडुरंगाचे ठायी त्यांची निस्सीम भक्ति असे. त्यांचे कवित्व भक्तिरसप्रधान आहे. दाजीमहाराजांचे वंशज मर्ढेकर गोळे यांचे सातार्‍यांस जे घराणे आहे, त्याच्याच संग्रही ह्या कवीच्या कवितांच्या साठ वह्या असून प्रत्येक वहींत सरासरीने १००० कविता आहे. म्हणजे सुमारे ६०००० कविता झाली. यापैकी बराच भाग अप्पा व आबा या दोघां शिष्यांनी लिहिलेला आहे. हे दोघे शिष्य शंभुमहादेव येथील राहणारे होते. " मनाचे श्लोक " नामक प्रस्तुत कवींचे एक प्रकरण काव्यसंग्रहात छापले आहे, ते सन १८३१ साली लिहून तयार झाले असा उल्लेख सापडतो. स्न १८५१ च्या सुमारास प्रस्तुत कवि समाधिस्थ झाले. त्यांची समाधी सातारा तालुक्यांत बोरबळ येथे कृष्णेच्या कांठी आहे.
दाजी कवींच्या ’ मनाच्या श्लोकां ’ चा उल्लेख वर केला आहे, ते श्लोक एकंदर १३०० आहेत, परंतु त्यांपैकी फ़क्त २८१ निवडक श्लोक काव्यसंग्रहकर्त्यांनी प्रसिध्द केले आहेत. " दाजी कवींची इतर कांही कविता आम्ही छापणार होतो, परंतु कांही कारणामुळे तो बेत तुर्त रहित केला आहे, " असे काव्यसंग्रहकार म्हणतात. दाजी कवीचे जे २८१ श्लोक प्रसिध्द झाले आहेत, तेवढया वरुनच जर त्यांच्या एकंदर कवितेची परिक्षा केली तर त्यांची रचना अगदी सामान्य प्रतीची आहे, असेच म्हणावे लागेल. त्यांची विव्दत्ता तर फ़ारशी दिसत नाहींच, पण भाषाज्ञानही बेताचेंच दिसते. परंतु त्यांच्या कवितेंतला भक्तिरसाचा ओघ एवढा दांडगा आहे, की त्यापुढे वरील दोषांची फ़ारशी मातब्बरी नाही. मनाच्या श्लोकांची मूळ कल्पना श्रीसमर्थ रामदास स्वामीची. तिचे अनुकरण ’ वामन ’  ( वामन पंडित नव्हे ) नामक एका कवीने पूर्वीच केले होते व त्या नंतर दाजी कवीनीं केले. समर्थांच्या ’ मनोबोधा ’ चे शेवटी ’ मनाची शते ऐकता दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती ।’ अशी फ़लश्रुति त्यांनी सांगितली आहे. दाजी कवीनींही आपल्या श्लोकांचे शेवटी " मनाची शते सार्थ की ज्या नरातें । कळूं लागती भ्रांति नव्हे तयांते " असे आश्वासन दिले आहे. त्यांच्या श्लोकांपैकी पंचवीस निवडक श्लोक येथे उतरुन घेतो :-

रमामंदिरा सुंदरा चिव्दिलासा । नमो तूजला सर्व भूताधिवासा ।
मती देइजे आपुले गूण गाया  । कृपासागरा यादवा कृष्णराया ॥१॥
मना शोधितां शोधितां सार पाहीं । हरीवांचुनी सार कोठेचि नाही ।
यदर्थी तया ध्याउनीयां रहावें । दिसे दृश्य हे त्याचियाने पहावे ॥२॥
मना संग रे सोडिं या संसृतीचा । समूळी मना भ्रम वारी मतीचा ।
भ्रमाच्या मुळे सूख स्वप्नी असेना । हरीवांचुनी साच कोठे दिसेना ॥३॥
मना साच रे कृष्ण कैवल्यदाता । मना संशयो सोडि रे सोडि आतां ।
यदर्थी जिवीं कृष्णरुपासि ध्यायी । तुझा तूंचि रे कृष्ण होवोनि राही ॥४॥
मना कल्पना सर्व जाळोनि टाकी । न ठेवी न ठेवी कदा कर्मबाकी ।
अनन्यैकभावे स्मरोनी हरीसी । मना जागवी जागवी या जिवासी ॥५॥
मना जोवरी तुझिया अर्थ गांठी । तुला मानिती धाकुली आणि मोठी ।
फ़ुका अर्थ जातांचि कोणि पुसेना । तुझे बोलणे कांहि कोणा रुचेना ॥६॥
मना सोडि रे वासना दन्यवाणी । प्रपंची असे रे मना फ़ार हानी ।
मना स्वप्निंहि लाभ कांही असेना  । जयाचेनि रे कृष्ण जीवी बसेना ॥७॥
मना साजिरा गोजिरा कृष्णराजा । तयाच्या पदी सर्व विश्वास माझा ।
म्हणोनी तया सर्वभावे स्मरावे । तयाच्या पदी सौख्य ते ऊमगावे ॥८॥
मना गोपिका कामयोंगे निवाल्या । रतीच्या भरे रुप होवोनि ठेल्या ।
मना दैत्य हे वैरभावे पदाते । कसे पावले वारुनी आपदाते ॥९॥
मना जाहला पूर्ण विश्वास माते । म्हणोनी जिवे लाविले दृढ नाते ।
मना तूंहि रे क्षण त्याते न सोडी । चढावाढिने वाढवी प्रेमगोडी ॥१०॥
मना रुक्मिणीवल्लभू सौख्यसिंधू । असा जाहला पाहिजे दृढ बोधू ।
नको नातळूं मानसा अन्य कर्मा । भजे आत्मया अच्युता सौख्यधामा ॥११॥
नको रे नको सेवुं तूं त्या नराते । विचारें करोनी खरा पामराते ।
जया अंतरी सर्वदा अन्य धंदा । जिवी नाठवी कृष्णपादारविंदा ॥१२॥
चतुर्भुज चक्रायुधें चार हाती । मना कुंडले कर्णि त्या ढाल देती ।
असे रेखिला तीलकू कस्तुरीचा । जिवा लागला छंद त्याच्या रुपाचा ॥१३॥
मना हेमपीतांबर दिव्य कांसे । कशील्यावरी कांचि अत्यंत भासे ।
किरीटावरी तो तुरा मोतियांचा । जिवा लागला छंद त्याच्या रुपाचा ॥१४॥
गरुडासनी शोभतें ध्यान पाही । जयाच्या पदी न्य़ून कांहीच नाही ॥१५॥
महाराज हा नाथ लोकत्रयाचा । जिवा लागला छंद त्याच्या रुपाचा ॥१५॥
मना भाव हा पापतापा निवारी । मना भाव हा शोकसंताप वारी ।
मना भाव हा आकळितो हरीते । पहा भावनेवांचुनी सर्व रीतें ॥१६॥
मना सूख ते एक कृष्णासि ध्याता । असे सार की हेचि ग्रंथी समस्तां ।
बहु हेदरे शेंदरे देव नाना । कराया जना जाहले जे तनाना ॥१७॥
खरा देव हा कृष्णदाता निजाचा । जया वर्णितां शीणली वेदवाचा ।
म्हणोनी मना गाइं घ्यायी तयासी । मना होइं रे भागि त्याच्या सुखासी ॥१८॥
सदा सर्वदा राहि एकांतवासी । न राहीं मना कांहि मोही कुपाशी ।
घडोने घडी सार साधोनि घेई । मना पूर्ण आनंद होवोनि राही ॥१९॥
नये रे मना कोणि कामास येथे । असे रे मना सर्व हे व्यर्थ नातें ।
नसे शांति रे मानसा अन्य ठायी । जिवीं आपुल्या कृष्णरुपासि पाही ॥२०॥
मथीलीं मना सर्व शास्त्रे प्रमाणे । नसे रे नसे शाश्वतू अन्य पेणें ।
म्हणोनी मना धांव हा जीव घेतो । प्रकारेकरोनी तुला शीकवितो ॥२१॥
असे साच ते लाधलें कर्मयोगे । मना पाहू पां वारिली सर्व सोंगे ।
असावा तसा गोमटा योग आला । न सोडी मना याजसाठी तयाला ॥२॥
करी रे मना पान नामामृताचे । नको रे नको मत्त नाना मतांचे ।
मना कृष्णनामें गती या जिवासी । असे गूज रे ठाऊकें त्या शिवासी ॥२३॥
करावी मना कासया व्यर्थ चिंता । महाराज राजेंद्र हा कृष्ण दाता ।
नुपेक्षी अनन्या कदां हा उदारु । असा कीर्तिचा ज्योचिया रे प्रकारु ॥२४॥
महावीर गंभीर पूर्णप्रतापी । गुणें आगळा चिद्घन ज्ञानरुपी ।
नुपेक्षी अनन्या कदां हा उदारु । असा कीर्तिचा ज्याचिया रे प्रकारु ॥२५॥
रामदासी मनाच्या श्लोकांचे हे अनुकरण असल्यामुळे, त्या श्लोकांतील बरेसचे शब्द व कल्पना ह्या श्लोकांत ठिकठिकाणी दृष्टोत्पत्तीस याव्या यांत कांही आश्चर्य नाही. समर्थांनी आपल्या अधिकारयुक्त धीरगंभीर वाणीने जो उपदेश २०५ श्लोकांत केला आहे, तोच उपदेश करण्यास दाजी कवीनीं १३०० श्लोक रचिले आहेत

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP