अध्याय ५४ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स्यंदने गरुण्डकेतुमंडने कुंडिनेशतनयाधिरोपिता ।
केनचिन्नवतमालकोमलश्यामलेन पुरुषेण नीयते ॥१॥

गरुडध्वज झळके ज्यासी । तोडर गर्जे चरणेंसीं । वीज बांधिले मेखळेसी । तैसा कांसेसि पीताम्बर ॥३॥
तिलक रेखिला पीवळा । मुकुट कुंडलें वनमाळा । डोळस सुंदर सांवळा । भीमकबाळा तेणें नेली ॥४॥
मागध म्हणती गेली वाटीवं । धैर्य गाम्भीर्य वैभव । यशकेर्तीची राणीव । नेले सर्व यादवीं ॥५॥
धिग्धिग् जालेपण जिवाचें । येथूनि परतणें तंव कैचें । गोवळीं यश नेलें आमुचें । म्हणोनि कवचें बाणलीं ॥६॥
पाठीची हिरोनि नेली भाज । त्याहूनि कवण थोर लाज । कवणें निर्वाणीचें झुंज । म्हणोनि पैज घेतली ॥७॥

इति सर्वे सुसंरब्धा वाहानारुह्य दंशिताः ।
स्वैः स्वैर्बलैः परिक्रांता अन्वीयुर्धृतकार्मुकाः ॥२॥

वीर वळघले असिवारीं । नाचती तीं पायांवरी । हो हो मामाजीजीकारीं । यावा स्वारीं दाविला ॥८॥
पुढें पायांचे मोगर । अढाउ चालती गंभीर । सेली सावली कोतेकार । धनुर्धर पायांचे ॥९॥
रथ जोडियेले एकवाट । वरी चढिले वीर उद्भट । घडघडिले चक्रवाट । रजें अंबुद कोंदलें ॥१०॥
घोडिया बाणाली मोहाळी । कंगाल टोप राघावळी । पाखरा झळकती तेजाळी । आरिसे तळीं लाविले ॥११॥
दोही बाहीं कुंजरथाट । मद गाळीती गजघंट । दांतीं लोहबंद तिखट । वारिया वाट वळघले ॥१२॥
एक चढले उंटावरी । एक चढले अश्वावरी । एक चढले महाखरीं । वीरभारीं गर्जती ॥१३॥
आम्ही प्रचंड धनुर्वाडे । रणकर्कश रणरगडे । नोवरी घेऊनि आम्हांपुढें । कोणीकडे पळतील ॥१४॥
निशाणें त्रहाटिलया भेरी । खाकाइलया रणमोहरी । सिंहनाद केला वीरीं । उपराउपरीं धाविन्नले ॥१५॥
शस्त्रास्त्रीं सन्नद्ध दळ । मीनले महावीर सकळ । धाविन्नले उताविळ । यादवदळ ठाकिलें ॥१६॥
अवघीं मिळोनि दिधली हाक । कृष्णा दाखवीं पां रे मुख । भीमकी फावली हें सुख । झणी देख मानिसी ॥१७॥
सांडीं सांडीं भीमकीचा संग । अबद्ध बांधिजसी निलाग । आला कोपिष्ठाचा लाग । पडेल पांग दुजयाचा ॥१८॥
एकला एकट होतासि । तैं तूं कोण्हा नाटोपसी । आतां स्त्रीलोभें अडकलासी । केउता जासी निजचोरा ॥१९॥
तूं हृदयशून्य अविवेकी । दुजियासि न मनिसी सेखीं । तुज जे मिनले विवेकी । ते तुवां वृत्तिशून्य केला ॥२०॥
अविचारितां एकाएकीं । चोरिली परात्परभीमकी । ते तव न जिरे इहलोकीं । वीरीं कार्मुकीं राखिली ॥२१॥
अविद्या चोरिली चंद्रावळि । विद्या पेंधी ते गोवळी । तैसीच नेऊं पाहसी भीमकबाळी । परी आस्री फळी मांडियेली ॥२२॥
न करितां रे उवेढा । केंवि जाऊं पाहसी पुढां । पळों नको परत भेडा । होईं गाढा वीरवृत्ति ॥२३॥
गोगोरसा मथन करितां । चोरिसी सारांश नवनीता । तैसीच नेऊं पाहसी राजदुहिता । बहुतां झुंजतां तें नये ॥२४॥
यावरी तूं गोवळा जाण । आतां करीं शहाणपण । भीमकी सांडूनि वांचवी प्राण । जीवदान तुज दिधलें ॥२५॥
जैसें अहंकाराचें दुर्ग । तैसें आलें चतुरंग । भीतरी वीर जी अनेग । कामक्रोधादि खवळले ॥२६॥

तानापतत आलोक्य यादवानीकयूथपाः ।
तस्थुस्तत्संमुखा राजन्विस्फूर्ज्य स्वधनूंषि ते ॥३॥

महामोहाचें मेहुडें । तैसें सैन्य आलें पुढें । कृष्णबोधाचे निजगडे । यादव गाढे परतले ॥२७॥
भीमकी ऐशा नेणों किती । कृष्ण वरील अनंतशक्ति । तुम्हां मशकांचा पाड किती । वेगें दळपति परतले ॥२८॥
पळतां जन्म गेले तुमचे । बोल बोलतां नाकें उंचें । आतांचि जाणवेल साचें । बहु बोलाचें फळ काय ॥२९॥
सतरा वेळां पळालेती । निलज्ज मागुते आलेती । रणीं तुम्हां लावूं न ख्याति । धनुष्यें हातीं वाइलीं ॥३०॥

अश्वपृष्ठे गजस्कंधे रथोपस्थे च कोविदाः ।
मुमुचुः शरवर्षाणि मेघा अद्रिष्वपो यथा ॥४॥

दोहीं सैन्यां झाली भेटी । वोढिल्या धनुष्यांचिया मुष्टि । होतसे बाणांची पैं वृष्टि । कूर्मपृष्ठी कांपत ॥३१॥
तडक फुटले एकसरें । भिंडिपालाचे पांगोरे । वीर गर्जती हुंकारे । रणतुरें लागलीं ॥३२॥
पायींचे लोटले पाइकांवरी । असिवार असिवारीं । वीर पडखळिले वीरीं । परस्परीं हाणिती ॥३३॥
गज आदळती गजासीं । महावत महावतासीं । शस्त्रें वोडविती शस्त्रांसीं । घाय घायासी निवारण ॥३४॥
वोडणें आदळती वोडणां । खर्ग वाजती खणखणा । बाण वाजती सणसणा । कालकलना मांडिली ॥३५॥
धीर वीर राहे साहे । मागें न ठेविती पाये । माथा वाजती घाये । रुधिर वाहे भडभडां ॥३६॥
शस्त्रें तूटती हातींचीं । कटारें काढिती माजांची । उदरें फोडूनि गजांची । वीर पायांचे चौकटती ॥३७॥
वोडणें उचलूनियां ठायीं । वारू तोडियले पायीं । वीर पाडूनियां भोंयी । आढाउ पायां भीडती ॥३८॥
भातडीचे सरले शर । धनुष्यदंडां महावीर । झोडूनि पाडिति अपार । घोरांदर मांडिलें ॥३९॥
लाता हाणोनि गजांतें । उपडोनी घेती गजदंतांतें । धांवोनि हाणिती रथांतें । एकेचि घातें शतचूर्ण ॥४०॥
घायें पाडिती गजांतें । झोंटी धरूनि महावतातें । तळीं आणूनियां त्यातें । घायीं आंतें काढिती ॥४१॥
घायीं मातले महावीर । वोढिती अंत्रमाळांचे भार । तर्‍ही धांवती समोर । थोर थोर पाडिले ॥४२॥
कृष्णबळें यादव गाढे । रणीं लोटलिया पुढें । देखोनि मागध धनुर्वाडे । कोपें वेगाढे ऊठिले ॥४३॥
हाक दिधली महावीरीं । बाण सुटले एकसरीं । यादवसैन्याचा महागिरि । शरधारीं झांकिला ॥४४॥
आमुच्या बाणांचें लाघव । आजि पावले रे यादव । धांवा पावा चाला सर्व । आलें गौरव आम्हांसी ॥४५॥
देखोनि वैरियांचा वरवाळा । कांपिन्नली भीमकबाळा । नाश होईल दोन्ही कुळां । बोल कपाळा लागेल ॥४६॥

पत्युर्बलं शरासारैश्छन्नं वीक्ष्य सुमध्यमा ।
सव्रीडमैक्षत्तद्वक्त्रं भयविह्वललोचना ॥५॥

वीर वर्षती तीक्ष्ण शरां । जैशा गिरिवरीं पर्जन्यधारा । आच्छादिलें यादवभारा । लोटधुळोरा उधळत ॥४७॥
देर भावे पडती रणीं । सासुरा होईल ठेहणी । कैंची आणिलीसी वैरिणी । धड कोण्ही न बोलती ॥४८॥
सखे बंधु पडती रणीं । दुःखें फुटेल जननी । माहेर सुटेल येथूनी । मुख कैसेंनि दाखवावें ॥४९॥
कृष्ण पावलिया पुढें । कैसें मांडिलें सांकडें । कठिण वोढवलें दोहींकडे । कपाळ कुढें माझेंचि ॥५०॥
थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासूर माहेर । कृष्णावेगळी न दिसे थार । पाहिलें वक्त्र हरीचें ॥५१॥
तंव हासिन्नला वनमाळी । भिऊं नको वो वेल्हाळी । यादव उठावले महाबळी । रणखंदोळी करितील ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP