मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|
धर्मशास्त्राच्या वादांतील लपंडावाची ठरीव पद्धती

धर्मशास्त्राच्या वादांतील लपंडावाची ठरीव पद्धती

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


आताची ही कल्पना रूढिभक्तांना मात्र योग्य वाटत नाही, व यदाकदाचित वाटली तरी तसे कबूल करणे हे त्यांच्या जिवावर येते. एका बाजूने स्मृतिवचन खोटे असे तर म्हणावयाचे नाही, व दुसर्‍या बाजूने स्त्रीपुनर्विवाहास मोडता तर घालावयाचा, ह्या दुहेरी लटपटीचा प्रत्यक्ष अनुभव पुणे मुक्कामी झालेल्या वादाच्या वेळी पूर्णपणे आला. धर्मशास्त्रातील वचन कोणतेही असो, ग्रंथातल्या ग्रंथात मागचा पुढचा संबंध पाहून अर्थ ठरवावयाचा ही पद्धती आमच्यातील धर्मशास्त्रज्ञ म्हणविणारांनी फ़ार दिवसांपासून टाकून दिली आहे. प्रत्येक विषय निरनिराळा घेऊन त्या विषयास लागू असणारी मूळ ग्रंथांतील वचने एकत्र करून हेमाद्री, निर्णयसिंधू इत्यादी ग्रंथांत मोठमोठाले व्यापक संग्रह केले आहेत. संग्रहाच्या दृष्टीने या ग्रंथांच्या कर्त्यास दोष कोणीही देणार नाही; परंतु दोष न दिला तरी या संग्रहपद्धतीपासून वास्तविक उपकार होण्याच्याऐवजी अपकार होण्याचे मात्र साधन उत्पन्न झाले. हरएक विषयासंबंधाने आयती वचने एकत्र केलेली तयार असल्यावर मूळच्या अस्सल ग्रंथांच्या पोथ्या धुंडाळण्याची खटपट कोण करतो ? ही खटपट सुटल्याबरोबर अस्सल जुने ग्रंथ कसरीच्या भक्ष्यस्थानी पडून किंवा इतर प्रकारे लुप्त झाले, व मतलबी लोकांस आपआपल्या पोथ्यांत नवीन वचने, नवीन पाठभेद घुसडून देण्याची व लटपट करण्याची मात्र आयतीच संधी मिळाली.
प्रस्तुत स्थळी ह्या लटपटीची उदाहरणे मुद्दाम दाखवीत बसण्याचे काही कारण नाही, तथापि या अशा स्थितीचा निराळ्या प्रकारे जो घातक परिणाम झाला, त्याचा निर्देश केल्याशिवाय मात्र सुटका नाही. हा परिणाम एवढाच की, धर्मशास्त्रातील कोणत्याही विषयाचा विचार करावयाचा असला, तरी बहुधा या संग्रहग्रंथांतून ( यांनाच ‘ आकरग्रंथ ’ अशीही निराळी संज्ञा आहे. ) नेमकी वचने काढून घेऊन त्या वचनांचा मूळ ग्रंथांतील पूर्वापर संबंध मनात न आणिता कोटिक्रमाने आयत्या वेळी पाहिजे होतोस्से दिसले, की तेथे मुद्दम करण्याचा प्रसंग आलाच पाहिजे. आकरग्रंथात स्त्रीपुनर्विवाहाची साधकबाधक वचने आहेतच, त्यांतील साधक वचनांवरच काय ती अशा प्रसंगी धाड यावयाची हे स्पष्टच आहे, व त्याप्रमाणे ती पराशराच्या ‘ नष्टे मृते० ’ या वचनावर आकरग्रंथांवरून होणार्‍या वादप्रसंगी आल्यास नवल नाही.
परंतु वाद करणार्‍या पंडितांतूनच टीकाकार अगर भाष्यकार यांची उत्पत्ती, असा प्रकार असल्याने वादाच्या वेळचे अर्थ करण्याचे तत्त्व ग्रंथस्थ विषयाच्या टीकेसही लागल्याशिवाय राहणार नाही हे उघड आहे. हे तत्त्व खुद्द बिचार्‍या पराशरासही राहिले नाही. या स्मृतीवर माधवाचार्यांची प्रसिद्ध टीका आहे, तीत पराशरस्मृती कलियुगाकरिता प्रवृत्त झाली हे एकवार कबूल केले असूनही ‘ नष्टे मृते० ’ या वचनावरील मात्र एवढेच हे वचन ‘ युगान्तरपर ’ म्हणजे मागच्या युगाबद्दलचे आहे, अर्थात ते कलियुगात मानावयास नको, - असा लपंडाव उघड रीतीने केला आहे !! असो.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP