लक्षणे - २२ ते २५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२२
नमूं वागीश्वरी शारदा सुंदरी । श्रोता प्रश्न करी व्यक्तयासी ॥१॥
वक्तयासी पुसे जीव हा कवण । शिवाचें लक्षण सांगा स्वामी ॥२॥
सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा । बोलिजे अनात्मा तो कवण ॥३॥
कवण प्रपंच कोणें केला संच । मागुचा विसंच कोण करी ॥४॥
कोण ते अविद्या सांगिजे ती विद्या । कैसें आहे आद्याचें स्वरूप ॥५॥
स्वरूप तें माया कैसी मूळमाया । ईस चाळावया कोण आहे ॥६॥
आहे कैसें शून्य कैसें तें चैतन्य । समाधान अन्य तें कवण ॥७॥
कवण जन्मला कोणा मृत्यु आला । बद्ध मुक्त जाला तो कवण ॥८॥
कवण जाणता कोणाची हे सत्ता । मोक्ष हा तत्वता कोण सांग ॥९॥
सांग ब्रह्मखूण सगुण निर्गुण । पंचवीस प्रश्न ऐसे केले ॥१०॥

२३
सत्य राम येक सर्वहि माईक । जाणावा विवेक योगियांचा ॥१॥
योगियांचा देव तया नाहिं खेव । जेथें जीवशिव ऐक्यरूप ॥२॥
ऐक्यरूप जेतें हें पिंडब्रह्मांड । तें ब्रह्म अखंड निराकार ॥३॥
निराकार ब्रह्म बोलताती श्रुती । आद्य मध्य अंतीं सारिखेंची ॥४॥
सारिखेंची ब्रह्म नभाचीये परी । सबाह्य अंतरीं कोंदलेंसे ॥५॥
कोंदलेंसे परी पाहतां दिसेना । साधुवीण येना अनुभवा ॥६॥
अनुभवा येना ब्रह्म हें निश्चळ । जया तळमळ संसाराची ॥७॥
संसाराचें दुःख सर्वहि विसरे । जरी मन भरे स्वस्वरूपीं ॥८॥
स्वस्वरूपीं नाहिं सुख आणी दुःख । धन्य हा विवेक जयापासीं ॥९॥
जयापासीं ज्ञान पूर्ण समाधान । त्याची आठवण दास करी ॥१०॥

२४
ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं । देवा तुझी भेटी केविं घडे ॥१॥
भक्तांसी निंदिती अभक्त दुर्जन । दुर्जनासी जन निंदिताती ॥२॥
भिन्न उपासना भिन्न संप्रदाव । येकमेकां सर्व निंदीता ॥३॥
क्रियेसी निंदीतीती क्रियाभ्रष्ट ज्ञानी । क्रियाभ्रष्टां जनीं निंदीताती ॥४॥
निस्पृहां निंदीती संसारीक जन । संसाकां जनरी निंदीताती ॥५॥
पंडितां पंडितां वेवाद लागला । पुराणिकां जाला कळहो थोर ॥६॥
वैदिकां वैदिक भांडती निकुरें । योगी परस्परें भांडताती ॥७॥
प्रपंची परमार्थीं भांडण तुटेना । लोभ हा सुटेना तेणें गुणें ॥८॥
स्मार्त ते वैष्णव शाक्त आणी शैव । निंदीताती सर्व परस्परें ॥९॥
स्वजाती विजाती भांडण लागलें । दास म्हणें केले अभिमानें ॥१०॥

२५
बहुसाल शीण होतसे कठीण । देवासी जतन करावया ॥१॥
करावया भक्ति भावें महोत्सव । देवासाठीं राव वोळगावा ॥२॥
वोळगावा रावा राखावया देव । देवासी उपाव मनुष्याचा ॥३॥
मनुष्याचा देव पूजीतां कष्टलों । कासावीस जालों वाउगाची ॥४॥
वाउगाची देव पाषाणाचा केला । भाव हा लागला तया पासीं ॥५॥
तयापासीं मन अखंड लागलें । तों तया फोडीलें कोण्ही येकें ॥६॥
कोण्ही येकें बरा विवेक पाहावा । देवाआदिदेवा वोळखावें ॥७॥
वोळखावें देवा निर्मळा निश्चळा । निर्गुणा केवळ निरंजना ॥८॥
निरंजना देवा कोण्ही उच्छेदीना । फुटेना तुटेना कदाकाळीं ॥९॥
कदाकाळीं देव पडेना झडेना । दृढ उपासना रामदासीं ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP