मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ८२१ ते ८४०

दासोपंताची पदे - पद ८२१ ते ८४०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


८२१
जनजिवना ! गुणहरणा ! भ्रमदळना ! रे !
द्वैतविषयक्षीणा ! परिपूर्णा ! रे ! ॥१॥धृ॥
सच्चिदानंदा ! परमविशुद्धा ! रे ! ॥छ॥
श्रमहरणा ! गुणदमना ! पद्मनयना ! रे !
दिगंबरा ! करि करुणा; देयी स्मरणा रे ! ॥२॥

८२२
भवहरणा ! सुखकरणा ! तमोमथना ! रे !
अवधूता ! संपूर्णा ! गुणक्षीण ! रे ! ॥१॥धृ॥
त्रिगुणातीता ! तुं जनत्राता रे ! ॥छ॥
जनसहिता ! गुणरहिता ! श्रमगळिता ! रे !
दिगंबरा ! तुज परुता नाहीं त्राता रे ! ॥२॥

८२३
अवधूता ! श्रीदत्ता ! मायामुक्ता ! रे !
प्रिय बहु होसी चित्ता अद्वैता ! रे ! ॥१॥धृ॥
हृदयीं राहीं; स्वसुख देयीं रे ! ॥छ॥
निजभक्ता तूं चि माता, स्वयं पीता रे !
दिगंबरा ! पुरे आता भववेधा रे ! ॥२॥

८२४
वैराटिका.
गुणपरमित हे माया सखिये ! वो ! आश्रयाची वो !
मूळमतिस्वरूप क्रिया त्रिगुणमयी, सगूण, स्वगुणी अद्वया.
नेणती साधु, स्वरूपें चिन्मयी, अव्यया. ॥१॥धृ॥
तें मीं पाहिन नयनीं मनुज. श्रमलें मन. बोलैन मीं तेणेंसीं गूज. ॥छ॥
जन, धन, स्वजन, जाया सखिये ! वो !
काये मीं करूं ? मन माझें ने घे वीषया.
चंचळ मग सगूण; मीं नलगें तया.
दिगंबरें मनस माझें न धरी क्रिया. ॥२॥

८२५
पळ पळ गेलें वो ! वायां बाईये ! वो !
श्रीगुरुवीण न कळे वो ! विहीत क्रिया.
चंचळ मन सखिये ! अनुसरे वीषयां.
ताप त्रिविध भोगिताहे; चूकलें तया. ॥१॥धृ॥
तो मीं नयनीं पाहिन सखिये !
श्रीदत्तु हा वो ! करूं काये ? अझूणी न ये. ॥छ॥
जनवन भ्रमण वायां बाइये ! वो ! सद्गुरुवीण न तुटे हें.
श्रीगुण माया. निश्चळें मनें सखिये ! तें न चले क्रिया.
दिगंबरें वो ! येकेंवीण नेणें दूजया. ॥२॥

८२६
तळमळ कीती वो ! करूं बाइये ! वो !
नयनी वाटु पाहें; मज न धरे धीरु.
कवण माझें दूरीत ? मीं केवि सावरूं ?
तपती ताप; तेणेंवीण नावडे परू. ॥१॥धृ॥
चांदु, चंदन न साहे गायन.
श्रीदत्तेंवीण सखीय ! वेचती प्राण. ॥छ॥
पाहिन पंकजनयना बाईये ! वो !
येणें वो ! वीण रूप येर नावडे मना.
केवळ माझा हृदयीं वो ! हे चि वासना.
दिगंबरचरणीं मन वेधलें गुणा. ॥२॥

८२७
असंग, संगवीहीन, असंग, त्रीगुणहीन,
असंग, अरूपु, सैये ! विज्ञानसार.
गुणसंगें वो ! तें सगुण. अवधूत योगिया योगधन.
तत्वसार, सुनीधान, अवो ! सैये ! भावहीन. ॥१॥धृ॥
सार्वकाळ करीन मीं सेवन. ॥छ॥
अनंत, अद्वयसार, अनंत, सुखदकर, अनंत, अद्वय सैये !
आनंदमय परमात्मयाचें शरिर, दिगंबर, भक्तजीवन, शंकर,
निर्विकार, भावपर, अवो सैये ! अनंतर. ॥२॥

८२८
सगुण चंचळ मन, सगूण करणगण सगूणें निर्गुण कैसें सेऊं मी ? माये !
परमाद्वय हें नीर्गुण रूप याचें सद्रूप, सचेतन, आत्मतत्त्व, नीरंजन,
आदिरूप, अकिंचन. ॥१॥धृ॥
काये करूं ? पारुषलें मीपण. ॥छ॥
अनन्यचेतन ध्यान, अनन्यचेतन ज्ञान,
अनन्यचिंतन सैये ! काये मीं जाणें परमात्मयाचें सेवन ?
दिगंबरीं भेदाचें निर्दळन, सुखरूप, संनिधान, अनंदुतें आरोपण. ॥२॥

८२९
सगुणें निर्गुणध्यान; सगूणें येणें वो ! ज्ञान;
सगूणांवांचूंनि मातें प्रीय चि नाहीं.
परब्रह्म हें वो ! सगुण. अमळपणें अविद्येचें दहन.
सार्वकाळ ज्याचें ध्यान आनंदद, प्राणधन. ॥१॥धृ॥
भक्तजन जाणती याची खुण. ॥छ॥
सगुणें व्यापीले जन. सगूणीं वेधलें मन.
सगूणीं भजतां सैये ! आयासु नाहीं.
परमानंदाचें कारण अनंतर करीतां संसेवन
दिगंबरें नूरे मन; अनवृत्ती आलंबन. ॥२॥

८३०
आठवीतां सगूणीं गूण सगुणीं वेधलें मन.
सखिये ! कै कै वो ! याचें होईल दर्शन ? ॥१॥धृ॥
सखिये ! माझें मन व्याकुळ; भेटी अंतःकरण
जाहालें मीपण व्याकुळ. ॥छ॥
विसरतां बळें स्फुरे; आठवे आठउ नूरे.
दिगंबरीं आसक्ति माते; नूमजे दुसरें. ॥२॥

८३१
अनुसरतां न गूणा; परति न कळे मना.
ठायें ठाॐ चित्त विरे; वीषयो गमेना. ॥१॥धृ॥
बाइये ! मीं नेणें भजन यया दत्ताचें
पाहातां पाहाणें खाये; राहातां नुरें गे ! माये !
दिगंबरु आणीतां लक्षा, दूसरें न साहे. ॥२॥

८३२
प्रतिक्षणीं तूझें ध्यान; न सूटे तेथूंनि मन.
अवधूता ! तुझां रूपीं रूपलें चेतन. ॥१॥धृ॥
आत्मया ! तुझा संदु लागला;
देवा ! रे ! तुझा वेधू, रूपअवबोधू लागला. ॥छ॥
परती न लाहे मन; जाहालें वीषयक्षीण.
दिगंबरा ! कयी मातें होईल दर्शन ? ॥२॥

८३३
ऐसी कैसी कर्मरेखा ? जाहालासी पारीखा.
योग कैसे ? ते मीं नेणें. दुःखद भूमिका. ॥१॥धृ॥
ऐसा नको करूं कठिण, देवा ! नको करूं कठिण.
बा ! रे ! बहु वाटे कठिण. पाहीन मीं तूझें वदन. ॥छ॥
दिगंबरा ! तूं जैं आत्मा, तरि काइसा योगु आह्मां ?
जाणतां मीपण नूरे. जडलें तें तुह्मां. ॥२॥

८३४
योगिराया ! मायातीता ! अवधारी अवधूता !
मायेबापा ! कयी, सांग, भेटसी मागुता ? ॥१॥धृ॥
देवा ! तुझें ध्यान लागलें; रूपीं माझें मन;
गुणीं अंतःकरण सत्य ! सत्य ! जाण, वेधलें. ॥छ॥
कृष्णश्यामा ! अब्जनयना ! सच्चिदानंदघना !
दिगंबरा ! मंत्रराजा ! स्वरूपवेदना ! ॥२॥

८३५
चाली भिन्न.
अवधूते ! माये ! येईन मीं तुजसवें.
न करी कठीण; तुझी लागली वो ! सवे. ॥१॥धृ॥
तुझा धरिला गे पदरु; न धरीं मीं आतां धीरू.
तुझेंनि वियोगें दुःख केवि तें सावरूं ?॥छ॥
बहु दीन गेले पाहतां वो ! तुझी सोये.
दिगंबरे आतां तुतें सोडूंनि न राहे. ॥२॥

८३६
गुण तुझे माये ! न येति वो ! गणीतां.
आठवसी मनीं, येणें तपे दुःखसविता. ॥१॥धृ॥
भ्रमु लागला वो ! मानसीं धड चि जालिये पींसी.
आळवीन परोपरी. रंगली जीवेंसीं संदु. ॥छ॥
नयन सजळ; माझें हियें फूतताहे.
दिगंबरे ! तुजवीण, राहिलें, न जाये. ॥२॥

८३७
जवळी निधान; मना ! भ्रमशील कायी ?
श्रीदत्तु आत्मा; यातें जाणपां हृदयीं. ॥१॥धृ॥
स्पंदु न करी रे ! मनसा. नको भ्रमो दश दिशा.
जाण तें जाणतां मोक्षु लाधला वीदूषा. ॥छ॥
मायामय हें भान तुजप्रति नाहीं. दिगंबर परब्रह्म तूंचि तूं अदेही. ॥२॥

८३८
मायामय मन, मायामय भान, मायामय हे सर्व योगसेवन. ॥१॥धृ॥
मन्ना न करी रे ! मानसें; सांडि तें सकळ पींसे.
अनुभवें तुझा तुं; तैं करणें कायीसें ? ॥छ॥
मृगजळ वाॐ; धरिजे तेथें भाॐ.
दिगंबरु तूंचि; येथें काइसा उपाॐ ? ॥२॥

८३९
श्रवण करितां मन विगुंतलें गूणी.
गुण ते सकळ, तेणें सांडिली करणी. ॥१॥धृ॥
शब्दु न करी रे ! मनसा ! न धरीं या गुणभासा.
आपेंआप निवळैल बोधु तो आइसा. ॥छ॥
दिगंबरगूणें मी दिगंबरु जाली.
मीतूंपणाची अवघी वृत्ति हरली. ॥२॥

८४०
तोंडी
कवण सुकृत ? दैव कवण ? वो ! बाइये !
श्रीदत्तासारिखें रत्न सांपडले गोरिये ! ॥१॥धृ॥
प्राणधन माझें, अवो ! प्राणधन माझें,
करीन जतन; दत्तु प्राणधन माझें. ॥छ॥
परती न धरी मन अवृत्ती पाहातां.
दिगंबरीं सखिये ! मीं पावलीयें स्थीरता. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP