अध्याय १६ वा - श्लोक १ ते ४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच :- त्रिलोक्य दूषितां कृष्णां कृष्णः कृष्णाहिना विभुः ।
तस्या विशुद्धिमन्विच्छन् सर्पं तमुदवासयत् ॥१॥

दैत्य मारूनि रासभजाति । तालफळें भक्षूनि तृप्ति । कळानिधान जो श्रीपति । नाचे प्रीतीं अहिमाथां ॥३०॥
कालियाचे विस्तीर्ण फणीं - । वरी नाचे चक्रपाणि । संगितशिक्षेच्या साधनीं । शिवभवानीछात्रत्वें ॥३१॥
कौरवचक्रचूडारत्ना । ऐकें परीक्षिते सज्ञाना । कालियविषें दूषित यमुना । देखोनि कृष्णा आवेश ॥३२॥
रक्षेमाजीं लोपला अग्नि । तरी आवेशे शुष्केन्धनीं । तैसा श्रीकृष्ण गोपपणीं । विभु म्हणोनि न झांके ॥३३॥
ईषन्मात्र वक्र भृकुटि । कृष्णें करितां ब्रह्मांडकोटि । होऊनि लपती मायेपोटीं । गोवळनटीं नटला तो ॥३४॥
ऐसा समर्थ स्वसामर्थ्यें । तेणें विभुत्वें कृष्णनाथें । सर्प दवडूनि कालिंदीतें । निर्विष करूं भाविलें ॥३५॥
यमुना करावी निर्मळ । ऐसें इच्छूनि गोपाळ । कालियसर्पातें तत्काळ । दवडी केवळ विभुत्वें ॥३६॥
ऐसें वदला द्वैपायनि । ऐकोनि शंका नृपा मनीं । झाली तयेचे निरसनीं । करी विनवणी मुनिवर्या ॥३७॥

राजा उवाच :- कथमंतर्जलेऽगाधे न्यगृह्णाद्भगवानहिम् । स वै बहुयुगावासं यथाऽसीद्विप्र कथ्यताम् ॥२॥

म्हणे अहो जी योगिराजा । इतुका संशय निरसा माझा । जळीं कालिय कवणें ओजा । युगें बहुतें स्थिरावला ॥३८॥
कालिय जलचर नव्हे कांहीं । तेणें वसति जलाचे ठायीं । बहुत युगें करावया पाहीं । कारण कांहीं मज सांगा ॥३९॥
स्थलचरेंही मनुष्यादिकें । जळीं क्रीडती यथासुखें । परंतु होऊनी स्थायिकें । युगें अनेक न वसती ॥४०॥
तरी तें अगाध यमुनाजळ । तदंतरीं करूनि स्थळ । जलचर नसोनि बहुत काळ । कां पां व्याळ राहिला ॥४१॥
आणि दुसरी ऐका गोष्टी । बहुत युगें यमुनेपोटीं । वसत होता दुर्विषहठी । केंवि जगजेठी निगृही त्या ॥४२॥
अथवा प्रावृट्काळीं यमुना । न वाहवी सर्पस्थाना । उभय तीरींचे ग्राम नाना । विषोल्बणा केंवि साहति ॥४३॥
बालपणें म्यां केला प्रश्न । देवें करावें निरूपण । सहसा न म्हणावें आडरान । हे कथा संपूर्ण कृष्णाची ॥४४॥

ब्रह्मन् भगवतस्तस्य भूम्नः स्वचंदवर्तिनः । गोपालोदारचरितं कस्तृप्येतामृतं जुषन् ॥३॥

भूमान् म्हणिजे अपरिच्छिन्न । स्वजनच्छंदें ज्या वर्तन । भगवंताची लीला पूर्ण । गोपक्रीडननाट्याची ॥४५॥
सुमनमाळेमाजील दोरा । साठीं धरिती त्या आमोदसारा । तेंवि भगवद्गुणचरिता उदारा । साठीं इतरा इतिहासा ॥४६॥
ब्रह्मनिष्ठां अग्रमणि । तो तूं सर्वत्र बादरायणि । हरिगुणप्रेमा अंतःकरणीं । जाण सज्ञानी तूं माझा ॥४७॥
सेवितां हरिगुणकथामृत । विरिंचिसांबही अतृप्त । तेथ अस्मदादि प्राकृत । केवीं संतृप्त होती पैं ॥४८॥
एकमेकांचे हृदयवासी । कीं जन्मले नाभिदेशीं । चरितामृत त्या न निगे कुसीं । मा येरां कायशी संतृप्ति ॥४९॥
म्हणोनि विस्तारेंशीं आम्हां । निरूपिजे जी द्विजोत्तमा । श्रवणीं देखोनि नृपाचा प्रेमा । शुकपरमात्मा तोषला ॥५०॥

श्रीशुक उवाच - कालिंद्यां कालियस्यासीद् ह्रदः कश्चिद्विषाग्निना ।
श्रप्यमाणपयो यस्मिन् पतंत्युपरिगाः खगाः ॥४॥

शुक म्हणे गा परीक्षिति । यमुनेमाजीं एके प्रांतीं । अगाध डोहो ज्यामाजी वसति । करी दुर्मति कालिय ॥५१॥
महापुराचा येतां लोट । तैंचि कालवे एकवट । एरवीं एकला यमुनेनिकट । ह्रद दुर्घट विषयोगें ॥५२॥
पूरप्रवाह पात्रांतरीं । ह्रद तो कालिंदीमाझारीं । सौम्यप्रवाहापासूनि दुरी । एके तीरीं ह्रद असे ॥५३॥
( येथे ५४ नं. नाही. )
यालागीं यमुनेचा प्रवाह । वाहवूं न शके सर्पसमूह । अंतर्जलीं करूनि गृह । चिरकाल राहे या हेतु ॥५५॥
कालियतुल्य विषोल्बण । दारापुत्रादि सर्पगण । सहस्रें सहस्र गणी कोण । तेणें दारुण विषवारि ॥५६॥
भाते लावूनि आटिती धातु । अष्टलोह द्रवीभूत । शीतळवातें ज्वाळा निघत । त्या नभांत पसरती ॥५७॥
भोंवताला तिर्यक्पवन । विषाक्त झगटे ह्र्दावरून । तेणें प्रलयहुताशन । भूतें भरून उचंबळे ॥५८॥
जीवन सळसळां डोहीं कढे । भवंता वाफांचा वळसा पडे । तप्तअयःपिंडापाडें । तापे चहूंकडे भूभाग ॥५९॥
जीवन भुवन दहन पवन । विषोल्बणचि झालें गगन । ऐसा पंचभूतांचा गण । विषें संपूर्ण कोंदला ॥६०॥
खेचर गगनीं जळोनि पडती । तीर्यक्पवनेंचि करपती । भूचर भूसंस्पर्शें मरती । मा जळें वांचती कैसेनी ॥६१॥
वळसा सामान्य विहंगमीं । क्रौंचादि विशेष ऊर्ध्वगामी । तेही विषें आहाळोनि व्योमीं । पडती भूमीं करपोनी ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP