TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अध्याय १६ वा - श्लोक ४४ ते ४७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्लोक ४४ ते ४७
नमः प्रमाणमूलाय कवये शस्त्रयोनये । प्रवृत्ताय निवृत्ताय निगमाय नमो नमः ॥४४॥

प्रमाशब्दें बोलिजे ज्ञान । प्रमाणें इंद्रियां अभिधान । प्रमेय तन्मात्रांचा गण । त्रिपुटी जाण हे ऐशी ॥६३॥
प्रमातृशब्दें बोलिजे जीव । प्रमाणद्वारा प्रमेयीं धांव । प्रमा पसरूनि केली माव । उभारी भव जो ऐसा ॥६४॥
म्हनोनि प्रमाणांचें मूळ । वास्तव प्रमा तूं केवळ । तुझेनि बुद्ध्यादि प्रांजळ । होती कुशल प्रमातृकें ॥५६५॥
तरी बुद्ध्या मीचि म्हणिसी । ऐसें नव्हे जी ऋषीकेशी । अभ्यस्तज्ञान बुद्ध्यादिकांसी । अनभ्यासीं मूढत्व ॥६६॥
कवि म्हणजे तूं सर्वज्ञ । कैंची कविता शास्त्राविण । जैं शास्त्रांचें कीजे पठन । तैं सर्वज्ञ कवि होय ॥६७॥
यालागीं शास्त्रयोनि तूं देवा । प्रसवोनि शास्त्रांचा मेळावा । ब्रह्मादिकांसि केला ठावा । तेथूनि आघवा विधिमार्ग ॥६८॥
अविद्याभ्रमें भ्रमले प्राणी । त्यांसि प्रवृत्तिप्रबोधनीं । प्रवर्तलासि चक्रपाणि । प्रवृत्त म्हणोनि तुज नमो ॥६९॥
करूनि वैराग्यसंपन्न । प्रवृत्तीपासूनि सोडवून । निवृत्त करिसी स्वात्मशरण । त्या निवृत्ता तुज नमो ॥५७०॥
पूर्वोत्तर ज्या मीमांसा । आल्या तयाच्या गर्भवासा । निगमरूपा श्रीपरेशा । तुज कारणें नमीतसों ॥७१॥

नमः कृष्णाय रामाय वसुदेवसुताय च । प्रद्युम्नाचानिरुद्धाय सात्वतां पतये नमः ॥४५॥

ऐसें करूनियां स्तवन । ऐश्वर्योत्कर्षाचें कथन । अनावृतत्वें नागिणिगण । करिती वर्णन व्यूहरूपें ॥७२॥
संकर्षण वासुदेव । प्रद्युम्न अनिरुद्ध स्वयमेव । चारी मिळूनि एक व्यूह । हें जाणती तत्त्व उपासक ॥७३॥
चतुर्विध भजनरीति । यथाधिकारें उपासक भजती । पर व्यूह विभवार्चा म्हणती । ते व्युत्पत्ति अवधारा ॥७४॥
कृष्ण परब्रह्म जाणोन । पूर्णोत्कर्षें ज्याचें भजन । त्या नांव पर उपासन । कैवल्यनिर्वाणप्रापक ॥५७५॥
वासुदेव संकर्षण । प्रद्युम्न अनिरुद्ध चारी मिळून । चतुरात्मक श्रीकृष्णध्यान व्यूहोपासन या नांव ॥७६॥
मत्स्यकूर्मादि अवतारपंक्ति । जाणोनि श्रीकृष्णाची मूर्ति । जे उपासक उपासिती । विभव म्हणिजती ते उपासक ॥७७॥
स्वर्णादि मृत्पाषाण । विष्णुप्रतिमा करूनि जाण । जे जे करिती कृष्णभजन । अर्चोपासन तें म्हणिजे ॥७८॥
पांचरात्र वैष्णवागमी । गौतमी तंत्रादि विष्णु धर्मी । यांची व्याख्या पृथग्नियमीं । असे वाग्मिविस्तृत ॥७९॥
कृष्ण केवळ परब्रह्म । नागिणी नमिती जाणोनि वर्म । व्यूहरूपें पूर्णकाम । मेघश्याम वंदिती ॥५८०॥
राम म्हणिजे संकर्षण । अनंतरूपी श्रीभगवान । जो कां अखंडदंडायमान । काळ म्हणोन बोलती ॥८१॥
शुद्धसत्त्व तो वसुदेव । तेथ प्रकाश जो वास्तव । तो बोलिजे वासुदेव । भूतसमूह जो वसवी ॥८२॥
धर्मा अविरुद्ध जो कां काम । सुखप्रापक नासोनि श्रम । प्रद्युम्न ऐसें ज्याचें नाम । भज्य आश्रयमात्रा जो ॥८३॥
विधि अविधि नेणतां प्राणी । सद्भाव जाणे अंतःकरणी । विरोधिला न वचे कोणीं । श्रुतिपुराणीं विधिवाक्यें ॥८४॥
तेणें सद्भावें भक्तपति । प्राप्त होय भक्तांप्रति । अनिरुद्ध ऐसिया संकेतीं । तयाप्रति बोलिजे ॥५८५॥
सालोक्यादि चारी मुक्ति । वोपी उपासकांचिया हातीं । तो श्रीकृष्ण जगत्पति । चतुर्मूर्ति एकात्मा ॥८६॥
नागिणी विवरूनि ऐशिया रीती । तुजकारणें नमो म्हणती । पुन्हा चतुर्धा वर्णिती । अभेदस्थिति ते ऐका ॥८७॥

नमो गुणप्रदीपाय गुणात्मच्छालनाय च । गुणवृत्युपलक्ष्याय गुणद्रष्ट्रे स्वसंविदे ॥४६॥

ते चतुर्धा भेद कैसे । गुणप्रकाशती ज्या प्रकाशें । चित्तचतुष्टय भेदवशें । वृत्तिविशेषें विभाग ॥८८॥
अंतःकरणचतुष्टुय । गुण ऐसें या नामधेय । यां उजळिसी दीपप्राय । त्या तुझे पाय वंदितसों ॥८९॥
म्हणसी आत्मा ही एकला । कैसा चतुर्धा विभागिला । भक्तप्रेमासि भाळला । तेणें झाला बहुविध ॥५९०॥
भक्तआवडिच्या कार्या । विचित्र फळें अर्पावया । जाणोनि भक्तमनोदया । आपणया आच्छादिसी ॥९१॥
गुणीं करितां आच्छादन । तैं मग मजला जाणे कोण । तरी वृत्तिरूपें प्रतीयमान । त्या तुजवीण कोण झांकील ॥९२॥
मनीं संकल्पाचें स्फुरण । तें तुजवीण करी कोण । बुद्धीसि निश्चयाचें बोधन । तें तुजविण कोणाचें ॥९३॥
चित्तीं अनुसंधानशक्ति । तुजवीण कोणाची प्रवृत्ति । साभिमानें अहंवृत्ति । कैंची श्रीपति तुजवीण ॥९४॥
चंद्र विधाता नारायण । विष्णु अथवा गौरीरमण । इत्यादि शक्ति गणेश पूर्ण । होसी संपूर्ण सप्रेमें ॥५९५॥
वृत्तिज्ञानें जीवमात्र । म्हणसी तैसा मी वृत्तितंत्र । तूं स्वसंवेद्य स्वतंत्र । अगोचर गुणद्रष्टा ॥९६॥
द्रष्टा सर्वघटीं तूं एक । गुणवृत्तीचा प्रकाशक । नमो तुजकारणें सम्यक । म्हणती पन्नगकामिनी ॥९७॥
आतां कैसें अगोचरपण । आणि कैसा उपलक्ष्यमाण । करूनि द्विधा उपपादन । करिती नमन तें ऐका ॥९८॥

अव्याकृतविहाराय सर्वव्याकृतसिद्धये । हृषीकेश नमस्तेऽस्तु मुनये मौनशीलिने ॥४७॥

अव्यक्तीं प्रपंच सामाये । तेव्हां विहार कैंचा काय । अतर्क्य महिमा तर्का नये । अगोचराय तुज नमो ॥९९॥
साक्षी पृथक्त्वें उरावें । तेव्हा अतर्क्य तर्कूं जावें । तें तुजमाजी अभिन्न व्हावें । लीन आघवें साक्षित्वें ॥६००॥
जागृति सांठवे सुषुप्तिपोटीं । पृथक्स्मृतीची निरसे गोठी । आत्मशून्यतापरिपाटीं । अतर्क्य सृष्टि अस्तिक्य ॥१॥
पुन्हा तेथूनि विकारसिद्धि । अंतःकरणादि मनोबुद्धि । प्रकटावया यथाविधि । समर्थ त्रिशुद्धि तूं होसी ॥२॥
यालागीं नामें हृषीकेश । सर्व करणीं चित्प्रकाश । चोजवूनि विषयाभास । दृश्य अशेष रूढविसी ॥३॥
म्हणोनि सर्वव्याकृतसिद्धा । तुज नमो जी परमानंदा । इंद्रियें रमती विषयानंदा । तूं गोविंदा अगोचर ॥४॥
म्हणसी मी जरी हृषीकेश । इंद्रियद्वारा विषयाभास - । सेवनजनित पावें तोष । तरी तूं परेश स्वाराम ॥६०५॥
यालागीं मुनि हें अभिधान । मौनशीली मनन । अविस्मृतत्वें मनोन्मन । स्वनंदघन स्वाराम ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-01T20:05:48.7730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चेवचेव

  • स्त्री. ( व . ) त्रास ; जिगजिग . 
  • चिवचिव , चिवचिवणें पहा . 
RANDOM WORD

Did you know?

जन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site