निरंजनबुवा

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


बाळाघांटी बंजरा नदीच्या तीरावर परळी  वैजनाथाच्या पूर्वेस चार योजने कळंब म्हणून एक गांव आहे. त्या गांवचे कुळकर्णी श्रीधरपंता श्रोत्री म्हणून कोणी गृहस्थ होते, त्यांचे चिरंजीव अवधूत हेच निरंजनबुवा ह्या नांवाने प्रसिद्धीस आले. ह्यांच्या मातुश्रीचे नाव लक्ष्मी. अवधूत यांस लहानपणींच घरच्या गरिबीमुळे गांव सोडून नौकरीकरितां पुण्यास राहावे लागले. कळंब गांवी नष्टे या आडनांवाचा कोणी वाणी होता त्याच्या अडतीचे काम हे पुण्यास राहून करीत. यांची दत्तावर अतिशय भक्ति असे. पुण्यास एकदां एका किर्तनांत ठाकुरदासबुवांनी श्रीमद्भागवतांतील यदुराजा आणि द्त्त यांच्या संवादाचे फ़ार प्रेमळ विवरण केले. त्या वेळी संसारव्यथेने तापलेल्या निरंजनबुवास अतिशय विरक्ति उत्पन्न होऊन त्यांनी ठाकुरदासबुवांचे पाय घट्ट धरले व ’ मजला श्रीदत्ताचे प्रत्यक्ष दर्शन करुन द्या " अशी त्यांस विनंती केली. तेव्हा बुवा म्हणाले ’ आम्ही फ़क्त कीर्तन करितो. ’ पण अवधूताची तळमळ कमी होईना. श्रीरघुनाथ भटजी नामक कोणी श्रीरामदासस्वामीसारखे ब्रह्मचारी सत्पुरुष नासिक येथे असल्याचे ऐकल्यामुळे ते नौकरी सोडून तिकडे गेले. वाटेत चिंचवड जुन्नर, इत्यादि ठिकाणच्या साधूंचे दर्शन घेत घेत शके १७७३ प्रजापती संवत्सरी कार्तिक वद्य चतुर्दशीस नासिक येथे जाऊन रघुनाथ भटजींचे  त्यांनी दर्शन घेतले. तेथेच मार्गशीर्ष शुद्ध एकादशीस भटजींकडून त्यांस गुरुपदेश मिळाला. निरंजनबुवा हे नांव उपदेश देतांना गुरुंनी ठेविले. कवित्वस्फ़ूर्तीही गुरुकृपेने याच वेळी झाली. गुरुकडून योगसाधन, आत्मज्ञान वगैरेची माहिती मिळाली परंतु श्रीदत्तदर्शनाची इच्छा तृप्त झाली नाही. तेव्हा गुरुची आज्ञा घेऊन बुवा गिरीनार पर्वतावरील दत्तपादुकांचे दर्शन घ्यावयास निघाले. अवधूत वृत्तीने सर्व मार्ग पायांनींच आक्रमण करुन बहुत कष्ट सोसून्न दत्ताचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन, परत नाशिकास येऊन त्यांनी गुरुची भेट घेतली. पुढे निरंजनबुवा कुटुंबातील मंडळीसह मिरज येथे गेले. तेथे श्रीमंत थोरले बाळासाहेब पटवर्धन यांनी बुवांचा उपदेश घेतला व त्यांच्या  वंशाकडे थोडेसे उत्पन्नही तोडून दिले. पुढे लवकरच बुवांनी चतुर्थाश्रम घेऊन शके १७७७ साली भाद्र्पद शुद्ध एकादशीस मिरज येथे देह ठेविला. त्यांस रामकृष्ण, योगिराज, विष्णु आणि वासुदेव असे चार पुत्र होते. पैकी वडील रामकृष्ण यांचे चिरंजीव वामनराव हे सुमारे १६ वर्षापूर्वी, ७० वर्षांचे होऊन वारले. त्यांचे चिरंजीव भास्करराव हे १९०३ साली मिरज संस्थानांतील मोडनिंब येथे मामलेदार कचेरीत कारकून होते. त्यानंतरची या घराण्यातील माहिती मिळाली नाही.
निरंजनबुवांनी " स्वात्मप्रचिति " ( ओव्या ५६५ ) ’ साक्षात्कार ( ७१० ) ’ रघुनाथचरित्र ( ३९६ ) ’ केशवचैतन्यकथाकल्पतरु ’ ( ७६० ) अशी चार मोठी प्रकरणे लिहिली. शिवाय मराठी व हिंदुस्थानी पदें आणि आरत्या भुपाळ्या वगैरे किरकोळ कविताही बरीच आहे. श्रीज्ञानदेवकृत ’ अमृतानुभवा ’ वरही या कवीने एक गद्य टीका लिहिली आहे. बुवांच्या कवितेपैकी ’ पतिव्रताख्यान ’ ( ओव्या ४३ ), निरंजनपर ओव्या ( ५२ ),  ’ गोंधळी ’ व ’ केशवचैतन्यकथाकल्पतरु ’ ही चार प्रकरणे काव्यसंग्रहांत प्रसिद्ध झाली आहेत. बुवांचे इतर ग्रंथ मिरजेस त्यांच्या वंशजांपाशी असतील किंवा मुंबईतील निर्णयसागर छापखान्यांत असतील. कोठेही असले तरी ते मिळवून प्रस्तुत चरित्रलेखनाच्या कामी त्यांचा उपयोग करणे हे कार्य माझ्या आटोक्याबाहेरचे आहे. " स्वात्मप्रचिति " व " साक्षात्कार " या ग्रंथात्तले कांही उतारे येथे देतां आले असते तर बरे झाले असते परंतु जी गोष्ट उघड उघड अशक्य तिच्या विषयी कुरकुर करण्यांत काय हंशील ? अस्तु. ' रघुनाथचरित्र ’ या ग्रंथात, आपले गुरु श्रीरघुनाथभटजी यांचे चरित्र निरंजनबुवानी दिले असले पाहिजे अशी माझी कल्पना आहे. बुवांच्या कवितेसंबंधाने काव्यसंग्रहकर्ते लिहितात, " बुवांची सर्वत्र कविता सोपी, रसाळ, प्रेमळ आणि भक्तिपूर्ण आहे. यांची पदे फ़ारच गोड असून मिरज प्रांती पुष्कळांच्या पाठांत आहेत. निरंजनबुबांच्या कवितेमध्ये वर सांगितलेल्या कवित्वगुणाशिवाय एक विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे, ती ही की ज्या ज्या ठिकाणी ते गेले व ज्या ज्या पुरुषांची दर्शने त्यांनी घेतली त्यांचे व इतर गोष्टींचे वर्णन त्यांनी खुलासेवार रीतीने केले आहे. त्यामुळे शके १७७३ च्या सुमारास पुण्यापासून नासिकास जाण्याचा व नाशिकाहून गिरनारास जाण्याचा त्या वेळ्चा पायरस्ता, वाटेतील गावे व तेथील साधु पुरुष आणि इतर लोक यांसंबंधाचे वर्णन वाचून इतिहासांत किंवा बखरींत वाचावयास न मिळणार्‍या अशा एका विशिष्ट समाजस्थितीची माहिती आपणांस मिळते ."

निरंजनबुवांच्या कवितेविषयी काव्यसंग्रहकर्त्यानी दिलेला अभिप्राय किती यथार्थ आहे, हे प्रस्तुत लेखाच्या शेवटी या कविच्या गंथांतले जे थोडेसे निवडक वेंचे दिले आहेत, त्यांच्या अवलोकनावरुन, वाचकांच्या लक्षात येईल. केशवचैतन्यकथाकल्पतरु, या ग्रंथात, तुकारामबुवांचे गुरु बाबाजी चैतन्य यांचे गुरुबंधु केशवचैतन्य यांचे चरित्र दिले आहे. हा ग्रंथ ’ कृष्णदास बैरागी ’ कृत ग्रंथाच्या आधाराने आपण लिहिला असे निरंजनबुवांनी खालील ओव्यात म्हटले आहे :-
कृष्णदास बैरागी परमभक्त । तेणे वर्णिला हा वृत्तांत ।
शके पंधराशे शहाण्णवांत । ग्रंथ पूर्ण पै जाला ॥
त्या ग्रंथाचेनि आधारे । बोलीलो वेडी वांकुडी उत्तरे ।
परिसोत भावीक भोळे । कृपा करुनि मजलागी ॥
हा कृष्णदास बैरागी कोणत्या कालीं व स्थली होऊन गेला व उपरि निर्दिष्ट ग्रंथाशिवाय त्याने आणखी कांही ग्रंथ लिहिले होते की काय हे समजण्यास कांही मार्ग नाही. आतां निरंजनकृत ग्रंथातील कांही उतारे येथे देतो.
पतिव्रताख्यान ( ओव्या )
वेद सर्वासो आधार । वेद सर्वांचे माहेर ।
वेदाचेनि पैलपार । पावले सर्व ॥१॥
तेथे बुद्धि पतिव्रता । दुबळी होवोनि दुश्चिता ।
गेली सांगावया हिता । आपुले गुज ॥२॥
वंदोनि श्रुतिमायेसी । सांगे दु:खाचिया राशी ।
ऐक माते, स्त्रीदेहासी । निर्मिले कोणे ॥३॥
स्त्रियेचा देह अमंगळ । स्त्रीदेह पापासी मूळ ।
स्त्रीदेहाचा विटाळ । मानिती ज्ञानी ॥४॥
स्त्रीदेह हे कोडे धन । स्त्रीचा देह पराधीन ।
स्त्रीदेह उघडे वान । झांकितां नये ॥५॥
मग म्हणे श्रुति आई । ’ ऐकले की बुद्धीबाई ।
स्त्रीदेहाची नवाई । सांगते तुज ॥६॥
स्त्रीदेह रामाची सीता । रुक्मिणा श्रीकृष्णकांता ।
स्त्री द्रृपदाची दुहिता । अहिल्या तारा ॥७॥
वसिष्ठाची अरुंधती । अत्रीची अनसूया सती ।
ऐशा स्त्रिया धन्य किती । जाल्या त्या सांगू ॥८॥
बुद्धि म्हणे ’ ऐक माते । धन्य होते त्यांचे भर्ते ।
जोडा माझिया दैवाते । मिळाला कैसा ? ॥९॥
हाते पाये लंगडा लुळा । नाही नाक कान डोळा ।
रुपाचा सोहळा । काय वो सांगू ? ॥१०॥
असो जैसा तैसा तरी । ऐक स्वभावाची परी ।
अविद्या दुराचारी । ठेविली तेणे ॥११॥
करितां तयेसी संसार । शतावधि जाली पोरे ।
मन आणि अहंकार । थोरले पुत्र ॥१२॥
त्यांनी पापाचे पर्वत । उभारिले असंख्यात ।
विषयभोगे उन्मत्त । होवुनी ठेले ॥१३॥
आशा तृष्णा कल्पना । लेकी झाल्या या तुफ़ाना
न म्हणती थोर साना । भोगिती सर्व ॥१४॥
काम क्रोधादि लेकुरें । खोडकर अनिवार ।
त्यांनी हागोनिया घर । नासिले सर्व ॥१५॥
ह्रदयाच्या माजघरी । पति निजतो बिळभरी ।
बरळतो नानापरी । अविद्यायोगे ॥१६॥
म्हणे जन्मतो मरतो । पाप पुण्यादि भोगितो ।
स्वर्ग नरकासि जातो । वारंवार ॥१७॥
माझे घर, माझे दार, । माझी संपत्ति हे पोर ।
माझा अवघा हा संसार । असावा सदा ॥१८॥
असो आतां मायाबाई । करुं उपायासी काई ? ।
व्रत आचरोनि पाही । जाळीन देह ॥
श्रुति म्हणे पतिव्रते । ऐक लेकी गुणवंत ।
माझे वचन निरुते । सांगते तुज ॥२८॥
पतिवांचोनिया व्रता । स्त्रियेने करुं नये सर्वथा ।
पतियोगे पतिव्रता । धन्य पै जाल्या ॥२१॥
स्त्रियांचा तो पति देव । व्रतदान पुण्ये सर्व ।
पति स्त्रियेचा तीर्थराव । वंदावा सदा ॥२२॥
पति जाणावा निर्दोष । पाहुं नये त्याचा दोष ।
सदा सर्वदा संतोषे । सेवावा पति ॥२३॥
पति मानावा गणगोत । प्ति स्त्रीचा परम आप्त ।
पति स्त्रियेचा परमार्थ । जाणाव सर्व ॥२४॥
करितां नित्य पतिसेवा । संतोष वाटतो देवा ।
लक्ष्मी पार्वती हेवा । करिती तिचा ॥२५॥
बुध्दि लेकी । धरी धीर । माघारी घरासी फ़ीर ।
भर्तारांची निरंतर । करावी सेवा ॥२६॥
वडिल बंधु तुझा सखा । विवेक नेई पाठीराखा ।
करिल अविद्येचा वाखा । देईल घालवूनि ॥२७॥
मन आणि अहंकार । अविद्येचा जो विस्तार ।
करिल तयाचा संहार । विवेक हा ॥२८॥
घेऊनि विवेकाचा फ़ाटा । झाडुनि काढी चारी वाटा ।
शमदमादि चोखटा । घाली गे सडा ॥२९॥
मुमुक्षता घेउनि फ़णी । घाली त्रिगुणाची वेणी ।
शुद्ध सत्व जीवनी । सुस्नात होई ॥३०॥
गुरुभक्ति पातळ चोळी । नेसुनि होई सोवळी ।
निश्चयाचे कुंकूं भाळी । अक्षयी लावी ॥३१॥
अमानित्वादि भांडार । उघडुनि घाली अलंकार ।
रत्नजडित परिसर । प्रकाशमय ॥३२॥
सर्व श्रृंगारा करोनि । जाई पतिसन्निधानी ।
स्तुतिस्तवना करुनी । उठवी पति ॥३३॥
श्रुतिमायेने कथिले । सदबुद्धिने तैसे केले ।
स्तवनासि आरंभिले । वेदांते करुनी ॥३४॥
’ उठा उठा पतिराया । कैसे भ्रमलांति वांया ।
जाणा ईश्वराची माया । मिथ्या ही सारी ॥३५॥
तुम्हां नाही देह गेह । कैचा पापपुण्या ठाय ? ।
स्वर्गनरकाची त्राय । फ़िटली सहजी ॥३६॥
तुम्ही निर्गुण निराकार । निर्मळ निश्चळ निराधार ।
अनंत पारावर । रहित तुम्ही ॥३७॥
तुम्ही ज्ञानघनानंद । परिपूर्ण असिपद ।
कैचा वायां करितां खेद । जागे व्हा स्वामी ॥३८॥
ऐसे करितां स्तवन । सांडोनिया जीवपण ।
प्रत्यगात्मा सावधान । होता पै झाला ॥३९॥
सद‍बुद्धिसी आलिंगुन । पावला तो समाधान ।
जाले पूर्वील स्मरण । त्यालागी सर्व ॥४०॥
बुद्धिसहवर्तमान । केला सद्गुरुसि शरण ।
त्याच्यायोगें पूर्णपण । पावता झाला ॥४१॥
तेथे बुद्धि पतिव्रता । विरुनी गेली सर्वथा ।
करुनी अपुल्या स्वहिता । पावली कीर्ती ॥४२॥
पतिव्रता आख्यान । जे का करिती स्मरण ।
तेहि होती निरंजन । रघुरवीरकृपे ॥४३॥
येवढया ओव्यांवरुन निरंजनबुवांच्या रचनाशैलीची ओळख वाचकांस होईल असे वाटते .

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP