अध्याय ६ वा - श्लोक ३६ ते ३८

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


कस्यानुभावोऽस्य न देव विद्महे तवांघ्रिरेणुस्पर्शाधिकारः ।
यद्वांछया श्रीर्ललनाचरत्तपो विहाय कामान्सुचिरं धृतव्रता ॥३६॥

नागिणी म्हणती अहो जी देवा । एवढा कवण सुकृतठेवा । आम्ही नेणों याचिया दैवा । कीं या अधिकार व्हावा पदरजीं ॥४४०॥
याचिया कोण्या पुण्यप्रभावें । तवांघ्रिरेणूचें स्पर्शन व्हावें । एवढा अधिकार कोण्या दैवें । हें न चोजवे आम्हांसी ॥४१॥
तपोदानव्रताचरणीं । नानानियम तीर्थाटनीं । विविधयज्ञपुरश्चरणीं । इत्यादिगुणीं अलभ्य ॥४२॥
पदरजःस्पर्शाधिकार होय । एवढ्या सुकृताचा समुदाय । गांठीं नसतां भाग्योदय । कैसा काय ययाचा ॥४३॥
हें अचिंत्य कृपावैभव । तुवां वोपिलें करूनि कींव । तुझा हा उपकारचि अपूर्व । एरवीं देव न पवती ॥४४॥
हेचि कीं श्लोकीं व्युत्पत्ति । नागपत्न्या वाखाणिती । कीं ब्रह्मादिकां देवांप्रति । दुर्लभ हे प्राप्ति तपादिकीं ॥४४५॥
असो ब्रह्मादिकांची कथा । वामांगवासें जे सनाथा । ते लक्ष्मीस एवढ्या अर्था । नाहीं सर्वथा पात्रता ॥४६॥
जयेच्या प्रसादलेशासाठीं । इंद्रादिश्रिया कोट्यानुकोटि । भरती तपांचे संकटीं । परी दुर्लभ भेटी जयेची ॥४७॥
ते मुख्य लक्ष्मीस आपण । ललितलावण्यें संपन्न । उत्तमलक्षणीं परिपूर्ण । ललना अभिधान या हेतु ॥४८॥
तेही तवांघ्रिरेणुस्पर्शा । अधिकारसिद्धीची धरूनि आशा । तपादि साधना सक्लेशा । श्री परेशा आचरे ॥४९॥
सांडूनि सकळ विषयकाम । सुष्ठु वृत्तादि धरूनि नेम । चिरकाळ चिंती श्रीपादपद्म । होऊनि सहमदमसंपन्न ॥४५०॥
अद्यापि फलसिद्धीचा समय । ब्रह्मादि अमरांचा समुदाय । ऐसाचि इच्छिती भाग्योदय । परी त्यां न होय अपैता ॥५१॥
कमलाप्रमुखां दुर्लभ प्राप्ति । तो भाग्योदय सर्पाप्रति । कोण्या सुकृतें हें तर्कितां चित्तीं । कोणाप्रति न तर्के ॥५२॥
केवळ तुझा कृतोपकार । एथ न घडो आन विचार । म्हणसी ब्रह्मादि पदें याहूनि थोर । तरी तीं अवर याहुनी ॥५३॥

न नाकपृष्ठं न च सार्वभौमं न पारमेष्ठ्यं न रसाधिपत्यम् ।
न योगसिद्धीरपुनर्भवं वा वांछंति तत्पादरजःप्रपन्नाः ॥३७॥

कां पां ब्रह्मादि पदें गौण । ऐसें स्वामी झणें म्हण । इतुकें ययाचें कारण । जे तव पदप्रपन्न नादरिती ॥५४॥
जे तव चरणा शरणागत । तव पदध्यानें नित्य तृप्त । ब्रह्मादिपदें ते तुच्छ करित । यां संप्राप्त कां रमती ॥४५५॥
नाकपृष्ठ म्हणिजे स्वर्ग । जो शतमखसुकृतें पाविजे भोग । असुकृतियां नोहे लाग । येर अयोग्य सामान्य ॥५६॥
सुरतरसिकां रंभाप्रमुखा । चितारल्या भूमिका । चैत्रनंदनादि वाटिका । जेथींच्या लोकां क्रीडार्थ ॥५७॥
अनर्घ्य रत्नांचे जेथ आकर । कल्पद्रुमाचे आगर । मन्मथरंगप्रजागर । नाहीं संचार निद्रेचा ॥५८॥
लोकपाळ यूथपति । मंत्रादेष्टा बृहस्पति । वसुरुद्रादित्यपंक्ति । सेनासंपत्ति जेथींची ॥५९॥
सौरभ्य उळिगी कुसुमाकर । चिकित्से अश्विनीकुमार । सामान्य सुरांमाजीं थोर । साध्य पितर विश्वप ॥४६०॥
गंधर्वांचीं तानमानें । किन्नरांचीं मधुरगानें । अप्सरांचीं सुनर्तनें । लास्यरसिकां प्रिय मान ॥६१॥
जेथ सर्वां सुधापान । सर्वां सर्वदा नवयौवन । कोणा न शिवे जरामरण । सिद्धि अंगण झाडिती ॥६२॥
ऐरावत स्तंबेरम । उचैःश्रवा अश्वोत्तम । घरोघरीं कल्पद्रुम । सर्वां साम्य जे लोकीं ॥६३॥
चंद्रा ऐसे अमृतकुंभ । सूर्यासारिखे सुप्रभ । सर्वां सर्वत्र सुखलाभ । नेणती क्षोभ विषमाचा ॥६४॥
ऐसें जें कां नाकपृष्ठ । नापेक्षिती हरिपदनिष्ठ । म्हणती एथींचें जें जें इष्ट । तें तें दुष्ट अवघेंची ॥४६५॥
विपरीत ज्ञानाचा जैं भ्रम । चढतां मद्यरूप जो कां काम । जीवात्मबुद्धीचें धरूनि प्रेम । मानी विश्राम इत्यादि ॥६६॥
ते तव पदरजःप्रपन्न । जाणती मृगाम्भापरी शून्य । स्वप्रतीति हेळसून । दृढ श्रीचरण आश्रयिती ॥६७॥
सार्वभौमतो मनुपुत्र । पार्थिवैश्वर्य ज्या स्वतंत्र । सप्तद्वीपांमाजि गोत्र । संततिमात्र जयाची ॥६८॥
पादप्रपन्नातें तें न रुचे । आहळे काळाचेनि काचें । म्हणऊनि प्रेम श्रीचरणाचें । केलें जीवाचें जीवन ॥६९॥
आतां पारमेष्ठ्याची पदवी । चौदा भुवनां जे नांदवी । स्वजागृति अवघें दावी । ते मावळवी निद्रेतें ॥४७०॥
भरतां युगें अष्ट सहस्र । जेथींचें लोटे अहोरात्र । परी तें अवघें कर्मतंत्र । नाहीं स्वतंत्र स्वानंदें ॥७१॥
जैशी नदीनदादिजळें । ओघीं धांवती अतिचपळें । त्यांसि स्वतंत्र कैंचें बळ । भरती घननीळ वर्षतां ॥७२॥
तैसें रजोगुणाचें ज्ञान । तेणें प्रकटे विश्वाभिमान । तें तूं अंतर्यामीं चिद्धन । प्रकाशघन उजळिसी ॥७३॥
बीजांतूनिच निघे मोड । भुसाकणांचा सरिसा जोड । परी त्या उभयत्र अपाड । गोडागोड विवरितां ॥७४॥
तैसे तुझेनि ब्रह्मादिक । पारमेष्ठ्यादि अखिल लोक । जैसें जीवन आणि पंक । ऐक्यविवेक जाणावा ॥४७५॥
जळ तें सर्वांचें जीवन । चिखल पितां पाविजे मरण । जीवनेंचि आलें चिखलपण । परी तें भिन्न विजातीय ॥७६॥
यालागीं जें विपरीत ज्ञान । ज्यासि पारमेष्ठ्य हें अभिधान । जेथ ब्रह्मा विश्वाभिमान । विराज होऊन राहिला ॥७७॥
तव पदरजाचें विस्मरण । तंववरी वाटे हें मंडन । भाग्यें होतां पदप्रसन्न । तेव्हां शून्य अवघें हें ॥७८॥
ऐशी पारमेष्ठ्याची मात । भोगी भोग कायसे तेथ । ज्याची म्हणिजे रसाधिपत्य । ज्या प्राकृत वांछिती ॥७९॥
मुळीं स्वप्नचि जरे लटिकें । तेथ जोडलें धन कैं टिके । तरी श्लाघे जें मूर्ख ही ठके । तैशीं अल्पकें तोषती ॥४८०॥
आतां योगसिद्धीचा महिमा । साधूनि योगाच्या संभ्रमा । अंतरोनि आत्मारामा । धरिजे प्रेमा सिद्धीचा ॥८१॥
सिद्धि प्रकटे योगबळें । त्यां मी अभिन्न हें तों न कळे । भेदें ऐश्वर्य पुंजाळे । भोगी सोहळे संकल्पें ॥८२॥
लटिका मृगजळाचा पूर । त्यामाजीं जे जे पोहणार । निस्तरोनि पावले पार । तैसे साचार सिद्धादि ॥८३॥
आतां पुनरावृत्तिवर्जन । अपुनर्भव ज्या म्हणती सुज्ञ । ते नेच्छिती पदप्रपन्न । अलीक जाणोन अवघें हें ॥८४॥
बागुलाशीं पडेल ठाठी । म्हणोनि बाळा चिंता मोठी । मिथ्या बागुल कळल्या पोटीं । भयाची गोठी मग कैंची ॥४८५॥
भवभ्रमासी नाहीं ठाव । तरी कायसा अपुनर्भव । यालागीं प्रपन्नसमुदाव । त्या हे माव रुचेना ॥८६॥
पादरजा जे प्रपन्न । ते काय वांछिती ऐसें हीन । ऐसें पदरजोमहिमान । लाहती धन्य सभाग्य ॥८७॥
ऐशिया नागपत्न्या चतुरा । सामें वर्णूनि हरिउपकारा । आतां श्रेष्ठत्व स्वभर्तारा । अभेदप्रकारा बोलती ॥८८॥
अभेद सामीचें लक्षण चौथें । तेंचि यथार्थ वदती एथें । श्रेष्ठत्व आपुल्या नाथातें । पातिव्रत्यें प्रशंसिती ॥८९॥

तदेष नाथाप दुरापमन्यैस्तमोजनिः क्रोधवशोऽप्यहीशः ।
संसारचक्रे भ्रमतः शरीरिणो यदिच्छतः स्याद्विभवः समक्षः ॥३८॥

नागिणी म्हणती चक्रपाणि । आमुच्या नाथासमान कोणी । सभाग्य न देखों त्रिभुवनीं । तवांगनिवासिविधिसहित ॥४९०॥
अनेक सुकृती देहधारी । भ्रमत होत्साते संसारीं । पदरजःप्राप्तीची सामग्री । अभ्यंतरीं वांछिती ॥९१॥
ब्रह्मादिकांची पदाभिमानें । होऊनि गेलीं मूल्यमानें । लक्ष्मी न लभे चंचलपणें । पदरजोनिधानें श्रमतांही ॥९२॥
ऐशी दुर्लभ सर्वांप्रति । पदरजःप्राप्तीची संपत्ति । भाग्यें लाभेल आमुचे हातीं । म्हणोनि वांछिती सर्वदा ॥९३॥
ते हे एथ न प्रार्थितां । प्राप्त झाली आपुल्या कांता । लक्ष्मीशिवादि विधाता । असाम्य तुळितां येणेंशीं ॥९४॥
तमोयोनि सर्पशरीर । दीर्घद्वेषी अमर्षपर । विवेकासी कैंचा थार । न वसे विचार शांतीचा ॥४९५॥
ऐशिया आणि एवढी प्राप्ति । म्हणसी झाली कोणे रीती । तरी हे स्वामीची अपरमूर्ति । अभेदस्थिति उभयत्र ॥९६॥
डावे हातींचें उजवे हातीं । घेतां साधनें कोणाप्रति । तुमची एकात्मतेची स्थिति । तैशी चित्तीं जाणतसों ॥९७॥
मत्स्यकूर्मादि अवतार । जैसे अद्यापि असती स्थिर । तैसा हाही सर्पशरीर । परी साचार तव मूर्ति ॥९८॥
आमुचा भर्ता कालिय फणी । त्याचे मुकुटीं तूं इंद्रमणि । तरलसी तेणें समस्तमूर्ध्नि । अमूल्यभूषणभूषित ॥९९॥
अमूल्यभूषण ज्याचे मुकुटीं । त्याच्या भाग्या नोहे कीं ठी । ऐशीं रत्नें ज्याचे गांठीं । वरिष्ठ सृष्टीं तो धन्य ॥५००॥
लक्ष्मी विधाता विधुभरण । ज्या रत्नाचें सन्निधान । न पवती ते ज्या मौळाभरण । त्या ते धन्य म्हणती कीं ॥१॥
प्रभूहूनिही आमुचा कांत । वरिष्ठ ऐसें जाणे चित्त । अशुक्लभूषण मौळिधृत । म्हणोनि सेवित सुरसिद्ध ॥२॥
सभाग्य रत्न कीं रत्नवंत । ऐसें जाणती विपश्चित । याचे भूषणीं तूं अनंत । तरी हा समर्थ तुजहूनी ॥३॥
सामींचें अभेदलक्षण । प्रतिपादूनि नागिणीगण । पातिव्रत्यें वरिष्ठपण । वदल्या संपूर्ण निजनाथा ॥४॥
खुपों नेदितां अंतरा । श्रेष्ठत्व दाविलें भर्तारा । पतिव्रता नागिणी चतुरा । जाणोनि श्रीधरा संतोष ॥५०५॥
पतिव्रता कां उपासक । सद्गुरुभजनीं शिष्यतिलक । यांवीण उत्कर्षविवेक । येर मायिक नेणती ॥६॥
नागिणी म्हणती चक्रपाणि । तुझी मूर्ति हे लावण्यखाणी । षड्वार्षिकी मौळाभरणीं । नाथालागूनि आमुच्या ॥७॥
शतशः फणा विस्तीर्ण थोर । लंबायमान विशाळ गात्र । मौळ रत्न तूं कमलामित्र । शोभा विचित्र उरगाची ॥८॥
ऐसा मौळमणीशीं मंडित । जे जे ध्याती आमुचा कांत । त्यांसि न बाधी अकाममृत्यु । हा इत्यर्थ एथींचा ॥९॥
मौलमणि चक्रपाणि । नटनें तरळे फणारंगीं । ऐसा ध्याती कालियफणी । त्यांलागूनि विधि वंदी ॥५१०॥
आतां पांचवें सामलक्षण । तें वर्णिती गुणकीर्तन । स्वनाथेंशीं प्रभु अभिन्न । स्तवनीं भावून वंदिती ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP