मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १३४१ ते १३६०

दासोपंताची पदे - पद १३४१ ते १३६०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१३४१
येइन तुजसवें; मज वेगळें न सवे.
अवधूता ! भेटि देइं ! मीं जाइन जीवें. ॥१॥धृ॥
वियोगें मन वो ! वियोगें मन वो !
व्याकुळ होतसे चित्त, चेतन वो ! ॥छ॥
तुजवांचूंनि आन नेणें; योगधन तूं सत्य जाणें.
दिगंबरा ! अवधारीं, तुझे चरण मीं जाणें. ॥२॥

१३४२
मज देखतां वय गेलें; क्षिण करणगण जाले;
मरण वरि आलें दत्ता ! तुझे पाए अंतरले. ॥१॥
कमळनयना ! काळाग्निशमना ! दत्ता ! पाव सगूणा !
भवदुःख निर्दाळना ! ॥छ॥
दश दिशा मीं पाहें, तुझी न कळे सोये;
दिगंबरा ! न येसी. आतां तरि करणें काये ? ॥२॥

१३४३
तुजकारणें योगसेवा, जप, तपसु, देवदेवा !
परब्रह्म सगुण तूं मज कां मोहिसी मावा ?
तुझा संगु लाहिन; तुझे पाये पाहीन;
माजें वेधलें मनस, तुजसवें येइन. ॥छ॥
वेद श्रमले च्यार्‍ही; तुझी नेणवे थोरी
दिगंबरा ! ब्रह्म तूं तुझे मीं पाउले धरीं. ॥२॥

१३४४
जन, वीजन, योगिराया ! धन स्वजन, सर्व माया !
भवस्वप्न आभासु वायां. गुणीं बाधक कर्म क्रीया.
येणें विश्व बुडालें; सुख सर्व हीं गेलें;
उपदेशु न चले; ऐसें तुवां कासया केलें ? ॥छ॥
अहंममता जन्मवरी जना लागली श्रमकरी;
मनोवासना ते चि वैरी; दिगंबरा ! अवधारीं ! ॥२॥

१३४५
जिणें जाहालें भारु, माये ! गुणसंगु हा बाधिताहे;
कुडे कर्म निपजे. कैसें वो ! मरण न ये ?
काये करूं ? कैसें मीं करूं ?
क्रिया करिजे ते चि वैरी ! दया नूपजे क्षणुभरी !
दिगंबरा आठवेना, ऐसी मीं पडली दूरी. ॥२॥

१३४६
वयसरिता वाहातिसे; दिनें दिनु हा जातु असे;
अवधुता ! काये करूं ! माझें काहीं हीत न दीसे !
मज पूर्व आठवे, तें पद आठवे;
कमळनयना ! तुझा तो संगु आठवे ! ॥छ॥
मन साधनें स्थीर नोहे ! जनसंगु हा बाधिताहे !
दिगंबरा ! हृदयीं तुझे मीं आठवी पाये ! ॥२॥

१३४७
मि वो ! जातिसें भवपुरें, मज पेलितें कर्म वारें.
अवधूतु न दीसे, आतां मीं कैसेनि तरें ?
दत्ता ! कास देयीं ! अवधूता ! कास देयीं !
निदान वरि आलें ! अतःपर पाहासी कायी ? ॥छ॥
स्वजन, जन, वन धन, धनद, गूणगण,
दिगंबरा ! दूरि करीं ! शरीरीं जडलें वोसाण. ॥२॥

१३४८
तुज पाहातां श्रमलियें; पुरें पाटणें पावलियें;
येरधारा करितां, असुखा पात्र जालियें !
होतासि कोठें ? आलासि कोठें ?
धरीन हृदयीं; आतां तूं जासील कोठें ? ॥छ॥
योग लंधिले गिरिवर; चलें अचल श्रमकर;
दिगंबरा ! लपणीचें तुझें तें न कळे घर. ॥२॥

१३४९
देहधारणीं सूख कायी ? श्रमु सांगतां पारु नाहीं !
आत्मया ! अवधूता ! भला धरिलासि ये देहीं !
धरीन पायीं; घालीन हृदयीं;
अवधूता ! कें जासी ? तुझा विश्वासु मज नाहीं ! ॥छ॥
म्यां पाहिलीं योगवनें; क्रिया तेवी चि सर्व जाणें.
दिगंबरा ! तुजलागी तपस, मंत्र साधने. ! ॥२॥

१३५०
नित्य पाहातां दश दिशा, जीउ जाहाला माये ! पीसा !
अवधूतु न दिसे ! आतां हा जाणिजे कैसा ? ॥१॥धृ॥
मीपणसारा मानसें वारा !
अवधूतु सखिये ! यायाचा कळला थारा ! ॥छ॥
दृष्टी न दिसे; पाहातिये. असे तिये चि आड माये !
आत्मा अवधूतू. आतां मीं सांडीन तीये ! ॥२॥
१३५१
हा वो ! गगना आड ठाये. नाकीं देखणा तो चि आहे.
झाडीतां मीपण हें, ययाची लागली सोये. ॥१॥धृ॥
आतां प्राणु देयीन; जीउ देईन.
अवधूतु सांपडला, आतां मीं भेटि घेइंन. ॥छ॥
हा वो ! मीपण आड होता; रूप न दवी शोधु घेतां.
दिगंबरु सखिये ! कैसा ? कें जाइल आतां ? ॥२॥

१३५२
॥ मोखलीस. ॥
चालतां शब्दपंथें श्रमली माये ! क्रियेचें भान मातें आंगीं न साहे.
तापें त्रिविधें चित्त जळोंनि जाये ! ॥
विश्रांति कैसी ? तुझे देखैन पाये ! ॥१॥धृ॥
दत्ता ! तूजवीण न सवे मातें ! वियोगदुःख थोर बाधी जीवातें ! ॥छ॥
संसारदुःखद्रुमुविषयच्छाया फळतें दीसें. परि लटिकी माया.
माजिर भ्रामक; मीं न सेवी तया. दिगंबरा ! हें पुरे ! लागैन पायां ! ॥२॥

१३५३
संसार व्याघ्र, वन निर्जन, माये !
सांडूंनि गेला दत्तु. करूं मीं काये ?
दुःख वाटलें जीवीं; मोकलीं धाये;
दीर्घस्वरें मीं सादु घालीत आहे. ॥१॥धृ॥
दत्ता ! ये इं रे ! कमळनयना ! लीलाविश्वंभरा ! कालाग्निशमना ! ॥छ॥
काम, क्रोध, हे नित्य भुजंग दोन्ही लागले; देवा ! वेधु करीती गूणी.
गुणाची न चले येथ करणी. दिगंबरा ! तूं पाव, पाव निर्वाणी ! ॥२॥

१३५४
संसारसागरीं हें मानव्यतारू जर्जर जालें क्षीण; न पवे चि पारू.
बुडैल क्षणा येका ! कैसें मीं करूं ?
न दीसे येथें तुजवीण आधारू ! ॥१॥धृ॥
दत्ता ! येइं रे ! श्रीयोगिराया ! वरदमूर्ती ! मीं लागैन पाया ! ॥छ॥
कर्मक्षयें क्षीण विछिन्न जालें; जराग्रस्त संधिबंधीं सूटलें.
दिगंबरा ! तुझें चिंतन केलें; न येसि, तरि सर्व वायां गेलें ! ॥२॥

१३५५
संसारुवन्हिमाजि हरणु मीं देवा ! गुंतलों ! मार्गु नेणें; घेतुसें धांवा !
आक्रंदें ! शब्दु करीं ! पावें माधवा !
दत्तात्रेया ! येइं श्रीदेवदेवा ! ॥१॥धृ॥
नेणें श्रीगुरू ! तुमची सेवा ! चुकलों ! अपराधु क्षमा करावा ! ॥छ॥
श्रमले करणगण; निर्वाण जालें. मौनें चि आठवीं मीं तुझीं पाउलें.
आणीकु येथें काहीं प्रेत्नु न चले. दिगंबरा ! मीं दीन वायां गेलें. ! ॥२॥

१३५६
संसारसंभ्रमें मीं क्रीडतां देहीं, आठऊ तुझा मज घडला चि नाहीं.
अपराध केले ते मीं सांगों कायी ?
दावीतां मुख वाटे शंका हृदयीं. ॥१॥धृ॥
धिग्य शरीर हें माझें ज्यालें ! दत्तासारिखें रत्न हातूंनि गेलें ! ॥छ॥
सदन, धन, वन, स्वजन, जाया, सोषितां सर्व वय गेलें हें वायां.
बाधक होये ते चि घडली क्रिया. दिगंबरा ! मीं कैसें करूं ? आत्मयां ! ॥२॥

१३५७
कामक्रोधें नित्य अंतर जळे. कासया वरि वरि लाविसी डोळे
मनस विषयीक बाहेरि पळे.
सुषुप्ति आली, कैसें सर्वांग डोले ? ॥१॥धृ॥
बकाची परि जाली गा  ! देवा !
मायीकु भक्तु कैसा करितुसे सेवा ! ॥छ॥
कल्पना बैसउंनि जीवाचां मूळीं स्फट्कारें बाह्य करीं, वाजवीं टाळी.
दिग्बंधु, जपु मुद्रा क्रिया जे केली,
दिगंबरा ! ते सर्व दुःखार्थ जाली ! ॥२॥

१३५८
माध्यान्हीं माझा घरीं पडलें खान.
चोरटें आलें माये ! कवणी कडूंन !
ग्रंथि भेदूंनि माझें नेलें चिद्रत्न.
जीवाची जीवें केली होती जतन. ॥१॥धृ॥
देगा ! देवा ! माणीक माझें; मज चि माजि परि मातें नुमजे !
येथें तवं नाहीं आलें परावें दूजें;
न दीसे; आतां काये कैसें कीजे ? ॥छ॥
समाधीची वो ! खूण मोडली माये ! मीपण पडलें रीतें; जाहालें काये ?
योगादि संपदा ते कवणाची होये ?
दिगंबरा ! तें रत्न परीस आहे ! ॥२॥

१३५९
संसार वीष मेघ वर्षती धारा ! लागती बाण मातें सूक्ष्म शरीरा !
कामक्रोधादि वेगु सूटला वारा !
भललें मन माझें; नेघें विचारा ! ॥१॥धृ॥
पालवें देवा ! करिकिआ सेॐ, पोटांतु घालीं. मज येतुसे भेॐ. ॥छ॥
विद्युल्लता झळके त्रीवीधु तापू; मेघांचे शब्द थोर; येतुसे कांपू !
दिगंबरा ! माझी माये तूं बापू कवणासि भारु घालूं ? करूं विलापु ? ॥२॥

१३६०
॥ देशी. ॥
तुं बा ! निर्गुणु निर्मळु, नीजानंदधामा !
योगमायेचा नियंता; आइकें शुद्धश्यामा !
अवधूता ! ब्रह्ममूर्ती ! आत्मयां ! पूर्णकामा !
आह्मीं दिनें ये संसारीं; कैसा पावसी मा ? ॥१॥धृ॥
आनंदा ! नित्यानंदा ! नंदविवर्धना ! रे !
थोर शब्दें आळवीन; पाव चिद्घना ! रे ! ॥छ॥
नाम नाहीं, रूप, वर्णु, गुण ही योगिराया !
क्रिया करूं ते आमुची केवळ भ्रमु माया !
तुज कैसें आराधिजे ? सांगइं देवराया !
दिगंबरा ! दीनबंधो ! अमितगुणवीर्या ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP