मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
भरत जवळि नाहीं; मातुलगराम...

वामनपंडित - भरत जवळि नाहीं; मातुलगराम...

मराठी शब्दसंपत्ति


भरत जवळि नाहीं; मातुलगरामवासी;
भरतजननि धाडी कानना राघवासी; ।
दशरथ मृत झाला, राम जातां वियोगें;
तृण बहुत दिसांचें अग्निच्या जेविं योगें ॥१॥

मग भरत वसिष्ठें आणिला जों अयोध्ये,
नगरि गतधवा ते, आणि निर्वीर्य योद्धे, ।
जन मृतसम देखे; हेतु कांहीं कळेना;
जननिकृतकुचेष्टा बुद्धितें आकळेना ॥२॥
 
वृत्तांत सांगे भरतासि माय, स्वानंद जीचा त्रिजगीं न माय; ।
भेदूनि वक्षस्थल शब्द तीचा करी महाक्षोभ महामतीचा ॥३॥

जाळील तीतें निजदृष्टिपातें पाहे असा, हालविनाच पातें; ।
म्हणे, ‘ अहो पापिणी ! पापरूपें ! जळो तुझें तोंड जडस्वरूपे ! ॥४॥

जाळीन हें तोंडचि जाण आधीं, मुखें जाण देशि अनंत आधी; ।
न माय तूं वैरिणि होसि साची; माझे मनीं भाव खरा असाची. ॥५॥

गिरिवनाप्रति राम रमापती दवडिल्यावरि, मृत्युमुखीं पती ।
निजविला; मज हे विधवा धरा म्हणसि भोग अयोग्य वसुंधरा ॥६॥

न कळत पतिताचें खादलें अन्न ओकी
तरि पतित नव्हे तो, पापरूपें ! अवो कीं; ।
म्हणुनि तरि मला हें पाप तूझें न लागे. ॥७॥

मारेल सद्य मज, खाइन त्या विखातें
कीं पापियास निज पातक जेविं खातें ।
तूं पापिणी त्वरित जाशिल रौखासी;
होसी सदा निरयदारुण लोकवासी. ॥८॥

( घनाक्षरी )
अवो कैकयि ! हें काय केलें तुवां ? हाय ! हाय !
न म्हणवे तुज माय, जन्मोजन्मीं वैरिणी. ॥
सर्वजगदभिराम वना धाडिला तो राम; ।
केलें विख्यात कुनाम कीं हे पतिमारिणी. ॥
तुझ्या वधें न अधर्म; तुज मारावें हा धर्म; ।
परि निंदील हें कर्म राम पापकारिणी ! ॥
नाहीं तरी प्राण आज्य तुझें घालूनियां प्राज्य, ।
जाळूनियां सामराज्य दाखवितों करणी ! ॥९॥

( श्लोक )
धिक्कारूनी गोष्टि मातेसि सांगे; कौसल्येच्या ये गृहा सानुरागें; ।
त्यातें देखे जेधवां राममाय, श्रीरामाचा शोक लोकीं न माय ॥१०॥

मोकळा करुनि कंठ तेधवां, आठवूनि मनिं जानकीधवा,
ते रडे भरतही तसा रडे; जोंवरी नयन होति कोरडे ॥११॥

म्हणे ‘ वांसरा ! घात झाला असा रे ! तुझ्या माउलीचेच हे खेळ सारे.
वृथा धाडिला राम माझा वनासी; न देखों शके त्या जगज्जीवनासी ॥१२॥

अरे ! राघवें व्यापिले लोक सारे; तरी नावरे शोक माझा कसा ? रे ! ।
तृषाक्रांत डोळे घनश्यामरामा पहायास रे ! सर्वलोकभिरामा. ॥१३॥

जानकी जनकराजकुमारी, पाय कोमल जिचे सुकुमारी, ।
चालली जशि वना अनवाणी, बोलली कटकटा जनवाणी. ॥१४॥
सून सूनहि वनाप्रति जाती; आणि जे जित असेल कुजाती; ।

भरत शोक अनेक तिचे असे परिसतां, मग बोलत तो असे; ।
‘ जननि ! गोष्टी समस्तहि हे खरी; परिस येविषयीं मम वैखरीं. ॥१५॥

मी ब्रह्महत्याशतपाप लाहें, ठावें असे लेश जरी मला हें; ।
खड्गें वसिष्ठासि अरुंधतीतें वधीं, जरी ठाउक हें मतीतें ! ॥१७॥

म्हणे राममाता, ‘ अरे वांसरा ! मी तुझा जाणतें प्रेम - उल्हास रामीं; ।
तुला रामसेवेविणें काम नाहीं; न राज्यादिकांची जया कामनाही. ॥१८॥

तों वसिष्ठ वदला भरतातें, रमपदनिजलाभरतातें; ।
“ पाळिं यावरि समस्त धरा हे; राजनीति करिं; सावध राहें ॥१९॥

रायें तुतेंचि दिधलें स्वनृपासना रे !
संपूर्ण तूं जननीची करिं वासना रे ! ” ।
शब्दार्थ हे नकळती गुरुलाघवाचे,
साचे म्हणूनि पद आठवि राघवाचे. ॥२०॥

स्मरोनि ऐसें रघुनंदनातें त्या राघवाच्या पदवंदनातें ।
जावें, असा भाव धरूनि, साच बोले वसिष्ठाप्रतिही तसाच. ॥२१॥

“ राजाधिराज रघुराजचि एक जाणा;
पाहों चला सकळ जाउनि त्या सुजाणा; ।
आम्हीं समस्त जन किंकर राघवाचे;
जें रामनाम जपतों अजि नित्य वाचे ॥२२॥

विना रक्षसी कैकयी, काननातें चला सर्व पाहूं मृगांकाननातें; ।
प्रयत्नेंचि घेऊनि येऊं गृहातें; न येतां समर्पूं शरीरें स्वहातें ॥२३॥

येणार ते या, अथवा नकाही; राहेन मी हें न घडेचि कांहीं; ” ।
बोलोनियां स्पष्टचि चालिला हो; शोकांतही घे प्रभु नामलाहो. ॥२४॥

वसिष्ठ तो, आणि समस्त माया, रामार्थ टाकूनि समग्र माया. ।
सेना, प्रजा, सर्वहि त्याच वेळे जाती; जसे लंघिति सिंधु वेळे. ॥२५॥

पायीं निघे भरत सानुज रामवाटे; ।
रामविणें इतर इष्ट न कामवाटे. ॥
माथां जटामुकुट, वल्कल नेसला, हो ! ।
श्रीरामवेष, वदनीं प्रभुनामलाहो ॥२६॥

रामवल्कलजटादिक रीती; वेष तो उभय बंधु करीती; ।
राम सानुज तशा भरतातें देखती सकळ रामरतातें ॥२७॥

तों भेटला गुहकनाम किरात वाटे;
श्रीरामभक्त परमाप्त तयास वाटे; ।
गंगातटीं रघुपतीशयनास दावी
ते भक्ति काय म्हणुनी मुखिं हो ! वदावी ? ॥२८॥

दर्भनिर्मित तया शयनातें देखतां, उदक ये नयनातें; ।
भूतळीं भरत घालुनि घे हो ! त्या स्थळींहुनि न चित्त निघे हो. ॥२९॥

रामवृत्त रघुवंशरातें सर्व वर्णुनि, गुहाख्यकिरातें, ।
लंघुनी सुरनदी, भरतातें ने ससैन्य रघुराजरतातें ॥३०॥

कैकेयीच्या दुष्टभावें जळाला; इच्छी रामाच्या पदाच्या जळाला;
तों स्वामीच्या देखिलें आश्रमातें; कांहीं चित्तें टाकिलें हो श्रमातें ॥३१॥

पादचिन्हित तयें वसुधेतें देखता तृषित जेविं सुधेतें; ।
रामचंद्रपदसारसमुद्रा वाढवी भरतसौख्यसमुद्रा. ॥३२॥

घालूनि घे भरत, देखुनि त्या रजातें;
शत्रुघ्नही अनुसरोनि निजाग्रजातें; ।
चित्त स्मरे प्रभुचिया पदनीरजातें;
प्रेमप्रवाह नयनीं सुखनीरजातें. ॥३३॥

तनुवरी गुढियाच उभारती; कविमुखें किति वर्णिल भारती ?।
भरत ये रितिनें अजि लोळला; प्रभुपदाब्जरजीं बहु घोळला. ॥३४॥

‘ हा राम ! राम ! रघुनंदन ’ हेंचि वाचे;
चित्तांत ते चरण दीसति राघवाचे; ।
‘ ते रेणु हे मुकुटमंडप जे शिवाचे ’;
ऐसें म्हणे, त्यजुनि भाव अहो जिवाचे. ॥३५॥

भरत पदरजीं त्या घोळला दीर्घकाळ;
त्रिभुवनिंहि सुखाचा होय तेव्हां सुकाळ; ।
‘ न मिळति पदरेणू जे विरिंच्यादिकांही,
सुलभ मज ’ म्हणे ‘ हें भाग्य माझेंचि कांहीं. ’ ॥३६॥

देखोनि रघवपदाभरजास वाटे,
लोटांगणीं गडबडी सुख फ़ार वाटेल ।
आनंदनीर हृदयीं नयनांबुजाचें
चित्तांत रामपद घे रज अंबुजाचें. ॥३७॥

वंदी असा सानुज राघवाचे, ते पादरेणू रघुराघवाचे, ।
प्रत्यक्ष तो राघव देखिला हो ! झाल सुखाचा अवितर्क लाहो ॥३८॥

वामअंकगत भूमिकुमारी, वामबाहुसुरता सुकुमारी; ।
वल्कलांबरजटाअ अभिरामा, देखतो भरत त्या रघुरामा ॥३९॥

दूर्वादलश्यामल दीप्ति देहीं; सेवो पदें लक्ष्मण तो विदेही; ।
गंगातटीं सेवित मंदवातें, देखे अशा श्रीरघुपुंगवातें. ॥४०॥

देखोनि ऐसें रघुमंदनातें, धांवे त्वरेनें पदवंदनातें; ।
अलभ्य जो हर्ष सुरादिकांही, तो होय; त्यामाजिक शोक कांहीं. ॥४१॥

रडे; फ़ुंदफ़ुंदे; शिरीं पादपद्मा धरी; सद्म मानीतसे ज्यास पद्मा; ।
बळें क्षेम दे त्यास ओढूनि रा, स्वभक्तप्रिय स्वामि विश्वाभिराम. ॥४२॥

मांडियेउपरि बैसविला हो अश्रुनीर पुशि दे सुखलाहो; ।
‘ वांसरा ! न रड; सांग सुवार्ता; अब्द हो निवर्वि दु:खदवार्ता. ” ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP