मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १३८१ ते १४००

दासोपंताची पदे - पद १३८१ ते १४००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१३८१
आत्मा तूं सर्वां भूतीं, तरि तुझ्या या प्रकृती;
गुणकरणनियंता कवणु पूडती ? ॥१॥धृ॥
सांग, आह्मीं येथें काये केलें ? दंडितासि बोलें बोलें !
सत्य तें सांडिलें तुवां; कवणाचें चाले ? ॥छ॥
कर्म केलें तो कवणु ? कां देसी वायां सीणू ?
दिगंबरा ! तुझां ठायीं न दिसे गूणू ! ॥२॥

१३८२
कवणाकारणें माया आणिली अविद्या आया ?
बद्ध केला तो कवणु ? लाविली हे क्रीया. ॥१॥धृ॥
सांग सत्य वाणी, सत्य वाणी; आह्मीं होतों कवणे स्थानी ?
तुवां तुतें विमोहिलें; गुंतलासी गुणी. ॥छ॥
ऐसें कर्म घडलें कुडें; आतां तें कैसें मोडे ?
दिगंबरा ! सिरकलासी; जाणपां नीवाडें. ॥२॥

१३८३
कोसले न घर केलें तेथें कवण गुंपलें ?
विचारूंनि सांग; देवा !मज हें न कळे ! ॥१॥धृ॥
वर्म बोलों कैसें ? बोलों कैसें ? विलया जायील हांसें !
तूं देॐ, आह्मी भक्त, घडलें अयीसें. ॥छ॥
आतां दुःखाचें न करीं ! होतों, तैसें आह्मा करीं !
दिगंबरा ! हें गार्‍हाणें न संगों बाहेरी ! ॥२॥

१३८४
तुवां दिधलें भक्तजण; तयाची करीतां जतन,
कोठें ठेवावें ? न कळे; न दिसे स्वस्थान. ॥१॥धृ॥
सर्व तूजवीण उरलें नाहीं. पाहातां, मीपण तें ही
सुटोनी जातसे. देवा ! आपुलें, तें घेइं ! ॥छ॥
देवपण तुझें देवा ! पाहावें, वाटे हें जीवा.
आहे किंवा नाहीं ? सांग; न दवी जो मावा. ॥२॥
देवभक्तपण देवा ! ठेविला होता जो ठेवा,
दिगंबरा ! काये जाला ? हारविला तुवां. ॥३॥

१३८५
भवतापें मीं तापली; दत्ता ! करीं का रे ! साउली !
तुझा वोसिंगां रीघैन; माये ! तूं माउली !
वापु तूं माउली ! सुखद साउली ! ॥१॥धृ॥
संगु न सोडवे, न सोडवे; तुज वेगळें न सवे.
खरतरू भवतापु; जायीन मीं जीवें !
शरीरस्वभावें सुखद नेणवे. ॥छ॥
तापत्रयाची तपणी वियोगु लागला वन्ही;
दिगंबरा ! तूजवीण नव्हती कवणी ! ॥२॥

१३८६
भवदुःख वाहे सरिता लाटलीयें मीं अवधूता !
केवळ जातीसे पुरें कामनेकरितां. ॥१॥धृ॥
शब्द न करवे, न करवे; विभ्रमु घेतला जीवें.
आपपर भूलि जाली; कव्हणी न पवे. ॥छ॥
अवधूता ! दत्ता ! येइं ! धरीन कास, देयीं;
आणिक उपाये देवा ! न करीं मीं कांहीं. ॥२॥
आणिकांचे हात पडती; मातें ते न साहाती.
दिगंबरा ! तूं जनकु; बोलणें तें कित्ती ? ॥३॥

१३८७
कवण स्वजन, जाया ? कवणाची धरूंनि माया,
कवणू मीं येथें आहें ? राहिलो कासया ? ॥१॥धृ॥
ऐसें मज उमजतां उमजतां, कारण न दीसे दत्ता !
सोयेरा तूं, देवदेवा ! कळलें तत्वता. ॥छ॥
धन, धनद, सामग्री माझी तूं देवा ! जरी,
दिगंबरा ! सत्य मज गति के दूसरी ? ॥२॥

१३८८
योगिराया ! अत्रिवरदा ! अवधूता ! पूर्णबोधा !
भक्तजनचिंतामणी ! स्मरें मीं सर्वदा. ॥१॥धृ॥
धिग्य न पवसी ! न पवसी ! दुःख न स्माये आकाशीं;
आदिगुरो ! देवदेवा ! संदु हा मानसीं ! ॥छ॥
अरे ! कालाग्निशमना ! दत्तमूर्ती ! नीरंजना !
दिगंबरा ! ज्ञानसिंधू ! स्वजनजीवना !

१३८९
भक्तजनसूरतरू, ज्ञानविज्ञानसागरू,
पावला श्रीसिद्धराजू आत्मा ईश्वरू,
परमात्मा ईश्वरू, दत्तु आदीगुरू. ॥१॥धृ॥
संगु न सोडवे, न सोडवे; जायीन मीं सवें सवें.
कृष्णश्यामातें सोडूंनी, वेगळें न सवे ? ॥छ॥
अरे ! अरे ! मंत्रसारा ! अरे ! लीला विश्वंभरा !
मायावंता ! मायामुक्ता ! त्राहि, दीगंबरा ! ॥२॥

१३९०
सर सर सर वाहे सरिता; गेलें पानीय न ये धरितां !
वय जातसे हें अवधूता ! क्षणक्षणक्षणें आली क्षिणता ! ॥१॥धृ॥
हां ! मनसा ! अरे ! मनसा ! कां भ्रमसी दाहा दीशा ?
भवस्वप्न हें मायिक; न धरीं दुराशा ! ॥छ॥
वन, सदन, धन, जन, जाया, प्रपंचु लटिकी माया.
व्यर्थ तळमळ करितासि काह्या ? दीगंबरेंवीण सकळ ही वायां ! ॥२॥

१३९१
गुणगण मती न ये गणिता; पारुपर मी तु न ये ह्मणतां;
तुझें देवपण तें अवगमितां, भक्ति कैसी मीं करूं ? अवधूता ! ॥१॥धृ॥
हां ! देवा ! अरे ! देवा ! पडसील कैसेनि ठावा ?
रूपा तुझें निर्धारीतां उरि नाहीं जीवा ! ॥छ॥
चंचळ, चळ, भ्रमित, विकारी मन राखों कवणिये परी ?
दिगंबरा ! मज मायापुरीं जाली दुर्लभ भजनाची परी ! ॥२॥

१३९२
मीं धाली चरणगुणस्मरणें; नीवाली विमळामृतश्रवणें;
दत्तेंवीण पर काहीं न मने; रूप जाणोनि तेथें चि निमणें. ॥१॥धृ॥
आत्मयां ! दत्ता ! येइं; तुजविण मज दुसरें नाहीं.
पाहीन मीं रूप हृदयीं; सवें येंइन, स्थाना नेइं. ॥छ॥
गुणश्रवणें विमळ जालें मनस; दत्ता ! तुझेनि विषयसुख विरस,
दिगंबरा ! सकळ मायातमस हरीं माझें. चरणीं धरीं शिरस.

१३९३
दुडु दुडु दुडू पासीं जनका जातां, मज कायीसी शंका ?
आंगलगपणें वसवीन अंका ! मुख लावीन त्याचिये मूखा. ॥१॥धृ॥
श्रीकृष्णा ! कमळनयना ! तुझी आवडी भरली मना.
बापा ! रे ! पर्यंकशया ! तेथें येउंनि लागैना चरणा. ॥छ॥
गुड गुड गुड हासैन माये ! तेणें वदवीली वदों काये ?
दोन्ही नयन पसरोंनि पाहे. प्रीय वचन मज भासताहे. ॥२॥
ढळ ढळ ढळ नयन द्रवती. भवदुःख आठवलें चित्तीं.
दिगंबरें आलिंगिलें पुडती. श्रमु हरला; जाहाली उपशांति. ॥३॥

१३९४
॥ धवळ धानाश्री. ॥ हळदि. ॥
नमूंनि सर्वेश्वरा गुरुमूर्ती उदारा लीलाविश्वंभरा दत्तात्रेया,
हळदीची रचना पावनकर्ती जना विवेकसंभावना संपादीन.
प्रकृतिपुरुषें दोन्हें बोवलां स्वस्थानीं चिन्मात्री निर्गुणीं बैसवीलीं.
तेथें आलिया वर्‍हाडीणी हरिद्रा घेउंनी; कुंकुमें मर्दूंनी योगु केला. ॥१॥धृ॥
धवळ मंगळ गाणें उदीत येणें क्षणें शिव येणें शोभनें श्रोतयासी.
नित्यशा कल्याण वक्तयांलागुन; येणें योगें जन पावन हो कां. ॥छ॥
बाळा, प्रोढा, मुग्धा वृद्धा, अतिवृद्धा वरानना प्रसिद्धा नानासिद्धी.
वराहुनी धाकुली सहजा ते करउली स्ववृत्ति बोलिली काये तेथें ?
भोजना उसीरु जाला; नवरा भुकेला विलंबु कां लागला उठणयासे ?
मग वरानना सकळैका जालिया अभिमुखा;
पुढें जगदंबिका उभी केली. ॥२॥
हलदि देउनि हातीं, वरानना बोलती उटणे या चिन्मूर्ती करीं माये !
हा डोळ्य़ांचा डोळा, जिवाचा जीवाळा, परब्रह्मपूतळा उटीं वेगीं.
योगियांचें धन, गुणाचें कारण, आनंदाचें स्थान रूप याचें.
चिद्गुण धनराशी सेविपां ययासी; सकळ अंश अंशा हाचि येकू. ॥३॥
सुरगणमोक्षकरें लक्षणें पवित्रें; जे चरणी आदरें तो उटीं आधीं.
जे चरणीं चिद्गंगा, पवित्र करी योगां; तो चरणू तूं वेगां उटीं माये !
करकमळें सुकुमारें, भक्तिमुक्तीकरें; उटींपां आदरे विमळामती !
अनुपम्य शरीर ब्रह्म निराकार, परमानंदसार उटीं माये ! ॥४॥
सरिसावे ते बाळा उन्मनी वेल्हाळा, गुणसाम्यचित्कळा उटणें करीं.
हळदि घेउंनि करीं उटिताहे नोवरी; जाणती ते परी माहानुभाव.
विविक्तात्मज्ञानें हरिद्रामर्दन मलिया तेथ गुण पडते जाले.
फिटलें दृश्य आधीं, दर्शन तत्संबंधीं; द्रष्टत्वाची बुद्धी गळोनि गेली. ॥५॥
ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, सकार्य कारण, फिटला तो सकळु सहजत्वेंसीं.
स्ववृत्तीचा मळु समाधीचा केवळु फिटला तो सकळु सहजत्वेंसीं.
उटणें ऐसें जालें, निजरूप निवळलें. बोलतां, तें बोलें न ये बोला.
वधूचिया बोलती :: - देवा ! मंगळमूर्ती ! हळदि घेऊंनि हातीं, उटा वधू. ॥६॥
सन्मयी साभास चिद्रत्नमांदुस ज्ञानकळा ईश ! उटा वेगीं !
आनंदाची खाणी, निष्टेची लावणी, योगांची वोवणी सूत्र जें कीं.
खेळु खेळे कोडें अनंतें ब्रह्मांडें ब्रह्मादीकां वेडें जाणतां जें.
योगीं भय धेलें; देखोनी परतले; ते ही इया केले समाधिस्थ. ॥७॥
हे तुमची अंगना; उटा जी ! चिद्घना ! अतिकाळू भोजना होतु आहे.
इतुलेनि अवसरें तेणें सर्वेश्वरें उटणॆं सत्यादरें आरंभीलें.
हरिद्रेचा वर्णू सुवर्णवर्णगूणू; मंत्रार्थ संपूर्णू तो चि काये ?
विविक्तात्मज्ञानें आदरिलें उटणें;
मलिया तेणें क्षणें पतिता होती. ॥८॥
अवस्थांचें भान जाहालें स्फेटण; स्फुरण आणि ज्ञान सारिखेंची.
देहचतुष्टय कारण आणि कार्य गुणकृत तें हेय पडतें जालें.
अभिमानी आणि गुण, शून्याचें शून्यपण, पावले पतन पूर्णत्वेंसीं.
उरलें निर्मळपण सन्मात्र चिद्घन; ऐसें उद्वर्तन संपादलें. ॥९॥
वेद च्यार्‍ही पुरुषन्हाणे वारे कळस, प्रतीतीची भाष शोभवीती.
कर्मभक्तिज्ञानें सुतिले ते त्रिगुणें; प्रत्यया जीवनें न्हालीं दोघें.
विहित सर्व जालें; अंतरीं ताठ केलें; स्वसूख वोगविलें गुरुकृपा.
सद्रुपु तो ते सत्ता चिन्मयु तो ते चित्ता
दोघां येकात्मता स्वस्वानंदीं. ॥१०॥
ऐसें हें उटणें विविक्तात्मज्ञानें त्या दोघां कारणें पूर्ण जालें.
तिचेनि शुद्धपणें आधीं त्या उटणें; गुणातीतु करणें ऐसें आहे.
त्याचें निर्मळपण पावे ईलागूंन ह्मणौन हे मागूंन उटिली काये ?
ना कीं विविक्तज्ञानें प्रकृतनिरसनें पुरुषु तो जाणणें ब्रह्म सत्य. ॥११॥
तद्दृष्टी पाहातां नाहीं तीतें भिन्नता; पुरुषीं नीमग्नता सिद्ध तीतें.
त्याचेनि निर्गुणपणें निर्गुण तें मानणें; यालागि उटणें पाठीं तीये.
ना ! शुद्धात्मज्ञत्वें ते तदभेदत्वें अवघेनि सगुणत्वे ब्रह्म भासे.
ऐसें बोलों कित्ती ? अनुभवी जाणती, दिगंबरीं स्वस्थिती जयां जाली. ॥१२॥

१३९५
नामनिर्देशु.
संप्रदायाकारें बोवलें साजिरें; बैसलीं वधुवरें उटणयांसी.
मिनलिया वरानना घेववीती अभिधाना; करवीती वंदना परस्परा.
बोलती सकळा वधुप्रती बाळा, प्रमूख वेल्हाळातें बैसउंनी ::-
घेइं वो ! अभिधान; वंदी याचे चरण स्वधर्मसाधन करीं माये ! ॥१॥धृ॥
ऐसी संप्रेरिली; वधू बोलविली. परि ते काहीं केली नाम ने घे.
विचारी मानसीं ::- याचिया नामासी जे घेती तयांसी परति नाहीं !
नेणों, काये होये जीवा ? संसारू अघवा मालवे; वरि दैवा तूटि पडे.
नारदु जाला वेडा; जडभर्तु उघडा; नामाचा येवढा गुणु आहे. ॥२॥
शुकासि जालें काये ? ह्मणौनि घेतां नये. संसाराचीं सोये मीं वीसरैन.
याचें नाम गाती, आणि गातां आइकती, संसाराची माती तयां होये.
आठवलें पुरें ! मग आंग आंगीं संचरे; प्रेम ? कीं तें वारें नृसिहाचें ?
लोलती रंगणीं; नयना ये वो ! पाणी ! लज्जेतें सांडूंनी, पुरुषु नाचे. ॥३॥
पुडती सोवासिणी बोलती वचनी ::- घेपां वोटप करूनी नाम याचें
ते मानी अंतरीं. आतां नाहीं उरी; न सरें मीं संसारीं होइल ऐसें.
विचारी मानसें, तव त्या नाम नसे. मेलेनि मनसें उच्चारावें.
वाचा चौघी जणी परतलिया देखोनी मनातें घेउनी समागमें. ॥४॥
बोलतां कुवाडें सहसा न संपडे. वेद जाले वेडे नाम घेतां.
योगियांतें मौन मनीं पडे विस्मरण, नामनिर्धारण करितां याचें
सरलिया मातृका अवस्था सकळैका. नाम घेतां शंका उपजली.
जयासी नाम नाहीं; कुळ तयाचें कायी ? समस्तां ही देहीं संगु याचा ॥५॥
बोलतां शंका माने. कुळा आलें उणें. नामें रूपें येणें मीं सूटलीयें
वायां गेले गुण, रूप वो ! लावण्य. याचें संनिधान ऐसें जालें !
समस्तीं बोलिलें ::- मौन कांवो ! ध्येलें ? झडकरूंनी बोलें नाम घेइं.
येरि पाहे चित्तीं नामाची अभिव्यक्ती,
तवं, अनंतें याप्रती दिसतीं जालीं ! ॥६॥
बहुतें नामें रूपें भर्ता केवि जल्पे ? गुंपली संकल्पें ते आपलेनी.
मग वीचारी मनी, आत्मा हा मीपणी; मीपण तें अभिधानी व्यक्तयातें.
करूनी निर्धारू मग करी उच्चारू, योगी, ज्ञानी, गुरू करूंनि साक्षी.
अहो ! मीं मज मातें, न मने हें तुमतें, तुंमीपण जेथें लीन होये. ॥७॥
केला नमस्कारू; जनु हांसे चतूरू; नव्हे ह्मणे तो पामरू नोकियेला.
मग बोलती वरानना ::- वरु तो प्रमुखु आणा; वधूचिया अभिधाना घेववापां
बोलती सुकुमारा ::- अहो ! सर्वेश्वरा ! अभिधान उच्चारा नोवरीचें.
मुखे अभिधान, मस्तकें वंदन, करणें हें विधान येथें आहे. ॥८॥
वरु मनीं विचारी नामाची ते परी; तवं विकल्प अंतरीं उठिते जाले.
हे संत ? की असंत ? नये ह्मणों सदसंत. नव्हे उभयातीत अनवस्थानें.
अव्यक्त ना व्यक्त, नव्हे व्यक्ताव्यक्त; कैसी उभयातीत बोलावीं पां ?
भिन्न ना अभिन्न, नव्हे भिन्नाभिन्न; उभयभावहीन नव्हे तैसी. ॥९॥
पाहातां अभिधान कुंठलें वचन; ईश्वरें परि मौन आश्रयीलें.
बोलती सुंदरा ::- शंका दूरि करा. ट, प, करूंनी उच्चारा नाम ईचें.
वरु वीचारी मनीं ::- उपाधि आड करूनी गुणदृष्टी अभिन्नी कल्पना करूं.
‘ अवो ! मृगनयने ! ’ ऐसेनि उपमानें,
मग रूपाकारणें पाहाता जाला. ॥१०॥
तवं रूप ना गुण वर्णू न चले अनुमानू; शून्या ही अकिंचनू भाॐ गमे.
मग कूळ विचारी. तवं तें आलें वरी; लग्न येके गोत्री लागोंनि गेलें.
वरु ह्मणे ::- आपुला वर्णाश्रमु गेला ! कळंकु लागला नामा, रूपा !
त्यागावी स्वभावें; वरि हें भिन्न नव्हे. न बोलतां बरवें लोकाचारीं ! ॥११॥
पुनः पुना त्या बाला बोलती वेल्हाळा. वरु ह्मणे, कां आला मीं यया स्थाना ?
मग वीचारी गुणी. तवं गुणांचा कारणीं प्रवर्ते अभिधानी ते चि माया.
मग ह्मणे मीं तें हे ऐसा योगु आहे. परावें न साहे नाम ईतें.
मग स्मरे आपणातें अवो ! मीं मम वनिते प्रणिपातू तूतें माझ्या ठायीं. ॥१२॥
वर्‍हाडिये हांसती; विस्मयो मानिती. ऐसी कैसी रीती उभे ० ० ?
येकें रूपें गुणें नामें पाचारणें; येर ह्मणती बहुमानें घटितार्थ ऐसा.
नामाचे उच्चार, जाले नमस्कार. अभै ० ० ० संपादले.
अवधूतु दिगंबरू तो नेणॆं हा विचारू माया नाशी ० रू त्याचां गावीं

१३९६
॥ प्रीतिकळहो. ॥
स्वस्थान बोवलें वोहोर बैसलें; प्रकृतिपुरुषा जालें समाधान.
जालें च्यार्‍ही दीन; साडेसंपादन करावे ह्मणौन सभा केली.
वधूचे अपार, वराचे समग्र वर्‍हाडि नागर यथाभागें.
बैसले असतां, वरानना अनंता प्रसंगें ० ० ० कलहो जाला. ॥१॥
प्रीतीचें भांडण, तें गुणविवरण; करितां श्रवण पुण्य थोर !
श्रोतया सद्गति वक्तया तत्प्राप्ति येणें संपादती सद्य हो का. ॥छ॥
वराचे बोलती, विचारापां युक्ती; वराची स्वस्थिती केसी शोभे ?
याचां स्वप्रकाशी परि लोपूं वधूसीं; सवज्ञा ते ऐसी कळा भासे.
आयकोनि हें वचन, वधूचे स्वजन गुणवंत ब्राह्मण वदते जाले.
वधूची बोलती :- नोवरीची दीप्ती, रूप गुण स्थीती अलोलीक. ॥२॥
इचे गुण कळा उदयो त्यांचा जाला. वरू आच्छादला तेणें योगें.
हारपला गुणी प्रकाशे इचेनी; महिमेतें पावोंनी शोभतूसे.
आइकोनि ऐसें वचन, वराचे तत्वज्ञ क्षोभले ब्राह्मण अनुवादती.
राहा ! राहा उगले तुह्मी येके बोलें ! सत्यासी न मिळे तुमचें मत. ॥३॥
तो रूप, हे छाया ! तो ब्रह्म हे माया ! व्यापका आश्रया न घडे ऐसें !
त्याचा रूपावरी वारावी नोवरी ! दृष्टीहूनी दूरि विसर्ज्जावी.
रूप ते कुरूप; कटप आंगी पाप; वितुळे आपेंआप तत्प्रभावें.
तमस दिवाकरें; तैसी हे भर्तारें लोपे साक्षात्कारें; आह्मी जाणों ! ॥४॥
वधूचीं बोलती ::- न बोला हे युक्ती. प्रत्यक्ष प्रतीती प्रमाण पाहा.
इचेनि रूपा आला; गुणवंतु भासला; सकळा वंद्यु जाला भर्त्तारू हा.
ईवीण तो कवणू ? कोठें ? किंलक्षणू ? यासि नेणे जनू निर्नामत्वें.
निर्नामांचा घरीं पडली हे नोवरी ! परि तयां उजेरी इचे नि जाली. ॥५॥
वराचे बोलती :: - सांडा ऐसी भ्रांती. विवेकु धरा चित्तीं; जाणवैल.
याचेनि हसे नाम; ना तरि, निर्नाम. निंद्य पैं परम रूप ईचे.
निर्नामाची मूलीं, निर्नाम कपालीं वराचां पडली; करणे काये ?
संगें यथाचेनी मान्य जाली जनी. गुणी गुण पावोंनी रूपा आली. ॥६॥
वधूचे बोलती ::- आछादावे कित्ती ? मुळीं ययाप्रति पुरुषत्व नाहीं !
आस्तीर्णा अभावो; प्रावर्णा के ठावो ? वरा निर्देवो आह्मीं जाणों !
नामाची हे बाळा. बोलु त्या कपाळा ! जन्मु वांयां गेला कन्निकेचा !
दृष्टी न पाहावें, मनें न कल्पवें, वाचें न बोलवें रूप याचें ! ॥७॥
वराचे बोलती ::- काइसी हे कुस्फूर्ती ? पुरुषु दुजा नाथी येणेंवीण !
हे बोलती दूषण, पाहाती निर्वाण त्याचें निःसंतान सत्य होये !
येकें अवेक्षणें गर्भ धेला ईणें ! बाळक येसणें हे प्रसवली !
च्यारि कीं पंचक ? येक कीं अनेक ? नेणवे बाळक निर्धारिता ! ॥८॥
बोलती येर पारु ::- व्यसनशून्यु नरू. वधूनें प्रतिकारु केला यया.
इचेनि आंगमेलें पुरुषत्व यया आलें ! संतान जाहालें तें सर्व ईचे !
भाग्याची हे बाला ! इचेनि तो दादुला
लौकिकें मिरवला ! जाणों आह्मीं !
येरव्हीं हा निश्चळु ! शब्दाचा दुःकाळू !
अंध ! मूकु ! विरलु ! निर्व्यापारी ! ॥९॥
वराचे बोलती ::- तुमची जलो रिति ! वायां वीण युक्ती चाळितसा !
वचनें तुमचेनी नोवरी परव्यसनी ! कुयुक्तीची खाणी ! पापरूपा !
इचां आंगीं भूतें ! अवतरे तन्मत्ते ! भोग होती तेथें डोलों लागे !
रूप दाखवितां, शंका ते सर्वथा नाहीं आलंगितां परपुरुषातें ! ॥१०॥
बोलती वधूचे ::- अवतरण भूतांचें फललें हें वराचें सन्निधान !
यया अनुसरती ते लज्जया सूटती ! नग्नची भ्रमती जनामाजी !
दुसरें न साहे; वरु तो ऐसा आहे ! बाळा तैसी नोहे ! जाणों आह्मीं !
गुणी आछादली, प्रवृत्ति झांकली,
कवणें हे देखीली ? सांगा वेगीं. ॥११॥
वराचे प्रलपती ::- साक्षी वदविती; भूतें कोठें होतीं याचां घरीं ?
इचें हें टवाळ ह्मणती ज्ञानशीळ; वराचे सकळ अवशीक.
इष्ट मित्र सखे आपुले पारिखे; हा तया नोळखे असतां ऐसें.
इचे चि ते सकळ आभास खेळ;
जाणती कुशळ अनुभवी ये. ॥१२॥
वधूचे बोलती ::- लटिकी हे वदंती. माहासिद्धांप्रति पुसाना कां ?
भान जें आभासे, सत्यत्वें जें दीसे, तेथें हें काय असे निर्धारीतां ?
याचें तें सकळ भासे जे पाल्हाळ ! इचें तें केवल नाममात्र.
द्वैत या न साहे; आपुलें आपण खाये.
ऐसियासी काये दिधली बाळा ? ॥१३॥
वधूचिया वर्‍हाडिणी इतुलें हें आइकोंनि, खेदाचां वचनी प्रलपती ::-
कवणे हा पाहिला ? नाहीं दृष्टि देखिला, श्रवणीं आइकिला पूर्वीं माये !
पूर्वसूत्र घडलें; येथें काये चाले ? वधूचेनी कपाळें लागला हा.
खाणें नां जेवणें, लेणें नां नेसणें,
याचां घरीं उणें धरील बाळा. ॥१४॥
नव्हते जया डोळे तेहीं या पाहिलें. पौरोहित्य केलें कवणें ? नेणों.
विचारीला जेहीं मनस त्याचें कायी मेले होतें आई मीं काये जाणे.
आइकिलें अभिधान; त्या नव्हते. श्रवण मीं ह्मणिजे तें कवण स्त्री ना पुरुषु
जननी ना जनकु; कुलहिनता कळंकू;
गुणु नाहीं विवेकु याचां ठाइं. ॥१५॥
गजंबु ऐसा करिती. तव येर बोलती, होणेराचा गती ऐसी चि आहे.
याकरीं दिधली, तैं चि ह्मणा मेली ! सांडापां उकळी ममत्वाची.
ऐसें संबोखिती विवेकें वारिती सर्वज्ञ हांसती वर प्रीय.
मूर्खांसीं बोलतां आंगीं ये मूर्खता. मौन मागें आतां करूं साडे. ॥१६॥
ज्योतिषीब्राह्मण बोलती सर्वज्ञ ::- दोघांचें अभिधान विचारापां.
एक चि मीपण उभेषांलागून. रूप यावरूंन भिन्न नव्हे.
रूपा भेदगुणें भूषणें, दूषणें, दोघांचीं समानें एके जाणा.
अनिवड येकपण ऐसें विचारूंन घटीत आह्मीं पूर्ण विचारीलें. ॥१७॥
ऐसा कळहो जाला; उपशांटी पावला. प्रीतियोगु कळला उभेषांचा.
साडे संपादले; वर्‍हाडी बुझाविले, स्वप्रभावसेले समर्पूंनी.
तो विधु संपला; गृहप्रवेशु जाला. पुरुषीं आछादला प्राकृतुभॐ.
विवाहाची परी हे सरे संसारीं. नग्नीं दीगंबरीं ब्रह्मीं कैंची ? ॥१८॥

१३९७
धानाश्री.
ज्ञान दयार्णव ! दुर्मतिहरणा ! सुरवरवंदित ! मोक्षदचरणा ! ॥१॥धृ॥
दत्ताचें रुप गुणहीन सखिये ! द्वैत न साहे अनुसरतां ! ॥छ॥
आदिरूप, परब्रह्म, निदान, दिगंबर ध्येयस्वरूप सगूण. ॥२॥

१३९८
पापांकुरसंसारविमथना ! आदिगुरो ! दुःखत्रीविधहरणा ! ॥१॥धृ॥
तूं माझें ध्येय; तूं माझें ध्यान; स्वसिद्धिसाधन, स्वस्वरूप. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें चिंतन करितां, निमाली अहंमतीसीं ममता. ॥२॥

१३९९
नामें चि संसारू नाशिली माये ! नामें वीण मज नावडे क्रीया. ॥१॥धृ॥
‘ जय ! दत्तात्रेया ! जय ! दत्तात्रेया ! जय ! दत्तात्रेया ! ’ जपु जपें मीं. ॥छ॥
दिगंबरा ! गुरो ! विज्ञानसागरा !
नामें वीण अर्थु न गमें मीं दुसरा. ॥२॥

१४००
‘ योगिजन प्रिया ! पंकजनयना ! आदिगुरो ! जय ! कालाग्निशमना ! ’ ॥१॥धृ॥
हें नामामृत जीवन सखिये ! चित्त न राहे येणें वीण. ॥छ॥
दिगंबरा ! जय ! अगणीतकीर्ती तुतें स्मरयीन मंगलमूर्ती ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP