अध्याय १६ वा - श्लोक ४८ ते ५५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


परावरगतिज्ञाय सर्वाध्यक्षाय ते नमः । अविश्वाय च विश्वाय तद्द्रष्ट्रेऽस्य च हेतवे ॥४८॥

त्या स्वात्मप्रत्ययस्वभावा । तुजकारणें नमो देवा । कैसा म्हणसी तरी परिसावा । श्लोक आघवा यदर्थीं ॥७॥
परावरगति जाणता । स्थूळसूक्ष्मांचा गतिवेत्ता । परंतु कोठें सज्ज न होतां । एकात्मता न मोडे ॥८॥
म्हणसी सर्वाध्यक्षता कैसी घडे । तरी सर्वाधिष्ठान तूंचि उघडें । अविश्वाय म्हणतां निवडे । अभेद रोकडें चिद्रूप ॥९॥
विश्व तुजमाजि साच असतें । तरी स्वरूपां वेगळें पृथग् दिसतें । रज्जु घेतां सर्पत्व तेथें । नोहे अपैतें नाथिलें ॥६१०॥
सूर्य मावळल्या मृगजळ । डोहीं उठते जरी कल्लोळ । तरी स्वरूपाहून वेगळ । ब्रह्मांडगोळ उरता कीं ॥११॥
विश्वविवर्ता अधिष्ठान । तुजवांचूनि वेगळें कोण । यालागीं विश्वाचें कारण । विश्वाय म्हणोन नमीतसों ॥१२॥
अध्यारोप आणि अपवाद । उभयसाक्षी परमानंद । तद्द्रष्टा या पदें विशद । द्रष्टा गोविंद नमीतसों ॥१३॥
आणि या विश्वाचा अध्याय । अविद्याभ्रमें भासे विशेष । स्वरूपदृष्टीं विद्याप्रकाश । करी निरास अपवादें ॥१४॥
विद्याअविद्यांचें कारण । पूर्णब्रह्म सनातन । त्या तुजकारणें नमन । अनन्य शरण सद्भावें ॥६१५॥
अथवा अविश्वायपदाची व्याख्या । विश्वतैजसप्राज्ञप्रमुखाऽ- । वस्थारहित चिदात्मका । तुजकारणें नमोनमो ॥१६॥
पुन्हा प्रत्यगादि विश्वपर्यंत । अवस्थाभिमान स्वांशभूत । मायायोगें प्रकटीकृत । विश्व म्हणिजे तयाहेतु ॥१७॥
त्या अवस्थांचे भावाभाव । त्यांचा साक्षी तूं स्वयमेव । द्रष्टा म्हणोनि वासुदेव । नमूं केशव तो आम्ही ॥१८॥
सर्वागतींचा जाणता । तूं सर्वांचा अधिष्ठाता । आत्माराम चिदात्मसत्ता । निरतिशयऐश्वर्या ॥१९॥
पंचावन्न विशेषणीं । अचिंत्यैश्वर्य चक्रपाणि । स्तवितां प्रशस्त नागिणी । प्रेम जाणोनि तोषला ॥६२०॥
भर्तारासि केला दंड । युक्त म्हणोनि मानिती गोडं । अनुमोदनें स्तवनें कोड । वदलें तोंड उरगींचें ॥२१॥
आतां जाणोनि प्रसन्न हरि । प्राणी परतंत्र संसारीं । काय अपराध त्यांचे शिरीं । म्हणोनि चतुरी विनविती ॥२२॥

त्वं ह्यस्य जन्मस्थितिसंयमान् प्रभो गुणैरनीहोऽकृत कालशक्तिधृक् ।
तत्तत्स्वभावान् प्रतिबोधयन् स्वतः समीक्षयाऽ मोघविहार ईहसे ॥४९॥

या लोकांची जन्मस्थिति । आणि तैशीच परिसमाप्ति । कर्ता तूं एक जगत्पति । पृथक् शक्ति यां कैंची ॥२३॥
त्या त्या योनिविशेषभेदा । कृत सौम्यादि विरुद्धा । संस्काररूपें लाविसी धंदा । भाव विविधा जागवूनी ॥२४॥
अथवा जन्मस्थित्यादि श्रेष्ठा । चेष्टविसी तूं परमश्रेष्ठा । अनादिकालशक्तीची प्रतिष्ठा । स्वांगीं निष्ठा जागवूनी ॥६२५॥
चेष्टारहित तूं मायागुणें । कां शक्तिर्पवर्तमानें । अमोघ विहार चेष्टा करणें । हें तुजविणें कोणाचें ॥२६॥
यालागीं चेष्टक तूंचि देवा । तरी कां अपराध या ठेवावा । असो तुमचिया गौरवा । अवघ्या मावा शोभती ॥२७॥

तस्यैव तेऽमूस्तनविस्त्रिलोक्यां शांता अशांता उत मूढयोनयः ।
शांताः प्रियास्ते ह्यधुनाऽवितुं सतां स्थातुश्च ते धर्मपरीप्सयेहतः ॥५०॥

त्या तुझ्याचि अवघ्या तनु । क्रीडती तव तंत्र भिन्नभिन्न । शांत अशांत योनिगण । मूढ सज्ञान अनेक ॥२८॥
आतांचि हे नवलपरी । साधु स्वधर्मपालनावरी । प्रवर्तलासि तूं मुरारि । शांतांवरी कृपाळु ॥२९॥
करावया साधूंचें पालन । सत्पथाचें संस्थापन । शांता योनि प्रिय मानून । अवतरोन चेष्टसी ॥६३०॥
अशांत योनि तुवांच केल्या । अपराध ठेवूनि दंडिल्या । अवतारचेष्टेचिया खेळा । प्रतिकूळ झाल्या म्हणोनी ॥३१॥
तरी तो अपराध त्यांचिया माथां । केंवि ठेविजे जगन्नाथा । सहजस्वभाव तूं सर्वथा । तुझिया सत्ता अलोट ॥३२॥
पक्षी स्वभावें गगनीं उडती । जळामाजीं ते केंवि बुडती । स्थळीं जलचरां नोहे वसति । जळीं न वसति स्थलचरें ॥३३॥
ऐशी तुझी अनादि सत्ता । आतां अनुसरोनि अवतारचरिता । दोष ठेविला सर्पामाथां । क्षमावंता तो साहीं ॥३४॥
अवतारचरितासि विरुद्ध । एवढा सर्पाचा अपराध । क्षमा करावया प्रसिद्ध । तूं स्वतःसिद्ध सर्वात्मा ॥६३५॥

अपराधः सकृद्भर्त्रा सोढव्यः स्वप्रजाकृतः । क्षंतुमर्हसि शांतात्मन् मूढस्य त्वामजानतः ॥५१॥

तूंतें नेणोनि फणिनायकें । आपुल्या स्वभावें नैसर्गिकें । अपराध केला तो सर्वात्मकें । क्षमा करणें हें उचित ॥३६॥
स्वप्रजांचे अपराध अमूप । क्षमापनीं मायबाप समर्थ होती ससाक्षेप । तूं सकृत जगज्जनक ॥३७॥
नेणत्या मूढाचा अन्याय । तुज सहावया उचित होय । शांतात्मा हें नामधेय । तुजवीण काय आणिकाचें ॥३८॥
तुझे चरण ज्याचिये शिरीं । त्या तव किंकराच्या आम्ही किंकरी । कृपावरें अनुग्रह करीं । श्रीमुरारि कारुण्यें ॥३९॥

अनुगृह्णीप्व भगवन् प्रानांस्त्यजति पन्नगः । स्त्रीणां नः साधु शोच्यानां पतिः प्राणः प्रदीयताम् ॥५२॥

अखिलैश्वर्यसंपन्न । अनंतब्रह्मांडभाजन । यालागीं तूं श्रीभगवान । दुजा कोण तुज साम्य ॥६४०॥
अनंतब्रह्मांडभाण्डोदरा । लागतां तुझिया पार्ष्णिप्रहारा । सोडूं पाहे प्राणनिकरा । स्थूळशरीरा समवेत ॥४१॥
यालागिं आम्हां स्त्रियांप्रति । वैधव्यदुःखा एवढी खंती । आणिक नाहीं हो श्रीपति । म्हणोनि काकुळती येतसों ॥४२॥
पतिप्राणांचें भिक्षादान । द्यावें कृपाळु होउन । इतुकें आमुचें करुणावचन । श्रवणीं घेऊन मानावें ॥४३॥
म्हणसी तुम्हांवरी अनुग्रह । करूनि वांचवूं काळग्रह । तरी इतर प्राण्यांसि प्रळयदाह । हा निर्वाहपूर्वक ॥४४॥

विधेहि ते किंकरीणामनुष्ठेयं तवाज्ञया । यच्छ्रद्धयाऽनुतिष्ठन्वै मुच्यते सर्वतो भयात् ॥५३॥

तरी ऐसें न म्हणें पुरुषोत्तमा । तुझिया किंकरींलागिं आम्हां । आज्ञा कीजे मेघश्यामा । आम्ही त्या नियमा अनुसरों ॥६४५॥
आम्हीं अनुष्ठावें काय । जेणें निरसे सर्व भय । भवसागरीं तरणोपाय । तो उपाय आज्ञापीं ॥४६॥
श्रद्धापूर्वक अनुष्ठितां । सुटे सर्व भयांची चिंता । भूतमात्रीं एकात्मता । त्या वृत्तांता आज्ञापीं ॥४७॥
तुझिये आज्ञेवरूनि आम्ही । प्राणिमात्राच्या कल्याणकामीं । प्रवर्तों ऐसें करीं स्वामि । हृदयपद्मीं वसोनी ॥४८॥

श्रीशुक उवाच - इत्थं स नागपत्नीभिर्भगवान् सममिष्टुतः । मूर्च्छितं भग्नशिरसं विससर्जांघ्रिकुट्टनैः ॥५४॥

शुक म्हणे गा परीक्षिति । नागपत्न्यांहीं ऐसिया रीति । स्तवितां सद्भावें श्रीपति । करुणामूर्ति जगदात्मा ॥४९॥
षड्गुणैश्वर्याचा राशि । जाणोनि त्यांच्या मानसांसी । आवरूनि पार्ष्णिघातासी । कालियासी सोडिलें ॥६५०॥
मूर्च्छापन्न सर्पशरीर । भयंकर महाथोर । पार्ष्णिघातीं भग्नशिर । पडिला विखार अचेष्टित ॥५१॥
पतिव्रतांच्या करुणास्तवनीं । कळवळूनि चक्रपाणि । कृपाकटाक्षावलोकनीं । झाला फणी सावध ॥५२॥

प्रतिलब्धेंद्रियप्रानः कालियः शनकैर्हरिम् । कृच्छ्रात्समुच्छ्वसन् दीनः कृष्णं प्राह कृतांजलिः ॥५५॥

जैसे सुषुप्तीमाजि जन । त्रियामा ग्रासितां होय निमग्न । तैसा कालिय मूर्च्छापन्न । होतां विसंज्ञ निश्चेष्ट ॥५३॥
तंव कृष्णतरणीच्या अपांगारुणें । विश्व धवलितां कृपाकिरणें । यथापूर्व सर्व करणें । होऊनि स्मरण आथिला ॥५४॥
कृच्छ्रात् म्हणिजे महाक्लेशें । श्वास सांडोनि विगतावेशें । हळूच निद्रोषमानसें । निजात्मतोषें उजळला ॥६५५॥
मग दीनप्राय हरिप्रति । बद्धांजळि परमप्रीति । अवलोकूनि कृष्णमूर्ति । करी प्रणति सप्रेमें ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP