दिनकर गोसावी रामदासी

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


महंते महंत करावे । युक्तिवादानें भरावे ।
जाणते करुनि विखरावे । नाना देशीं ॥१॥
दासबोध.

शके १५०० पासून १६०० पर्यंत १०० वर्षांच्या काळांत धर्ममूढचेत महाराष्ट्राला खर्‍या महाराष्ट्र धर्माची व ज्ञानाची प्राप्ति करुन देण्यास महाराष्ट्रीयांच्या सुदैवानें ज्या दिव्य विभूति निर्माण झाल्या, त्यांत श्रीसमर्थांचे महंत व शिष्य यांचीही गणना करण्यास हरकत नाही. अशा महंतांपैकीं श्रीदिनकरबुवा हे एक होत. यांचें मूळचें नांव बहिणंभट किंवा बहिणाजी असें होतें; धुळें येथील सत्कार्योत्तेजक सभेनें प्रसिद्ध केलेल्या ‘रामदासांची कविता, भाग १ ला’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेंत समर्थशिष्यांचीं नांवें दिली आहेत, त्यांत ८९ वें नांव ‘बहिणाजी’ हें आहे. पण पुढें श्रीसमर्थांनी बहिणाजीस उपदेश देऊन त्यांचे नांव ‘दिनकर’ ठेविलें, अशी आख्यायिका आहे. दिनकरबुवांच्या शिष्यांनी, त्या काळच्या अधिकार्‍यांनी व गांवकर्‍यांनीं बुवास जीं दानपत्रें व सनदा करुन दिल्य आहेत, त्यां त्यांचे नांव ‘बहिणाजी वा नरहरजी गोसावी’ असें लिहिलें आहे. ह्या सत्पुरुषाचा जन्ममृत्युकाल अद्याप नक्की समजला नाहीं; तथापि शके १५५० पासून १६२५ च्या दरम्यान दिसतें. अहमदनगरानजीक पुराणप्रसिद्ध भृगुक्षेत्रीं-भिंगार येथें पाठक उपनांवाच्या यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण कुळांत दिनकरबुवांचा जन्म झाला. पाठकांकडे नगर भिंगारची व आसपासच्या कांही गावांची वृत्ति होती. हे पाठक हल्लीं ‘मुळे’ या आडनांवानें प्रसिद्ध आहेत. दिनकरबुवांचे पणजे जनार्दन पाठक व आजे कोनेर पाठक हे भगवद्भक्त असून चांगले विद्वान होते. सूर्य, गणपति व देवी या दैवतांचे ते उपासक होते. दिनकरबुवांचे तीर्थरुप नरहरि पाठक हेही वेदशास्त्रसंपन्न व ब्रह्मनिष्ठ पुरुष होते; त्यांस श्रीगणपतीची उपासना असे. दिनकरबुवांची आई द्वारकाबाई ही फार सुशील व पतिसेवापरायण होती. दिनकरबुवा लहानपणापासूनच भक्तिमान व धार्मिक होते. नरहर पाठकांच्या सान्निध्यांत दिनकरबुवांनी मराठी व संस्कृत भाषांचे अध्ययन केलें. त्यांस वेदान्त व धर्मशास्त्राचें चांगलें ज्ञान होतें, असें त्यांच्या ग्रंथांवरुन दिसतें. रामदास, तुकाराम, वामन इत्यादि तत्कालीन कवींची पुष्कळ कविता त्यांच्या संग्रहीं असून, ती त्यांनी लक्षपूर्वक वाचली होती. व्रतबंध व लग्न झाल्यावर दिनकरबुवांची विरक्ति अधिकच वाढली. त्यांचे भाऊबंद पुष्कळ असल्यामुळें त्यांस जाताशौच किंवा मृताशौच बहुधा नेहमीं असावयाचें; ह्या अडचणीमुळें त्यांच्या स्नानसंध्यादि नित्यकर्मास व भगवद्भजनास व्यत्यय येऊं लागला. त्यामुळें गांवांत राहणें सोडून कोठें तरी गिरिकंदरी जाऊन बसावें, असा त्यांनीं निश्चय केला व त्याप्रमाणें, एके दिवशीं, गुप्तपणे गांव सोडून, भिंगारच्या पूर्वेस १३-१४ कोसांवर डोंगरांत वृद्धेश्वर (म्हातारदेव) नामक एक पुराणप्रसिद्ध स्वयंभू शिवलिंग आहे, तेथें ते जाऊन राहिले. हें स्थळ अत्यंत रमणीय व शांत असून, तपस्वीजनांस अनुकूल अशी सृष्टीरचना व निसर्गसौंदर्य या ठिकाणीं आहे. दिनकरबुवांनीं येथील एका गुहेंत बारा वर्षे तप केलें, अशी आख्यायिका आहे. वृद्धेश्वरानजीक दक्षिणेच्या बाजूस डोंगरांत जी गुहा आहे तेथेंच दिनकरबुवा ध्यानस्थ बसत असत. कांहीं दिवस आसपासच्या गांवांतून मिळणार्‍या अल्प भिक्षेवर, कांहीं दिवस आसपासच्या गांवांतून मिळणार्‍या अल्प भिक्षेवर, कांही दिवस कंदमूलफलांवर निर्वाह करुन दिनकरबुवांनी अनेक पुरश्चरणें केलीं व समाधियोगाचा अभ्यास केला. याप्रमाणें ते भगवत्प्रातीच्या साधनांत निमग्न असतां, श्रीसमर्थांनीं त्यांस स्वप्नांत दर्शन देऊन त्यांच्या मस्तकीं आपला वरद हस्त ठेविला. पुढें एक वर्षांनें समर्थांनीं त्यांस प्रत्यक्ष उपदेश दिल्यावर त्यांच्या अनुष्ठानाची परिसमाप्ति झाली.
‘ययापूर्वी एक वर्षाआदि । फाल्गुनी पौर्णिमा निशिसंधी ।
दिनकरीं स्वानुभव प्राप्त स्वप्रसिद्धी । मस्तकीं विराजे वाम कर ॥’
हा साक्षात्कार शके १५७५ त झाला; या गोष्टीस आजच बरोबर २५५ वर्षे झालीं.
‘स्वप्नावस्थेमाजी चोखडें । जें देखिलें होतें श्रीगुरु रुपडें ।
तें न दिसेचि पाहतां पुढें । जागृतीसि येतां ॥
नाहीं जंव ज्ञानसिद्धि । न होतां प्रत्यक्ष गुरुवाक्यशुद्धि ।
जाली जरी पूर्ण समाधि । तर्‍ही अपक्कचि कीं ॥’
अशा समजुतीनें श्रीसमर्थांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठीं दिनकरबुवा फार उत्सुक झाले होतें.                               
ध्यानस्थ होतांच स्वप्नांतील मूर्तीशीं तादात्म्य व्हावें व नेत्र उघडतांच वृद्धेश्वराचा देखावा डोळ्यांपुढें दिसावा, असा प्रकार बरेच दिवस चालल्यावर, दिनकरबुवांनीं ‘मग आर्ताचिया पडिभारें । जिज्ञासा करुनि मोहरें ।
अर्थार्थाचियानुकारें । ज्ञानइच्छा धरुनि ॥
निश्चय केला निजमानसीं । मूर्ति जंव न देखे नयनासी ।
तंव न घेणें अन्नपानासी । आणि नाना उपभोग ॥’
याप्रमाणें निश्चय करुन श्रीसमर्थांच्या दर्शनाची ते वाट पाहत बसले. अशा स्थितींत एक वर्ष गेल्यावर असा चमत्कार झाला कीं, श्रीसमर्थ एकदां जांबगांवाहून कृष्णातीराकडे आपल्या परिवारासह जात असतां, वाटेंत वृद्धेश्वराचें दर्शन घेऊन, तेथून सहा कोसांवर भातवडी नामक गांवीं, नृसिंहमंदिरांत मुक्कामास राहिलें; ‘तंव इकडे दिनकरासी ।
स्वप्नदर्शनाचिया हव्यासीं । परम क्लेश निजमानसीं । विरहें करुनि संतप्त ॥
शके पंधराशें शाहात्तरामाझारी । फाल्गुनी पौर्णिमा अवसरीं ।
श्रीरामदासकृपा दिनकरीं । स्वानुभवसुख प्राप्त ॥’
भातवडी येथील नृसिंहमंदिरांत समर्थ उतरले आहेत, ही हकीकत दिनकरबुवांस स्वप्नांत समजतांच, ते तत्काल त्या ठिकाणीं गेले; तेथें, शके १५७६ फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, रविवारीं सूर्योदयीं, श्रीनृसिंहमूर्तिसन्निध समर्थांनीं त्यांस उपदेश देऊन, त्यांचें नांव ‘दिनकर’ ठेविलें. ‘बोधुनि बोध प्रबोधनमार्गे । ठेविति वामकरा शिरिं वेगें । विप्रकुलोत्तम कर्म करावें ।
रामउपासन चित्तिं धरावें ।’ असें सांगून व दोन तसू उंचीची तांब्याची सीतायुक्त श्रीराममूर्ति दिनकरबुवांस देऊन समर्थ कृष्णातीरीं गेले. इकडे दिनकरबुवांनीं त्या मूर्तीची तीसगांवीं स्थापना केली व तेथेंच सांप्रदायाचा मठ करुन ते राहिले. दिनकरबुवा पुन: कधींही भिंगारास गेले नाहीत. समर्थांनी उदात्त राष्ट्रहितबुद्धीनें महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत १४ महंतांची योजना करुन जे १४ मठ स्थापन केले, त्यांत तीसगांवच्या दिनकरस्वामींचा मठही प्रसिद्ध आहे. इतर मठांप्रमाणें ह्या मठास जहागीर किंवा नक्त नेमणूक वगैरे कायमचें उत्पन्न कांही नाहीं; याचें कारण दिनकरबुवा हे पूर्ण निरिच्छ व वैराग्यसंपन्न असल्यामुळें त्यांनीं वैभवाची अपेक्षा कधींही केली नाहीं. ‘ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा ।
ॐ भवति या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥’
या समर्थोक्तीस अनुसरुन, केवळ भिक्षान्नावर आपल्या कुटुंबाचा योगक्षेम चालवावा व रामनवमीचा उत्सव करावा, हा दिनकरबुवांचा परिपाठ असे व हीच वहिवाट त्यांच्या घराण्यांत अद्याप चालू आहे. दिनकरबुवांस एक मुलगा होता, त्याचें नांव रामचंद्र. बुवांचे शिष्य अनेक होते त्यांत हे रामचंद्रच मुख्य होत. हेही विद्वान्‍ असून मोठे धर्मपरायण होते; तीर्थरुपांच्या पश्चात्‍ सांप्रदायाची कामगिरी यांनी उत्तम प्रकारें बजाविली.
दिनकरबुवांस तत्कालीन सरकारांतून व सरदार लोकांकडून इनाम जमिनी मिळाल्या, पण त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाहीं; दिलेल्या सनदा तशाच घरांत पडून राहिल्या. त्यांच्या कित्येक शिष्यांनी आपलीं वतनें दिनकरबुवांस अर्पण करुन दानपत्रें करुन दिली, त्यांचीही व्यवस्था वरील इनामपत्रांप्रमाणेंच झाली. निस्पृहपणें धर्मोपदेश करुन, केवळ परोपकारार्थ व ईश्वरसेवनांत ज्यानें आपलें आयुष्य घालविलें, त्याच महात्म्यास ‘संत’ व ‘महंत’ या पदव्या शोभतात, इतरांचे ठायीं त्यांचा विपर्यास मात्र होतो. दिनकरबुवा जसे मोठे महंत होते, तसेच ते कवीही होते. बुवांच्या कवितेसंबंधाने त्यांच्या एका शिष्यानें म्हटलें आहे:-
‘नमनें ग्रंथ प्रबंध श्लोक वदले निपुण । करुनी स्वानुभवदिनकर भक्तिविवेक । कलापषोडश किरणें अष्ट दशक एक ।’
दिनकरबुवांनी’ ‘स्वानुभवदिनकर’ नामक एक मोठा ओवीबद्ध ग्रंथ व श्लोक, पदें, अभंग वगैरे फुटकळ कविता पुष्कळ केली आहे. पैकी स्वानुभवदिनकर हा ग्रंथ धुळें येथील सत्कार्योत्तेजक सभेनें हल्लीं प्रसिद्ध केला आहे. ह्या ग्रंथांत वेदांत व भक्तिमार्ग यांचें विवेचन फार उत्तम प्रकारें केलें आहे. ह्याचे १६ कलाप असून ८१ किरणें आहेत व ओवीसंख्या ६७५० आहे. ह्याशिवाय स्फुट श्लोक सुमारें ६२५ व अभंग, पदें मिळून ७५०, अशी एकंदर १०,००० कविता उपलब्ध झाली आहे. दिनकरबुवांची कांही कविता हिंदी भाषेंत आहे. ह्यांच्या कवितेचे मुख्य विषय भक्ति, ज्ञान, वैराग्य इत्यादि असून, त्यांचें पर्यवसान श्रीरामोपासनेंत झालें आहे. दिनकरांचे चिरंजीव रामचंद्र यांनीही बरीच कविता केली, तीतील थोडीशी उपलब्ध झाली आहे; त्यांत दिनकरबुवांच्या दोन आरत्या आहेत. एका आरतींत असे चरण आहेत: -
‘दिनकर दिवाकर दीनबंधु दिनेशा । अपार नाममाला स्वयंज्योतिप्रकाशा ।’
यांतील पहिलीं चार नांवें दिनकरबुवांच्या कवितेंत, पदांच्या शेवटी असलेलीं आढळतात. सत्कार्योत्तेजक सभेनें प्रसिद्ध केलेल्या ‘रामदासी कविता, खंड १ ला’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेंत समर्थ शिष्यांची नामावली दिली आहे, तींत ‘दिनकर, दिवाकर व बहिणाजी’ अशीं तीन नांवे दिलीं आहेत; ती कदाचित्‍ एकट्या दिनकरबुवांचींच असण्याचा संभव आहे. दिनकरबुवा व त्यांचे चिरंजीव रामचंद्र यांशिवाय त्यांच्या वंशांत पुढें कोणी कवि झाला नाहीं. या पिता-पुत्रांच्या समाधि तीसगांवापासून थोडया अंतरावर आहेत. ह्यांचे वंशज तीसगांवच्या राममंदिराचे मालक असून, ते ‘रामदासी’ उपनांवानें प्रसिद्ध आहेत. श्रीदिनकरबुवा रामदासी यांची वंशावळ येणेंप्रमाणे: -
दिनकरबुवा

रामचंद्र

बाबाजीबुवा

नारायणबुवा

राजाराम

भानुदास

बाळकृष्ण

रघुनाथबुवा

रामकृष्ण

सीताराम
(विद्यमान)

लक्ष्मणबुवा
(विद्यमान)

नारायण  

गोविंद
(विद्यमान)

आत्माराम

श्रीराम

बाळकृष्ण

अण्णाबुवा
(कडेकर)


हल्लीं लक्ष्मणबुवा व सीतारामबुवा हे मंदिराची व्यवस्था पाहतात, व गोविंदबुवा हे तेथेंच सरकारी मराठी शाळेचे मुख्य शिक्षक आहेत.

दिनकरबुवांची गुरुपरंपरा
(रामचंद्रबुवांपासून चढती.)
‘एवं रामचंद्र दिनकर रामदास श्रीराम, वसिष्ठ, चतुर्मुख सर्वेश ।
परब्रह्म निर्गुण स्वयंप्रकाश । स्वानुभवी दिनकरीम परिपूर्ण ॥’
दिनकरबुवांची कविता अधिकारयुक्त दिसते, तींत उपमारुपकादि अर्थालंकार व अनुप्रासमयकादि शब्दालंकार वृत्तांचा उपयोग केला आहे. कवीनें श्लोकरचनेच्या कामीं निरनिराळ्या वृत्तांचा उपयोग केला आहे. तथापि शुद्धाशुद्धाकडे फारसें लक्ष्य न दिल्यामुळें, एकंदर कविता रामदासी थाटास शोभेल, अशीच उतरली आहे. दिनकरबुवांची वर्णनशैली पुढील श्लोकांत दिसून येते:-
प्रमाणिका.
‘गिरी प्रशस्त साजिरे । जसे अढेच पांजिरे ॥
दरे कुटया विशाळल्या । बर्‍या मनासि वाटल्या ॥
तरु प्रचंड दंडसे । उदंड जाड वाडसे ॥
फुलीं फळीं विराजती । सुगंध गंध माजती ॥
बहू विहंग गर्जती । मयूर फार गाजती ॥
झडाड वायु झाडितो । बळें तरु कडाडितो ॥
अशी वनांतरा बरी । हरीत रंग साजिरी ॥
प्रशस्त वाटली मना । नुरेचि कामकामना ॥
हें वर्णन, दिनकरबुवांनीं जेथें तपश्चर्या केली, त्या वृद्धेश्वरानजीकच्या अरण्याचें आहे. दिनकरबुवा निस्सीम रामभक्त होते, त्यांस पुत्रप्राप्तिविषयी व स्वानुभवदिनकर ग्रंथाविषयीं श्रीरामचंद्रांनी वरप्रदान दिल्याचा उल्लेख त्या ग्रंथांत आहे. दिनकरबुवांस काव्यस्फूर्ति बालपणींच झाली असावी असें वाटतें. ह्यांच्या धार्मिक, दयाळू आणि वैराग्यशील वृत्तीसंबंधानें त्यांचे मातेनें काढिलेले उद्गार, त्यांनीच एका अभंगांत नमूद केले आहेत: -
‘जननी म्हणे बापा ऐकें दिनकरा । अज्ञान तूं खरा कळलें मज ॥१॥
मज शिकविसी दानधर्म करीं । लोक घरोघरीं पाहें कैसे ॥२॥
कैसें पाहें जन नांदे धनधान्यें । मिरविती भूषणें परोपरी ॥३॥
परोपरी कां रे छळिसी आम्हांसी । कायी या धर्मासी म्हणो तुझ्या ॥४॥
तुझ्यासंगे आम्हीं दिनकरा जाण । जालों हीन दीन माता म्हणे ॥५॥

पुढील श्लोकांतील उपदेश किती उदात्त आहे !
‘जननिपद पराचे अंगनेलागिं द्यावें । परधन निजस्वार्थे स्वप्निंही नातळावें ॥
घडिघडि रसनेनें रामपीयूष घ्यावें । दिनकरमय रामीं रामरुप स्वभावें ॥१॥
मना मानसी थोर धारिष्ट घ्यावें । मना हीन वाचाल्य सोडोनि द्यावें ॥
मना ज्ञान वैराग्यपंथीं भरावें । सदां सर्वदा रामदासीं भजावें ॥२॥
मना सज्जना सज्जनीं सज्ज व्हावें । मतीहीन तात्पर्य सोडोनि द्यावें ॥
स्वधर्मे स्वहीतार्थ रामीं रमावें । करावें असें तेंचि जालें म्हणावें ॥३॥
जाला अन्याय मोठा विषय विषकुटा सेविला म्यां वरिष्ठा ।
तेणें योनी अचाटा प्रतिगमन कटा दैन्य तो योग खोटा ॥
जाणेना मी करंटा तवपदिं निकटा राहतां वीट मोठा ।
तो वारीं शीघ्र ताठा दिनकर प्रभु तूं रामचंद्रा वरिष्ठा ॥४॥
दास्य ज्यासि न घडे जनकाचें । तेंचि जाण सहसा जन काचे ॥
भावपूर्वक पुजी जनकासी । तोचि वास करितो जन काशी ॥५॥
दास्य ज्यासि न घडे जननीचें । ते पडोत पतनीं जन नीचे ॥
भक्तिभाव हृदयीं जननीचा । देत उच पदवी जन नीचा ॥६॥
सुखमया समया जरि लाहिजे । तरि मना सुमना गति पाहिजे ॥
सुखरुपें स्वरुपें सुगतीसि ये । पतितही परि मोक्षनिवासिये ॥७॥
अपेयपानें पद ये विधीचें । तैं कां करावें करणें विधीचें ॥
अभक्ष्य खातां जरि मोक्ष होतो । कां राक्षसांला तरि नर्क हो तो ॥८॥
समस्त व्यस्त अस्तवी । प्रशस्त वस्तु शस्तवी ॥
निबीड नित्य नूतनू । कविकृतांतसूदनू ॥९॥
सुगंध चर्चिलें खरा । न सोडि जेविं आखरा ॥
तसा मदांध बोधिला । परंतु तो भवाधिला ॥१०॥
झडकरि झडकावें स्थीर कोठें न व्हावें ।
न पुसत सकळांला गुप्त होऊनि जावें ॥
स्थळगति न वदावी जावया यावयाची ।
प्रकटित न करावी मात जे अंतरींची ॥११॥
दिनकरकुलवल्ली लोळली अंगभारें । रघुविर अवतारें दाटली थोरथोरें ॥
सुखरुप सुखवासी राहिले योगराशी । सफळ शितळ छाया फावलीं रामदासीं ॥१२॥
तोंडावरी थुंकुनि कान फुंकी । भोंदुनियां लोक जनीं विवेकी ॥
न ऊठती अंकुर फुंकिल्याचे । पळोनि जाती मग बोडकीचे ॥१३॥
हा संसार पुढें पुन्हां तुजकडे येईल हें कैं घडे ।
ऐसें जाणुनि रोकडें हरि कुडें चौर्‍यांशिंचें सांकडें ॥
रामीं चित्त बुडे विवेक उघडे अज्ञान तें वीघडे ।
ऐसें जेथ घडे दिवाकर म्हणे लागा त्वरें त्याकडे ॥१४॥

अभंग.

रामेविण जीणें व्यर्थ जनीं वनी । मृत्तिकेसी धनी जाण बापा ॥१॥
बाप माय राम सर्वांचा आधार । तयाचा अव्हेर करुं नका ॥२॥
नका, रामेंवीण शीण असे थोर । म्हणे दिनकर रामदास ॥३॥

कीर्तना जावया नाहीं अराणूक । चाळणा अनेक संसाराची ॥१॥
संसाराची चिंता स्वप्नींही सुटेना । करी विवंचना अंतवंत ॥२॥
अंतवत राम नाचवी पापियां । दिनकरा माया करी ऐसें ॥३॥

परा द्वार साधूं जाणे । तोचि साधु पूर्णपणें ॥१॥
तैसे साधु कोण पुसे । ज्यासि स्वरुपज्ञान नसे ॥२॥
परात्पर पराद्वारें । प्राप्त होतसे विचारें ॥३॥
गुरुविण न कळे हें भडस । म्हणे दिनकर रामदास ॥४॥

समाधानापरतें सुख । पाहतां न दिसे नि:शेख (ष) ॥१॥
कालत्रयी अबाधित । रामें केलें सदोदित ॥२॥
ज्ञान देयीं हरपलें । ज्ञेय ज्ञानीं सामावलें ॥३॥
दिनकर रामीं रामदास । जनीं वनीं उदास ॥४॥

आत्मज्ञानेंविण नर । नर नव्हे खरा खर ॥१॥
व्हावें सावध नरदेहीं । आयुष्य जातसे लवलाही ॥२॥
गेली घटिका नये पुढें । स्वहित करावें रोकडें ॥३॥
दिनकर ज्ञानेंविण । न चुके जन्ममृत्यु शीण ॥४॥

बहुत काळ गेला उरलासे थोडा । चांडाळाच्या तोंडा राम नये ॥१॥
निंदेचा हव्यास करी रात्रंदीस । न सोडी कास (?) कीडा जेवीं ॥२॥
तेवीं पापियाचें जीणें कुंभिपाकी । दिनकरा निकी रामसोय ॥३॥

रिता अर्थ पराहातीं । देउनि करी कुंथाकुंथी ॥१॥
कैसें पाहें पां नवल । सूर्य अंधारें व्याकुळ ॥२॥
इच्छा धरितां व्याजाची । हानी होतसे मुद्दलाची ॥३॥
दिनकर रामदास म्हणे । दिवाळखोरी हें करणें ॥४॥

पदें.

तेंचि दिजे गुरुराजें । अपराजित महाराजें ॥ध्रु०॥
वेद निरंतर स्तविति अगोदर । गोचर नव्हे कधीं जें ॥१॥
चराचरी अनुपम्य परात्पर । अक्षर क्षर नव्हें जें ॥२॥
दिनकर चरणीं होउनि सादर । मागति सनकादिक जें ॥३॥

सदाशिव मनिं धरिं मनुजा । सोडीं जाया अनुजा ॥ध्रु०॥
बहुकाळ गेला भोगितां यातना । नोळखतां सनातना ॥१॥
नरदेहसार पुढें न लाहे । हित करिं लवलाहें ॥२॥
दिनकर म्हणे शिकविलें अनुभवीं । न बुडे सत्य तो भवीं ॥३॥

करुणालया रे रामराया ॥ध्रु॥
चौर्‍यांशिं लक्ष दुस्तर योनी । कैसें कीजे निस्तराया ॥१॥
प्राकृत हीन पतित प्राणी । भव भय भीति तराया ॥२॥
दिनकर म्हणे कृपा करुनियां । उपाय सांगत राया ॥३॥

(हिंदी)

दूरि करो गुमराई ॥बाबा॥ ध्रु०॥
तेढि वातसें कछु नहिं काम । अच्छि हे गरिबाई ॥दुरि०॥१॥
बुरे फेलसें कौउन जिंके । जमकि बुरी खसलाई ॥२॥
कहे दिनकर एक राम भजनबिन । झूटी सब चतुराई ॥३॥

करम करामति काम कुसंग । त्यजिं भज राम अनंत अभंग ॥ध्रु०॥
निशिबासर यहि बाणि बखान । रामहि रामसुधारसपान ॥१॥
सारसुधारससें अगणित । दीन दिवाकर सो सुख लेत ॥२॥

"स्वानुभवदिनकरां" तील निवडक ओंव्या.
श्रीराम जयराम जयजयराम । नित्य स्मरणाचा हाचि असावा नेम ।
त्यावांचूनि मिथ्या श्रम । वायांविण करुं नये ॥१॥
वैराग्य करावें विवेकयुक्त । प्रतिज्ञा म्हणवावें श्रीरामभक्त ।
पदार्थमात्रीं कदापि आसक्त । प्राणांतींही न व्हावें ॥२॥
जितुकी गोष्टी मुखें बोलावी । तितुकी क्रिया करुनि दाखवावी ।
सत्क्रिया उत्तरोत्तर वाढवावी । धर्मशास्त्रें विचारेंशी ॥३॥
या लोकांए ठायीं नाहीं एक निश्चय ।
म्हणोनि यांसी होती नाना अपाय ।

पा नं. ९२ --       
तर्‍ही आपुल्या स्वहिताचा उपाय । प्राणांतींही न देखती ॥४॥
आपणासी लागला रोग क्षय । वैद्य दुसर्‍यासी करी औषधोपांय ॥
आयुष्य भविष्यतेचा अन्वय । नाडिज्ञान निदानेंशी ॥५॥
पराव्यासि नाना उपदेश करिती । कर्तव्य न कर्तव्या स्थापिती ।
परी आपुला मूलान्वय न विचारिती । गहींसपणें मूर्खत्वें ॥६॥
दीप घरच्यांसी करी समोंता उजेड । परी अंधारे व्यापले तें न देखे बुड ।
तेवीं आपुलें स्वहित न जाणोनि मूढ । आणिकां बोधिती नानापरी ॥७॥
तर्‍ही कोण्हीएकीं ऐसें न करावें । संसारी आलियातें सहज स्वभावें ।
अनन्य भावें स्वहित साधावें । शरण रिघोनी श्रीगुरुसी ॥८॥
मनाचा स्वभाव चंचळ आहे । मन क्षणैकही निश्चळ न राहे ।
अवस्तुसी वस्तुत्वें पहात राहे । आणि वस्तुसि विसरे तत्काळ ॥९॥
म्हणोनि हें चित्त जिंकिल्याविण । जितुके साधन तितुका शिण ।
अभिनिवेशासीच होय कारण । तेथें परमार्थ कैंचा ॥१०॥
केवढा या चित्ताचा चमत्कार । महा तपस्वियांही तत्काळ करी असुर ।
आणि गृहस्थाश्रमीयां करुनि योगेश्वर । दैवी संपत्ती त्यां देतसे ॥११॥
अहो न होतां चित्त हें आपवर्ग । त्रिभुवन विजयासी होती उपसर्ग ।
नहुष पावलीयाहीवरी स्वर्ग । चित्तें तत्काळ पाडिला ॥१२॥
असो, करावयासी मनोजय । मुख्य पाहिजे सत्संगाची सोय ।
सत्संगें संसारवासनात्यागाचा अन्वय । सहजचि साधे ॥१३॥
संती संसार केला मोक्षरुप । संतकृपा शीतळ त्रिताप ।
स्वानुभवें दिनकरा ऐसें पडप । सद्गुरुचिया अनुग्रहें ॥१४॥
संत विवेकाचे आगर सदा । सारासारविचार नित्य धंदा ।
दृष्टिमात्रें संसारदैन्य आपदा । भाविकांची निरसिती ॥१५॥

सच्छिष्यलक्षण.
अध्यात्मग्रंथांची आवडी । लिहिण्या वाचण्याची गोडी ।
आश्रमधर्माची परवडी । यथायुक्तपणें ॥१॥
प्रपंचावरी नित्य उदास । संसाराचा अत्यंत त्रास ।
नाना सायासें परमार्थास । लिगटोनि जाणें ॥२॥
कार्य करुनि अतिसावध । राजकारणीं असोनि विविध ।
साबडेपणीं अतिसावध । वेष भाविक बावळा ॥३॥

जो सत्य साचार सात्त्विक । ज्यासी कदा काळीं नावडे दांभिक ।
भोळा साबडा भाविक । तो सच्छिष्य जाणिजे ॥४॥
समर्थांप्रमाणे त्यांचे शिष्यही राजकारणी असत, ह्या विधानाला हा एक सबळ पुरावा आहे. परमार्थ साधीत असतां राजकारणें करावयाची हा समर्थसंप्रदायाचा मुख्य विशेष होय व ही संप्रदायपरंपरा दिनकरबुवांनींही चालविली होती, हें वर दिलेल्या मोठ्या अक्षरांतल्या ओवीवरुन स्पष्ट होत आहे.

कलियुगवर्णन.
कलियुगीं परमायुष्य वर्षे शंभर । अन्नमय प्राण वर्ते साचार ।
बौद्ध आणि कल्कि अवतार । या कलियुगामाजी ॥१॥
कलियुगीं पुण्याची वार्ता बुडाली । पापाची वृद्धि फार झाली ।
सांगतां या कलियुगाची चाली । चित्त कांटाळे सर्वथा ॥२॥
बोलतां कलीचें महिमान । धर्म झाला कंपायमान ।
जे युगीं राजा यवन । तेथें अन्य वार्ता कायसी । ॥३॥
जे युगीं देवधर्म बुडाले । अवघे एकंकार जाले ।
सत्य जातीनिशीं हारपलें । स्वधर्मासकट ॥४॥
ब्राह्मण कर्मभ्रष्ट झाले । स्वाहा स्वधाकार राहिले ।
वर्णाश्रमधर्म बुडाले । जातीकुळेंशी ॥५॥
राजा देवद्रोही जाला । देवस्थळांचा उच्छेद केला ।
तीर्थमहिमा सकळ मोडिला । ठायीं ठायींचा ॥६॥
राजांची अनेक बंडे जालीं । गो ब्राह्मणावरी पालाणें पडिलीं ।
पृथ्वी हलकल्लोळ जाली । कोणी नव्हे कोणाचें ॥७॥
पर्जन्याचें अवर्षण अखंड । राजा प्रजा लोक दुखंड ।
पृथ्वी जाली शतसहस्त्र खंड । सौख्यवार्ता न दिसे ॥८॥
कुलस्त्रिया भ्रष्टविल्या यवनीं । ब्राह्मण जाले दासीगमनी ।
अंत्यजांचे गृहीं उत्तम वर्णी । बलात्कारें भ्रष्टिजे ॥९॥
तेणें जाला वर्णसंकर । वृद्धी पावला अनाचार ।
परस्त्री परद्रव्यापहार । परन्य़ून स्वेच्छा बोलती ॥१०॥
कुलवधू निर्लज्जा जाल्या । त्या हीन यातींशी रतल्या ।
लोकापवादें भ्रष्टल्या । देशोदेशीं फिरती ॥११॥
श्रीपाद जाले द्रव्याभिलाषी । साळी कोष्टी जाले जटिल संन्यासी ।
ब्राह्मण फिरती देशोदेशी । उपार्जना करित ॥१२॥
तीर्थक्षेत्रें व्रतें उद्यापनें । सकळही उच्छेदिलीं यवनें ।
धर्मचर्चा पुराणश्रवणें । कथा कीर्तनें राहिलीं ॥१३॥
अवघा जाला धुंधुकार । कोणाचें कोणी नायके उत्तर ।
बाहेर घालूनि माता-पितर । सासू-सासरा पाळिती ॥१४॥

या ओव्यांवरुन, विजापूरच्या आदिलशाही अंमलामुळें महाराष्ट्रास जी शोचनीय अवस्था प्राप्त झाली होती, तिची कांहींशी कल्पना होते. ह्या धर्मच्छलाचें वर्णन एकनाथ व समर्थ यांच्या ग्रंथांतही आढळतें. दिनकरबुवांनी ज्या स्वानुभवदिनकर ग्रंथांत वरील उद्गार काढले आहेत, तो ग्रंथ त्यांनी शके १६१६ (इ०स० १६९४) त लिहिली; ह्या वेळी मोगलांचा उपद्रव पुष्कळच कमी झाला होता. शिवाजी महाराजांना समाथिस्थ होऊन या वेळीं १४ वर्षे झाली होती व त्यांच्या मृत्यूनंतर संभाजीच्या कारकीर्दीत व त्याच्या पश्चात्‍ राजारामाच्या कारकीर्दीच्या आरंभी, अहमदनगर येथें येऊन राहिलेल्या औरंगजेबाच्या लष्करानें महाराष्ट्रांत जो धुमाकूळ माजविला, त्यास अनुलक्षून दिनकरबुवांनी वरील उद्गार काढले असावेत असें वाटतें. यवनांकडून होत असलेल्या धर्मच्छलाचीं ही त्वेषजनक वर्णनें वाचून, तत्कालीन महाराष्ट्रीयांच्या अंगावर शहारे येत असले पाहिजेत हें उघडच आहे व स्वराज्यस्थापनेच्या कामीं असल्यालोकांच्या मन:स्थितीचा फायदा शिवाजीमहाराजांस पुष्कळच झाला असला पाहिजे, यांत शंका नाहीं. मातापुरची देवी ही दिनकरबुवांची कुलस्वामिनी होय. हिचें ठाणें भिंगारानजीक सारोळें (वद्दी) येथें असल्याचा उल्लेख स्वानुभवदिनकराच्या प्रथम कलापांत केला आहे.
‘तेंचि नाम (येमाई) अद्यापि महागजरीं । भक्त वाखाणिताती परोपरी ।
ते भृगुवंशीचें वत्स गोत्र असती भिंगारी । ज्योतिषी उपनामक पाठक ॥१॥
ज्यांची भक्ति देखोनि उत्कट । आदिमाया सोडोनियां मूळ पीठ ।
सारोळें अधिष्ठान अति निकट । भक्तसाह्यतेकारणें ॥२॥
तें भृंगारीहूनि आग्नेयी दिशेसी । सारोळ असे क्रोशत्रयेंसी ।
तेथ अधिष्ठान धरणें आदिमायेसी । निजभक्तरक्षणानिमित्त ॥३॥
ते आदिमाया विश्वसंजीवनी । दिनकरें पूजिली सकळ उपचार योजुनी ॥
स्वानुभवदिनकराच्या १३ व्या कलापाच्या ४ थ्या किरणांत स्वामीनीं आपली वंशपरंपरा दिली आहे, ती येणेंप्रमाणें :-
त्या भृगुऋषीचें निवास क्षेत्र । भृंगार नामें अति पवित्र ।
जेथील रचना अनादि विचित्र । पुराणप्रसिद्ध जें असे ॥१॥
तेथें भृगुऋषीनें केलें पुरश्चरण । त्याच पुण्यें त्रिजगतीं विस्तारलें गहन ।
तया पुण्यप्रभवें वंश सकल पावन । अद्यापि चालतसे ॥२॥
वाजसनेयी शाखाध्ययन । वत्सगोत्री विराजमान ।
गणक ज्योतिर्विद विद्वज्जन । महापुण्यप्रतापी ॥३॥
तेचि वंशीं उपनाम पाठक । जनार्दन नामें पुण्यश्लोक ।
जो पुरश्चरणीं सूर्य उपासक । प्रतिज्ञासूर्य केला उभा ॥४॥
वाराणसी यात्रेचिया विलासें । ब्राह्मणसंतर्पण करितां हव्यासें ।
तेणें ऋण झालें अतिविशेषें । तेंही मागों आदरिलें ॥५॥
केला तिहीं बहुतचि निग्रह । आण शपथ दुराग्रह ।
तें सूर्यासी जालें दु:सह । तो खोळंबला प्रहर एक ॥६॥
तेणें चकित जाले सकळ लोक । तत्काळ ऋण जालें फारिक ।
क्षणमात्र जेथील तेथें सम्यक । सूर्यगमन पश्चिमे ॥७॥
असो, तेचि वंशीं कोनेरी पाठक । ज्याच्या दर्शनमात्रें होईजे पुण्यश्चोक ।
जन्मांतर ब्रह्मसमंधादि अनेक । कित्येकांचे नाशले ॥८॥
कित्येकांसी जाले चमत्कार । ब्रह्मराक्षस राहों न शकती समोर ।
ज्याचे घरीं दरवडा येतां चोर । निर्बंधनेसी बांधिले ॥९॥
त्याचे वंशीं नरहरी पाठक । सुब्राह्मण गणेश उपासक ।
स्नानसंध्या शुचिर्भूत सम्यक । वेदशास्त्रसंपन्न ॥१०॥
द्वारका नाम निजभार्या । धरुनि स्वधर्मतत्पर ॥११॥
तियेचे उदरीं जाला दिनकर । जो कां रामदासाचा नित्य किंकर ।
रामीरामदासकृपा स्वानुभवदिनकर । कलापकिरणें प्रकाशिली ॥१२॥
तो स्वानुभवदिनकर संपूर्ण । दिनकरें रामचंद्र निजात्मजेशीं आपण ।
रामचंद्रीं करुनियां समर्पण । निजाऐक्यता सहज स्थिती ॥१३॥

दिनकरबुवांस श्रीरामचंद्राचें वरप्रदान मिळालें तो प्रसंग: -
असो ऐक्यपणें श्रीराम । शब्द बोलिले निस्सीम ।
दिनकरा तुझे पूर्ण काम । होतील सर्वदा ॥१॥
यया वाक्यामृततुषारें । साजेपणें सुकतेनि अंकुरें ।
जी जी म्हणोनि दिनकरें । होईजे पुढां ॥२॥
तंव भक्तिभावभुवन दीपें । जगज्जनक त्रिभुवनभूपें ।
प्रसन्नता दिधले निजकृपें । वरदत्रय ॥३॥
प्रथम स्वानुभवदिनकर । ग्रंथ वदसी परिकर ।
तो स्वानुभवैक प्रकाशेल साचार । दिवाकरोपम ॥४॥
दुजें याचे श्रवणमननें निजध्यासें । निजसाक्षात्कार पाविजैल अनायासें ।
इहपरत्र परमसंतोषें । सुख लाधसी निश्चयें ॥५॥
तिजें एकवेळ निजानंदेसी । सुखें अवतरेन तववंशीं ।
श्रीरामरुपें दिनकरासी । त्रिवरद भाष ॥६॥
केवळ चंचळपणें पाहतां । श्रीराममूर्ति न लक्षे तत्त्वता ।
मग अंतरीं निजनामें ऐक्यता । स्मरिलें भावें ॥७॥
तिया नामस्मरणाचे सरिसें । झणे दृष्टीचा मळ लागेल ऐसें ।
श्रीरामरुप देखिलें वृत्ति समरसें । देदीप्यमान ॥८॥
स्वानुभवदिनकर ग्रंथांत कवीनें स्वत:स ‘दिनकर रामदास’ म्हटलें आहे; ‘अहो सर्वी असोनि सर्वातीत । एक रामदास सद्गुरु इत्यंभूत । म्हणोनि स्वानुभवदिनकरीं आद्यंत । दिनकर रामदा बोलिजे. ॥’
राजकीय धामधुमीच्या दिवसांत सामान्य लोकांनीं कसें वागावें हें दिनकरबुवांनीं खालील पद्यांत सांगितलें आहे:-

श्लोक. (प्रमाणिका.)
जयाकडे समर्थ राम । त्यासि काय धामधूम ।
मूढासि हे परंपरा । त्यजूनि निश्चयो खरा ॥१॥
सहाय राम तो कुळीं । करील काय रे हुली ।
उगेचि कां भरीं भरा । त्यजूनि निश्चयो खरा ॥२॥
करील राम तें खरें । अचूक तें विधीस रे ।
उगाचि संशयो नरा । त्यजूनि निश्चयो खरा ॥३॥
उठेल तें सुखें उठो । लुटेल तें सुखें लुटो ।
नये दुरुक्ति अंतरा । त्यजूनि निश्चयो खरा ॥४॥
जनीं वनीं निरंजनीं । नियंत राम रक्षणीं ।
छळाल कां दिवाकरा । त्यजूनि निश्चयो खरा ॥५॥
ह्या निश्चयपंचकांत वर्णिलेली ही धामधूम कोणती असावी बरें ? हे परंपरेस चिकटणारे मूढ लोक कोण ? त्याचप्रमाणें, दिनकरबुवा जो निश्चय करावयास सांगतात, तो कोणता ? निजामशाहीच्या अंत्यावस्थेंतील बेबंदशाहीसंबंधानें हे उद्गार असावेत असें रा०रा०अ०बा० रसाळ यांचें मत आहे. पण मला वाटतें, संभाजीचा वध झाल्यावर मोगल सैनिकांनीं महाराष्ट्रांत जो बेबंद धुमाकूळ माजविला होता, त्यास अनुलक्षून दिनकरबुवांनी हे उद्गार काढले असावेत. रामदासी संप्रदायाचें सामर्थ्य कशांत होतें, हें या उद्गारावरुन स्पष्ट दिसतें.
‘जनीं वनीं निरंजनी राम रक्षण करण्यास समर्थ आहे’. अशी दृढ भावना असलेल्या दिनकरबुवांसारख्या समर्थशिष्यानें ‘छळाल कां दिवाकरा । त्यजूनि निश्चयो खरा ।’ असा बाणेदारपणाचा प्रश्न करावा, हें अगदी साहजिक आहे. हल्लीं राजकीय बाबतींत पडणार्‍या आमच्यांतील पुढार्‍यांच्या अंगी हें निश्चयाचें बळ अगदीं क्वचित्‍ दृष्टीस पडतें; कारण त्यांस उपासनेचें सामर्थ्य नाहीं. ‘उपासनेला दृढ चालवावें;’ हे पहिलें तें हरिभजन । दुसरें तें राजकारण; ’ हा समर्थांनीं सांगितलेला महाराष्ट्र-धर्म आजच्या अवलंबनाशिवाय ‘धामधुमीच्या दिवसांत मनाचें स्वास्थ्य अढळ ठेवण्याइतकी विवेकशक्तीची जागृति व दुरुक्तीचा उच्चार न होण्याइतकी निश्चयाची दृढता कोणत्याही समाजधुरीणास प्राप्त होणार नाही.’ समर्थांच्या कर्तृत्वाचें प्रतिबिंब त्यांच्या शिष्यवर्गाच्या अंत:करणावर इतकें स्पष्टपणें उमटलेलें पाहून, खुद्द समर्थांच्या अंत:करणाची स्थिति किती उदात्त आणि निश्चयपूर्ण असली पाहिजे, याची कल्पना सहज होते. वरील निश्चयपंचकांत जी तेजस्विता आणि जें आत्मविश्वासाचें बळ प्रदर्शित झालें आहे, तो सगळा उपासनामार्गाचा प्रभाव होय. स्वत:च्या सामर्थ्यावर पूर्ण श्रद्धा असणें, हें दैवी प्रसादाचें निदर्शक होय; व हा दैवी प्रसाद उपासनेशिवाय प्राप्त होणें दुरापास्त होय. महाराष्ट्रीयांनीं ह्या गोष्टीचा अवश्य विचार करावा. शके १५६४ त भिंगार येथें दिनकरबुवांनीं भागवत ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख आढळतो. त्यांस शके १५७६ त समर्थांचा अनुग्रह झाला व शके १६१६ त त्यांनी स्वानुभवदिनकराची रचना केली, हें पूर्वी सांगितलेच आहे. शके १६१२ ते १६१८ पर्यंत त्यांच्या नांवाचा उल्लेख कागदपत्रीं आढळतो; पुढें त्यांचे चिरंजीव रामचंद्र यांचेंच नांव सर्वत्र आढळतें. दिनकरबुवा हे रामदासी संप्रदायी असतां, पंढरपुरवर्णन व पांडुरंग यांवर त्यांनीं पुष्कळ कविता केली आहे व यावरुन रामदासी व वारकरी संप्रदायांतील विरोधाभास म्हणजे अज्ञान लोकांनी उत्पन्न केलेला केवळ आभासच होय, हें अगदीं स्पष्ट होतें. दिनकरबुवांची एकंदर कविता सुमारें १०००० असून, ती, शेवगांव जिल्हा अहमदनगर येथील शिक्षक रा०रा०अ०ब० रसाळ यांच्याच श्रमाचें फल होय, हें मी येथें कृतज्ञतापूर्वक नमूद करितों. तीसगांव येथें दिनकरबुवांच्या घराण्यांतील पुरुषांच्या तीन चार समाधि जवळ जवळ आहेत, त्यांत दिनकरांची समाधि कोणती, हें समजण्यास साधन नाहीं. जी समाधि सर्वांत जुनी दिसते, तीच बहुधा दिनकरांची असावी, असें वाटतें. यांपैकीं एका समाधीवर पुसट अक्षरांनीं लिहिलेला एक श्लोक आहे, तो असा: -
‘बाह्या तिथी कृष्ण जुग्राथ ज्येष्ठा । त्रिसष्ट सोळा छकै काल पुष्टा ॥
दिना दास राम प्राण जाला । श्रीरामचंद्रस्वरुपीं मिळाला’ ॥
परंतु हा श्लोक ज्या समाधीवर आहे, ती दिनकरबुवांची नसावी असें वाटतें; कारणे ‘त्रिसष्ट सोळा’ म्हणजे शके १६६३ हा दिनकरांचा समाधि शक मानिल्यास, निधनकालीं त्यांचें वय १००-१२० वर्षांहून अधिक होतें, असें म्हणावें लागेल. ‘दिनादास राम प्राण जाला’ ह्या चरणांतील ‘दिनादास’ हे नांव दिनकरबुवांच्या कवितेंत कोठेंही आढळत नाहीं. तेव्हां ‘दिनादास’ म्हणजे दिनकरांचा शिष्य व पुत्र जो रामचंद्र, त्याची ही समाधि आहे, असें समजणें अधिक सयुक्तिक होईल. शेवटीं रामचंद्रबुवांनीं दिनकरबुवांवर लिहिलेली एक आरती येथें देऊन हा लेख करितों: -
‘ब्रह्मज्ञाना आगर सागर शांतीचा । कृपेचें माहेर उदधि करुणेचा ।
शरणागत जनवत्सल मेरु सत्त्वाचा । विवेकाचा नायक दायक मुक्तीचा ॥१॥
जयदेव जयदेव जयजय गुरुदेवा । जय दिनकरदेवा ।
निजभावें आरति तुज देसी निज ठेवा ॥ध्रु०॥
नित्यानित्यविचारें निजसुख दाविसी । मी मम निरसुनि माझें आत्मत्व देसी ।
जिवशिव भेदाभेदें स्वरुपी नुरवीसी । स्वानुभवें निजैक्य परब्रह्मेंसी ॥२॥
निजदासादिव स्वामी दीनाचा । म्हणुनि दिनकरस्वामी आळविती वाचा ॥
देवभक्तां ऐक्य करिसी तूं साचा । दिनकरनंदन राम शरण त्रिवाचा ॥३॥
महिपतींनीं आपल्या संतविजयाच्या १३ व्या अध्यायांत समर्थशिष्यांची नामावळी दिली आहे, तींत ‘दिनकर असती तिसगांवीं’ असा स्पष्ट उल्लेख आहे. दिनकरबुवांचे चिरंजीव रामचंद्रबुवा यांची श्रीसीतारासंवाद’ नामक एक ३३ अध्यायांचा ओवीबद्ध ग्रंथ रा० रसाळ यांस उपलब्ध झाला आहे, त्यांत दिनकरबुवा व श्रीसमर्थ यांच्यासंबंधानें बरीच नवीन माहिती आहे, असें समजतें. अमृतराय या नावाचे दोन कवि झाले, याबद्दलही सदर ग्रंथांत चांगला पुरावा आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या चौथ्या भागांत रामचंद्रबुवांचें चरित्र देण्याचा विचार आहे, तेव्हां ह्या मुद्यांचा विचार करुं.

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP