लक्षणे - १० ते १३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


१०
आपुल्या भजनें पोटही भरेना । लागे उपार्जना दुसर्‍याची ॥१॥
दुसर्‍याची सेवा करितां वेतन । पाविजेतें अन्न लोकामधें ॥२॥
लोकामधें उपासितां देहदारा । मागावा मुषारा कोणापासीं ॥३॥
कोणापासीं कोणें काये हो सांगावें । कैसेनि मागावें वेतनासी ॥४॥
वेतनासी जनीं तरीच पाविजे । जरी सेवा कीजे स्वामीयाची ॥५॥
स्वामीयाची सेवा करितां उत्पन्न । स्वामी सुप्रसन्न होत असे ॥६॥
होत असे देव संतुष्ट भजतां । मुक्ति सायुज्यता तेणें लाभे ॥७॥
लाभे नवविधा तेणें चतुर्विधा । पुसावें सुबुद्धा सज्जनासी ॥८॥
सज्जनासी पुसा देहासी भजतां । भार भगवंता कैसा पडे ॥९॥
कैसा पडे भार देहाच्या भजनें । भक्तीचेनि गुणें देव पावे ॥१०॥
देव पावतसे भजतां देवासी । सेवितां देहासी देव कैचा ॥११॥
देव कैचा देव सेविल्यावांचुनी । तत्वविवंचना दास म्हणे ॥१२॥

११
येतां संसारासी जाल्या दुःखरासी । कोणाला असोसी कासयाची ॥१॥
पात्र कोण्ही येक भरला वमक । खायाचा विवेक तेथें कैंचा ॥२॥
विषय नासका कळला असका । सुख नाहें येका देवेंविण ॥३॥
देवेंवीण येका सर्व कांहिं फोल । वासना गुंतेले कोणे ठाईं ॥४॥
कोणे ठाईं आतां असोसी राहिली । वासना गुंतली रामपाई ॥५॥
रामपाईं जन्म मृत्यु आडळेना । दास म्हणे मना सावधान ॥६॥


सावधानपणें कांहिंच नुरावें । त्वरें उद्धरावें कोण्ही येकें ॥१॥
कोण्ही येकें इच्छा देवाची मानावी । आपुली नाणावी वासना हे ॥२॥
वासनेसी मनापासूनि कंटाळा । जन्मासी वेगळा सहजची ॥३॥
सहजची आतां मन कंटाळलें । पोंचट वाटले सर्व कांहिं ॥४॥
सर्व कांहिं दीसे मिथ्या वोडंबरी । साचाचीये परी कोण मानी ॥५॥
मानेसेंहि नाहीं असोसीही नाहीं । दास कांहिं नाहिं राम येक ॥६॥

१३
सर्व कांहि चिंता केली भगवंतानें । आपुले चिंतेनें काय होतें ॥१॥
काय होतें देव कांहीं कां करीना । विश्वासानें मना उर्ध्वगती ॥२॥
उर्ध्वगती हे तों बुद्धीच्या वैभवें । उत्तराई व्हावें काय आतां ॥३॥
काय आतां द्यावें काय आहे माझें । मीपणाचें वोझें कासयासीं ॥४॥
कासयासी चित्त दुश्चित्त करावें । संसारी तरावें देवाचेनि ॥५॥
देवाचेनि नामें हरतील कर्में । परी नित्यनेमें जपध्यान ॥६॥
जपध्यान पूजा आखंड करावी । बुद्धी विवरावें देव देणें ॥७॥
देवदेणें बुद्धी तेणें सर्व सिद्धी । गती निरवधी होत असे ॥८॥
होत असे गती देवीं विश्वासतां । चिंता नाहीं आतां कासयाची ॥९॥
कासयाची चिंता कासया करावी । भक्ती हे धरावी राघवाची ॥१०॥
राघवाची भक्ती तेणें होय मुक्ती । भक्तीविण युक्ते कामा नये ॥११॥
कामा नये युक्ती धरावा विश्वास । सांगतसे दास प्रचीतीनें ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP