मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ९०१ ते ९२०

दासोपंताची पदे - पद ९०१ ते ९२०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


९०१
विष ही घेतां परि मातें भय नाहीं तुझेनि हातें.
देवा ! अमृत ही परहस्तें तें अनर्थ करेल येथें. ॥१॥धृ॥
तरि तूं पासूनी न वचे परुता देवराया ! श्रीअवधूता ! ॥छ॥
अवगमितां पुडतो पुडती मज नाहीं दुसरी गती.
दिगंबरा ! मंत्रमूर्ती ! अतिशीघ्र करीं परति. ॥२॥

९०२
दिसे तें नव्हे साचार, भान अवस्था गुणगोचर
स्वप्न प्रत्यक्ष साकार पाहतां जैसें; तैसें सकळ मायिक; वायां करितासि
दुःख, बंधमोक्ष लटिक; तें कां स्मरतासि ? ॥१॥धृ॥
जना ! होइं रे ! सावधानु. आत्मा तुं उपाधिविहीनू.
गुण मतीचे देखणें सर्व विसरलेपणें.
शुद्धस्वरूपवेदनें तुं चि परिपूर्णू. ॥छ॥
नेणसी तवं हा संसारु. जाणतां तूं चि निराकारु.
पृथगसंतु हा साकारु प्रपंचमृगजळें.
येथें काइसें तरणें ? योगसेवया श्रमणें ?
दिगंबर उमजणें अज, निज, निश्चळ. ॥२॥

९०३
तक्र निसार, सत्य जाण; कां करितासि अतिमथन ?
दृश्य विवर्त्तु, प्रपंचभान दिसे मृगजळापरी.
येथें देवो तो कवणु द्रष्टेनसीं विलक्षणु ?
चित्र पाहोंनि रावनु कां रे ! सत्य मानिसी ? ॥१॥धृ॥
मूढमतीचा वितर्कु; जनु न मनी तात्विकु.
सत्यद्रष्टा आणिकु नाहीं दुसरा तया. ॥छ॥
नान्योस्ति द्रष्टा, हें वचन; तत्केन किं पश्येतु, ह्मणौन
वाक्य वैदीक, जाण, प्रमाण येथें.
दिगंबराचें बोलणें आलें अनुभव खुणे.
आतां बळ तें केसणें मूढमतीचें तेथें ? ॥२॥

९०४
तत्वमस्यादि वाक्यविचारें पदार्थशोधन पुरस्कारें
तत्व उपपादितीं चतुरें मनुजें बापा !
तर्‍हीं परंतु सद्गुरू याचा नेणवे चि पारु.
योगी जाणोंनि निर्धारु अनुसरती तया. ॥१॥धृ॥
दत्ता ! सद्गुरुराया ! परब्रह्म तूं अव्यया !
तुझें चरणस्मरण तें चि तत्वेवेदन;
ऐसी कळलीसे खूण मज हृदयीं रेया ! ॥छ॥
अवस्थेविण अवस्थान, देखणें दृष्टीवांचून,
जेथें वितूळलें भान, नुठी प्रपंचु कहीं.
आत्मा ब्रह्मदर्शन आंगीं प्रकटवी खुण.
दिगंबराचें वचन ऐसें दुसरें नाहीं. ॥२॥

९०५
दृश्य स्वप्न तें देखणा चि, साकारता निराकाराची,
स्वप्न दृष्टी येथीची प्रतीति अना.
शरीरेंसीं विलक्षणता रोकडी प्रतीति नसतां
बहुसाल ज्ञावार्ता सांगे गुरू.
तैसें करितां श्रवण नव्हे भवछेदन;
व्यर्थ भजती अज्ञान; तैसा नव्हे सद्गुरू. ॥१॥धृ॥
आधीं सिद्ध प्रतीति पाहे, देहव्यतिरेकें देखणें आहे;
द्रष्टा दृश्य जेथें दर्शन न दिसे; मा तें चि होउनिया राहे रे ! ॥छ॥
योक्तयाचें नाहीं ज्ञान, जो विज्ञान जन्मस्थान,
करी मुद्राबंधन, लक्ष पाहे डोळां.
तें बा ! अवघे कुमत; नव्हे वेदविहित;
दिगंबरीं अनुचित; ते वेगळी कळा. ॥२॥

९०६
देहेंसीं विलक्षणपण, तरि कां योगाचें सेवन ?
बाहीं बांधोनि पाषाण, कां रे ! तरतासि ?
आधीं आपणा जाणयीं. तेथें अयोगू चि नाहीं.
यागु ह्मणिजे तो कायी भेदविगतासि ? ॥१॥धृ॥
आतां काये धरितासि वायो ? तद्द्रष्टा तूं अव्ययो.
सहजमुक्तु तें बंधन असतां, पाहातासि मोक्षाश्रयो रे ! ॥छ॥
जें देह, जे जे अवस्था तेथ दृष्टत्वें चि विलक्षणता.
सिद्ध सहज जाणतां आयासु नाथी.
ऐसी न कळत खुण, वाया भ्रमतासि वन.
दिगंबराचे चरण दृढ धरीं चित्तीं. ॥२॥

९०७
जाणिवेचेनि आगळेपणें सैर बोलतासि वचनें.
तरि जाणू तो जाणवेपणें जाणवेना.
जेथें परा कुंठली; अहंमति वितूळली;
स्थिति सहज उरली; तेथें जाणणें कैसें ? ॥१॥धृ॥
सांग रे ! सज्ञाना ! जेथें न धरवें मनत्व मना;
तेथें खुणेचें जाणणें, वृत्ति मारूंनि असणें,
जैसें गगन गगनें दूरि धरवेना. ॥छ॥
आतां दृश्यदर्शननिरासें आणि स्वरूप जवं प्रकाशे,
तवं माजिचे देखणें कैसें ? सांग, बापा !

९०८
चालतां चंचळ चरण चळती निश्चळ मन
मननी मानसगुण सांडूंनिया.
श्रृयश्रावकश्रवण माते न कळे ते खुण;
रूपी मिसळलें वेदन; मन न धरीं क्रिया.
व्यक्तीं करितां भजन; टकमकिती लोचन;
द्रष्टा गिळुंनी दर्शन तो वसवी आश्रया.
तेथें वाचा राहिली; गुणकरणें सूटली;
भेदवासना तूटली; ठेली स्थिति अव्यया. ॥१॥धृ॥
आतां काये करणें ? कैसें करणें ?
जाणती विषयो मनें जाणवे चि ना.
अवधूतें वो ! बोधन माझें हरिलें सगुण.
रूप आपूलें करूंन आतां वागवी तया. ॥छ॥
आंगीं स्पर्शु आडले; तो ही न कळे, न कळे.
कले कळणें वेगळें मूळें सूटलें माये !
अहंममता राहिली; भावा अभावो कवळी;
तया बैसलासे मूळीं; आतां करणें काये ?
मति जाहाली निर्मुळ; नाहीं, नाहीं आश्रयबळ;
चित्त गळित व्याकुळ माझें प्रशमताहे.
दिगंबरें विमोहिलें रूप दाउंनि आपलें;
माझें मज मीं न कळे; ऐसें घडलें सये ! ॥२॥

९०९
रूप दाऊंनि सगुण करी गुणप्रहरण;
हे चि जाणीतली खुण गुणरहिताची.
दृष्टी पाहातां लक्षणें भेदत्रयेंसीं नूरणें;
चिन्हें जाणवती खुणे भेदविगताचीं.
क्रीया क्रियेंतें नूरवी; वृत्ति स्वरूपीं जीरवी;
क्रिया घडते बरवी कर्मगलिताचीं.
रूप आठवे सावळें; देहत्रय तेणें गळें;
नीज रूप निवळे; तरि तें हीं तें ची. ॥१॥धृ॥
परब्रह्म गुणवंत जालें; तें चि तद्गुणीं उमजा आलें;
कृष्णश्यामरूप राजीवलोचन देखोनि हृदय निवाले वो ! ॥छ॥
रूपीं ठेवितां चेतन तेथें नुरे भिन्नपण;
उपादान तें ह्मणौन, ऐसी खुण आली.
ज्ञानें गमितां अज्ञेय; ज्ञाना नुरउंनि ज्ञेय;
स्वसंवेद्य सनाय प्रतिति जाली.
योगी ह्मणती निर्गुण; आह्मीं भजों तें सगुण;
दत्तु ब्रह्म चिद्घन वासने मूळीं.
निष्ठे भजती अभेदु; भेद छेदे तो भेदु;
आह्मां जाणवें अभेदु दिगंबरस्थळीं. ॥२॥

९१०
सुनेत्रकमळ विशाळ, कंठीं सुमनाची माळ.
स्वरूप सुंदर शामळ कैसें बरवें !
किरीटु शिरसस्थानीं, कुंडलमणि श्रवणीं,
जटितें तेणें करूनि दिनमणि शोभे. ॥१॥धृ॥
माये अवधूतयोगें सुरगण शोभती; संगें निजगण
पुढें मागें बरवताती. ॥छ॥
सुवर्ण वर्णें वस्त्रें देवांगें पवित्रें मंत्रबीजाक्षरें मिरवताति.
चंदनें डवरिला, भक्तीं आराधिला, दिगंबरू देखिला सहज स्थिती. ॥२॥

९११
सुरतरुचिंतामणीयीं जालीं ठेगणीं. दत्ता ! तुझां स्मरणीं अगणित महिमा.
नरसुरमानवगण, जे करिती स्मरण, तयां भवबंधन स्वप्नीं कें ? गा ?
योगी लांचावले, जे तत्वीं गुंतले, नुपडति काहीं केलें, न पवति श्रम.
अवधूता ! मीं, जाण, न मगें काहीं आन;
वेधलें माझें मन तुझया नामा बा ! ॥१॥धृ॥
तुझें नामस्मरण तें मज संजीवन; निश्चळ करीन मन तये ठायीं बा ! ॥छ॥
मानस ठेऊंनि स्मरणीं, विसरु करितां गुणी.
स्मरणास्मरणस्मरणीं पारुषलें बा !
वरि पडलें निर्वाण; नुरे चि कर्तेपण; आज्ञानेंसीं ज्ञान गुण च रमेलें.
मींपण होतां क्षर; तेथें तूं चि सार; तैं तें मन येकत्र मिळोनि गेलें.
दिगंबरा ! जाण, ऐसें तुझें स्मरण, ब्रह्म सनातन स्थीती आलें बा ! ॥२॥

९१२
आनंदाचें स्थान हृदय नंदनवन; तेथें तूं येऊंनि क्रीडा करिपां !
प्रेम अमृतपान मज परुतें जीवन; निजसुखसंवेदन तूं हीं घेपां !
विहितें क्रियाफळें मग मागिती रसाळें; सांडुंनि तीं वनफळें जासी कां ? पां !
योगद्रुमातलिं विश्रांतीसाउली पूजिन
मानसकमळीं अरूपरूपा ! ॥१॥धृ॥
तुझेनि संगें मुनिजन रंगति रंगें;
सद्भावप्रसंगें निश्चळ होती बा ! ॥छ॥
कामक्रोध जन कुश्चित करिती, जाण, तुझें क्रीडावन परमपुरुषा.
श्रवणावरि येकांतु, ऐसा तो वसंतु, कैसी सुमनें ? रुतु बरवा कैसा ?
ऐसा जाईल पुडती; वनवैरी भ्रंशिती;
भुमि का चाळुनि नेती अवघी वयसा.
दिगंबरा जाणें. काये कित्ती सांगणें ?
उचित तैसें करणें, जें प्रिय मनसा. ॥२॥

९१३
सद्गुरुमूर्तिध्यान मोक्षाचें साधन योगामृतसेवन चरणस्मरणें.
पाहातां न दिसे आन तेणेंसी समान.
ब्रह्मात्मविज्ञान प्रतीति जेणें बा ! ॥१॥धृ॥
श्रीदत्तु निर्वाण योगामृतसेवन.
वरि न पडे संसरण त्याचेनि स्मरणें बा ! ॥छ॥
नेणोंनि अज्ञान भजती पाषाण, मृत्तिका, जीवन; तें मज न मने.
काइसे योगज्ञ, योगांगसाधन सांडूंनि श्रीगुरुसेवन आणीक करणें ? ॥२॥
गुरुप्रेम सुखर बह्मैक्यसाकार भजती सूरगणनर मोक्षहेतू.
सद्गुरुवचनामृत ब्रह्मानंदाकृत निरसी द्वैताद्वैत, दावी वस्तु. ॥३॥
नानासाधनफळ गुरुवाक्य चि केवळ; तूणेंवीण बरळते चुकती पंथु.
ऐसा दिगंबरु बोळगतां सद्गुरु, वरि न पडे संसारु गुणवीवर्तु बा ! ॥४॥

९१४
नलनीदलगतजळ चंचळ, चल, चपळ; चळतां तें केवळ विलंबु नाथी.
सरितेचा पुरु सरे, वय तैसें वोसरे;
मग मरणें संचरे शरीरव्यक्ती. ॥१॥धृ॥
श्रीदत्तु चिद्घन हृदयीं करिं जतन;
ब्रह्म सनातन स्वयें चि होसी बा ! ॥छ॥
जन, धन, यौवन, जाया क्षणीक क्षीण आत्मया !
गुणगण चिदव्यया ! कैचें पुडती ?
गणवण करिसी काह्या ? मर मनसा अद्वया,
सांडूंनि दत्तात्रेया पुडतोपुडाती ? ॥२॥
झरझर झरती धारा बोलल्या जलधरा,
परि गुणु तो अंबरा न लगे जैसा; गगनीं चंचळपणें चळतां हीं निजगुणें
पर्वतु जेणें पवनें डोले जैसा; ॥३॥
गुणकरणव्यापारें हर्षामर्षभरें न चळे गुणव्यापारें आत्मा जैसा;
जाणोनि राहीं स्थिति न लगतां गुणवृत्ती, दिगंबरसंप्राप्ति ते हे मनसा. ॥४॥

९१५
भिन्न चाली
देवा ! दुरितहरचरणा ! भ्रम मद भव हरणा !
आत्मयां ! गुणनिधाना ! तुझा वेधू या मना.
हृदयपुररमणा ! भेटी देयीं सगूणा ! ॥१॥धृ॥
अरे ! श्रीयोगिराया ! अमितगुणवीर्या !
हे गुरो ! बा ! रे ! श्रीगुरो ! दत्तात्रया ! ॥छ॥
परमात्मयां ! रामा ! परिपूर्णकामा ! सच्चिदानंदधामा ! हरीं संसारश्रमा,
सुरगुरो ! रामा ! दिगंबरा ! अनामा ! बापा ! श्रीदीगंबरा ! अनामा ! ॥२॥

९१६
वा ! रे ! विज्ञानसारा ! परिपूर्णपारा !
पारमुक्ता ! अपारा ! देवा ! योगांगधीरा !
पूर्णअवतारा ! श्रीदत्तमूर्ती ! उदारा ! ॥१॥धृ॥
मज भेटसी कयी ? वचन बोलवी. बहुकाळ भेटि नाहीं. ॥छ॥
अरे ! श्रीसिद्धराजा ! मंत्रार्थबीजा !
ब्रह्मचित्सारसहजा ! मनीं विश्वासु तूझा.
प्राणु तूं माझा दीगंबरात्मतेजा ! ॥२॥
बापा ! श्रीदीगंबरात्मतेजा !

९१७
देवा ! विषयसुखसरिता पडलीयें दत्ता !
होतिसे थोर वेथा; तूं स्वजनसुखदाता.
श्रीअवधूता ! तुजवीण कवण त्राता ? ॥१॥धृ॥
अरे ! कमळनयना ! कै करिसी करुणा ? करितसें नित्य स्मरणा. ॥छ॥
अहर्षहर्षलहरी पीटलियें भारी. चंचलां गुणविकारीं तीर बहुसाल दूरी.
ये भवपूरीं दीगंबरा ! सावरीं. ॥२॥

९१८
येणें संसारसर्पे विलयविक्षेपें दंशिलें.
कैसें दंशिलें पापरूपें ? भ्रमु लागला जल्पें.
अमितगुणकल्पे उरि नाहीं स्वरूपें. ॥१॥धृ॥
कयी पावसी ? गरुडनाथा ! कृपामंदिरा ! अवधूता ! ॥छ॥धृ॥२॥
कयी पावसी ? गरुडनाथा ! कृपामंदिरा ! दत्ता !
आरत पुरवीं जिवीचें; भेटि दे अवधूता ! ॥छ॥
येणें अवृत्तिपापें, तमसगुणकल्पें,
भेटला हा वरूपें. देवा ! त्रिगुणकृतलोपें,
चललिये कंपें, दीगंबरा प्रकोपें. ॥२॥

९१९
ज्ञानविवर्जित बोले; अंगचारें मायीकु डोले.
बकु जैसा निश्चळु न चळे; तैसा लावीना उघडी डोळे.
विषयो जे चित्ता न मिळे, कामवेगे हृदय डहुळे;
क्रोधगुणें उचंबळे. ऐसा माइकु कैसा न कळे ? ॥१॥धृ॥
विश्वासु कैसा मीं धरूं ? तें श्रवण कैसें सांग करूं ?
न ये भानु तो सद्गुरू. मंदमतीचा व्यवहारू. ॥छ॥
परअर्थीं घाली दृष्टी. कामना दृढतर पोटीं.
करी क्रिया ते ते खोटी, मनोवासना जरि वोखटी.
तेणेंसीं न हो भेटी, सर्वस्वा होईल तूटी.
न करी दिगंबरा ! कष्टी; आतां झडकरी यावें भेटी. ॥२॥

९२०
कामवासनेचें बळ, माझें मन चंचळ. पूर्वकर्म केवल मीं वो ! भोगिताहें.
गुणीं करणें गुंपलीं; अर्थपरें वीखूरलीं.
भ्रमु मतीतें जाकळी; यत्नु करितां न ये.
काम क्रोध हे प्रबळ; मद मत्सर वोखळ;
वृत्तिवेग पाल्हाळ; तें हीं गुंपलियें.
वैरीसंगु वो ! वोखटा मातें घडलासे कटा.
पंथु सांडूंनि आणिके वाटा भरलियें. ॥१॥धृ॥
आतां काये करणें ? गे ! माये ! माते उपदेशु आंगीं न साहे.
बोलु ठेविजे कवणा वैर साधितां आपणां ?
आंगि जडली वेदना; जना सांगतां नये. ॥छ॥
कांहीं करितां श्रवण, माझें विषयीक मन
भावो न धरी; भ्रमण अर्थी करित आहे.
दुःख धरूंनि हृदयीं, योगबळें तें निग्रहीं;
तव खुषुप्तीचा डोहीं तें बुडोंनि जाये.
डोले शरीर सगळें, जैसें मदिरा मातलें;
क्षितितळीं उलंडलें; परि स्मरणा नये.
वय वाउगें वेचलें; पासीं मरण पावलें;
जोडी अहीत आपुलें तें चि पडलें माये ! ॥२॥
हित न दिसे काहीं; बाणु लागे हृदयीं;
वीष प्राशूं मीं काइ ? आइ ! सांग मज.
घालूं शरीर पडणी; करूं शकलें मीं दोन्हीं;
अवदान देउंनि वन्ही, साधूं नीज.
गुरु करूं मीं सगुणु; मातें न कळे सज्जनु;
आंगीं असे अवगुणु जन्ममरणबीज.
सखी ! सांगे निर्धारु; नाहीं दुसरा विचारु;
नित्य स्मरें दिगंबबरू; पारु पावसी बूझ. ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP